हमीदचे मुसलमान .
( त्यांच्या चष्म्यातून भाग ५ )
हमीद दलवाई आणि माझा स्वधर्माकडे पहाण्याचा चष्मा एकच आहे. ज्या दृष्टीकोनातून हमीद इस्लामकडे आणि मुस्लिम समाजाकडे पाही , नेमक्या त्याच दृष्टीकोनातून मी हिंदूचे यच्चयावत धर्म आणि समग्र हिंदू समाज यांकडे पाहतो. हमिदचा दलवाई्चां चष्मा माझ्या नेहमीच्या वापरातला असल्याने , प्रस्तुत लेख प्रथमपुरुषी एकवचनात लिहिला आहे . पण लेखातले प्रत्येक वाक्य आणि विचार प्रवाह मात्र हमिदचाच . सर्व लेखन समग्र संदर्भ देऊन केले आहे.
******************************************************************************************************************************************************************
मी मुसलमान आहे : मुस्लिमांच्या हितासाठी मी कार्यरत आहे .
आयकल का ? मी हमीद उमर दलवाई. मी मुसलमान आहे. कारण भारतातील मुस्लिम संस्कृतीने ज्या चांगल्या गोष्टी निर्माण केल्या त्याचा मला अभिमान वाटतो. आणि तिच्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्याची मला लाज वाटते. मुस्लिमांच्या हितासाठी या समाजात बुद्धिवादी आणि उदारमतवादी प्रवाह निर्माण होणे गरजेचे आहे . हिंदू - मुस्लिम बुद्धिजिवित एक महत्वाचा फरक आहे तो म्हणजे अंतर्मुख होऊन स्वत:ची चिकित्सा करण्याची पात्रता आजून मुस्लिम समाजाला लाभलेली नाही . मुस्लिमांच्या तुलनेत भारतातल्या हिंदू समाजाची अधिक प्रगती झालेली दिसते. चिकित्सक, बुद्धिवादी आणि उदारमतवादी विचारधारा हिंदू समाजाकडे तुलनेने अधिक असणे हे त्याचे प्रमुख कारण आहे . या विचारधारेची देणगी हिंदुना आपोआप मिळालेली नाही. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. (1-122) आयकल का ? हिंदू धर्मश्रद्धा आणि चातुर्वर्ण्याची विषम समाजव्यवस्था याविरुद्ध गेले एक शतक हिंदू विचारवंत आणि बुद्धीजीवी यांनी घनघोर युद्ध केले आहे. या युद्धातूनच हिंदू समाजात बुद्धिवाद , उदारमतवाद आणि मानवतावादाचे थोडेबहुत अंकुर फुटले आहेत. (2-47)
या उदारमतवादाचा मुसलमान स्वत:च्या टोळीच्या राजकारणासाठी उपयोग करू पाहतात . मुसलमान स्वत:च्या धर्माची चिकित्सा करत नाहीत आणि इतरांनीही ती करू नये अशी त्यांची अपेक्षा असते. भारतीय मुस्लिमात काही नवे विचारप्रवाह येऊ पहात आहेत हे हि तितकेच खरे आहे . सनातनी मुल्ला मौलवी सोडले तर धार्मिक पण उदारमतवादी असा एक प्रवाह आहे .पण हि मंडळी सुद्धा इस्लाम परिपूर्ण आहे अशीच री ओढतात . लोकशाही , समाजवाद , धर्म निरपेक्षता, अहिंसा , स्त्री पुरुष समता आणि बुरख्याच्या सक्तीला विरोध अशी सर्व आधुनिक मुल्ये इस्लाम मध्येच ठासून भरली आहेत. कालविसंगत असे इस्लाम मध्ये काहीच नाही अशी यांची भूमिका आहे. हि मंडळी प्रामाणिक आहेत.(जुन्या) इस्लाम चा विरोध (नव्या ) इस्लामने ! धर्माचा उपयोग धर्माविरुद्धची तलवार म्हणून करत आहेत . धर्माचे काही बिघडले नाही . तलवार मात्र बोथट झालेली आहे !(1-160)
आयकल का ? धर्मग्रंथाच्या चौकटीत बुद्धिवाद करत बसणे हा मुर्खपणा आहे. तो तसाच चालू ठेवायची माझी बिलकुल इच्छा नाही . मुहम्मद पैगंबर जगाच्या इतिहासावर प्रभाव टाकणारे थोर आणि कर्तुत्ववान पुरुष होते. हे मला मान्यच आहे पण . बस्स . पण .अल्ला , त्याचे देवदूत , ते देवदूत खाली येउन पैगंबराला सांगतात ते कुराण , कयामतचा दिवस , त्यादिवशी थडग्यातून उठणारे ते मृतदेह ,ते स्वर्ग ,ते नरक यापैकी कशावरही माझा विश्वास नाही . आणि यावर विश्वास ठेवतो तोच मुसलमान यावरही माझा विश्वास नाही . आणि धार्मिकतेतून मुस्लिमांचे भले होईल किंवा धर्माचा उपयोग मुस्लिमांच्या भल्यासाठी करता येईल हि मी अंधश्रद्धा मानतो .(1-122) आणि हे डरपोक हिंदू ! पुरोगामी हिंदुंची एक शोकांतिका आहे. नेमक्या कसोटीच्या निर्णयाच्या वेळी हा प्राणी आपण मुसलमानांहूनहि अधिक मुसलमान असण्याची बतावणी करतो आणि मुसलमानाला जरा कमी मुसलमान करण्याचा प्रयत्न करणार्या माझ्यासारख्याला तोंडघशी पाडतो ! (3-16)
इस्लामचे धार्मिक नेते मुस्लिम समाजावर प्रेम करत नाहीत . आयकल का ? माझे मुस्लिम समाजावर प्रेम आहे आणि या समाजाचे भले व्हावे त्यात बुद्धिवादी , उदारमतवादी आणि मानवतावादी प्रवाहांची निर्मिती व्हावी म्हणून मी परंपरांशी युद्ध लढणार आहे . आयकल का ? हे माझे धर्मयुद्ध आहे आणि एक मुसलमान म्हणून मी ते लढणार आहे. आमेन... सुम्मा आमेन ! (1-122)
मुस्लिम स्त्रिया आणि इस्लाम धर्म (१ - १५४)
भारतीय स्त्रियांच्या दास्य मुक्तीचा लढा हा भारतीय समाज प्रबोधनाच्या लढ्याचा एक हिस्सा आहे. हे परिवर्तन हिंदू स्त्रियांच्या बाबतीत तरी एक शतक आधीच सुरु झाले आहे. परिवर्तन सरळ रेषेत कधी होत नसते. अगदी फ्रान्स सारख्या देशात आज पूर्ण स्त्री पुरुष समता आहे. कालपर्यंत फ्रांसमध्ये स्त्रियांना वेगळे बैंक अकौंट ठेवता येत नव्हते. भारतातल्या हिंदू स्त्रिया स्वत:हून झगडण्या आधी . त्यांच्या साठी आंबेडकर लढले . त्यांनी हिंदू कोड बिल आणले. दलितांसाठी सर्वप्रथम ज्योतिबा फुले लढले . गुलामांना गुलामीची सवय लागलेली असते. मुस्लिम स्त्रियांनाही गुलामीची सवय लागलेली आहे . त्यांसाठी आपणा सर्वांनाच लढावे लागणार आहे. .
हिंदू समाजातील मंडळी समाजाचे भले करण्यासाठी पुढे आली धर्म - परंपरा नाकारल्या . आयकल का ? मुस्लिम स्त्रियांना यासाठी मदतीचा हात द्यावा लागेल . मुस्लिम स्त्री ला आजही समान प्रोपर्टी राईटस नाहीत. सवत बंदी कायदा नाही . बहुपत्नीत्व आहे . तोंडी तलाक आहे. बुरख्याची सक्ती आहे . या सर्व विषमतेला इस्लाम धर्माचा पाठिंबा आहे. " पुरुष हे स्त्रियांचे मालक आहेत आणि अल्लानेच त्याना स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ बनवले " आहे असे कुराणातच म्हटले आहे . (कुराण ४:३४ ) . मला पुन्हा श्ब्दार्थाचे किस पाडत चिकित्सेची तलवार बोथट करायची नाही. इस्लामच्या परंपरेत आणि धर्मात स्त्री पुरुष विषमता आहे आणि त्या गुलामीतून स्त्रियांना बाहेर काढले पाहिजे .आयकल का ? समाजाचे भले कारणासाठी धर्म दूर ठेवला पाहिजे . मुस्लिम स्त्रियांच्या हितासाठी तोंडी तलाक रद्द झाला पाहिजे आणि समान नागरी कायदा आला पाहिजे.
मुस्लिम जातीयतेचे स्वरूप आणि कारणे
इस्लाम धर्म आणि धार्मिक परंपरातून जन्मलेला सर्वोच्च - धर्माचा मनोगंड हे मुस्लिम जातीयतेचे कारण आहे. जामायते इस्लामी नावाची भारतीय मुस्लिमांची संघटना आहे. भारतात इस्लामिक शरीयाचे राज्य स्थापन करणे हे या संघटनेने आपले उद्दिष्ट ठेवले आहे. या संघटनेच्या रेडीयन्स या इंग्रजी पत्राने लिहिले कि " भारतातील धार्मिक संघर्ष सहजा सहजी मिटणारे नाहीत जेंव्हा भारतातील सर्व लोक एकाच धर्माचे बनतील तेंव्हाच भारतातील धार्मिक संघर्ष मिटतील ". भारताच्या धर्मनिरपेक्ष घटनेविरुद्ध हा त्यांचा जिहाद आहे. सर्वांनी मुसलमान व्हावे म्हणजे धार्मिक संघर्ष मिटतील ! हा इस्लामी न्याय ......आणि आम्ही अल्पसंख्य आहोत म्हणून आम्हाला आमचा धर्म पाळू द्या हा सर्वमान्य न्याय ! हवा तेव्हा सेक्युलर न्याय आणि पाहिजे तेंव्हा इस्लामी न्याय असा हा खाक्या आहे. मुस्लिमांचे ढोंगी राजकारण दोन्ही भूमिका आलटून पालटून घेते . (३ - २४ ते २६ )
आपण इथे राज्यकर्ते होतो बादशाहा होतो म्हणून मुस्लिमांचे भारतावर भारी प्रेम आहे. पण आपण आज लोकशाहीच्या राज्यात अल्पसंख्य झालो आहोत राज्य करते राहिलेलो नाही हि खरी खंत आहे. बद्रच्या ऐतिहासिक युद्धात मुठभर मुस्लिमांनी काफिरांचा पराभव केला . का ? तर ते मुसलमान श्रद्धावान होते ! मग अरब इस्त्राइल युद्धात मुस्लिमांचा पराभव का झाला ? का ? तर इस्लाम वरची श्रद्धा कमी पडली ! मुस्लिम मन शास्त्रशुद्ध चिकित्सा जाणत नाही . सर्वत्र धर्म श्रद्धेचे परिमाण वापरले जाते. भारतात मुस्लिम हालाखीची स्थितीत आहेत . खरे आहे . पण कारण काय तर इस्लाम् वरची श्रद्धा कमी पडते ! आयकल का ?
आज मुस्लिम अल्पसंख्य आहेत . मग त्यावर उपाय काय ? तर लोकसंख्या वाढवणे आणि इस्लामी लोकसंख्येच्या लाटेत देश बुडविणे. मुस्लिमांच्या बहुतेक धार्मिक संघटनांचा कुटुंब नियोजनाला विरोध आहे . अशा शेखचिल्ली स्वप्नांमुळे मुस्लिम समाजाचे नुकसान होते आहे. मोठ्या कुटुंबामुळे दारिद्र्य आणि अनपढ पणा वाढतो आहे . ज्या धर्मनिष्ठेमुळे वाटोळे झाले तेथेच पुन्हा घेऊन जाणारा हा प्रवाह आहे. (३ - २९ ते ३१)
स्वातंत्र्य पूर्व काळात कधीही हिंदू जातीवादी विरुद्ध मुस्लिम जातीवादी असा संघर्ष झाला नव्हता. गोळवलकर आणि सावरकर याना हिंदू समाजाने तेंव्हा नेते म्हणून स्वीकारले नव्हते. मुस्लिमान बाबत उदार दृष्टीकोन ठेवणारे गांधी नेहरू विरुद्ध जातीय जिन्हा असा हा संघर्ष होता . हिंदूचा उदारमत वाद विरुद्ध मुस्लिम जातिवाद यात जातिवाद जिंकला आणि पाकिस्तानचा जन्म झाला. स्वतंत्र भारतातही मुस्लिम मानसिकतेत फरक पडलेला नाही . आणि मुस्लिम जातीवादाला प्रतिक्रिया स्वरूप हिंदू जातिवाद प्रबळ होत चालला आहे.
इस्लामी बंधुभाव
कुराणात विश्व बंधुभाव आहे वगैरे या केवळ गप्पा आहेत . (मक्का आणि मदिना पूर्वकाळ ) या काळी मदिन्याला मुसलमान अल्पसंख्य होते आणि प्रेषिताचे स्थान अजून अस्थिरच होते. अशा काळात गैर मुस्लिमांना चांगली वागणूक देण्याचे आदेश कुराणात आले तर त्यात नवल नव्हे. पुढे शक्ती वाढल्यावर कुराणात ' काफिरांशी लढा ' व त्याना अवमानित करण्यासाठी त्यांच्यावर झिजीया लादा असे म्हटले आहे. साधारणत: नव्या आदेशांनी जुने आदेश रद्द होतात असे धर्म पंडित मानतात . शाफी नावाचा अतिशय महत्वाचा आणि सन्मानीय भाष्यकार आहे त्याच्या मते " ख्रिश्चन आणि ज्यू या किताबी लोकांनाच झिजीया देऊन जिवंत राहण्याचा अधिकार आहे. ज्याना वाही (धर्मशास्त्र ) आलेले नाही (हिंदू , बौद्ध , जैन वगैरे ) त्यांच्यापुढे इस्लामचा स्वीकार करणे किंवा मृत्युला तयार होणे हे दोनच मार्ग उरतात " . (१ -१७३)
हिंदुत्ववाद (२ - १६९)
मुस्लिम समाजाच्या संकुचित धर्म वादाला आणि पिसाट जातीवादाला विरोध करणे हे काही पाप नाही ! प्रश्न असा आहे कि या विरोधाचे स्वरूप कोणते असावे ? धर्म निरपेक्ष समाज व्यवस्थेची चौकट बळकट करण्यासाठी मुस्लिमांच्या धर्म राज्याला विरोध योग्यच आहे . पण हिंदुत्व वाद्यांचा मुळात धर्म निरपेक्षतेवरच विश्वास नाही. बरे हे भांडण केवळ मुस्लिम प्रश्नासाठी नाही . हिंदुत्व वाद्यांना त्यांच्या धर्मात हस्तक्षेप सहन होत नाही . बहुतेक हिंदुत्व वादि लोक चातुर्वणाचे आणि विषमतेचेही समर्थक असतात , गोळवलकरांच्या वर्णवादी भूमिकेचे आजवर एकाही हिंदुत्व वाद्याने खंडन केलेले नाही . हिंदुच्या भल्यासाठी त्याना वेदाच्या काळाचे पुनरुज्जीवन हवे असते. या लोकांचे हिंदू समाजावर प्रेम नाही . धर्मावर आहे .मुस्लिम जातीवादाला प्रतिक्रिया स्वरूप हिंदू जातिवाद प्रबळ होत चालला आहे.
आर्य समाजाचा फारसा प्रभाव नाही आणि आहे तिथे मुळ मुद्दा वैदिक कालखंडाचे पुनरुज्जीवन आणि मुस्लीमविरोध हा आहे. पूर्वी असलेली समाजसुधारणेची चळवळ आर्य समाजातून लोप पावली आहे . हिदुत्व वाद्यातला तिसरा गट म्हणजे सावरकर. त्यातल्या त्यात सावरकरांच्या विचाराला शास्त्रीय बैठक होति. त्याना अस्पृश्यता अमान्य होती . चातुर्वर्ण मान्य नव्हते . खरेतर सावरकर नास्तिकच होते. पण त्यांचे हिंदुत्व गंमतशीर होते. भारतात सर्व धर्मियांचे राज्य होईल. प्रत्येकाला त्यात समान अधिकार राहतील असे सावरकरांनी एका ठिकाणी म्हटले होते. दुसरीकडे अफगाणी पठाणा विरुद्ध सीमेवर हिंदुसैन्य उभे राहील म्हणतात . हिंदुसैन्य हि काय भानगड आहे ? सगळ्याना समान संधी असणार्या राष्ट्रात हिन्दुसैन्य कोठून आणले ? सावरकरांच्या अस्पृश्यता निवारण वगैरे कार्यात मानवता वाद जरा कमीच आणि मुस्लिमांशी लढण्यासाठी - हिंदुना बलवान करण्यासाठी जाती तोडा - असा दृष्टीकोन अधिक दिसतो . त्याचे अनुयायी सुद्धा विज्ञान निष्ठा वगैरे भाग सोडून मुस्लिम द्वेषाचा अजेंडा राबवताना दिसतात
डूकराचे मास खात आणि वाइन पीत कधीही नमाज न पढनारे जिन्हाभक्त आणि महाराष्ट्रातील दुटप्पी सावरकरवादी ब्राह्मण वर्ग यात कमालीचे साम्य आहे . यातल्या अनेकाना गोमास व्यर्ज नाही . कुठलीच व्रतवैकल्ये नकोत पण महाराष्ट्रात जनसंघाचा आणि मुस्लिम द्वेषाचा तोच आधारस्तंभ आहे. एकीकडे विज्ञानाचे पोवाडे आणि दुसरीकडे इतिहासाचे गोडवे गात जमातवाद हि आधुनिकता दुटप्पी आहे . नव्या हिंदुत्वाचा विरोध केवळ मुस्लिमाच्या आजच्या वेडपट मागण्यांना नाही. त्याना भूतकाळातल्या मुस्लिमांचा सुड आत्ता उगवायचा आहे आणि अंध द्वेषाने इतिहासाचे चाक उलटे फिरवायचे आहे . सावरकरांनी आजच्या मराठी ब्राह्मणाना दिलेला हा दुटप्पी आधुनिकतेचा वारसा आहे. आयकल का ? आता मला कोणी ब्राह्मण द्वेष्टा म्हणेल! मग मला माझे सहकारी असलेल्या ब्राह्मणांची नावे घ्यावी लागतील ! मला त्याची सवय आहे . मुस्लिमांनी मला संघाचा , हिंदुंचा आणि ब्राह्मणांचा हस्तक आधीच ठरवले आहे ! आयकल का ? मला काहीच फरक पडत नाही !
मुस्लिम सत्यशोधक मंडळ
महात्मा फुलेंच्या बंडखोर परंपरेचा वारस म्हणून माझ्या संस्थेच्या नावात 'सत्यशोधक' असावे असे बाबा आढावांनी सुचवले. (१-१५) संस्थेच्या नावात ' मुस्लिम' असावे का ? यावर बराच खल झाला. शेवटी मी मुस्लिम सत्यशोधक मंडळ हेच नाव निश्चित केले. आयकल का ? जरी भारत एक आहे …. पण आज तरी मुस्लिम हा वेगळा समाज आहे असे आमच्या लोकाना वाटते. बाहेरच्या लोकांनी येउन आमच्या बंदिस्त समाजात बुद्धिवाद आणि आधुनिकता रुजवणे अशक्य आहे. हे काम माझ्यासारख्या एखाद्या हमीद उमर दलवाइलाच करावे लागेल . आव्हाने मोठी आहेत वेळ थोडा आहे . जमातवाद सार्या देशालाच गिळतो आहे .
मुस्लिम प्रबोधनाची वाट बिकट आहे. माझ्यावर अनेक हल्लेही झाले . काफर हि पदवी मला कायमची बहाल झालेली असल्याने ते सहाजिक आहे . मित्र शरद पवारांनी मला स्व रक्षणासाठी पिस्तुल बाळगण्याचा सल्ला दिला होता. पिस्तुल तत्वात बसत नव्हते . बाळगले नाही . (१-४५). माझा समाज माझ्यावर चिडून होता. तो त्याचा अधिकार होता . मी त्यांच्या चुका दाखवत होतो ना ! प्रत्येक कामाची किंमत द्यावी लागते ! सगळ्या मुस्लिम जगताची चिता भारतातले मुसलमान वाहत असतात . ज्यांना स्वत:चा समाज सुधारता येत नाही त्यांनी जगाची चिंता वाहू नये . मी फक्त भारताबद्दल बोललो . आणि म्हणूनच कि काय … मी त्यांच्या लेखी काफर होतो ! (१-३४ ते ३६ )
पण मी स्वत:ला मुसलमान समजतो त्यामुळे मुस्लिमांच्या अंतर्गत प्रश्नाबद्दल मी अधिक बोलणार . मुस्लिमांचे भले करण्यासाठी आमची अति धार्मिकता आणि जमातवाद बंद केला पाहिजे. मुस्लिम जातिवाद आणि मुलतत्ववाद हा इस्लाम धर्मातून निर्माण झाला आहे. मुहम्मद पैगंबरानंतर दुसरा कोणी प्रेषित होणार नाही . जे काही कुराणात आले ते फायनल ! नवे ज्ञान सब झूट (अथवा ते तर आहेच कि कुराणात !) या प्रवृत्तीमुळे इस्लाम मध्ये एक फायनालीटी आहे. कुराणातले ज्ञान ते सर्वश्रेष्ठ ज्ञान . प्रेषित मुहम्म्दाएव्ह्ढा ज्ञानी यापुढे होणे नाही ! हे इस्लामचे मुलतत्व आहे . मुस्लिमांचा विकास आणि ज्ञानाची वाढ या इस्लामी मुलतत्व वादा मुळे खुरटली आहे . मुस्लिमांच्या मागासालेपणाचे मुळ ह्या फायनालीटीच्या सिद्धांतात आहे. हा फायनालीटी सिद्धांत विज्ञान , शास्त्र , समाज व्यवस्था या सार्यांना लावला जातो . मुस्लिम अधोगतीचे हे मूळ कारण आहे . (१- १४८)
हाच फायनालीटी नियम मग काफीरांशी कसे वागावे ? जिहाद करावा का ? भारत दार उल इस्लाम आहे का ? कुराणातल्या शक्ती कमी असतानाच्या माक्कि सुरह पालन करून काफ़िरांशी तडजोड ? कि उत्तर मदिना काळातला मोहिदा करार तोडून जिहाद ? यालाही लावला जातो . हि फायनालीटी तोडली पाहिजे . त्याशिवाय मुस्लिमांचे हित नाही . भारताचे हित नाही . मानवतेचे कल्याण नाही . हा वारसा मला मला महात्मा फुलेंची चळवळ पुढे नेणार्यांकडून मिळाला . म्हणून मी सत्यशोधक आहे . मुस्लिम सत्यशोधक आहे.
आजचा उपाय : धर्मनीरपेक्षता : खरा आशय (१:१४३)
हिंदू आणि मुसलमान अशा जातीय तत्त्वावर या देशाची एकदा रक्तरंजित फाळणी झाली. एक देश इस्लामी पाक पाकिस्तान झाला. तेंव्हा दुसरा देश हा हिंदुचा हिदुस्थान झाला पाहिजे असा एक मतप्रवाह आहे. मग हिंदूचे धर्मराज्य वगैरे आपोआप संकल्पना येतात , दुसरी संकल्पना मुस्लिमांची ! कि हा देश धर्म निरपेक्ष आहे .इथे धर्म स्वातंत्र्य आहे … तवा हवा तेव्हढा आणि वाटेल तसा इस्लाम आम्ही पाळणार ! इस्लाम पाळणे हा आमचा घटना दत्त अधिकार आहे . दोन्ही संकल्पना साफ चूक आहेत .
मुस्लिमांच्या पक्षपातासाथि देश सेक्युलर नाही . या देशात १०० % हिंदू असते तरीही हा देश सेक्युलरच राहीला पाहिजे . - हमिदचा चष्मा
या देशात जी धर्मनिरपेक्षता आहे ती मुस्लिमांसाठी नाही . या देशात एकही मुस्लिम नसता तरी हा देश धर्म निरपेक्षच राहिला असता . सेक्युलरीझम म्हणजे शासन आधुनिक राहील . शासकीय निर्णय न्याय , नीती , आचरण इत्यादी आधुनीक चष्म्यातून घेतले जातील . आदत आणि इबादत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत . कुणाची पूजा करावी आणि पारमार्थिक बाबिना इबादत म्हणतात . या इबादत चे स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षतेत जरूर आहे. आदत म्हणजे इहलोक .आणी इथले नियम . किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही . सर्व हक्क शासनाकडे आहेत . या देशात फक्त हिंदूच राहिले असते तरीही हा देश सेक्युलरच राहिला असता. मनुस्मृती नाही , कुराण नाही कोणताच फायनल ! असा ग्रंथ नाही . आम्ही नव्या ज्ञानाचे मानवतेचे आणि बहुविधतेचे चाहते ……हि आमची चाहत . आणि शेवटची इच्छा ! माणसाच भल माणसांनी करायचं असत … माझे मुस्लिम समाजावर प्रेम आहे आणि या समाजाचे भले व्हावे त्यात बुद्धिवादी , उदारमतवादी आणि मानवतावादी प्रवाहांची निर्मिती व्हावी म्हणून मी परंपरांशी युद्ध लढणार आहे . आयकल का ? हे माझे धर्मयुद्ध आहे आणि एक मुसलमान म्हणून मी ते लढणार आहे. आमेन... सुम्मा आमेन !
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हमिदचा चष्मा सत्यशोधक आहे .
त्याकाळी शरद पवार राजकारणात वाहवले नव्हते . आणि आजच्या सारखे जमातवाद आणि जातीवादाचा राजकारणात उपयोग हि करत नव्हते . त्याकाळी पवार सत्य शोधक परंपरा जगत होते . पवारांनी हमीदला आणि त्याच्या बंडखोरीला अभय दिल नसत तर तो एव्हढा जगालाच नसता . त्याला किडनीचा असाध्य विकार जडला . उपचार प्रामाणिक सत्यशोधकाच्या आवाक्या बाहेर होते . पवारांनी आर्थिक सहाय केले . हमीद नास्तिक होता . त्यान मृत्युनंतराच्या इच्छेत लिहील - " हिंदू किंवा मुस्लिम अशा कोणत्याही धर्माचे विधी मी मेल्यानंतर करू नयेत . पूजा पाठ श्राद्ध - दुवा नमाजाच्या भानगडीत पडू नये . कोणत्याही धर्माचा पुरोहित बोलावू नये . माझी समाधी नको . प्रेत विजेवर जाळून टाकावे. शेवटची भाषणे किंवा स्मारक करू नये. इस्लामच्या वस्तुनिष्ठ आणि सत्यशोधकी अभ्यासासाठी एक संस्था आणि नियतकालिक काढावे " पत्राच्या प्रती शरद पवार आणि अभी शहांना पाठवल्या .
हमीदचे नातेवाईक हटून बसले . त्याना इस्लामनुसार शास्त्रशुद्ध दफन करायचं होत. या इस्लामी फायनालीटीत बंधू हुसेन दलवाई सुद्धा होते. आणि हमीदची शेवटची इच्छा नाकारून त्याला सनातनी मुस्लिम पद्धतीने दफन करायचे ठरले . शरद पवारांनी हस्तक्षेप केला. सूत्रे हाती घेतली . शेवटी हमीदची इच्छा पूर्ण झाली. आज पवार इतकी धर्म निर्पेक्ष भूमिका घेतील असे वाटत नाही . (4 - 76 to 80)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हमीद दलवाई आदर्श म्हणून डॉ नरेंद्र दाभोलकरांनी स्वत:च्या मुलाचे नाव हमीद दाभोलकर ठेवले होते . दाभोलकरासारख्या हमीदच्या हिंदू चाहत्यांना काय भोगावे लागले ? मुस्लिम सहकारी त्यापेक्षा जास्त कष्टात आहेत .
------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------
(1-122) हा संदर्भ पहिल्या संदर्भ ग्रंथातील १२२ वे पान असा वाचावा . कुराणातला संदर्भ सुरा आणि आयत नुसार वाचावा.
१) हमीद दलवाई - क्रांतिकारी विचारवंत : संपादक : शमसुद्दिन तांबोळी : २००९ : पाष्टे : डायमंड पब्लिकेशन्स
२) राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान ::हमीद दलवाई :२०१२ : सुगावा प्रकाशन
३ )मुस्लिम जातीयतेचे कारणे स्वरूप व उपाय : हमीद दलवाई :१९७८ : साधना प्रकाशन
४) हमीद : अनिल अवचट : १९७७ : नीलकंठ प्रकाशन
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे चरित्रनायक निवडले आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……
१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html
Class
उत्तर द्याहटवाThought provoking...studiful article. Thnks for sharing.
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाAbhiraamji I always had respect for you but now its transfered in to divotion to your knowledge
उत्तर द्याहटवाHats off to you sir
Islam madhe ekach kutumbat lagna hotat tyamule hindu peksha jast bikat jatiwad muslim lonkat aahe. Pakistan madhe tar jatiwad wadhatach chalala aahe.arab tyanna duyyam samajtat.
उत्तर द्याहटवाTahnks Abhiram for shareing it on your blog.. I am sharing it on facebook
उत्तर द्याहटवा