११ फेब्रु, २०१६

लाला लजपत राय - फाळणीचे कट्टर समर्थक

लाल बाल पाल हि भारतीय स्वातंत्र्य लढ्याची आद्य त्रिमूर्ती समजली जाते. त्यापैकी बाळ गंगाधर टिळक हे हिंदुत्व वादी विचाराकडे झुकलेले समजले जातात. हे खरे आहे काय  ?

लाला लजपत राय यांनी टिळकांच्या लखनौ करारावर का टीका केली होती ?    

कडवे राष्ट्रवादी लाला लाजपत राय यांनी हिंदु - मुस्लिम फाळणीचे समर्थन १९२० च्या दशकापासून पासून का ? आणि कसे सुरु केले ?  लाला जी धर्मांध होते काय ?

लालाजी  कॉंग्रेसचे कि हिंदू महासभेचे ?  हिंदू महासभा आणि कॉंग्रेसचा संबंध काय होता? इत्यादी प्रश्नावर आपण विचार करायचा आहे. 

 भारतीय स्वातंत्र्य लढ्याची आद्य त्रिमूर्ती लाला लाजपत राय , बाल गंगाधर टिळक आणि बिपीन चंद्र पाल 

१९२० : खिलाफत :  टिळकांचे लोकमान्य समर्थन  

१९२० च्या ऑगस्ट महिन्यात खिलाफतीचे वादळ घोंगावू लागले. केमाल पाशा या मुस्लिम सुधारकाने सनातनी खलिफा हाकलून दिला . त्या  तुर्कस्थानच्या धर्मगुरू - राजगुरू ला पुन्हा गादी वर बसवण्यासाठी  भारतीय मुस्लिमांनी सुरु केलेला हा जिहाद - धर्म पराकाष्ठा होती. जिहादचा अतिशय स्पष्ट उल्लेख खिलाफत कमिटी करत होती.  त्याआधी जून महिन्यात अखिल भारतीय  खिलाफत परिषद स्थापन करण्यात आली. त्याला हिंदुंचा पाठिंबा मिळवण्या साठी हिंदु मुस्लिम अशी संयुक्त बैठक आयोजित केली गेली. त्या बैठकीला गांधीजी बरोबर लाला लजपत राय सुद्धा हजर होते.  १९२० च्या कलकत्ता येथील विशेष कोन्ग्रेस अधिवेशनाचे लजपत राय हे अध्यक्ष सुद्धा होते. खिलाफतीला पाठिबा देण्यासाठी कोन्ग्रेस तर्फे असहकार आंदोलन सुरु केले गेले . त्यावेळी पंजाबचे सिंह लाला लजपत राय गरजले होते कि , 

" खिलाफत हा मुस्लिमांसाठी धार्मिक  विषय असला तरी हिंदू करता तो राजकीय विषय आहे . भारताचे राजकीय हित धोक्यात येणार नाही या मर्यादेतच हिंदु त्यांना मदत करू शकतील."   (१ - २१७ )
१९२० च्या विशेष अधिवेशनात खिलाफतीच्या समर्थनार्थ असहकार आंदोलनाचा ठराव पास होतो . त्याचे  अध्यक्ष लाला लाजपतराय असतात . याच अधिवेशनात टिळकांनि उचलून धरलेली स्वराज्याची मागणी खिलाफत आणि असहाकाराशी जोडली जाते . टिळकांनी लोकमान्य केलेली स्वराज्याची मागणी काय आहे ?

स्वराज्य वेगळे - संपूर्ण स्वातंत्र्य निराळे 

स्वराज्य हे काही संपुर्ण स्वातंत्र्य  नाही . टिळकांनी वसाहतीचे मर्यादित अधिकार ब्रिटिशांकडे मागितलेले आहेत.  लखनौ करार करून टिळकांनी मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणाहुन अधिक मतदान , जास्त जागा  आणि स्वतंत्र धार्मिक मतदार संघ  दिलेले आहेत .

हे जे होमरूल - स्वराज्य  आहे ते म्हणजे शरियतच्या इस्लामी कायद्याचे राज्य आहे . असे मुस्लिमांनी गृहीत धरले आहे. मौलाना आझाद आणि मौलाना बारी अगदी स्पष्टपणे तसे सांगत आहेत . (२-१८५). लोकमान्य टिळकांचा खिलाफतीच्या धार्मिक आंदोलनाला पाठिंबा आहे.  केवळ गांधिजिंचा नव्हे ! (२- १८७)    याच सुमारास मुस्लिमांच्यात कडव्या जातीय आणि हिंदु विरोधी संघटना तयार होऊ लागतात . तंझीम आणि तबलीग या हिंदुचे धर्मांतर करण्यासाठी काढलेल्या त्या संघटना होत. 'जमियत उल उलेमा हिंद'  ने  आता सरळ हिंदुविरोधी भूमिका घेतलेली दिसते. लखनौचे मौलवी बारी लिहितात
" हिंदुच्या भावनेचा विचार न करता गोहत्या करा. जर (इस्लामी धार्मिक कायदा ) शरियत च्या आज्ञा पायाखाली तुडवल्या जाणार असतील , तर तो निर्णय दिल्लीच्या मैदानात घेतलेला असो, कि सिमल्याच्या महालात ! आमच्यासाठी तो सारखाच आहे. इस्लामच्या प्रत्येक शत्रूशी असहकार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे . मग तो शत्रू तुर्कस्थानचा असो कि अरेबियाचा असो कि आग्रा वा बनारस (काशी ) येथिल असो !"  (२- २२७)

खिलाफतीचे परिणाम उलटे झाले . लाल बाल पाल मधील बिपीन चंद्र पाल लिहितात " हिंदुनि आता मुसलमानांप्रमाणेच आपली शक्ती व साधने संघटित करणाच्या मागे गंभिरपणे लागले पाहिजे . " (उक्त २२८)

१९२४ : लाला लजपत रायांचा एल्गार 

२६ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर १९२४ या काळात लाला लजपत राय यांनी ट्रिब्युन वर्तमानपत्रात घणाघाती लेख लिहिले आहेत. कोलंबिया युनिव्हर्सिटिने  ते सर्व लेख इंटरनेट वर उपलब्ध करून दिले आहेत.  (३)  लालाजिं नी लोकमान्य टिळकांच्या धोरणावर जाहीर टिका केलेली दिसते.  टिळक कृत लखनौ करावर सडकून हल्ला केलेला दिसतो . पंजाब केसरी लाला लजपतराय लिहीतात

" लखनौ करारात मुस्लिमाना दिलेले स्वतंत्र मतदार संघ यादवी युद्धाशिवाय काढुन घेता येणार नाहीत. त्यास मान्यता देणे म्हणजे देशाची हिंदु भारत आणि मुस्लिम भारत अशी विभागणी करणे होय. मुस्लिमांच्या वाढत्या मागण्यांपुढे पंजाब आणि बंगालची फाळणी आम्ही हिंदु अधिक पसंद करू . फाळणी करून हिंदु व मुस्लिम प्रांतांचि स्वतंत्र संघराज्ये स्थापन करावीत. 


पंजाबचे सिंह : लाला लजपत राय 


हिंदू मुस्लिम तेढिचे कारण सांगताना लालाजी लिहितात  :-

 " गेले सहा महिने माझा बहुतेक वेळ मुस्लिम कायदा व मुस्लिम इतिहास यांचा अभ्यास करण्यात खर्च झाला आहे. यावरून माझे असे मत बनत चालले आहे कि - हिंदु मुस्लिम ऐक्य शक्य नाही आणि व्यावहारिक सुद्धा नाही . … मी मुस्लिम पुढार्यांवर विश्वास टाकायला  पुर्णपणे तयार आहे . पण कुराण आणि हदीस यातील आज्ञांचे काय ? "  ( ४ - २७५ आणि  २७६ )

लजपत राय यांनी वरील पत्र देशबंधु  चित्तरंजन दास यांना लिहिले होते . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पाकिस्तानवरील पुस्तकात ते पत्र उधृत केले आहे. (Ref Dr B R Ambedkar Volume 8 page 275 - 276) 


१९२४ : लालाजी फाळणीची योजना मांडतात : -  

पुढे जाउन लाला लजपत राय फाळणीची योजना मांडतात. वायव्य व इशान्य भारतातील मुस्लिम प्रांतांचे मुस्लिम संघराज्य व उर्वरित भारताचे हिंदु संघराज्य स्थापावे अशी लाला लजपत राय यांची सूचना आहे.  चार मुस्लिम बहुल प्रांत   वेगळे काढावे असे त्यांचे मत आहे. १) पूर्व बंगाल २) पश्चिम पंजाब ३) सिंध ४) बलोच आणि वायव्य सरहद्द प्रांत.  नेमके हे चार प्रांत आज पाकिस्तान - बांग्लादेश या नावाने प्रसिद्ध आहेत.

फाळणीची सूचना करणारे ते महत्वाचे हिंदु  नेते आहेत . हे १९२४ साली घडते आहे .  मुस्लिमांना इशारा देताना
लालाजी म्हणतात -

" आम्हाला जिहाद ची धमकी देऊ नका. आम्ही खूप जिहाद पाहिले आहेत. गेल्या  बाराशे वर्षात आमच्या राष्ट्रीय अस्तित्वा विरुद्धच्या या घोषणा आम्ही दररोज ऐकल्या आहेत. आमच्या राष्ट्रासाठी बलिदान करण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही धमक्यांना आणि दडपशाहीला भिणार नाही " ( ५-७३)

आम्ही धमक्यांना  भिणार नाही !


१९२५ : लालाजी हिंदू महासभेचे अध्यक्ष :

हिंदु महासभा हे काय प्रकरण आहे ? ते प्रथम समजून घ्यावे लागेल. १९०६ साली मुस्लिम लीग ची स्थापना झाली . त्याला प्रत्युत्तर म्हणून लाला लजपत राय यांनी पंजाब हिंदु सभेची स्थापना १९०९ साली केली होती . पुढे अनेक प्रांतात हिंदु सभा स्थापन झाल्या आणि १९१५ साली त्या सर्व गटांचे एकीकरण घडून अखिल भारतीय हिंदु महासभेची स्थापना झालेली आहे. लालाजी पहिल्या पासून हिंदु  महासभेचे पालक आहेत.

कोन्ग्रेस मध्ये सर्व विचाराची मंडळि पूर्वी असत. कॉंग्रेस या शब्दाचा अर्थच मुळी एकीकरण - मंच सभा असा आहे . त्यामुळे हिंदु महासभेचे पालक लालाजी १९२० साली कॉंग्रेस चे अध्यक्ष असतात. पुढे मुस्लिम प्रश्नावर खवळून ते   कोन्ग्रेस पासून दूर जातात  आणि १९२५ साली अ. भा.  हिंदु महासभेचे अध्यक्ष होतात. हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना ठणकावून सांगतात कि -
" हिंदुनि संघटित होणे कोणाला मुस्लिमविरोधी वा राष्ट्रविरोधी वाटले तर मी मनापासून  सांगतो कि , हिंदुसभा दोन्हीही आहे " (५ -७४ ) 

 लाला जी धर्मांध होते काय ? 

मुस्लिम लीग च्या धमक्यांना भिक घालता कामा नये .  इस्लाम धर्माचे लांगुलचालन करू नये. मुस्लिम मुजोरीला तोंड देण्यासाठी हिंदुनि संघटित व्हावे असे लाला लजपतराय म्हणतात. पण त्याना हिंदुच्या धर्मावरचे सनातनी राष्ट्र नको आहे . कट्टरता आणि धर्मांधता हिंदुत यायला नको आहे. देशबंधुना लिहिलेल्या ज्या पत्रात लालाजिंनी  इस्लाम धर्म , कुराण यामुळे फाळणीची आवश्यकता मांडण्याचि सुरुवात केली होती  त्याच पत्रात ते म्हणतात.
" हिंदुना मी सांगेन कि , जर कोणि या देशात हिंदुराज्य स्थापण्याचे स्वप्न पाहत असेल तर ते मूर्ख व वेडे आहेत. " ( २-२३०)
हिंदु धर्मात अनेक दोष आहेत. त्याचे निराकरण केले पाहिजे असे मानणार्या आर्य समाजाचे लालाजी चाहते होते. पंजाबचे सिंह लाला लजपतराय यांच्या मृत्युनंतर  श्रद्धांजली वाहताना डॉ बाबासाहेब आंबेडकर   ७ डिसेंबर १ ९ २ ८  च्या बहिष्कृत भारत च्या अग्रलेखात   म्हणतात -


" लाला लजपत राय यांनी राजकारण आणि समाजकारण यात फारकत करून  आपल्या पंगुपणाचे प्रदर्शन कधीच केले नाही .त्याकाळी  लालाजिंचा आर्य समाज मुस्लिमांच्या आक्रमणापेक्षा जातीभेदादि हिंदु समाजाच्या अंतर्गत दोषांकडे अधिक लक्ष पुरवत असे . अस्पृश्यांच्या चळवळीबद्दल लालाजिंचि सहानुभूती कळकळीची होती  "   - डॉ बाबासाहेब आंबेडकर





लालाजीं नी संपुर्ण स्वातंत्र्याचि मागणी केली नाही . मर्यादित स्वराज्याची केली आहे.  अखंड  भारताचे संपुर्ण स्वातंत्र्य म्हणजे लोकसंख्येच्या बळावर मुस्लिम राज्य असे त्यांना वाटत असे. (२-२७० )   १९२५ च्या कलकत्त्याच्या हिंदु महासभेच्या अध्यक्षपदावरुन बोलताना लालाजींनि आधी लखनौ कराराचा निषेध केला आहे.  आणि म्हटले आहे : -

" ज्या लोकसत्ताक राज्यात भारतातील  हिंदु मुसलमान व अन्य धर्मीय हे त्या धर्माचे नव्हे तर भारतीय म्हणुन साभागी होऊ शकतील अशा स्वराज्याचे आम्ही आग्रही समर्थन करतो . "         (२ -२३०) 


 सेक्युलर भारतासाठी फाळणी 

भारत सेक्युलर ठेवण्यासाठी लालाजींच्या हिंदु महासभेला फाळणी हवी आहे . फाळणी झाल्यानंतर येथील मुस्लिमांना तिकडे पाठवुन द्यावे असे  लाला लजपत राय म्हटलेले नाहीत. मुस्लिम लोकसंख्येच्या बळावर मुस्लिम लीग धमक्या देतो आहे . फाळणी झाली कि मुस्लिम लोकसंख्या कमी होईल आणि मग उरलेल्या मोजक्यांना  आपण आपल्या राष्ट्रीय सेक्युलर प्रवाहात सामील करून घेऊ असे त्यांना वाटत असावे. लालाजिंचे विचार  दोन लोकांनी पुढे चालवले - पण वेगवेगळ्या अर्थाने ! ते दोघे आहेत सावरकर आणि जिन्हा !


लालाजींचे विचार सावरकर आणि जिन्हा उधृत करतात 

१९३७ साली सावरकरांनी हिंदु महासभेच्या अध्यक्षपदावरुन लाला लजपत रायांचा वारसा पुढे चालवला आहे. हिंदू आणि मुसलमान हि दोन राष्ट्रे आहेत . त्यात एकता होणे अवघड आहे असा द्वि राष्ट्रवाद सावरकरांनी सत्य म्हणून मांडला. मुस्लिम लीगच्या दादा गिरीला तोंड देण्यासाठी हिंदुनि संघटित व्हावे . पण फाळणी मात्र करू नये असे सावरकरांचे मत होते. या दोन राष्ट्रांनी एकाच देशात रहावे.  मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा द्याव्यात . पण त्यांच्या अव्वाच्या सव्वा मागण्या मान्य करू नयेत . देशाचे संविधान निधर्मी सेक्युलर विज्ञान निष्ठ असावे असे सावरकरांचे स्पष्ट मत आहे . हे लाला लजपत रायांचेच  विचार हिंदु महासभेच्या नव्या अध्यक्षाने पुढे न्यावेत हे हि अतिशय नैसर्गिक आहे .   


१९४० : जिन्हा लालाजिंचे दाखले देतात 

विज्ञान निष्ठा , सेक्युलर भारत असल्या भानगडी मुस्लिम लीग ला  मान्य नव्हत्या . मुस्लिम लीगच्या १९४० सालच्या अध्यक्ष पदावरून आपले मत सिद्ध करण्यासाठी महम्मद अली जिन्हांनि लाला लजपत राय यांचेच दाखले दिले आहेत. जिन्हा म्हणतात 

" मुसलमान नेते कुराण आणि हदीसच्या आज्ञा तोडू शकत नाहीत. हे लाला  लजपतचे  मत अगदी अचूक आहे. लाला भारतातील सात कोटि मुस्लिमांना भीत नसत पण ते अफगाणिस्तान , अरेबिया तुर्की या एकत्रित मुस्लिम उम्मत ला भीत असत
हिंदुना धमक्या द्यायला आणि आपल्या द्वि राष्ट्र वादाचे समर्थन करायलाही जिन्हा लालाजिंचे विचार उधृत करतात हे लक्षणिय आहे.


फाळणी एका वरदान 

डॉ  आंबेडकर सनातन धर्माचे विरोधक होते. पण हिंदु समाजाच्या हिताची त्यांना काळजी होती . फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५  साली -  बाबासाहेब म्हणाले होते. --

" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (६-१४६)  



फाळणीचे कारण सांगताना बाबासाहेब लिहितात - 

 " इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी  नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही .....  भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला  देत नाही . "  (४-३३०)


हिंदु बहुसंख्येचा भारत सेक्युलर राहण्याच्या शक्यता अधिक आहेत . भारत सेक्युलर राहावा म्हणुन डॉ आंबेडकरांनी  फाळणीचे समर्थन केलेले आहे. लाला लजपत राय यांनीही याच कारणाने फाळणीचे समर्थन केलेले आहे. दोन राष्ट्रांचे वास्तव मान्य करूनही फाळणी नको ! हि सावरकरांची भूमिका मात्र कोड्यात  टाकणारी आहे !!


सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती . पुढे १९२४ ला लाला लजपतराय , १९३७ ला सावरकर आणि १९४० ला जिन्हा हीच द्विराष्ट्रवादाची भूमिका मांडत आहेत.  निष्कर्ष वेगळे असले असले तरी जिन्हा , सावरकर,  सर सय्यद , लाला लजपत राय आणि डॉ  आंबेडकर  यांचे एका बाबतीत मात्र एकमत आहे . --
इस्लाम धर्म आणि  कुराणानुसार द्वि राष्ट्र वाद सत्य आहे . आणि हि धार्मिक आज्ञा मुस्लिम समाज सोडणार नाही !  





-----------------
संदर्भ 

(८ - ३२०)  हा संदर्भ ८ व्या संदर्भ ग्रंथातील  ३२० वे पान असा वाचावा . 

(१)  Gandhi: Pan-Islamism, Imperialism, and Nationalism in India. B. R. Nanda - OUP (1889)

(२) गांधी आणि कोन्ग्रेस ने अखंड भारत का नाकारला ? मोरे शेषराव - राजहंस प्रकाशन

(३)२६ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर १९२४ या काळात लाला लजपत राय यांनी ट्रिब्युन वर्तमानपत्रातले  लेख  (सौजन्य  कोलंबिया युनिव्हर्सिटि)  त्याची लिंक : . http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00islamlinks/txt_lajpatrai_1924/txt_lajpatrai_1924.html

४)  Dr B R Ambedkar  Volume 8 : पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया   

५) Hindu Nationalism: Origins, Ideologies and Modern Myths by Chetan Bhatt

६) Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)  

२ टिप्पण्या:

  1. Bhartache rajkiy hit dhokyat yenar nahi ya maryadet hindunche sahkary asel hi Lala lajpat roy yanchi bhumika nishtach tyyanchya durgami vicharache lakshan aahe. khilapat chalwalimule rajkiy hit dhokyat yeil hi kalpana Lokmanyaana aali nahi.Kadachi tyancya rajakarnache aarakhade vegle asati kinwa roychi hi bhumika 1924chi aasalyamule, tyavelesche hindu-muslim rajkarnache chitran vegle asu shakel,tasech Maulvi barichya vktavya varun ase diste ki 1924 paryant muslimanchya magnya vadhlelya astil. Ya thikani Maulvichya vakyavya cha kai namud kelela nahi,tari suddha 1920 te1924 ya kalat muslim rajkarnache badltya chitranacha ha parinam asu shakel tyamulech roy phalanichi bhumika ghetat.Ase asle tari tyanantar kewal hinuche rajya nirman zale tari te secular asanar hyachi khatri tyana hoti ka , ha prashn aahe.pan ek matr many karave lagte ki, hindurajayacha vichar ha ya vishyakade panyacha tyachya rational approach ha laksha ghyave lagel.Savarkarachi phalni talun secularism chi bhumika matr nishit sanshyaspad aahe. Te kase shakya hoyil he matra tyani kuthe sangitalele nahi.aapan kelela ha vichar prapanch atishay abhyaspurn v yitar abhyasakana vichrana disha denara aasel. aek vinanati hi ki sandharbh no. 5 chya granthache publication v uplabhatata mahit zalyas aabhari aahe. Dhanywad

    उत्तर द्याहटवा
  2. Dr.abhiram,aapan ya lekha dware 'LaL,Bal,pal te dr.ambedkar'Jinha w Sawarkar yanchi..tya tya paristhititil,Deshatil Hindu...Muslim..ekya,Rajkiy w Dharmik babi..yancha, Bharatachya Swatantra ladyashi asalel sambandh w varil nete Mandalich vichr yancha drishtikone sambandhi'mahiti Utkrush pane deli.Muslimana bharatatil Rajya ghatanenusar sarv adhikar have aahet ,parantu 'tyanchya'Dharmacha'adosa'dakhawun'Saman nagari kayada nako'...he wastaw'Bharat, Swtantra'honya purvi he hote w Phalani banter he desh'swatantra,zalyawar he 'kayam'aahe..mag..Falni 'jya'dwe rashtrwadachya'sidhantawar'zali'tyacha kay'Upyog..Hindu dharmiy'Sanatani w aakramak'nasalyacha'fayada w''Muslimancha'anunay karnarya'begadi'Dharmnirpeksh'rajyakartya mule'aaj punha'deshyachi'Falni'whayachi'paristhiti'nirman hot aahe.aajche'dave communist,deshatil,begadi dharmanirpeksh,vichrvanta na hatashi dharun he chaalkhelat aahet.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *