७ ऑक्टो, २०१३

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ?

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ?
 (मला समजलेले गांधीजी  भाग २ )

******************************************************************************************************************************************************************
संदर्भ स्पष्टीकरण : धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्राची  दहावी  आवृत्ती संदर्भ म्हणुन वापरली आहे . खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्रही संदर्भाला घेतले आहे - ( खैरमोडे ३-६७) हा संदर्भ खैरमोडे लिखित चरित्रातील तिसर्या खंडातील ६ ७ वे पान असा वाचावा . बहिष्कृत भारत  या पत्रातले बाबासाहेबांचे लेख उद्धृत केले आहेत त्यापुढे  वर्तमान पत्राचा दिनांक दिला आहे.  द न गोखले यांचे डॉ आंबेडकरांचे अंतरंग हे हि पुस्तक संदर्भ म्हणून वापरले आहे .
******************************************************************************************************************************************************************


गांधी विरुद्ध आंबेडकर हा संघर्ष अटळ होता . एक दलितांचा नेता आणि दुसरा सवर्ण हिंदुंचा पुढारी यात गुलुगुलु गुलाबी  ऐक्य शक्य नव्हते . त्याला सामाजिक कारणे जवाबदार होती .  हा संघर्ष कधी निर्माण झाला ? कसा निर्माण झाला ? कसा वाढत गेला ? आणि कधी संपला ? हे आपण प्रस्तुत लेखात पहायचे आहे .
 आजच्या दलितांनी गांधिंचा द्वेष करण्याचे कारण नाही आणि सवर्णांनी आंबेडकरांचा किंवा आजच्या दलितांचा राग धरू नये .म्हणुन हि धडपड.

  हिंदु महासभा हा हिंदुंचा पक्ष म्हणणे तत्व म्हणुन ठिक आहे . पण लोकशाहीच्या राजकारणात हा एक जोक ठरत असतो  . ज्याला लोक मते देतात तो पक्ष त्या समाजाचा असतो .   सवर्ण हिंदुंनि फ़ाळणिपुर्वि आणि फ़ाळणिनंतरहि गांधिबाबाच्या कोग्रेसला मते टाकलि होती. तत्कालीन सवर्ण हिंदुंचा पुढारी - लोकनियुक्त पुढारी गांधी होता .


आंबेडकर गांधिंकडे सवर्ण हिंदुंचा नेता म्हणुनच पहात होते . तत्कालीन हिंदुंच्या हृदयावर गांधीच राज्य करत होते.  हे सत्य एकदा मान्य केले कि पुढे जाता येईल . आंबेडकरांचा प्रश्न वेगळा होता. दलित समाजातल्या एका घटकाने त्याकाळी त्यांना पुढारी मानले होते    . त्या काळाचा विचार आंबेडकरांनि राजकारणात प्रवेश करण्या आधीपासून केला पाहिजे. आणि त्या आधी परिस्थिती,  अनुभव,  वाचन आणि  विचार करून माणुस सतत बदलत जात असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे .



महाडचा धर्म संगर : फक्त गांधिजिंचि तसबीर 

चवदार तळ्यासाठी केलेला सत्याग्रह हि बाबासाहेबांच्या संघर्षातलि पहिली मोठी लढाई . २५ डिसेंबर १९२७ रोजी ह्या लढ्याला आरंभ झाला. ७ - ८ हजार माणसे जमली होती . मंडपात येताना शिवाजी महाराज कि जय ! आणि गांधीजी कि जय ! अशा घोषणा देण्यात येत होत्या .  यावेळी मंडपात फक्त एकाच नेत्याची तसबीर विराजमान होती - गांधीजी ! (खैरमोडे ३ - १५९ )




आपल्या तडाखेबंद भाषणात बाबासाहेब म्हणतात -

 " चवदार तळ्याचे पाणि प्याल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही . आजपर्यंत ते प्यायलो नव्हतो तेंव्हा काही मेलो नव्हतो . इथे आम्ही पाणि पिण्यासाठी जमलेलो नाही . आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी जमलो आहोत. हि सभा समतेची आहे ...

हिदू समाज समर्थ करायचा असेल तर चातुर्वण्य व असमता यांचे उच्चाटन करून हिंदु समाजाची रचना एकवर्णत्व व समता या दोन पायावर केली पाहिजे. अस्पृश्यता निवारण्याचा मार्ग हा हिंदु समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही. म्हणुन मी म्हणतो - कि आपले कार्य जितके स्वहिताचे आहे , तितकेच राष्ट्र हिताचे   आहे . ….  हि सभा हिंदु समाजाचे संघटन करण्यासाठी बोलावली आहे. "  (बहिष्कृत भारत ३-२ - २ ७ )

या काळात बाबासाहेब गांधी आणि गांधिविचार दोन्हीही मानत असलेले दिसतात.  माहाडच्या धर्म संगराला बाबासाहेबांनी सत्याग्रह म्हटले होते . हे हि ध्यानात ठेवले पाहिजे . " सत्याग्रह हि विचारसरणी आम्ही गीतेतून घेतली असून . गीता हा धर्म ग्रंथ म्हणुन आम्हाला मान्य आहे " - बाबासाहेब (बहिष्कृत भारत - २५ - ११ - २ ७ ). याच परिषदेत बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली .

१९ २ ७  सालीच बाबासाहेबांनी दादरच्या गणेशोत्सवात भाषण केले होते . आणि विरोधकांच्या बंदोबस्तासाठि खिशात पिस्तुल बाळगले होते! (खैरमोडे २ - १ ४ ९ )

हिंदु राहून समता प्राप्त करणे आणि त्यासाठी लढा देणे हे आंबेडकरांचे धोरण १९ २ ७ साल पर्यंत स्पष्ट दिसते आणि हिंदु पुढारी - गांधी हे आपले विरोधक आहेत असे आंबेडकरांना त्याकाळी वाटत नव्हते हे हि स्पष्ट होते .

हिंदु समाज समर्थ आणि संघटित करण्याची मनीषा आंबेडकरांनि या काळात अनेकदा बोलून दाखवली आहे.


काळाराम ते सायमन : ठिणगी पेटली  

काळा राम मंदिर प्रवेशासाठी अस्प्रुश्यांचा संघर्ष चालू होता. त्यावेळी आंबेडकरांनि गांधिंना सवाल केला होता - " मंदिर प्रवेशाचा प्रश्न मिटल्या नंतर जेंव्हा अस्पृश्य लोक जातीच्या आणि चातुर्वणाच्या उच्चाटनाचा प्रश्न हाती घेतील . तेंव्हा महात्माजी कोणाच्या बाजूने उभे राहतील ? "

हा सवाल फक्त गांधीना नव्हता. पुर्या हिंदु समाजाला होता.

गांधीजी उत्तरले - " मी मानत असलेल्या हिंदु धर्मात उच्च नीचता नाही पण डॉ आंबेडकरांना वर्णाश्रमाशि झगडा करायचा असल्याने मी त्यांच्या पक्षाला राहू इच्छित नाही. कारण वर्णाश्रम हा हिंदु धर्माचा अभिन्न भाग आहे, अशी माझी श्रद्धा आहे . "  (कीर - २ ३ ९ )


गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष इथून सुरु होतो.





(सनातनी हिंदु धर्माला डांबर फासत आहेत . गांधीजी ते कष्टाने   पुसू पाहत आहेत आणि आंबेडकर त्याचा पाया असलेल्या वर्ण व्यवस्थेवर हातोड्याने घाव घालत आहेत.  ब्रिटीश लांबून मजा बघत आहेत- तत्कालीन व्यंगचित्र ) 



सायमन आयोग : 

 हा आयोग भारताला कोणत्या बाबतीत स्वायतत्ता द्यावी याचा विचार करण्यासाठी होता . बहुतेक सर्व राजकीय पक्षांनि त्याला अनेक मर्यादा आहेत म्हणुन विरोध केला . बहिष्कार घातला . आंबेडकरांनि मात्र सायमन आयोगाला सहकार्य केले आणि त्याला एक लांबलचक निवेदन नेउन  दिले . का ? हा आंबेडकरांचा स्वातंत्र्याच्या चळवळीशी द्रोह होता का ? काय होते त्या निवेदनात ?  या प्रश्नांचि  उत्तरे  पहाण्या आधी एका घटनेची नोंद केली पाहिजे .




सायमन गो ब्याक ! म्हणत आंदोलन करताना लाला लजपत राय यांच्या छातीवर ब्रिटिश पोलिसी दंडुके बसले. त्याबद्दल ७ डिसेंबर १ ९ २ ८  च्या बहिष्कृत भारत च्या अग्रलेखात श्रद्धांजली वाहताना बाबासाहेब म्हणतात - " लाला लजपत राय यांनी राजकारण आणि समाजकारण यात फारकत करून  आपल्या पंगुपणाचे प्रदर्शन कधीच केले नाही .त्याकाळी  लालाजिंचा आर्य समाज मुस्लिमांच्या आक्रमणापेक्षा जातीभेदादि हिंदु समाजाच्या अंतर्गत दोषांकडे अधिक लक्ष पुरवत असे . अस्पृश्यांच्या चळवळीबद्दल लालाजिंचि सहानुभूती कळकळीची होती  "

१ ९ २ ७  ते ३ ०  या काळात बाबासाहेबांच्या विचारात बदल घडू लागलेला दिसतो . त्यांना अजून हिदू समाजाकडून आशा आहे पण गांधिविरुद्ध मत बनू लागले आहे . ठिणगी पेटली आहे .



******************************************************************************************************************************************************************
विभक्त  मतदार संघ म्हणजे काय ?

भारातात सध्या जी लोकशाही आहे त्यात संयुक्त भौगोलिक मतदार संघ   आहेत . काही जागा मागास उमेदवारांना राखीव आहेत . पण प्रत्येक उमेदवारासाठी सर्व जाती धर्माचे लोक मत देतात . त्यामुळे निवडणुकीतल्या उमेदवाराला सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते. 

विभक्त  मतदार संघ म्हणजे काही जातीना वेगळे मतदार संघ . आजच्या पदवीधर  मतदार संघात  ज्याप्रमाणे पदवीधर उमेद्वरांसाठि  केवळ पदवीधर च  मतदान करतात त्याप्रमाणे - दलित उमेदवारासाठी केवळ दलितांनी मतदान करणे म्हणजे - विभक्त मतदार संघ. 
******************************************************************************************************************************************************************


ब्रिटिशांना दिलेल्या सायमन कमिशनच्या निवेदनात बाबासाहेब लिहितात  -

" १ ) आज अस्पृश्य समाजाच्या समस्या वेगळ्या असल्याने ते हिंदु समाजापासून वेगळे आहेत
२) मात्र अस्पृश्यांसाठी मागितलेल्या मागितलेल्या सवलती तात्पुरत्या आहेत . सर्व भारत शेवटी एका व्हावा . " (गोखले १ १ ८ )
या काळात आंबेडकरांनि विभक्त  मतदार संघाला कडाडून विरोध केलेला आहे. आणि राखीव जागा मागितलेल्या आहेत .   

निवेदनात बाबासाहेब म्हणतात - विभक्त मतदार संघ हे लोकशाहीच्या मुळावरच घाव घालतात. विभक्त मतदार संघात निवडुन गेलेले उमेदवार सभागृहात सर्वांसाठीच कायदे करतात . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांबद्दल कायदे करण्याचा हक्क विभक्त मतदार संघातल्या उमेदवारांना मिळतो . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांवर राज्य करणे हि कुठली लोकशाही ?  ( Dr Ambedkar Writings and Speeches. Vol 2 pg 344 - 366, 1982)


ह्या निवेदनात बाबासाहेबांचा लोकशाहीवाद आणि राष्ट्रवाद अनेकवार व्यक्त झाला आहे . पण सायमन शी सहकार्य केले म्हणुन त्याकाळी बाबासाहेब देशद्रोही असल्याची चुकीची   टिका कोंग्रेसि वर्तमान पत्रांनी केली होती .






गोलमेज परिषद : वणवा पेटला 


सायमन आयोगापुढे ३७ दलित संघटना गेल्या होत्या.  त्यापैकी ३५ संघटनांनि विभक्त मतदार संघांचि मागणी केली होती .  आंबेडकरांनि आपले वैयक्तिक मत बाजूला ठेवत पुढे लोकमताला मान दिला . (खैरमोडे ४ - १ ४ १ . १ ४ २ ) आणि गोलमेज परिषदेत  बाबासाहेबांनी दलितांना विभक्त मतदार संघ मागितले .  लोकमताच्या रेट्यात बाबासाहेबांनी बदललेला हा निर्णय आहे . 

इथे एक लक्षात ठेवले पाहिजे कि आंबेडकर हे केवळ विचारवंत नाहीत ते एक राजकारणीही आहेत . जे बाबासाहेबांबद्दल खरे आहे ते गांधीबाबा बद्दल हि खरे आहे.




******************************************************************************************************************************************************************

प्रौढ सार्वत्रिक मताधिकार म्हणजे काय ?

ब्रिटिश राजवटीत हि निवडणुका होतच होत्या पण मतदानाचा अधिकार सर्वांना नव्हता. ठराविक जमीन ठराविक शिक्षण असलेलेच लोक मतदान करू शकत .  या गाळण्यांमूळे बहुसंख्य दलितांना मतदानाचा हक्क मिळत नव्हता आणि त्यामुळे राखीव जागांवरुन निवडुन जाणारे दलित उमेदवारही सवर्णांचे  चमचे असत. 

प्रौढ मताधिकार म्हणजे १८ / २१  वर्षे वयाच्या सर्व भारतियांना मतदानाचा अधिकार असणे .  प्रौढ माताधीकारात सर्व दलितांनाहि  मतदानाचा हक्क मिळतो आणि अस्पृश्य  हिताबद्दल जागरूक असणारे उमेदवार निवडुन जाणे सोपे होते , असे आंबेडकरांचे मत होते .

******************************************************************************************************************************************************************


स्वत:चे विभक्त मतदार संघाबद्दलचे प्रतिकूल मत राजकारणी आंबेडकरांनि बदलले . गांधिंमधल्या अट्टल राजकारणी पुरुषा बद्दल तर कोणालाच शंका नाही !  राजकारणात स्वत:च्या लोकांचा अनुनय करावा लागतो . हा लोकशाहीचा साइड इफ़ेक्ट आहे !

गांधीनी सवर्णांच्या भावना बोलून दाखवत दलितांच्या विभक्त मतदार संघाला विरोध केला असे काहिंना वाटते.  प्रौढ मतदानाचे नाव सुद्धा नसताना केवळ उच्चशिक्षिताना मतदानाचा अधिकार असताना - आंबेडकरांची नवी  मागणी चुकीची  होती असे म्हणता येणार नाही. पण जर दलितांना विभक्त मतदार संघ दिले तर उद्या सर्वच जाती स्वत:चे वेगळे मतदार संघ मागतील -प्रत्येक जात स्वत:चे उमेदवार निवडुन देऊ लागली तर - उमेदवारांना सर्वसमावेशक भूमिका घेण्याची काहीच गरज उरत नाही  त्यामुळे जातीवादी  उमेदवारच निवडुन येतील आणि ते देशाचे तुकडे पाडतील हि गांधिजिंचि भीती हि अनाठाई  नव्हती.

गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष पेटु लागला आणि त्यातच उभयतांचि भेट ठरली.




वादळी भेट आणि जळते उद्गार  


इथे एका विनोदी गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे . हि भेट संपेस्तवर आंबेडकर हे अस्पृश्य समाजातले आहेत हेच गांधीना माहित नव्हते. (कीर १८०)  गांधीजी आंबेडकरांना पुण्याचे पुरोगामी ब्राह्मण समजत असत ! आंबेडकरांच्या शैक्षणिक डिग्र्यांकडे पाहून गांधिंनि हा ग्रह करून घेतला होता कि आंबेडकर या ब्राह्मण आडनावामुळे गांधिंचा तसा ग्रह झाला होता ते सांगता येत नाही . ( आं - बा -व -डे -क -  र हे मुळ नाव बदलून त्यांच्या एका प्रेमळ ब्राह्मण गुरुजीने आंबेडकर असे स्वत:चे नाव दफ्तरी लावले होते. आंबेडकरांनि तेच पुढे कायम ठेवले)

पण गांधिंचा समज आंबेडकर हे एक पुरोगामी ब्राह्मण गृहस्थ आहेत असा होता! आणि पुरोगामी ब्राह्मण हा प्राणि राजकारणात फारशी किंमत द्यायच्या लायकीचा नसतो ! कदाचित यामुळेच या भेटीत गांधिंच्या अजब पुर्वग्रहामुळे मोठे नुकसान झाले असे मानायला जागा आहे ! आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांनी गांधी भानावर आले आणि ते अस्पृश्य समाजातले आहेत काय ? अशी सहकार्यांकडे विचारणा केली .


कादाचित हा  -  पुरोगामी ब्राह्मण कशापाई नसती उठाठेव करतो आहे ? कशासाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या लष्कराच्या भाकरी भाजतो आहे ?    अशा भावनेतून गांधीनी भेटीची सुरवातच थोडी कडक केली. आंबेडकरांचि पार्श्वभूमी माहित नसल्याने  - कोणत्या परीस्थित आणि दबावात हा निर्णय घेतला हे गांधिंना कळलेले नसणार . सुरवातीला  त्यांनी आंबेडकरांकडे चक्क दुर्लक्ष केले आणि दुसर्याच कोणाशीतरी सुत कताइबद्दल बोलू लागले. थोड्या वेळाने गांधी  म्हणाले " आंबेडकर तुमचा जन्म व्हायच्या आधीपासून मी अस्पृश्यांसाठी काम करतो आहे . (तेंव्हा मला शहाणपणा शिकवू नये ! ) कोग्रेसने अस्पृश्यांसाठी विस लाख रुपये खर्च केलेले आहेत.

अशाप्रकारच्या बोलण्याने आंबेडकर चांगलेच व्यथित झाले असणार.  त्यांनी चिडून गांधिंना खडे बोल सुनावले शेवटी म्हणाले " ज्या देशात आमच्या समाजाला कुत्र्यापेक्षा वाइट वागणुक मिळते त्या देशाला मी मायभूमी म्हणु शकत नाही , गांधीजी मी पुन्हा सांगतो - मला मायभूमी नाही !"

या वादळी भेटीमुळे - गांधिंच्या दुर्लक्ष करण्यामुळे आणि आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांमुळे या दोनही महान नेत्यात तयार झालेला व्यक्तिगत दुरावा बराच काळ टिकला.





पुणे करार : कौन जिता … कौन हारा 


आंबेडकरांनि  विभक्त मतदार संघांचि मागणी सोडुन द्यावी म्हणुन गांधिजिंनि उपोषण सुरु केले. ज्याच्या मागे जवळजवळ सारा सवर्ण समाज आहे त्याचा मृत्यू झाला तर गावोगावच्या अस्पृश्यांना काय झेलावे लागले असते ? आंबेडकरांसमोर पुणे करारावर  सही करण्याशिवाय कोणता पर्याय होता ?

ताणलेले दोर 

पण त्या आधी एका भानगडिचा वेध घेणे आवश्यक आहे. ती भानगड म्हणजे राजा - मुंजे करार होय . एम सी राजा हे एक अस्पृश्य पुढारी होते . राजा आणि त्याच्या सारख्या इतर अस्पृश्य पुढार्यांच्या दबावामुळेच आंबेडकरांना आपली मुळातली सायमन कमिशन समोरची भूमिका बदलत विभक्त मतदार संघाना पाठिंबा द्यावा लागला होता . हेच राजा आता गटबाजीचे राजकारण खेळले . आणि स्वत:चे महत्व वाढवण्यासाठी त्यांनी डॉ मुंजे या हिंदु महासभेच्या पुढार्याबरोबर एक करार केला. या करानुसार अस्पृश्यांना विभक्त मतदार संघ नको . वाढीव राखीव जागा हव्या अशी मागणी केली !

आता आंबेडकरांसमोर मोठा पेचप्रसंग होता . महाराष्ट्रातल्या महार समाजाचा पुर्ण पाठिंबा आणि मराठि दलीतात बर्यापैकी वजन या  आंबेडकरांच्या जमेच्या बाजू असल्या तरी अखिल भारतीय पातळीवर त्या क्षणापर्यंत तरी  आबेडकर हे सर्व दलितांचे एकमुखी नेते नव्हते .  अखिल भारतीय पातळीवर दलितांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना राजा सारख्या अंतर्गत गटबाजांबरोबर हि राजकाराण भोगावे लागत होते . पंचाइत अशी कि राजा मुंजे करार मान्य केला तर आंबेडकरांनि राजाचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर मान्य केलेले आहे आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व अधिकार राजा कडे आहेत असा सरळ अर्थ निघत होता . राजा आणि मुंजेंचि तीच राजकीय चाल होती . आता आबेडकरांना चटकन विभक्त मतदार संघाची मागणी सोडणे अशक्य झाले . राजा सारख्या गटबाज व्यक्ती च्या हाती राष्ट्रीय दलित चळवळीची सूत्रे देण्याचा गलथान पणा आंबेडकर करणे शक्य नव्हते.

त्यामुळे आंबेडकरांनिहि विभक्त मतदार संघाचा मुद्दा ताणून धरला आणि गांधिंना प्राणांतिक उपोषण करण्या पर्यंत परिस्थिती ताणावी लागली.






 तुटलेले बंध 

परिस्थिती विकोपाला जाऊ लागली . गांधिजिंना कोणत्याहि परीस्थित जातीय तत्वावर विभक्त मतदार संघ नको होते . आणि आंबेडकर एका विचित्र राजकीय परिस्थितीमुळे झटकन निर्णय फिरवू शकत नव्हते. गांधिंचि तब्येत खालावू लागली . परिस्थिती स्फोटक बनू लागली. गांधिंचा मृत्यू ओढवला असता तर गावोगाव सवर्ण दलित दंगली पेटल्या असत्या . बाबासाहेबांसारख्या लोकशाहीवादी   नेत्याला  दंगली होणे कदापि मंजुर नव्हते त्यामुळे त्यांनी पुणे करारावर सही केली .

व्यथित होऊन आंबेडकर म्हणाले होते " हे कोंग्रेस वाले माझे राजकीय जीवन संपुष्टात आणतील आणि मग तेच दलितांचे पुढारी होतील " ( खैरमोडे ५ - ३१ )

  पुणे करारावर सही -  हा आंबेडकरांचा राजकीय पराभव होता काय ? त्यांच्या सहकार्यांना तेंव्हा तसेच वाटले आजही आंबेडकर वाद्यांच्या हृदयातली ती एक भळभळति जखम आहे . त्यामुळे मने तुटली आहेत . पण सत्य काय आहे ?


अंतिम विजय कोणाचा ? 

पुणे करारामुळे विभक्त मतदार संघ रद्द झाले आणि संयुक्त मतदार संघ आले असा बर्याच लोकांचा भ्रम असतो . ते खरे नाही . पुणे करारा मुळे संयुक्त आणि विभक्त मतदार संघाचे एक आगळेच फ्युजन जन्माला आले . त्यानुसार -

१) दोन स्तरीय निवडणुक पद्धती आली . अस्पृश्यांनी स्वत:चे चार उमेदवार निवडायचे (विभक्तपणे) आणि त्यानंतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी या चारपैकी एक उमेदवार (संयुक्तपणे ) निवडायचा. या कलमामुळे सवर्णांचे चमचे निवडुन जाण्याचा धोका आंबेडकरांनि टाळला. आणि खरे पाहता आंबेडकरांचा मुलभुत विचार गांधिंनि मान्य केला. 

२) या करानुसार अस्पृश्यांना १ ८ टक्के राखीव जागा मिळाल्या . (त्या पूर्वीच्या मेकडोनल्ड निवाड्यापेक्षा खूपच जास्त होत्या )

३) अस्पृश्यांच्या शिक्षणासाठि वेगळी काढुन ठेवायची रक्कम ठरली यातही आंबेडकरांनि ठरवलेला आकडा ग्राह्य धरण्यात आला .




डॉ  बाबासाहेब आंबेडकर हेच दलितांचे एकमेव राष्ट्रीय नेते आहेत आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व हक्क एकट्या आंबेडकरांना आहेत हि गोष्ट सिद्ध झाली . पुणे करारा नंतर आंबेडकर हे एकमेव  राष्ट्रीय दलित नेते असून एम सी राजा सारखे लोक  केवळ उपट्सुंभ आहेत हे सिद्ध झाले. 

पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा हक्क दलितांसकट सर्वांना मिळाला . शीक्षण , जमीन इत्यादी चाळण्या गेल्या .   त्यामुळे घटना परिषदेचे सदस्य  असलेल्या आंबेडकरांनि स्वतंत्र भारतात एकदाही विभक्त मतदार संघ मागितले नाही .  प्रौढ सार्वत्रिक मतदान आल्याने विभक्त कि संयुक्त हा मुद्दाच उरला नाही . 

गांधिंना जे साध्य करायचे होते ते हि घडलेच -  द्विस्तरीय गुंतागुंतीची निवडणुक प्रक्रिया झाल्याने इतर जाती विभक्त मतदार संघ मागाण्याचा धोका टळला . कारण इतकी गुंता गुंतिचि प्रक्रिया सर्व जातींसाठी लागू करणे अशक्यच होते . त्यातून जातीय फायद्याची गणिते बांधणेहि दुरापास्त होते .

थोडक्यात पुणे करार बरोबरीत सुटला किंवा थोड्या प्रमाणात आंबेडकरांच्याच बाजूला झुकला असे म्हणावे लागते.  स्वातंत्र्यानंतर तर तो प्रश्न पुर्णपणेच आउट डेट बनलेला आहे . कारण सार्वत्रिक प्रौढ मतदान !





 सम्यक पणे विचार बदलणारा - झपाटलेला अभ्यासक : डॉ  आंबेडकर 

बाबासाहेब आंबेडकर हे एक अभ्यासू आणि विद्वान गृहस्थ होते .  राजकारण - समाजकारण - धर्म कारण याबद्दल ते सतत अभ्यास करत आणि नव्या अभ्यासानुसार - मते बदलत असत  . उदाहरण घायचे झाले तर भगवत गीता या हिंदु धर्म ग्रंथाबद्दल लिहिता येईल .


१) १९ २ ७  सालच्या महाडच्या   संगरात   त्यांनी मनुस्मृती जाळली पण गीता हा धर्मग्रंथ स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन्ही लोकांना मान्य आहे असे ते त्याकाळी  म्हणत असत  .
२)  पुढे धर्मांतराच्या घोषणे नंतर गिता हा पुर्णपणे  मूर्खपणे आणि बाष्कळ पणे लिहिलेला ग्रंथ आहे असे ते म्हणत .
३) धर्मांतरानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बाबासाहेब म्हणाले - गीतेत ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बुद्ध धर्मातून उसन्या घेतल्या आहेत . (म्हणजे गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत !)


एकाच ग्रंथाबद्दल व्यक्त केलेली हि मते आहेत . प्रा शेषराव मोरे यांनी त्यांच्या आंबेडकरांवरिल ग्रंथात राजकारण , समाजकारण , इतिहास मिमांसा  या सर्वच बाबतीतल्या बदलत जाणार्या मतांचा आढावा घेतला आहे .






अभ्यासक नवीन माहितीनुसार मते बदलत जातोच . पण आंबेडकरांचे सामाजिक धोरणही त्यांची धर्म मिमांसा आणि इतिहास मिमांसा बदलते. जोपर्यंत हिंदु राहून समता आणता येईल असे त्यांना वाटत होते तोपर्यंत ते गीतेला पुज्य मानत होते. हा हिंदु समाजावरचा विश्वास उडाल्यावर ते गीतेला मुर्ख ग्रंथ म्हणु लागले . पुढे घटना   परिषदेत  दाखल   झाल्यावर ....जेंव्हा त्यांना हिंदु कोड  बिल  पास करून हिंदु स्त्रियांचे भले करायचे होते तेंव्हा........ ते बिल पास करायला त्यांना सवर्ण हिंदुंचा पाठिंबा हवा होता....... आणि त्यावेळी त्यांनी गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत पण ........त्या बुद्धाकडुन उधार घेतलेल्या आहेत असे मत व्यक्त केले .

समता आणणे आणि लोकशाही रुजवणे  हे बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते . त्यासाठी त्यांनी धर्म मिमांसा आणि इतिहास मीमांसा लिहिली , त्यात वेळोवेळी बदल केले , कारण त्यांना इतिहास केवळ लिहायचा नव्हता तर घडवायचाहि होता .


स्वत:ची मते बदलण्याचे स्वातंत्र्य जर आंबेडकरांना आहे तर गांधिंना का नाही ?



परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी 

परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी

गांधीजी हे आंबेडकरांप्रमाणे विद्वान , अभ्यासक किंवा संशोधक निश्चितच नव्हते . पण त्यांना उभ्या देशाबद्दल कळकळ प्रेम आणि जिव्हाळा होता . दलितांचे भले करणे हा गांधिंसमोरचा एकमेव कार्यक्रम कधीच नव्हता पण उच्च निचतेला आणि मुख्यत: अस्पृश्यतेला त्यांचा विरोध पहिल्या पासून होता . त्याला गांधिंनि कमी महत्व दिल-  हा आरोप खोटा म्हणता येणार नाही . पण गांधी म्हणजे अस्पृश्यांच्या जिवावर उठलेला सैतान निश्चितच नव्हे.

गांधीही स्वत:ची मते अगणित वेळा बदलत आलेले आहेत . मी हिमालया  एव्हढ्या चुका केल्या आहेत असे गांधिंनि अनेकदा म्हटले आहे .







कधीकाळचा चातुर्वणाचा समर्थक गांधी । यापुढे मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच हजार राहीन अशी अट ठेवतो .। आणि राउंड टेबलाची नीती पुढे घटनाकारांना सन्मान देण्यापर्यंतही बदलते । बाकी गांधिंचि मते बदलत गेली आणि बाबासाहेब कायदामंत्रि (पहिल्या) मंत्रिमंडळात होण्यामागे गांधी होते   ।  पहिल्या घटनेपरिषदेवर बाबासाहेब लीग च्या पाठिंब्यावर गेले होते । ती परिषद पुढे रद्द झाली आणि फ़ाळणिनंतर जी नवी घटनापरिषद आली त्यावर बाबासाहेब जाताना गांधिंनि पाठिंबाच दिला होता . कोग्रेसच्या पाठिंब्या  शिवाय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होणे शक्य नव्हते … आणि आंबेडकरांसरखा विद्वान कायदा पंडित हातचा घालवायला गांधिजिहि मूर्ख नव्हते .

सुरवातीला गांधी सनातनी आणि चातुर्वणाचे समर्थक आहेत असा अर्थ निघू शकेल अशी पुष्कळ वचने गांधिंच्याच साहित्यातून काढुन दाखवता येतील . पुढे मात्र . गांधिंनि त्यांचे विचार बदलले आणि हिंदु धर्माच्या सर्व स्मृतींचे आणि धर्म ग्रंथांचे पुनर्लेखन करावे आणि स्त्रिया आणि शुद्र यांवर अन्याय करणारा भाग त्यातून काढुन टाकावा असे स्पष्ट मत गांधिंनि व्यक्त केले . ( म. गांधी आणि समाजसुधारणा - आकलन . नरहर कुरुंदकर)

हिंदु राहून समता प्राप्त करण्याचा हा  गांधी विचार आहे . हा विचार १ ९ २ ७  सालच्या आंबेडकरांच्या विचारासारखाच आहे.







गांधीच्या अर्धनग्न धार्मिक फ़किरिपेक्षा आंबेडकरांचे सुटा बुटात राहणे आणि त्यांचा आधुनिक विचार मला अधिक भावतो पण ....

सुस्पष्ट , लोजिकल , तर्कशुद्ध विचार करणारा माणुस उभ्या भारताचा नेता बनणे अशक्यच होते. या देशाची विविधता समस्यांची गुंतागुंत व आकांक्षांचा अनेकपदरिपणा जितका संकिर्ण (Complex ) होता तितकेच गांधिंचे व्यक्तिमत्व हि संकिर्ण होते.

 भारतासारख्या अनेकपदरी देशात राजकारण करायचे झाले तर मायावतिलाहि शेवटी सर्वजन हिताय अशी घोषणा द्यावी लागते हे विसरून चालणार नाही . गांधीना सर्वोदय हवा होता . पण अंत्योदय हे त्याचे सूत्र होते . सर्वांच्याच डोळ्यातले अश्रू पुसण्याची गांधिंचि महत्वकांक्षा आहे . पण अंत्यजाच्या डोळ्यातले अश्रू पुसणे हि त्याची पहिली पायरी आहे .  गांधी हे मुख्यत: राजकीय नेते आहेत पण त्यांनी समाजकारण झटकून टाकलेले नाही . त्यांची धर्माची परिभाषा , हरिजन वगैरे संकल्पना माझ्यासारख्या नास्तिकाला पचणार्या नाहीत पण गांधिंचा उदारमत वाद भारताला थोड्या बहुत प्रमाणात का होईना जोडू शकला हे नाकारता येत नाही .




समारोप 

घटनेचा साचा बनवून बाबासाहेबांनी ह्या देशाचा मनु  पालटला . गांधिच्या पाठिंब्या शिवाय हे शक्य नव्हते . देशाचे भविष्य कसे चालावे याचा ढाचा आंबेडकर तयार करतात आणि त्यांच्या नियुक्तीला गांधिंचा पाठिंबा असतो . तेंव्हा मुख्य वाद मिटलेला असतो. हा देश सनातनी विचारांनी चालणार नाही … आधुनिक राज्यघटनेनुसार चालेल अशी ग्वाही मिळालेली असते .   . बाकी थोडेबहुत मतभेद सगळ्याच माणसात असणार आणि ते नैसर्गीकही आहे .

गांधी आंबेडकर मुख्य वाद आणि संघर्ष इथे संपतो .

तरीही या दोन महान भारतीय नेत्यांत कधीही मनोमिलन झाले नाही हि भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे .

गांधी सवर्ण हिंदुचे नेते होते पण अस्पृश्यांचे दुश्मन नाही . आंबेडकर दलित समाजाचे नेतृत्व करत असले तरी त्यांचे घटना परिषदेतील काम , हिंदु कोड बिल , कायदा मंत्रि म्हणुन केलेले काम हे सर्व देशासाठी होते . एक अर्थशास्त्री म्हणुन आंबेडकरांचा रिझर्व बेंक ऑफ इंडिया च्या पायाभरणीत मोठा वाटा आहे . हे काम सर्वच देशासाठी आहे . त्या अर्थाने आंबेडकर हे राष्ट्रीय नेते आहेत .

स्पृश्य - अस्प्रुश्यांचा संघर्ष जटिल होता . अस्पृश्यांची अस्मिता जागी करणे - अन्याया विरुद्ध लढणे - स्वत:चे न्याय्य हक्क मागणे आवश्यक होते. हे काम आंबेडकरांनी केले . त्याचवेळी अस्पृश्यांना त्यांचे हक्क देऊन टाकण्यासाठी सवर्णांचि मानसिकता तयार करणे आवश्यक होते . गांधिंनि तेच काम टप्प्या टप्प्याने केले . हे कामही अतिशय अवघड होते आणि आवश्यकही होते .

त्या दोघात एकमत दुर्दैवाने  झाले नाही म्हणुन आजही तो भांडण  वारसा चालू ठेवणे वेडेपणाचे आहे .

(क्रमश:)

-------------------------------------------------------------------------------------------------------------
मला समजलेले गांधिजी या मालिकेतील पुढील भाग : - 

भाग ३) पुस्तकांपलिकडचे गांधी : (आगामी )   



सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *