७ डिसें, २०१३

चैत्यभूमी - शिवाजी पार्क . बाबासाहेबांना वंदन करायला

आज दादरला गेलो होतो . रमलो तिथे .

 चैत्यभूमी - शिवाजी पार्क . ६ डिसेंबर  

 बाबासाहेबांना वंदन करायला जनसागर लोटला होता . लाखोंचा . फ़ोटो विकले जात होतेच पण त्याहून महत्वाच म्हणजे शाहिरी जलसे करणार्या पाच दहा उत्साह मुर्तिंचे अनेक ग्रुप प्रबोधन जलसा - पथनाट्य करत हिंडत होते . यात बहुसंख्येने नवबौद्ध आणि मराठि असले तरी तामिलनाड , मध्य प्रदेश , गुजराथ आणि ऊत्तर प्रदेशातूनही सर्व जातीचे  लोक आले होते . पाहून बर वाटल . बाबासाहेबांचे व्यक्तित्व  आणि लहान  प्रमाणात का होईना पण  त्यांचा विचार भारतभर पसरतोय हे चित्र आशादायी आहे . भरपूर भटकलो . फेसबुकवरचे अनेक दोस्त प्रत्यक्षात भेटले … थोडेथोडके नाही … कमीत कमी साठ - सत्तर लोकांनी अभिराम म्हणुन हाक मारून बोलावलं . मी पण पाच पन्नास लोकाना हाक घातली . युवकांची पथनाट्य आणि गाणी ऐकली , सोबत आमचे बडे भाय मोहिते सर होतेच .

मी प्रत्यक्ष चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मृतीचे दर्शन घेऊ शकलो नाही. खच्चाखच जाम लाइन प्लाझा च्या पुढे होती म्हणे … युवराज सरांचा शिवसैनिक दोस्त आतपर्यंत व्ही आयपी गाडी ऑफर करत होता … पण स्मृतीशिल्पे पहाण्यात रस नव्हताच मला . तिथे तर लई वेळा गेलोय . पुन्हा जायला हा काही मुहूर्त नव्हता . आलेल्या जनासागाराच दर्शन अधिक महत्वाचे वाटत . 

व्ही आयपी गाडीतून दर्शनाला काही गेलो नाही . 

शाहिरी जलसे , गाणी , आलेली माणस पहात आणि त्यांचे संवाद ऐकत गर्दीतच रेंगाळत बसलो .बाबासाहेबांचे खरे दर्शन किंवा खरी भेट … खरी गळा भेट या गर्दीत असते . 




वैभव आमचा  जिगरी दोस्त मात्र गावला नाही कारण त्याची तब्येत बरी नव्हती . पण सिद्धार्थ भेटला - दाभोळकरांवर मस्त पथनाट्य बसवलं होत त्यांनी . एका चुणचुणीत पोरानि तर धमाल उडवून दिली . त्या आंबेडकरी गर्दीत अनेक ठिकाणी दाभोळकर - त्यांचे फ़ोटो दिसले … पण दाभोळकरांचे विरोधकही दिसले . सिद्धार्थ मोकळेच्या पथनाट्यावर टिका करायला     बामसेफी  आले होते . भट दाभोळकरांचे  नाव आंबेडकरांबरोबर घेणे हा त्यांना बाबासाहेबांचा अपमान वाटत असावा ! सिद्धार्थ ने सडेतोड समारोप केला ………… बाबासाहेब आंबेडकरांनि जातिअंताचा विचार दिला , विज्ञान निष्ठेचा विचार दिला …. या मार्गावर जे असतील ते आमचे आहेत .

महाराष्ट्रात घडलेल्या जातीय अत्याचारांचे -  एत्रोसिटिचे प्रदर्शन हि लावले गेले होते . आमचे  मित्र सुनील गजाकोशानी पोस्टर डिझाईन बनवले होते. पांढर्या पोस्टरवर काळी अक्षरे . बस्स … चाळिस  सनातनी खुनांचा आणि सरंजामी बलात्कारांचा पोस्टरवर उल्लेख होता . त्यात खैरलांजी असेल … वाल्मिकी समाजाच्या तीन तरुणांची केलेली हत्या असेल . 

का ? का? का? 

तर हुच्च वर्णिय मराठ्याच्या पोरीशी लग्न केले म्हणुन …कार्यकर्ते सगळीकडे भेट देऊन आलेले . आयटीत काम करणारे उच्च शिक्षित . त्यांच्या स्मार्ट फोन मध्ये घडलेल्या घटनांचे फ़ोटो होते. वर्तमान पत्रातील कात्रणे होती . 

मी विचारले " पोस्टर पांढर्या वर काळे का ? फोटो का नाही टाकले ?

उत्तर मिळाले…. त्या कार्यकर्त्यांनी दिलेले उत्तर होते …. .
भावना भडकावून काही होणार नाही . हे फ़ोटो प्रदर्शनात टाकायच्या लायकीचे नाहीत . आम्ही अत्याचारांचे फ़ोटो टाकणार नाही । पण त्याबाद्दल जागृती करूच करू … आम्हाला समाजाचा फ़ोटो बदलायचा आहे…आणि तेव्हा । त्यावेळी … तिथेच । मला बुद्ध दिसला .






शिवाजी पार्क ची स्थानिक हुच्चभ्रू जनता बहुतेक १ २ ते ३ … ३ ते ६ … ६ ते ९ चे पिक्चर बघायला गायब झाली होती . घरे आणि उरलेली रिकामी माणसे …हिंदु कोलनी  जराशी उजाड वाटत होती . शिवशक्ती - भीमशक्तीची  टेबली राजकीय घोषणा करणारे नेतागण फिरकले हि नाहीत

काही शिव सैनिक पण बाबा साहेबांचे पोस्टर आणि विचार बोलत होते .  कवीमित्र  तांबे डोक्क्टर , उकळता गणेश चव्हाण , गायकवाड , धमाल कांबळे आणि… ज्यांची मते पटत नाहीत अजाबात पण… माणुस म्हणुन दिलदार असलेले जमाते इस्लामीचे भाइजान … आमचे जुने दोस्त नौशाद उस्मान सुद्धा भेटले . ते त्यांना उपयुक्त ठरतील ती पुस्तके खरेदी करायला आले होते . गळाभेट घेतली. बाबासाहेब मेल्यानंतरहि अनेकांची गळाभेट मिठी घडवून आणतात .

 महामानवास अभिवादन श्रद्धांजली पुण्यस्मरण वगैरे म्हणणार नाही .
 कारण भीमराव माझ्यासाठी सुपर मेन नाही . रियल मेन आहे . 

बाबासाहेबांना गळाभेट . जय भीम !


.
अभिराम दीक्षित

२ टिप्पण्या:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *