१८ फेब्रु, २०१४

एका डुक्कर समाजाची कथा लेखक - फें ड्री डॉर्ज अभिराम्वेल









तर एक आटपाट गाव असत . तिथ एक फेंड्री रहात असतो . तर तो डुक्कर फेंड्री म्हणजे "मी" . आम्हा डूकरांच्या राज्यात विषमता नाही. जातीयता नाही . डुक्कर समाज हा एक परिपूर्ण आणि समतापूर्ण समाज आहे. आमचा मूलमंत्र आहे कि सर्व डुकरे समान आहेत . फक्त "काहि" डुकरे जरा अधिक समान आहेत. आमच्यात फारच समता असल्याने… हि राखीव काळी डुकरे समतेचा गैरफायदा उचलतात …. म्हणून आमच्या पांढऱ्या डूकरांनी एक झाले पाहिजे. असो . तर मी आज तुम्हाला माझी गोष्ट सांगतो …… माझी चित्तरकथा


तर मी फेंड्री डुक्कर . किंवा डुकराचे पिल्लू . माझे एका डूकरिनिवर प्रेम होते. मग मी तिच्या मागे मागे हुंगत हुंगत फिरायचा . पण माझ्या डुक्कर समाजाला पत्ताच नव्हता. मी लागू पण दिला नाही. आपला सुमडीत गु -- पीत राहिला मी . मग आमच्या डुक्कर शाळेत डुक्कर मास्तराक न कलता मी माझ्या माझ्या प्रेमावर प्रेम करत राहिलो .


पण आमची जत्रा होती ना एक । डुक्कर जत्रा …… च्यामारी तिथे एक मानुस शिवला हो आमच्या देवाला …… साला … मंग आमच्या डुक्कर धर्माचा पुजारी बोलला डुक्कर मुखीयाला - हे काय बर झाल नाही. आमच्या डुक्कर टोळीचा मुखिया आणि पुजारी हे लोक म्हणजे फार फार फार फार देवडुक्कर.
मंग त्यांनी एका खालच्या जातीच्या काळ्या डूकरास बोलावले आणि देवास शिवणार्या माणसाचा वध करण्यास सांगितले.


लई मारामारी झाली , मी माझी सगळी पणाला लावली . मी माणसाला पकडणारच होतो …. पण तेव्हढ्यात आमचे राष्ट्रगीत सुरु झाले . चारी पाय जमिनीत रोवून उभा राहिलो . पण आमाचे डुक्कर लोक , आमचे गीत , आमची हाजारो वर्षाची महान परंपरा, आमचा महान धर्म , आमची थोर समाज व्यवस्था आणि यामुळेच टिकून राहिलेला आमचा समाज ! डुक्कर समाज कधी हारणार नाही … तर शेवटी डुकरांनी फालतू माणसावर जय मिळवलाच ! चारी बाजूनी त्याला घेरला आणि पकडला ! शेवटी जय आमचा झाला … आमचाच होणार आणि होत राहील !


काही माणसांनी माझ्या नावाचा उपयोग करून एक शिणुमा बनवला आहे..... फेंड्री ....फेंड्री ...फेंड्री , त्यात चिडलेला मानुस दगड मारतो शेवटी … ह्या ह्या ह्या ह्या आणि ख्या ख्या ! प्रचंड हश्या आणी टाळ्या ! छ्या काय पण … मारणे , चावणे , डूरकणे हा आमच्या आमच्या डुकरांचा शिरस्ता


मानुस चावणार नाही , मानुस डूरकनार नाही , मानुस दगड पण मारणार नाही …


डूकरानो बिनधास्त रहा मानुस फकस्त शिणुमा बनवतोय !




लेखक - फें ड्री डॉर्ज अभिराम्वेल  





१५ फेब्रु, २०१४

हमीदचे मुसलमान .

 हमीदचे मुसलमान .
त्यांच्या चष्म्यातून भाग ५ )

हमीद दलवाई आणि माझा   स्वधर्माकडे पहाण्याचा चष्मा  एकच  आहे. ज्या दृष्टीकोनातून हमीद इस्लामकडे आणि मुस्लिम समाजाकडे पाही , नेमक्या त्याच दृष्टीकोनातून मी हिंदूचे यच्चयावत  धर्म आणि समग्र हिंदू समाज यांकडे पाहतो. हमिदचा दलवाई्चां  चष्मा माझ्या   नेहमीच्या वापरातला असल्याने , प्रस्तुत लेख प्रथमपुरुषी एकवचनात लिहिला आहे . पण लेखातले प्रत्येक वाक्य आणि विचार प्रवाह  मात्र हमिदचाच . सर्व लेखन समग्र संदर्भ देऊन केले आहे.

******************************************************************************************************************************************************************

 मी मुसलमान आहे : मुस्लिमांच्या हितासाठी मी कार्यरत आहे . 

आयकल का ? मी हमीद उमर दलवाई. मी मुसलमान आहे. कारण  भारतातील मुस्लिम संस्कृतीने ज्या चांगल्या गोष्टी निर्माण केल्या त्याचा मला अभिमान वाटतो. आणि तिच्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्याची मला लाज वाटते. मुस्लिमांच्या हितासाठी या समाजात बुद्धिवादी आणि उदारमतवादी प्रवाह निर्माण होणे गरजेचे आहे . हिंदू -  मुस्लिम बुद्धिजिवित एक महत्वाचा फरक आहे तो म्हणजे अंतर्मुख होऊन स्वत:ची चिकित्सा करण्याची पात्रता आजून मुस्लिम समाजाला लाभलेली नाही . मुस्लिमांच्या तुलनेत भारतातल्या हिंदू समाजाची अधिक प्रगती झालेली दिसते. चिकित्सक, बुद्धिवादी आणि उदारमतवादी विचारधारा हिंदू  समाजाकडे तुलनेने अधिक असणे हे त्याचे प्रमुख कारण आहे . या विचारधारेची देणगी हिंदुना आपोआप मिळालेली नाही. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. (1-122) आयकल का ? हिंदू धर्मश्रद्धा आणि चातुर्वर्ण्याची विषम समाजव्यवस्था  याविरुद्ध गेले एक शतक हिंदू विचारवंत आणि बुद्धीजीवी यांनी घनघोर युद्ध केले आहे. या युद्धातूनच हिंदू समाजात बुद्धिवाद , उदारमतवाद आणि मानवतावादाचे थोडेबहुत अंकुर फुटले आहेत.  (2-47)




या उदारमतवादाचा मुसलमान स्वत:च्या टोळीच्या राजकारणासाठी उपयोग करू पाहतात . मुसलमान स्वत:च्या धर्माची चिकित्सा करत नाहीत आणि इतरांनीही ती करू नये अशी त्यांची अपेक्षा असते. भारतीय मुस्लिमात काही नवे विचारप्रवाह येऊ पहात आहेत हे हि तितकेच खरे आहे . सनातनी मुल्ला मौलवी सोडले तर धार्मिक पण उदारमतवादी असा एक प्रवाह आहे .पण  हि मंडळी सुद्धा  इस्लाम परिपूर्ण आहे अशीच री ओढतात . लोकशाही , समाजवाद , धर्म निरपेक्षता,  अहिंसा , स्त्री पुरुष समता आणि बुरख्याच्या सक्तीला  विरोध अशी सर्व आधुनिक मुल्ये इस्लाम मध्येच ठासून भरली आहेत. कालविसंगत असे इस्लाम मध्ये काहीच नाही अशी यांची भूमिका आहे. हि मंडळी प्रामाणिक आहेत.(जुन्या)  इस्लाम चा विरोध (नव्या ) इस्लामने ! धर्माचा उपयोग धर्माविरुद्धची  तलवार  म्हणून करत आहेत . धर्माचे काही बिघडले नाही . तलवार मात्र बोथट झालेली आहे !(1-160)



आयकल का ?  धर्मग्रंथाच्या चौकटीत बुद्धिवाद करत बसणे हा मुर्खपणा आहे. तो तसाच चालू ठेवायची माझी बिलकुल इच्छा नाही . मुहम्मद पैगंबर जगाच्या इतिहासावर प्रभाव टाकणारे थोर आणि कर्तुत्ववान पुरुष होते. हे मला मान्यच आहे पण   . बस्स . पण   .अल्ला  , त्याचे देवदूत , ते देवदूत खाली येउन पैगंबराला सांगतात ते कुराण , कयामतचा दिवस , त्यादिवशी थडग्यातून उठणारे ते  मृतदेह ,ते  स्वर्ग ,ते  नरक यापैकी कशावरही माझा विश्वास नाही .  आणि यावर  विश्वास ठेवतो तोच मुसलमान यावरही माझा विश्वास नाही . आणि धार्मिकतेतून मुस्लिमांचे भले होईल किंवा धर्माचा उपयोग मुस्लिमांच्या भल्यासाठी करता येईल हि मी अंधश्रद्धा मानतो .(1-122)  आणि हे डरपोक हिंदू ! पुरोगामी हिंदुंची एक शोकांतिका आहे.  नेमक्या कसोटीच्या निर्णयाच्या वेळी हा प्राणी आपण मुसलमानांहूनहि अधिक मुसलमान असण्याची बतावणी करतो आणि मुसलमानाला जरा कमी मुसलमान करण्याचा प्रयत्न करणार्या माझ्यासारख्याला तोंडघशी पाडतो ! (3-16)

इस्लामचे धार्मिक नेते मुस्लिम समाजावर प्रेम करत नाहीत . आयकल का ? माझे मुस्लिम समाजावर प्रेम आहे आणि या समाजाचे भले व्हावे त्यात बुद्धिवादी , उदारमतवादी आणि मानवतावादी प्रवाहांची निर्मिती व्हावी म्हणून मी परंपरांशी  युद्ध लढणार आहे . आयकल का ?  हे माझे धर्मयुद्ध आहे आणि एक मुसलमान म्हणून मी ते लढणार आहे. आमेन... सुम्मा आमेन !  (1-122)




मुस्लिम स्त्रिया आणि इस्लाम धर्म (१ - १५४) 

भारतीय स्त्रियांच्या दास्य मुक्तीचा लढा हा भारतीय समाज प्रबोधनाच्या लढ्याचा एक हिस्सा आहे. हे परिवर्तन हिंदू स्त्रियांच्या बाबतीत तरी एक शतक आधीच सुरु झाले आहे.  परिवर्तन सरळ रेषेत कधी होत नसते. अगदी फ्रान्स सारख्या देशात आज पूर्ण स्त्री पुरुष समता आहे. कालपर्यंत फ्रांसमध्ये स्त्रियांना वेगळे बैंक अकौंट ठेवता येत नव्हते. भारतातल्या हिंदू  स्त्रिया स्वत:हून झगडण्या आधी . त्यांच्या साठी आंबेडकर लढले . त्यांनी हिंदू कोड बिल आणले. दलितांसाठी सर्वप्रथम ज्योतिबा  फुले लढले . गुलामांना गुलामीची सवय लागलेली असते. मुस्लिम स्त्रियांनाही गुलामीची सवय लागलेली आहे . त्यांसाठी आपणा सर्वांनाच लढावे लागणार आहे.  .




हिंदू समाजातील मंडळी समाजाचे भले करण्यासाठी पुढे आली धर्म - परंपरा नाकारल्या . आयकल का ? मुस्लिम स्त्रियांना यासाठी मदतीचा हात द्यावा लागेल . मुस्लिम स्त्री ला आजही समान प्रोपर्टी राईटस नाहीत. सवत बंदी कायदा नाही . बहुपत्नीत्व आहे . तोंडी तलाक आहे. बुरख्याची सक्ती आहे . या सर्व विषमतेला इस्लाम धर्माचा पाठिंबा आहे. " पुरुष हे स्त्रियांचे मालक आहेत आणि अल्लानेच त्याना स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ बनवले " आहे असे कुराणातच म्हटले आहे . (कुराण ४:३४ ) . मला पुन्हा श्ब्दार्थाचे किस पाडत चिकित्सेची तलवार बोथट करायची नाही. इस्लामच्या परंपरेत आणि धर्मात स्त्री पुरुष विषमता आहे आणि त्या गुलामीतून स्त्रियांना बाहेर काढले पाहिजे .आयकल का ? समाजाचे भले कारणासाठी धर्म दूर ठेवला पाहिजे . मुस्लिम स्त्रियांच्या हितासाठी तोंडी तलाक रद्द झाला पाहिजे आणि समान नागरी कायदा आला पाहिजे. 



मुस्लिम जातीयतेचे स्वरूप आणि कारणे 

इस्लाम धर्म आणि धार्मिक परंपरातून जन्मलेला सर्वोच्च - धर्माचा मनोगंड हे मुस्लिम जातीयतेचे कारण आहे. जामायते इस्लामी नावाची भारतीय मुस्लिमांची संघटना आहे. भारतात इस्लामिक शरीयाचे राज्य स्थापन करणे हे या संघटनेने आपले उद्दिष्ट ठेवले आहे. या संघटनेच्या रेडीयन्स या इंग्रजी पत्राने लिहिले कि " भारतातील धार्मिक संघर्ष सहजा सहजी मिटणारे नाहीत जेंव्हा भारतातील सर्व लोक एकाच धर्माचे बनतील तेंव्हाच भारतातील धार्मिक संघर्ष मिटतील ". भारताच्या धर्मनिरपेक्ष घटनेविरुद्ध हा त्यांचा जिहाद आहे. सर्वांनी मुसलमान व्हावे म्हणजे धार्मिक संघर्ष मिटतील ! हा इस्लामी न्याय ......आणि आम्ही अल्पसंख्य आहोत म्हणून आम्हाला आमचा धर्म पाळू द्या हा  सर्वमान्य न्याय ! हवा तेव्हा सेक्युलर न्याय आणि पाहिजे तेंव्हा इस्लामी न्याय असा हा खाक्या आहे.  मुस्लिमांचे ढोंगी राजकारण दोन्ही भूमिका आलटून पालटून घेते . (३ - २४ ते २६ )

आपण इथे राज्यकर्ते होतो बादशाहा  होतो म्हणून मुस्लिमांचे भारतावर भारी प्रेम आहे.  पण आपण आज लोकशाहीच्या राज्यात अल्पसंख्य झालो आहोत  राज्य करते राहिलेलो नाही हि खरी खंत आहे. बद्रच्या ऐतिहासिक युद्धात मुठभर मुस्लिमांनी काफिरांचा पराभव केला . का ? तर ते मुसलमान श्रद्धावान होते ! मग अरब इस्त्राइल युद्धात मुस्लिमांचा पराभव का झाला ? का ? तर इस्लाम वरची श्रद्धा कमी पडली ! मुस्लिम मन शास्त्रशुद्ध चिकित्सा जाणत नाही . सर्वत्र धर्म श्रद्धेचे परिमाण वापरले जाते. भारतात मुस्लिम हालाखीची स्थितीत आहेत . खरे आहे . पण कारण काय तर इस्लाम् वरची श्रद्धा कमी पडते ! आयकल का ?

आज मुस्लिम अल्पसंख्य आहेत .  मग त्यावर उपाय काय ? तर लोकसंख्या वाढवणे आणि इस्लामी लोकसंख्येच्या लाटेत देश बुडविणे. मुस्लिमांच्या बहुतेक धार्मिक संघटनांचा कुटुंब नियोजनाला विरोध आहे . अशा शेखचिल्ली स्वप्नांमुळे मुस्लिम समाजाचे नुकसान होते आहे. मोठ्या कुटुंबामुळे दारिद्र्य आणि अनपढ पणा वाढतो आहे . ज्या धर्मनिष्ठेमुळे वाटोळे झाले तेथेच पुन्हा घेऊन जाणारा हा प्रवाह आहे. (३ - २९ ते ३१)


स्वातंत्र्य पूर्व काळात कधीही हिंदू जातीवादी विरुद्ध मुस्लिम जातीवादी असा संघर्ष झाला नव्हता. गोळवलकर आणि सावरकर याना हिंदू समाजाने तेंव्हा नेते म्हणून स्वीकारले नव्हते.  मुस्लिमान बाबत उदार दृष्टीकोन ठेवणारे गांधी नेहरू विरुद्ध जातीय जिन्हा असा हा संघर्ष होता . हिंदूचा उदारमत वाद विरुद्ध मुस्लिम जातिवाद यात जातिवाद जिंकला आणि पाकिस्तानचा जन्म झाला. स्वतंत्र भारतातही मुस्लिम मानसिकतेत फरक पडलेला नाही . आणि मुस्लिम जातीवादाला प्रतिक्रिया स्वरूप हिंदू जातिवाद प्रबळ होत चालला आहे.


इस्लामी बंधुभाव 

कुराणात विश्व बंधुभाव आहे वगैरे या केवळ गप्पा आहेत . (मक्का आणि मदिना पूर्वकाळ ) या काळी मदिन्याला मुसलमान अल्पसंख्य होते आणि प्रेषिताचे स्थान अजून अस्थिरच होते. अशा काळात गैर मुस्लिमांना चांगली वागणूक देण्याचे आदेश कुराणात आले तर त्यात नवल नव्हे. पुढे शक्ती वाढल्यावर कुराणात ' काफिरांशी लढा  ' व त्याना अवमानित करण्यासाठी त्यांच्यावर झिजीया लादा असे म्हटले आहे. साधारणत: नव्या आदेशांनी जुने आदेश रद्द होतात असे धर्म पंडित मानतात . शाफी नावाचा अतिशय महत्वाचा आणि सन्मानीय भाष्यकार आहे त्याच्या मते " ख्रिश्चन आणि ज्यू या किताबी लोकांनाच झिजीया देऊन जिवंत राहण्याचा अधिकार आहे. ज्याना वाही (धर्मशास्त्र ) आलेले नाही (हिंदू , बौद्ध , जैन वगैरे ) त्यांच्यापुढे इस्लामचा स्वीकार करणे किंवा मृत्युला तयार होणे हे दोनच मार्ग उरतात " . (१ -१७३)









हिंदुत्ववाद (२ - १६९) 


मुस्लिम समाजाच्या संकुचित धर्म वादाला आणि पिसाट जातीवादाला विरोध करणे हे काही पाप नाही ! प्रश्न असा आहे कि  या विरोधाचे स्वरूप कोणते असावे ?  धर्म निरपेक्ष समाज व्यवस्थेची चौकट बळकट करण्यासाठी मुस्लिमांच्या धर्म राज्याला विरोध योग्यच आहे . पण हिंदुत्व वाद्यांचा मुळात धर्म निरपेक्षतेवरच विश्वास नाही. बरे हे भांडण केवळ मुस्लिम प्रश्नासाठी नाही . हिंदुत्व वाद्यांना त्यांच्या धर्मात हस्तक्षेप सहन होत नाही . बहुतेक हिंदुत्व वादि लोक चातुर्वणाचे आणि विषमतेचेही समर्थक असतात , गोळवलकरांच्या वर्णवादी भूमिकेचे  आजवर एकाही हिंदुत्व वाद्याने खंडन केलेले नाही . हिंदुच्या भल्यासाठी त्याना वेदाच्या काळाचे पुनरुज्जीवन हवे असते.  या लोकांचे हिंदू समाजावर प्रेम नाही . धर्मावर आहे .मुस्लिम जातीवादाला प्रतिक्रिया स्वरूप हिंदू जातिवाद प्रबळ होत चालला आहे.



आर्य समाजाचा फारसा प्रभाव नाही आणि आहे तिथे मुळ  मुद्दा वैदिक कालखंडाचे पुनरुज्जीवन आणि मुस्लीमविरोध हा आहे. पूर्वी असलेली समाजसुधारणेची चळवळ आर्य समाजातून  लोप  पावली आहे . हिदुत्व वाद्यातला तिसरा गट म्हणजे सावरकर. त्यातल्या त्यात सावरकरांच्या विचाराला शास्त्रीय बैठक होति. त्याना अस्पृश्यता अमान्य होती . चातुर्वर्ण मान्य नव्हते . खरेतर सावरकर नास्तिकच होते. पण त्यांचे हिंदुत्व गंमतशीर  होते. भारतात सर्व धर्मियांचे राज्य होईल. प्रत्येकाला त्यात समान अधिकार राहतील असे सावरकरांनी एका ठिकाणी म्हटले होते.  दुसरीकडे अफगाणी पठाणा विरुद्ध सीमेवर हिंदुसैन्य उभे राहील म्हणतात . हिंदुसैन्य हि काय भानगड आहे ? सगळ्याना समान संधी असणार्या राष्ट्रात हिन्दुसैन्य कोठून आणले ?   सावरकरांच्या अस्पृश्यता निवारण वगैरे कार्यात मानवता वाद जरा कमीच आणि मुस्लिमांशी लढण्यासाठी - हिंदुना बलवान करण्यासाठी जाती तोडा - असा दृष्टीकोन अधिक दिसतो . त्याचे अनुयायी सुद्धा विज्ञान निष्ठा वगैरे भाग सोडून मुस्लिम द्वेषाचा अजेंडा राबवताना दिसतात

डूकराचे मास खात आणि वाइन पीत कधीही नमाज न पढनारे जिन्हाभक्त आणि   महाराष्ट्रातील दुटप्पी सावरकरवादी  ब्राह्मण वर्ग यात कमालीचे साम्य आहे . यातल्या अनेकाना गोमास व्यर्ज नाही . कुठलीच व्रतवैकल्ये नकोत पण महाराष्ट्रात जनसंघाचा आणि मुस्लिम द्वेषाचा तोच आधारस्तंभ आहे. एकीकडे विज्ञानाचे पोवाडे आणि दुसरीकडे इतिहासाचे गोडवे गात जमातवाद हि आधुनिकता दुटप्पी आहे . नव्या हिंदुत्वाचा विरोध केवळ  मुस्लिमाच्या आजच्या वेडपट मागण्यांना नाही. त्याना भूतकाळातल्या मुस्लिमांचा सुड  आत्ता उगवायचा आहे आणि  अंध द्वेषाने इतिहासाचे चाक उलटे फिरवायचे आहे . सावरकरांनी आजच्या मराठी ब्राह्मणाना दिलेला हा दुटप्पी आधुनिकतेचा वारसा आहे. आयकल का ? आता मला कोणी ब्राह्मण द्वेष्टा म्हणेल!  मग मला माझे सहकारी  असलेल्या ब्राह्मणांची नावे घ्यावी लागतील ! मला त्याची सवय आहे . मुस्लिमांनी मला संघाचा , हिंदुंचा आणि  ब्राह्मणांचा हस्तक आधीच ठरवले आहे !      आयकल का ?  मला काहीच फरक पडत नाही !



 मुस्लिम सत्यशोधक मंडळ 

महात्मा फुलेंच्या बंडखोर परंपरेचा वारस म्हणून माझ्या संस्थेच्या  नावात  'सत्यशोधक' असावे असे बाबा आढावांनी सुचवले. (१-१५) संस्थेच्या नावात ' मुस्लिम' असावे का ? यावर बराच खल झाला.   शेवटी मी मुस्लिम सत्यशोधक मंडळ हेच नाव निश्चित केले. आयकल का ? जरी भारत एक आहे …. पण आज तरी मुस्लिम हा वेगळा समाज आहे असे आमच्या लोकाना  वाटते. बाहेरच्या लोकांनी येउन आमच्या बंदिस्त समाजात  बुद्धिवाद आणि आधुनिकता रुजवणे अशक्य आहे.  हे काम माझ्यासारख्या एखाद्या हमीद उमर दलवाइलाच  करावे लागेल .  आव्हाने मोठी आहेत वेळ थोडा आहे . जमातवाद सार्या देशालाच गिळतो आहे .




मुस्लिम प्रबोधनाची वाट बिकट आहे. माझ्यावर अनेक हल्लेही झाले .  काफर हि पदवी मला कायमची बहाल झालेली असल्याने ते सहाजिक आहे . मित्र शरद पवारांनी  मला स्व रक्षणासाठी  पिस्तुल बाळगण्याचा सल्ला दिला होता. पिस्तुल तत्वात बसत नव्हते . बाळगले नाही . (१-४५). माझा समाज माझ्यावर चिडून होता. तो त्याचा अधिकार होता . मी त्यांच्या चुका दाखवत होतो ना ! प्रत्येक कामाची किंमत द्यावी लागते ! सगळ्या मुस्लिम जगताची चिता भारतातले मुसलमान वाहत असतात . ज्यांना स्वत:चा समाज सुधारता येत नाही त्यांनी जगाची चिंता वाहू नये . मी फक्त भारताबद्दल बोललो . आणि म्हणूनच कि काय … मी त्यांच्या लेखी  काफर होतो !     (१-३४ ते ३६ )

पण मी स्वत:ला मुसलमान समजतो त्यामुळे मुस्लिमांच्या अंतर्गत प्रश्नाबद्दल मी अधिक बोलणार .  मुस्लिमांचे भले करण्यासाठी आमची अति धार्मिकता आणि जमातवाद बंद केला पाहिजे.  मुस्लिम जातिवाद आणि मुलतत्ववाद  हा इस्लाम धर्मातून निर्माण झाला आहे. मुहम्मद पैगंबरानंतर  दुसरा कोणी प्रेषित होणार नाही . जे काही कुराणात आले ते फायनल ! नवे ज्ञान सब झूट (अथवा ते तर आहेच कि कुराणात !) या प्रवृत्तीमुळे इस्लाम मध्ये एक फायनालीटी आहे. कुराणातले ज्ञान ते सर्वश्रेष्ठ ज्ञान . प्रेषित मुहम्म्दाएव्ह्ढा ज्ञानी  यापुढे होणे नाही ! हे इस्लामचे मुलतत्व आहे . मुस्लिमांचा विकास आणि ज्ञानाची वाढ या इस्लामी मुलतत्व वादा मुळे  खुरटली आहे . मुस्लिमांच्या मागासालेपणाचे मुळ ह्या फायनालीटीच्या सिद्धांतात आहे. हा  फायनालीटी सिद्धांत विज्ञान , शास्त्र , समाज व्यवस्था या सार्यांना लावला जातो . मुस्लिम अधोगतीचे हे मूळ कारण आहे . (१- १४८)

हाच  फायनालीटी नियम मग काफीरांशी कसे वागावे ? जिहाद करावा का ? भारत दार उल इस्लाम आहे का ? कुराणातल्या शक्ती कमी असतानाच्या माक्कि सुरह पालन करून काफ़िरांशी तडजोड  ? कि उत्तर मदिना काळातला मोहिदा करार तोडून जिहाद ? यालाही लावला जातो . हि   फायनालीटी तोडली पाहिजे . त्याशिवाय मुस्लिमांचे हित नाही . भारताचे हित नाही . मानवतेचे कल्याण नाही . हा वारसा मला मला महात्मा फुलेंची चळवळ  पुढे नेणार्यांकडून मिळाला . म्हणून मी सत्यशोधक आहे . मुस्लिम सत्यशोधक आहे.


आजचा उपाय : धर्मनीरपेक्षता : खरा आशय (१:१४३)

हिंदू आणि मुसलमान अशा जातीय तत्त्वावर या देशाची एकदा रक्तरंजित फाळणी झाली. एक देश इस्लामी पाक पाकिस्तान झाला.  तेंव्हा  दुसरा देश हा हिंदुचा हिदुस्थान झाला पाहिजे असा एक मतप्रवाह आहे. मग हिंदूचे धर्मराज्य वगैरे आपोआप संकल्पना येतात , दुसरी संकल्पना मुस्लिमांची ! कि हा देश धर्म निरपेक्ष आहे .इथे धर्म स्वातंत्र्य आहे … तवा हवा तेव्हढा आणि वाटेल तसा इस्लाम आम्ही पाळणार ! इस्लाम पाळणे हा आमचा घटना दत्त अधिकार आहे . दोन्ही संकल्पना साफ चूक आहेत .




मुस्लिमांच्या पक्षपातासाथि  देश सेक्युलर नाही . या देशात १०० % हिंदू असते तरीही हा देश सेक्युलरच राहीला पाहिजे  .  - हमिदचा चष्मा



या देशात जी धर्मनिरपेक्षता आहे ती मुस्लिमांसाठी नाही . या देशात एकही मुस्लिम नसता तरी हा देश धर्म निरपेक्षच राहिला असता . सेक्युलरीझम म्हणजे शासन आधुनिक राहील . शासकीय निर्णय न्याय , नीती , आचरण इत्यादी आधुनीक  चष्म्यातून घेतले जातील . आदत आणि इबादत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत . कुणाची पूजा करावी आणि पारमार्थिक बाबिना इबादत म्हणतात . या इबादत चे स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षतेत जरूर आहे.  आदत म्हणजे इहलोक .आणी  इथले नियम . किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही . सर्व हक्क शासनाकडे आहेत .  या देशात फक्त हिंदूच राहिले असते तरीही हा देश सेक्युलरच राहिला असता. मनुस्मृती नाही , कुराण नाही कोणताच   फायनल ! असा ग्रंथ नाही . आम्ही नव्या ज्ञानाचे मानवतेचे आणि बहुविधतेचे चाहते ……हि आमची  चाहत . आणि शेवटची इच्छा !  माणसाच भल माणसांनी करायचं असत … माझे मुस्लिम समाजावर प्रेम आहे आणि या समाजाचे भले व्हावे त्यात बुद्धिवादी , उदारमतवादी आणि मानवतावादी प्रवाहांची निर्मिती व्हावी म्हणून मी परंपरांशी  युद्ध लढणार आहे . आयकल का ?  हे माझे धर्मयुद्ध आहे आणि एक मुसलमान म्हणून मी ते लढणार आहे. आमेन... सुम्मा आमेन !  

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हमिदचा चष्मा सत्यशोधक आहे .
त्याकाळी  शरद पवार राजकारणात वाहवले नव्हते . आणि आजच्या सारखे  जमातवाद आणि जातीवादाचा राजकारणात उपयोग हि करत नव्हते . त्याकाळी पवार  सत्य शोधक परंपरा जगत होते . पवारांनी हमीदला आणि त्याच्या बंडखोरीला अभय दिल नसत तर तो एव्हढा जगालाच नसता . त्याला किडनीचा असाध्य विकार जडला . उपचार प्रामाणिक सत्यशोधकाच्या आवाक्या बाहेर होते . पवारांनी आर्थिक सहाय केले . हमीद  नास्तिक होता . त्यान मृत्युनंतराच्या इच्छेत लिहील - " हिंदू किंवा मुस्लिम अशा कोणत्याही धर्माचे विधी मी मेल्यानंतर करू नयेत . पूजा पाठ श्राद्ध - दुवा नमाजाच्या भानगडीत पडू नये . कोणत्याही धर्माचा पुरोहित बोलावू नये . माझी समाधी नको . प्रेत विजेवर जाळून टाकावे. शेवटची भाषणे किंवा स्मारक करू नये. इस्लामच्या वस्तुनिष्ठ आणि सत्यशोधकी अभ्यासासाठी एक संस्था आणि नियतकालिक काढावे " पत्राच्या प्रती   शरद पवार आणि अभी शहांना पाठवल्या .



हमीदचे नातेवाईक हटून  बसले . त्याना इस्लामनुसार शास्त्रशुद्ध दफन करायचं होत. या  इस्लामी  फायनालीटीत  बंधू हुसेन दलवाई सुद्धा होते. आणि हमीदची शेवटची  इच्छा नाकारून त्याला सनातनी मुस्लिम पद्धतीने  दफन करायचे ठरले . शरद पवारांनी हस्तक्षेप केला. सूत्रे हाती घेतली . शेवटी हमीदची इच्छा पूर्ण झाली. आज पवार इतकी धर्म निर्पेक्ष भूमिका घेतील असे वाटत नाही .  (4 - 76 to 80)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हमीद दलवाई आदर्श म्हणून डॉ नरेंद्र दाभोलकरांनी स्वत:च्या मुलाचे नाव हमीद दाभोलकर ठेवले होते . दाभोलकरासारख्या हमीदच्या हिंदू चाहत्यांना काय भोगावे लागले ?  मुस्लिम सहकारी त्यापेक्षा जास्त कष्टात आहेत .
------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------

 (1-122)  हा संदर्भ पहिल्या संदर्भ ग्रंथातील १२२ वे पान असा वाचावा . कुराणातला संदर्भ सुरा आणि आयत नुसार वाचावा.

१) हमीद दलवाई - क्रांतिकारी विचारवंत : संपादक : शमसुद्दिन तांबोळी : २००९ : पाष्टे : डायमंड पब्लिकेशन्स
२) राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान ::हमीद दलवाई :२०१२ : सुगावा प्रकाशन
३ )मुस्लिम  जातीयतेचे कारणे स्वरूप व उपाय : हमीद दलवाई :१९७८ : साधना प्रकाशन
४) हमीद : अनिल अवचट : १९७७ : नीलकंठ प्रकाशन

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html

७ फेब्रु, २०१४

त्यांच्या चष्म्यातून भाग ४ : मौलानांची आजादी


त्यांच्या चष्म्यातून भाग ४ : मौलानांची आजादी 

महान देशप्रेमी   मौलाना अबुल कलाम आझाद यांना तीन वेळा दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा फर्मावण्या एव्हढ्या गुन्ह्यांचे दोषी ठरवण्यात  आले  ! होय , तेच मौलाना आझाद - स्वातंत्र्य सेनानी , स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि गांधीजींचे अनुयायी असलेले राष्ट्रवादी गृहस्थ . असा कोणता गुन्हा केला होता त्यांनी ? कोणी फर्मावली हि शिक्षा ? शिक्षेचे पुढे काय झाले ? चला मौलाना आझादांच्या कथेला त्यांच्या बालपणापासून सुरुवात करू .





मौलाना आझादांचे घर, शिक्षण  आणि बालपण 

बादशहा अकबराच्या सेक्युलरगिरी बद्दल आणि विशेष म्हणजे दिने इलाहिच्या स्थापनेबद्दल मुल्ला मौलवित संतापाची लाट उसळली होती आणि अकबराविरुद्ध कलकत्त्याला मोठे धार्मिक  बंड झाले होते हे आपण मागील भागातून पाहिले आहे. दिने इलाहीविरुद्ध प्रखर संघर्ष करत ज्यांनी अकबराविरुद्ध सलीम च्या बंडाला पाठिंबा दिला - अशा प्रसिद्ध मुल्ला मौलवित जमालुद्दीन हे नाव फार महत्वाचे आहे. ते मेहदवि चळवळीचे पाठीराखे होते . सय्यद नुरुद्दीन या आपल्या पूर्वजाचा वारसा ते चालवत होते . सय्यद नुरुद्दीन यांनी इस्लामी राजेरजवाड्यांनी इस्लामची मुल तत्वे सोडून भरकटू नये म्हणून हि चळवळ चालवली होती .  सय्यद नुरुद्दीन आणि जमालुद्दीन या प्रसिद्ध मौलवींच्या वंशात मौलाना आझादांचा जन्म झालेला आहे .

 इस्लामी परंपरे नुसार मौलानांचे घर बंगाल मध्ये धर्मगुरुंचे घर म्हणून मानले जाते. १८५७ साली ब्रिटिशांना हाकलून देण्यासाठीचा  जिहाद अयशस्वी   ठरल्यानंतर मौलाना आझादांचे वडील भारत सोडून अरबस्तानातील मक्का येथे रहाण्यास गेले . आपल्या वडिलानच्या या कृत्याला आझादांनी ' हिजरत ' असे संबोधले आहे .      


 ' हिजरत '  म्हणजे काय ? हे जाणून घेण्यासाठी इस्लामी धर्मशास्त्रांचे जुजबी ज्ञान करून घेणे आवश्यक आहे. मुहम्मद पैगंबर साहेबांनी  इस्लाम धर्म स्थापन केला आणि तोच अल्लाहचा एकमेव सत्यधर्म आहे असे घोषित केले . 

प्रेषित मुहम्मदानि मक्का या अरबस्तानातल्या शहरात इस्लामची स्थापना केली . इस्लामचा मूर्तीपूजेला विरोध होता म्हणून स्थानिक मूर्तिपूजक अरबांनी मुहम्मदाना फार त्रास दिला , त्यांचा छळ केला . त्यावेळी इस्लामच्या अनुयायांची संख्या २०० पेक्षा कमी होती. त्या मुठभर मुस्लिमांना काफरांच्या राज्यात राहणे असह्य आणि अशक्य झाले . प्रेषितांनी आपल्या नव मुस्लिम बांधवांसह मक्का शहराचा त्याग केला आणि मादिनेकडे प्रयाण केले. या स्थलांतराला ' हिजरत '  असे म्हणतात . प्रेषित मुहम्मद हे परंपरे नुसार आदर्श मुस्लिम मानले जातात. आणि धार्मिक मुसलमान त्यांच्या सर्व कृतींचे मनापासून अनुकरण करत असतो . 

मुहम्मदाप्रमाणेच  आझादांच्या वडिलांना इंग्रजी काफिरांचे राज्य असलेल्या भारत देशात राहणे असह्य आणि अशक्य  झाले म्हणून त्यांनी अरबस्तानातल्या इस्लामी मक्केत हिजरत केली. मक्केत त्याना १८८८ साली  सुपुत्र झाला - त्याचे नाव मोहियुदिन अहमद .






 पण हा मोहियुदिन   कोणी सामान्य मुसलमान नव्हता. परंपरेनेच तो कलकत्त्याचा इमाम आणि मुस्लिम धर्मगुरुत्वाचा वारसदार होता.   हे पारंपारिक इमाम पद लक्षात घेऊन त्याचे दुसरे नाव ठेवण्यात आले -   फिरोजबख्त ! फिरोजबख्त म्हणजे युद्धजेता ! तर या बुद्धिमान फ़िरोझ बख्त ला आधुनिक शिक्षण मिळाले नाही . त्याने पारंपारिक इस्लामी धर्म शिक्षण घेतले. लोक विलक्षण  बुद्धिमत्ता आणि इस्लामी धर्मातले प्राविण्य यामुळे लहान वयातच या मुलाची कीर्ती अरबस्तान भर  दुमदुमू लागली ! वयाच्या केवळ अठराव्या वर्षी त्याना विद्या वाचस्पती अशी पदवी देण्यात आली . या लहान   मुलाचे इस्लामी धर्म शास्त्रातले प्राविण्य, ज्ञान आणि अधिकार  पाहून मक्केतल्या मुल्ला मौलवींनी हि पदवी दिलेली आहे . अरबी भाषेत विद्यावाचस्पती म्हणजे अबुल कलाम . हा फ़िरोजबख्त पुढे मौलाना अबुल कलाम आझाद या नावाने सुविख्यात झाला !

भारतातून इंग्रजांची राजवट समाप्त झाली पाहिजे हि श्रद्धा मौलाना आझादांना घराच्या परंपरेतूनच गवसली आहे .  अकबर ते इंग्रज या सर्वांच्या गैर इस्लामी सत्तेविरुद्ध जिहाद वा हिजरत करणार्यांचे रक्त मौलानांच्या नसात खेळत होते आणि शिकवण डोक्यात भिनली होती. 

या सर्व पार्श्वभूमीवर मौलाना आझादांचे क्रांतिकारी विचार , त्यांच्या विचारात झालेले बदल आणि आंदोलने समजून घ्यावी लागतात . मौलाना आजाद भारतात येतात आणि १९१२ मध्ये ' अल हिलाल ' हे उर्दू नियत कालिक प्रकाशित करू लागतात. अजादांचे भारतातील सामजिक आणि राजकीय जीवन इथून सुरु होते . 



इस्लामचा नवा अर्थ : नवी उत्कंठा 

मौलाना आझादांचे ' अल हिलाल ' हे उर्दू नियतकालिक गाजू लागते . ते ब्रिटीश विरोधाची आघाडी उभारतात आणि पूर्ण जोमाने खिलाफत चळवळीत सामील होतात.  १९१२ साली आझादांनी  'अल हिलाल'  सुरु केले आणि उण्या पुर्या दहा वर्षात ते  कोन्ग्रेस चे अध्यक्ष बनले . १९२३ साली मौलाना आजाद भारतीय राष्ट्रीय कोन्ग्रेस चे अध्यक्ष बनले होते. आजादांची लोकविलक्षण बुद्धिमत्ता , नेतृत्व गुण आणि इस्लामचे पंडित म्हणून त्याना मुस्लिम समाजात असलेली मान्यता या मागे उभी आहे. १९१२ ते १९२३ हा मौलाना आझादांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होण्याचा कालखंड आहे. १९३५  नंतर मात्र त्यांची लोकप्रियता झपाट्याने घसरलेली दिसते. नेमके काय घडले ? 

लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ असताना १९१६ साली त्यांनी नवे ' कुराण भाष्य ' लिहून तयार असल्याची घोषणा केली.   १९१६ मध्ये त्याना अटक झाली आणि ब्रिटीश पोलिसांनी आझादांचे ' नवे कुराण भाष्य'  जप्त केले . पुढे हे गायब करण्यात आले आणि आझादांचे भाष्य बेपत्ता झाले आहे म्हणून इंग्रजांनी जाहीर केले . मौलाना आझाद नाउमेद झाले नाहीत त्यांनी नव्याने पुन्हा कुराणाचा   अर्थ लिहिला आणि १९२१ साली पुन्हा छ्पाइस प्रारंभ केला . लागोलाग मौलाना आझादाना अटक झालेली आहे आणि ब्रिटीश पोलिसांनी सारी मुद्रिते आणि हस्तलिखिते गायब केलेली आहेत ! शेवटी अखेरीस ब्रिटीशांची सद्दी मावळू लागली १९३० सालच्या आसपास मौलाना आजादांचे तिसरे पुनर्लेखन प्रकाशित झाले . पण पुढची १५ वर्षे हे लिखाण बाजारातून पुन्हा गुल  करण्यात आले . अखेरीस १९४५ साली भारताचे स्वांतत्र्य दृष्टीपथात आल्यावर …. आझादाना आपले पुस्तक बाजारात बघण्याचे भाग्य मिळाले !!





पण तोपर्यंत इतर मौलवींनी आझादांच्या भाष्यावर केलेली टीका बाजारात उपलब्ध होती. इस्लामच्या पारंपारिक विश्लेषणाला मौलाना आझादांनी छेद दिला होता ----- कुराण आणि इस्लामचा नवा अर्थ विश्लेशित केला होता. इस्लामचे इतर अभ्यासक मौलवी त्यामुळे संतापले. हि बंडखोरी त्याना सहन झाली नाही . इतर मुल्ला मौलवींनी आजादांवर तीन गुन्हे लावले . बिदात , इरात्काम आणि इरतदात हे ते तीन गुन्हे होत. ज्या तीन अपराधाबद्दल मौलाना आझादाना दोषी ठरवण्यात आले ; त्यापैकी कोणत्याही एका  गुन्ह्याला इस्लामी धर्म शास्त्रात-  जाहीर रित्या  दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे . जणू धर्म पंडिताना  अजादाचां गुन्हा तीन वेळा दगडाने ठेचून मारण्याच्या लायकीचा वाटत होता . 

मौलाना आझादांचे नवे कुराण भाष्य इंग्रज पोलिसांनी का गायब केले ? इतर पारंपारिक मुल्ला मौलवी आझादांवर का संतापले ? असे काय होते या नव्या कुराण भाष्यात ? असे काय होते या इस्लामच्या अभिनव अर्थात ?   

कुराणाचा अर्थ कसा काढायचा ? 

परंपरेने इस्लामचा अर्थ काढण्याच्या रूढ पद्धती आहेत . प्रेषित मुहम्मद आधी मक्केत राहत होते. त्यावेळी शक्ती  आणि अनुयायांची संख्या कमी असल्याने त्याना मूर्तिपूजक अरबांचा जाच सहन करावा लागत होता. मुहम्मदाना मक्का सोडावी लागली आणि मदिनेला हिजरत करावी लागली . मक्का आणि मदिना या दोन शहरात प्रेषित साहेबाचे वास्तव्य होते. प्रेषित मुहम्मदांना या दोन शहरात वास्तव्य असताना अल्लाने जिब्राइल या त्याच्या दूताकरवी काही संदेश पाठवले. प्रेषितांनी आणि इस्लामच्या अनुयायी मुस्लिमांनी त्यांची जीवन पद्धती कशी ठेवावी ? (इस्लामी बन्धुसंघ ) उम्मत मधल्या मुस्लिमांशी कसा व्यवहार  करावा ? गैर मुस्लिमांशी कसा व्यवहार करावा ? कफ़िरांशी कशी वागणूक ठेवावी ? यासंबंधीचे अल्लाहने देवदूता करावी पाठवलेले आदेश मक्का आणि मदिना या दोन शहरात प्रेशिताना प्राप्त झाले. या संदेशाचा संग्रह म्हणजे कुराण होय . अशी मुस्लिमांची श्रद्धा आहे . 

प्रेषित मुहम्मद निरक्षर होते आणि त्यांनी अनुयायांना कुराण सांगितले - लिहिले नाही - याबद्दल सर्व मुस्लिम अभ्यासकात एकमत आहे.  पैगंबर साहेब ५७१ साली जन्मले आणि ६३२ साली अनंतात विलीन झाले. 

प्रेषित मुहम्मदाच्या मृत्युनंतर खलिफा उस्मान च्या काळात कुराण पाठ एकत्रित करण्यात आला. पैगंबर साहेबांचे चिटणीस जैद इब्बेसाबित यांनी हे काम केले. पण कुराणात अनेक अशुद्धे आली होती त्यामुळे मुहम्मदाचि जिवंत पत्नी हफ़शा यांच्या तोंडचा पाठ पवित्र मानून कुराणाचे पहिले संहितीकरण झाले . पुन्हा त्यात भाषिक अशुद्धी घुसल्या. ९३३ साली म्हणजे प्रेषिताच्या मृत्युनंतर तीनशे वर्षांनी इब्ने हसा आणि इब्ने मुजाहिद यांनी पुन्हा कुराण संस्कारित केले . आज आपल्या समोर आहे ती प्रत  ९३३ सालच्या कुराणाची आहे.

त्यात काही परस्पर विरोध किंवा अर्थ निश्पत्तिचि  अडचण आली तर ? तर त्याचा अर्थ हदीस नुसार काढला जातो . हदीस म्हणजे प्रेषितांच्या उक्ती आणि कृती . जर हदीस मध्ये संदर्भ मिळाला नाही तर मात्र बुद्धिवादाचा वापर करण्याची मुभा प्रेषितांनी कुराणात दिलेली आहे . 





मौलाना आजाद म्हणाले हदीस हि मानवी भाष्ये आहेत . फक्त कुराण हाच ईश्वरी ग्रंथ आहे . हदीसच्या परंपरेने (मुकलिद ) मी कुराणाचा अर्थ विदित करणार नाही. प्रेषितांच्या समकालीना प्रमाणे कुराणाचा अर्थ काढला पाहिजे .  कुराणाच्या इंटर प्रिटेशनचि हि संपूर्ण अभिनव पद्धती होति.  आझादांची बंडखोरी फक्त इथेच संपत  नाही  …. आजाद कुराणाचा नवा अर्थ विशद करू पाहतात . 

प्रेषित मुहम्मदाचा हेतू सर्वधर्मीय सरकार स्थापन करण्याचा आहे  असा मौलाना आझादांचा दावा आहे . इस्लामची राजकीय  धर्मसत्ता मुळी  प्रेशितानाच नको होती असा याचा अर्थ आहे .त्याचा पुढचा अर्थ असा कि - शरियत किंवा इस्लामी कायदा आणणे आणि दार उल इस्लाम करण्यासाठी जिहाद करणे हे प्रेशितासमोरचे ध्येय मुळीच नाही !!   मौलाना आझादांचे इस्लामचे  नवे इन्टप्रिटेशन सर्वार्थाने क्रांतिकारक आहे.   

सर्वधर्म समभावाचे नवे विश्लेषण इस्लाम मधून उत्पन्न केल्याने मौलाना आझादाना इंग्रजांची लबाडी अनुभवावी लागली आहे आणि रुढीप्रिय मुस्लिमांचा संताप सहन करावा लागला आहे  . 


अभिनव धर्मसंगर

मक्का  वास्तव्यात  प्रेषितांचे अनुयायी संखेने कमी होते . या काळात अल्लाने जिब्राइल नावाच्या देवदूता मार्फत जे संदेश पाठवले आहेत ते कुराणात मक्का कालीन सुरह (अध्याय ) म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहेत . त्यावेळी अल्लाने स्वत:चे एकमेवत्व  आणि  मूर्तीपूजेला विरोध यावर अधिक भर दिलेला दिसतो. मक्केतल्या भ्रष्ट पुरोहितांची रोजीरोटी मूर्तीपूजा (बुदपरस्ति ) वर अवलंबून होती . या भ्रष्ट पुरोहितांनी आणि अरबी काफिर मुर्तिपुजकानि मुहम्मदाचा छळ  केल्याने त्याना हिजरत करून मदिनेला निघून जावे लागले हे आपण पाहिले आहेच . ....    आता मुहम्मद साहेब मदिनेत प्रवेश करत आहेत . एव्हाना मुहम्मद साहेबांचा  दरारा आणि मूर्तीपूजा विरोध मदिनेतल्या काफ़िरानाहि माहित झालेला आहे .

मदिनेतहि  काफिर राज्यच आहे. इथे ज्यू , ख्रिस्ती , सबियान , मगियान आणि बुदपरस्त (मूर्तिपूजक) अशा पाच धर्माचे बहुधर्मीय सरकार आहे . मदिना कालीन सुरह (अध्याय ) सुरवातीला अल्लाहची एक भूमिका दाखवतात .   .या काळात  ज्यू आणि ख्रिस्ती धर्माचे प्रेषित हे इस्लामचेच  पूर्व प्रेषित आहेत अशी भूमिका अल्लाने मांडली आहे. अशी मुस्लिमांची श्रद्धा आहे .  सुरवातीला मुहम्मदाचे अनुयायी मक्केकडे तोंड करून नमाज पद्धत असत . 

तिथे मुहम्मदाने काफिर  ज्यू आणि ख्रिस्ती धर्माशी जुळवून घेतले कारण... अल्लानेच जेरुसलेम कडे तोंड करून प्रार्थना करण्याचा आदेश पाठवला . त्यामुळे मुसलमान नाराज झाले . त्यावर प्रेषित मुहम्मद म्हणतात - " ईश्वर तर सर्वत्र आहे , मग जेरुसलेम कडे तोंड करायला काय हरकत आहे ? " 





मुस्लिम आणि गैर मुस्लिम यात मदिना करार झाला आणि मदिनेत बहुधर्मीय सरकार अस्तित्वात आले. इथे इस्लामी धर्माची किंवा शरियतचि राजवट स्थापन झाली नाही . अल्लाने दुजोरा दिला. 

याच काळात अरबी मुर्तिपुजकात मुलीना जन्मात:च पुरून ठार करण्याची दुष्ट  चाल होती त्याला मुहम्मदानि विरोध केला आहे. प्रेषित साहेबांनी सावकारी व्याजालाही विरोध केला आहे. आणि या काळात एक पुरोगामी आणि  सर्व धर्मीय राजवट मदिनेत स्थापन झालेली दिसते. अल्लाहचा हेतू सर्वधर्मीय राजवट स्थापन करणे हाच आहे आणी  मुहम्मदानि त्यासाठीच मदिना करार केला आहे असे मौलाना   आझादांचे म्हणणे आहे . 



हदीस नुसार इस्लामचा अर्थ काढणार्या मुल्ला मौलविन्ना आझादांचे मत पटले नाही . पुढे इस्लामचे अनुयायी वाढल्यावर (मदिना कालीन उत्तरार्ध ) मदिना करार तोडण्यात आला आणि अल्लाहने काफ़िरान्विरुद्ध जिहाद पुकारून दार उल इस्लाम स्थापन करण्यासाठी आज्ञा दिल्या असे पारंपारिक मौलवी मानतात. तत्कालीन जमाते इस्लामीचे नेते मौलाना मौदुदि याच मताचे होते. शरियत - इस्लामी कायदा लागू करून सारी पृथ्वीच दार उल इस्लाम करण्यात यावी असे या  मौलवींचे मत आहे . 


कठमुल्ले आझादांच्या नव्या विचाराला विरोध करण्यासाठी परंपरेने कटिबद्ध होते. पण विद्या वाचस्पती - अबुल कलाम आझादांना इस्लामचे ज्ञान नाही असे म्हणताना दातखीळ बसत होती . कारण पाक मक्केतल्या मौलविनीच अझादाचां इस्लामी धर्म शास्त्रावरचा अधिकार मान्य केला होता. पण सर्वधर्मीय राजवट असलेले राज्य मान्य करणे म्हणजे सार्या - सार्या मेहदवि , वाहाबी वगैरे कट्टर विचारधारा अरबी समुद्रात बुडवणे ! आझादाना कसा विरोध करायचा हे धर्मांधाना न समजल्याने त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले . या गुन्ह्यांबद्दल इस्लामी धर्म शास्त्रातली शिक्षा दगडाने ठेचून मारण्याची होती !


आझाद मौलानांचे पारतंत्र्य


इस्लामचा अर्थ काढण्याच्या जुन्या पुराण्या  पद्धतीतून मौलाना अबुल कलाम - आझाद झाले होते - स्वतंत्र झाले होते. त्यांनी इस्लामचा नवा अभिनव अर्थ मांडला . सर्वधर्म समभाव हेच इस्लामचे ध्येय आहे म्हणून ठासून सांगितले. त्यांनी फ़ालनिलाहि विरोध केला . धर्माच्या आधारावर जिन्नाने पाकिस्तान निर्माण केला . पण  मौलाना आझाद पाकिस्तानात गेले नाहित. सर्वधर्म समभावी भारतातच राहिले .  प्रेषित साहेबाचे खरे ध्येय सर्वधर्मीय राजवट हेच आहे असे वारंवार म्हणत राहिले.  


भारतात सर्वधर्मीय सरकार रहावे - फाळणी होवू नये म्हणून तोडगे सुचवत राहिले. ज्या राष्ट्रवादी मुस्लिमांचे प्रतिनिधित्व मौलाना करत होते त्यांनी आणि ' जमियत उल उलेमाने'  फाळणी नको म्हणून सुचवलेले तोडगे पाकिस्तान पेक्षा भयानक असेच होते. धार्मिक दृष्ट्या विभक्त मतदार संघ , लोकसभेत मुस्लिमाना ४५% राखीव जागा , प्रान्ताना विशेष अधिकार आणि दुबळे केंद्र सरकार अशा राष्ट्रवादी अखंड भारतापेक्षा फाळणी परवडली - जिन्हा परवडला असे इतर भारतीय नेत्यांना वाटू लागले . 

अशा अव्वाच्या सव्वा मागण्या करून अखंड भारत मिळाला तरी मौलाना आझादाना तो हवा होता. मौलाना धार्माच्या पारंपारिक अर्थातून मुक्त झाले . पण पुढे राजकीय नेतृत्व म्हणून परतंत्र राहिले आणि जमियत उल उलेमाच्या मागण्यांना रेटत राहिले. 




केवळ धर्माचे अर्थ पुरोगामी काढणे या बाबतीत पहायचे झाले तर मौलाना आझादांची तुलना आर्य समाजाच्या दयानंद सरस्वतींशी करावी लागते.  महर्षी दयानंदानी वेदच नव्हे तर मनुस्म्रुतितुनहि समता उलगडली आहे!!!! त्यासाठी संस्कृत भाषेचा आणि व्याकरणाचा  किस पाडत प्रत्यक्ष पाणीनीला पाणी भरायला लावले आहे. पण मुल धर्मग्रंथात काय आहे ? यापेक्षा भाष्य काराचा हेतू काय आहे ? हे समाज कारणात अधिक महत्वाचे ठरते. वैदिक धर्मात समता आहे असे प्रतिपादित करणार्या दयानंद सरस्वतिना पुण्याच्या सनातनी ब्राह्मणांनी गर्दभानंद (गाढव + आनंद ) म्हटले होते आणि महात्मा फुलेंनी दायानंदाची मिरवणूक हत्ति वरून  काढली होती. राजर्षी  शाहू  तर घोषित आर्य समाजिस्ट आणि  बाबासाहेब हि दयानन्दाचे चाहते !
पण सवर्ण हिंदू समाज , सनातनी ब्राह्मण आणि हिंदूच्या तत्कालीन नेत्यांनी दयानन्दाना मनापासून कधीच स्वीकारले नाही .  परंपरेत नसलेले नवे अन्वयार्थ असेच तिरस्कृत राहतात.

मौलाना आझादांना यापेक्षा  वेगळे काय मिळणार होते ? सनातनी मुस्लिमांनी त्यांचे क्रांतिकारी कुराण भाष्य अमान्य केले आणि त्यांचे तडजोडीचे  राजकारण  मात्र  स्वीकारले . पण भारतात सम्राट अकबर , मौलाना  आझाद  आणि अश्फाक उल्ला खान यांचा वारसदार म्हणा अगर सहकारी म्हणा - जन्माला आलेला आहे - त्याचे नाव : हमीद दलवाई : हा बंडखोर अवलिया विचारवंत मात्र महात्मा फुलेंचा शिष्य आहे . मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा संस्थापक आहे …. आणि त्याचा आदर्श म्हणून सनातन्यांचा रोष पत्करणार्या हुतात्मा नरेंद्र दाभोलकरांनी स्वत:च्या मुलाचे नाव हमीद ठेवलेले आहे  . त्या हमीद  दलवाई विषयी  पुढच्या भागात … (क्रमश: )  
  

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html










सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *