७ जून, २०१६

प्रेमा तुझा गंध कसा ?


प्रेमा तुझा गंध कसा ?

स्त्रीयांना आकर्षून घेणारे परफ्युम असतात काय ? एक्स चा बॉडी स्प्रे मारला तर तुमच्या मागे अप्सरांचा थवा धावत येईल काय ? मोगरा आणि प्रणय याचा काय संबंध ? वात्सायनाच्या काम सूत्रात अनेक सुगंधी तेले आणि सुवासिक फुलांचे कामक्रीडेतील महत्व सांगितले आहे. ते  वाचले नसले तरी अनुभवी सज्जनांस सुगंधाची महती पुरती ज्ञात असणार. प्रस्तुत लेखात जीवशास्त्र आणी उत्क्रांती विज्ञान प्रेमाचा गंध कसा शोधते ते पहायचे आहे.

जो कोणी असा आकर्षक परफ्युम शोधून काढेल तो अब्जो करोडपती होईल - जगातले सर्व पुरुष त्या अत्तराचे  ग्राहक असतील ! आता आपण हा परफ्युम शोधून काढूया ….







स्त्रियांना नेमका कोणता वास आवडतो ? उद्दीपित करतो ? त्यावर सखोल संशोधन झालेले आहे . तिथपर्यंत जाण्या आधी आपण थोडे जीवशास्त्र हसत खेळत समजून घेऊ. खुर्चीत मस्त रेलून बसा . एक कप चहा मागवा ….

अनेक प्राण्यात फ़ेरोमोन्स असतात हे आपल्याला ठाउक आहे . फ़ेरोमोन्स म्हणजे विशिष्ट वास - गंध निर्माण करणारी हार्मोन -  द्रव्ये. फुलातील असे  (फ़ेरोमोन्स) प्रेमगंध म्हणजे त्यांचा सुवास . उदाहरणार्थ आंब्याचा मोहोर सुवासिक असतो .  या सुवासा मुळे मधमाशा किंवा इतर किडे त्या फुलांकडे आकर्षित होतात. मध खाताना त्यांच्या पायाला परागकण (पुरूषबीज ) लागतात … माशा दुसर्या फुलावर बसल्या की त्यांच्या पायाला लागलेले  पराग त्या  फुलाच्या स्त्री बीजा पर्यंत पोचतात - मीलन झाले -  झाला मग रसाळ आंबा तयार ! म्हणजे फुलाचा सुवास हा त्याला पुनरुत्पादन करण्यास मदत करतो.










पण केवळ फुलेच नव्हे तर फुलपाखरे सुद्धा असे फ़ेरोमोन्स - प्रेमगंध तयार करत असल्याचे दिसून आले आहे. पुरुष पाखरू आपल्या मिशांवर प्रेमगंध तयार करतो  आणि स्त्री फुलपाखरा च्या एंटीना वर आपल्या मिशा घासून मेसेज पोचवतो  - मुलाच्या मिशा आणि मिशांचा प्रेमगंध पसंद पडला तर मग शुभमंगल सावधान ! फुलपाखरातील  वधू पक्षाला फार लांबचा वास घेता येत नसल्याने- नराला पोरगी पटेस्तोवर   (अनेक ठिकाणी )  मिशा घासायचे कष्ट उचलावे लागतात.  पण काही सूरवंट , साप आणि बेडुक हे -- फुलपाखरा पेक्षा अधिक भाग्यवान आहेत. त्याच्या फ़ेरोमोन्स चा प्रेमगंध दूर दूर पर्यंत जाऊ शकतो.







उंदिर जमात या फ़ेरोमोन्स प्रकरणात फारच प्रगत आहे. केवळ प्रेमगंधच नाही तर त्यांच्या जमातीत  भिती युक्त  गंध सुद्धा आढळून आलेले आहेत. याबद्दल विविध प्रयोग करण्यात आलेले आहेत.

 एक उंदिर मुद्दाम घाबरवायचा मग त्याला इतर न घाबरलेल्या उंदरांच्या पिंजर्यात टाकायचे . इतर उंदिर आपोआप घाबरतात आणि एक्साइट होऊन थयथयाट करू लागतात . घाबरलेला उंदिर एक भितिगंध हवेत सोडत असतो - तो गंध ज्या रसायनामुळे तयार होतो ते रसायन (4-methylpentanal and hexanal ) शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे आहे. (१) आता घाबरलेल्या उंदराची गरज नाही. नुसते ते रसायन हवेत फवारले तर प्रयोगशाळेतले  सारे उंदिर भीतीने थयथयाट करतात.

उंदिर मामांकडे अजून एक भारी फेरोमोन आहे. लहान वयाच्या उंदिर कन्यांच्या अश्रूत हे गंधद्रव्य असते .
मै तो अभी  बच्ची हूं । असे सांगणारे हे गंधद्रव्य आहे. त्याचा वास आला की  उंदिर मामा लहान उंदिर कन्ये वर वाईट नजर टाकत नाही - नव्या माम्या शोधतो !







प्रेमगंधाचि देणगी किडे , पाखरे , पक्षी , बेडुक , उंदिर अशा निम्न स्तरीय प्राण्या पुरती मर्यादित नाही. सस्तन प्राण्यातले प्रेमगंध सुद्धा मिळाले आहेत.  दाढीधारी मस्तवाल बोकड एक विशिष्ट प्रकारचा प्रेमगंध तयार करत असतो  . बोकडाची ताकद आणि त्याचे तरुण वय याच्याशी हा प्रेमगंध संबंधित आहे. या प्रेमगंधाचि तीव्रता शेळीला लगेच जाणवते . नुसती जाणवते असे नाही तर मिस शेळीच्या जननेंद्रियाना उद्दीपित करणारी रसायने मेंदुतुन स्त्रवू लागतात - असे सिद्ध झाले आहे. हा प्रेमगंध बहरला की मग शुभमंगल सावधान ! (२)







बाबा बोकड आपल्या कातडीतून हा मर्दानी प्रेमगंध सोडत असतो . शेळी ताईच्या नाकात तो वास शिरतो . मग नाकातले वासाचे सेन्सर एक्साइट होतात . हे उद्दीपीत सेन्सर म्हणजेच रिसेप्टार - (नर्व्ह)  नसांशी जोडलेले असतात . या नसा शेळीच्या मेंदुतल्या ओल्फ़्याक्ट्रि लोबला म्हणजेच वासाच्या विभागाला  जोडलेल्या असतात. शेळी ताइंच्या नाकातला वास अशाप्रकारे मेंदुतला वासाचा  भाग चेतवतो - हा भाग मग मेंदूतील इतर लैंगिक विभागांना पेटवतो - असे झाले की  शेळी पक्षाकडुन मधुचंद्रास परवानगी मिळते.

उत्क्रांती शास्त्रातील महत्वाची संकल्पना : निवड (सिलेक्षन) 

इथेच आपल्याला एक महत्वाची संकल्पना समजून घ्यायची आहे. आणि त्यानंतर माणसाच्या  प्रेमगंधात नाक खुपसायचे आहे. ती संकल्पना  म्हणजे सर्व बोकड सारख्याच तीव्रतेचे मर्दानी गंध तयार करतील याची खात्री नाही . वासाची तीव्रता मोजण्यासाठी ऑडर युनिट हे एकक वापरतात . हे एकक मिथेन वायुला क्यालिब्रेट केलेले असते . (त्याबद्दल नंतर कधीतरी )

तर समाजा पहिला बोकड ५ ऑडर युनिट इतका मर्दानी वास तयार करतो , दुसरा बोकड १० युनिट आणि तिसरा १०० ऑडर युनिट इतका मर्दानी सुगंध तयार करू शकतो . असे बदल निसर्गात कायम होत असतात .
अतीनील किरणे, काही रसायने, काही विषाणू ,जीवाणू यामुळे बोकडाच्या (आणि सर्व सजीवांच्या ) डी एन ए मध्ये थोडे बहुत बदल (म्युटेशन ) दर पिढीत होतात . त्यामुळे वैविध्य हा जीवसृष्टीचा पहिला नियम आहे . अनियमितता  रैंण्डम आचार  आणि विविधता हि कोणत्याही हेतू शिवाय घडत असते . त्यामुळेच ५, १० आणि १०० असे वेगवेगळ्या तीव्रतेचे मर्दानी वास धारण करणारे बोकड तयार होतात .

जे बदल (म्युटेशन ) बोकडाबाबत खरे आहे तेच शेळी  बाबत हि खरे आहे . काही शेळ्यांना १०० युनिट वाले दणदणीत बोकड आवडणार - काही शेळ्या नाक मुरडत म्हणतिल "श्शी बाई कसला हा उग्र वास ?" आमचे ५ युनिट वाले  "हे"  कसे मंद मंद महकतात ! शेळी  शेळीची  वेगवेगळी आवड !

 रैंण्डम नेस - अनियमित पणा  हा जीवसृष्टीचा महत्वाचा  नियम आहे . 

बोकड बाबा आणि शेळिताइ या दोघांच्या  डी एन ए मध्ये असे अनियमित बदल सतत घडत राहणार . बोकडाला बोकडिण पटत राहणार …….  एक मिनिट आता दुसरा नियम !

जीवसृष्टी हा निसर्गाचाच एक भाग आहे.  निसर्गही अनियमित आहे . निसर्गात वादळे आहेत पूर आहेत दुष्काळ आहेत …. याचा बोकड समाजावर गंभीर परिणाम होणार आहे.

रैंण्डम नेस - अनियमित पणा हा निसर्गाचा सुद्धा नियम आहे . अनियमितता हाच नियम . 


आता कल्पना करा :-
  • समजा बोकडाचा वास आणी त्याची तब्येत याचा घनिष्ट संबंध आहे . १०० युनिट वास वाले बोकड धष्ट  पुष्ट माजलेले असणार आणि  ५ युनिट वाले हडकुळे असणार . 
  • दोघांची लाग्ने  जमत आहेत कारण शेळ्यांना सुद्धा स्वत:च्या  विविध आवडी निवडी  आहेत. 
  • बोकड राष्ट्रात सिंहाची संख्या वाढली तर ? आणि बोकड राष्ट्रात दुष्काळ पडला तर ? दोन्ही शक्यतात काय होऊ शकेल ? याचा आपण विचार करायचा आहे . 
-------------------

शक्यता पहिली : मत्स्य न्याय 






जर बोकड राष्ट्रात सिहांची संख्या वाढली तर दुबळे आणि हडकुळे बोकड लवकर मारतील . कारण त्यांना सिंहापासुन पळून जाता येणार नाही . शक्तिवान बोकड पाळण्यात अधिक भारी आहेत . त्यामुळे ते वाचायची शक्यता अधिक आहे . सबब १०० युनिट वास वाले तगडे मर्दानी बोकड जगतील आणि दुबळे बोकड मारून जातील .
 मंद वासाचे बोकड आवडणार्या शेळ्यांची स्थळे जुळणार नाहीत . सबब मंद वास वाले बोकड आणि त्यांच्या चाहत्या शेळ्या - प्रजनन थांबल्याने नष्ट होणार आहेत .
 बळी तो कान पिळी -  मोठा मासा लहान माशा खाई असा हा मत्स्य न्याय होय  . पण याच्या अगदी उलट दुसरी शक्यता आहे . आणि तीच अधिक प्रभावी आहे . 


शक्यता दुसरी : अनुरूप न्याय 

डास आणी डायनोसोर एकाच काळातले सजीव . डायनोसोर मेले -  डास जगले ! शक्तिवान कोण होते ?

 ज्वालामुखीच्या विस्तवात स्नायूची शक्ती  कामाची  नाही. तिथे डासाचे लहानपण देगा देवा - मला उडत ठेवा  अधिक कामाला  येत असते !


 

डास आणि डायनोसोर एकाच काळातील फ़ोसिल - अश्मीभूत स्तरात मिळतात . 

समजा बोकड राष्ट्रात दुष्काळ पडला . धष्ट पुष्ट बोकडाना भरपूर खायला लागते . त्यामुळे दुष्काळात ते प्रथम मरतील . याउलट कमी अन्नावर जगण्याची क्षमता  लुकड्या बोकडा जवळ आहे ! त्यामुळे दुष्काळी भागात दुबळे ५ युनिट वाले बोकड जगणार त्यांचा वंश वाढणार ….

आम्हाला शंभर युनिट वासाचाच बोकड पाहिजे  असा हट्ट धरणाऱ्या शेळ्या कुमारिका राहणार आहेत. आणि दुष्काळात दुबळ्यांचे राज्य येणार आहे.

याचा अर्थ असा कि

  • जीवशास्त्र आणि निसर्ग दोघेही अनियमित आहेत . 
  • दोन अनियमिततांचा संघर्ष झाला कि    नियोजित वाटणारे अनियमित निकाल लागतात 
  • त्यामुळे दर वेळी जगायला अनुरूप कोण ? हे बदलत राहते.   

सर्व्हायव्हल ऑफ द फ़िटेस्ट चा अर्थ असा आहे की , जो सर्व्हाइव्ह होतो त्याला फीट म्हणायचे असते .  

जो जगतो तो त्या परीस्थीतीला  अनुरूप असतो . 



आता बोकड प्रेमाचे काय ?

परिस्थिती जशी बदलेल तसे बोकड प्रेम बदलणार आहे. दुष्काळात ५ युनिट वाल्या शेळ्यांची चंगळ असली तरी सिंह वाढले तर मात्र लैंगिक उपासमार होणार आहे . १०० वाल्यांनाहि कधीतरी अशी परिस्थिती येइलच !

 निसर्गात सतत बदल होत असतात तसे शेळ्यांचा डीएनए मध्ये सुद्धा होतात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. अनियमितता हाच नियम . बदल हेच सूत्र .  आता काही शेळ्या अशाही तयार होणार आहेत कि ज्यांना ५ ते ५०० युनिट यापैकी कोणताही वास असलेला बोकड चालतो ! त्यांची लैंगिक उपासमार कधीही होणार नाही .

 वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत हजारो पिढ्यात मला  अमुकच बोकडोबा हवा म्हणणार्या शेळ्या नामशेष होणार आहेत. कारण त्यांना लगीन नाही - हानिमून नाही - पोरे पण नाही - तो युनिट  हटवादी गुण पुढच्या पिढीत जाणारच नाही .

५ ते ५०० अशा कोणत्याहि रेंज चा बोकड आपला म्हणणाऱ्या शेळ्या जगणार वाढणार बहरणार!


-----------------------------------------------------------------------------------------------
 इथे एक लक्षात घेतले पाहिजे कि आपण फक्त तार्किक शक्यतांचि चर्चा करत आहोत .  नैसर्गिक प्रक्रीया  अधिक गुंतागुंतिच्या असतात . पण  त्याचे तर्कशास्त्र असेच असते
-----------------------------------------------------------------------------------------------

आता माणसाचे काय ? 

दुर्दैवाने माणसातली फ़ेरोमोन्स अजून तरी मिळालेली नाहीत. मिळणे अवघड सुद्धा आहे. कारण मानवी मेंदूतील वासाचा विभाग फारच लहान आहे. त्यात चेतना कमी आहे . इतर प्राण्यात तो भाग बराच अधिक विकसित असतो. पण इतक्यात निराश व्हायचे कारण नाही . एका  अचाट प्रयोगाची माहिती आपण घेणार आहोत .

पोलिसाचे कुत्रे वासावरून माणुस ओळखते हे तुम्हाला माहित आहे . याचाच अर्थ असा कि प्रत्येक माणसाला स्वत:चा असा एक विशिष्ट वास असतो. हा वास का असतो ? ते प्रथम जाणुन घेऊया - मग स्त्रियांना कोणते पुरुष आवडतात ते लगेचच लक्षात येईल .

माणसाचा गंध हा मुख्यत: त्याच्या घामाला येणारा वास आहे . आपल्या त्वचेवर बारीक बारीक केस असतात . कोणी अनिल कपूर असेल तर त्याला लैच केस असतात . हा केस जिथे त्वचेतून उगवतो . त्याच्या मुळाशी घाम तयार करणारी ग्रंथि असते .





पण या ग्रंथितुन शुद्ध पाणि बाहेर निघते . काही क्षार आणि पाणि बस्स ! मग प्रत्येकाच्या घामाचा वास वेगळा का ? उत्तर सोपे आहे . हा वास घामाचा नसून त्या घामात जे लहान लाहान जीवाणू (Bacteria) राहतात त्यांच्या उत्सर्जनाचा आहे . पण प्रत्येक माणसाच्या शरीरावर वेगवेगळे जीवाणू राहतात - त्यामुळे प्रत्येकाचा वास वेगळा असतो . आता हा अन्याव का म्हणून ?  सगळ्या माणसांचा घाम सारखा असला तरी त्यात वेगळे जीवाणू का ? त्यामुळे प्रत्येकाला वेगळा वास का ?


तुमच्या त्वचेवर कोणते जीवाणू राहतात ?

आपल्या त्वचेवर जे जीवाणू जगू शकतात ते तिथे राहतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती ज्यांना जगू देते ते जीवाणू तिथे राहतात . माणसाला दोन प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती असते . एक अनुभवाने शरीर शिकते ती (Acquired) आणि दुसरी (Innate) जन्म सिद्ध रोगप्रतिकारक शक्ती. हि जन्म सिद्ध रोग प्रतिकार शक्ती आनुवंशिक आहे . आणि मानवी त्वचेवर हि रोग प्रतिकार शक्ती असते . आपल्या डी एन ए मधला  एक महत्वाचा  कोड  ( MHC) हि जन्मजात रोग प्रतिकार शक्ती ठरवत असतो . त्या ( MHC) गुणसुत्रा नुसार रोगप्रतिकार शक्ती ठरते . त्यावर  त्वचेवरील जीवाणूची जात ठरते - आणि त्यानुसार माणसाचा वास ठरतो . अशाप्रकारे पुरुषाच्या वासाचा थेट संबंध त्याच्या जेनेटिक रोगप्रतिकार शक्तीशी आहे . 


घाम - प्रेम आणि प्रयोग 

१९९५ साली क्लोस वेडिकेण्ड  (Claus Wedekind) या स्विस शास्त्रज्ञाने एक अफलातून प्रयोग केला . (३,४) त्याने पन्नास फुटबॉल पटुंचे शर्ट मागवले . घामाने ओलेचिंब झालेले शर्ट . आणि मग त्याने काही तरुण स्त्रियांना बोलावले . आणि विचारले तुम्हाला कोणता टी  शर्ट  वाला आवडेल ?

गंमत अशी की , तो फुटबॉल पटू दिसतो कसा ? त्याचा रंग काय ? वंश काय ? याची कोणतीच माहिती त्या तरुण स्त्रियांना नव्हती . त्यांनी फक्त शर्ट च्या  वासावरून आपली निवड ठरवायची होती.

या प्रयोगातून अतिशय धक्कादायक निष्कर्ष हाती आले . 

प्रेमा तुझा गंध कसा ? एखाद्या स्त्रीला कोणता पुरुष आवडतो ? हे फार कोड्यात टाकणारे कोडे आहे ! लावण्यवती , अतिशय बुद्धिमान आणि सुंदर स्त्रियांनी बावळट आणि माकड चाप लेच्या पेच्या पुरुषांशी प्रेम - विवाह केल्याचे आपण सर्वानीच पाहिले असणार … तिने त्याच्यात काय पाहिले ?   एकुणात जीवाशास्त्राने त्याचे सहज साधे आणि सोपे उत्तर शोधले आहे … स्त्रिया प्रेमाची परिक्षा कशी करतात ?   - प्रेमा तुझा गंध कसा ?


प्रेमा तुझा गंध असा - 

आपले भाऊ वडिल आणि जवळचे नातेवाइक यांचे  टी  शर्ट  स्त्रियांनी नाकारले . आणि स्वत:च्या (MHC) गुणसुत्राहुन भिन्न असे टी  शर्ट धारी पुरुष त्यांना  आवडले . त्यांचे टी  शर्ट आकर्षक सुवासाचे आहेत असे उत्तर त्या तरुण स्त्रियांनी  दिले ! शास्त्रीय कारण अगदी उघड आहे .

आपले होणारे बाळ अधिक जगावे अशी कोणत्याहि आईची इच्छा असतेच . लाखो  वर्षाच्या उत्क्रांतीत अशाच स्त्रिया जगल्या आहेत ज्या  उत्तम रोग प्रतिकार शक्ती असलेल्या बाळाला जन्म देतात . त्यासाठी त्याना स्वत:हून वेगळी अशी जास्तीची रोग प्रतिकार शक्ती बाळाला द्यायची असते . जवळच्या नातेवाइकाशि लग्न केले तर आइपेक्षा वेगळी रोगप्रतिकार शक्ती कशी मिळणार ? आणि ज्या जवळच्या नातेवाइकाशि लग्न करणारी गुणसुत्रे बाळगतात त्या उत्क्रांतीत सिलेक्ट होणार नाही . त्यांचा वंश टिकणार नाहि.

त्यामुळे ज्या स्त्रियांना स्वत: हून दूरच्या जेनेटिक पुरुषाला हुंगता येते - त्या उत्क्रांतीत सिलेक्ट झाल्या आहेत . त्यांचीच बाळे जगली आहेत . आंतरजातीय विवाह करणे हि स्त्री ची जेनेटिक ओढ आहे हे लक्षात घ्या . त्यातून त्यांच्या बाळास अधिकचि इम्युनिटि असणारी गुणसुत्रे मिळणार आहेत.


प्रेमाचा गंध हा असा आहे . घामाचा वास - वासातले जीवाणू - त्यामागची वेगळी रोग प्रतिकारशक्ती - आणि  बाळाची-  जगण्याची  जास्तीची  शक्यता - मनुष्यमात्राच्या हजारो पिढ्यात प्रेमाला असा गंध गवसला आहे . सिलेक्ट झाला आहे.

शेळ्यांना बोकड गवसले तसाच ! स्वत:हून भिन्न  रोगप्रतिकार शक्तीचा पुरुष स्त्रियांना आवडणार आहे . ते स्त्रिया वासावरून ठरवणार आहेत . आपण सांस्कृतिक कारणे दाखवत हि नैसर्गिक उबळ मारून टाकतो …  आता कोणाला एक्स परफ्युम मारून नैसर्गिक आकर्षण असणारा वास ठार मारायचा असेल तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे ----- पण त्यामागे हि एक वैज्ञानिक  कारण आहे.





पुरुषाला अत्तर लावून नैसर्गिक वास लपवून - स्त्रीची जैविक दिशाभूल करता येते आणि आपल्या इतर गुणांवर तिला पटवता येते ! बाकी स्त्रिया त्यांचा हुंगायचा  उद्योग सोडणार नाहीत पुरुष त्यांचा लपवायचा  उद्योग सोडणार नाही . स्त्रियांचे परफ्युम मंद वासाचे असतात …… याउलट पुरुषांना वास लपवायला उग्र  अत्तरे लागतात - जगाच्या पाठीवर कुठेही अत्तराचा क्रम हाच आहे - आणि प्रेमाचा गंधहि असाच आहे !


संदर्भ

-----------------------------------------------------------------------

१) http://www.asianscientist.com/2015/01/in-the-lab/scent-anxiety/
२) http://www.u-tokyo.ac.jp/en/utokyo-research/research-news/discovery-of-male-effect-pheromone-in-mammals/
३) https://en.wikipedia.org/wiki/Claus_Wedekind
४) http://www.pbs.org/wgbh/evolution/library/01/6/l_016_08.html
५) http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-3451532/Dating-app-matches-SMELL-Service-analyses-sweaty-t-shirts-people-like-scent-not-showering.html

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *