सामाजिक प्रश्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक प्रश्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१७ मार्च, २०१४

विज्ञानाच्या चष्म्यातून जाती



विज्ञानाच्या चष्म्यातून जाती 


( जात पात  आणि जातिव्यवस्था यातला मूर्खपणा विज्ञान , बुद्धिवाद , गणित आणि लॉजिकने खोडून काढणारा मनोरंजक लेख …… )


तुमचे पूर्वज किती ?


स्वत:च्या जातीविषयी अभिमान हे सर्व भारतीयांचे समान लक्षण आहे . आपल्या पूर्वजांविषयीचा अभिमान आणि मग त्यातून उद्भवणारा स्व जातीविषयक अभिमान मग त्यातूनच उगवणारा इतर जाती विषयीचा तुच्छतावाद हे भारतीय समाजाचे आणि परिणामि इथल्या अनेक धार्मिक , सामाजिक आणिक राजकीय विचारधारांचे प्रमुख अंग आहे .  आनुवांशिकता , डी एन ए , असे विज्ञान सदृश शब्द वापरून या पुरातन मानसिकतेचे समर्थन केले जाते . प्रस्तुत लेखात आपण विज्ञानाच्या चष्म्यातून जातींकडे पहायचे आहे .

चला तुमच्या आराम खुर्चीत जरा रेलून बसा .हातात एक गरम कॉफीचा वाफ़ाळता कप  असू द्या  .  आपण मेंदूचा व्यायाम करणार आहोत . तुमचे पूर्वज किती ? तुमच्या पूर्वजांच्या संख्येत जातीव्यवस्थेचे गुपित  दडले आहे . आई  आणि बाप हे दोन पूर्वज झाले . आजी आजोबा दोन्हीकडचे पकडले तर ४ होतात आणि दोन पिढ्यांमागे पुर्वजांची संख्या होते ४. तीन पिढ्या मागे गेले तर हि संख्या आठ वर जाते . आपल्या पैकी प्रत्येकाला आठ पणजी पणजोबा आहेत . हि संख्या भूमितीय गतीने वाढत जाते. जितक्या पिढ्या मागे जायचे आहे तितक्या वेळेला दोन या संख्येला दोन ने  गुणायचे आहे . साधे शाळेतले गणित ! आजी आजोबांच्या पिढीत म्हणजेच दोन पिढ्या मागे आपल्या पूर्वजांची संख्या दोनाचा दुसरा घात = ४ एव्हढी असते. तीन पिढ्या मागे गेले तर पूर्वजांची संख्या ८ आहे . चार पिढया पूर्वी दोनाचा चौथा घात म्हणजे आपले १६ पूर्वज होतात . इथ पर्यंत ठीक आहे .   जितक्या पिढ्या मागे जायचे तितक्या वेळेला दोन ला दोन ने गुणले कि आपल्याला पूर्वजांची संख्या मिळते . ज्या पिढीतल्या पूर्वजांची संख्या शोधायची आहे त्या संख्ये एव्हढा दोनाचा घात त्या पिढीतल्या आपल्या पूर्वजांची संख्या दाखवेल हे गणिती सूत्र आपल्याला मिळाले !

पण जातीचा अभिमान केवळ या सोळा पूर्वजा पर्यंतच मर्यादित नाही . प्रत्येक जातीला कमीत कमी दोन हजार वर्षापुर्वीच्या पुर्वाजाबद्दल प्रेम वाटत असते . त्यांचा अभिमान वाटत असतो . आणि दोन हजार वर्षापूर्वीच्या अपमानाचे उट्टेहि काढायचे असतात .


1) गणित पहिले : अफ़ाट पुर्वज 


साधारण पंचविसाव्या वर्षी मुले होतात असे गृहीत धरू . खरे तर इतिहासात यापेक्षा लवकर मुले होत आली आहेत . तरी आपल्या गणिताच्या सोयीसाठी आपण पंचविसाव्या वर्षी मुले होतात असे गृहीत धरू . म्हणजे शंभर वर्षात चार पिढ्या झाल्या. हजार वर्षात चाळीस पिढ्या होतील . आणि दोन हजार वर्षात ८० पिढ्या होतात . आणि आपण आधीच सिद्ध केल्यानुसार दोन हजार वर्षापूर्वी तुमच्या पूर्वजांची संख्या मोजण्याचे सूत्र आपल्याला ठाउक झाले आहेच . ती संख्या येईल दोनाचा ८० वा घात .







दोनाचा ८० वा घात . दोन ला ८० वेळा दोन ने गुणायचे आहे . इथे मात्र आपल्याला सायनटिफ़िक केलक्युलेटर लागणार आहे. एक्स  चा वाय वा घात काढण्याचे एक बटण त्या  केलक्युलेटर वर आहे .
 २ चा ८० वा घात = 1208925819614629174706176 अशी एक अगडबंब संख्या मिळते .
हि संख्या आपण वाचूही शकत नाही . आजही पृथ्वीची तेव्हढि लोकसंख्या नाही . बरे हे पूर्वज एका माणसाचे झाले बरका ! आजच्या सर्व माणसांचे पूर्वज याच गणिताने काढले आणि त्यांची बेरीज केली तर तेव्हढि माणसे उभी करायला शंभर पृथ्व्यांचे क्षेत्रफ़ळ हि पुरणार नाही . या पहिल्या गणिती संकल्पनेला अफ़ाट पुर्वज असे नाव देऊ . काहीतरी चुकते आहे नक्की ! नेमके काय  चुकते आहे ? ? ते पुढे पाहूच …  पण स्वत:ची  जात आणि पूर्वज याविषयी थोडा वेगळा विचार करावा लागणार हे नक्की ....  !! .


नातेवाइकात अंतर्गत लग्ने  होतात . 

एकाच कुटुंबात लग्ने होत असतात . आणि आपण ज्यांच्याशी लगिन  करू शकतो असे आपले रक्त बांधव म्हणजेच "जात" हे तर आपण विसरूनच गेलो कि !  अनेक जातीत विवाह करण्यापूर्वी पदर जुळवण्याचा विधी आहे .  आपल्या आधीच्या पिढ्यात कोणि नातेवाइकानि लग्न केले आहे का ? हे तपासले जाते आणि मग तसा पदर आधीच्या पिढीत जुळला असेल तरच लग्न केले जाते . म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्यात नातेवाइकात लग्ने  झालेली आहेत . दूरचे चुलत मावस भाऊ बहिण लग्न करत असतात त्यामुळे आपले पूर्वज अगडबंब संख्येत नसतात . समजा तीन पिढ्यांपूर्व आपल्या सोळा पुर्वाजात कोणि चुलत मावस सोयरिक जुळवली असेल तर चार पिढ्या पूर्वीच्या पणजोबांची संख्या कमी भरते….  कारण चुलत मावस बहिण भावांचे काही पणजोबा समान असणार आहेत .  चला म्हणजे आपल्या पूर्वजांची संख्या 1208925819614629174706176 एव्हढी अगडबंब नाही . नात्यातल्या लग्नांना धन्यवाद ! नाइतर लई पितरांचे पारणे फेडत बसावे लागले असते !

चला.  पुन्हा एकदा आरामखुर्चीत रेला . गरम वाफ़ाळत्या कॉफीचा  अजून एक घुटका घ्या . आता आपण  उलटे गणित करणार आहोत . आपले आधीचे गणित साफ चुकले आहे . नव्याने विचार करावा लागणार आहे . दर वर्षी पृथ्वीची लोकसंख्या वाढत जाते हे आपल्याला माहित आहे.  म्हणजे दर एक पिढीत मागे मागे गेले कि पूर्वजांची संख्या कमी कमी  होत गेली पाहिजे कारण साधारणत : एकापेक्षा जास्त मुले होण्याकडे कल असतो . चार पोरांचे आईबाप दोन असतात म्हणजे मागच्या पिढीत पुर्व जांची संख्या वर्ग मुळा  एव्हढी झाली ! पूर्वीचे गणित प्रत्यक्षात उलटे चाललेले दिसते !    मगाशी आपण एका व्यक्तीच्या पूर्वजांची संख्या शोधण्याचा प्रयत्न केला . आता उलटा विचार करू या .


आज  पृथ्वीवरच्या सर्व माणसांचे पूर्वज किती होते ?
ते शोधून काढु ! विचार करायला सोपे जावे म्हणुन एक छोटे गाव उदाहरणार्थ  घेऊ .




2 ) गणित दुसरे : दोनच  पूर्वज : आदम आणि इव्ह


पश्चिम महाराष्ट्रातले एक गाव सावरखेड ! चला तर या काल्पनिक गावात समजा आज पाचशे लोक रहात आहेत . आधीच्या पिढीत किती बरे लोक रहात असतील ?  समजा या गावाची लोकसंख्या स्थिर आहे .  गेले कित्येक वर्षे इथे ५०० च लोक राहतात . मग आजच्या ५०० लोकांचे पूर्वज किती ? इथे काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत .

१) काही लोक नपुंसक असतात .
२) काही लग्ना आधीच मारून जातात
३) काहीची मुले लवकर मरतात

म्हणजे आजच्या पाचशे लोकांचे पूर्वज किती ?  काही लोकाना स्वत:चे वंशसातत्य राखता येत नाही हे लक्षात घेतले तर सहज लक्षात येईल कि ५०० लोकांचे पूर्वज ५०० पेक्षा कमी असणार ! काही वंश प्रत्येक पिढीत नामशेष होणार . आपल्या गणिताच्या सोयीसाठी . ५०० लोकांचे पूर्वज ४९० आहेत असे मानु ! दहा लोक दर पिढीत नपुंसक तरी निघतात किंवा मुले होण्या आधीच खपतात .

एक पिढी पूर्वीचा इतिहास पाहिला तर  सावरखेडात ५०० च लोक राहत होते पण ते सर्व आजच्या सावरखेड करांचे पूर्वज नाहीत . दहा लोकांचा वंश नाश झालेला आहे . म्हणजे आजच्या जिवंत पाचशे लोकांचे एका पिढी पूर्वी ४९० वंशज होते. दोन पिढ्यांपूर्वी देखील वंश नाशाचा जीवशास्त्रीय नियम लागू होतोच ! दोन पिढ्या मागे गेले तर विस वंशाचे सातत्य तुटले आहे . आणि आजच्या ५०० जिवंत लोकांचे उगमस्थान म्हणजे दोन पिढ्यान पूर्वीचे ४८० लोक . कोणत्याहि कुटुंबाची वंशावळ पाहिली तर मुले न झालेले असे अनेक विवाहित आणि अविवाहित लोक दिसतील .









आजच्या लोकसंखेचे पालकत्व कमी पूर्वजांकडे असते हा मुद्दा आहे . जर पन्नास पिढ्या मागे गेले . आणि दर पिढीत दहा लोकांचे वंश सातत्य तुटते असे मानले तर आजच्या सावरखेड गावाचे सर्व लोक एकाच माता पित्याची आपत्ये आहेत. हे झाले सावरखेडचे आदम आणि इव्ह ! याला आपण आदम इव्हचे गणित म्हणु .

हे गणित फार विण्ट्रेस्टिंग आहे ! समजा दर पिढीत दहा नाही एकाच माणसाचे वंश सातत्य तुटते असे मानले तर पन्नास पिढ्यापुर्वि आजच्या लोक संख्येचे ४९० पूर्वज होते असे मानणे भाग आहे . पण मग ५०० पिढ्यांपूर्वी काय ? पुन्हा आपल्याला सावर खेडचे ५०० पिढ्या जुने दोनच आदम इव्ह मिळतात ! म्हण्जे सवाल फकस्त किती पिढ्या मागे जायचे ? एव्हढाच आहे !  गावाची लोकसंख्या कितीही असो ! नपुंसकांची संख्या कितीही असो ! पुरेशा पिढ्या मागे गेले कि सर्वांचे कोमन आई बापच मिळणार आहेत . फकस्त जरा जास्त पिढ्या मागे जावे लागेल ! म्हणजे प्रत्येक गावातले सर्व लोक एकमेकांचे बांधव आहेत हे मानणे भाग आहे .

हे गणितही उघडच चुकले आहे ! कारण गावाबाहेर लग्ने  होतातच . आपले गृहीतकच चुकले होते . च्यामारी ! पण हाच नियम सार्या पृथ्वी लाच लागू केला तर ? पृथ्वीबाहेर लग्न करण्याची पद्धत नाही . दर पिढीत काही लोक नपुंसक निघणारच. काही वंशांचा नाश होणारच .  आणि पुरेशा पिढ्या मागे गेले तर आजच्या सर्व मानव जातीचे समान पुर्वज मिळतील !

आरामखुर्चीत रेलून कॉफीचे घुटके घेत आपण मानवता सिद्ध केली आहे आणि जातिवाद खोटा  ठरवला आहे ! थांबा एका मिनिटासाठी काहीतरी चुकते आहे    हे नक्की ....  !!




3 ) दोनही गणितांचा मसावि :  मानवाची वैज्ञानिक  महामाय 


आपले पूर्वज संख्येने भरपूर आहेत . त्यांनी परस्परात लग्ने  केलेली आहेत आणि अनेक मानवांना स्वत:चे वंश सातत्य राखता येत नाही हे आपण वरील दोन्ही शक्यतात पडताळून पाहिले . या दोन्ही गणिती प्रक्रिया जीवशास्त्रात एकाच वेळी चालू आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे .

पृथ्वीची लोकसंख्या दर सेकंदाला वाढते आहे . याचाच दुसरा अर्थ असा की दर सेकंदाला आजच्या जिवंत माणसांच्या वंश सातत्यातल्या पूर्वजांची संख्या कमी होते आहे . फक्त किती पिढ्या मागे जायचे ? एव्हढाच हिशेब बाकी आहे . मानवाच्या पुरेशा पिढ्या होऊन गेल्या … कि आजच्या भूतलावरची सर्व ,माणसे एकाच मातेची लेकरे उरणार हे उघड आहे .


आता प्रश्न असा आहे कि खरोखर मानवाच्या इतक्या पिढ्या होऊन गेल्या आहेत का ? उत्तर होय असे आहे !


 आजच्या मानवाची मूळ माता ९९००० ते २००००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत राहत असावी . मात्र तिच्या काळातील ती एकमेव स्त्री नव्हती. फक्त तिची माता सोडून इतर स्त्रियांना आजच्या एखाद्या जिवंत स्त्री पर्यंत अखंड वंश साखळी निर्माण करता आली नाही . तसेच हि मूळ माता हि एक पदवी असून विशिष्ठ स्त्रीच मूळ माता असेही ठाम सांगता येत नाही . कारण मूळ माता ठरण्यासाठी तिला अखंड वंश सातत्य असलेल्या किमान दोन मुली असणे आवश्यक असते . जेव्हा एखाद्या वंश रेषेतील शेवटची स्त्री मारते तेव्हा हे वंश सातत्य खंडित झाल्याने मूळ माता पदवी पुढच्या पिढीकडे सरकते . म्हणजेच मूळ माता हि विशिष्ट व्यक्ती नसून कालांतराने बदलू शकणारी व्यक्ती असते . 









या स्त्रीला पिढीगणिक बदलू शकणारी कॉमन मदर इव्ह -  वैज्ञानिक  महामाय म्हणतात . 





थोडक्यात सर्व मानवांची आई एकाच आहे . मग बापाचे काय ?



खरी गम्मत इथून सुरु होते . हि  जी कोणि काळानुसार बदलणारी  वैज्ञानिक  महामाय आहे ती केवळ आरामखुर्चीत कॉफीचे घुटके  घेत  - मेंदूचे व्यायाम करत गवसलेली नाही . त्यासाठी शास्त्रज्ञांनी जगातल्या १३५ भिन्न भिन्न जमातींच्या  स्त्रियांचे रक्त तपासले आहे . मायटोकोण्ड्रिया म्हणजे  पेशीचे उर्जा केंद्र . आपल्या डी एन ए चा अर्धा भाग पित्याकडून आणि अर्धा भाग मातेकडून येत असतो .  मात्र आपणा सर्वाना हे मायटोकोण्ड्रिया मात्र फक्त मातेकडून मिळत असतात.  म्हणजे आजच्या सर्व प्रजातीच्या स्त्रियात आणि पुरुषात असलेले मायटोकोण्ड्रिया त्याना त्याच्या मातेपासून मिळाले आहेत . शास्त्रज्ञांनी पिग्मी ते अंदमानी आदिवासी ते आफ्रिकन ते युरोपियन अशा सर्व भिन्न १३५ प्रजातींच्या स्त्रियांचे  मायटोकोण्ड्रियल डी एन ए तपासले . त्यात दर पिढीत होणारे म्युटेशन आणि मोलेक्युलर क्लोक यांच्या अभ्यासावरून निश्कर्ष काढले . त्यानुसार हि मायटोकोण्ड्रियल कॉमन मदर इव्ह -  वैज्ञानिक  महामाय सिद्ध केलेली आहे.हि थेअरि बायबल च्या विरुद्द असल्याने धर्म मार्तण्ड सन्तप्त आहेत। 

 . 
मानवाच्या दर पिढीत काही वंशाचा नाश होत असल्याने हि महामाय दर पिढीतही बदलू शकते ! म्हणजे आजचे सर्व मानवांची माता मिळते पण पिता नाही . कारण दर पिढीत गुणुसुत्रे बदलत असतात . लग्न केल्याने त्यांचे मिश्रण होत असते . त्यामुळे आपल्या रक्तात अनेक पुरुष पूर्वजांची गुणसुत्रे खेळत असतात . आणि तत्कालीन महामायेचा तत्कालीन पती तत्कालीन बाप असतो ! 


आता एव्हढे सगळे समजून घेतल्यावर कोणाला स्वत:चा वंश , जात आणि बापजादे  यांचा अभिमान  बाळगायचा असेल तर खुशाल बाळगावा ! वेदातले पुरुषसुक्त आणि बायबल कुराणातलि एकमेव आणि न बदलणारे  "आदम इव्ह"  हीच मानवी उत्पत्तीची खरी थेअरी मानायची असेल तर खुशाल मानावी !


Ref : River Out of Eden: A Darwinian View of Life is a 1995 popular science book by Richard Dawkins


१८ फेब्रु, २०१४

एका डुक्कर समाजाची कथा लेखक - फें ड्री डॉर्ज अभिराम्वेल









तर एक आटपाट गाव असत . तिथ एक फेंड्री रहात असतो . तर तो डुक्कर फेंड्री म्हणजे "मी" . आम्हा डूकरांच्या राज्यात विषमता नाही. जातीयता नाही . डुक्कर समाज हा एक परिपूर्ण आणि समतापूर्ण समाज आहे. आमचा मूलमंत्र आहे कि सर्व डुकरे समान आहेत . फक्त "काहि" डुकरे जरा अधिक समान आहेत. आमच्यात फारच समता असल्याने… हि राखीव काळी डुकरे समतेचा गैरफायदा उचलतात …. म्हणून आमच्या पांढऱ्या डूकरांनी एक झाले पाहिजे. असो . तर मी आज तुम्हाला माझी गोष्ट सांगतो …… माझी चित्तरकथा


तर मी फेंड्री डुक्कर . किंवा डुकराचे पिल्लू . माझे एका डूकरिनिवर प्रेम होते. मग मी तिच्या मागे मागे हुंगत हुंगत फिरायचा . पण माझ्या डुक्कर समाजाला पत्ताच नव्हता. मी लागू पण दिला नाही. आपला सुमडीत गु -- पीत राहिला मी . मग आमच्या डुक्कर शाळेत डुक्कर मास्तराक न कलता मी माझ्या माझ्या प्रेमावर प्रेम करत राहिलो .


पण आमची जत्रा होती ना एक । डुक्कर जत्रा …… च्यामारी तिथे एक मानुस शिवला हो आमच्या देवाला …… साला … मंग आमच्या डुक्कर धर्माचा पुजारी बोलला डुक्कर मुखीयाला - हे काय बर झाल नाही. आमच्या डुक्कर टोळीचा मुखिया आणि पुजारी हे लोक म्हणजे फार फार फार फार देवडुक्कर.
मंग त्यांनी एका खालच्या जातीच्या काळ्या डूकरास बोलावले आणि देवास शिवणार्या माणसाचा वध करण्यास सांगितले.


लई मारामारी झाली , मी माझी सगळी पणाला लावली . मी माणसाला पकडणारच होतो …. पण तेव्हढ्यात आमचे राष्ट्रगीत सुरु झाले . चारी पाय जमिनीत रोवून उभा राहिलो . पण आमाचे डुक्कर लोक , आमचे गीत , आमची हाजारो वर्षाची महान परंपरा, आमचा महान धर्म , आमची थोर समाज व्यवस्था आणि यामुळेच टिकून राहिलेला आमचा समाज ! डुक्कर समाज कधी हारणार नाही … तर शेवटी डुकरांनी फालतू माणसावर जय मिळवलाच ! चारी बाजूनी त्याला घेरला आणि पकडला ! शेवटी जय आमचा झाला … आमचाच होणार आणि होत राहील !


काही माणसांनी माझ्या नावाचा उपयोग करून एक शिणुमा बनवला आहे..... फेंड्री ....फेंड्री ...फेंड्री , त्यात चिडलेला मानुस दगड मारतो शेवटी … ह्या ह्या ह्या ह्या आणि ख्या ख्या ! प्रचंड हश्या आणी टाळ्या ! छ्या काय पण … मारणे , चावणे , डूरकणे हा आमच्या आमच्या डुकरांचा शिरस्ता


मानुस चावणार नाही , मानुस डूरकनार नाही , मानुस दगड पण मारणार नाही …


डूकरानो बिनधास्त रहा मानुस फकस्त शिणुमा बनवतोय !




लेखक - फें ड्री डॉर्ज अभिराम्वेल  





७ डिसें, २०१३

चैत्यभूमी - शिवाजी पार्क . बाबासाहेबांना वंदन करायला

आज दादरला गेलो होतो . रमलो तिथे .

 चैत्यभूमी - शिवाजी पार्क . ६ डिसेंबर  

 बाबासाहेबांना वंदन करायला जनसागर लोटला होता . लाखोंचा . फ़ोटो विकले जात होतेच पण त्याहून महत्वाच म्हणजे शाहिरी जलसे करणार्या पाच दहा उत्साह मुर्तिंचे अनेक ग्रुप प्रबोधन जलसा - पथनाट्य करत हिंडत होते . यात बहुसंख्येने नवबौद्ध आणि मराठि असले तरी तामिलनाड , मध्य प्रदेश , गुजराथ आणि ऊत्तर प्रदेशातूनही सर्व जातीचे  लोक आले होते . पाहून बर वाटल . बाबासाहेबांचे व्यक्तित्व  आणि लहान  प्रमाणात का होईना पण  त्यांचा विचार भारतभर पसरतोय हे चित्र आशादायी आहे . भरपूर भटकलो . फेसबुकवरचे अनेक दोस्त प्रत्यक्षात भेटले … थोडेथोडके नाही … कमीत कमी साठ - सत्तर लोकांनी अभिराम म्हणुन हाक मारून बोलावलं . मी पण पाच पन्नास लोकाना हाक घातली . युवकांची पथनाट्य आणि गाणी ऐकली , सोबत आमचे बडे भाय मोहिते सर होतेच .

मी प्रत्यक्ष चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मृतीचे दर्शन घेऊ शकलो नाही. खच्चाखच जाम लाइन प्लाझा च्या पुढे होती म्हणे … युवराज सरांचा शिवसैनिक दोस्त आतपर्यंत व्ही आयपी गाडी ऑफर करत होता … पण स्मृतीशिल्पे पहाण्यात रस नव्हताच मला . तिथे तर लई वेळा गेलोय . पुन्हा जायला हा काही मुहूर्त नव्हता . आलेल्या जनासागाराच दर्शन अधिक महत्वाचे वाटत . 

व्ही आयपी गाडीतून दर्शनाला काही गेलो नाही . 

शाहिरी जलसे , गाणी , आलेली माणस पहात आणि त्यांचे संवाद ऐकत गर्दीतच रेंगाळत बसलो .बाबासाहेबांचे खरे दर्शन किंवा खरी भेट … खरी गळा भेट या गर्दीत असते . 




वैभव आमचा  जिगरी दोस्त मात्र गावला नाही कारण त्याची तब्येत बरी नव्हती . पण सिद्धार्थ भेटला - दाभोळकरांवर मस्त पथनाट्य बसवलं होत त्यांनी . एका चुणचुणीत पोरानि तर धमाल उडवून दिली . त्या आंबेडकरी गर्दीत अनेक ठिकाणी दाभोळकर - त्यांचे फ़ोटो दिसले … पण दाभोळकरांचे विरोधकही दिसले . सिद्धार्थ मोकळेच्या पथनाट्यावर टिका करायला     बामसेफी  आले होते . भट दाभोळकरांचे  नाव आंबेडकरांबरोबर घेणे हा त्यांना बाबासाहेबांचा अपमान वाटत असावा ! सिद्धार्थ ने सडेतोड समारोप केला ………… बाबासाहेब आंबेडकरांनि जातिअंताचा विचार दिला , विज्ञान निष्ठेचा विचार दिला …. या मार्गावर जे असतील ते आमचे आहेत .

महाराष्ट्रात घडलेल्या जातीय अत्याचारांचे -  एत्रोसिटिचे प्रदर्शन हि लावले गेले होते . आमचे  मित्र सुनील गजाकोशानी पोस्टर डिझाईन बनवले होते. पांढर्या पोस्टरवर काळी अक्षरे . बस्स … चाळिस  सनातनी खुनांचा आणि सरंजामी बलात्कारांचा पोस्टरवर उल्लेख होता . त्यात खैरलांजी असेल … वाल्मिकी समाजाच्या तीन तरुणांची केलेली हत्या असेल . 

का ? का? का? 

तर हुच्च वर्णिय मराठ्याच्या पोरीशी लग्न केले म्हणुन …कार्यकर्ते सगळीकडे भेट देऊन आलेले . आयटीत काम करणारे उच्च शिक्षित . त्यांच्या स्मार्ट फोन मध्ये घडलेल्या घटनांचे फ़ोटो होते. वर्तमान पत्रातील कात्रणे होती . 

मी विचारले " पोस्टर पांढर्या वर काळे का ? फोटो का नाही टाकले ?

उत्तर मिळाले…. त्या कार्यकर्त्यांनी दिलेले उत्तर होते …. .
भावना भडकावून काही होणार नाही . हे फ़ोटो प्रदर्शनात टाकायच्या लायकीचे नाहीत . आम्ही अत्याचारांचे फ़ोटो टाकणार नाही । पण त्याबाद्दल जागृती करूच करू … आम्हाला समाजाचा फ़ोटो बदलायचा आहे…आणि तेव्हा । त्यावेळी … तिथेच । मला बुद्ध दिसला .






शिवाजी पार्क ची स्थानिक हुच्चभ्रू जनता बहुतेक १ २ ते ३ … ३ ते ६ … ६ ते ९ चे पिक्चर बघायला गायब झाली होती . घरे आणि उरलेली रिकामी माणसे …हिंदु कोलनी  जराशी उजाड वाटत होती . शिवशक्ती - भीमशक्तीची  टेबली राजकीय घोषणा करणारे नेतागण फिरकले हि नाहीत

काही शिव सैनिक पण बाबा साहेबांचे पोस्टर आणि विचार बोलत होते .  कवीमित्र  तांबे डोक्क्टर , उकळता गणेश चव्हाण , गायकवाड , धमाल कांबळे आणि… ज्यांची मते पटत नाहीत अजाबात पण… माणुस म्हणुन दिलदार असलेले जमाते इस्लामीचे भाइजान … आमचे जुने दोस्त नौशाद उस्मान सुद्धा भेटले . ते त्यांना उपयुक्त ठरतील ती पुस्तके खरेदी करायला आले होते . गळाभेट घेतली. बाबासाहेब मेल्यानंतरहि अनेकांची गळाभेट मिठी घडवून आणतात .

 महामानवास अभिवादन श्रद्धांजली पुण्यस्मरण वगैरे म्हणणार नाही .
 कारण भीमराव माझ्यासाठी सुपर मेन नाही . रियल मेन आहे . 

बाबासाहेबांना गळाभेट . जय भीम !


.
अभिराम दीक्षित

९ जाने, २०१३

पण लक्षात कोण घेतो ?

पण लक्षात कोण घेतो ?


(2013 साहित्य संमेलनातिल परशुराम वादाच्या निमित्ताने )








पण लक्षात कोण घेतो ?


(2013 साहित्य संमेलनातिल परशुराम वादाच्या निमित्ताने )

पृथ्वी एकदा निक्षत्रिय करता येईल ..... २१ वेळा कशी काय ? हा प्रश्न ह्या जाती वाद्यांना पडत नाही. पण लक्षात कोण घेतो ?. ब्रह्मणांच्यात जातीवाद पहिल्यापासून होताच . पण अखिल भारतीय ब्राह्मण संमेलनांचि उपस्थिती ब्रिगेड च्या उदयानंतर लक्षणीय वाढली ! आणी त्यानंतरच परशुराम सिक्स पेक बॉ डी बिल्डर झाला.........ब्राह्मण मराठा ह्या उच्च जातीचा संघर्ष चघळला जात आहे. जणु महाराष्ट्रात या दोनच जाती आहेत !! ह्या दोन जातींच्या पुस्तकी टोमणेबहादुरित सारा महाराष्ट्र वेठीला धरला आहे. 

ब्राह्मणांच्या घरात परशुरामाची कधीही पूजा होत न्हवती . ते उग्र दैवत आहे. ब्रिगेडच्या सामन्या साठी मैदानात उतरलेल्या चित्पावन महासंघाने प्रथम पुण्यात परशुरामाची भव्य पोस्टर लावली. सामन्यासाठी सिद्ध व्हावा म्हणुन त्याला जिम मध्ये धाडून सिक्स पेक पहिलवान बनविण्यात आले. देवतांचे स्वरूप कसे बदलत जाते ? ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

त्यामुळे परशुराम -- ब्रिगेड विरोधी ब्राह्मणांचे प्रतिक बनला . आता हे ध्यानात घेऊन संमेलनाच्या संयोजकांनी परशुराम टाळला असता तर बरे झाले असते. पण लक्षात कोण घेतो ? साहित्यिक समाजापासून तुटले आहेत याचे हे उत्तम उदाहरण आहे.
याची दुसरी बाजू अशी की दैवतांना स्थानिक महात्म्य असते. सर्वजातीय कोकणी लोक परशुरामाला मानतात. कोकणस्थ ब्राह्मण हि याच कारणाने त्याला मानतात. नाहीतर आंतरजातीय विवाहाची संतान असलेला परशुराम चित्पावन महासंघाचा हिरो कसा काय ठरला ? (परशुरामाची आइ क्षत्रीय होती... आणि बाप ब्राह्मण ).
देवतांच्या पुराणकथांना काही फारसा अर्थ नसतो. त्या ऐतिहासिक पुराव्याप्रमाणे घ्यायच्या नसतात. त्यात पुष्कळ परस्पर विरोध ठासून भरलेला असतो. पण लक्षात कोण घेतो ? चित्पावन महासंघाचा आंतरजातीय विवाहांना विरोध आहे तरी त्यांचा आयडॉल आंतरजातीय विवाहाची संतान असलेला परशुराम . कारण क्षत्रियांशि लढायला एक परशुधारी सिक्स पेक पहिलवान नको का ?
दुसरीकडे ब्रिगेडचा वर्णव्यवस्थेला ला विरोध आहे. ब्रिगेड म्हणते - " मराठे क्षत्रिय नसून ते शुद्र आहेत. त्यामुळे मराठ्याना आरक्षण दिलेच पाहिजे " आता ह्या बहुजन ब्रिगेडला त्या खर्या खोट्या क्षत्रियांशि देणेघेणे ठेवण्याचे काय कारण ? आणि क्षत्रिय संहारक परशुरामाला विरोध करण्याचे काय कारण ?
दाखवायचे दात बहुजन आणि खायचे दात क्षत्रिय असा हा ब्रिगेडी कावा आहे. बहुजन वादि ब्रिगेडी उच्चवर्णीय क्षत्रियांचि बाजू घेऊन रस्त्यावर येतात .... जातीय ब्राह्मण मराठ्यांना खिजवायला आपले नसलेले दैवत जिम मध्ये धाडतात..... साहित्यिक समाजापासून तुटलेले असल्याने ते हा घोळ अजून वाढवतात ....... दोन सुसंपन्न प्रस्थापित जातींच्या भंगार अस्मिता युद्धात सारा महाराष्ट्र वेठीला धरला जातो ......
आदिवासी उपाशी मरतात .. पाकडे आत घुसतात ... आसाराम बापू अकलेचे तारे तोडतात ....ब्राह्मण मराठ्याच्या अस्मितेशिवाय आपल्यासमोर दुसरे प्रश्न नाहीत काय ? महाराष्ट्रात या दोनच जाती आहेत काय ? ह्या अभिजनांच्या लढाईत .. आणि राजकीय फ़ंतुश्गिरिला मिडिया डोक्यावर घेऊन नाचतो ..... पण लक्षात कोण घेतो ??

७ सप्टें, २०१२

युवकांच्या चश्म्यातून - आरक्षण.



थोड्या दिवसापूर्वी एका वाद विवाद स्पर्धेला परिक्षक म्हणून गेलो होतो. आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धा होती. २० ते २५ वर्षाची मुलं - मुली स्पर्धक होती. धर्माच्या आधारावर आरक्षण द्यावे का ? दिल्यास ते देशाच्या एकतेला बाधक होईल का ? - असा विषय होता.  प्रत्येक कॉलेज मधून दोन्ही बाजूंनी बोलण्यासाठी एक - एक विद्यार्थी पाठवायचा नियम होता. - तरुणांची भाषणं ऐकून टाळकं भणाणून गेलं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी मी समारोपाला थोडसं बोललो. जे बोललो त्यात  भर टाकून लिहतो.








 रामभाउ म्हाळगी प्रबोधिनी च्या मुंबईतल्या कार्यालयात झाली स्पर्धा. विनय सहस्त्रबुद्धे, रविंद्र साठे आणी लोकसत्तेचे मुकुंद संगोराम  कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

मी म्हणालो -

तुमची भाषणं मी ऐकली. टाळकं भणाणून गेलं. घोर निराशेनी - पण थोडा आशेचा किरणही दिसला. आशेचा किरण हा की - अतिशय जिव्हाळ्याच्या - भावनिक - अस्मितेच्या  प्रश्नावर; चर्चा वाद - विवाद करण्याची तुमची तयारी आहे. नाहीतर सध्या मुद्दे  - गुद्द्यांनी आणी लाथांनी सोडवायची पद्धत आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात आहे. मधल्या खाण्याच्या वेळेला तुम्ही एकत्र हसत खेळत होता. नंतर स्टेजवर येउन तावातावाने भांडत होता. लोकशाहीचा पप्पा आणी पुरोगामिपणाचा फादर म्हणजे व्हॉल्टेर हा फ्रेंच विचारवंत. तो म्हणाला होता. "I do not agree with what you have to say, but I'll defend to the death your right to say it" . तुझे विचार मला अजिबात मान्य नाहित. पण वेगळे विचार बाळगण्याच्या - तुझ्या हक्काच्या -  रक्षणासाठी -  मी मरण पत्करायला तयार आहे. याला म्हणतात पुरोगामीपणा ! माणूस विचार करणारा प्राणी आहे यावर श्रद्धा बाळगणार्‍याला मी पुरोगामी म्हणेन. चर्चा करून समोरच्याचे विचार बदलता येतात हा पायाच आहे आहे पुरोगामीपणाचा. अशा प्रकारे ज्ञानाचे आदान प्रदान करत समाज प्रगतीच्या दिशेने पुढे न्यायचा. गामी म्हणजे जाणारा पण जायच कुठे ? पुरो - प्रगतीच्या दिशेला. पुरो - गामी.




                                                                         व्हॉल्टेर


आता निराशेबद्दल आणी डोकं भणाणण्या बद्दल - तुम्हा सर्वांचीच एक गोष्ट मला जाम खटकलीय.  जातीय आरक्षण आणी धार्मिक आधारावरच आरक्षण - यात जमीन आस्मानाचा फरक आहे. हा फरक कुणीच नीटपणी ध्यानात घेतला न्हवता. आरक्षणाचे समर्थक दोन्ही प्रकारच्या  आरक्षणाला पाठिंबा देत होते. आणी विरोधक दोन्हीला विरोध. आजचा विषय 'आरक्षण योग्य का अयोग्य ? ' असा न्हवताच मुळी. मित्रांनो ! विषय धार्मिक आरक्षणाबद्दल होता. त्याहून गंभीर गोष्ट म्हणजे अभ्यासाऐवजी -  "स्व" जास्त डोकावत होता. ज्यांना आरक्षण मिळतय ते त्याच्या बाजूचे आणी मिळत नाही ते विरोधक अशी स्पष्ट विभागणी दिसली ! काहि अपवाद होते. पण मोजकेच. त्याहून धक्कादायक म्हणजे , भारताचे संविधान, त्यातले धर्मस्वातंत्र्य , सेक्यूलर, सर्वधर्मसमभाव आणी धर्मनिरपेक्षता याबद्दल सर्वांनीच दाखवलेले भीषण अज्ञान. तुम्ही सर्व राज्यशास्त्र, इतिहास अशा कलाशाखांचे विद्यार्थी आहात तेंव्हा तुमच्याकडून काही नवे शिकण्यासाठी आलेला मी .....विज्ञानाचा विद्यार्थी.....असो. एक गोष्ट मात्र तुम्ही मला आज शिकवलीत. कोणती ? ते शेवटीच सांगतो भाषणाच्या.


आरक्षणाच्या विरोधकांनी आर्थिक आरक्षणाचा बूट वारंवार उगारला. सगळ्याच गरिबांना द्या वगैरे वगैरे. आरक्षण म्हणजे काय - गरिबी हटाव चा सरकारी कार्यक्रम वाटला की काय तुम्हाला ? का भीक वाटली ? गरिबांना मदत म्हणून भरपूर सरकारी योजना असतात. वेगळ्या रंगाच रेशनकार्ड असतं,  सबसिड्या असतात. बहुसंख्य दलित गरिब आहेत हे खरे आहे.  पण ते गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण दिलेलं नाही. सामाजिक गरजेतून दिलेलं आहे. बर... आरक्षणाची सुरवात कोणी केली ? आंबेडकरांनी ? अजिबात नाही ! शाहू महाराजांनी ? बिल्कूल नाही ! आरक्षणाची सुरवात केली भगवान मनूनी ! किती टक्के ? तर १०० % ...कोणाला ? तर उच्चवर्णीयांना. हे विपरीत आरक्षण होतं मित्रांनो. ब्राह्मण, क्षत्रीय आणी इतर पुढारलेल्या जातींनी गेली हजारो वर्षे या विपरीत आरक्षणाची मजा घेतली. १००% सत्ता, १००% धर्माधिकार, १००% न्यायव्यस्था, १०० % उच्च उत्पादनाचे उद्योग, १००% शेतजमीनी  गेली हजारो वर्षे ठराविक जातींच्याच हातात होत्या. पुण्याच्या एका विद्यार्थ्यानं मगाशी लंगड्या घोड्यांची गोष्ट सांगितली. त्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेल आहे. घोड्यांची शर्यत लावली. सगळे घोडे तगडे. एक मात्र लंगडा. मुद्दाम लंगडा केलेला घोडा. कुणी केला त्याला लंगडा ? तर तगड्या घोड्यांनी. ही काय स्पर्धा झाली ? मेरीट माय फूट ! त्या लंगड्या घोड्याला आरंभरेषेच्या थोडं पुढे उभ कराव लागेल. तेंव्हाच खरी स्पर्धा होईल. हे आहे सामाजिक आरक्षण. २२.५ %. लोकसंखेच्या प्रमाणात. दलित आणी आदिवासिंना , भटक्या आणी विमुक्तांना दिलय. रेषेच्या पुढं उभ केलय. काय चुकलं ? गेली हजारो वर्षे अभ्यासाची परंपरा नाही. पाढे बापानी शिकवले नाहित. आईनी अभ्यास घेतला नाही. देवळात यायला बंदी. शिकायला बंदी. अस्पृष्यता. मग रेषेच्या पुढे उभ करा त्याना. त्यालाच म्हणतात सामाजिक आरक्षण. सरकारी जावई न्हवे. दुबळा भाउ म्हणा.

दुसरी गोष्ट आर्थिक आरक्षणाची. तेही आहेच की दिलेलं . फक्त गरीब व्यक्तींना ते दिलेलं नाही. गरीब जातींना दिलय. त्याला म्हणायच ओ. बी. सी. आरक्षण. गरीब व्यक्तींना कसं देणार आरक्षण ?  गरीब शोधायचा कसा ? माझ  हॉस्पिटल आहे. भावाचा कारखाना आहे. बायकोच्या नावावर काही नाही. ती झाली की गरीब !  माझ होस्पिटल बायकोच्या नावावर केलं की मी झालो गरीब ! समजा एक श्रीमंत व्यापारी आहे. सोन्याच्या दागिन्यांच दुकान आहे त्याचं. . डान्स बार मधे उधळल्या - गड्याच्या गड्या -  नोटांच्या. दारू प्याला.शौक केला. बाई ठेवली. उधळले सगळे पैसे. झाला गरीब. बोला.. देणार त्याला आरक्षण ? एक महा मूर्ख आहे महिपतराव , एक आळशी  आहे सुस्तराव ... दोघेही गरीब आहेत. देताय आरक्षण ह्या दोन रावांना  ? म्हणे आर्थिक आधार ! सरसकट गरीबांना आरक्षण देता येत नाही हो. तो का गरीब झाला हे पहाव लागत. तो त्याच्या वैयक्तिक दुर्गुणांमुळे गरिब आहे का ? की त्याला संधी नाकारलीय व्यवस्थेनं. श्रीमंत होण्याची संधी. भारतात जातिव्यवस्था आहे. ते एक भयानक वास्तव आहे. जेंव्हा जातीच्या जाती गरीब रहातात. तेंव्हा नक्कीच त्याना संधी नाकारलेली असते. समाजान. व्यवस्थेन. अरे सुतारान सुतारच राहायच. लोहारान लोहार. जास्त पैशे मिळणारे धंदे करायचेच नाही त्यानं. कोणी नाकारली संधी ? -  पैशे मिळवण्याची संधी? व्यवस्थेन. म्हणून अनेक जाती गरीब राहिल्या. मग आला मंडल आयोग. मंडल न काय केलं ? निकष लावले. र्थिक, सामाजिक आणी शैक्षणीक . (आसाशै ) मंडल ने पहाणी केली सगळ्या जातींची. शिक्षणाचं प्रमाण कुठल्या जातित कमी आहे ? कोणत्या जाती गरीब आहेत ? त्यांना म्हटलं ओ.बी.सी. आणी दिलं आरक्षण. या ओबिसीत माळी आणी कुणबी यासारख्या शेतकरी जाती आहेत. दैवेज्ञ ब्राह्मण ही उच्चवर्णीय जात ही आहे ओबीसी आरक्षणात. तेंव्हा गरीब किंवा मागास उच्चवर्णीयांना आधीच आरक्षण मिळालेलं आहे.  पुन्हा द्यायचा प्रश्नच कुठे येतो ?  तेंव्हा लक्षात ठेवा आर्थिक आधारावर आरक्षण व्यक्तीला देता येत नाही. गरीब जातीना देता येत  - ते दिलेलंच आहे. मग आर्थिक आरक्षणाचा बूट काय म्हणून?

जातिय आरक्षणाचा काहिना  - काही व्यक्तीना गैर फायदा होतो म्हणे. मागासवर्गीय कलेक्टरचा मुलगाही आरक्षण मिळवतो. अरेच्च्या पुन्हा तेच तेच. जातिच्या लॉब्या असतात की नाही ? ज्यांच्या लॉब्याच नाहीत सत्ताकारणात. त्याना पुढे आणायला आहे आरक्षण. ते व्यक्तीला नाहीच -  समाजाला आहे. बटाट्याची तुलना बटाट्याशी करा हो - टोमेटोशी नको. जर ठराविक समाजाला आरक्षण आहे तर - "व्यक्ती गैरफायदा मिळवतेचा" -  टॉमेटो आणला कुठून ?  हरेक व्यक्तीच्या मागासपणाची कारण शोधणं सरकारला शक्य नाही. जातींच्या मागासपणाची कारणं शोधता येतात आणी त्यावरचा उपाय म्हणजे आरक्षण. मग विचारता हे संपेल कधी ? प्रश्न विनोदी आहे. आरक्षण म्हणजे सत्ताकारणातला न्याय्य वाटा. तो संपायला कशाला पाहिजे ? जेव्हढे टक्के हक्काचा वाटा आहे. तो मिळालाच पाहिजे. कायम.निरंतर.मिळाला पाहिजे आणी  अनुशेष म्हणजे काय ? मागासांना आरक्षण आहे २२.५ % + २७.५ % ओबीसींना = ४९ %.

एकूण आरक्षण ४९ %

बर हे आरक्षण कागदावर आहे. खरोखर जागा भरल्या किती. दिल्लीत कॅबिनेट सचीव दर्जाच्या ९६ पोस्ट आहेत. दलित किती त्यातले १ . फक्त एक. म्हणजे एक टक्का. ओबीसी कीती. अ ग्रेडचे केंद्र सरकारी अधिकारी घेतले तर त्या ओबीसी ४% हून कमी आहेत. म्हणजे ४९% आरक्षण फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात ते आलेलच नाही. राखीव जागांचा अनुशेष भरून काढणे अजून बाकी आहे. आधी अनुशेष भरा नंतर तोंड वर करून विचारा की - संपेल कधी ? पदोन्नती मध्ये आरक्षण दिलं पाहिजे ते म्हणूनच. अनुशेष भरण्यासाठी.

आरक्षणा बाबत दहा  वर्षाचा बोगस मुद्दा 

बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितलं होतं कि आरक्षण दिल्यानंतर १० वर्षांनी त्याचं परीक्षण केलं जावं…

दर दहा वर्षांनी पाहणी करावी आणि आरक्षणाचि वैधता ठरवावी असे बाबासाहेब आंबेडकर म्ह्टले होते . हा मुद्दा निवडणुकीतील राजकीय आरक्षणाचा होता. त्याप्रमाणे दर दहा वर्षांनी तशी पहाणी केली जाते . ओपन राजकीय क्षेत्रातुन किती टक्के मागास वर्गीय निवडुन आले ते पाहिले जाते … त्याचे प्रमाण नगण्य असते म्हणून पुन्हा आरक्षण दर दहा वर्षांनी मिळते .नोकरी आणि शिक्षणातिल आरक्षण बाबासाहेबंनि दिलेले नाही . बाबासाहेबांचे महानिर्वाण  १९५६ सालचे आहे.   शिक्षणातिल आरक्षण १९८२ सालचे आहे .  ज्याप्रमाणे राजकीय आरक्षणाचि दर दहा वर्षांनी वैधता तपासली जाते त्याप्रमाणेच शैक्षणिक आरक्षणाचि दर पाच वर्षांनी वैधता तपासली जाते. ते वैध असते म्हणून दिले जाते.

संदर्भ : https://web.archive.org/web/20090619063917/http://www.education.nic.in/cd50years/g/S/I6/0SI60301.htm


..बाकी हा मुद्दा फक्त राजकीय आरक्षणा  बाबत सत्य आहे. नोकरी आणि शिक्षण याबातीतील अरक्षणा बाबत बाबासाहेबांनी हे विधान केलेलेच नाही . कारण तिथे आरक्षण द्यायचा क्रायटेरियाच वेगळा आहे.   तिथेही जेव्हा मागास सबळ होतात तेव्हा आरक्षणाची  गरज संपते .

४९% आरक्षण फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात ते आलेलच नाही. राखीव जागांचा अनुशेष भरून काढणे अजून बाकी आहे. आधी अनुशेष भरायचे . मग ओपन मधून सुद्धा लोकसंखेच्या प्रमाणात दलित - मागास जेव्हा भारती होतील - तेव्हा आरक्षणाचि गरज संपते .

बाकी दहा वर्षाचा मुद्दा बकवास 

घरात घुशी झाल्या म्हणून कोणी घर जाळत नाही. तस  कुठल्याही सरकारी योजनेत काही दोष रहाणारच. म्हणून कुणी योजनाच बंद करत नाही. शिवाय श्रीमंत ओबीसींना म्हणजे क्रीमी लेयरला आरक्षणाचे लाभ मिळतही नाहीत. तशी तरतूदच कायद्यात आहे. प्रथम अनुशेष भरला पाहिजे. सत्तेत हक्काचा वाटा मिळाला की हळूहळू लंगडा घोडा तगडा होईल. स्वतःच्या हिमतीवरच पळू लागेल. स्पर्धा करेल ओपनशी. माझ्या एका मित्राची गोष्ट. विजय. तो ओबीसी आहे. ओबीसीच्या सीटांचे मार्क क्लोज झाले ओपनच्या वर. त्याला आरक्षणाचा काहिच उपयोग झाला नाही. ओपनलाही काही तोटा नाही. त्या कॉलेजपुरत तरी -  आरक्षण नसल्यातच जमा. या एव्हढ्या शर्यतीपुरता घोडा तगडा झालाय. आरक्षण अस संपतं. आपोआप. हा मुद्दा एका एकाही स्पर्धकान मांडला नाही.


क्रिमी लेयर फक्त ओबिसिना का ? 

ओबीसी आणि एस सी या दोन्ही आरक्षणाचे हेतू भिन्न आहेत . ओबिसिना  (आसाशै ) आणि एससी ना अस्पृश्यता आणि शोषण याविरुद्ध आरक्षण आहे .

१) ओबीसी आरक्षण हे प्रामुख्याने (आसाशै ) आर्थिक/सामजिक /शैक्षणिक मागास जातीना दिले आहे. (मंडल आयोग क्रायटेरिया ) माळी , साळी,   कोळी,  सुतार,  दैवज्ञ ब्राम्हण अशा बारा बलुतेदार  जाती ओबीसीत येतात. यांचे  (आसाशै ) उत्थान झाले कि क्रिमी लेयर लावून वगळता येते. कारण ज्या  क्रायटेरियावर आरक्षण दिले आहे - त्याची पूर्तता होते

 २) एससी / एस टी  चे आरक्षण हे पूर्व अस्पृश्य  शोषित आणि दुर्लक्षित जातीना आहे. यात नवबौद्ध , महार , मांग , चांभार, ढोर , आदिवासी या जाती येतात   त्यांचे (आसाशै ) उत्थान झाले तरी इतरांच्या  (मनातली ) अस्पृश्यता - शोषण आणि हलके मानले जाणे संपत नाही - भेदभाव तसाच राहतो -  म्हणून  एससी / एस टी ला (आसाशै ) क्रिमी लेयर लावता येत नाही . यावर यदी फ़डकेंच्या "खरी हि न्यायाची रीती"   या पुस्तकात  विस्तृत विवेचन आहे.


मुस्लिम आरक्षण.

आता आपण आजच्या खर्‍या विषयावर येवू. धार्मिक आरक्षण. म्हणजे मुस्लिम आरक्षण. कारण मुसलमान अल्पसंख्यातले बहुसंख्य आहेत. मुस्लिमांना आरक्षण द्यावे का ? दिल्यास भारतातली एकात्मता वाढेल का कमी होईल ?


संविधान आणी सर्वधर्म समभाव हा विषय प्रत्येकाने चघळला. आणी प्रचंड घोळ घातला. सभ्य स्त्री - पुरुष हो - आपल्या राज्यघटनेत सर्वधर्मसमभाव नाही. धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य ही घटनेत नाही.  घटनेत सेक्यूलारिझम आहे. सर्वधर्मसमभाव आणी सेक्युलारिझम या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत.

सर्वधर्म समभाव. सर्व धर्म सारखेच आहेत. त्यांची शिकवण एकच आहे. सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छती -  ही हिंदुधर्माची शिकवण आहे. संविधानातला कायदा न्हवे ! उलट धर्मपालनाचे कोणतेच हक्क संविधान देत नाही.

तुम्ही सगळे प्रेमात पडायच्या वयाचे आहात.   आणी कुणाच्यातरी प्रेमात पण असणार. जो - जी नसेल त्यान कार्यक्रम संपल्यावर मला येऊन भेटावं. शनिवारवाड्यावर जाहिर सत्कार करण्यात यील. असो ..समजा तुम्ही ट्रेन नी कुठेतरी प्रवास करत आहात. समोर एक अप्सरा बसली आहे. यौवन बिजली.. पाहून थिजली.. इंद्रसभा भवताली. अप्सरा दिसली. तुम्ही मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करत आहात. असे प्रेम करण्याचे स्वातंत्र्य ती अप्सरा तुम्हाला अवश्य दील. पण मनातल्या मनात. मांडे खा. पण मनातल्या मनात. तिला ट्रेनमधे डोळा मारला ; की काय खायच ? सँडल !


भारताच्या राज्यघतनेत सेक्युलारिझम आहे. म्हणजे इहवाद आहे. कुठल्याही धर्मावर तुम्ही श्रद्धा ठेवू शकता. प्रेम करू शकता पण कसं ? मनातल्या मनात ! तुम्ही म्हणाल आमच्या धर्मात अस्प्रुश्यता आहे. आम्ही ती पाळणार... मग काय खायचं ? सँडल.

तुम्ही म्हणाल आमच्या कुराणात लिहिलिय . मूर्त्या फोडा. काफरांविरुद्ध जिहाद करा. म्हणा की. पण. मनातल्या मनात म्हणायच. खरोखर कुणी जिहाद करू लागला- तर काय खायच ? ....सँडल.
धर्माच्या चिकित्सेत संविधान शिरत नाही. पण २५ व्या कलमात बजावून सांगतं - धर्म पाळायचा पण मनातल्या मनात. इहलोकात कसं जगायच ? ते कायदा ठरवेल. लग्नाच वय किती असावं ? कायदा ठरवेल धर्म नाही.

संविधान नावाची अप्सरा हातात सँडल घेऊन उभी आहे . मनातल्या मनात धर्म पाळा की ! पण तुमच्या घरात - नाही - नाही तुमच्या बेडरुम मध्ये किती बायका असाव्यात ? त्याच्याशी कसा व्यवहार करावा ? हे कायदा ठरवणार आहे . तुम्ही तुमच्या धर्माचे किती पालन करावे ? हेही कायदा ठरवणार आहे !

सर्व धर्म चांगले आहेत ते जवळ घ्या म्हणजे सर्वधर्म समभाव. शासकीय निर्णयातून धर्म वगळा. धर्म दूर ठेवा म्हणजे सेक्यूलारिझम. म्हणजे च इहवाद. हा सेक्युलारिझम आपल्या संविधानाचा पाया आहे.  आणी अशा प्रकारचा पारलौकिक श्रद्धेसाठीचा कोणताही धर्म तुम्ही पाळू शकता. नवा धर्म बनवू शकता. धर्म बदलू शकता. धर्मांतराचे स्वातंत्र्य ही आहे.(मनातल्या मनात.)


आता मला सांगा. शासकीय निर्णयात धर्म आणायचा नाही हाच जर सेक्युलारिझम चा अर्थ आहे तर धर्मावर आधारित आरक्षण कसे काय देता यील ? दुसरं धर्म ही ऐच्छीक गोष्ट आहे. धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य आहे तर धर्मावर आधारित आरक्षण कसे देता यील ?


नीट विचार करा. समजा मुस्लिमांना आरक्षण दिलं. तर मुस्लिम कोण ? हे ठरवायचं कसं ? सुन्नी म्हणतात की शिया हे खरे मुसलमान नाहीत. कादियानी / अहमदिया पंथाचे लोक खरे मुसलमान नसून ते काफिर आहेत. त्यांच्या विरुद्ध जिहादचे फतवे ही निघतात पाकिस्तानात. मुसलामान कोण ? व्याख्या काय मुसलमानाची ? नाव ? समीर आणी कमल नावाच्या मुसलमानांना मी ओळखतो. अंतुले आडनावाचे मुसलमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.  सरकारने मुसलमानाची पहिल्यांदा व्याख्या करावी लागेल. टोपी, दाढी, नमाज हे सर्व नाकारणारे ही मुसलमान असतातच.

म्हणजे शेवटी सरकारला अ‍ॅफीडेव्हीट घ्यावे लागेल की मी मुसलमान आहे. आणी मगच आरक्षण देता यील.

पण गोची अशी आहे की घटनाकारांनी धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.  आरक्षण मिळवण्यासाठी मी काय करावे ? एक अ‍ॅफीडेव्हीट करावे. मी मुसलमान आहे. आरक्षणाचा लाभ मिळाला की पुन्हा धर्म बदलावा. हिंदू व्हावे. आता सरकार काय करणार ? माझी नोकरी काढून घेणार ? बर मी समजा सुमडीत धर्म बदलला. गुपचूप.  तर सरकारला कसे कळणार ? आरक्षणाचा लाभ मिळालेले लोक इस्लाम पाळतात का ? यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकार मौलवींची कमीटी नेमणार आहे काय ?

अहो दिवसातून पाच वेळा धर्म बदलता येतो. एक अ‍ॅफीडेव्हीट खेळ खलास. जी गोष्ट ऐच्छीक आहे ती गोष्ट कुठल्याही सवलतीसाठी अट म्हणून घालता येत नाही. एवढी साधी गोष्ट सरकारला कळू नये.

जातीचे खोटे दाखले मिळवून सवलती लाटणार्यांवर कायदेशीर कारवाई करता येते. कारण जात बदलता येत नाही. त्यात जन्म घ्यावा लागतो. पण धर्म ही ऐच्छीक बाब आहे. त्यावर आधारित सवलती देता येत नाहीत. धर्मांतराचे स्वातंत्र्य आणी धार्मिक आधारावर सवलती एकाच वेळी कशा देता येतील ? 

समजा उद्या तोगाडीयांनी हिंदू बांधवांना आवाहन केल - कोर्टात अ‍ॅफीडेव्हीट करून सवलती आणी आरक्षण लाटण्याच.. काय करणार तुम्ही ?


सर्वात महत्वाच  - आज मुस्लिमांना आरक्षण आहेच. मुस्लिमातल्या मागास जातींना आरक्षणाचा लाभ मिळतोच आहे. सर्वच धर्मातल्या मागास आणी गरीब जातींना आरक्षण आहे. ते तसेच राहिले पहिजे. पण सरसकट सर्व मुस्लिमांना आरक्षण मिळू शकत नाही. कोणत्याच धार्मिक आधारावर आरक्षण मिळू शकत नाही.  फक्त एका स्पर्धकाने हा मुद्दा मांडला त्याला पहिलं बक्षिस देत आहोत.

मुस्लिमांना समजायला हव की धार्मिक आधारावरच आरक्षण घटनाविरोधी तर आहेच पण;  ते देता येणंही अशक्य आहे. त्यामुळेच ते कोर्टात टिकणार नाही. सरकार तुम्हाला उल्लू बनवते आहे.

 तुमच्या सर्वांकडून शिकलेली एक गोष्ट म्हणजे वक्त्याने उगीच बडबड करत बसू नये वेळ संपली की भाषण बंद करावं. तुम्ही सर्वांनी बरोब्बर दिलेल्या वेळेत भाषण संपवलीत. तुम्च्याकडून मी हे शिकलो. आता आचरणात आणतो आणी भाषण संपवतो.


 - डॉ. अभिराम दीक्षित, मुंबई

  -----------------------------------------------------------------------------------------------------------

टिप : प्रस्तुत लेखन मागासवर्गीय आयोगाने अभ्यास करून शोषित वर्गाला दिलेल्या आरक्षणाबाबत आहे. सध्या तलवारी उपसून राजकीय दडपशाही करून  आरक्षण  मागण्याचा धंदा जोरात आहे. लेखक मागास , अतिमागास आणि इतर मागास जाती जमातींच्या आरक्षणाचा समर्थक आहे. आरक्षण म्हणजे सत्ता  अणि शिक्षण यातले प्रतिनिधित्व.

ज्यांना सत्तेत/ शिक्षणात  पुरेसे  प्रतिनिधित्व नाही त्याना ते दिले पाहिजे . ज्या समाजाला असे प्रतिनिधित्व पहिल्या पासूनच आहे आणि तरी त्यात गरिबी आहे - त्यांच्या विकासा साठी अन्य प्रयत्न केले पाहिजेत . आरक्षण  नाही .  राजपूत , ब्राम्हण ,  जाट , मराठा अशा सत्ता संपन्न समाजां च्या आरक्षणाबाबत वरील लेख लागू होत नाही . त्यांनी केलेल्या मागण्या आणि दिलेली आरक्षणे कोर्टात टिकणारी नाहीत . 

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *