धर्म चिकीत्सा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धर्म चिकीत्सा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१२ जाने, २०१५

चार्ली हेब्दो च्या निमित्ताने : भारतीय सेक्युलारीझम समोरील आव्हाने



होय इस्लाम खरोखरच खतरेमे आला आहे .

पेरिस च्या 'चार्ली हेब्दो' या साप्ताहिकावर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. मुहम्मद पैगंबर आणि इसीस च्या नेत्याची व्यंगचित्रे छापली म्हणुन कडव्या इस्लामिस्टांनि एक डझन लोकांना गोळ्या घालून ठार केले आहे. यावेळी ते अल्लाहू अकबर , आम्ही प्रेषित अपमानाचा सूड घेतला आणि धर्म्ररक्षण केले अशा अर्थाच्या घोषणा देत होते. यामुळे त्यांचा धर्म टिकेल, वाढेल आणि इस्लामला सन्मान मिळेल असे त्यांना वाटते .

वास्तवात जगभरात आधीच अस्तित्वात असलेल्या इस्लाम विरोधाला आता अजून धार येणार आहे . ज्या साप्ताहिकावर हल्ला झाला ते डाव्या पुरोगामी विचारांचे आहे. सर्व प्रकारच्या (पाश्चात्य ख्रिस्ती / इस्लामी ) उजव्या विचारसरणींच्या लोकांना मात्र हे साप्ताहिक अगदी सुरुवातीच्या अंकापासुन खटकतं राहिले आणि राहिल.

पण त्यावर जीवघेणा हल्ला करणारे मुस्लिमच असावेत यात काहीही नवल नाही . विवेकवाद आणि सहिष्णुता यांच्याशी इस्लाम धर्माचे काहीही देणे घेणे नाही. मुळात इण्टोलरन्स आणि इतर विचाराशी / धर्माशी असहिष्णुता हा कुराण आणि हदीस या धर्मग्रंथांचा गाभा आहे . सर्वच धर्म मनुष्यकृत आहेत . मानवाच्या रानटी अवस्थेत धर्माची निर्मिती झाली असल्याने सर्वच जुन्या धर्मात थोडाबहुत रानटीपणा आढळतोच . इस्लाम मध्ये हे प्रमाण जास्त आहे कारण अरबांचा वाळवंटि प्रदेश , टोळीयुद्ध , सततचा कोरडा दुष्काळ  , वाळवंटि दुर्भिक्ष या सार्या घटकांचा परिणाम इस्लाम वर झाला आहे . त्याहून वाइट म्हणजे इस्लाम मध्ये धर्म सुधारणा चळवळीची वानवा आहे . मुद्दा असा कि या सार्याचा इस्लामला काहीही उपयोग होताना दिसत नाही . इस्लामची म्रुत्युघंटा वाजू लागली आहे .

सुबुद्ध आणि सुसंस्क्रुत मुस्लीमाला या इसीसशी किंवा अल कायदाशी माझा संबंध नाही असे म्हणणे आवश्यक ठरणार आहे . पण त्यातून सुधारणा चळवळ जन्म घेताना दिसत नाही याउलट "खरा" इस्लाम शांतता प्रिय आहे वगैरे अकलेचे तारे तोडले जातात . इस्लामचे असहिष्णू रूप कुराण आणि हदीसच्या पाना पानावर आहे. सत्य फार काळ लपत नसते . इस्लाम सुधारणा घडवू शकत नसल्यास तो संपणार आहे. जो वाकत नाही तो मोडतो . नव्या आधुनिक जगाशी ज्याना जुळवून घेता येणार नाही त्या सर्वच धर्मांची हि हालत होणार आहे .

जी चित्रे का छापली ? म्हणुन हा हल्ला केला ती चित्रे आज अनेकांची फेसबुक प्रोफ़ाइल म्हणुन फिरत आहेत . ती चित्रे महाराष्ट्र टाइम्स नेही प्रसिद्ध केली आहेत . किती लोकांवर हल्ले करणार ? धर्म ग्रंथाचे पान मिटुन विज्ञान ग्रंथाचे पान उघडावे लागेल . मध्ययुग संपले -- विज्ञान युग आले.. त्यातल्या विवेक वादाशी इस्लामला जुळवून घ्यावे लागेल. नाहीतर संपावे लागेल . इस्लाम मध्ये सध्या तरी सुधारणेचे कोणतेहि चिन्ह दिसत नसल्याने इस्लाम खत्र्यात आहे हे खरेच . (त्यांच्याप्रमाणे कडवे होऊन आपले धर्म रक्षण होईल असे ज्यांना वाटते . ते हि खत्र्यातच येणार आहेत )

 ती चित्रे महाराष्ट्र टाइम्स नेही प्रसिद्ध केली आहेत 


सेक्युलारीझम का हरतो ?


फ्रांस मधील हल्ल्यानंतर भारतीय सेक्युलरांच्या प्रतिक्रिया पहाण्याजोग्या आहेत . एकिकडे दहशतवादाचा निषेध आणि दुसरीकडे व्यंग चित्रकार चार्ली हेब्दो तुम्हाराबी चुक्याच ! असा अर्थ सेक्युलर प्रतिक्रियांच्या लसावितून निघतो … इस्लाम हा मुर्तिपुजेचा / चित्रनिर्मितिचा कडवा विरोधक असल्याने त्यांच्या प्रेषिताचे व्यंगचित्र काढणे चूक आहे . विनाकारण मुस्लिमांच्या भावना दुखावू नयेत वगैरे नेहमीचे सेक्युलर रडगाणे आहेच . एका बसपाच्या खासदाराने हल्लेखोरांना बक्षिस जाहीर करून आणि मणिशंकर अय्यरने थेट प्रेशितांच्या समर्थनार्थ धावून जावून आपली अल्ला भक्ती सिद्ध केली आहे . तिस्ता सेटल्वाडनेहि इस्लाम समर्थनाची बांग ठोकली आहे .


भारतातल्या स्वत:ला सेक्युलर म्हणणार्यांनि इस्लाम धर्म रक्षणाचि भूमिका घ्यावी यात काहीच धक्कादायक नाही . आजवरचा इतिहास पाहता ,जमाते इस्लामी आणि भारतीय सेक्युलर यांच्या भूमिकात विलक्षण साम्य आहे . साम्यवादी विचारवंतांचे भारतीय बौद्धिक जगतावर साम्राज्य आहे .त्यातून हा   विचार  जन्मला आहे .. इस्लाम हा धर्म इथल्या वर्ण व्यवस्थेतून मुक्ती देणारा समतावादी धर्म आहे अशी जमाते इस्लामीची मांडणी आहे . सार्या भारताने इस्लाम स्वीकारून समतेच्या धर्मात सामील व्हावे यासाठी जमाते इस्लामी ने इस्लाम सर्वांसाठी असे अभियान चालवले आहे . भारतीय सेक्युलर या अभियानात जाणता / अजाणता सामील आहेत .

मुळात इस्लाम हा भारतीय धर्म नसल्याने त्यात वर्ण व्यवस्थेचे समर्थन नाही . वर्ण व्यवस्था वाइटच ... पण वर्ण व्यवस्थेचे समर्थन नसणे हा समतेचा एकमेव क्रायटेरिया आहे काय ? सर्व धर्म मानवनिर्मित आहेत . भारतातले धर्म इथल्या सामजिक गोष्टीवर भाष्य करतील … अरबी धर्म कसे करतील ?

इस्लाम मध्ये समता आहे हा साफ खोटा प्रचार आहे . तत्कालीन अरबांचि स्त्रियांकडे पाहण्याची                   " विशिष्ट "  दृष्टी इस्लाम मध्ये ओतप्रोत भरली आहे . बहुपत्नीत्व तलाक बुरखा या केवळ रूढी नाहीत .       " स्त्रिया म्हणजे पुरुषांची शेती " अशी वाक्ये कुराणातून अल्लाहनेच लिहून ठेवली आहेत . कुराणात गुलामांना चांगले वागवा असे उल्लेख येतात . गुलामगिरी प्रथा नष्ट करा असे कुराण म्हणत नाही . आजही मुस्लिम राष्ट्रात गुलामगिरी आहेच . चातुवर्ण नसले तरी विषमता विषमता असू शकतेच . काफिर आणि मोमीन अशी सार्या जगाचीच दोन भागात विभागणी करणारा इस्लाम हा समतावादी किंवा शांतता प्रिय धर्म आहे असे म्हणण्याचे धाडस फक्त भारतातले सेक्युलर आणि जमाते इस्लामीच करू शकतात . 


भारतातल्या मुस्लिमात असलेल्या जातिप्रथेचे, विषमतेचे, मुलतत्व वादाचे जनकत्व दरवेळी हिंदु धर्माकडे दिले तर बौद्धिक वावदुकीत जिंकता येईल अशी भाबडी आशा  सेक्युलर मनात वसते आहे . त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य याच भाबड्या आशेवर जगायला आमची ना नाही . पण बहुसांस्कृतिक वाद , सर्व धर्म समाभाव , अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे आधुनिक बुरखे पांघरुन तथाकथित सेक्युलरांनि इस्लाम धर्म रक्षणाचि बांग ठोकल्याने त्यांची चिकित्सा क्रमप्राप्त ठरली आहे .

इसीस चे प्रेरणास्थान कालि  माता आहे अशा अर्थाचे सेटलवाड उद्गार  



सेक्युलरांना दुसर्याच्या धर्माचा आदर करणे हे योग्य मुल्य वाटते.


सेक्युलरांना दुसर्याच्या धर्माचा आदर करणे हे योग्य मुल्य वाटते. हीच मुळात भयंकर गोची आहे . धर्म हि एक कालबाह्य आणि घातक गोष्ट आहे . हिंदुधर्म घातक आहे . तो मुख्यत: आत्मघातक आहे . सती प्रथेपासुन अस्प्रुश्यते पर्यंत सारा हिंदु धर्म आत्म घातक आहे . त्यामुळे हिंदु समाजाच्या भल्यासाठी त्याला धर्म मुक्त करणे आणि हिंदु धर्माची कठोर चिकित्सा करणे क्रमप्राप्त ठरते . इस्लामची केस वेगळी आहे . बुरखा तलाक मुळे तो आत्म् घातक तर आहेच . पण दार उल इस्लाम - जिहाद - मुजाहिदीन अशा धार्मिक संकल्पनामुळे इस्लाम पर घातक हि आहे .


इस्लाम इतर  धर्म घातक असल्याने  इस्लामेतरांनाहि इस्लामची चिकित्सा करण्याचा नैतिक अधिकार आहे . पिके सिनेमातला हास्यास्पद शंकर योग्य आणि मुहम्मदाचे फ्रेंच कार्टुन अयोग्य हा कोणता उफराटा बुद्धिवाद ? इस्लामची चिकित्सा करण्याची परंपरा भारतीय बुद्धीवाद्यात आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर , कुरुंदकर , शहा , दलवाई या आधुनिक विचारवंतानि इस्लामची कठोर चिकित्सा केलेली दिसते . सध्या हि परंपरा खंडित झालेली दिसते .
चित्रकला विरोध मान्य करणे म्हण्जे सहिष्णुता नाही . चार्ली हेब्दोने कार्टुन काढायची किंवा बघायची मुस्लिमांना सक्ती केलेली नाही . कार्टुन काढणे आणि नग्नता हि फ्रेंच संस्क्रुतित मान्य गोष्ट आहे . फ़्रेंचाच्या अभिव्यक्तीचा मान राखणे हे इस्लामचे दायित्व आहे । कोणाची किती चिकित्सा करायची याची त्या धर्माकडून परवानगी घेतली जाणार नाही . पण भारतीय सेक्युलरांना व्यक्तिवाद , व्यक्तिसवातंत्र्य , अभिव्यक्तिस्वातंत्र्य , स्वातंत्र्य समता बंधुता या फ्रेंच संकल्पना अजून कळलेल्या नाहीत .

बहुसांस्कृतिक वाद आणि परधर्म सहिष्णुतेचे गोंडस बुरखे घेऊन चार्ली हेब्दोचा विरोध भारतीय बुद्धिमंतानि चालवलेला दिसतो . व्यंगचित्र ते पण इस्लामच्या प्रेषिताच … ज्याला चित्रे आणि मूर्ती मान्यच नाहीत त्याच व्यंगचित्र ? हे म्हणजे फारच झाल बुवा ! असा तो सूर आहे . मग इस्लामने मान्य केल्लेल्या परिघातच त्याची चर्चा व्हावी काय ? तसे असेल तर इतर धर्माला हि हाच न्याय लावणार काय ?


जमाते इस्लामीशी सुसंगत भूमिका घेणार्या सेक्युलरांना आपण का हरतो आहोत हे समजणार नाहीच ! अल्लाहनेच त्यांच्या बुद्धीवर सील ठोकले आहे !!



फ्रेंच राज्यक्रांतिचा आदर्श 

भारताच्या राज्यघटनेतिल स्वातंत्र्य , समता,  बंधुता हि तत्वे फ्रेंच राज्यक्रांतितुन स्फुरली आहेत . या सेक्युलर राज्य घटनेमुळे आज भारत  देश एकसंघ आणि प्रगतीपथावर आहे.  सध्याच्या भारतीय सेक्युलरांना मात्र फ्रेंच राज्यक्रांतिच्या मुलभूत तत्वांचा विसर पडलेला दिसतो . 
फ्रेंच राज्यक्रांती हा माणसाच्या बौद्धिक उत्क्रांतितला महत्वाचा टप्पा आहे.  माणुस केंद्रस्थानि ठेवून नव्या अभिनव तत्वज्ञानाचि मांडणी फ्रेंच राज्यक्रांतितुन झाली .व्यक्ती श्रेष्ठ आहे . समाज , धर्म , राष्ट्र या सर्वापेक्षा व्यक्तीचे स्थान उच्च आहे . अभिव्यक्ती स्वातंत्र्यात धर्म- धर्मगुरू - प्रेषित या सर्वावर तिक्ष्ण हल्ले होणे क्रमप्राप्त आहे . 

 व्यक्तीचे स्वातंत्र्य , अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मानणार्या फ्रेंच डाव्या पुरोगामी साप्ताहिकावर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला करावा हे त्यांच्या परंपरेला साजेसेच आहे . हा धर्म आणि व्यक्तिस्वातंत्र्य यातला संघर्ष आहे . फ़्रेंचाच्या जुन्या पिढ्यांनी या कुस्तीत ख्रिस्ती धर्माला चीतपट केले आहे . आता इस्लामची बारी आहे . धर्म चिकित्सा अपरिहार्य आहे आणि चिकित्सेचे उत्तर गोळी नाही .

हे इस्लामिस्टांना आणि भारतीय सेक्युलरांना उमजले तर ते दोघे टिकतील . अन्यथा नाही . 


.   

१२ डिसें, २०१४

संघाचे धर्मांतर …. विरोधी पक्षांचा गदारोळ आणि काही मूलभूत प्रश्न


७ प्रश्न कोकुमम्मा च्या विचारासाठी  आणि   प्रश्न हिंदुत्व वाद्यांच्या विचारासाठी 
 .
पार्श्वभूमी : लोकसत्ताच्या ११ डिसेंबर २०१४ च्या बातमिनुसार २०० मुस्लिमाना संघाने हिंदु करून घेतले. दोन्ही (को)न्ग्रेस ,(क)म्युनिस्ट, बंगालची (म)मता आणि (मा)यावती कोकुममा यांच्या पक्षांनि लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घातला . या पक्षाना एकत्रित रित्या कोकुममा म्हणुया . विरोध करताना कोकुममा कारणे देत होते कि या हिंदु धर्मांतरामुळे ताणाव वाढेल , संघाने आधार कार्डाची लालूच दाखवली इत्यादी.

भारताची घटना त्यातला सेक्युलारीझम आणि धर्म् - स्वातंत्र्य हे सर्व भारताच्या  हिताचे आहे । हे तुम्हाला कधी कळणार ? हा बौद्धिक दुबळेपणा कधी सोडणार ?
.
यातून काही मुलभूत धार्मिक -राजकीय - सामजिक प्रश्न उभे राहतात . त्यांचा अतिशय तटस्थ पणे विचार करुया .
७ प्रश्न कोकुमम्मा च्या विचारासाठी : 

१) धर्मांतर हा घटनेने दिलेला हक्क आहे . मुस्लिमांना हा घटनादत्त मूलभूत अधिकार नाकारणारे कोकुममा कोण ?
.
२) यावेळी संघाने केवळ २०० लोकाना हिंदु केले आहे । या आधी लाखोंच्या संख्येने ख्रिश्चन आणि मुस्लिमांनी हिंदुचे धर्मांतर केलेले आहे . त्यावेळी कोकुममा चे प्रश्न आणि गोंधळ कोठे गुप्त झाला होता ?
.
३) आधार कार्ड देतो अशी लालूच दाखवून संघाने धर्मांतर घडवले असा या पक्षांचा आक्रोश आहे . या आधी जी हिंदुंचि धर्मांतरे ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मात झाली ती सर्वच्या सर्व तौलनिक धर्म शास्त्रांचा विद्यापीठीय अभ्यास करून झाली होती काय ? रेव्हरंड टिळ्कांसार्खे अपवाद वगळता ९९.९९९% धर्मातारे हि भीती किंवा लालुच यामुळेच होतात. पाद्र्यांचि पाव भिस्कुटे आणि मौलविंचा (लग्नाळू लव्ह ) दबाव राहिला एका बाजूला . मुळात सारे धर्मच लालूच दाखवतात . जन्नतची लालूच . जहन्नुमची भीती . स्वर्ग - नर्क - मोक्ष - पुनर्जन्म - दु:खमुक्ती यांची भीती किवा लालूच दाखवल्याशिवाय कोण्यातरी धर्माचे दुकान चालेल काय ?
.
४) जमाते इसलामीचे दावत आणि इस्लाम सर्वांसाठी असे धर्मांतर अभियान सध्या चालू आहे. मागे जॉनी लिव्हर आणि नगमाने मुंबईभर मोठमोठाली पोस्टर लावून ख्रिस्ती धर्मप्रचार चालवला होता . तेव्हा कोकुममा आणि त्यांचे भाडोत्री विचारवंत काय करत होते ?
.
५) यात खरे विवस्त्र झाले ते कम्युनिस्ट . धर्म हि जर अफूची गोळी आहे तर अफूचा ब्रेंड बदलल्याने तुम्हाला काय फरक पडतो ? अल्प्संख्यकांच्या सहान्भूतीचे हे फ्लोप नाटक कोकुममा किती वेळ करणार ?
.
६)हिंदुनि भारतीय धर्मात केलेले धर्मांतर आणि उपरोक्त धर्मांतर यातला फरक   आहे   ?   हिंदु - मुस्लिम - ख्रिस्ती धर्मांतराचा संबध बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म स्वीकाराशी करण्याचा मुर्खपणा कोकुममा करणार आहेत काय ? सामाजिक न्यायासाठी बाबासाहेबांनी केलेले योग्य कृत्य आणि उपरोक्त राजकीय वशिलेबाजीतला फरक कोकुममा ला कळणार काय ?
.
७ )अशा प्रकारे सतत हिंदु जन विरोधी आणि इस्लाम धर्म धार्जिणी भूमिका घेतली तर कोकुममा पैकी एखाद्याला… निदान विरोधी पक्षनेता होण्याएव्हढ्या सीटा तरी भारतीय लोकसभेत मिळतील काय ?


--------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी इथे धर्म सुधारणाबद्दल बोलत नसून …. कोकुमम्मा च्या दुटप्पी धर्मांधतेबद्दल बोलत आहे . मुस्लिमाना धर्मांतराचा मुलभुत हक्क नाकारणार्या कोकुमम्मा फेसिझम बद्दल बोलत आहे … बाकी तणाव दबाव हे अपवाद आहेत …इथेहि आणि तिथेही … धर्म हि एक अतिशय सामान्य आणि फालतू गोष्ट आहे आणि ती दिवसातून पाच वेळा बदलली तरी चालते . सोडली तरी चालते . किंबहुना हिंदु समाजाच्या हितासाठी त्यांनी मनुस्मृती जाळली पाहिजे असेच आमचे मत आहे. हिंदू समाजाचे हित …… आणि ……. सनातनी हिंदु धर्मवाद यातला फरक स्पष्ट करण्यात पुरोगामी अपयशी ठरले आहेत . कारण हिंदु या शब्दाचाच वांझोटा " कुत्सित " द्वेष करणारी   विचारसरणी त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी अतिशय काळजीपूर्वक वरील प्रश्न विचारले आहे . सहसा असे प्रश्न सनातनी विचारतात पण त्यांचा मुद्दा असतो कि … हिंदु धर्मातच सुधारणा का ? हिंदुचेच अंधश्रद्धा निर्मुलन का ? सानातन्यांचे विक्षिप्त म्हणने आहे कि " … जो तो उठतो तो हिंदूंनाच शहाणपण काय म्हणुन शिकवतो ? हिंदूच्याच सुधारणा काय म्हणुन ? अंधश्रद्धा निर्मुलन फक्त हिंदुचेच का ? विकास फक्त हिंदुचाच का ? प्रगती फक्त हिंदुचीच का ? प्रगतिपथावर फक्त हिंदूच का ? हिन्दुनाहि बहुपत्नित्वाचा , धर्माधतेचा , अस्पृश्यतेचा , मागासलेपणाचा, दारिद्र्याचा , भोळसट्पणाचा आणि गरिबिचा पुर्ण हक्क आहे ! आणि तो आम्ही हिन्दु मिळवणारच"
.--------------------------------------------------------------------------------------------------------------------


७ प्रश्न हिंदुत्व वाद्यांच्या विचारासाठी :


हिदुत्व वादि लोक्स धर्मांतर बंदी कायद्याचा पुनरुच्चार करत आहेत । तसे झाले तर हा घटनेने दिलेल्या मुलभुत धर्म स्वातंत्र्यावर घाला असेल।  ७ प्रश्न हिंदुत्व वाद्यांच्या विचारासाठी :

हिंदु सबलिकरणाचि भाषा करणार्यांना संख्या हे एक बळ हे समजत नाही ? जर समजत असेल तर मग हिंदु पर्सेंटेज आहे तेव्हढेच ठेवण्याचा धर्मांतर बंदी कायदा का ?
.
१)श्रद्धा हि डोक्यात असते कागदी सर्टिफ़िकेटात नाही । आणि विचारावर बंदि घालता येत नाहि. बौद्धिक चर्चा करून स्वधर्माची महती पटवून द्यायला काय अडचण आहे ? कि काही विशिष्ट मुद्द्यावर चर्चा आणि आत्म्परिक्षण कठीण जाते आहे ?
.
२) आज हिंदुत्व वादि पुर्ण बहुमताने सत्तेत आहेत . हा देश शत प्रतिशत हिंदु बनवायची सुवर्णसंधी चालून आलेली आहे . हिंदु लोक सत्ता संपत्ति साधने आणि माध्यमे या बाबतीत इसाई आणि मुस्लिमांपेक्षा कितीतरी अधिक सरस आहेत . मग हि भित्रट वृत्ती का ? धर्मप्रसार करणे हा हिंदुचाहि मुलभूत घटनादत्त हक्क आहे … तो तुम्हाला का गमवायचा आहे ? सारी सत्ता हातात असताना मिश्नर्यांसमोर का गुढगे टेकताय ? हे क्लैब्य आहे … आणि हि मानसिक कमजोरी हिंदुचा सर्वनाश घडवण्यास पुरेशी आहे . बाहेरच्या शत्रुंची गरज नाही .
.
३) धर्मांतर केले कि नव्या धर्मांतरीत व्यक्तिस कोणती जात द्यावी ? कर्मविपाक सिद्धांताने गेल्या जन्मीचे फळ म्हणुन मिळणारी जात कशी शोधावी ? सर्व धर्म सारखीच शिकवण देतात ? अशा भाकड प्रश्नातून हिंदुनि यापूर्वी कधीही धर्मप्रसार केला नाही । त्यात सहिष्णुतेचा भाग कमी आणि मानसिक क्लैब्याचा भाग अधिक आहे . या मानसिक कमजोरीतून बाहेर पडल्याशिवाय हिंदू समाज , त्याचे समाजकारण आणि राजकारण कधीही बलवान होऊ शकत नाही .
.
४) हम पाच हमारे पच्चीस वरून मुस्लिमांविरुद्ध बोंब ठोकायची आणि हिंदुनि दहा मुले जन्माला घालावीत असे आदेश काढायचे … यापेक्षा बरे उपाय संख्या वाढवायला मिळत नाहीत का ? कुटुंबाची लोकसंख्या लग्नाच्या संख्येवर अवलंबुन असते-- समाजाची नाही . एव्हढे साधे सत्य समजत नाही ? निसर्गात: स्त्रीपुरुष प्रमाण समान असते … एकाने पाच लग्ने केली तर उरलेले चार पुरुष विधुर राहतात हे तरी समजते का ? समाजाची लोकसंख्या त्या समाजातील स्त्रियांच्या लोकसंख्येवर अवलंबुन असते … लग्नावर नाही …। हिंदुतलि स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे हा लोकसंख्या वाढवायचा शास्त्रीय मार्ग आहे. पर हजारी स्त्रियांची संख्या मुस्लिमात जास्त आहे…कारण त्यांत स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण नगण्य आहे …। या बाबतीत त्यांची बरोबरी करायला कधी आदेश का नाही आला ?
.
५) स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे यासारखे हिंदु सबलीकरणाचे साधे सोपे शास्त्रीय मार्ग सोडुन द्यायचे आणि … कुटुंबनियोजन नको म्हणुन रडायचे … धर्मांतर बंदी कायद्याची वकिली करायची आणि मग हिंदुराश्ट्र म्हणुन रडायचे … हा बौद्धिक भित्रेपणा कधी सोडणार ?
6) आपला धर्म इतरांना सामावून घेण्याची शक्ती गमावून चुकला आहे … मठ मंदिराच्या आवारात आणि बाबा बुवांच्या परसात धर्माची वाढ खुंटली आहे … वाढ करायची नाही … या भ्याडपणातुन सर्वच धर्म सारखी शिकवण देतात … हि बुळचट विचारसरणी हिंदुत जन्माला आली . धर्मांतर केले तरी ते किती वेळ टिकेल याची ग्यारेंटि नाही … म्हणुन कायद्याची नाटके चालू आहेत… सध्याच्या हिंदु सरकारला एक कायदा करून मंदिरातले हजारो कोटींचे धन त्यांच्या घर वाप्सिला वापरता येईल … हिंदुचा पैसा हिदुधर्माच्या वाढीसाठीच वापरल्याचे पुण्य पण मिळेल . असे होईल का ?
.
7) बहुसंख्य ख्रिस्ती धर्मांतर हे रोग बरे करणारे येशूचे पाणि वाटुन होते . अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याचा योग्य वापर केला तर ख्रिस्ती धर्मांतर पूर्णपणे थांबवता येईल हे सनातनी बाल्बुद्धीना सुचेल काय ? त्याच कायद्याचा वापर करून शौर्य दाखवणार कि भित्र्या भागुबाई प्रमाणे अंधश्रद्धा विरोधी कायद्याच्या नावाने रडत बसणार ?

.जर एखाद्याने मनातून हिंदु धर्म सोडला तर कागदी सर्टिफ़िकेटला कोण विचारतो ? कागदोपत्री हिंदु असलेले लोक्स हिदुत्व वादि असतात काय ? नव्या युगात आत्मपरिक्षण धर्मसुधारणा हि टिकण्याची साधने आहेत …. भ्याड कायदे नाही … इव्होल्युशन आणि नास्तिकता अंशत: तरी मान्य करणार्या ख्रिस्ती पोप ला हे कळले …भारताची घटना त्यातला सेक्युलारीझम आणि धर्म् - स्वातंत्र्य हे सर्व हिंदु हिताचे आहे । हे तुम्हाला कधी कळणार ? हा बौद्धिक दुबळेपणा कधी सोडणार ?


. Dr Abhiram Dixit
.

५ ऑग, २०१४

मौलाना नदविचा शांतता धर्म

मौलाना नदविचा शांतता धर्म 
मौलाना नदवी ने खुल्या पत्रात "इसीस" नावाच्या इस्लामी दहशत वादि संघटनेला पाठिंबा जाहीर केला आहे . "इसीस" साठी भारतातून पन्नास हजार मुजाहीदांची (धर्मयोद्धे ) फौज पाठवण्याच्या वल्गनाही केलेल्या आहेत. आणि त्या "इसीस" साठी आर्थिक मदतीचे आवाहनही केलेलं आहे . कोण आहे हा मौलाना नदवी ? हा भारतीय मौलाना आहे . 

भारतात एक दार उल उलुम नावाची सुन्नी मुस्लिमांची शिखर संघटना आहे . त्याच्याच पिल्लू संघटनेत नदवी आहेत . बरे नुसती संघटना महान आणि मुस्लिम मनावर प्रभाव असणारी आहे एव्हढेच नव्हे तर नदवीचे कुळहि हुच्च आहे . अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि दारुल उलुमचे रेक्टर अली मियाँ यांचे हे मौलाना नातू आहेत. या महान मौलवीने "इसीस " साठी जिहाद चे आव्हान केले आहे .
-----

काय आहे इसीस ?


सुन्नी आणि शिया असे मुस्लिमांचे दोन पंथ / जमाती आहेत . मुहमद पैगंबराच्या मृत्यनंतर काही वर्षातच खलिफा (इस्लामचा सार्वभौम राजा ) कोणि व्हावे ? यावरून वाद झाला . खून पडले . रक्तपात झाला . आणि मग शिया सुन्नी असे दोन गट पडले . इसीस हि कडवी सुन्नी मुस्लिम दहशतवादी संघटना .

इसीस = ISIS = इस्लामिक स्टेट ऑफ इराक एण्ड सिरिया . 


"इसीस" ने हजारो परजातीय शिया मुस्लिमांची कत्तल केली आहे. इराक मधील स्त्री वादि कार्यकर्त्या बासमा-अल-खातीब यांच्या मुलाखतीनुसार इसीस ने शेकडो शिया स्त्रियांवर बलात्कार केले आहेत . गंमत म्हणजे संस्कृती रक्षणाचि बांग ठोकत , ह्याच इसीस ने बुरख्याची सक्ती केलेली आहे . बुरखा न घालणार्या स्त्री ला शरियत या मध्ययुगीन कायद्यानुसार शिक्षा देण्यासाठी "इसीस" कटिबद्ध आहे . बुरखा - बलात्कार आणि शरीयतची अशी गुंफण "इसीस" ने घातली आहे. एव्हढेच काय ? कपड्याच्या दुकानातील जाहिरात करणार्या प्लास्टिकच्या बाहुल्या "पुर्ण कपड्यात " असल्या पाहिजेत असाही इसीस चा नियम आहे . प्लास्टिकच्या बाहुल्यांनी चेकाळणार्या ह्या इस्लामी महाभागांचा चक्रमपणा एव्हढ्यावरच थांबलेला नाही .…. कत्तली , खून आणि बलात्काराच्या शिरावर त्यांनी खिलाफ़तिचा मुकुट चढवला आहे .

इसीस ने नवा खलिफा जाहीर केला असून भारतीय मौलाना नदविने सकल जगातील मुस्लिमांच्या या नव्या - राजास - खलिफ़ास सलाम ठोकत त्यासाठी भारतिय मुस्लिमांची फौज उभारण्याचा संकल्प सोडला आहे . कळवा - मुंब्रा - ठाणे येथील काही तरुण ह्या इस्लामी खिलाफ़तिसाठि जिहाद करायला इराक मध्ये डेरेदाखल झाल्याच्या बातम्या वर्तमान पत्रातून प्रसिद्ध झाल्या आहेत.
------
त्यामुळे नदवीचे पत्र हा हसून सोडुन द्यायचा विषय नाही . इसीस आणि दारुल उलुम यांच्या पैन इस्लामिक कनेक्षनकडे पुरोगामी मुस्लिमांनी दुर्लक्ष करता कामा नये . मुख्यत: भारतातील मुस्लिम स्त्रियांनी , शिया मुस्लिमांनी विचार करायची वेळ आलेली आहे . इतर धर्माचे लोक तर तो करतीलच.

-----------------------------------------------------------------------

४ मार्च, २०१४

मुकादमांचां इस्लाम (त्यांच्या चष्म्यातून : भाग ६ )

चश्म्याविषयी थोडेसे :

या मालिकेत आपण आजपर्यंत पाच महत्वाच्या ऐतिहासिक मुस्लिम महापुरुशांच्या विचारांना स्पर्श केला आहे . एका अर्थाने पाच अतिशय वेगवेगळ्या दृष्टीकोनातून इस्लाम धर्मा कडे पाहिले आहे.  परकाया प्रवेश करून - दुसर्‍याच्या नजरेतून तिसर्‍याकडे पहाण्याची तर मजाच काही और आहे. माझ्या लहानपणी मिस्टर इंडिया नावाचा एक सिनेमा आला होता. हातात वैज्ञानिक जादूचे घड्याळ बांधून अनिल कपूर अद्रुष्य व्हायचा. काहि केल्या तो मोगँबोला दिसायचा नाही. मग मोगँबो लाल काचेच्या चश्म्यातून बघायचा. अनिल कपूर दिसायचा. आपण चश्म्याचा रंग बदलला की नजरेसमोरचे दृष्य बदलते. कविळ झालेल्याला पिवळे दिसते म्हणतात. एकाच घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पहाता येते हा मुद्दा आहे. जर एकाच घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पहाता येत असेल तर विचारधारांकडे आणि धर्मप्रवाहांकडे तर हजारो दृष्टीकोनातून पाहता येईल . अकबरापासून हमीद पर्यंतचे हे थोर पुरुष आणि धर्माकडे  पहाण्याचा त्यांचा चष्मा आपण पाहिला. त्यात एक गोष्ट सामाईक आहे. कोणती बर ?



 अकबर हा मध्ययुगातला अतिश्रीमंत बादशहा आहे . तो फिरायला निघाला कि त्यामागे चवर्या - पंखे घेऊन धावणारे हुजरे  , सुगंधी सरबते घेऊन फिरणार्या दासी , अकबराची स्तुती करायला पाळलेले पगारी भाट यांच्या लवाजम्याची झुंबड उडते आहे . पण हिंदुस्तानच्या  शहन्शहाचे यात मन  रमत नाही . खलबतखाने - इबादत खाने उघडत अकबर धर्मचीकीत्सक बनतो . धर्मचीकीत्सेची पहिली पायरी म्हणूनच कि काय ? पण तो धर्मसहीष्णू बनतो आणि सर्व धर्मांना समान न्याय देण्याचे धोरण अवलंबतो . पण अकबराची जिज्ञासा त्याला त्याला तिथे थांबू देत नाही … त्याने इबादत खान्यात सर्व धर्माच्या धर्मप्रेमी मंडळी ची तडाखेबंद भाषणे आणि चावरे युक्तिवाद ऐकले आहेत . थोड्या बर्या आणि थोड्या वाईट अशा गोष्टी सगळ्याच धर्मात असतात असे त्याला वाटू लागते . मग तो म्हणू लागतो कि जनतेच्या भल्यासाठी धर्मात हस्तक्षेप करणे हा राजाचा अधीकार आहे … अशाप्रकारे अकबर सेक्युलर आणि बुद्धिवादी बनत सगळ्या धर्मातले त्याला आवडणारे घटक एकत्र करून दिने इलाही नावाचा नवाच धर्म काढतो ! मुल्ला मौलवी विरोध करतात तर अकबर त्याना चोप देऊन कंदाहारच्या बाजारात विकून टाकतो.

 जे जे अकबराला जमते ते ते हमीद दलवाइना जमू शकणार नाही . त्याना कधी मौलविंच्या धर्मांधते समोर क्षणिक  माघार हि घ्यावी लागेल. काही सामर्थ्य सत्तेचे आहे . पण काही गोष्टी हमीद अशा करेल … जे अकबराला शक्य नाही …. कारण  काही सामर्थ्य काळाचेही आहे . अकबराने दिने इलाहिचा पुढचा प्रेषित म्हणून स्वत:लाच जाहीर केले होते . हमीद तसे करणार नाही. हमीद लोकशाही , धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची भाषा बोलेल. तरी हमीद आणि अकबराला जोडणारा एक धागा आहेच  फकस्त विद्रोही , बंडखोर , नास्तिक , पाखंड नव्हे…  तो धागा आहे उपेक्षेचा . स्वधर्मियाकडून झालेल्या दुर्लक्षाचा आणि पराजयाचा . आणि वेदनेचा . …. अकबराच्या दिने इलाही या धर्माला पंचवीसहून कमी अनुयायी मिळावेत आणि हमीदच्या   मंडळात आज विसही  सत्यशोधक  मुसलमान उरू नयेत ! हा योगायोग खचितच नाही. इस्लामचा गड  चिरेबंदी आहे काय ?
एका अर्थाने आहे आणि एका अर्थाने नाही. धर्माचे वेगवेगळ्या प्रकारे अर्थ निघू लागले कि त्यातले एकमेवत्व आणि अद्वितियत्व कमी होवू लागते. इस्लामचा अर्थ काढणार्या वेगवेगळ्या विचार शाळा ( थॉट स्कूल्स ) आहेत. असगर आली इंजिनिअर किंवा अब्दुल कादिर मुकादम या विद्वानांचीही  एक शाळा आहे. इस्लामचा पुरोगामी अर्थ काढणारी हि शाळा आहे. अब्दुल कादिर मुकादम यांच्या विचाराविषयी प्रस्तुत लेखात पहायचे आहे. त्यांनी हमीद दलवाई सोबत मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नावर काम केले आहे . त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे पुरोगामी संस्कार आहेत आणि या पुरोगामी चष्म्यातून ते इस्लाम कडे पाहतात . त्यांच्याशी प्रत्यक्ष केलेल्या चर्चेतून आणि चंद्रकोरीच्या छायेत या त्यांच्या पुस्तकावरून प्रस्तुत लेख बेतला आहे .



झाकीर नाईकांचे  इस्लामी गणित : 

झाकीर नाईक हे एक टीव्ही प्रसिद्ध मौलवी आहेत. त्यांची सर्व धर्माच्या शास्त्रांवर व्यासंगी पकड आहे . मुळ  धर्म इस्लाम आहे . वेदात , गीतेत , धम्मपदात , त्रीपिठकात आणि बायबलात इस्लामच आहे . त्यात आता भेसळ झाली आहे . कुरान मध्येच एकमेव सत्यधर्म आहे म्हणून कुराणाकडे चला असा त्यांचा आग्रह आहे. भेसळ युक्त धर्माचा त्याग करून सर्वांनी मुसलमान झाले पाहिजे असे ते सांगत असतात. यु ट्यूब वरच्या एका मुलाखतीत झाकीर नाईकांना मुलाखत कर्ता एक प्रश्न विचारतो. तुम्ही जगभर आणि भारतात इस्लामचा प्रचार करता . सर्वांनी मुसलमान व्हावे असे म्हणता . तुम्हाला इतर देशात तुमच्या धर्माचा प्रचार करायचा अधिकार हवा आहे . मग सौदी अरेबियात इतर धर्माना प्रचाराचा अधिकार का नाही ?

झाकीर नाईक उत्तर देतात : कारण २ +२ = ४ हे आम्हाला माहित आहे . खरा आणि एकमेव सत्यधर्म इस्लामच आहे हे आम्हाला माहित आहे . ज्याना स्वत:चा धर्म खरा आहे कि नाही ? २ +२ = ५ कि ६ कि ४ हे माहित नाही . ते  सर्वच उत्तरे खरी आहेत असे मानतात . सर्वच धर्म खरे आहेत असे मानतात. त्यामुळे ते आम्हाला प्रचार करू देतात आणि आम्ही इतराना करू देत नाही . देणार नाही . इतरांच्या सहिष्णुतेचा असा धार्मिक अर्थ मौलवी झाकीर नाईक काढतात.




मुकादामांचे प्रमेय 

लबाड झाकीर नाईक स्वत:चे बीजगणित सिद्ध करण्यासाठी कुराणच्या ज्या आयती सांगत आहेत त्यांचा मुळातला अर्थ सहिष्णू आहे. झाकीर आणि तत्सम मौलवी इस्लामला बदनाम करत आहेत . इस्लाम हा शांततेचा धर्म आहे . स्त्री पुरुष समानता , लोकशाही , सर्व धर्म समभाव , बुद्धिवाद या सार्याचा कुराण पुरस्कार करते . मौलाना आझाद , इकबाल आणि असगर आली इंजिनिअर यांचे दाखले देत अब्दुल कादिर मुकादम आपले प्रमेय सिद्ध करतात . कुराणात बुरख्याची सक्ती नाही . इतरांनी मुसलमान झालेच पाहिजे असा आग्रह कुराणात नाही हे मुकादम कुराणातल्याच आयतींचे वेगळे अर्थ सांगत पटवून देतात . पण मुकादम तिथेच थांबत नाहीत . तर  कुराणातच प्रेषितांनी आपल्या धर्म ग्रंथाच्या मर्यादा स्पष्ट केल्या असून जर कुराणात किवा हदिसामध्ये आधार मिळाला नाही तर बुद्धीचा वापर करण्यास सांगितले आहे . पवित्र कुराणाने दिलेली हि बुद्धिवादाची शिकवण आहे असे मुकादम आग्रहाने सांगतात .

कुराण पुरोगामी आहेच पण भारताचे संविधान सार्वभौम आहे असे एका टीव्हीवरील मुलाखतीत अब्दुल कादिर मुकादमांनी प्रतिपादित केले होते . धर्म ग्रंथ आणि संविधान यात अंतर आले तर संविधानाचा सेक्युलर कायदा पाळायचा आहे असा अर्थ यातून निघतो . मुकादमान्चा हा विचार सर्वार्थाने क्रांतिकारक आहे . कुराणाच्या अध्ययनातून हा पुरोगामी विचार स्फुरला आहे असे मुकादमांचे प्रमेय आहे . या प्रमेयाच्या आधारे झाकीर नाईकांचे इस्लामी गणित खोडून काढता येते असे मुकादम मानतात . आणि त्यासाठी लेखही लिहितात .



मोरेंची भूमिती 

मौलाना मौदुदि हे जमाते इस्लामीचे संस्थापक त्यांच्या वचनांचा आधार घेत प्रा शेषराव मोरे यांनी मुस्लिम मनाचा शोध हा ग्रंथ लिहिला आहे . प्रेषितांचे चरित्र , कुराण , हदीस त्यावर जमाते इस्लामीच्या विचारवंताची भाष्ये याची मोजपट्टी वापरत मोरेंनी आपला ग्रंथ लिहिला . त्यातल्या प्रत्येक वाक्याला यातलेच संदर्भ दिले आहेत. इस्लाम हा एकमेव सत्यधर्म आहे . इतर धर्म भेसळयुक्त आहेत . इतर धर्मियांना मेल्यानंतर जहन्नुम / नरकाची आग आहे . आणि इमानदार मोमिनाना जन्नत . पण इस्लाम केवळ पारलौकिक धर्म नाही ती एक जीवनपद्धती - "दिन" आहे. इस्लामी कायद्याचे राज्य - शरीयतचे राज्य स्थापन करण्यासाठी प्रत्येक मुस्लिमाने (प्रयत्नांची पराकाष्ठा ) जिहाद केला पाहिजे. दार उल हार्ब चे रुपांतर दार उल इस्लाम मध्ये व्हावे म्हणून प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रेशित मुहम्मदाचा आदर्ष  ठेवून (मक्का काल - मदिना पूर्वार्ध ) शक्ती कमी असताना इतर  धर्माशी तडजोड करून इस्लामचा प्रचार केला पाहिजे . आणि शक्ती वाढली कि काफिरांशी युद्ध (जिहाद बा सैफ) केले पाहिजे . इस्लामचे एकमेव अद्वितीय आग्रही धर्मरूप मोरे मौदुदिंचे दाखले देत सांगतात. मोरेंच्या पुस्तकाला जमाते इस्लामीच्या विद्वानांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते लिहितात " मोरेंनी इस्लामचा अर्थ मराठी वाचकाना सांगून फार मोठे काम केले आहे . त्याबद्दल त्याना शाह फैसल पारितोषिक दिले पाहिजे. मोरेंवर अल्ला स्वर्गातून पुष्पवृष्टी करेल"  असे म्हणत जमाते इस्लामीच्या पंडितांनी प्रस्तावनेत शेषराव मोरेंचे कौतुक केले आहे आणि त्याचे निष्कर्ष योग्य ठरवले आहेत . इस्लाम केवळ परमेश्वराची आराधना करत स्व चा / जगाचा शोध घेणारा धर्म नाही . इस्लाम हा एकमेव सत्यधर्म - दिन आहे. राजकीय भूगोल बदलणारा धर्म आहे अशी मोरेंची भूमिती आहे . आणि जे जे मुस्लिम कुराणाच्या आधारे पुरोगामित्व सांगतात ते वस्तुत: मक्का काळातले तडजोडीचे इस्लामी राजकारण करत धर्म रक्षण करत असतात कारण मदीनाकालीन युद्धासाठी त्याना शक्ती वाढवायची असते असा मोरेंच्या भूमितीय सिद्धान्ताचा व्यत्यास आहे.



मुकादमांचा पवित्र लढा 

इस्लामचा टोकाचा अर्थ काढणारे झाकीर नाईक , जमाते इस्लामी एका बाजूला आणि शेषराव मोरे दुसर्या बाजूला . मुकादमांचा  संघर्ष दोघांशी आहे . कुराण अपरिवर्तनीय एकमेव आहे अशी मुकादमांची लेखी भूमिका आहे पण कुराणाचे अर्थ काढणार्या वेगवेगळ्या परंपरा आहेत . त्यातल्या पुरोगामी परंपरांकडे मोरे दुर्लक्ष करतात आणि जमाते इस्लामीचीच री ओढतात असा मुकादमांचा आक्षेप आहे . त्यांचा आक्षेप १००% खरा आहे . मुकादामानी केवळ मोरेंचे खंडन केलेले नाही , जमाते इस्लामी , झाकीर नाईक आणि शहाबुद्दीनच्या भूमिकान्वारही टीका केलेली आहे . इस्लामचा उपयोग करून जर मुस्लिम समाजात पुरोगामित्व आणता येत असेल तर त्याला विरोध का करता ? असा खडा सवाल अब्दुल कादिर मुकादम विचारतात . मराठीतून या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे . मुकादमांचे विचार अकबराशी जुळत नाहीत … हमिदशीही जुळत नाहीत . पण स्वधार्मियांकडून उपेक्षेचि वेदना या तिघाना जोडते . असगर अलींच्या किंवा मुकादमांच्या
तुलनेत  जमाते इस्लामीची मान्यता मुस्लिम समाजात कितीतरी अधिक आहे . आणि जमाते इस्लामीचा मुस्लिम मान्य  इस्लाम मोरे रिपीट करत आहेत. बहुसंख्य मुस्लिम समाज मुकादामांचे  लिखाण मराठीतून असल्याने त्यांच्या पुरोगामी विचारापासून वंचित राहतो आहे. मात्र हा विचार  मराठी वाचाकांपार्यात पोचवण्याचे पवित्र बुद्धिवादी कार्य ते पार पाडत आहेत. शेवटी कुठेतरी सुरवात करावी लागते. अकबर आणि हमीद दलवाइच्या बाबतीत जसा सत्तेच्या आणि कालाच्या सामर्थ्याचा विचार केला तसाच विचार असगर आली इंजिनिअर किंवा अब्दुल कादिर मुकादम यांच्या बाबतीत केला पाहिजे .

 एक सवाल : 

कुठल्याही धर्माच्या अनुयायाला मला एक प्रश्न विचारायला आवडतो . बरोबर काय ? आणी चूक काय ? याचा फैसला आम्ही    कायद्याच्या - संविधानाच्या आणि मुख्यत : विवेक बुद्धीच्या तराजूत करतो. धर्माच्या तराजूत करत नाही. तुम्ही हा फैसला कोणत्या तराजूत करता ? हा प्रश्न झाकीर नाइकना आहे , जमाते इस्लामीला आहे आणि अब्दुल कादर मुकादम यांनाही आहे .

" कुराणातच विवेकबुद्धी  सांगितलि असल्याने मी विवेकवादी आणि बुद्धिवादी आहे " असे उत्तर ते देणार नाहीत याची खात्री आहे!

काही असो शेवटी उपयुक्तता वादाला महत्व आहे. धर्माचा उपयोग करून आणि त्याचेच वेगवेगळे पुरोगामी अर्थ काढून मुस्लिम स्त्रियांच्या तलाकचा , पोटगीचा प्रश्न  सुटला तर कोणाला नको आहे ? पाहुया !

पुन्हा चष्मा : 

जगाकडे पाहण्याचा आपला एक दृष्टीकोन असतोच . तो इतर लोकान्पेक्षा वेगळा असतो . दुसर्याच्या चश्म्याबद्दल आदर बाळगणे . त्याच्या चष्मा घालायच्या हक्काबद्दल आदर बाळगणे हे पुरोगामित्वाचे मुलभुत लक्षण आहे. माझा स्वत:चाही एक चष्मा आहेच . तरी शक्य तितक्या तटस्थपणे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व सहा भाग वेगळा विचार करू पाहणार्या इस्लाम विचारवंतावर आहेत    . हि सर्व माणसे विचारी आणि भल्या हृदयाची आहेत . मुस्लिमांचे हित कोणता चष्मा पाहतो याचा निर्णय वाचकांवर सोपवत आहोत . आणि हित म्हणजे काय ? याचाही निर्णय वाचकांनीच करायचा आहे .


अब्दुल कादिर मुकादम यांची विचारसरणी बुद्धिवादी नाही हे पहिले समजून घ्यावे लागेल . मुस्लिम समाजात सुधारणा करण्यासाठी इस्लामचा वेगळा आधुनिक अर्थ काढावा इतकाच त्यांचा सुधारणावाद मर्यादित आहे. कुराणाचे प्रामाण्य ते नाकारत नाहीत - स्वीकारतात . कुराणात स्त्री स्वातंत्र्य आहे , समता आहे , सहिष्णुता आहे, शांतता आहे ..... लोकशाही , विज्ञान निष्ठा सारे काही आहे ! म्हणून मुस्लिमांनी त्याचे पालन केले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. 

धर्माचा उपयोग धर्माविरुदची तलवार म्हणून करण्याचा त्यांचा मानस आहे . धर्माचे काही बिघडत नाही . तलवार मात्र बोथट झाली आहे . मुकादम एकटे नाहीत . असगर आली इंजिनिअर इत्यादी मुस्लिम समाज सुधारकांचि देखील हीच भूमिका आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने हमीद दलवाईंच्या बुद्धिवादी विचाराचे दफन करून - असगर अली स्वीकारले आहेत.

हि भूमिका मोडरेट सनातन्यांच्या हिंदु धर्म विषयक भूमिकांशी तंतोतंत जुळते . हिंदु धर्मात मुळात अस्पृश्याता नव्हती , चमत्कार नव्हते - धर्म चांगला - काही ठेकेदार वाइट अशी ती भूमिका आहे.

हिंदु किंवा मुस्लिमात धार्मिक अतिरेकी हे संख्येने फार कमी असतात. हे तथाकथित मोडरेट लोक्स धर्माची ढाल तयार करून अतिरेक्यांचे संरक्षण करतात. धर्म चांगला आचार वाइट हि भूमिका बुद्धिवादी नाही - धार्मिकच आहे. मोडरेट दुष्ट नाहीत .... सज्जन आणि सभ्य आहेत .... त्यांच्या मार्गाने धर्मसुधारणा होईल असा अंधविश्वास त्याना आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html


१५ फेब्रु, २०१४

हमीदचे मुसलमान .

 हमीदचे मुसलमान .
त्यांच्या चष्म्यातून भाग ५ )

हमीद दलवाई आणि माझा   स्वधर्माकडे पहाण्याचा चष्मा  एकच  आहे. ज्या दृष्टीकोनातून हमीद इस्लामकडे आणि मुस्लिम समाजाकडे पाही , नेमक्या त्याच दृष्टीकोनातून मी हिंदूचे यच्चयावत  धर्म आणि समग्र हिंदू समाज यांकडे पाहतो. हमिदचा दलवाई्चां  चष्मा माझ्या   नेहमीच्या वापरातला असल्याने , प्रस्तुत लेख प्रथमपुरुषी एकवचनात लिहिला आहे . पण लेखातले प्रत्येक वाक्य आणि विचार प्रवाह  मात्र हमिदचाच . सर्व लेखन समग्र संदर्भ देऊन केले आहे.

******************************************************************************************************************************************************************

 मी मुसलमान आहे : मुस्लिमांच्या हितासाठी मी कार्यरत आहे . 

आयकल का ? मी हमीद उमर दलवाई. मी मुसलमान आहे. कारण  भारतातील मुस्लिम संस्कृतीने ज्या चांगल्या गोष्टी निर्माण केल्या त्याचा मला अभिमान वाटतो. आणि तिच्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्याची मला लाज वाटते. मुस्लिमांच्या हितासाठी या समाजात बुद्धिवादी आणि उदारमतवादी प्रवाह निर्माण होणे गरजेचे आहे . हिंदू -  मुस्लिम बुद्धिजिवित एक महत्वाचा फरक आहे तो म्हणजे अंतर्मुख होऊन स्वत:ची चिकित्सा करण्याची पात्रता आजून मुस्लिम समाजाला लाभलेली नाही . मुस्लिमांच्या तुलनेत भारतातल्या हिंदू समाजाची अधिक प्रगती झालेली दिसते. चिकित्सक, बुद्धिवादी आणि उदारमतवादी विचारधारा हिंदू  समाजाकडे तुलनेने अधिक असणे हे त्याचे प्रमुख कारण आहे . या विचारधारेची देणगी हिंदुना आपोआप मिळालेली नाही. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. (1-122) आयकल का ? हिंदू धर्मश्रद्धा आणि चातुर्वर्ण्याची विषम समाजव्यवस्था  याविरुद्ध गेले एक शतक हिंदू विचारवंत आणि बुद्धीजीवी यांनी घनघोर युद्ध केले आहे. या युद्धातूनच हिंदू समाजात बुद्धिवाद , उदारमतवाद आणि मानवतावादाचे थोडेबहुत अंकुर फुटले आहेत.  (2-47)




या उदारमतवादाचा मुसलमान स्वत:च्या टोळीच्या राजकारणासाठी उपयोग करू पाहतात . मुसलमान स्वत:च्या धर्माची चिकित्सा करत नाहीत आणि इतरांनीही ती करू नये अशी त्यांची अपेक्षा असते. भारतीय मुस्लिमात काही नवे विचारप्रवाह येऊ पहात आहेत हे हि तितकेच खरे आहे . सनातनी मुल्ला मौलवी सोडले तर धार्मिक पण उदारमतवादी असा एक प्रवाह आहे .पण  हि मंडळी सुद्धा  इस्लाम परिपूर्ण आहे अशीच री ओढतात . लोकशाही , समाजवाद , धर्म निरपेक्षता,  अहिंसा , स्त्री पुरुष समता आणि बुरख्याच्या सक्तीला  विरोध अशी सर्व आधुनिक मुल्ये इस्लाम मध्येच ठासून भरली आहेत. कालविसंगत असे इस्लाम मध्ये काहीच नाही अशी यांची भूमिका आहे. हि मंडळी प्रामाणिक आहेत.(जुन्या)  इस्लाम चा विरोध (नव्या ) इस्लामने ! धर्माचा उपयोग धर्माविरुद्धची  तलवार  म्हणून करत आहेत . धर्माचे काही बिघडले नाही . तलवार मात्र बोथट झालेली आहे !(1-160)



आयकल का ?  धर्मग्रंथाच्या चौकटीत बुद्धिवाद करत बसणे हा मुर्खपणा आहे. तो तसाच चालू ठेवायची माझी बिलकुल इच्छा नाही . मुहम्मद पैगंबर जगाच्या इतिहासावर प्रभाव टाकणारे थोर आणि कर्तुत्ववान पुरुष होते. हे मला मान्यच आहे पण   . बस्स . पण   .अल्ला  , त्याचे देवदूत , ते देवदूत खाली येउन पैगंबराला सांगतात ते कुराण , कयामतचा दिवस , त्यादिवशी थडग्यातून उठणारे ते  मृतदेह ,ते  स्वर्ग ,ते  नरक यापैकी कशावरही माझा विश्वास नाही .  आणि यावर  विश्वास ठेवतो तोच मुसलमान यावरही माझा विश्वास नाही . आणि धार्मिकतेतून मुस्लिमांचे भले होईल किंवा धर्माचा उपयोग मुस्लिमांच्या भल्यासाठी करता येईल हि मी अंधश्रद्धा मानतो .(1-122)  आणि हे डरपोक हिंदू ! पुरोगामी हिंदुंची एक शोकांतिका आहे.  नेमक्या कसोटीच्या निर्णयाच्या वेळी हा प्राणी आपण मुसलमानांहूनहि अधिक मुसलमान असण्याची बतावणी करतो आणि मुसलमानाला जरा कमी मुसलमान करण्याचा प्रयत्न करणार्या माझ्यासारख्याला तोंडघशी पाडतो ! (3-16)

इस्लामचे धार्मिक नेते मुस्लिम समाजावर प्रेम करत नाहीत . आयकल का ? माझे मुस्लिम समाजावर प्रेम आहे आणि या समाजाचे भले व्हावे त्यात बुद्धिवादी , उदारमतवादी आणि मानवतावादी प्रवाहांची निर्मिती व्हावी म्हणून मी परंपरांशी  युद्ध लढणार आहे . आयकल का ?  हे माझे धर्मयुद्ध आहे आणि एक मुसलमान म्हणून मी ते लढणार आहे. आमेन... सुम्मा आमेन !  (1-122)




मुस्लिम स्त्रिया आणि इस्लाम धर्म (१ - १५४) 

भारतीय स्त्रियांच्या दास्य मुक्तीचा लढा हा भारतीय समाज प्रबोधनाच्या लढ्याचा एक हिस्सा आहे. हे परिवर्तन हिंदू स्त्रियांच्या बाबतीत तरी एक शतक आधीच सुरु झाले आहे.  परिवर्तन सरळ रेषेत कधी होत नसते. अगदी फ्रान्स सारख्या देशात आज पूर्ण स्त्री पुरुष समता आहे. कालपर्यंत फ्रांसमध्ये स्त्रियांना वेगळे बैंक अकौंट ठेवता येत नव्हते. भारतातल्या हिंदू  स्त्रिया स्वत:हून झगडण्या आधी . त्यांच्या साठी आंबेडकर लढले . त्यांनी हिंदू कोड बिल आणले. दलितांसाठी सर्वप्रथम ज्योतिबा  फुले लढले . गुलामांना गुलामीची सवय लागलेली असते. मुस्लिम स्त्रियांनाही गुलामीची सवय लागलेली आहे . त्यांसाठी आपणा सर्वांनाच लढावे लागणार आहे.  .




हिंदू समाजातील मंडळी समाजाचे भले करण्यासाठी पुढे आली धर्म - परंपरा नाकारल्या . आयकल का ? मुस्लिम स्त्रियांना यासाठी मदतीचा हात द्यावा लागेल . मुस्लिम स्त्री ला आजही समान प्रोपर्टी राईटस नाहीत. सवत बंदी कायदा नाही . बहुपत्नीत्व आहे . तोंडी तलाक आहे. बुरख्याची सक्ती आहे . या सर्व विषमतेला इस्लाम धर्माचा पाठिंबा आहे. " पुरुष हे स्त्रियांचे मालक आहेत आणि अल्लानेच त्याना स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ बनवले " आहे असे कुराणातच म्हटले आहे . (कुराण ४:३४ ) . मला पुन्हा श्ब्दार्थाचे किस पाडत चिकित्सेची तलवार बोथट करायची नाही. इस्लामच्या परंपरेत आणि धर्मात स्त्री पुरुष विषमता आहे आणि त्या गुलामीतून स्त्रियांना बाहेर काढले पाहिजे .आयकल का ? समाजाचे भले कारणासाठी धर्म दूर ठेवला पाहिजे . मुस्लिम स्त्रियांच्या हितासाठी तोंडी तलाक रद्द झाला पाहिजे आणि समान नागरी कायदा आला पाहिजे. 



मुस्लिम जातीयतेचे स्वरूप आणि कारणे 

इस्लाम धर्म आणि धार्मिक परंपरातून जन्मलेला सर्वोच्च - धर्माचा मनोगंड हे मुस्लिम जातीयतेचे कारण आहे. जामायते इस्लामी नावाची भारतीय मुस्लिमांची संघटना आहे. भारतात इस्लामिक शरीयाचे राज्य स्थापन करणे हे या संघटनेने आपले उद्दिष्ट ठेवले आहे. या संघटनेच्या रेडीयन्स या इंग्रजी पत्राने लिहिले कि " भारतातील धार्मिक संघर्ष सहजा सहजी मिटणारे नाहीत जेंव्हा भारतातील सर्व लोक एकाच धर्माचे बनतील तेंव्हाच भारतातील धार्मिक संघर्ष मिटतील ". भारताच्या धर्मनिरपेक्ष घटनेविरुद्ध हा त्यांचा जिहाद आहे. सर्वांनी मुसलमान व्हावे म्हणजे धार्मिक संघर्ष मिटतील ! हा इस्लामी न्याय ......आणि आम्ही अल्पसंख्य आहोत म्हणून आम्हाला आमचा धर्म पाळू द्या हा  सर्वमान्य न्याय ! हवा तेव्हा सेक्युलर न्याय आणि पाहिजे तेंव्हा इस्लामी न्याय असा हा खाक्या आहे.  मुस्लिमांचे ढोंगी राजकारण दोन्ही भूमिका आलटून पालटून घेते . (३ - २४ ते २६ )

आपण इथे राज्यकर्ते होतो बादशाहा  होतो म्हणून मुस्लिमांचे भारतावर भारी प्रेम आहे.  पण आपण आज लोकशाहीच्या राज्यात अल्पसंख्य झालो आहोत  राज्य करते राहिलेलो नाही हि खरी खंत आहे. बद्रच्या ऐतिहासिक युद्धात मुठभर मुस्लिमांनी काफिरांचा पराभव केला . का ? तर ते मुसलमान श्रद्धावान होते ! मग अरब इस्त्राइल युद्धात मुस्लिमांचा पराभव का झाला ? का ? तर इस्लाम वरची श्रद्धा कमी पडली ! मुस्लिम मन शास्त्रशुद्ध चिकित्सा जाणत नाही . सर्वत्र धर्म श्रद्धेचे परिमाण वापरले जाते. भारतात मुस्लिम हालाखीची स्थितीत आहेत . खरे आहे . पण कारण काय तर इस्लाम् वरची श्रद्धा कमी पडते ! आयकल का ?

आज मुस्लिम अल्पसंख्य आहेत .  मग त्यावर उपाय काय ? तर लोकसंख्या वाढवणे आणि इस्लामी लोकसंख्येच्या लाटेत देश बुडविणे. मुस्लिमांच्या बहुतेक धार्मिक संघटनांचा कुटुंब नियोजनाला विरोध आहे . अशा शेखचिल्ली स्वप्नांमुळे मुस्लिम समाजाचे नुकसान होते आहे. मोठ्या कुटुंबामुळे दारिद्र्य आणि अनपढ पणा वाढतो आहे . ज्या धर्मनिष्ठेमुळे वाटोळे झाले तेथेच पुन्हा घेऊन जाणारा हा प्रवाह आहे. (३ - २९ ते ३१)


स्वातंत्र्य पूर्व काळात कधीही हिंदू जातीवादी विरुद्ध मुस्लिम जातीवादी असा संघर्ष झाला नव्हता. गोळवलकर आणि सावरकर याना हिंदू समाजाने तेंव्हा नेते म्हणून स्वीकारले नव्हते.  मुस्लिमान बाबत उदार दृष्टीकोन ठेवणारे गांधी नेहरू विरुद्ध जातीय जिन्हा असा हा संघर्ष होता . हिंदूचा उदारमत वाद विरुद्ध मुस्लिम जातिवाद यात जातिवाद जिंकला आणि पाकिस्तानचा जन्म झाला. स्वतंत्र भारतातही मुस्लिम मानसिकतेत फरक पडलेला नाही . आणि मुस्लिम जातीवादाला प्रतिक्रिया स्वरूप हिंदू जातिवाद प्रबळ होत चालला आहे.


इस्लामी बंधुभाव 

कुराणात विश्व बंधुभाव आहे वगैरे या केवळ गप्पा आहेत . (मक्का आणि मदिना पूर्वकाळ ) या काळी मदिन्याला मुसलमान अल्पसंख्य होते आणि प्रेषिताचे स्थान अजून अस्थिरच होते. अशा काळात गैर मुस्लिमांना चांगली वागणूक देण्याचे आदेश कुराणात आले तर त्यात नवल नव्हे. पुढे शक्ती वाढल्यावर कुराणात ' काफिरांशी लढा  ' व त्याना अवमानित करण्यासाठी त्यांच्यावर झिजीया लादा असे म्हटले आहे. साधारणत: नव्या आदेशांनी जुने आदेश रद्द होतात असे धर्म पंडित मानतात . शाफी नावाचा अतिशय महत्वाचा आणि सन्मानीय भाष्यकार आहे त्याच्या मते " ख्रिश्चन आणि ज्यू या किताबी लोकांनाच झिजीया देऊन जिवंत राहण्याचा अधिकार आहे. ज्याना वाही (धर्मशास्त्र ) आलेले नाही (हिंदू , बौद्ध , जैन वगैरे ) त्यांच्यापुढे इस्लामचा स्वीकार करणे किंवा मृत्युला तयार होणे हे दोनच मार्ग उरतात " . (१ -१७३)









हिंदुत्ववाद (२ - १६९) 


मुस्लिम समाजाच्या संकुचित धर्म वादाला आणि पिसाट जातीवादाला विरोध करणे हे काही पाप नाही ! प्रश्न असा आहे कि  या विरोधाचे स्वरूप कोणते असावे ?  धर्म निरपेक्ष समाज व्यवस्थेची चौकट बळकट करण्यासाठी मुस्लिमांच्या धर्म राज्याला विरोध योग्यच आहे . पण हिंदुत्व वाद्यांचा मुळात धर्म निरपेक्षतेवरच विश्वास नाही. बरे हे भांडण केवळ मुस्लिम प्रश्नासाठी नाही . हिंदुत्व वाद्यांना त्यांच्या धर्मात हस्तक्षेप सहन होत नाही . बहुतेक हिंदुत्व वादि लोक चातुर्वणाचे आणि विषमतेचेही समर्थक असतात , गोळवलकरांच्या वर्णवादी भूमिकेचे  आजवर एकाही हिंदुत्व वाद्याने खंडन केलेले नाही . हिंदुच्या भल्यासाठी त्याना वेदाच्या काळाचे पुनरुज्जीवन हवे असते.  या लोकांचे हिंदू समाजावर प्रेम नाही . धर्मावर आहे .मुस्लिम जातीवादाला प्रतिक्रिया स्वरूप हिंदू जातिवाद प्रबळ होत चालला आहे.



आर्य समाजाचा फारसा प्रभाव नाही आणि आहे तिथे मुळ  मुद्दा वैदिक कालखंडाचे पुनरुज्जीवन आणि मुस्लीमविरोध हा आहे. पूर्वी असलेली समाजसुधारणेची चळवळ आर्य समाजातून  लोप  पावली आहे . हिदुत्व वाद्यातला तिसरा गट म्हणजे सावरकर. त्यातल्या त्यात सावरकरांच्या विचाराला शास्त्रीय बैठक होति. त्याना अस्पृश्यता अमान्य होती . चातुर्वर्ण मान्य नव्हते . खरेतर सावरकर नास्तिकच होते. पण त्यांचे हिंदुत्व गंमतशीर  होते. भारतात सर्व धर्मियांचे राज्य होईल. प्रत्येकाला त्यात समान अधिकार राहतील असे सावरकरांनी एका ठिकाणी म्हटले होते.  दुसरीकडे अफगाणी पठाणा विरुद्ध सीमेवर हिंदुसैन्य उभे राहील म्हणतात . हिंदुसैन्य हि काय भानगड आहे ? सगळ्याना समान संधी असणार्या राष्ट्रात हिन्दुसैन्य कोठून आणले ?   सावरकरांच्या अस्पृश्यता निवारण वगैरे कार्यात मानवता वाद जरा कमीच आणि मुस्लिमांशी लढण्यासाठी - हिंदुना बलवान करण्यासाठी जाती तोडा - असा दृष्टीकोन अधिक दिसतो . त्याचे अनुयायी सुद्धा विज्ञान निष्ठा वगैरे भाग सोडून मुस्लिम द्वेषाचा अजेंडा राबवताना दिसतात

डूकराचे मास खात आणि वाइन पीत कधीही नमाज न पढनारे जिन्हाभक्त आणि   महाराष्ट्रातील दुटप्पी सावरकरवादी  ब्राह्मण वर्ग यात कमालीचे साम्य आहे . यातल्या अनेकाना गोमास व्यर्ज नाही . कुठलीच व्रतवैकल्ये नकोत पण महाराष्ट्रात जनसंघाचा आणि मुस्लिम द्वेषाचा तोच आधारस्तंभ आहे. एकीकडे विज्ञानाचे पोवाडे आणि दुसरीकडे इतिहासाचे गोडवे गात जमातवाद हि आधुनिकता दुटप्पी आहे . नव्या हिंदुत्वाचा विरोध केवळ  मुस्लिमाच्या आजच्या वेडपट मागण्यांना नाही. त्याना भूतकाळातल्या मुस्लिमांचा सुड  आत्ता उगवायचा आहे आणि  अंध द्वेषाने इतिहासाचे चाक उलटे फिरवायचे आहे . सावरकरांनी आजच्या मराठी ब्राह्मणाना दिलेला हा दुटप्पी आधुनिकतेचा वारसा आहे. आयकल का ? आता मला कोणी ब्राह्मण द्वेष्टा म्हणेल!  मग मला माझे सहकारी  असलेल्या ब्राह्मणांची नावे घ्यावी लागतील ! मला त्याची सवय आहे . मुस्लिमांनी मला संघाचा , हिंदुंचा आणि  ब्राह्मणांचा हस्तक आधीच ठरवले आहे !      आयकल का ?  मला काहीच फरक पडत नाही !



 मुस्लिम सत्यशोधक मंडळ 

महात्मा फुलेंच्या बंडखोर परंपरेचा वारस म्हणून माझ्या संस्थेच्या  नावात  'सत्यशोधक' असावे असे बाबा आढावांनी सुचवले. (१-१५) संस्थेच्या नावात ' मुस्लिम' असावे का ? यावर बराच खल झाला.   शेवटी मी मुस्लिम सत्यशोधक मंडळ हेच नाव निश्चित केले. आयकल का ? जरी भारत एक आहे …. पण आज तरी मुस्लिम हा वेगळा समाज आहे असे आमच्या लोकाना  वाटते. बाहेरच्या लोकांनी येउन आमच्या बंदिस्त समाजात  बुद्धिवाद आणि आधुनिकता रुजवणे अशक्य आहे.  हे काम माझ्यासारख्या एखाद्या हमीद उमर दलवाइलाच  करावे लागेल .  आव्हाने मोठी आहेत वेळ थोडा आहे . जमातवाद सार्या देशालाच गिळतो आहे .




मुस्लिम प्रबोधनाची वाट बिकट आहे. माझ्यावर अनेक हल्लेही झाले .  काफर हि पदवी मला कायमची बहाल झालेली असल्याने ते सहाजिक आहे . मित्र शरद पवारांनी  मला स्व रक्षणासाठी  पिस्तुल बाळगण्याचा सल्ला दिला होता. पिस्तुल तत्वात बसत नव्हते . बाळगले नाही . (१-४५). माझा समाज माझ्यावर चिडून होता. तो त्याचा अधिकार होता . मी त्यांच्या चुका दाखवत होतो ना ! प्रत्येक कामाची किंमत द्यावी लागते ! सगळ्या मुस्लिम जगताची चिता भारतातले मुसलमान वाहत असतात . ज्यांना स्वत:चा समाज सुधारता येत नाही त्यांनी जगाची चिंता वाहू नये . मी फक्त भारताबद्दल बोललो . आणि म्हणूनच कि काय … मी त्यांच्या लेखी  काफर होतो !     (१-३४ ते ३६ )

पण मी स्वत:ला मुसलमान समजतो त्यामुळे मुस्लिमांच्या अंतर्गत प्रश्नाबद्दल मी अधिक बोलणार .  मुस्लिमांचे भले करण्यासाठी आमची अति धार्मिकता आणि जमातवाद बंद केला पाहिजे.  मुस्लिम जातिवाद आणि मुलतत्ववाद  हा इस्लाम धर्मातून निर्माण झाला आहे. मुहम्मद पैगंबरानंतर  दुसरा कोणी प्रेषित होणार नाही . जे काही कुराणात आले ते फायनल ! नवे ज्ञान सब झूट (अथवा ते तर आहेच कि कुराणात !) या प्रवृत्तीमुळे इस्लाम मध्ये एक फायनालीटी आहे. कुराणातले ज्ञान ते सर्वश्रेष्ठ ज्ञान . प्रेषित मुहम्म्दाएव्ह्ढा ज्ञानी  यापुढे होणे नाही ! हे इस्लामचे मुलतत्व आहे . मुस्लिमांचा विकास आणि ज्ञानाची वाढ या इस्लामी मुलतत्व वादा मुळे  खुरटली आहे . मुस्लिमांच्या मागासालेपणाचे मुळ ह्या फायनालीटीच्या सिद्धांतात आहे. हा  फायनालीटी सिद्धांत विज्ञान , शास्त्र , समाज व्यवस्था या सार्यांना लावला जातो . मुस्लिम अधोगतीचे हे मूळ कारण आहे . (१- १४८)

हाच  फायनालीटी नियम मग काफीरांशी कसे वागावे ? जिहाद करावा का ? भारत दार उल इस्लाम आहे का ? कुराणातल्या शक्ती कमी असतानाच्या माक्कि सुरह पालन करून काफ़िरांशी तडजोड  ? कि उत्तर मदिना काळातला मोहिदा करार तोडून जिहाद ? यालाही लावला जातो . हि   फायनालीटी तोडली पाहिजे . त्याशिवाय मुस्लिमांचे हित नाही . भारताचे हित नाही . मानवतेचे कल्याण नाही . हा वारसा मला मला महात्मा फुलेंची चळवळ  पुढे नेणार्यांकडून मिळाला . म्हणून मी सत्यशोधक आहे . मुस्लिम सत्यशोधक आहे.


आजचा उपाय : धर्मनीरपेक्षता : खरा आशय (१:१४३)

हिंदू आणि मुसलमान अशा जातीय तत्त्वावर या देशाची एकदा रक्तरंजित फाळणी झाली. एक देश इस्लामी पाक पाकिस्तान झाला.  तेंव्हा  दुसरा देश हा हिंदुचा हिदुस्थान झाला पाहिजे असा एक मतप्रवाह आहे. मग हिंदूचे धर्मराज्य वगैरे आपोआप संकल्पना येतात , दुसरी संकल्पना मुस्लिमांची ! कि हा देश धर्म निरपेक्ष आहे .इथे धर्म स्वातंत्र्य आहे … तवा हवा तेव्हढा आणि वाटेल तसा इस्लाम आम्ही पाळणार ! इस्लाम पाळणे हा आमचा घटना दत्त अधिकार आहे . दोन्ही संकल्पना साफ चूक आहेत .




मुस्लिमांच्या पक्षपातासाथि  देश सेक्युलर नाही . या देशात १०० % हिंदू असते तरीही हा देश सेक्युलरच राहीला पाहिजे  .  - हमिदचा चष्मा



या देशात जी धर्मनिरपेक्षता आहे ती मुस्लिमांसाठी नाही . या देशात एकही मुस्लिम नसता तरी हा देश धर्म निरपेक्षच राहिला असता . सेक्युलरीझम म्हणजे शासन आधुनिक राहील . शासकीय निर्णय न्याय , नीती , आचरण इत्यादी आधुनीक  चष्म्यातून घेतले जातील . आदत आणि इबादत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत . कुणाची पूजा करावी आणि पारमार्थिक बाबिना इबादत म्हणतात . या इबादत चे स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षतेत जरूर आहे.  आदत म्हणजे इहलोक .आणी  इथले नियम . किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही . सर्व हक्क शासनाकडे आहेत .  या देशात फक्त हिंदूच राहिले असते तरीही हा देश सेक्युलरच राहिला असता. मनुस्मृती नाही , कुराण नाही कोणताच   फायनल ! असा ग्रंथ नाही . आम्ही नव्या ज्ञानाचे मानवतेचे आणि बहुविधतेचे चाहते ……हि आमची  चाहत . आणि शेवटची इच्छा !  माणसाच भल माणसांनी करायचं असत … माझे मुस्लिम समाजावर प्रेम आहे आणि या समाजाचे भले व्हावे त्यात बुद्धिवादी , उदारमतवादी आणि मानवतावादी प्रवाहांची निर्मिती व्हावी म्हणून मी परंपरांशी  युद्ध लढणार आहे . आयकल का ?  हे माझे धर्मयुद्ध आहे आणि एक मुसलमान म्हणून मी ते लढणार आहे. आमेन... सुम्मा आमेन !  

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हमिदचा चष्मा सत्यशोधक आहे .
त्याकाळी  शरद पवार राजकारणात वाहवले नव्हते . आणि आजच्या सारखे  जमातवाद आणि जातीवादाचा राजकारणात उपयोग हि करत नव्हते . त्याकाळी पवार  सत्य शोधक परंपरा जगत होते . पवारांनी हमीदला आणि त्याच्या बंडखोरीला अभय दिल नसत तर तो एव्हढा जगालाच नसता . त्याला किडनीचा असाध्य विकार जडला . उपचार प्रामाणिक सत्यशोधकाच्या आवाक्या बाहेर होते . पवारांनी आर्थिक सहाय केले . हमीद  नास्तिक होता . त्यान मृत्युनंतराच्या इच्छेत लिहील - " हिंदू किंवा मुस्लिम अशा कोणत्याही धर्माचे विधी मी मेल्यानंतर करू नयेत . पूजा पाठ श्राद्ध - दुवा नमाजाच्या भानगडीत पडू नये . कोणत्याही धर्माचा पुरोहित बोलावू नये . माझी समाधी नको . प्रेत विजेवर जाळून टाकावे. शेवटची भाषणे किंवा स्मारक करू नये. इस्लामच्या वस्तुनिष्ठ आणि सत्यशोधकी अभ्यासासाठी एक संस्था आणि नियतकालिक काढावे " पत्राच्या प्रती   शरद पवार आणि अभी शहांना पाठवल्या .



हमीदचे नातेवाईक हटून  बसले . त्याना इस्लामनुसार शास्त्रशुद्ध दफन करायचं होत. या  इस्लामी  फायनालीटीत  बंधू हुसेन दलवाई सुद्धा होते. आणि हमीदची शेवटची  इच्छा नाकारून त्याला सनातनी मुस्लिम पद्धतीने  दफन करायचे ठरले . शरद पवारांनी हस्तक्षेप केला. सूत्रे हाती घेतली . शेवटी हमीदची इच्छा पूर्ण झाली. आज पवार इतकी धर्म निर्पेक्ष भूमिका घेतील असे वाटत नाही .  (4 - 76 to 80)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हमीद दलवाई आदर्श म्हणून डॉ नरेंद्र दाभोलकरांनी स्वत:च्या मुलाचे नाव हमीद दाभोलकर ठेवले होते . दाभोलकरासारख्या हमीदच्या हिंदू चाहत्यांना काय भोगावे लागले ?  मुस्लिम सहकारी त्यापेक्षा जास्त कष्टात आहेत .
------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------

 (1-122)  हा संदर्भ पहिल्या संदर्भ ग्रंथातील १२२ वे पान असा वाचावा . कुराणातला संदर्भ सुरा आणि आयत नुसार वाचावा.

१) हमीद दलवाई - क्रांतिकारी विचारवंत : संपादक : शमसुद्दिन तांबोळी : २००९ : पाष्टे : डायमंड पब्लिकेशन्स
२) राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान ::हमीद दलवाई :२०१२ : सुगावा प्रकाशन
३ )मुस्लिम  जातीयतेचे कारणे स्वरूप व उपाय : हमीद दलवाई :१९७८ : साधना प्रकाशन
४) हमीद : अनिल अवचट : १९७७ : नीलकंठ प्रकाशन

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html

७ फेब्रु, २०१४

त्यांच्या चष्म्यातून भाग ४ : मौलानांची आजादी


त्यांच्या चष्म्यातून भाग ४ : मौलानांची आजादी 

महान देशप्रेमी   मौलाना अबुल कलाम आझाद यांना तीन वेळा दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा फर्मावण्या एव्हढ्या गुन्ह्यांचे दोषी ठरवण्यात  आले  ! होय , तेच मौलाना आझाद - स्वातंत्र्य सेनानी , स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि गांधीजींचे अनुयायी असलेले राष्ट्रवादी गृहस्थ . असा कोणता गुन्हा केला होता त्यांनी ? कोणी फर्मावली हि शिक्षा ? शिक्षेचे पुढे काय झाले ? चला मौलाना आझादांच्या कथेला त्यांच्या बालपणापासून सुरुवात करू .





मौलाना आझादांचे घर, शिक्षण  आणि बालपण 

बादशहा अकबराच्या सेक्युलरगिरी बद्दल आणि विशेष म्हणजे दिने इलाहिच्या स्थापनेबद्दल मुल्ला मौलवित संतापाची लाट उसळली होती आणि अकबराविरुद्ध कलकत्त्याला मोठे धार्मिक  बंड झाले होते हे आपण मागील भागातून पाहिले आहे. दिने इलाहीविरुद्ध प्रखर संघर्ष करत ज्यांनी अकबराविरुद्ध सलीम च्या बंडाला पाठिंबा दिला - अशा प्रसिद्ध मुल्ला मौलवित जमालुद्दीन हे नाव फार महत्वाचे आहे. ते मेहदवि चळवळीचे पाठीराखे होते . सय्यद नुरुद्दीन या आपल्या पूर्वजाचा वारसा ते चालवत होते . सय्यद नुरुद्दीन यांनी इस्लामी राजेरजवाड्यांनी इस्लामची मुल तत्वे सोडून भरकटू नये म्हणून हि चळवळ चालवली होती .  सय्यद नुरुद्दीन आणि जमालुद्दीन या प्रसिद्ध मौलवींच्या वंशात मौलाना आझादांचा जन्म झालेला आहे .

 इस्लामी परंपरे नुसार मौलानांचे घर बंगाल मध्ये धर्मगुरुंचे घर म्हणून मानले जाते. १८५७ साली ब्रिटिशांना हाकलून देण्यासाठीचा  जिहाद अयशस्वी   ठरल्यानंतर मौलाना आझादांचे वडील भारत सोडून अरबस्तानातील मक्का येथे रहाण्यास गेले . आपल्या वडिलानच्या या कृत्याला आझादांनी ' हिजरत ' असे संबोधले आहे .      


 ' हिजरत '  म्हणजे काय ? हे जाणून घेण्यासाठी इस्लामी धर्मशास्त्रांचे जुजबी ज्ञान करून घेणे आवश्यक आहे. मुहम्मद पैगंबर साहेबांनी  इस्लाम धर्म स्थापन केला आणि तोच अल्लाहचा एकमेव सत्यधर्म आहे असे घोषित केले . 

प्रेषित मुहम्मदानि मक्का या अरबस्तानातल्या शहरात इस्लामची स्थापना केली . इस्लामचा मूर्तीपूजेला विरोध होता म्हणून स्थानिक मूर्तिपूजक अरबांनी मुहम्मदाना फार त्रास दिला , त्यांचा छळ केला . त्यावेळी इस्लामच्या अनुयायांची संख्या २०० पेक्षा कमी होती. त्या मुठभर मुस्लिमांना काफरांच्या राज्यात राहणे असह्य आणि अशक्य झाले . प्रेषितांनी आपल्या नव मुस्लिम बांधवांसह मक्का शहराचा त्याग केला आणि मादिनेकडे प्रयाण केले. या स्थलांतराला ' हिजरत '  असे म्हणतात . प्रेषित मुहम्मद हे परंपरे नुसार आदर्श मुस्लिम मानले जातात. आणि धार्मिक मुसलमान त्यांच्या सर्व कृतींचे मनापासून अनुकरण करत असतो . 

मुहम्मदाप्रमाणेच  आझादांच्या वडिलांना इंग्रजी काफिरांचे राज्य असलेल्या भारत देशात राहणे असह्य आणि अशक्य  झाले म्हणून त्यांनी अरबस्तानातल्या इस्लामी मक्केत हिजरत केली. मक्केत त्याना १८८८ साली  सुपुत्र झाला - त्याचे नाव मोहियुदिन अहमद .






 पण हा मोहियुदिन   कोणी सामान्य मुसलमान नव्हता. परंपरेनेच तो कलकत्त्याचा इमाम आणि मुस्लिम धर्मगुरुत्वाचा वारसदार होता.   हे पारंपारिक इमाम पद लक्षात घेऊन त्याचे दुसरे नाव ठेवण्यात आले -   फिरोजबख्त ! फिरोजबख्त म्हणजे युद्धजेता ! तर या बुद्धिमान फ़िरोझ बख्त ला आधुनिक शिक्षण मिळाले नाही . त्याने पारंपारिक इस्लामी धर्म शिक्षण घेतले. लोक विलक्षण  बुद्धिमत्ता आणि इस्लामी धर्मातले प्राविण्य यामुळे लहान वयातच या मुलाची कीर्ती अरबस्तान भर  दुमदुमू लागली ! वयाच्या केवळ अठराव्या वर्षी त्याना विद्या वाचस्पती अशी पदवी देण्यात आली . या लहान   मुलाचे इस्लामी धर्म शास्त्रातले प्राविण्य, ज्ञान आणि अधिकार  पाहून मक्केतल्या मुल्ला मौलवींनी हि पदवी दिलेली आहे . अरबी भाषेत विद्यावाचस्पती म्हणजे अबुल कलाम . हा फ़िरोजबख्त पुढे मौलाना अबुल कलाम आझाद या नावाने सुविख्यात झाला !

भारतातून इंग्रजांची राजवट समाप्त झाली पाहिजे हि श्रद्धा मौलाना आझादांना घराच्या परंपरेतूनच गवसली आहे .  अकबर ते इंग्रज या सर्वांच्या गैर इस्लामी सत्तेविरुद्ध जिहाद वा हिजरत करणार्यांचे रक्त मौलानांच्या नसात खेळत होते आणि शिकवण डोक्यात भिनली होती. 

या सर्व पार्श्वभूमीवर मौलाना आझादांचे क्रांतिकारी विचार , त्यांच्या विचारात झालेले बदल आणि आंदोलने समजून घ्यावी लागतात . मौलाना आजाद भारतात येतात आणि १९१२ मध्ये ' अल हिलाल ' हे उर्दू नियत कालिक प्रकाशित करू लागतात. अजादांचे भारतातील सामजिक आणि राजकीय जीवन इथून सुरु होते . 



इस्लामचा नवा अर्थ : नवी उत्कंठा 

मौलाना आझादांचे ' अल हिलाल ' हे उर्दू नियतकालिक गाजू लागते . ते ब्रिटीश विरोधाची आघाडी उभारतात आणि पूर्ण जोमाने खिलाफत चळवळीत सामील होतात.  १९१२ साली आझादांनी  'अल हिलाल'  सुरु केले आणि उण्या पुर्या दहा वर्षात ते  कोन्ग्रेस चे अध्यक्ष बनले . १९२३ साली मौलाना आजाद भारतीय राष्ट्रीय कोन्ग्रेस चे अध्यक्ष बनले होते. आजादांची लोकविलक्षण बुद्धिमत्ता , नेतृत्व गुण आणि इस्लामचे पंडित म्हणून त्याना मुस्लिम समाजात असलेली मान्यता या मागे उभी आहे. १९१२ ते १९२३ हा मौलाना आझादांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होण्याचा कालखंड आहे. १९३५  नंतर मात्र त्यांची लोकप्रियता झपाट्याने घसरलेली दिसते. नेमके काय घडले ? 

लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ असताना १९१६ साली त्यांनी नवे ' कुराण भाष्य ' लिहून तयार असल्याची घोषणा केली.   १९१६ मध्ये त्याना अटक झाली आणि ब्रिटीश पोलिसांनी आझादांचे ' नवे कुराण भाष्य'  जप्त केले . पुढे हे गायब करण्यात आले आणि आझादांचे भाष्य बेपत्ता झाले आहे म्हणून इंग्रजांनी जाहीर केले . मौलाना आझाद नाउमेद झाले नाहीत त्यांनी नव्याने पुन्हा कुराणाचा   अर्थ लिहिला आणि १९२१ साली पुन्हा छ्पाइस प्रारंभ केला . लागोलाग मौलाना आझादाना अटक झालेली आहे आणि ब्रिटीश पोलिसांनी सारी मुद्रिते आणि हस्तलिखिते गायब केलेली आहेत ! शेवटी अखेरीस ब्रिटीशांची सद्दी मावळू लागली १९३० सालच्या आसपास मौलाना आजादांचे तिसरे पुनर्लेखन प्रकाशित झाले . पण पुढची १५ वर्षे हे लिखाण बाजारातून पुन्हा गुल  करण्यात आले . अखेरीस १९४५ साली भारताचे स्वांतत्र्य दृष्टीपथात आल्यावर …. आझादाना आपले पुस्तक बाजारात बघण्याचे भाग्य मिळाले !!





पण तोपर्यंत इतर मौलवींनी आझादांच्या भाष्यावर केलेली टीका बाजारात उपलब्ध होती. इस्लामच्या पारंपारिक विश्लेषणाला मौलाना आझादांनी छेद दिला होता ----- कुराण आणि इस्लामचा नवा अर्थ विश्लेशित केला होता. इस्लामचे इतर अभ्यासक मौलवी त्यामुळे संतापले. हि बंडखोरी त्याना सहन झाली नाही . इतर मुल्ला मौलवींनी आजादांवर तीन गुन्हे लावले . बिदात , इरात्काम आणि इरतदात हे ते तीन गुन्हे होत. ज्या तीन अपराधाबद्दल मौलाना आझादाना दोषी ठरवण्यात आले ; त्यापैकी कोणत्याही एका  गुन्ह्याला इस्लामी धर्म शास्त्रात-  जाहीर रित्या  दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे . जणू धर्म पंडिताना  अजादाचां गुन्हा तीन वेळा दगडाने ठेचून मारण्याच्या लायकीचा वाटत होता . 

मौलाना आझादांचे नवे कुराण भाष्य इंग्रज पोलिसांनी का गायब केले ? इतर पारंपारिक मुल्ला मौलवी आझादांवर का संतापले ? असे काय होते या नव्या कुराण भाष्यात ? असे काय होते या इस्लामच्या अभिनव अर्थात ?   

कुराणाचा अर्थ कसा काढायचा ? 

परंपरेने इस्लामचा अर्थ काढण्याच्या रूढ पद्धती आहेत . प्रेषित मुहम्मद आधी मक्केत राहत होते. त्यावेळी शक्ती  आणि अनुयायांची संख्या कमी असल्याने त्याना मूर्तिपूजक अरबांचा जाच सहन करावा लागत होता. मुहम्मदाना मक्का सोडावी लागली आणि मदिनेला हिजरत करावी लागली . मक्का आणि मदिना या दोन शहरात प्रेषित साहेबाचे वास्तव्य होते. प्रेषित मुहम्मदांना या दोन शहरात वास्तव्य असताना अल्लाने जिब्राइल या त्याच्या दूताकरवी काही संदेश पाठवले. प्रेषितांनी आणि इस्लामच्या अनुयायी मुस्लिमांनी त्यांची जीवन पद्धती कशी ठेवावी ? (इस्लामी बन्धुसंघ ) उम्मत मधल्या मुस्लिमांशी कसा व्यवहार  करावा ? गैर मुस्लिमांशी कसा व्यवहार करावा ? कफ़िरांशी कशी वागणूक ठेवावी ? यासंबंधीचे अल्लाहने देवदूता करावी पाठवलेले आदेश मक्का आणि मदिना या दोन शहरात प्रेशिताना प्राप्त झाले. या संदेशाचा संग्रह म्हणजे कुराण होय . अशी मुस्लिमांची श्रद्धा आहे . 

प्रेषित मुहम्मद निरक्षर होते आणि त्यांनी अनुयायांना कुराण सांगितले - लिहिले नाही - याबद्दल सर्व मुस्लिम अभ्यासकात एकमत आहे.  पैगंबर साहेब ५७१ साली जन्मले आणि ६३२ साली अनंतात विलीन झाले. 

प्रेषित मुहम्मदाच्या मृत्युनंतर खलिफा उस्मान च्या काळात कुराण पाठ एकत्रित करण्यात आला. पैगंबर साहेबांचे चिटणीस जैद इब्बेसाबित यांनी हे काम केले. पण कुराणात अनेक अशुद्धे आली होती त्यामुळे मुहम्मदाचि जिवंत पत्नी हफ़शा यांच्या तोंडचा पाठ पवित्र मानून कुराणाचे पहिले संहितीकरण झाले . पुन्हा त्यात भाषिक अशुद्धी घुसल्या. ९३३ साली म्हणजे प्रेषिताच्या मृत्युनंतर तीनशे वर्षांनी इब्ने हसा आणि इब्ने मुजाहिद यांनी पुन्हा कुराण संस्कारित केले . आज आपल्या समोर आहे ती प्रत  ९३३ सालच्या कुराणाची आहे.

त्यात काही परस्पर विरोध किंवा अर्थ निश्पत्तिचि  अडचण आली तर ? तर त्याचा अर्थ हदीस नुसार काढला जातो . हदीस म्हणजे प्रेषितांच्या उक्ती आणि कृती . जर हदीस मध्ये संदर्भ मिळाला नाही तर मात्र बुद्धिवादाचा वापर करण्याची मुभा प्रेषितांनी कुराणात दिलेली आहे . 





मौलाना आजाद म्हणाले हदीस हि मानवी भाष्ये आहेत . फक्त कुराण हाच ईश्वरी ग्रंथ आहे . हदीसच्या परंपरेने (मुकलिद ) मी कुराणाचा अर्थ विदित करणार नाही. प्रेषितांच्या समकालीना प्रमाणे कुराणाचा अर्थ काढला पाहिजे .  कुराणाच्या इंटर प्रिटेशनचि हि संपूर्ण अभिनव पद्धती होति.  आझादांची बंडखोरी फक्त इथेच संपत  नाही  …. आजाद कुराणाचा नवा अर्थ विशद करू पाहतात . 

प्रेषित मुहम्मदाचा हेतू सर्वधर्मीय सरकार स्थापन करण्याचा आहे  असा मौलाना आझादांचा दावा आहे . इस्लामची राजकीय  धर्मसत्ता मुळी  प्रेशितानाच नको होती असा याचा अर्थ आहे .त्याचा पुढचा अर्थ असा कि - शरियत किंवा इस्लामी कायदा आणणे आणि दार उल इस्लाम करण्यासाठी जिहाद करणे हे प्रेशितासमोरचे ध्येय मुळीच नाही !!   मौलाना आझादांचे इस्लामचे  नवे इन्टप्रिटेशन सर्वार्थाने क्रांतिकारक आहे.   

सर्वधर्म समभावाचे नवे विश्लेषण इस्लाम मधून उत्पन्न केल्याने मौलाना आझादाना इंग्रजांची लबाडी अनुभवावी लागली आहे आणि रुढीप्रिय मुस्लिमांचा संताप सहन करावा लागला आहे  . 


अभिनव धर्मसंगर

मक्का  वास्तव्यात  प्रेषितांचे अनुयायी संखेने कमी होते . या काळात अल्लाने जिब्राइल नावाच्या देवदूता मार्फत जे संदेश पाठवले आहेत ते कुराणात मक्का कालीन सुरह (अध्याय ) म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहेत . त्यावेळी अल्लाने स्वत:चे एकमेवत्व  आणि  मूर्तीपूजेला विरोध यावर अधिक भर दिलेला दिसतो. मक्केतल्या भ्रष्ट पुरोहितांची रोजीरोटी मूर्तीपूजा (बुदपरस्ति ) वर अवलंबून होती . या भ्रष्ट पुरोहितांनी आणि अरबी काफिर मुर्तिपुजकानि मुहम्मदाचा छळ  केल्याने त्याना हिजरत करून मदिनेला निघून जावे लागले हे आपण पाहिले आहेच . ....    आता मुहम्मद साहेब मदिनेत प्रवेश करत आहेत . एव्हाना मुहम्मद साहेबांचा  दरारा आणि मूर्तीपूजा विरोध मदिनेतल्या काफ़िरानाहि माहित झालेला आहे .

मदिनेतहि  काफिर राज्यच आहे. इथे ज्यू , ख्रिस्ती , सबियान , मगियान आणि बुदपरस्त (मूर्तिपूजक) अशा पाच धर्माचे बहुधर्मीय सरकार आहे . मदिना कालीन सुरह (अध्याय ) सुरवातीला अल्लाहची एक भूमिका दाखवतात .   .या काळात  ज्यू आणि ख्रिस्ती धर्माचे प्रेषित हे इस्लामचेच  पूर्व प्रेषित आहेत अशी भूमिका अल्लाने मांडली आहे. अशी मुस्लिमांची श्रद्धा आहे .  सुरवातीला मुहम्मदाचे अनुयायी मक्केकडे तोंड करून नमाज पद्धत असत . 

तिथे मुहम्मदाने काफिर  ज्यू आणि ख्रिस्ती धर्माशी जुळवून घेतले कारण... अल्लानेच जेरुसलेम कडे तोंड करून प्रार्थना करण्याचा आदेश पाठवला . त्यामुळे मुसलमान नाराज झाले . त्यावर प्रेषित मुहम्मद म्हणतात - " ईश्वर तर सर्वत्र आहे , मग जेरुसलेम कडे तोंड करायला काय हरकत आहे ? " 





मुस्लिम आणि गैर मुस्लिम यात मदिना करार झाला आणि मदिनेत बहुधर्मीय सरकार अस्तित्वात आले. इथे इस्लामी धर्माची किंवा शरियतचि राजवट स्थापन झाली नाही . अल्लाने दुजोरा दिला. 

याच काळात अरबी मुर्तिपुजकात मुलीना जन्मात:च पुरून ठार करण्याची दुष्ट  चाल होती त्याला मुहम्मदानि विरोध केला आहे. प्रेषित साहेबांनी सावकारी व्याजालाही विरोध केला आहे. आणि या काळात एक पुरोगामी आणि  सर्व धर्मीय राजवट मदिनेत स्थापन झालेली दिसते. अल्लाहचा हेतू सर्वधर्मीय राजवट स्थापन करणे हाच आहे आणी  मुहम्मदानि त्यासाठीच मदिना करार केला आहे असे मौलाना   आझादांचे म्हणणे आहे . 



हदीस नुसार इस्लामचा अर्थ काढणार्या मुल्ला मौलविन्ना आझादांचे मत पटले नाही . पुढे इस्लामचे अनुयायी वाढल्यावर (मदिना कालीन उत्तरार्ध ) मदिना करार तोडण्यात आला आणि अल्लाहने काफ़िरान्विरुद्ध जिहाद पुकारून दार उल इस्लाम स्थापन करण्यासाठी आज्ञा दिल्या असे पारंपारिक मौलवी मानतात. तत्कालीन जमाते इस्लामीचे नेते मौलाना मौदुदि याच मताचे होते. शरियत - इस्लामी कायदा लागू करून सारी पृथ्वीच दार उल इस्लाम करण्यात यावी असे या  मौलवींचे मत आहे . 


कठमुल्ले आझादांच्या नव्या विचाराला विरोध करण्यासाठी परंपरेने कटिबद्ध होते. पण विद्या वाचस्पती - अबुल कलाम आझादांना इस्लामचे ज्ञान नाही असे म्हणताना दातखीळ बसत होती . कारण पाक मक्केतल्या मौलविनीच अझादाचां इस्लामी धर्म शास्त्रावरचा अधिकार मान्य केला होता. पण सर्वधर्मीय राजवट असलेले राज्य मान्य करणे म्हणजे सार्या - सार्या मेहदवि , वाहाबी वगैरे कट्टर विचारधारा अरबी समुद्रात बुडवणे ! आझादाना कसा विरोध करायचा हे धर्मांधाना न समजल्याने त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले . या गुन्ह्यांबद्दल इस्लामी धर्म शास्त्रातली शिक्षा दगडाने ठेचून मारण्याची होती !


आझाद मौलानांचे पारतंत्र्य


इस्लामचा अर्थ काढण्याच्या जुन्या पुराण्या  पद्धतीतून मौलाना अबुल कलाम - आझाद झाले होते - स्वतंत्र झाले होते. त्यांनी इस्लामचा नवा अभिनव अर्थ मांडला . सर्वधर्म समभाव हेच इस्लामचे ध्येय आहे म्हणून ठासून सांगितले. त्यांनी फ़ालनिलाहि विरोध केला . धर्माच्या आधारावर जिन्नाने पाकिस्तान निर्माण केला . पण  मौलाना आझाद पाकिस्तानात गेले नाहित. सर्वधर्म समभावी भारतातच राहिले .  प्रेषित साहेबाचे खरे ध्येय सर्वधर्मीय राजवट हेच आहे असे वारंवार म्हणत राहिले.  


भारतात सर्वधर्मीय सरकार रहावे - फाळणी होवू नये म्हणून तोडगे सुचवत राहिले. ज्या राष्ट्रवादी मुस्लिमांचे प्रतिनिधित्व मौलाना करत होते त्यांनी आणि ' जमियत उल उलेमाने'  फाळणी नको म्हणून सुचवलेले तोडगे पाकिस्तान पेक्षा भयानक असेच होते. धार्मिक दृष्ट्या विभक्त मतदार संघ , लोकसभेत मुस्लिमाना ४५% राखीव जागा , प्रान्ताना विशेष अधिकार आणि दुबळे केंद्र सरकार अशा राष्ट्रवादी अखंड भारतापेक्षा फाळणी परवडली - जिन्हा परवडला असे इतर भारतीय नेत्यांना वाटू लागले . 

अशा अव्वाच्या सव्वा मागण्या करून अखंड भारत मिळाला तरी मौलाना आझादाना तो हवा होता. मौलाना धार्माच्या पारंपारिक अर्थातून मुक्त झाले . पण पुढे राजकीय नेतृत्व म्हणून परतंत्र राहिले आणि जमियत उल उलेमाच्या मागण्यांना रेटत राहिले. 




केवळ धर्माचे अर्थ पुरोगामी काढणे या बाबतीत पहायचे झाले तर मौलाना आझादांची तुलना आर्य समाजाच्या दयानंद सरस्वतींशी करावी लागते.  महर्षी दयानंदानी वेदच नव्हे तर मनुस्म्रुतितुनहि समता उलगडली आहे!!!! त्यासाठी संस्कृत भाषेचा आणि व्याकरणाचा  किस पाडत प्रत्यक्ष पाणीनीला पाणी भरायला लावले आहे. पण मुल धर्मग्रंथात काय आहे ? यापेक्षा भाष्य काराचा हेतू काय आहे ? हे समाज कारणात अधिक महत्वाचे ठरते. वैदिक धर्मात समता आहे असे प्रतिपादित करणार्या दयानंद सरस्वतिना पुण्याच्या सनातनी ब्राह्मणांनी गर्दभानंद (गाढव + आनंद ) म्हटले होते आणि महात्मा फुलेंनी दायानंदाची मिरवणूक हत्ति वरून  काढली होती. राजर्षी  शाहू  तर घोषित आर्य समाजिस्ट आणि  बाबासाहेब हि दयानन्दाचे चाहते !
पण सवर्ण हिंदू समाज , सनातनी ब्राह्मण आणि हिंदूच्या तत्कालीन नेत्यांनी दयानन्दाना मनापासून कधीच स्वीकारले नाही .  परंपरेत नसलेले नवे अन्वयार्थ असेच तिरस्कृत राहतात.

मौलाना आझादांना यापेक्षा  वेगळे काय मिळणार होते ? सनातनी मुस्लिमांनी त्यांचे क्रांतिकारी कुराण भाष्य अमान्य केले आणि त्यांचे तडजोडीचे  राजकारण  मात्र  स्वीकारले . पण भारतात सम्राट अकबर , मौलाना  आझाद  आणि अश्फाक उल्ला खान यांचा वारसदार म्हणा अगर सहकारी म्हणा - जन्माला आलेला आहे - त्याचे नाव : हमीद दलवाई : हा बंडखोर अवलिया विचारवंत मात्र महात्मा फुलेंचा शिष्य आहे . मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा संस्थापक आहे …. आणि त्याचा आदर्श म्हणून सनातन्यांचा रोष पत्करणार्या हुतात्मा नरेंद्र दाभोलकरांनी स्वत:च्या मुलाचे नाव हमीद ठेवलेले आहे  . त्या हमीद  दलवाई विषयी  पुढच्या भागात … (क्रमश: )  
  

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html










सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *