१७ मार्च, २०१४

विज्ञानाच्या चष्म्यातून जाती



विज्ञानाच्या चष्म्यातून जाती 


( जात पात  आणि जातिव्यवस्था यातला मूर्खपणा विज्ञान , बुद्धिवाद , गणित आणि लॉजिकने खोडून काढणारा मनोरंजक लेख …… )


तुमचे पूर्वज किती ?


स्वत:च्या जातीविषयी अभिमान हे सर्व भारतीयांचे समान लक्षण आहे . आपल्या पूर्वजांविषयीचा अभिमान आणि मग त्यातून उद्भवणारा स्व जातीविषयक अभिमान मग त्यातूनच उगवणारा इतर जाती विषयीचा तुच्छतावाद हे भारतीय समाजाचे आणि परिणामि इथल्या अनेक धार्मिक , सामाजिक आणिक राजकीय विचारधारांचे प्रमुख अंग आहे .  आनुवांशिकता , डी एन ए , असे विज्ञान सदृश शब्द वापरून या पुरातन मानसिकतेचे समर्थन केले जाते . प्रस्तुत लेखात आपण विज्ञानाच्या चष्म्यातून जातींकडे पहायचे आहे .

चला तुमच्या आराम खुर्चीत जरा रेलून बसा .हातात एक गरम कॉफीचा वाफ़ाळता कप  असू द्या  .  आपण मेंदूचा व्यायाम करणार आहोत . तुमचे पूर्वज किती ? तुमच्या पूर्वजांच्या संख्येत जातीव्यवस्थेचे गुपित  दडले आहे . आई  आणि बाप हे दोन पूर्वज झाले . आजी आजोबा दोन्हीकडचे पकडले तर ४ होतात आणि दोन पिढ्यांमागे पुर्वजांची संख्या होते ४. तीन पिढ्या मागे गेले तर हि संख्या आठ वर जाते . आपल्या पैकी प्रत्येकाला आठ पणजी पणजोबा आहेत . हि संख्या भूमितीय गतीने वाढत जाते. जितक्या पिढ्या मागे जायचे आहे तितक्या वेळेला दोन या संख्येला दोन ने  गुणायचे आहे . साधे शाळेतले गणित ! आजी आजोबांच्या पिढीत म्हणजेच दोन पिढ्या मागे आपल्या पूर्वजांची संख्या दोनाचा दुसरा घात = ४ एव्हढी असते. तीन पिढ्या मागे गेले तर पूर्वजांची संख्या ८ आहे . चार पिढया पूर्वी दोनाचा चौथा घात म्हणजे आपले १६ पूर्वज होतात . इथ पर्यंत ठीक आहे .   जितक्या पिढ्या मागे जायचे तितक्या वेळेला दोन ला दोन ने गुणले कि आपल्याला पूर्वजांची संख्या मिळते . ज्या पिढीतल्या पूर्वजांची संख्या शोधायची आहे त्या संख्ये एव्हढा दोनाचा घात त्या पिढीतल्या आपल्या पूर्वजांची संख्या दाखवेल हे गणिती सूत्र आपल्याला मिळाले !

पण जातीचा अभिमान केवळ या सोळा पूर्वजा पर्यंतच मर्यादित नाही . प्रत्येक जातीला कमीत कमी दोन हजार वर्षापुर्वीच्या पुर्वाजाबद्दल प्रेम वाटत असते . त्यांचा अभिमान वाटत असतो . आणि दोन हजार वर्षापूर्वीच्या अपमानाचे उट्टेहि काढायचे असतात .


1) गणित पहिले : अफ़ाट पुर्वज 


साधारण पंचविसाव्या वर्षी मुले होतात असे गृहीत धरू . खरे तर इतिहासात यापेक्षा लवकर मुले होत आली आहेत . तरी आपल्या गणिताच्या सोयीसाठी आपण पंचविसाव्या वर्षी मुले होतात असे गृहीत धरू . म्हणजे शंभर वर्षात चार पिढ्या झाल्या. हजार वर्षात चाळीस पिढ्या होतील . आणि दोन हजार वर्षात ८० पिढ्या होतात . आणि आपण आधीच सिद्ध केल्यानुसार दोन हजार वर्षापूर्वी तुमच्या पूर्वजांची संख्या मोजण्याचे सूत्र आपल्याला ठाउक झाले आहेच . ती संख्या येईल दोनाचा ८० वा घात .







दोनाचा ८० वा घात . दोन ला ८० वेळा दोन ने गुणायचे आहे . इथे मात्र आपल्याला सायनटिफ़िक केलक्युलेटर लागणार आहे. एक्स  चा वाय वा घात काढण्याचे एक बटण त्या  केलक्युलेटर वर आहे .
 २ चा ८० वा घात = 1208925819614629174706176 अशी एक अगडबंब संख्या मिळते .
हि संख्या आपण वाचूही शकत नाही . आजही पृथ्वीची तेव्हढि लोकसंख्या नाही . बरे हे पूर्वज एका माणसाचे झाले बरका ! आजच्या सर्व माणसांचे पूर्वज याच गणिताने काढले आणि त्यांची बेरीज केली तर तेव्हढि माणसे उभी करायला शंभर पृथ्व्यांचे क्षेत्रफ़ळ हि पुरणार नाही . या पहिल्या गणिती संकल्पनेला अफ़ाट पुर्वज असे नाव देऊ . काहीतरी चुकते आहे नक्की ! नेमके काय  चुकते आहे ? ? ते पुढे पाहूच …  पण स्वत:ची  जात आणि पूर्वज याविषयी थोडा वेगळा विचार करावा लागणार हे नक्की ....  !! .


नातेवाइकात अंतर्गत लग्ने  होतात . 

एकाच कुटुंबात लग्ने होत असतात . आणि आपण ज्यांच्याशी लगिन  करू शकतो असे आपले रक्त बांधव म्हणजेच "जात" हे तर आपण विसरूनच गेलो कि !  अनेक जातीत विवाह करण्यापूर्वी पदर जुळवण्याचा विधी आहे .  आपल्या आधीच्या पिढ्यात कोणि नातेवाइकानि लग्न केले आहे का ? हे तपासले जाते आणि मग तसा पदर आधीच्या पिढीत जुळला असेल तरच लग्न केले जाते . म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्यात नातेवाइकात लग्ने  झालेली आहेत . दूरचे चुलत मावस भाऊ बहिण लग्न करत असतात त्यामुळे आपले पूर्वज अगडबंब संख्येत नसतात . समजा तीन पिढ्यांपूर्व आपल्या सोळा पुर्वाजात कोणि चुलत मावस सोयरिक जुळवली असेल तर चार पिढ्या पूर्वीच्या पणजोबांची संख्या कमी भरते….  कारण चुलत मावस बहिण भावांचे काही पणजोबा समान असणार आहेत .  चला म्हणजे आपल्या पूर्वजांची संख्या 1208925819614629174706176 एव्हढी अगडबंब नाही . नात्यातल्या लग्नांना धन्यवाद ! नाइतर लई पितरांचे पारणे फेडत बसावे लागले असते !

चला.  पुन्हा एकदा आरामखुर्चीत रेला . गरम वाफ़ाळत्या कॉफीचा  अजून एक घुटका घ्या . आता आपण  उलटे गणित करणार आहोत . आपले आधीचे गणित साफ चुकले आहे . नव्याने विचार करावा लागणार आहे . दर वर्षी पृथ्वीची लोकसंख्या वाढत जाते हे आपल्याला माहित आहे.  म्हणजे दर एक पिढीत मागे मागे गेले कि पूर्वजांची संख्या कमी कमी  होत गेली पाहिजे कारण साधारणत : एकापेक्षा जास्त मुले होण्याकडे कल असतो . चार पोरांचे आईबाप दोन असतात म्हणजे मागच्या पिढीत पुर्व जांची संख्या वर्ग मुळा  एव्हढी झाली ! पूर्वीचे गणित प्रत्यक्षात उलटे चाललेले दिसते !    मगाशी आपण एका व्यक्तीच्या पूर्वजांची संख्या शोधण्याचा प्रयत्न केला . आता उलटा विचार करू या .


आज  पृथ्वीवरच्या सर्व माणसांचे पूर्वज किती होते ?
ते शोधून काढु ! विचार करायला सोपे जावे म्हणुन एक छोटे गाव उदाहरणार्थ  घेऊ .




2 ) गणित दुसरे : दोनच  पूर्वज : आदम आणि इव्ह


पश्चिम महाराष्ट्रातले एक गाव सावरखेड ! चला तर या काल्पनिक गावात समजा आज पाचशे लोक रहात आहेत . आधीच्या पिढीत किती बरे लोक रहात असतील ?  समजा या गावाची लोकसंख्या स्थिर आहे .  गेले कित्येक वर्षे इथे ५०० च लोक राहतात . मग आजच्या ५०० लोकांचे पूर्वज किती ? इथे काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत .

१) काही लोक नपुंसक असतात .
२) काही लग्ना आधीच मारून जातात
३) काहीची मुले लवकर मरतात

म्हणजे आजच्या पाचशे लोकांचे पूर्वज किती ?  काही लोकाना स्वत:चे वंशसातत्य राखता येत नाही हे लक्षात घेतले तर सहज लक्षात येईल कि ५०० लोकांचे पूर्वज ५०० पेक्षा कमी असणार ! काही वंश प्रत्येक पिढीत नामशेष होणार . आपल्या गणिताच्या सोयीसाठी . ५०० लोकांचे पूर्वज ४९० आहेत असे मानु ! दहा लोक दर पिढीत नपुंसक तरी निघतात किंवा मुले होण्या आधीच खपतात .

एक पिढी पूर्वीचा इतिहास पाहिला तर  सावरखेडात ५०० च लोक राहत होते पण ते सर्व आजच्या सावरखेड करांचे पूर्वज नाहीत . दहा लोकांचा वंश नाश झालेला आहे . म्हणजे आजच्या जिवंत पाचशे लोकांचे एका पिढी पूर्वी ४९० वंशज होते. दोन पिढ्यांपूर्वी देखील वंश नाशाचा जीवशास्त्रीय नियम लागू होतोच ! दोन पिढ्या मागे गेले तर विस वंशाचे सातत्य तुटले आहे . आणि आजच्या ५०० जिवंत लोकांचे उगमस्थान म्हणजे दोन पिढ्यान पूर्वीचे ४८० लोक . कोणत्याहि कुटुंबाची वंशावळ पाहिली तर मुले न झालेले असे अनेक विवाहित आणि अविवाहित लोक दिसतील .









आजच्या लोकसंखेचे पालकत्व कमी पूर्वजांकडे असते हा मुद्दा आहे . जर पन्नास पिढ्या मागे गेले . आणि दर पिढीत दहा लोकांचे वंश सातत्य तुटते असे मानले तर आजच्या सावरखेड गावाचे सर्व लोक एकाच माता पित्याची आपत्ये आहेत. हे झाले सावरखेडचे आदम आणि इव्ह ! याला आपण आदम इव्हचे गणित म्हणु .

हे गणित फार विण्ट्रेस्टिंग आहे ! समजा दर पिढीत दहा नाही एकाच माणसाचे वंश सातत्य तुटते असे मानले तर पन्नास पिढ्यापुर्वि आजच्या लोक संख्येचे ४९० पूर्वज होते असे मानणे भाग आहे . पण मग ५०० पिढ्यांपूर्वी काय ? पुन्हा आपल्याला सावर खेडचे ५०० पिढ्या जुने दोनच आदम इव्ह मिळतात ! म्हण्जे सवाल फकस्त किती पिढ्या मागे जायचे ? एव्हढाच आहे !  गावाची लोकसंख्या कितीही असो ! नपुंसकांची संख्या कितीही असो ! पुरेशा पिढ्या मागे गेले कि सर्वांचे कोमन आई बापच मिळणार आहेत . फकस्त जरा जास्त पिढ्या मागे जावे लागेल ! म्हणजे प्रत्येक गावातले सर्व लोक एकमेकांचे बांधव आहेत हे मानणे भाग आहे .

हे गणितही उघडच चुकले आहे ! कारण गावाबाहेर लग्ने  होतातच . आपले गृहीतकच चुकले होते . च्यामारी ! पण हाच नियम सार्या पृथ्वी लाच लागू केला तर ? पृथ्वीबाहेर लग्न करण्याची पद्धत नाही . दर पिढीत काही लोक नपुंसक निघणारच. काही वंशांचा नाश होणारच .  आणि पुरेशा पिढ्या मागे गेले तर आजच्या सर्व मानव जातीचे समान पुर्वज मिळतील !

आरामखुर्चीत रेलून कॉफीचे घुटके घेत आपण मानवता सिद्ध केली आहे आणि जातिवाद खोटा  ठरवला आहे ! थांबा एका मिनिटासाठी काहीतरी चुकते आहे    हे नक्की ....  !!




3 ) दोनही गणितांचा मसावि :  मानवाची वैज्ञानिक  महामाय 


आपले पूर्वज संख्येने भरपूर आहेत . त्यांनी परस्परात लग्ने  केलेली आहेत आणि अनेक मानवांना स्वत:चे वंश सातत्य राखता येत नाही हे आपण वरील दोन्ही शक्यतात पडताळून पाहिले . या दोन्ही गणिती प्रक्रिया जीवशास्त्रात एकाच वेळी चालू आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे .

पृथ्वीची लोकसंख्या दर सेकंदाला वाढते आहे . याचाच दुसरा अर्थ असा की दर सेकंदाला आजच्या जिवंत माणसांच्या वंश सातत्यातल्या पूर्वजांची संख्या कमी होते आहे . फक्त किती पिढ्या मागे जायचे ? एव्हढाच हिशेब बाकी आहे . मानवाच्या पुरेशा पिढ्या होऊन गेल्या … कि आजच्या भूतलावरची सर्व ,माणसे एकाच मातेची लेकरे उरणार हे उघड आहे .


आता प्रश्न असा आहे कि खरोखर मानवाच्या इतक्या पिढ्या होऊन गेल्या आहेत का ? उत्तर होय असे आहे !


 आजच्या मानवाची मूळ माता ९९००० ते २००००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत राहत असावी . मात्र तिच्या काळातील ती एकमेव स्त्री नव्हती. फक्त तिची माता सोडून इतर स्त्रियांना आजच्या एखाद्या जिवंत स्त्री पर्यंत अखंड वंश साखळी निर्माण करता आली नाही . तसेच हि मूळ माता हि एक पदवी असून विशिष्ठ स्त्रीच मूळ माता असेही ठाम सांगता येत नाही . कारण मूळ माता ठरण्यासाठी तिला अखंड वंश सातत्य असलेल्या किमान दोन मुली असणे आवश्यक असते . जेव्हा एखाद्या वंश रेषेतील शेवटची स्त्री मारते तेव्हा हे वंश सातत्य खंडित झाल्याने मूळ माता पदवी पुढच्या पिढीकडे सरकते . म्हणजेच मूळ माता हि विशिष्ट व्यक्ती नसून कालांतराने बदलू शकणारी व्यक्ती असते . 









या स्त्रीला पिढीगणिक बदलू शकणारी कॉमन मदर इव्ह -  वैज्ञानिक  महामाय म्हणतात . 





थोडक्यात सर्व मानवांची आई एकाच आहे . मग बापाचे काय ?



खरी गम्मत इथून सुरु होते . हि  जी कोणि काळानुसार बदलणारी  वैज्ञानिक  महामाय आहे ती केवळ आरामखुर्चीत कॉफीचे घुटके  घेत  - मेंदूचे व्यायाम करत गवसलेली नाही . त्यासाठी शास्त्रज्ञांनी जगातल्या १३५ भिन्न भिन्न जमातींच्या  स्त्रियांचे रक्त तपासले आहे . मायटोकोण्ड्रिया म्हणजे  पेशीचे उर्जा केंद्र . आपल्या डी एन ए चा अर्धा भाग पित्याकडून आणि अर्धा भाग मातेकडून येत असतो .  मात्र आपणा सर्वाना हे मायटोकोण्ड्रिया मात्र फक्त मातेकडून मिळत असतात.  म्हणजे आजच्या सर्व प्रजातीच्या स्त्रियात आणि पुरुषात असलेले मायटोकोण्ड्रिया त्याना त्याच्या मातेपासून मिळाले आहेत . शास्त्रज्ञांनी पिग्मी ते अंदमानी आदिवासी ते आफ्रिकन ते युरोपियन अशा सर्व भिन्न १३५ प्रजातींच्या स्त्रियांचे  मायटोकोण्ड्रियल डी एन ए तपासले . त्यात दर पिढीत होणारे म्युटेशन आणि मोलेक्युलर क्लोक यांच्या अभ्यासावरून निश्कर्ष काढले . त्यानुसार हि मायटोकोण्ड्रियल कॉमन मदर इव्ह -  वैज्ञानिक  महामाय सिद्ध केलेली आहे.हि थेअरि बायबल च्या विरुद्द असल्याने धर्म मार्तण्ड सन्तप्त आहेत। 

 . 
मानवाच्या दर पिढीत काही वंशाचा नाश होत असल्याने हि महामाय दर पिढीतही बदलू शकते ! म्हणजे आजचे सर्व मानवांची माता मिळते पण पिता नाही . कारण दर पिढीत गुणुसुत्रे बदलत असतात . लग्न केल्याने त्यांचे मिश्रण होत असते . त्यामुळे आपल्या रक्तात अनेक पुरुष पूर्वजांची गुणसुत्रे खेळत असतात . आणि तत्कालीन महामायेचा तत्कालीन पती तत्कालीन बाप असतो ! 


आता एव्हढे सगळे समजून घेतल्यावर कोणाला स्वत:चा वंश , जात आणि बापजादे  यांचा अभिमान  बाळगायचा असेल तर खुशाल बाळगावा ! वेदातले पुरुषसुक्त आणि बायबल कुराणातलि एकमेव आणि न बदलणारे  "आदम इव्ह"  हीच मानवी उत्पत्तीची खरी थेअरी मानायची असेल तर खुशाल मानावी !


Ref : River Out of Eden: A Darwinian View of Life is a 1995 popular science book by Richard Dawkins


१६ टिप्पण्या:

  1. हसत-खेळत वैज्ञानिक सत्य सांगण्याची हातोटी लाजवाब !!!

    असेच लिहीत रहा.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. Mala jaticha abhiman thevane, dusaryavar kurghodi karane ajbat manya nahi...parantu y chromosome ha saral sarva purushat straight rahato...miosis madhe thoda far badal hot asava.......mhanun mansache adnav he continue kartaat...

      Tarihi mala jaticha ani tyatahi kulacha abhiman thevun kurghodi karane vikrut manache laxan watate......tumache mhanane manya ki dar pidhya madhe gunsutra change hotat..pan jatit madhech eka shretat lagna kelyane vividhata yet nahiye..... ani dubali vansh tayar hot aahe ase mala watate.....

      हटवा
  3. Fantastic, Nice Article...... Here, on our Planet, Global Earth, Everybody is having Hybrid Inheritance...... :)

    उत्तर द्याहटवा
  4. मानवाच्या दर पिढीत काही वंशाचा नाश होत असल्याने हि महामाय दर पिढीतही बदलू शकते ! म्हणजे आजचे सर्व मानवांची माता मिळते पण पिता नाही . कारण दर पिढीत गुणुसुत्रे बदलत असतात . लग्न केल्याने त्यांचे मिश्रण होत असते
    _____________________
    Y chromosome purushatach adhalato. to straight sarv purush apatyat transfer hot jaato..

    उत्तर द्याहटवा
  5. प्रिय अभिराम अनुलोम वैध व प्रतिलोम अवैध म्हणून उच्चवर्णीयांनी निम्न वर्णीयांचे जनुकीय शोषण केले असा एक प्रवाद आहे तो खोडून काढणारा युक्तिवाद जोडावा.
    राजीव साने

    उत्तर द्याहटवा
  6. च्यायला!! लईच मोठा 'ब्याक अप' आहे राव!! :-)

    उत्तर द्याहटवा
  7. छान
    फेबू लींक वरून आलो
    अफलातून विचार
    अनेक factors अजून असतील
    पपणअसा विचार केला नव्हता

    उत्तर द्याहटवा
  8. लेख फारच सुंदर - कुल, जात, गोत्र या सर्व गोष्टींचा फोलपणा समोर येतो - आता हडप्पा संस्कुतीतल्या एखाद्याचे चित्र पाहतो तेंव्हा मनात प्रश्न येतो हा आपल्याशी जैविक दृष्ट्या किती पिढ्यांपूर्वी नात्यात असेल ?

    उत्तर द्याहटवा
  9. या विश्लेषणद्वारे मग जात आणि धर्माला काही अर्थ च उरत नाही। जर हे सारे मानव जातीला समजले तर आजचे आपसातील वाद मिटतील ।

    उत्तर द्याहटवा
  10. पूर्वीच्या काळात येणारी आजारपणे, दुष्काळ आणि त्या काळात जगण्याची धडपड हि वेगळी होती, आत्ता गेल्या २ शतकात जो वैद्यानिक धुमाकूळ घातला गेला आहे त्यात जुने तर्कवाद पूर्ण फोल ठरतात.. आपण दिलेले विचार फारच वरवर आहेत. जुन्या जातीसंस्था, कट्टर नियम हे मान्य करत नाहीत.. आफ्रिकेतून मानव सर्वात प्रथम भारतात स्थिर झाला आणि तिथेच जातीयता सुरु झालेली आहे.. त्यामुळे जातीयतेचे कारण शोधणे इतके सोपे आणि हूल उठवण्यासारखे नाही. अधिक अभ्यास हवा

    उत्तर द्याहटवा
  11. जबरदस्त अभिराम...तुम्ही डॉक्टरकी सोबत मानववंशशास्त्राचाही अभ्यास करता का??

    उत्तर द्याहटवा
  12. पूर्ण वाचले नाही पण इंटरेस्टिंग वाटतेय....

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *