ॲरिस्टोटल च्या चश्म्यातुन - तर्कदोष (fallacy)
इग्लंड मधल्या एका रेल्वे गाडीत दोन प्रवासी सामोरा समोर बसले होते . पेपर वाचत होते. दोघे स्कोटिश होते . पहिल्या पानावर एका तरुणीच्या खून आणि बलात्काराची बातमी होती. बातमीचा मथळा पाहताच दोन्ही स्कोटिशान्नि नाके मुरडली. असले रानटी काम कोणताच स्कोटिश करू शकत नाही हे त्यांच्या मनात क्षणात चमकून गेले . बातमी पुढे वाचतात… तो हि घटना स्कोटलन्ड मध्येच घडलेली असते. दोन्ही स्कोटिशाना आश्चर्याचा धक्का बसतो. पुढे वाचतात तर तो खुनी आणि बलात्कारी माणुस चक्क एक स्कॉटिश निघतो ! दोघे स्कोटिश मान हलवत म्हणतात …. मग तो " खरा " स्कोटिश नसणार !
अशा प्रकारे विचार करण्याला तर्कदोष - फेलसि असे म्हणतात. इथे आपले स्कोटीश जातभाई वाईट कृत्य करूच शकत नाहीत असे गृहीत धरलेले आहे. पण नवा अनुभव आल्यानंतर जुने निष्कर्ष बदलले पाहिजेत . पण तसे न करता … स्कोटीश असण्याची व्याख्याच बदलून टाकली आहे . स्कोटीश च्या आधी "खरा" हा शब्द जोडून …. आपल्या निष्कर्षात बसतील तेव्हढेच स्कोटीश " खरे " म्हणायचे असतात ! हा तर्कदोष "खरा" हिंदू दहशतवादी नसतो किंवा "खरा" मुसलमान शांतता प्रिय असतो असाही वापरता येईल . इथे जो शांतात प्रिय नसेल त्याला "खोटा" म्हटले कि आपला तर्कदुष्ट युक्तीवाद पूर्ण होतो.
फेलसि - तर्कदोषांचे वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्न ॲरिस्टॉटलने (इ. स. पू. ३८४–३२२) केला. हे वर्गीकरण अजूनही बरेचसे रूढ आहे व तर्कदोषांचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात येणारी बरीचशी परिभाषाही ॲरिस्टॉटलच्या वर्गीकरणावर आधारलेली आहे.
ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोचा शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचा गुरू होता. प्रस्तुत लेखात ॲरिस्टॉटल ने केलेले तेरा तर्कदोष पहायचे आहेत . इथे हे समजून घ्यायला हवे कि जगभरातल्या सर्व माणसात हे तर्कदोष कमी अधिक प्रमाणात आढळतात . मानवाची उत्क्रांती होत असताना प्रतिकूल नैसर्गिक स्थितीत टिकून राहताना फार विचार करत बसायला मानवी मेदुकडे वेळच नव्हता . फटकन निष्कर्ष काढण्यासाठी तर्कदोष उपयुक्त आहे त्यामुळे उत्क्रांतीत तो सिलेक्ट झाला आहे पण योग्य निष्कर्ष काढण्यासाठी या नैसर्गिक तर्क दोषातून मुक्त व्हावे लागते . त्यासाठी लोजिकल - तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायला मेदुला शिकवायला लागते .
प्रस्तुत लेखात तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्यासाठी कोणते तर्कदोष (फेलसि ) टाळायला हव्या ? त्या बद्दल ॲरिस्टॉटल चे मत पाहू .
ॲरिस्टॉटल ने चुकीच्या भाषेमुळे निर्माण होणारे (भाषिक ) आणि चुकीच्या विचार पद्धतीमुळे निर्माण होणारे तर्कदोष म्हणजे आशयिक अशी विभागणी केलेली आहे.
भाषिक तर्कदोष :
१) शब्दच्छल :
एका शब्दाचे अनेक अर्थ भाषेत असतात . शब्दाच्या मुळ अर्थाचा छळ करून वेगळाच अर्थ युक्तिवादात वापरला जातो . कायद्याच्या कचाट्यातुन सुटण्यासाठी सुद्धा हा तर्कदोष मुद्दाम वापरला जातो . नरो वा ? कुंजरो वा ?? अश्वत्थामा मेला आहे असे धर्मराज सांगतो . त्यावेळी तो अश्वत्थामा या हत्तीचा उल्लेख करत असतो . पण त्यावरून अश्वत्थामा ह्या द्रोणाचार्यांच्या मुलाचा वध झाला आहे असे सुचित होते .
नरेंद्र मोदींना तुम्ही हिंदू राष्ट्रवादी आहात काय ? असा प्रश्न विचारला गेला होता . त्यावर मोदिनी मी हिंदू आहे आणि राष्ट्रवादी आहे असे उत्तर दिले होते . त्यामुळे त्यांचे समर्थक हि खुश होणार आणि कुणि मोदिना त्यावर विरोधही करू शकत नाही . कारण हिंदू असणे पाप नाही . राष्ट्रवादी असणे तर त्याहून नाही . मुळातला प्रश्न तुम्हाला हिंदू धर्माचे राज्य आणायचे आहे काय ? घटना बदलायची आहे काय ? सेक्युलर घटना मोडुन धार्मिक हिंदुराष्ट्र हवे आहे का ? असा आहे . पण मोदिनी शब्दाची फोड करून शब्दच्छल या तर्कदोषाचा युधिष्ठीर - धर्मराजाप्रमाणे वापर केलेला आहे !
२) वाक्य छळ :
हा तर्कदोष युक्तिवादात एक वाक्य दोन अर्थांनी घेतल्यामुळे घडतो. उदा., हे वाक्य पहा :
आई आणि ती मुलगी खेळत होत्या - मेंदी लावलेल्या हाताने .
नेमकी मेंदी कोणि लावली आहे ? आईने ? मुलीने ? कि दोघांनी ? काहीच अर्थबोध होत नाही . प्रस्तुत उदाहरण जरी साधारण वाटले तरी वाक्य छळ हा तर्कदोष उजून गंभिर वळण घेऊ शकतो . जसे की : -
तू माझी बायको मी तुझी बायको सिनेमाला जाऊ ! या वाक्यात योग्य ठिकाणी स्वल्पविराम दिले नाहीत तर गंभिर परिस्थिती उद्भवू शकते .
३ / ४ ) गुणाकार आणि भागाकार (समाहार आणि विभाजन ) :
या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . फारच कमी निरिक्षणातुन निष्कर्ष काढण्याची सवय सर्व प्राणिमात्राना आहे . माणुस हि त्याला अपवाद नाही . वाद विवादात हा तर्कदोष खूप वेळा वापरला जातो .
उदाहरणार्थ : पुणे हे कंजूष माणसांचे गाव आहे . स्वत:ला आलेल्या थोड्याश्या अनुभवांना येथे कल्पनेने गुणले आहे आणि एका अक्ख्या शहराविषयी विधान केलेले आहे .
तसा कल्पनेतला भागाकारही (विभाजन ) चुकीच्या निष्कर्षांना जन्म देतो . उदाहरणार्थ : बिहार हे गरीब राज्य आहे म्हणून सर्व बिहारी गरीब आहेत म्हणुन लालू हा एक गरीब मनुष्य आहे . सर धोपटिकरण किंवा जनरलायझेशन करायच्या मानवी प्रवृत्तीमुळे हा तर्कदोष निर्माण होतो .
५) आघात
वाक्य उच्चारताना किंवा वाचताना चुकीच्या शब्दावर जोर दिला तर हा तर्कदोष निर्माण होतो ."तो काल संध्याकाळि येणार होता . " या वाक्यातल्या वेगवेगळ्या शब्दावर जोर देऊन अनेक अर्थ काढता येतात . उदा : -
"तो काल संध्याकाळि येणार होता . " - तू का आलास ?
"तो काल संध्याकाळि येणार होता . " - आज का आला ?
"तो काल संध्याकाळि येणार होता . " - सकाळी का आला ?
"तो काल संध्याकाळि येणार होता . " - आलाच नाही !
चुकीच्या शब्दावर जोर दिला कि तर्कदोष तयार होतो .
तू शेजार्या विरुद्ध खोटी "साक्ष" देऊ नको . इथे साक्ष ऐवजी " शेजार्याविरुद्ध " या शब्दावर जास्त जोर दिला तर शेजारी सोडुन इतर लोकाविरुद्ध खोटी साक्ष द्यायला हरकत नाही . असा चुकीचा अर्थ निघू शकतो.
६) व्युत्पत्तीदोष :
ज्या अर्थाने शब्द बनला त्या अर्थाने वापरला पाहिजे . शब्दाआधी अ प्रत्यय लावला तर विरुद्धार्थी शब्द बनतो . अ + स्वीकार = स्वीकार न करणे . उदाहरणार्थ अमुल्य चा अर्थ आहे ज्याचे मुल्य (किंमत ) करता येत नाही असे . पण तुमचे मत अ + मुल्य (फुकट ) आहे असे त्याचा अर्थ लावला तर तो तर्कदोष ठरेल .
आशयिक तर्कदोष :
१) गृहीत प्रश्न दोष :
तू बायकोला मारणे सोडलेस का ? तू दारू पिणे सोडलेस का ? भाजपा लोकशाही मानणार का ? या प्रश्नात एक तर्कदोष आहे . समोरचा माणुस दारू पितो, बायकोला मारतो, लोकशाही धिक्कारतो हे आधीच गृहीत धरण्यात आलेले आहे . पहिले गृहीत सिद्ध न करताच हा प्रश्न विचारणे तर्कदोष ठरते .
२) विवाद अज्ञान तर्कदोष :
हा असंबद्ध युक्तिवाद करणार्यांचा तर्कदोष आहे . वाद विवाद करण्याचे सामन्य नियम माहित नसणारी माणसे हा तर्कदोष वारंवार करतात. आपण युक्तीने मुळ प्रश्नाला बगल दिली ! असे त्याना वाटत असते . वस्तुत: हा तर्कदोष आहे . हि युक्ती तर्कशास्त्राच्या अज्ञानातून सुचलेली असते . याचे ४ उपभाग आहेत२अ ) व्यक्तीयुक्ती / हेत्वारोप :
यात विरोधकाच्या मताचे खंडन केले जात नाही . सरळ हेतूवर शंका घेतली जाते . उदाहरणार्थ आमच्या विरुद्ध लिहिण्यासाठी तुला पैसे मिळतात असे म्हणणे . किंवा तुझ्या मनातला सुप्त जातिवाद हे बोलतो आहे …. असे म्हणुन विरोधकाच्या व्यक्तिमत्वावर / हेतूवर / चारित्र्यावर शितोडे उडवले जातात . मग त्याच्या मतांचे खंडन करण्याची गरजच उरत नाही . हा तर्कदोष सर्व राजकारण्यांकडून वापरला जातो . मोदींच्या जुन्या विवाहावर टिका करणे किंवा सोनिया गांधींच्या परदेशी मुळाचा उल्लेख करून त्यांच्या विचारांचे खंडन टाळणे हा तर्कदोष व्यक्तीयुक्ती / हेत्वारोप म्हणुन गणला जाइल .
२ब ) भीती युक्ती :
आपले मत पुराव्याच्या आधारावर सिद्ध करायचे नाही . ताकदीची किंवा नुकसानीची भीती वारून युक्तिवाद टाळणे याला भीती युक्तीचा तर्कदोष म्हणता येईल . समान नागरी कायदा करू नका . मुस्लिम चिडतील . दंगल होईल . हा तर्कदोष आहे . अंधश्रद्धा विरोधी कायद्याने हिंदू चिडतील म्हणुन तो करू नका हा ही तर्कदोष आहे . हि भितीयुक्ती हा भारतीय राजकारणाचा पाया बनला आहे . भीती दाखवली कि युक्तिवाद संपला आपण जिंकलो असे वाटणे हा ॲरिस्टोटल ने तर्कदोष ठरवला आहे .
२क ) लोकभावना युक्ती :
आपला मुद्दा युक्तिवादाने सिद्ध न करता लोकांच्या भावनेचा हवाला देण्यात येतो . जगातले इतके कोट्यावधि लोक हजारो वर्षे धर्मावर श्रद्धा ठेवतात . मग धर्म चूक कसा असेल ? हा तर्कदोष आहे . नेक लोक अनेक वर्षे मुर्खपणाहि करू शकतात .
२ड ) आदर युक्ती :
एखाद्या महान माणसाचा हवाला देऊन स्वत:चे मत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो . उदाहरणार्थ : गांधीजी धार्मिक होते. महान माणसाची सर्वच मते योग्यच असतील असे नाही . पैगंबराने अनेक विवाह केले . ज्ञानेश्वरांनी चातुर्वण्यावर आघात केले नाहीत . तुकोबा वैष्णव होते . शिवाजी महाराजांनी आठ लग्ने केली होती . आंबेडकरांचा फाळणीला पाठिंबा होता . समजा हे सर्व खरे आहे . पण केवळ ह्या दाखल्यांवरून . आजचे युक्तिवाद करता येत नाहित. अगदी आजच्या काळातल्या इस्रोच्या वैद्न्यानिकांनी बालाजीला साकडे घातले यावरून धर्माची आवश्यकता सिद्ध होत नाही . महान आणि आदरणीय व्यक्तीमत्वांचे हवाले देत युक्तिवाद करणे हि युक्ती समोरच्याला गप्प करायला ठीक असली तरी तो तर्कदोष आहे. पण व्यक्तीपुजेने बद्ध समाजात हा तर्कदोष सहजच चालून जातो .३) चक्रविचार :
यात अ ने ब सिद्ध केले जाते आणि मग पुन्हा ब ने अ सिद्ध केले जाते . येशु प्रेषित आहे कारण बायबलात तसे लिहिले आहे आणि बायबल दैवी ग्रंथ आहे कारण येशु देव तसे म्हणतो . खरे पाहता या दोन्ही गोष्टी स्वतंत्र पणे सिद्ध केल्या पाहिजेत. चक्रविचार हा तर्कदोष सर्वच इझंम वाल्या मंडळींकडून थोडाबहुत वापरला जातो . वेद हि ईश्वरी वाणी अपौरुषेय आहे कारण वेदातच तसे म्हटले आहे किंवा आंबेडकरांनी म्हटले कि जेव्हढा बुद्धधर्म विज्ञान निष्ठ असेल तोच खरा बुद्धधर्म ! हि दोन्ही आर्ग्युमेण्ट यातच मोडतात .४) छद्म कारण दोष :
यात वेगळ्याच कारणाचे खण्डन करून भलताच परिणाम चूक ठरवला जातो . पक्षि उडतात मग गुरुत्वाकर्षण कसे काय अस्तित्वात असू शकेल ? वास्तविक पाहता पक्षि किंवा विमाने उड्ण्याचा आणि गुरुत्वाकर्ष्णाच्या सिद्धांताचा काहीच संबध नाही .
राजचे आडनाव ठाकरे आहे मग तो हिंदुत्व वादिच असणार हा हि तर्क दोषच. कारण आडनावाचा आणि विचारसरणिचा काहीच संबध नसतो !
५) उपाधी तर्कदोष:
याचं अॅरिस्टॉटलने दिलेलं उदाहरण सांगतो. हा कुत्रा बाप आहे, हा कुत्रा तुझा आहे. म्हणून हा कुत्रा तुझा बाप आहे. हे विधान उघडच तर्कसंगत नाही.
६) सामान्य-विशेष-संभ्रम :
सामान्य नियम जेव्हा आपण विशिष्ट वस्तुंना किंवा घटनांना उद्देशून लावतो, तेव्हा त्याचं हे उपयोजन काही अटींनी मर्यादित झालेलं असतं असं आपण मानतो. पण अनेकदा आपण या अटी स्पष्टपणे नमूद करत नाही. उदाहरणार्थ, ‘प्रत्येक माणसाला आपल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार असतो,’ हे सामान्य तत्त्व जर आपण घेतलं, तर माणसाला वेड लागलेलं नाही, तो शुद्धीवर आहे इत्यादी अध्याहृत अटी त्याचं उपयोजन मर्यादित करतात. अशा सामान्य तत्त्वाच्या उपयोजनावर मर्यादा घालणार्या अटी लक्षात न घेता, जर ते तत्त्व एका विशिष्ट वस्तुला लावलं, तर तो सामान्य-विशेष-संभ्रम तर्कदोष होय. उदाहरणार्थ, दारूच्या धुंदीत असलेल्या माणसाला आपल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार असतो असा निष्कर्ष मी काढला, तर हा तर्कदोष घडेल.
आता आपण पुढे नव्याने वापरात आलेले तर्कदोष पाहू. आपल्याला हवी तेवढी माहिती गोळा करायची नको त्या माहितीकडे दुर्लक्ष करायचं. मग आपोआपच आपल्याला हवे ते निष्कर्ष निघतात. फोर्टमध्ये राहणार्या माणसांची स्थानिक स्थिती पाहून सगळी मुंबई श्रीमंत आहे असा निष्कर्ष काढणं यास चेरी पिकिंग फेलसी असं नाव आहे.
वदतोव्याघात हा एक अजून तर्क दोष . यात आपण आपले म्हणने आपणच खोडून काढत असतो . उदाहरणार्थ ती म्हातारी बाई फार तरुणपणिच मरून गेली किंवा ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या . म्हातारी बाई तरुणपणिच मरू शकत नाही कारण ती म्हातारी आहे असे आपण आधीच म्हटले आहे . ब्राह्मण हि एक जात आहे . आणि जर भुतकाळात इतिहासात जाती नसलेली व्यवस्था अस्तित्वात असेल तर जाती निर्माण करायला … ब्राह्मण हि जात कोठून उत्पन्न झाली ?
सगळ्यात शेवटचं म्हणजे ः स्ट्रो मेन फेलसी ः यामध्ये दुसर्याचं मुख्य म्हणणं ऐकून घ्यायचं नाही आणि निरर्थक लहान मुद्यावर वाद घालत वेळ काढायचा याला स्ट्रो मेन फेलसी असं म्हणतात. स्ट्रो मेन म्हणजे बुजगावणं. शत्रुच्या सैन्यावर हल्ला न करता शत्रुच्या बुजगावण्यावर हल्ला करायचा आणि मग विजयाचा डंका पिटायचा… प्रस्तुत लेखातल्या मुख्य विषयाकडे दुर्लक्ष करून लहानसहान नजरचुकीवर हल्ला करून बुजगावणं मारल्याचा आनंद व्यक्त करता येईलच की! त्यालाच म्हणायचं स्ट्रो मेन फेलसी!
(संदर्भ स्रोत : मराठि विश्वकोश , तत्वज्ञान कोश , गुगल ! )
.