१६ नोव्हें, २०१६

अमेरिका डायरी (भाग १ ते भाग ३ )

क्यान्सर आणि रोगप्रतिकार शक्ती

माझा उत्तर अमेरिकेतील आधी ठरलेला मुक्काम काही महिने होता - तो आता काही वर्षे झालेला आहे . त्यामुळे मंडळाच्या सदस्यांना कळवण्यात येते कि , पुढील काही वर्षे कामानिमित्त मी अमेरिका आणि युरोप येथे असेन. भारतात पुढच्या वर्षी येईन . आधी ठरवलेले भारतातले काही कार्यक्रम नाईलाजाने रद्द करावे लागत आहेत.
इथे एका नवीन मोलेक्युल वर काम करणार आहे . हे नवे औषध शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीला ट्रेन करते . आणि नैसर्गिक रीतीने क्यान्सर बरा होतो. कित्येक प्रकारच्या क्यान्सर मध्ये किमोथेरपी ची गरज सम्पते .
क्यान्सर होणे हे नैसर्गिक आहे . ती उत्क्रान्तीची देणगी आहे . शरीराची वाढ होताना म्हणा किंवा दररोज चे वेअर एन्ड टिअर म्हणून म्हणा - आपल्या शरीरातील पेशी सतत विभाजित होत असतात . पेशी विभाजनात डीएनए ची कॉपी होते . अशा असंख्य कॉप्या बनत असताना काही केमिकल चुका होतात . त्यामुळे काही पेशी गंडतात , आणि माजतात . स्वतः:ला वेगळा सजीव समजून स्वतः:च्या असंख्य कॉप्या बनवू लागतात . त्याची पुढे क्यान्सर ची गाठ बनते . एसबेसटॉस किंवा तंबाकू सारख्या पदार्थामुळे पेशी गंडायची शक्यता वाढते . पण हे पदार्थ जरी नसले तरीही विभाजन प्रक्रियेत पेशी गंडायची थोडी शक्यता असतेच . त्यामुळे तंबाखू खाणार्यात क्यान्सर ची शक्यता जास्त असते पण जे खात नाहीत त्यांनाही तोंडाचा क्यान्सर होण्याची थोडी शक्यता असतेच.
आपल्या शरीरातील अनेक पेशी अनेक कारणामुळे गंडत असतात . त्या अर्थाने तुम्हाला मला सर्वानाच दररोज क्यान्सर होत असतो . तो वाढत नाही कारण आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती त्याला मारून टाकते. क्यान्सर वाढून त्याची गाठ होते तेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती गंडलेली तरी असते किंवा क्यान्सरच्या पेशी हुशार झालेल्या असतात . त्या आपण नॉर्मल असल्याचे ढोंग करतात . नॉर्मल पेशीसारखे कपडे घालतात - (सेल वोल प्रोटीन )
आपली रोगप्रतिकारशक्ती नॉर्मल पेशिंना मारत नाही . क्यान्सर च्या पेशी नॉर्मल असल्याचे ढोंग करतात म्हणून त्याची गाठ बनते . वाढते पसरते मग माणूस मरतो .
मी ज्या नव्या औषधावर काम करतो आहे - ते औषध ढोंगी क्यान्सर पेशिंचे नॉर्मल कपडे काढून टाकते . त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीला या लबाड पेशी ओळखू येतात . आणि क्यान्सर वर शरीर हल्ला बोल करते .इम्युनिटी चे अंतरंग

नैसर्गिक रोग प्रतिकार शक्तीला वापरून क्यान्सर वर उत्तर शोधता येते हे आपण मागील भागात पाहिले . आता रोग प्रतिकार शक्ती अधिक खोलात समजून घेऊ. सर्दी पडशासारखे अनेक रोग औषध न घेताही बरे होऊ शकतात . मानवी शरीराची रोग प्रतिकार शक्ती हे काम करते.
माणसाला दोन प्रकारच्या इम्युनिटी - प्रतिकार शक्ती असतात . एक अनुभवाने शरीर शिकते ती (Acquired) आणि दुसरी (Innate) जन्म सिद्ध रोगप्रतिकारक शक्ती . क्यान्सर बाबत विचार करताना (Acquired) अनुभवजन्य रोगप्रतिकार शक्ती अधिक महत्वाची आहे . ही अतिशय चलाख सिस्टीम आहे . जुन्या अनुभवातून ती अधिक शिकत शहाणी होत जात असते.
उदाहरणार्थ गालगुंड, कांजिण्या यासारखे आजार लहानपणी एकदाच होतात . पुन्हा होत नाहीत कारण त्याच्याशी लढायला इम्युनिटी प्रशिक्षित झालेली असते .
पोलियो ची लस म्हणजे काय असते ? पोलियोचे मेलेले किंवा बिनविषारी केलेले व्हायरस म्हणजे पोलियोची लस. हे पोलियोचे मरतुकडे व्हायरस आपण आपल्या पोरांना लसीकरण म्हणून खाऊ घालत असतो. बाळाची अल्पशिक्षित इम्युनिटी अशा मरतुकड्या व्हायरस चा फन्ना क्षणात उडवते . पण त्याहून महत्वाचे म्हणजे या व्हारसला कसे हाणायचे ? ते जन्मभर लक्षात ठेवत असते . लसीकरण हे एक प्रकारचे इम्युनिटी ला दिलेले प्रशिक्षण आहे .
रोग प्रतिकार शक्ती चा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तिचा आप - पर भाव . स्वत:चे कोण ? आणि परके कोण ? हे इम्युनिटी ओळखू शकते . लक्षात ठेऊ शकते. रेल्वेत जसा तिकीट तपासणारा टीसी असतो तसा टीसी प्रतिकारशक्ती कडे पण असतो . शरीरातील कोणती गोष्ट स्वकीय आहे ? कोणती परकीय आहे ? याची सतत तपासणी चालू असते . जे परकीय वाटेल त्याच्यावर हल्ला केला जातो . हा हल्ला केमिकल किंवा प्रत्यक्ष असतो . प्रत्यक्ष हल्ल्यात पोलीस पेशी जाऊन परकीय ब्याक्टेरिया खाऊन टाकतात . आणि पचवतात . मग ढेकर देतात .


टिसी आणि पोलीस हे रोगप्रतिकार शक्तीचे महत्वाचे भाग आहेत . काही पोलीस स्वतः जाऊन परकीयांना अक्षरश: खाऊन टाकतात . काही पोलीस गोळी मारतात . त्याला अँटीबॉडी असे म्हणतात . हा एक केमिकल रेणू आहे .कोणत्या प्रकारचा शत्रू कोणत्या गोळीने मरतो ? हे इम्युनिटी लक्षात ठेवत असते . हे लक्षात ठेवण्याचे काम एका कारकून पेशी कडे दिलेले असते . रोगावरचा उपाय लक्षात ठेवणारे कारकून , आपला कोण ? आणि घुसखोर कोण ? ते ठरवणारे टीसी , आणि प्रत्यक्ष हल्ला बोल करणारे पोलीस असे मानवी रोग प्रतिकार शक्तीचे महत्वाचे तीन भाग आहेत .


यातला टीसी हा गृहस्थ हल्लाबोल करण्याचे आदेश काढत असतो . क्यान्सर सेल नॉर्मल नसतात . त्यांच्या जवळ नॉर्मल पेशींचे तिकीट नसते तेव्हा टीसी हल्लाबोल करण्याच्या सूचना पोलीस पेशींना देतात . अनेकदा क्यान्सर च्या पेशी बनावट नॉर्मल तिकीट तयार करतात . आणि टीसी पेशींना उल्लू बनवून स्वतः:ची संख्या वाढवू लागतात .
यातली काही प्रकारची बनावट तिकिटे आपल्याला माहीत झाली आहेत. ही बनावट तिकीट फाडून टाकणारी औषधे मिळालेली आहेत . इथे एक लक्षात घेतले पाहिजे कि नॉर्मल सेल नॉर्मल असते त्याकडे रेल्वेचा पास असतो . भरपूर तिकिटे असणाऱ्या पासधारी नॉर्मल पेशींवर या औषधाचा परिणाम होत नाही.
विकृत क्यान्सर सेल मात्र एका तिकिटावर आपले काम भागवत असतात . त्यांच्या सेल वोल वरचे एक प्रोटीन म्हणजे हे बनावट तिकीट . ही बनावट तिकीट फाडून टाकणारी औषधे मिळालेली आहेत .
अशा बनावट तिकीटधारी सेल ओळखून काढायला प्याथॉलॉजी च्या काही टेस्ट विकसित करून त्या स्टयांडरडाइज कराव्या लागतात . वेगवेगळ्या औषधासाठी , क्यान्सर प्रकारासाठी आणि तिकिटासाठी वेगवेगळ्या टेस्ट असतात.
माझे काम तिकीट आणि औषध याची सांगड बसवण्याचे आहे . ते नेमके कसे केले जाते ? हे पुढच्या काही भागात पाहूया .
त्याचबरोबर अर्थकारण आणि राजकारण हे आरोग्य या विषयावर कसे प्रभाव पाडत असते ? तेही समजून घ्यायचे आहे - पुढचा भाग उत्तर अमेरिकेतील राजकारण आणि त्याचा जागतिक आरोग्य सुविधांवर पडणारा प्रभाव यावर असेल .

 सेकंड अमेंडमेंट

ही अमेरिकन राज्यघटनेतली दुसरी घटना दुरुस्ती - बंदूक वापरण्याच्या अधिकाराबद्दल आहे. सध्याच्या ट्रम्प विरुद्ध हिलरी लढतीत हा बंदुकीचा मुद्दा गाजतो आहे. अमेरिकेतले अंतर्गत राजकारण - जगभरातल्या सरंक्षण , उद्योग , अर्थ आणि आरोग्य व्यवस्थांवर परिणाम करत असते . अमेरिकेतले राजकारण समजून घेण्यासाठी " सेकंड अमेंडमेंट " हे चपखल उदाहरण आहे .
माझ्या एका नातेवाईक आणि मित्राला भेटायला पिट्सबर्ग नावाच्या शहरात गेलो होतो . त्याने हा बंदुकींचा खजिना दाखवला . या बंदुका वाण्याच्या दुकानात विकत मिळतात. विकत घ्यायला १५ - २० मिनिटे लागतात . बंदुका, गोळ्या ,मशिनगन याची ऑनलाईन खरेदी करता येते . सहज कोणतीही चौकशी न करता सैन्यदल वापरते त्या ऑटोम्याटिक मशीन गन कुणीही विकत घेऊ शकतो . मोठ्या क्यालिबरच्या शॉटगन हि एक लहान तोफ असते . अशा संहारक बंदुका अठरा वर्षे पूर्ण झालेला कोणीही अमेरिकन विकत घेऊ शकतो - घरी बाळगू शकतो. स्व सरंक्षण किंवा प्रॉपर्टी मध्ये घुसणाऱ्या विरुद्ध फायरिंग करू शकतो . (ट्रेस पासिंग )


फोटोग्राफी : अश्विन जोशी यांची 
वरील फोटोतल्या साऱ्या बंदुका एकाच व्यक्तीच्या कायदेशीर मालकीच्या आहेत . अमेरिकेतील अनेक भागात माणसापेक्षा दरडोई बंदुकीची संख्या जास्त आहे . उदाहरणार्थ एका टेक्सस राज्यातल्या सामान्य माणसांकडे जितक्या बंदुका आहेत - तितक्या बंदुका जगाच्या पाठीवरील अनेक देशांच्या अधिकृत सैन्यांकडे देखील नाहीत. ना संख्येने - ना संहारक क्षमतेने !
अमेरिकन राज्यघटनेत हि दुसरी घटना दुरुस्ती का झाली ? याचा इतिहास मोठा मजेशीर आहे. राज्यघटना हा देशातल्या नागरिकांनी एकमेकांशी केलेला करार असतो. १७८९ साली अमेरिकन राज्यघटनेने आकार घेतला . नंतर त्यावर चर्चा सुरूच होती ... त्यानंतर काही वर्षात झालेल्या घटना दुरुस्त्यांना घटने इतकेच महत्व आहे . बंदूक बाजीची घटना दुरुस्ती क्रमांक दोन वर आहे. (१७९१: सेकंड अमेंडमेंट )
युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका या नावात काही अर्थ आहे . हा स्टेट म्हणजे राज्यांचा संघ आहे. हि सर्व राज्ये काही करार मदार करून एकत्र आली आहेत .सुरुवातीला अमेरिका ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग होती . चार जुलै चा स्वातंत्र्य लढा देऊन ती ब्रिटिशापासून स्वतंत्र झाली हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे .
१६८९ सालच्या इंग्लिश कायद्या नुसार ब्रिटिश प्रजेला शस्त्र धारणेचा अधिकार आहे .. तत्कालीन ब्रिटन मध्ये अनेक पदरी संघर्ष सुरु आहे . राजा विरुद्ध पार्लमेंट , केथोलिक विरुद्ध प्रोटेस्टंट यापैकी कुणी कायमचा दादा बानू नये म्हणून - बंदूक बाळगायचा अधिकार सर्वाना देण्यात आला . हि एक तडजोड होती . त्याला विकसित होणाऱ्या लोकशाहीची , आधुनिकतेची आणि सत्त्तेच्या समान वाटपाची पार्शवभूमी आहे.
सशस्त्र लोक निःशस्त्रावर सत्ता गाजवतात . ... 
जर सर्वाकडे शस्त्रे असतील तर सत्तेचा आणि राजकारणाचा समतोल साधला जाईल असा हा प्र्याक्टीकल विचार आहे. १७९१ साली अमेरिकन राज्यघटनेत हा विचार पुन्हा आला . आता अमेरिका ब्रिटन पासून राजकीय अर्थाने स्वतंत्र आहे . पण अमेरिकेत सुद्धा सत्तेच्या समतोलाची गरज आहे .
१७९१ सालच्या बाळ अमेरिकेत - दक्षिणेतली राज्ये विरुद्ध उत्तरेतली राज्ये अशा मारामाऱ्या आहेत. प्रत्येक राज्याला स्वतः:चे काही स्वातंत्र्य अबाधित ठेऊन मगच अमेरिकन संघराज्यात सामील व्हायचे आहे . सत्तेचा समतोल साधण्यासाठी सेकंड अमेंडमेंट आहे असा एक विचार प्रवाह आहे . दक्षिणेतल्या राज्यात (काळ्या ) आफ्रिकन गुलामांची पद्धत रूढ आहे. गुलामांचे व्यवस्थित शोषण करता यावे म्हणून त्याना (militia) खाजगी सैन्याची आवश्यकता होती . बंदूक बाळगायचा अधिकार दक्षिणी राज्यांनी गुलामी टिकवायला मागितला असाही प्रवाह आहे . (पेट्रिक हेन्री )

एकूण पाहता लोकशाहीसाठी अथवा गुलामीसाठी ! असे बंदूक बाळगायचे अनेक मार्गानी समर्थन करण्यात आले . ट्रम्प बाबा बंदुकीच्या बाजूचे आहेत . हिलरी आज्जीला या कायद्यात बदल करायचे आहेत.
उत्तर अमेरिकेतली राजकीय व्यवस्था आणि हेल्थ सिस्टीम याचाही घनिष्ट संबंध आहे . त्याचा परिणाम जगभरातल्या हेल्थ सीस्टीम वर पडत असतो . तो कॅन्सर विषयक संशोधनावर सुद्धा पडतो . अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आपल्या पेक्षा बरीच वेगळी आहे. तिथे अध्यक्ष कोण असावा ? यासाठी सामान्य जनता प्रत्यक्ष मतदान करते .

प्रत्येक राज्याला काही हायपोथेटिकल सिटा दिलेल्या असतात . त्याची बेरीज होते आणि त्यानुसार अध्यक्ष ठरतो . भारतीय लोकशाहीत आपण निवडून दिलेले खासदार पंतप्रधान ठरवत असतात . अमेरिकेत मात्र राज्यांच्या हायपोथेटिकल वजना नुसार - त्यातली सामान्य जनता अध्यक्ष कोण असावा ? हे ठरवत असते . इथे एक महत्वाचा फरक असा कि खासदार खरेदी विक्रीची भारतात सोय आहे - अमेरिकेत तशी सोय नाही . कारण अध्यक्षा साठी प्रत्यक्ष जनता मतदान करते.
अमेरिकेत निवडणुकीतला भ्रष्टाचार सुद्धा नाही कारण-- इथे भ्रष्टाचारच कायदेशीर आहे !

उद्योगपती राजकीय पक्षांना पैशे देऊ शकतात .यात अट इतकीच आहे कि कोणी कोणत्या पक्षाला किती पैसे दिले ? ते जाहीर करायचे कायदेशीर बंधन आहे . याला भ्रष्टता म्हणणे अवघड आहे - कारण त्यातला लबाडीचा भाग वजा झालेला आहे - जे काही आहे ते खुल्लम खुल्ला आहे .
अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट अशा दोन पार्ट्या आहेत . त्यांच्या नावावर जाऊ नका - रिपब्लिकन हि इथे उजवी पार्टी आहे . डेमोक्रॅट - लोकशाहीवादी आघाडी हा डावा पक्ष आहे .नावाचा भाग अलहिदा ठेवला तरी भारतातल्या उजव्या डाव्या विचाराशी याची नाळ जोडणे जरा कठीण - परिस्थिती फार वेगळी आहे . अमेरिकेतले पेट्रोल - खाण आणि अवजड उद्योग वाले भांडवलदार ट्रम्प बाबा च्या रिपब्लिकन पार्टीचे असतात . फेसबुक मायक्रोसॉफ्ट सारखे नवश्रीमंत लोक्स डाव्या हिलरींच्या डेमोक्रेट पार्टीला पैशे देतात.
अमेरिकेत गन लॉबी आहे. बंदूक लॉबीचे धनाढ्य कारखानदार युद्धखोर राजकारणाला मदत करतात ...
 हे बुरजवा लोक्स - अमेरिकेतील राजकारण आणि पर्यायाने जगाचे युद्धकारण ठरवत असतात असेही काही जण म्हणतात . हे बोलणे फ्याषनेबल आहे ! पण वास्तविक जागतिक राजकारणाला अनेक पदर असतात . मानवी व्यवहार "फक्त" पैशावर चालतो - असते म्हणायचे असेल तर आपल्याला कम्युनिस्टां इतके हुश्शार  व्हावे लागेल ! तरीही जागतिक युद्धकारणावर "काही अंशी" प्रभाव - या गन लॉबीचा आहे - हे खरेच .
आपला मुद्दा बंदूक नाही . आरोग्य आहे. ..अमेरिकेचे आरोग्य विषयक धोरण त्यातील - "कशाच्या संशोधनाला चालना मिळेल ? हे ठरवते ". त्यानुसार जगभरातले आरोग्य विषयक व्यवहार ठरतात कारण मूलभूत संशोधन मुख्यत: अमेरिकेत होत असते...
आता  आपण अमेरिका  आणि आरोग्यव्यवस्था या विषया कडे वळूया  .....
क्लिव्हलॅन्ड ते वॉलस्ट्रीट
हि आमची क्लिव्हलॅन्ड क्लिनिक मधली मित्रमंडळी .वेगवेगळ्या देशातली आहेत - भाषा वेगळी वेगळी आहे - मी मराठी माध्यमात शिकलो. सरकारी शाळा . थोडक्यात इंग्लिश ची बोंब . चालणे - वॉक चा भूतकाळ वाकड . वर्क चा भूतकाळ वरकड ....


पुढे विज्ञान किंवा मेडिकल साठी कामापुरते इंग्लिश भागते . खर्या अर्थाने इंग्रजी साहित्य , भाषा, बोली , उच्चार हे शिकायची अजिबात गरज पडली नाही. महाराष्ट्रात चांगले शैलीदार मराठी लिहीणार्या किंवा बोलणार्या माणसाला नको तितका मान मिळतो . बाकी ठिकाणी हिंदीत भागते . मेडिकलची पुस्तके वाचता येतील इतपत इंग्लिश येत होते. खरी बोंब लागली माझी- ती कामा निमित्ताने परदेशी लोकांशी संबंध आल्या नंतर ...
दोन तीन वर्षांपूर्वीचा काळ आठवतो - जरनल क्लब मध्ये काहीतरी बोलायचे असायचे . बरेच मुद्दे मनात घोळायचे - समोर इंग्रज आला कि गप बसायचो . बोलण्यापुरते इंग्लिश येत होते . पण त्याने काही प्रश्न विचारला - तर तो प्रश्न काय आहे ? हेच समजायचे नाही . उच्चार सगळे डोक्यावरून जायचे .
हा जो एक्सेंट म्हणजे उच्चार नावाचा प्रकार आहे तो अजब आहे . त्याला सांस्कृतिक , ऐतिहासिक असे बरेच संदर्भ आहेत . म्हणजे गिलबर्ट या इंग्लिश नावाचा उच्चार फ्रेंच मध्ये जिब्राइल सारखा का होतो ? यावर एक निबंध लिहिता येईल. इंग्लड मध्ये बारा बोलीभाषा आहेत - कोकणी कोल्हापुरी भोजपुरी सारख्या . अमेरिकन, ब्रिटिश , पोर्तुगीज , फ्रेंच , चिनी, तुर्की हे सारे आपल्या आपल्या इंग्लिश मध्ये बोलू लागले तर तेला शिवाय भेजा फ्राय होतो . उच्चार सगळे डोक्यावरून जायचे . हा मुद्दा आहे .
गेली काही वर्ष अनेक युरोपियन - एशियन लोकांशी संबंध आला . त्यावेळी प्रत्यक्ष बोलताना अडखळायचो . समोरचा माणूस नेमका काय बोलतो आहे तेच कळायचे नाही . मग काही महिन्या पूर्वी ट्यूब पेटली ....
संभाषण म्हणजे शब्द नाहीत . ते त्याहून काहीतरी अधिक आहे . बहिऱ्या व्यक्ती सुद्धा ऐकू शकतात . त्याला लीप मुव्हमेंट म्हणतात . ओठाच्या हालचालीवरून नेमके कोण काय बोलतो आहे - ते कर्णबधिर व्यक्तीला ५०% बोलणे कळू शकते . ओठाची हालचाल - चेहर्यावरचे भाव - देहबोली - मान डोलावण्याची पद्धत हि सगळी भाषाच आहे. आणि गंमत अशी कि हि भाषा इंग्रजी नाही . ही स्थानिक आहे.
माझया टीम मध्ये क्यानडा , चिनी , पोर्तुगीज , तुर्की, अमेरिकन , ब्रिटिश , ऑस्ट्रलियन अशा सर्व देशाचं प्रतिनिधित्व आहे. ते सारे मेडिकल डॉक्टर किंवा बायोकेमिस्टरी चे पीएचडी आहेत . क्लिव्हलॅन्ड क्लिनिक सध्या क्लिनिकल रिसर्च च्या संख्येत अमेरिकेत प्रथम क्रमांकावर आहे. इतक्या चांगल्या इन्स्टिट्यूट मधल्या सहकार्यांना सुद्धा अनेकदा एकमेकांचे उच्चार कळत नाहीत हे पाहून बरे वाटले. च्यायला म्हणजे मी एकटाच "ढ" नाहीये इथे !
आपण उजवी डावीकडे मान हलवून (*नाही - नाही) असे म्हणतो - त्याचा अर्थ जगात अनेक ठिकाणी (हो- हो अवश्य ) असा होत असतो ! चेहर्यावरचे भाव, ओठ दुमडण्याची पद्धत हे सारे स्थानिक असते . आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीशी संभाषण करतो तेव्हा फक्त शब्द ऐकत नसतो - चेहर्यावरचे भाव , देहबोली , कानी ऐकू येणारे शब्द हि सारी भाषाच असते .
मग मी एक शक्कल काढली - कदाचित आपण देहबोली ला जास्त महत्व देतोय ... उच्चार आणि हावभाव याची गल्लत करता कामा नये . हावभावाकडे संपूर्ण डीफोकस - दुर्लक्ष करायचं - आणि फक्त शब्द ऐकायचे - खच्चून अंधाराने भरलेल्या खोलीत एक काडी पेटावी आणि सगळे उजळून जावे - तसे झाले - देहबोली कडे दुर्लक्ष केले तसे सारे उच्चार कळू लागले .

जे क्लिव्हलॅन्ड बाबत खरे आहे ते वॉलस्ट्रीट बाबत सुद्धा खरे आहे . वॉलस्ट्रीट ला फक्त पैशाची भाषा कळते . हि भाषा समजून घ्यायची असेल तर - देहबोली कडे दुर्लक्ष करावे लागेल - त्याचबरोबर अर्थकारण आणि राजकारण हे आरोग्य या विषयावर कसे प्रभाव पाडत असते ? तेही समजून घ्यायचे आहे -

(क्रमश:)


सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *