५ मार्च, २०१३

बडवा ( कडव्या हिंदूची बखर ) - भाग 2


 

बडवाबडवा भाग १ साठि लिंक : -  http://drabhiram.blogspot.in/2013/03/1.html


पूर्वसूत्र :  तशाच नजरेने राजवीरही विनोद कडे पाहत होता. फक्त त्याला आश्चर्य वाटत होतं... की हे बारकं सालं कुणाच्या जिवावर उडतय ?
त्याच वेळी पोलिस स्टेशनच्या बाहेर ....... पायर्‍यांवर ......कुणाची तरी भारदस्त पावले वाजत होती ............
इंन्स्पेक्टर राजवीर पाटील विनोद कडे खाउ का गिळू अशा नजरेने बघत होता; त्याचवेळी त्याला कोणकोणत्या कलमात लटकवता येइल याचाही विचार करत होता. पाटी उखडण्याबद्द्ल बरीच कलमे लावण्यासारखी होती. पण त्यापेक्षा पाटी उखडण्याबद्द्ल एकच कलम लावावं सरकारी मालमत्तेच्या नासधुशीचं. आणी बाकी सारी कलमं लावावी या निळ्या पत्रकाच्या केस साठी. पण एकच केस केली तर जादा लटकतील आणी जामीन पण लवकर होणार नाही. काही असो पण या भट बडव्याला सॉलिड लटकवायचा .


हिंदू म्हणे ! कावाय साल्यांचा. बिनकामाचे भांडणं लावतात आणी शिवाजीचं नाव घेतात.....भट हरामखोर ठग. राजवीरचे आजोबा नेहमी म्हणायचे आपल्या तलवारीमुळे शेंड्या वाचल्या. पण उंदराच्या शेपटीवानी वेदोक्तात अडकल्या. शाहू महाराजांना वेदोक्त संस्कार करणार नाही म्हणणार्यांच्या अवलादींबद्द्ल एक घ्रुणाच होती राजवीरच्या मनात. त्यातही तो 'भीमरूपी महारूद्रा' वाला हिंदुत्ववादी असेल तर फारच लबाड. कितीही असले भ्रष्ट| तरी म्हणे आम्हीच श्रेष्ठ|| हिंदू मुस्लिम भांडणाच रा़जकारण करणारे भट पिंजर्‍यात पाठवायला हात शिवशिवत त्याचे. पण त्याचे शिवशिवणारे हात यावेळी तरी त्याला बहुतेक खिशातच ठेवावे लागणार होते.


त्याचा बॉस इंन्स्पेक्टर बनगोंडा खुर्चीतून उठून उभा राहिला होता. कारण जिन्यावर वाजणारी पावलं पोलिस स्टेशनच्या आत पोचली होती. त्या पावलांना आदर देण्यासाठी बनगोंडा ला उठणं भागच होतं.

 निष्णात कायदेपंडीत, बेळगावातल्या १८ हॉटेलांचे मालक, आर्य समाजाचे प्रमुख, माजी आमदार अ‍ॅड्व्हकेट एम के शिंदे. यावेळी फक्त ४३ मतांनी पडले ते, पण बेळगावची महापालिका त्यांच्याच खिशात होती. राजवीर त्याना ओळखत न्हवता..... त्याला जॉइन होउन महीनाही उलटला न्हवता म्हणून. पण अ‍ॅड. शींदेंच्या एकूण भारदस्त व्यक्तिमत्वाने तोही प्रभावित झाला होता. साडे सहा फूट उंची, अडीच फूट रुंद खांदे, कडक स्टार्च केलेला पांढरा झब्बा कूडता आणी त्यांच्या विस्तीर्ण भालप्रदेशावर शोभणारे केशरी अष्टगंध. हे सगळं कमी होतं म्हणून की काय, त्यांनी हल्लीच (त्यांच्या लाडक्या एकुलत्या कन्यारत्नाला आवडत नसे तरीही) खांद्यावर भगवी शाल वागवायला आरंभ केला होता.


ताड ताड पावलं टाकत ते आत आले आणी राजवीरकडे पहात म्हणाले हे कोण हे ? नवीन का? मग त्यानी बनगोंडाकडे पहात विचारलं,किसने मारा मेरे छोकरेको? क्यों मारा ? बनगोंडाने मौन धारण केले होते. पण तरा तरा पुढे होत राजवीर म्हणाला. "टीपू सुलतान नगरची पाटी उखडत होते,कुर्हाड  घेउन"

अ‍ॅड. शिंदेंच्या चेहर्‍यावर समाधानाची लकेर दिसली. हवालदाराने सरकवलेल्या खुर्चीवर बसत बसत त्यांनी आपला उजवा हात बनगोंडाच्या टेबलवर ठेवला. आणी पेपरवेटशी चाळा सुरू केला. पण विनोदला कळत होतं; शिंदे सर अत्ता रिलॅक्स दिसत असले तरी ते केवळ त्यांना अजून   पत्रकाच्या केस बद्द्ल कळलेले नाही म्हणून. त्या केसचा संबध फक्त शिंदे सरांशीच येणार न्हवता तर त्यांच्या मुलीशी - नियती शिंदेशीही हा विषय निगडीत होता. पेपरवेट हाताने गोल फिरवत - फिरवत आपल्या नेहमीच्या खर्ज्या आवाजात, शिंदे म्हणाले " कोण म्हणतं टिपू सुलतान नगर ? त्याच नाव बदललेलं आहे. ....आजपासून..... महर्षी दयानंद सरस्वती नगर असं त्याचं नामकरण झालेलं आहे. महापालिकेने नामकरणाचा ठराव काल केला.

 त्या भागातल्या नगरसेवकाने पाटी बदलण्यासाठी या पोराना कंत्राट दिलेलं होतं. त्यानुसार ही पोरं काल महापालिकेच्या कंत्राटावर काम करत होती. म्युन्सिपाल्टी के काँट्रॅक्टर समझे बन्गोंडा ? "

चक्क खोटं बोलत होते अ‍ॅड्व्हकेट शिंदे. ते साफ खोटं बोलतायत हे इंन्सपेक्टर बनगोंडाला ही कळत होतं आणि राजवीरलाही. पण अशी कागदपत्रं महापालिकेतून २ तासात बनवून आणणं हा शींदेंच्या डाव्या हातचा मळ होता. महापालिकेचे प्रशासन आणि नगरसेवक शिंदेनी सांगितलं तर रस्त्यात नागडा  भांगडाही खेळायला कमी करणार नाहीत. हे बनगोंडा पुरता जाणून होता.

त्यांच्या ताकदीची कल्पना न्हवती ती राजवीरला.

" मग सोडताय ना पोराना ? " शिंदेंचा करडा आवाज घुमला.
"नाही साहेब" राजवीरचं उत्तर हजर होतं. " पत्रकाची सिरीयस केस आहे त्यांच्यावर"
"कोणतं पत्रक ?" शिंदेनी चिंतायुक्त स्वरात विचारलं.
"ते कोर्टात हजर केलं जाईल" राजवीर.
"निळ्या रंगाचं का ? " शिंदेंच्या आवाजात मार्दव निर्माण झालं होतं.
" मी सांगायला बांधील नाही" राजवीर उत्तरला.

अ‍ॅड्व्हकेट मल्हारराव केशवराव शिंदे. मनात कितीही खळबळ उडालेली असली तरी चेहर्यावर दिसायचं नाही त्यांच्या. त्यांनी विनोदकडे प्रश्नार्थक कटाक्ष टाकला. त्यानं मानेनंच हो म्हटलं आणि आणि क्रुष्णा जाधवकडे पहात मान उडवली.

शिंदे काय समजायचं ते समजले. "पत्रक कुणाकडे मिळालं ?" त्यांनी इंन्स्पेक्टर राजवीर कडे पाहत विचारलं. " त्याला ठेवा उरलेल्याला सोडा."

" शक्य नाही. पत्रक आरोपी क्र २ कडे मिळालं आणी त्यावर आरोपी क्र १ ची सही आहे." एफ आय आर  लिहिण्यासाठी सरसावत राजवीर म्हणाला.

" आरोपी ? " आता मात्र शिंदेचा पारा चढला होता. असल्या फालतू इंन्सपेक्टराशी वावदूकी करायची सवय नाही मला. बन्गोंड्या अभि के अभी छोडो दो इसे. नही तो म्युन्सिपाल्टी के काँट्रॅक्टर पर जानलेवा हमला करनेका केस लगाता हू तुझपर. कल सुबह ५ हजार कार्यकर्ता आपसे मिलने... मोर्चा लेकर आयेंगे वो अलग. और बाकी बात मै कमिश्नर साब से कर लूंगा.

*********************************************************************************

शिंदे आणि विनोद पोलिस स्टेशनच्या पायर्‍या उतरत होते तेंव्हा पहाटेचे साडेचार वाजले होते. पत्रकाची केस फाइल झाली होती. क्रिश्ना पोलिसांच्याच ताब्यात होता. विनोदला सोडला होता. पण तारखेला कोर्टात हजेरी लावायची होती. जाता जाता राजवीर ला " फिर मिलेंगे" म्हणायला शिंदे विसरले न्हवते. राजवीरनही बिनदिक्कत उत्तर दिलं होतं " शौकसे ". पण त्यावेळी राजवीरला शिंदेंच्या ताकदीची कल्पना न्हवती आणी शिंदेनाही राजवीरच्या  कडक पणाचा  अंदाज आला न्हवता.
ड्रायव्हरने मर्सडीझचं दार उघडलं. आत बसता बसता शिंदेंनी विनोदला विचारलं " ही पाटीची भानगड काय आहे ? "

"सर मी आणि किश्या टिपू सुल्तान नगर च्या दाराशी उभे होतो. बाकीची पोरं पोचायची होती. किश्याच्या हातात कुर्हाड  होती. माझ्याकडे पण रामपुरी होता पण पोलिस बघून मी तो त्या पाटीमागे लपवत होतो.     माझे हात पाटीच्या मागे आणी किश्याच्या हातातली कुर्हाड  बघून -  त्या माकड बनगोंड्याला वाटलं मी पाटीच उखडतोय ! तसली कामं बालवाडीत करायचो सर!
 पण पडत्या फळाची आज्ञा प्रमाण मानून मी पण बोल्लो बन्गोंड्याला चल उखड्तो पाटी...... काय उपटणार तू ?

मग भरपूर आरडाओरडा झाला. आपल्या तिथे येणार्या कार्यक्रर्त्यांनी तो ऐकला. आणी ते तुम्हाला कळवतीलच हे माहित असल्याने मी आणी किश्या हसत होतो. त्यावर पण उखडल बेनं आणी वाइट धुतला हो....." विनोद.


शिंदे दरवाजा लावताना म्हणाले " चल आपण खरं कशासाठी जमणार होतो....ते तर समजलं नाही ना पोलिसाना ... बरं झालं. जाउन झोप आता. संध्याकाळी ये वाड्यावर बैठकीसाठी   . ती पत्रकाची केस बघू आपण .फार लागलं नाही ना ?"


"देश आणी धर्मासाठी काय पण सर ! " असं म्हणून विनोदने सरांना नमस्कार केला. रूमकडे जाताना तो विचार करत होता, - सराना वाटतंय तितकी   केस सोपी जाणारी नाही. कमित कमी आपल्याला आणी नियतीला तर नाहीच नाही. पण अती ताण आला की तो नियतीचा ,सरांच्या मुलीचा विचार करत असे. आणी सरांनी ''५५५'' साठी वाड्यावर बोलावलंय तेव्हा हजारात एक शक्यता अशीही होती की आपण   केस ला काही वेगळे वळण देउ शकू. असा पॉझीटिव्ह विचार करत करत विनोद त्याच्या रूम कडे चालत होता.


*********************************************************************************शिंदेच्या पाया पडताना विनोद म्हणाला होता " देश आणे धर्मासाठी काय पण सर! " गाडीतून वाड्याकडे जाता जाता, शिंदे विनोदचाच विचार करत होते. त्यांचा मानसपुत्रच बनला होता तो. विनोदच्या मुंबईच्या भानगडीनंतर महाराष्ट्रात रहाण अवघडच झालं होतं त्याचं, . आपण तेव्हढ्यासाठी त्याला इथं बेळगावात घेउन आलो. मुंबईत पक्षाच्या अधिवेशनात पहिल्यांदा भेटला तेंव्हा सामान्य कार्यकर्ता होता तो. पण इथे आल्यावर पहाता पहाता कार्यकर्त्यांचा अनभिषिक्त हृदयसम्राट बनून गेला, काय भाषण ठोकतो लेकाचा ! पब्लीक ला नुस्त वेड लावतो वेड. हाच बनू शकतो आपला राजकीय वारसदार. पोरीचं लग्न एकदाचं उरकून टाकलं की कौटुंबीक जवाबदारी संपलीच आपली. मग आपली सारी संपत्ती, सारी संचित पुण्यायी, सारा वेळ........ फक्त विनोदला राष्ट्रीय रा़जकारणात प्रस्थापित करण्यासाठीच वापरायचा.

हो बेळगावातल्या विहिरीतला बेडूक बनवायचा नाही त्याला.गल्ली नाही दिल्ली.... काय हिंदीवर कमांड आहे बेट्याची ! आपणही लहान असताना असेच होतो. हिंदू एकता आंदोलन गा़जलं होतं ते फक्त आपल्या भाषणांमुळेच. पण कोणी रा़जकारणातला गॉडफादर न्हवता म्हणून....., नाहितर कमीत कमी भारताचा गृहमंत्री झालो असतो आज. आपला समाज नेता ड्रीव्हन आहे. चांगला कणखर नेता पाहिजे राष्ट्रीय पातळीवर तरच काही भविष्य आहे या देशाला. नाहीतर चीन पाकिस्तान आणी इथलेच गद्दार हिरवे साप .... वाट लावतील वाट.

बरोबर एक वर्षाने लोकसभेची निवडणूक आहे. तोपर्यंत व्यवस्थित लाँच झाला पाहिजे विनोद. आपल्याला कुणी गॉडफादर मिळाला नाही पण विनोदचे गॉडफादर बनू आपण. काय मस्त प्लान आहे आपला....... पुर्या बेळगावची  "ती"   ठसठसती जखम.... आपल्या एका कामगिरीने मलम लावणार विनोद.... फक्त ६ महिने गायब करायचा विनोद ला त्यानंतर. आणी परत आणायचा तो हत्तीवरच्या मिरवणुकीतूनच....आणी मग थेट खासदारकी ला उभा करायचा. पक्षातल्या ओळखी कामी येणार कधी ? आणि ' त्या ' कामगिरीच्या बळावर सहज निवडून ही यील तो.

कामगिरीचं सगळ कसं व्यवस्थित जमवून आणल होत आपण. पण ऐन वेळी तो बनगोंड्या तडमडला. पाटीची नस्ती भानगड करून ठेवली. त्यात त्या येड्झव्या किश्या ने पत्रक नेलं ! एव्हढ्या महत्वाच्या कामगिरीवर जातान बरोबर पत्रक काय घेउन जातो ? बावळट ! असो पण दाबू सहज केसेस. विनोदची केस लवकर निल करून घ्यायला पाहिजे. कामगिरी नंतर ६ महिने गायब रहावं लागणार त्याला... त्यावेळी केस चालू असेल तर ? ... तर तारखेला स्टेटस फरार दिसेल त्याचं.... नकोच ... त्यापेक्षा केस निल होइस्तवर पुढे ढकलावी कामगिरी. फालतूत आठवडा जाइल फुकट..... विचार करता करता ते ड्रायव्हरला म्हणाले. ती सेतुनिर्माण ची सीडी लाव रे. विनोदचीच कविता होती ती..त्याच्याच आवाजातली..पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात वाचली होती हि कविता त्यानी.... वेड लागलं होतं पबलिकला. ..... ही सगळी कामं नियती बघायची. पक्षाच्या आय. टी. विभागाची प्रमुखच होती ती. भाषणांच्या सीड्या बनवणं, यु ट्युब वर अपलोड करण वगैरे. तिला लांब नाही द्यायची फार.....बेळगावातलंच एखादं चांगलं खानदानी मराठ्याच घर शोधलं पाहिजे. आठवडाभर कामगिरी पुढे ढकलाविच लागणार आहे तर हा वेळ तिच्यासाठी स्थळं शोढण्यात सत्कारणी लावू. नंतरच्या भानगडींमधे वेळ नाही मिळायचा. त्यांची विचारमालिका तुटली ती सीडी च्या आवाजाने ...


सेतुनिर्माण....
स्वर्णीम पृश्ठ गतकालके
पढतेही कंपित हृदय, प्रस्फूर्त बाहुद्वय |
जो नस नस मे थी दौडी
बि़जली हमारी रगोंमे
हतवीर्य आज वह विद्युत
जीवन हुवा श्वानवत, या फूटी अपनी किस्मत|
किस्मत पे न रोते थे
खुद भविष्य अपना लिखते थे,
हस्तरेखाओंकी दिशा, मुट्ठी से बदलते थे |
ना कायरोंके...............
" पॉज कर पॉज कर" शिंदे म्हणाले.

शिंदेंचा मोबाइल वाजत होता. " बोला चौगुले साहेब." शिंदेंचे चौगुले नावाचे मामेभाउ बेळगाव पोलिसात एसीपी होते त्यांचा फोन होता. त्यांना टिपू सुल्तान नगर पोलिस चौकीत झालेला प्रकार कळला होता. " शिंदे साहेब... एवढ मनावर नका हो घेउ.. तो राजवीर पाटील आपलाच पोरगा आहे. पाहुण्यातला. आपल्या शरूताइंची मुलगी दिलीय त्याच्या भावाला.....".

कसल्यातरी विचाराने खुश होत शिंदे म्हणाले, " बर - बर.. आज त्याला घेउन ये जेवायला वाड्यावर............ नको नको संध्याकाळी नको. संध्याकाळी ५५५ चा कार्यक्रम आहे. दुपारीच आण"
आणी आनंदात शीळ घालत ड्रायव्हर ला म्हणाले " हं प्ले कर सीडी"

हस्तरेखाओंकी दिशा,
मुट्ठी से बदलते थे
ना कायरोंके बच्चे
वह चट्टानो से कट्टे मरहट्टे ही सच्चे |
चालक शिवशाही के,
गोपाल वे मुकुंद के
या खालसे गोविंद के,वानर हनुमंत के |
शिवाजी उनका राजा,राष्ट्र्धर्म रक्षण वादा |
परत एकदा पॉज कर. फोन परत वाजला होता.   नंबर बघून त्यांनी तो कट केला.

*********************************************************************************


पहाटेचे पाच वाजत आले होते. इकडे विनोद चालत चालत रूम पर्यंत पोचला होता. त्याला झोप अनावर झाली होती. त्यानं धाडकन् पलंगावर अंग टाकलं.  संध्याकाळि शिंदे सरांबरोबर बैठकीला बसायचं होत . त्या  वेळेला शिंदे सरांपुढे आपले मुद्दे कसे मांडायचे याचा विचार करायचा होता त्याला. पण   अतिताणानी झोप लागली आणी चित्र - विचित्र स्वप्ने पडू लागली. - नियतीची स्वप्ने.@@@@@@@


चांगलंच फटफटलं होतं तेंव्हा. समोरच्या खिडकीतून प्रकाश येत होता. विनोदच्या डोळ्यावर आदळत होता. डोळे गच्च मिटलेले असले आणी समोर प्रकाश असेल तर वेगवेगळे रंग दिसू लागतात. सोनेरी - गुलाबी - लालसर - केशरी. रंगांची वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. संथ पाण्यात दगड टाकल्यावर निर्माण होतात तशी. वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. त्या पाण्यात विनोद आपलं प्रतिबिंब पहायचा प्रयत्न करतोय. पण त्याला त्याचा चेहरा त्यात दिसत नाही.कारण त्या वर्तुळात फेर धरलाय नियतीनं. तिच्या अरंगेत्रम ला धरला होता तसाच. भरत नाट्याचे नवरस नवरंग उधळले जातायत.तिच्या बोटांच्या हालचालीत, डोळ्यांच्या विभ्रमात, हातांनी अवकाशात काढलेल्या रेखात एक ग्रेस आहे. तिच्या कमरेवर हात ठेवण्यात, नाराज झाली की ओठ मुडपण्यात, हसताना जमिनीकडे बघण्यात एक नजाकत आहे. तिच्या नेत्रकटाक्षात, तिनं विनोदला दिलेल्या आव्हानात, तिच्या पहिल्या चुंबनात बिजलीचा झटका आहे.

जो नस नस मे थी दौडी
बि़जली हमारी रगोंमे
हतवीर्य आज वह विद्युत
हिजड्यानो .........

"हिजड्यानो" तो म्हातारा ब्राह्मण ओरडला. अंग घामानी थबथबलंय त्याचं. त्याचा उजवा तुटका हात उंचावून पुन्हा किंचाळतो " हिंदूत एकपण मर्द पोरगा शिल्लक राहिला नाही काय ? " सूड घ्या. सूड. हाताला हात, पायाला पाय, डोळ्याला डोळा. मुली ला मुलगी. बदला घ्या बदला. अंगात आल्यासारखा तो घुमू लागतो. अर्धनारीनटेश्वरासारखा नाचू लागतो, गोल ,गोल. वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. बर्फाचा खडा स्कॉच मधे टाकल्यावर निर्माण होतायत. " विनोद ही कामगिरी तुलाच पार पाडावी लागेल. बेळगावची ठसठसणारी जखम तूच सांधू शकतोस." शिंदे सरांचा ग्लास बोलतोय. बर्फ वितळतोय. स्कॉच चा रंग डायल्युट होतोय. चॉकलेटी - पिवळा - फि़क्कट - पांढरा. वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. विनोद डोळे चोळत ऊठला. तेंव्हा दुपारचे तीन वाजले होते.

*********************************************************************************


आज सकाळी  शिंदे सरानी राजारामशास्त्री भागवताना घरी एका खास कामासाठी बोलावलं होतं. बेळगावातील सुप्रसिद्ध नटेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी आणी शिंदेंचे अध्यात्मिक गुरु. तेजस्वी गोरा वर्ण, गर्द निळ्या रंगाच सोवळं आणी त्यांच्या उघड्याबंब शरीरावर शोभणारं जानवं. शास्त्रींनी वाड्याचा उंबरठा ओलांडताच शिंदेंनी चरणस्पर्श केला. राजारामशास्त्रींनी डाव्या हातानेच आशिर्वाद दिला. हो कारण उजवा हात न्हवताच त्यांना.
मोहसीननी म्हणजेच उस्मान च्या भावानी कुर्हाडीच्या एका घावात त्यांचा उजवा हात मनगटापासून ऊडवला होता. त्यांची १९ वर्षाची कोवळी सुंदर पोरगी. सुनेत्रा तिचं नाव. घराण्याला बट्टा लावत आणी शास्त्रीजिंच्या संस्कारावर बोळा फिरवीत उस्मान च्या प्रेमात पडली. कोवळी नासमज पोर. एका कत्तलखाना चालवणार्या पोरात तिला काय दिसलं कुणास ठाउक ? शास्त्रींनी परोपरीनं समजावलं तिला. शिंदेही म्हणाले " पोरी असा वाह्यात पणा करू नकोस. तु म्हणशील त्या हिंदू मुलाशी लग्न लावून देतो तुझं. माझी सारी संपत्तीही त्याच्या नावे करतो. तू आणी नियती दोनीही माझ्या मुलीच."

"पण काका मी वचन दिलय उस्मान ला. माझ मन अर्पण केलंय त्याला." सुनेत्रा.
शेवटी ती अजिबातच ऐकत नाही म्हटल्यावर तिला घरातच कोंडून ठेवण्याचा सल्ला दिला होता त्यांनी शास्त्रींना.


गेल्या वर्षीच्या शिवरात्रीला रात्री २ वाजता उस्मान शास्त्रींच्या घरात घुसला. बरोबर त्याचे पंचवीस भाउबंद होते. त्यांच्या हातात कुर्हाडी, कुदळी आणी तलवारी होत्या. सरळ उचलून खांद्यावर टाकलं त्यानी सुनेत्राला. शास्त्रीजी तिचा हात धरून ओढत होते त्याचवेळीच. खाट्कन कुर्हाड मारली मोहसीन नं.

शास्त्रींच्या तुटक्या हाताकडे बघवत नसे शिंदेंना. त्यांना बसायला खुर्ची देत शिंदे म्हणाले. शास्त्रीबुवा पत्रिका जुळवायचीय नियतीची. आमच्या तोलामोलाचं स्थळ आहे. पदरही जुळलाय. शिंदेनी दिलेली पत्रिका उचलताना शास्त्रींनी उपरण्याने कपाळावरचा घाम पुसला.

सर्रकन काटा आला शिंदेंच्या अंगावर. त्यांच्या डोळ्यांसमोर त्या वर्षभरापूर्वीच्या बैठ्कीचा प्रसंग उभा राहिला. बेळगावातल्या तमाम हिंदुत्ववाद्यांची बैठक भरली होती. घामाने डबडबले होते शास्त्रीजी तेंव्हा. आणी उपरण्याचा पदर पसरून सूडाची भीक मागत होते. परिस्थितीच तशी होती. बापाचा हात तुटूनही सुनेत्राने उस्मान सय्यद बरोबरच रहाण्याचा निर्णय घेतला होता. कायद्याने आता सज्ञान होती ना ती. हात तोडल्याबद्द्ल मोहसीन ला फक्त एक वर्षाची सजा सुनावली गेली. पण सय्यद पतिपत्नी सुखाने नांदत होते, गावातल्या सर्वात जुन्या मंदिराच्या मुख्य पुजार्याची ही दशा पाहून सारा बेळगाव हळ्हळला होता. हिंदुत्ववाद्यांच्या हृदयात खोल जखम झाली होती. काय करायचं ? ते ठरवायला बैठक भरली होती. किश्या म्हटला सर्व सय्यदांचे हात तोडू. विनोद म्हटला सय्यद रहातात ते अख्ख टीपू सुल्तान नगर जाळून टाकू. "मी सांगतो उपाय" शास्त्रीजी म्हणाले, शात्रीजी बोलायला उभे राहिले तेंव्हा त्यांच्या डोळ्यातून अंगार बरसत होता. अंग घामाने डबडबले होते. ते जी कामगिरी उपाय म्हणून सांगणार होते. त्यामुळे सारेच आवाक झाले होते. बेळगावातल्या एकाही हिंदूने असे क्रुत्य याआधी केलेले न्हवते." सूड घ्या. सूड. हाताला हात, पायाला पाय, डोळ्याला डोळा. मुली ला मुलगी. बदला घ्या बदला." संतापाने थरथरत शास्त्रीजी म्हणाले.

कोयत्याने खीमा बनवतो सगळ्या सय्यदांचा, दात ओठ चावत कृष्णा उत्तरला. " आपली तयारी आहे २० वर्ष तुरुंगात खडी फोडायची. पण धर्माला डाग लागू देणार नाही. "

त्याचा हात ओढत विनोद म्हणाला, " शांत व्हा रे सारे... थंड डोक्यानी काम घ्या. पोरगी तर हातची गेली शास्त्रीजिंच्या. तिला विधवा करून काय मिळवणार आपण?.. थंड म्हणजे षंढ न्हवे. सूड हवाच. पण तो विचार्पूर्वक, योजनाबद्ध आणि त्यांच्या जमातील गारद करणारा असला पाहिजे. ते सय्यद राहतात ते टीपू सुलतान नगर जाळून टाकू. बेघर करू भडव्यांना. हाकलून देउ इथून. येत्या माघी अमावस्येला ही कामगिरी पार पाडू. सरांच्या मतदारसंघात हिरवी कीड नकोच ही. त्यांच्या फुगीर संख्येनेच पडलो आपण मागच्यावेळी. फक्त ४३ मतांनी...".


"तुम्ही येउन जाउन राजकारणच करणार ! " साने बोलला. सदाशिव साने.(स.सा.) १२ इंच छातीचा, २ दात पुढे आलेला सनातन प्रभातचा बेळ्गाव आव्रुत्ती संपादक. त्याच्या बावळट थोबाडावर सणसणीत ठोसा मारून - त्याला डेंटल ट्रीट्मेंट द्यायचा मोह - फार फार वेळा आवरला होता विनोदनं." राजकारण हा तुझ्यासारख्या सशांचा विषय नाही भाड्या. तुम्ही जेंव्हा यज्ञात तूप ओतायच्या पळीची लांबी किती असावी ह्यावर परिसंवाद रंगवत होतात, तेंव्हा आल्लाउद्दीन खिलजि नालंदा जाळत होता." इती विनोद.


सदाशिव साने आतून तंतरला होता पण चाचरत बोलला " धर्माचरण नाही म्हणून मार खातो आपण. कामगिरीला अमावस्येचे मुहूर्त काढणारे... विनोद साहेब -- शिंदे सरांबरोबर स्कॉच पिणार. शिंदेंच्या मुलीबरोबर सुनेत्रा स्टेजवर नाचणार. संस्कार नाहीत धर्माचरण नाही इथे .अमीर खान आणि सलमान खान चे    सिनेमे बघणार्या पोरी पळणारच की मुसलमानांबरोबर.. ..."

शिंदेंची डावी भुवई वर चढली आणी ती खाली होण्याआधी विनोदच्या उजव्या हाताचा ठोसा सशाच्या थोबाडावर बसला होता. कोलमडलंच ते. त्याला पुरता ठेचायला क्रूष्णा धावला.


शिंदेनी हाताच्या इशार्याने त्याला थांबवलं, आणी शांतपणे म्हणाले " राजकारण ही शिवी नाही साने. हिंदूचा राजकीय जय म्हणजेच हिंदुत्व. आणी सुनेत्रा ही बेळगावातली एकच केस नाही.... इंजिनिअरिंग कॉले़जच्या १० -१२ पोरींना फूस लावून पळवलय लांड्यांनी. लव्ह जिहाद म्हणतात ते त्याला. त्यासाठी बकायदा मशीदीतून प्रोत्साहन दिलं जात, आणी मक्केशा ट्रस्ट मार्फत पैसा पुरवला जातो.लोकसंख्या वाढवून राजकीय ताकद वाढवण्याचा डाव आहे हा. त्यांच आक्रमण राजकीय अन धार्मिक आहे. त्यामुळे त्याला उत्तरही तसंच आहे. असलं पाहिजे. यापुढे बैठ़कीला तुला आमंत्रण नाही. क्रिष्णा बाहेर काढ याला.... "
मान खाली घालून साने निघाला; जाताना पुटपुटला " संस्कार नाही.... धर्माचरण नाही... सत्संग नाही .. सनातन धर्मशास्त्राचा मुहूर्त...."


तेव्हढ्यात विनोद ने मागुन आवाज दिला " ए सशा अमावस्येच्या अंधार्या रात्री लढाया मारून स्वराज्य उभारलं महाराजानी.. तेंव्हाही तुझ्यासारखे भुस्कट ज्योतीशी बकतच होते .. हो चालता... .आणी ऐका सर्वानी ....टीपू सुल्तान नगर पेटवा .. ह्या माघी अमावस्येला अंधाराचा फायदा घेत तिथे घुसायचं.. शिमगा करायचा.... आणी येत्या शिवरात्रीला विजयादशमी साजरी करायची. देव मस्तकीं धरावा | अवघा हलकल्लोळ करावा | मुलुख बडवा कां बडवावा की........ जाळावा | धर्मसंस्थापनेसाठी || "


शास्त्रीजी कडाडले. " काय फरक पडेल त्याने ? त्यांनी माझी पोरगी नुस्ती पळवली नाही. तिला बाटवली. धर्मानी... शरीरानी... आणी मनानी पण. बापाचा हात तोड्णार्या सय्यदांच्या घरात सुखानी नांदतीय अवदसा. जशास - तसे. तरच तो खरा सूड. धटासी आणावा धट | उत्धटासी पाहिजे उत्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी" || सयदांच्या घरची पोरगी पळवा. तिला हिंदू करा. लग्न करून नांदवा.. आणी ती फक्त सुरवात असू द्या... मी देतो प्रोत्साहन हिंदू तरूणांना... प्रत्यकाने मुस्लीम पोरींशी लग्न करून धर्म वाढवा.. १ महिन्यात घाबरून शरण येतील हरामखोर सय्यद. भित्री जमातआहे त्यांची. एकही हिंदू पोरगी बाट्णार नाही त्यापुढे......."

 एव्हाना शिंदेंतला मुत्सद्दी राजकारणी जागा झाला होता आणी याची राजकीय गणीते बांधू लागला होता. हे क्रुत्य करणारा तरूण -- शास्त्रींसाठी हळहळणार्या -- सार्या बेळगावचा हिरो बनणार हे निश्चित होतं.
पण आग लावण्यासाठी सळसणारे कार्यकर्ते, अग्निप्रदक्षिणेसाठी मात्र तयार होत न्हवते. कारण उघड होतं - जात बुडण्याची भीती! जातीशिवाय हिंदू नसतोच! किंवा जातीचा कुळाचार त्यातली कर्मकांडे, सण वार हाच हिंदूचा धर्म असतो. आपण मुसलमानिणीशी लग्न केलं तर.. तर, पै पाव्हणे वाळीतच टाकतील की! आपल्या बहिणींशी लग्न कोण करेल मग ? परंपरेचा अभिमान बाळगणार्यांना ती परंपराच हतबल बनवत होती. षंढ बनवत होती. धर्माभिमान्यांना धर्मच पंगू बनवत होता.ओळखलं ते शिंदेंनी. विनोदच्याही लक्षात आलं . मगाशी डरकाळ्या फोडणारा वाघ गाय झाला होता. दबक्या आवाजात तो म्हणाला, " शास्त्रीजी पण त्या उस्मान च्या बहिणीशी सूत नाही जमलेलं आपल्यापैकी कुणाचं ."

"हिजड्यानो" शास्त्री ओरडले. अंग घामानी थबथबलंवतं त्याचं. त्यांचा उजवा तुटका हात उंचावून पुन्हा किंचाळले " हिंदूत एकपण मर्द पोरगा शिल्लक राहिला नाही काय ? काय लागतं पोरगी पटवायला ? जे उस्मान कडे आहे आणी तुमच्याकडे नाही ते ? कळू तरी द्या मला. आणी नसेलच पुरुषार्थ तुमच्यात तर सांगतो बेळगावातल्या सगळ्या मुलींना... जा सय्यदांकडे नाहितर शेखांकडे नांदायला. आहे काय त्या उस्मान कडे ? जरासा बरा चेहरा आणी गुलुगुलु भाषा"

शांतता. फुलपाखराचा पंख फड्फड्ला असता तरी कानठळ्या बसल्या असत्या अशी शांतता.
कोणीच पूढे येत नाही असे पाहून शिंदे दुखावले. म्हणाले " काम होइल शास्त्रीजी.. फक्त कोणीतरी सुरवात केली पाहिजे. एकदा सुरवात झाली की प्रथाच पाडू बेळगावात... अशा लग्नांची . मक्केशा ट्र्स्ट्च्या आयला ! मी दीन आर्थीक मदत आपल्या पोराना."

जातीपातीपलीकडे पोचलेला आणी चळवळीसाठी घर दार सोडलेला एक कार्यकर्ता होता त्यांच्याकडे. त्यांच्या त्या मानसपुत्राला खासदारकीसाठी लाँच करायची हीच नामी संधी होती...तो दिसायलाही उजवा होता. बोलायलाही चतुर होता. त्यांनी आपली नजर विनोद कडे वळवली. त्यांच्या नजरेत आशा होती , विश्वास होता आणी आज्ञा होती.


त्यावेळी नाही म्हणायची छाती न्हवती विनोद्ची. आणी त्याचं आणी नियतीचं प्रेम प्रकरण सरांना सांगायची ती वेळ ही न्हवती. तो मानेनेच हो म्हणाला. शिंदेंचा उर दाटला.

*********************************************************************************


झर्रकन सारा प्रसंग अ‍ॅडवकेट शींदेंच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. आज शास्त्रीजींचा तुटका हात पाहून सारं पुन्हा आठवलं. आज नियतीला स्थळ म्हणून दाखवायचं होतं त्यासाठीच शास्त्रीजींना बोलावल होत. भावी जावयशी आजच नीट ओळख होणार होती. पहिल्या भेटीत उद्दाम वाटला होता तो शींदेना. पण पदर जुळलेलं खानदानी ९६ कुळी मराठ्याच घर. शिंदेना स्वत:चं तारुण्य आठवलं. उद्दाम बेदरकार स्वभाव. उंच हँडसम पर्सनॅलिटी. समोरची बाजू कितीही मोठी असली तरी - भीक घालणार नाही. अशी ताठ तत्वनिष्ठा. इंन्स्पे़क्टर राजवीर पाटील.
राजवीर आणी एसीपी चौगुले काही मिनिटातच पोचणार होते. आपल्याला चौगुले साहेब कुठे नेतायत ते राजवीरला माहित न्हवतं.
सच्या सत्यशोधकी परंपरेतला राजवीर शास्त्री आणी पत्रिका पाहून काय प्रतिक्रिया देइल ? याचाही अंदाज शिंदेनाही न्हवता.

*********************************************************************************

नियतीने पायात घुंगरू बांधले. ता तै तम धित तै तम. भारतीय शास्त्रीय न्रुत्यप्रकार पाच.
प्रत्येक पंचतत्वाच्या नावाने एकेक. त्यातले भरतनाट्यम म्हणजे अग्निनृत्य.
ता तै तम धित तै तम. सूत्रल अदवू चा पदन्यास सुरू झाला.
त्यात चार हस्तमुद्रा वापरतात.
 पाची बोटे एकत्र असलेली पताका,

दुसरी अलपद्म् ,

तिसरी अंगठा आणी शेजारच्या दोन बोटांनी बनवलेले हरणाचे तोंड - कटकमुख

आणी चौथी मुद्रा शिखरमुद्रा .

 ता तै तम धित तै तम

. नियतीने नमस्कारम करून दोन्ही हाताच्या पताका उंचावल्या.
 दोन्ही पताका डोक्यावर इकडून तिकडे फिरू लागल्या

. झेंडे.. झेंडे ...झेंडे... झेंडे. ता तै तम धित तै तम.

मग नियतीच्या उजव्या हाताच्या पताकेचे उमललेल्या कमळात - अलपद्मात रूपांतर झाले. चारी बोटे बाहेर ताणलेली अन करंगळी मनगटाजवळ आलेली. अलपद्म डोलून डोलून विचारत होते.

कोणाचे झेंडे ? कोणाचे झेंडे ? ता तै तम धित तै तम॥

नियतीच्या दोन्ही हातांची कमळे डोक्यावर उधळली गेली. पावसाच्या सरींप्रमाणे कमळे अंगावर कोसळू लागली. त्या लाडीक सुखाने, सुवासाने नियतीचा चेहरा सुखाचे प्रसन्न भाव दाखवत होता.

 ता तै तम धित तै तम.

 पितृप्रेमाचा जास्वंद, प्रियकराचा मोगरा, फुलेच फुले होती माझ्या आयुष्यात. पण मधेच उपटले हे - दोन्ही हाताच्या पताका आभाळात फेकत नियतीने दाखवले - झेंडे.. .
अलपद्म डोलून डोलून विचारत होते. कोणाचे झेंडे ? कोणाचे झेंडे ?

 ता तै तम धित तै तम

मूठ बंद अंगठा सरळ ताठ वर - दोन्ही हाताच्या शिखरमुद्रा नियतीने समोरासमोर धरल्या.
 कल्प्नेतला राजमुकुट शिखरमुद्रांनी डोक्यावर चढवला. विचारले -राजकारणाचे झेंडे ?
 पताका परत आभाळात फेकत विचारले - जातीचे झेंडे ? धर्माचे झेंडे ?
 अलपद्म डोलून डोलून विचारत होते. कोणाचे झेंडे ? कोणाचे राजकारण ? कोणाचा धर्म ? कोणाच्या जाती ?

 ता तै तम धित तै तम ॥पित्याचा जास्वंद, प्रियकराचा मोगरा अंगावर पडायचा थांबला. कारण मधेच उपटले हे - झेंडे..
 शिखरमुद्रा नियतीने उलटी धरली. अंगठ्याने कपाळावर उभे गंध रेखाटले.

आणी दाखवला - पुरुष..... पुरुषांची आडनावे. पुरुषांची वंशशुद्धी, पुरुषांच्या जाती, पुरुषांचे धर्म, पुरुषांचे राजकारण.
 झेंडे.. अलपद्म डोलून डोलून विचारत होते. का? का? का? का ?

ता तै तम धित तै तम॥

अंगठा आणी शेजारच्या दोन बोटांनी नियतीने हरणाचे तोंड तयार केले.
करांगुली आणी अनामिकेचे दोन कान झाले. कटकमुद्रा अवकाशातले कण तोंडाने वेचू लागली.
 नीयतीच्या आयुश्यातले क्षण होते ते.

 पित्याने डोक्यावर उचलून ज्योतिबाला नेले तो क्षण, मातृहीन मुलीला घास भरवले ते क्षण, मुक्या मुलीला व्यक्त होता यावे म्हणून भरतनाट्यम शिकवले ते क्षण.
 प्रियकराने कंबरेवर हात ठेवला तेंव्हा उठलेला थरार, त्याची अमोघ भाषणे ऐकताना अंगावर उठलेला रोमांच, त्याच्या ओठांच्या स्पर्षातली जादू.

 कटकमुद्रा सारे क्षण सार्‍या भावना टिपत होती. ते सारे आता पुन्हा का मिळणार नाही ? अलपद्म डोलून डोलून विचारत होते. का? का? का? का ?

 ता तै तम धित तै तम॥

शिखरमुद्रांनी उचलून नियतीने राजमुकुट फेकून दिला. प्रियकर काय निवडेल ? राजमुकुट की मोगरा ?

 पिता काय निवडेल झेंडा की जास्वंद ?

ता तै तम धित तै तम.

अलपद्म डोलून डोलून विचारत होते. नियतीने फेर धरला.

नाहीतरी पुरुषांच्या या महान भारतीय नाट्यात मुकी नियती काय करू शकणार होती? नियतीचे अग्नीनृत्य पेटत चालले, फेर्यांचा वेग वाढत राहिला. ता तै तम धित तै तम, ता तै तम धित तै तम ॥*********************************************************************************
 : भरत नाट्यम :

चाल : अइ गिरी नंदिनि सारखी 

घुंगरुत घालुन हे नियती तव पायच नृत्यच भारत गे 
भरतच नृत्यच रे भर सूत्रल आवडु आदवु नृत्य भरे
जल अवकाश जमीन व वायु भडाग्नि त पेटतसे भरते 
जय जयहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य करे 

कटक मुखे अंठा नियते नियती हरिणा नयने अंगुली 
कमळ फुले अलपद्म् कमाल सुहास्य फुलेल मना भुलवी   
शिखरणि रत्नप्रभा मुकुटांचि पताक ध्वजा दिसते जगती  
जय जहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य करी  

नमन करी नमो ध्वज ही तर धर्म ध्वजा मम जाति ध्वजा  
भगवति मी नियती अलपद्म पुसे मजला कवण ध्वज हा 
पदकमले कमळे फुलती मनि ही कमळे नयनी फुलता
जय जहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य कथा 

करिसि कृपा नित पालन पोषण रम्य पीता कनवाळु पिता    
सुमन सुगंधित किंचित तांबुस जास्वंद देव घरी फुलला 
त्रिभुवन भीषण तूचि करी नित सुस्वर हर्ष भरे मजला 
जय जहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य कथा 

जवळ करी प्रिय प्रेम भरे जवळी अधरी चुंबला चुंबला
थरथरली तुझियाच मिठीत थरारत रोम च रोम उभा       
सळसळलेचि मनोहर सुंदर मोहक मोगगरा फुलला 
जय जहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य कसा  

मधुर मधाहुनि फूल फुले तकथै तकथै करि नर्तन मी 
कुणि नटले पुरते कुणि अर्ध नटेचि पिता नट नायक ही
मज पुढती फुलले सगळे मृदु जास्वंद मोगगरे पुरुषी   
जय जहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य करी  


तव तुकडे तुकडे नियते  तव धर्म करी तव जात करी  
अति अति क्रोधित क्रंदन तांडव दानव हे असले पुरुषी    
पसरत रक्तसडे धरणीवर पौरुष जात अधर्म धरी
जय जहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य करी  

तुडवित छिन्न विछिन्न सभोवर घालि धुमाकुळ ते पुरुषी  
उचलुनि आपटिला रणि मानव गंड असे अति क्रूरकृती
थयथय नाचति गुंड ऋषीवर हा ध्वज जिंकती ते जगती 
जय जहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य करी *********************************************************************************

शिंदे सर जरासे उखडले होते. राजवीर सोबतची बैठक विषेश जमली न्हवती पण अजून आशेला वाव होता. नियती सुंदर असली तरी मुकी होती. तिला चांगल्या घरी उजवायला थोडेबहुत कष्ट पडणारच. आज बरेच विषय मार्गी लागायला हवे होते. पत्रकाची केस, टीपू सुल्तान नगरची कारवाई, हे घरगुती विषय, विनोदचा राजकारण प्रवेश. सगळ्या विषयांवर विनोद्शी सविस्तर बोलणे आवश्यक होते.

दिवेलागणी  झाली होती. विनोदही येउन पोचला होता . 

बैठकीला  सुरवात झाली होती. 

पेग पहिला : - ( क्रमशः )

.
तिसर्या भागाची लिंक : http://drabhiram.blogspot.in/2013/04/3.html
.

४ मार्च, २०१३

बडवा - ( कडव्या हिंदूची बखर ) - भाग 1

बडवा - ( कडव्या हिंदूची बखर ) - भाग 1


*************** * हिंदुत्वाची चळवळ .. लाट ..त्याच्या बर्या  वाइट बाजू  - एक थरार कादंबरी ***************** 

त्या पोलिसानी मागून विनोदला धरला. उचल्ला. एका हातात गचांडी आणी दुसर्या हातात गांडीवरची पैंट. विनोद च्या हातातली कुर्हाड  गळून पडली होती. गळा आवळल्यान गोरा चेहरा लाल होऊ लागला. किश्या न ताबड्तोप हालचाल केली. विनोद ला अस धरल्यान खाड्कन रक्त चडलं त्याच्या डोळ्यात. किश्यान सरळ पोलिस इंन्स्पेक्टरच्या रोव्हॉल्वर ला हात घातला. त्याक्षणी इंन्स्पेक्टरन धाडकन विनोदला खालती आदळला. आणी किश्याच्या खणखणीत मुस्काडात ठेवून दिली. दोघाना सांगीतलं "नीचे बैठो''. आळीपाळीनं दोघाना चार चार लाथा लगावल्या. आदळला गेल्यान आधीच ओठ फाटला होता विनोदचा. रक्त वहात होतं तरीही दात ओठ चावत तो ओरडला '' जय भवानी'' ....... ''जय शिवाजी '' किश्यानही साथ दिली.

नीनू यारू ? मराठी ? संताप संताप झाला त्याचा. कानडी पाटी ऊखडतात काय? हरामखोर लेकाचे .  चांगली अद्दल घडवली पाहीजे ह्या शिवसेनावाल्याना. रात्रि टिपू सुलतान नगर मधली ड्युटी म्हणजे काहि ना काहि तरी लफड व्हायचच. इंस्न्पेक्टर बन्गोंडाला सवयच होती त्याची. पण त्याच्या कर्यक्षेत्रात एकही लफड फार मोठं होउ द्यायचा नाही तो. ही विशितली फाल्तू मराटी पोरं, आज अस्सा दांडू देउ त्याना की सारा बेळगाव याद राखेल.

इंन्स्पेक्टर साठी हिशोब सरळ होता. पोरं बडवायचि , साहेब तर खुश होइलच , पण कानडी पेपर मधे झक्कपैकी फोटो पण छापुन येइल. इंन्पेक्टर बन्गोंडा हि तशी अजब वल्ली होती. प्रामाणिक आणी हिरोइक तरुण. देशभक्त, कडक आणि स्वतच्या मायबोलिवर - कानडीवर जिवापाड प्रेम करणारा. पण तितकाच भडक आणि उथळ. टिपू सुल्तान नगरची जी कानडी पाटी हि पोर उखडू पाहत होती; त्या पाटीखालिच गाडावं साल्याना !.................पण ..... थोड्या लाथा हाणल्यावर बर वाट्लं त्याला. पोराच्याही थोबाडातून रक्त वाहत होतं. ........तेही पाहून राग थोडा कमी झाला त्याचा.


' बिचारं तरूण पोरगं, कपडे बरे होते... चेहराही चांगला गोरा गोमटा होता. बर्या घरचा वाटतोय . बरोबरचा मात्र गूंडय . विनाकारण या राजकारण्यांच्या नादि लागतात आणि करिअर खराब करून घेतात. चांगलं बडवून काढ्ल्याशिवाय अक्कल येणार नाही भडव्याना' .. असा विचार करत इंन्स्पेक्टर बनगोंडा चालू लागला, आणि त्या पाटी काढणार्या पोराना शिव्या घालत, त्यांची वरात पोलिस स्टेशन कडे ढकलू लागला.

दोन्ही पोरं जुना मार विसरून जणु काहि झालच नाही अशा थाटात छाति पुढे काढुन चालत होती. एकमेकाशी मराठीत बोलत होती आणी टाळ्या देउन हसत होती. ह्या बनगोंड्याला बिल्कूल भिक घालणार न्हवते ते. त्यांच्या मराठी गप्पांचा अर्थ काय असावा ह्याचा अंदाज करत इंस्पेक्टर त्याना ढकलत होता. पण त्यांची बेगुमान आणि निडर वागणुक त्याचा संताप वाढवत होती. ह्यांची कशी सालटी सोलावित? हा इंन्स्पेक्टर बन्गोंडाचा विचार पूर्ण होइपर्यंत ते सगळे पोलिस स्टेशन मधे पोचले होते. उद्या बेळगाव मधल्या पेपर मधे काय बातमी द्यायची याचा विचार करत बन्गोंड्यान दुकलीकडे रोखून पाहिल .......
विनोद च्या डोळ्यात बघत आणी एका हाताने त्याची गचांडी धरत इंन्स्पेक्ट्रर बन्गोंडा ने विचारले -मराठी हं ?

निन्ना हेस्सार्येन्नू ? नाम क्या है तेरा ?

" विनोद बडवे ... और सुनो मराठी -- कानडी कुछ नही जानता मै. गर्व से कहो हम हींदू है. ये टीपू सुल्तान कटुवे का नाम नही चलेगा इधर.उसके नाम का सिर्फ बोर्ड ही नही निकालूंगा मै, उसके नाजायझ औलादोंको पाकिस्तआन भी भगाउंगा. जो उखाडना है उखाडले ....''


बनगोंड्याच्या हाताची पकड ढिली होत होती. आणी डोळ्यातला राग निवळत होता ......

**********************************************************************************************


खरं तर विनोद न आपल्या पहिल्या वाक्यातच अर्ध मैदान मारलं होतं. इंन्स्पेक्टरची पकड ढिली होउ लागताच, आपल्या पल्लेदार्, रसरशीत आणी मुलुखमैदान तोफेसमान वक्तृत्वाने....... तो त्या पोलिस स्टेशन लाच......सभेचे व्यासपीठ बनवणार होता. आपल्या ह्या कष्टाने कमावलेल्या कलेचा बरा वाईट उपयोग कसा करायचा ? हे त्याला चांगलच ठाउक होतं.

 जेमतेम पाच फूट उंची, पण कष्टान कमावलेलं पिळदार शरीर; त्याला शोभणारी तलवार कट मिशी आणी चटकन डोळ्यात भरेल असा तेजस्वी रंग ल्यालेला तो, हाताची तर्जनी उंचावून खडे भाषण सुनावू लागला. त्याचे मोठे काळेभोर डोळे भाषण देता देता प्रत्येक श्रोत्याच्या नजरेला नजर भिडवत होते आणी ह्रुदयाचा ठाव घेत होते. नियतीला माहित होतं, याच अमोघ भाषणाने तो त्या पोलिस स्टेशन मधल्या सार्या स्टाफला जींकणार होता............ फक्त एक अपवाद सोडून !

शांत खोल आणि धीरगंभीर आवाजात विनोदनं बोलायला सुरवात केली, त्याच्या हालचाली संथ होत्या आणी डोळ्यात अतिशय सौम्य भाव होते. " शिवाजी महाराज सिर्फ मराठियोंके लिये लडे थे क्या ? रानी चेन्नम्मा का खून कर्नाटक के लिये बहा था क्या ? सुभाषबाबू सिर्फ बंगाल के सुपुत्र थे क्या ?क्या भगतसिंग सिर्फ पंजाब के आजादी के लिये फासी पर लटका था ? हिंदुकुश पर्वत से हिंद महासागर तक, जो भी हिंदू खून बहा है ..... उसको गाली मत दो! कुछ नही मराठी, कुछ नही बंगाली, कुछ नही पंजाबी, कुछ नही कानडी, कुछ नही तामिळी.... कुछ नही तुळू ..... हम बस हींदू !

 इतिहास पढो . छोडो....... अगर नही पढना तो मत पढो. ......लेकिन रोज का पेपर तो पढो ..... कश्मीर से केरल तक जो भी बम फूटे है, जितना भी हिंदू खून बहा है .... किसने बहाया है ? और क्यों ? क्यों जादातर बम शुक्रवार को फटते है ? मस्जिद मे शुक्रवार का नमाज पढनेवाले उनके मुल्ले भाई सुमडीमे बच निकल्ते है ... फिर भी हमारे होष ठिकाने नही आते. वो सब छोडो .... जब हिंदूओंको मारते हुए वो नही देखते की ये कानडी है या मराठी ? तो हम क्यों देखते है ? जब उन्हे काफिर हिंदुओंको मारते हुए भाषा से फर्क नही पडता .. .. तो हमे क्यों फरक पडता है ? ये गद्दार बैंड बजा रहे है पूरे देश की.... और हम लोकोंने तमाशा कर रखा है हिंदुत्व का ! मेरा नाम है विनोद बडवे , बडवा का मतलब मालूम है आपको ?

भड्वा नही बडवा....... बडवा ......बडवा मतलब मंदिर के आगे ढोल बजाने वाला पुजारी....लेकिन ..... मै ढोल नही बजाता,......... गद्दरोंकी ** बजाता हूं ..... हां मै आया हूं शिवाजी महाराज के महारष्ट्र से.... बस........एकही मक्सद लेके ......" हळू हळू विनोद बडव्याचा आवाज चढू लागला होता.अणुकुचीदार गोरं नाक लाल लाल होउ लागलं होतं. डाव्या हाताची मूठ कमरेवर विराजमान झाली होती. उजव्या हाताचे दुसरे बोट उंचावून तो बोलत होता. काळी रम जशी धमन्या धमन्यात पसरते, तसेच त्याचे विचार श्रोत्यांच्या अंगात भिनत होते. पोलिस स्टेशन चा सारा कानडी स्टाफ त्याकडे कुतुहलान बघत होता. संशयान बघत होता तो तिथला एकमेव मराठी पोलिस. सब इंन्स्पेक्टर राजवीर पाटील निप्पाणीकर . इंन्स्पेक्टर बनगोंड्याचा ज्युनिअर.


विनोद पुढे बोलू लागला ''और मेरा मक्सद है हिंदूओंको एक साथ जोडना, एकसाथ खडा करना. एक साथ खडे होकर हमने मूत दिया , तो भी साले १३% वाले बह जायेंगे. भाषा भेद, प्रांत भेद, जाती भेद और वर्ण भेद को भूलकर हींदुओंको एक साथ चलना होगा. एक साथ लडना होगा. समय बदल रहा है. इतिहास करवट ले रहा है. बाद्शाहोंद्वारा मंदिर गिराने का वक्त गया........ बाबरी तोडनेवाला  यह वर्तमान है.

कराची, पेशावर तो क्या .... काबूल कंदाहरतक परमपवित्र भगवा ध्व्ज लहरायेगा, यही दुनिया का भविष्य है. हमारी विजय सुनिश्चित है.. हिंदू बंधूओ........... क्योंकी उस विजयगाथा का पहला अध्याय हमने ६ दिसंबर को ही लिख दिया है. मैं छत्रपती शिवाजी महाराज के महाराष्ट्र से आया हूं सोता सिंह जगाने, हर दिल मे आग लगाने, हिंदू साथ जूटाने ........... दो दिन पहले हमारे महाराष्ट्र से राष्ट्रवादी कोंग्रेस का एक मराठी मंत्री इधर आया था और कह रहा था" -- महाराष्ट्राला बेळगाव नाही मिळाल, तर इथं रक्ताचे पाट वाहतील ---- " वाह रे मर्द .... उधर भिवंडी, मुंब्रा पाकिस्तान मे जानेका टाइम आया है.....मूंबई सम्हाली नही जाती .और ये बेलगाव मांग रहे है....... " विनोदचा सूर टिपेला पोचला होता. एक कसलेला कलाकारही होता तो. हातवारे करताना त्याच्या हाताची बोट थरथरत होती. चेहरा लालभडक झाला होता. त्याला विश्वास होता शेवट्च्या दोन वाक्यात आपण सारं पोलिस स्टेशन जींकलेलं आहे. मराठी माणसान कर्नाटकात अशी भूमिका घेतली , की तो लोकप्रिय होतोच ! पण त्याचा विश्वास खोटा ठरवण्यासाठीच सब इंन्स्पे़क्टर राजवीर पाटिल निप्पाणीकर त्याच्या दिशेने शांतपणे पाउलं टाकत येत होता.


राजवीर पाटिल. सडसडीत उंच नकेला आणि सावळा. टोल डार्क ऐंड हैंडसम . पण त्याचा बॉस बनगोंडा प्रमाणे तो ऐंग्री यंग मॅन मात्र न्हवता. अतिशय संयमी आणी परिस्थितीनं खोल बनवलेलं व्यक्तिमत्व होतं त्याचं. निपाणी जवळच्या अर्जुनी गावचे पाटिल. मराठी बोलणारा सारा अर्जुनी गाव सीमप्रश्नात कर्नाटकात आलेला. राजवीर पाटिलचे आजोबा क्रांतिसिंह नाना पाटलांचे सहकारी होते. प्रतिसरकारचे मंत्री होते. त्यांनी घरची लाखोंची इस्टेट स्वातंत्र्य लढ्यात फुकून टाकलेली होती. राजवीर ला ऐहीक संपत्ती काही ठेवली न्हवती त्यांनी. ठेवली होती ती कड्व्या देशभक्तीची परंपरा आणी....विचारांची संपत्ती शाहु महाराजांच्या विचारांची. आणी महात्मा फुलेंच्या सच्च्या सत्यशोधकी विचारांच सोनं . गरीबीशी दोन हात करत तो शिकला आणी बेळगाव पोलिसात चिकटला.


एव्हाना विनोदच्या भाषणाचा स्वर वरच्या सा पर्यंत पोचला होता " यह सब काँग्रेस का खेल है हम हींदूओंको आपस मे लडवाते है. जाती और भाषा के नाम पे. और देश्द्रोही मुल्लों के दाढी को धी शक्कर लगाते है............... भारत मे परिवर्तन होगा, भगवा ध्वज लहरायेगा | हिंदू हींदू एक रहेगा, राम राज तब आयेगा |"

सब इंन्पेक्टर राजवीर पाटिल एव्हाना विनोद च्या जवळ येउन पोचला होता आणि एक शब्दही न बोलता त्यानी विनोदची झडती घ्यायला सुरवात केली. त्याच्या या क्रुत्याने भाषणामुळे भारावलेलं आणि भांबावलेलं कर्नाटक पोलिस दल पण ताळ्यावर येउ लागलं होतं. पण ..... विनोदच्या खिशात काहीही न्हवत. अक्षरश। रिकामे होते खिसे त्याचे. तसंही असल्या कामगिरीवर जाताना खिशात पास्पोर्ट ठेव्ण्याएव्हढा मूर्ख नक्कीच न्हवता तो. विनोदनं राजवीरकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. राजवीरनंही हसून आपला मोर्चा विनोद च्या मित्राकडे वळवला. नाम क्या है तेरा ?

किश्या... आपलं क्रिश्ना जाधव.....
किश्याची झडती सुरू असतानाच विनोद विचार करत होता, -- नियतीचा फेरा कोणाला कोठे घेउन जाइल याचा नेम नाही. नाहीतर १२ वीला गणीत आणी विज्ञानात ९८% मार्क मिळवणारा आपल्यासारखा हुशार सोफ्ट्वेअर इंजिनिअर........या आड बेळगावातल्या पोलिस स्टेशनात रात्री दोन वाजता काय करतो आहे ?........... त्याची विचारमालिका तुटली ती इंन्स्पे़क्टर राजवीरच्या सण्सणीत आवाजाने...


ये क्या है ? त्यान क्रुष्णा जाधवच्या खिशातून एक निळ्या रंगाचं पत्रक काढलं ..
ते पत्रक राजवीरला मिळालेलं पाहून विनोदच्या चेहर्यावरचा रंग ऊड्त होता, आणी रा़जवीरच्या चेहर्यावरचे रंग बदलत होते. कधी आनंद, कधी क्रौर्य तर कधी राग असे राजवीरचे भाव बदलत होते.
पत्रकाच्या शेवट्ची सही त्यानं वाचली. ----- विनोद बडवे.

हे पत्रक कामगिरीला जाताना आणल्याबद्दल विनोद क्रूश्णा कडे खाउ का गिळू अशा नजरेने पहात होता. आणी बरोब्बर तशाच नजरेने राजवीरही विनोद कडे पाहत होता. फक्त त्याला आश्चर्य वाटत होतं... की हे बारकं सालं कुणाच्या जिवावर उडतय ?


त्याच वेळी पोलिस स्टेशनच्या बाहेर ....... पायर्‍यांवर ......कुणाची तरी भारदस्त पावले वाजत होती ............


( क्रमशः )

------------

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *