******************************************************************************************************************************************************************
हा लेख प्रस्थापित मतांना धक्का देणारा असल्याने . संदर्भासहित स्पष्टीकरण केलेले आहे . शेवटी संदर्भ ग्रंथांचि यादी दिलेली आहे (१-१० ६ ) हा संदर्भ - यादीत दिलेल्या पहिल्या संदर्भग्रंथातिल १ ० ६ वे पान असा वाचावा . कुरुंदकर आणि शेषराव मोरे हे माझे गुरु तर आहेतच पण स्वत:चे पूर्वग्रह बाजूला ठेवून तटस्थ पणे इतिहासाची समिक्षा करणारे दुर्मिळ इतिहासकारही आहे . या लेखाची प्रेरणा त्यांच्याच लेखनातून मिळाली आहे . नेताजिंचे विचार योग्य कि अयोग्य याची चर्चा न करता … त्यांचे मुस्लिम विषयक विचार काय होते ? ते आपण प्रस्तुत लेखात तटस्थ पणे जाणून घ्यायचे आहे .
******************************************************************************************************************************************************************
क्रांतिकारकांचे मुकुटमणि
क्रांतिकारकांचे मुकुटमणि म्हणुन भारतीय जनता सुभाषबाबुंना मानते . आपल्या या प्रिय नेत्याच्या मृत्यूची खबर भारतीय पचवू शकलेले नाहीत . नेताजी भारताबाहेर जिवंत आहेत अशी श्रद्धा बाळगणारे कित्येक लोक होते. वास्तविक पाहता बोसांचे आपल्या मातृभूमीवर नितांत प्रेम होते. भारत सोडुन कोठेतरी परदेशात गुप्तपणे राहण्यापेक्षा त्यांनी मायभूमीत सामान्य माणसाचे अतिसामान्य जीवन पत्करले असते . त्यांना भारतात प्रवेश नाकारणारे सरकार एक आठवडा हि टिकू शकले नसते. तरीही त्यांचा मृत्यू पचवणे कठिण जाते . ते जिवंत असावेत - असले पाहिजे असे भारतीय मनाला वाटत राहते आणि मग सुरस - चमत्कारिक कथांचा जन्म होत जातो . असे दंतकथांचे नायकत्व फार कमी नेत्यांच्या नशिबी येते कारण जनतेचे इतके अपार प्रेमही फार कमी लोकांच्या नशिबी येते.
महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे असेच झाले आहे . हिदुत्व वादि , कम्युनिस्ट , सेक्युलर , समाजवादी, कोंग्रेसि , ब्रिगेडी , बहुजन वादि फार काय कट्टर इस्लाम वादि सुद्धा - शिवराय आमचेच म्हणुन छाती ठोकून सांगतात. त्यामागे अनेक राजकीय कारणे आहेत पण सर्वात महत्वाचे कारण आहे कि - महाराष्ट्रातली तमाम मराठि जनता रयतेच्या या राजावर मनापासुन प्रेम करते . सुभाष बाबुंच्या वाट्याला हे भाग्य अखिल भारतीय स्तरावर आहे . प्रस्तुत लेखात भावनेची झूल बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ अंगाने विचार करायचा आहे .
सुभाष बाबू आणि सावरकर यात भेट झाली होती हे खरे आहे . सावरकरांचे अभिनव भारत संघटनेतिल सहकारी रासबिहारी बोस यांची सुभाशबाबुंना सेनेच्या स्थापनेत मदत झाली होती हे ऐतिहासिक सत्य आहे पण त्यावरून सुभाष बाबू हिंदुत्व वादि ठरत नाहित. त्यांनी सावरकरांची भेट घेतली होती यावरून ते सावरकर वादि हि ठरत नाहीत !
विस्तार भयास्तव प्रस्तुत लेखात आपण सावरकर संदर्भात अधिक खोलात न शिरता - नेताजिंचे मुस्लिम प्रेम पहायचे आहे . त्यानंतर सुभाष बाबुंचा सावरकरांसोबत फोटो लावायचा का ? याचा निर्णय सावरकर भक्तांवरच सोडायचा आहे . फक्त जाता जाता एव्हढे नमूद केले पाहिजे कि ज्या नौदलातील बंडाला घाबरून ब्रिटिश भारतातून पळाले असे अनुमान काढले जाते त्या बंडखोरांच्या हातात बंडाच्या वेळी भगवे झेंडे न्हवते . त्यांच्या हातात कोग्रेसचे तिरंगे होते आणि मुखी - महात्मा गांधी कि जय होते !
सुभाषबाबूंचे आकलन करताना कुरुंदकर लिहितात - जे सशस्त्र क्रांतीकारक आहेत, ते सगळे अहिंसाविरोधी . जे अहिंसाविरोधी ते सर्व गांधीविरोधी आणी जो गांधीविरोधी तो हींदुत्ववादी अशी सोयीची समजूत मध्यमवर्गीयांनी केलेली आहे."
जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.
सुभाषबाबूंनी त्यांच्या आझाद हिंद रेडीओवरच्या भाषणातून गांधीचा उल्लेख राष्ट्रपिता असाच केला होता. बंगाल मधल्या दास पॅक्ट नुसार ५२ % मुसलमानाना ६०% जागा मिळणार होत्या आणी सुभाषबाबू ह्या कराराचे पाठीराखे होते हे पटवून देत कुरुंदकर सुभाषबाबूंचे मुस्लीम प्रेम दाखवून देतात. आकलन मधल्या याच लेखात कुरुंदकर लिहितात - गांधी, नेहरू आदी ज्या नेत्यांना बहुसंख्य हिंदुंचा कौल मिळाला ते सर्व मुस्लिम धार्जिणे आणि ज्यांना बहुसंख्येने कधीच जवळ केले नाही ते हिंदुंचे एकमेव प्रतिनिधी असे गणिताचे विपरीत उत्तर हुडकण्यात वरिष्ठ वर्गीय हिंदुनि स्वत:च्या वांझोट्या बुद्धीचे कौतुक करून घेतले आहे . कुरुंदकरांचे वरील वाक्य कोणाला उद्देशून आहे ते उघड आहे. समजदार को इशारा काफी है !
मुस्लिमांना किती द्यायचे ?
बाबुंचे गांधिंशि वाद झाले होते हे इतिहास सिद्ध आहे. हे वाद कोणत्या कारणावरुन झाले होते ? या वादाला काही हिंदु मुस्लिम आयाम होता काय ?
हिंदु मुस्लिम भांडणाचा गैरफायदा इंग्रजांनि घेऊ नये म्हणुन सारेच कोंग्रेसि धडपडत होते. हिंदु - मुस्लिम प्रश्नाबाबत उदार भूमिका घेतली पाहिजे असे सर्व कोंग्रेस जंटल्मन्स चे म्हणणे होते. दोन मुस्लिमांना तीन मतांचा अधिकार देणारा कायदा लखनौ करारात लोकमान्य टिळकांनी उचलून धरला होता. टिळकांपासुन गांधिंपर्यंत आणि नेहरुंपासुन बोसांपर्यंत सारेच मुस्लिमांबाबत उदार मतवादी होते .
मुस्लिमांना किती द्यायचे ? यावरून गांधीजी आणि बाबूत वाद झालेले आहेत …. गांधी म्हणतात त्यापेक्षा अधिक दिले पाहिजे असे सुभाष बाबुंचे मत होते ! दास पेक्ट च्या वेळी याच कारणावरुन दोन्ही पक्षात वाजले हि होते. मुस्लिमांबाबत बोस हे गांधिंपेक्षा अधिक उदार आहेत हे ध्यानात ठेवले पाहिजे . देशबंधू चित्तरंजन दास यांच्या दास पेक्ट नुसार तत्कालीन बंगाल मधील ५ २ % मुस्लिमाना ६ ० % जागा विधिमंडळात राखीव मिळणार होत्या . सुभाषबाबू हे देशबंधू चित्तरंजन दास यांचे पट्टशिष्य होते . त्यांच्यावरील मृत्युलेखात सुभाष बाबू म्हणतात . " हिदू नेत्याताला कोणीही दास यांच्याएव्हढा इस्लामचा मोठा मित्र नाही . ते इस्लाम वर निस्सीम प्रेम करणारे होते. " (२- ६ ८ )
१ ९ ३ ८ साली जिन्हा सुभाष बाबुंना म्हणाले होते " मिस्टर बोस तुम्ही चित्तरंजन दास यांचे शिष्य आहात . त्यामुळे तुमचे माझे जमेल . पण माझे आणि गांधिंचे कधीच जमणार नाही " (३-२४६ )
फ़ोरवर्ड ब्लोक हा बाबुंचा कोंग्रेस अंतर्गत पक्ष होता . हा डाव्या विचारांचा पक्ष होता . उजव्या नाही ! हिंदु मुस्लिम प्रश्नाबाबत सुभाष बाबुंचि स्वत:ची ठाम मते होती . ती मते पुढिलप्रमाणे -
१) (अपवाद वगळता ) भारतातली मुस्लिम राजवट हि मुख्यत: सहिष्णू होती . त्यात हिंदुना सांस्कृतिक , सामाजिक आणि धार्मिक स्वातंत्र्य मिळत होते. (१ -८ )
२) मुस्लिम राजवटीच्या काळात भारत हा प्रगतीच्या आणि वैभवाच्या शिखरावर पोहोचला होता . (१-७)
३ ) मुस्लिम प्रश्न हा कधी अस्तित्वातच न्हवता … ब्रिटिशांनि फोडा आणि राज्य करा या नीतीने हा प्रश्न उभा केला . ब्रिटिश निघून जाताच हिंदु मुस्लिम प्रश्न चुटकीसरशी नष्ट होईल असे त्यांचे मत होते . (२-२ ९ १ )
४) इतिहासात कोणतेच हिंदु मुस्लिम असे भांडण झालेले नाही . भारतीय जनातेतले भेद ब्रिटिश शासानाने निर्माण केलेले आहेत . (२-३ २ १ ) . १ ९ २ ३ साली झालेलि मोपला दंगल हा ब्रिटिश राजवटीचा परिणाम आहे . (१ - ६ ९ )
६) भारताची फाळणी रोखावी म्हणुन बाबुंनि मुस्लिम लीगच्या जिनासाहेबाकडे एका प्रस्ताव ठेवला होता आणि जिनांना अखंड भारताचे पंतप्रधान बना अशी गळ घातली होती . (३-३ ० ७ ) . पण "सारख्याच जातीय" हिंदु महासभेकडे त्यांनी असला कोणताही प्रस्ताव पाठवला नव्हता !
विस्तार भयास्तव हि मते योग्य कि अयोग्य याची चर्चा करत नाही . पण सुभाष चंद्र बोस यांची मते हि अशी होती .
जिन्हा मुहम्मद या पाकिस्तानच्या राष्ट्रपित्याची भेट बोसबाबुनी सावरकर भेटीच्या दिवशीच घेतली होती |
सुभाष बाबुंचे मुस्लिम सहकारी आणि हितचिंतक :
१) अफ़गाणिस्तानचा अमीर अमानुल्ला याने भारतावर स्वारी करून हा देश इंग्रजांपासुन मुक्त करावा असे काही भारतीय मुस्लिम नेत्यांना वाटत होते. गांधिजिंचा याला पाठिंबा होता . या पदच्युत अमीर अमानुल्ला ची सुभाष बाबुंनि १ ९ ३ ४ साली रोम येथे भेट घेतली होती . सुभाष बाबुंच्या भावी योजना अमानुल्ला ला एव्हढ्या पसंद पडल्या कि त्याने सुभाष बाबुंच्या दिमतीला आपली इसोटा फ्राशिनी हि (महागडी) मोटार भेट दिली होती . (३-२१५ )
२) फोरवर्ड ब्लोक या नेताजिंच्या डाव्या पक्षात आणि आझाद हिंद सेनेत मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांचा सहभाग होता . पेशावारचे कार्यकर्ते मिया अकबर्शहा , अबिद हसन , हबिबूर रहमान, शहनवाज , कियानी , गिलानी यांनी आपली निष्ठा नेताजिंच्या चरणी वाहिली होती. (३ - ४ ० ८ , १ १ )
३) हबिबखान नावाच्या एका धनाढ्य पंजाब्याने नेताजिंचे एक भाषण ऐकले . तो धावत व्यासपीठाकडे गेला आणि चित्कारला " नेताजी मी माझी सारी संपत्ति तुमच्या चरणांशी अर्पण करतो आहे . केवळ संपत्तीच नाही . माझे सारे जीवनही . " (३- ४ ७ १ ). नेताजिंना असे अनेक हबिब्खान मिळाले होते.
४ ) १ ९ ४ १ मध्ये गुप्तपणे देशत्याग करून जाताना सर्व जवाबदारी अकबर शहा वर होति. प्रवासातले नेताजिंचे टोपण नाव होते - महंमद झिया उद्दीन ( ३-३१८)
५)बाबुंना या प्रवासात पेशावर ला उतरून घेण्यासाठी माजीदखान आले होते. माजिद खानाचा मोठा भाऊ म्हणजे अब्दुल काय्युमाखान . हे मुस्लिम लीगचे मोठे नेते होते. (३ - ३ ३ ९ )
६) पुढच्या प्रवासात रशिया कडे जाण्यासाठी त्यांनी हाजी महंमद चे सहकार्य घेतले. (३-३ ५ १ ). १९ ४ ३ मध्ये जर्मनीहून जपान ला जाताना बरोबर फक्त अबिद हसन होता . (३-४ ३ ३ ) । नेताजी ज्या विमानात निधन पावले त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेला एकमेव विश्वासू सहकारी म्हणजे हबिबूर रहमान .
नेताजिंना जेव्हढे मुस्लिम सहकारी आणि त्यांचे प्रेम मिळाले - तेव्हढे इतर कोणत्याहि तत्कालीन हिंदु नेत्याला मिळालेले दिसत नाही . नेताजिंच्या मुस्लिम प्रेमाची हि पावतीच आहे .
आझाद हिंद सेना ते आझाद मुस्लिम सेना :
१) आझाद हिंद फौजेत मुस्लिमांची संख्या लक्षणिय होती . मुळात ब्रिटिश सैन्यातच मुस्लिम बरेच होते आणि आझाद हिंद फौज हि याच युद्धकैद्यांतुन तयार झाली होती . नेताजिंचि मुस्लिम जनमानसातली प्रतिमा त्यांना या सेनेचे नेतृत्व करण्यात उपयोगी पडली असावी . आझाद हिंद सेनेचे मुख्य प्रतिनिधी मंडळ ७ लोकांचे होते . या ७ पैकी ४ मुस्लिम होते . (३-४ ५ ७ )
२) लक्ष्मि सहगल आझाद हिंद सेनेत केप्टन होत्या त्यांचे इन्किलाब झिंदाबाद नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यात पान क्र : ४ ७ वर लक्ष्मि सहगल लिहितात " वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीत म्हणुन स्वीकारणे नेताजिंना पसंद न्हवते. त्यामुळे मुस्लिम जनतेच्या भावना दुखावतात असे त्यांना वाटे . त्यामुळे फौजेत 'वंदे मातरम' ऐवजी 'जन गण मन' हे गीत म्हटले जाई . " लक्ष्मि सहगल यांचे चक्षुर्वै सत्य पुरेसे बोलके आहे. नेताजी मुस्लिमांच्या भावना जपण्यासाठी किती धडपडत असत हेच यावरून सिद्ध होते.
३) आझाद हिंद फौजेत फक्त आझाद हिंद रेडिओ नव्हता । त्या जोडीने आझाद मुस्लिम रेडिओ देखील होता . (३- ४ १ ४ ). मुस्लिमांची मने राखण्यासाठीच नेताजींनी हा निर्णय घेतला होता .
४ ) इक्बाल शेदाई हे सुभाष बाबुंचे खास मित्र होते त्यांना आझाद हिंद फौजेत नेताजिंनंतर क्र २ चे स्थान हवे होते . पण पुढे ते पालटले . शेदाइंनि आझाद मुस्लिम फौज उभारली . पुढे ते पाकिस्तानात स्थाईक झाले . (३ - ४ १ ५ ). नेताजिंच्या राष्ट्रीय आत्म्यास किती वेदना झाल्या असतील ! पण सुभाष बाबू आपल्या सिद्धांतावरुन हटले नाहीत . त्यांच्या फौजेत मुस्लिमांचे स्थान तसेच राहिले.
५ ) केप्टन मुहम्मद दुराणी हा नेताजिंचा फार लाडका होता . सिद्धहस्त लेखक विश्वास पाटिल यांच्या महानायक कादंबरित पान क्र ८३९ वर फार रोमहर्षक वर्णन आलेले आहे .राष्ट्रीय अशा अझाद हिंद फौजेत सुद्धा काही लोक धर्मांध प्रचार करत होते. पत्रके वाटली जात होती "गांधी आणि सुभाष हे हिंदुंचे नेते आहेत . यांना हिंदुराज्य हवे आहे . हिंदुंचे दास बनू नका . पाकिस्तानचा ध्यास घ्या . जिना साहेबासाठी आपले सर्वस्व अर्पण करा ". नेताजी हे पत्रक मोठ्याने वाचत असताना मुहम्मद दुराणी ताडकन उभे राहिले. आणि म्हणाले " पाकिस्तान हा शब्दोच्चार सहन करण्याऐवजी मरण पत्करलेले चांगले . खुद्द आझाद हिंद फौजेत असा बुद्धिभेद करणारा पशु कोण आहे त्याला आपल्यासमोर फ़रफ़टत आणतो . "
६) हाच तडाखेबंद भाषण देणारा महम्मद दुराणी च तो पत्रक वाटणारा गद्दार होता हे समजल्यावर नेताजिंना किती यातना झाल्या असतील . नेताजींनी आदेश दिला" पकडा त्या गद्दार दुराणिला !" (उक्त ९ २ ० ). शेदाइंप्रमाणेच दुराणिहि गद्दार निघाला हे ऐतिहासिक सत्य आहे. पण तरीही नेताजींनी आपले हिंदु मुस्लिम ऐक्याचे धोरण सोडले नाही हाही इतिहासच आहे .
७) नेताजिंच्या मृत्युसमयी त्यांच्या बरोबर एकमेव विश्वासू सहकारी होता - हबिबूर रहमान . तोच त्यांच्या हौतात्म्याचा साक्षिदार होता .
हिंदु मुस्लिम ऐक्यावर प्रगाढ श्रद्धा असणार्या सुभाष बाबुंना हिंदुत्वाच्या रांगेत बसवता येईल का ?
************************************************************************************************************************************************************************************************************************
संदर्भ ग्रंथ :
1) The Indian struggle (1920 - 1942) - Subhash Chandra Bose, OUP (1977)
2) The Essential writings of Netaji Subhash Chandra Bose, OUP (1998)
3) नेताजी : वि. स. वाळिंबे , मेहता पब्लिशिंग हाउस पुणे (१९ ९ ४ )