राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वदेशी चळवळ, गोळवलकर गुरुजी आणि चातुर्वण या बाबतीत प्रा मोरे कोणते विचार सतत मांडत असतात ? सांस्कृतिक राष्ट्र्वादाबद्दल आणि धर्माच्या राजकारणाबद्दल शेषराव मोरेंचि मते काय आहेत ? हे जाणुन घेणे आज आवश्यक आहे . त्यांच्या संमेलनातिल भाषणाचा राजकीय मुद्दा बनवताना, आणि मोरेंना संघाचा (पेड) हस्तक ठरवताना, निर्वाचन आयोग सदस्य पुरोगाम्यांनी कशा चलाख्या केल्या आहेत ते हि त्यातून स्पष्ट होईल . प्रा मोरेंचे पुढील संघ विषयक विचार मला स्वत:ला पटलेले आहेत. ते वाचकांनीही समजून घ्यावेत आणि त्यावर निकोप मनाने विचार करावा. अट अशी कि लेख संपुर्ण आणि शेवटपर्यंत वाचला पाहिजे .
हिंदु - मुस्लिम प्रश्न आणि त्या अनुषंगाने येणारे सेक्युलारीझम , धर्म स्वातंत्र्य , संस्कृती या बाबतीत संघाचे अनेक विचार मोरेंना मान्य नाहीत. त्यावर त्यांनी वेळोवेळी लिहिले आहे . पण तरीही मोरे हे प्रतिगामी / संघाचे हस्तक वगैरे का ठरवले जातात याचेही उत्तर (पुरोगामी लॉजिक) या लेखात उलगडले आहे . त्यासाठी इस्लाम चिकित्सा आणि हिंदु संघट्न यावरील प्रा मोरेंचि मते पहावी लागतील . प्रा मोरे यांनि नेमके काय लिहिले आहे ? ते त्यांच्याच शब्दात पाहू : -
प्रा स ह देशपांडे हे संघातुन बाहेर पडलेले मोरेंचे समविचारी अभ्यासक , शेषराव लिहितात "स. ह. चा बुद्धी प्रामाण्यवाद ( विज्ञान निष्ठा ) व अभ्यासा अंति जे पटेल ते स्पष्टपणे व प्रकटपणे मांडण्याचि वृत्ती यांमुळे ते संघात टिकले नाहीत " (१:३). प्रा मोरे व संघ यांचा संबंध कसा आला याचे सविस्तर वर्णन त्यांनी केलेले आहे . मोरे लिहितात :
" सावरकरांचे लिखाण आम्ही वाचले ते लिंगायत समाजातील उप्पे गुरुजिंच्या प्रेरणेने . त्यांचा कोणत्याहि हिंदुत्व वादि संघटनेशि संबंध नव्हता . किंबहुना आम्हाला स्वत:ला वयाच्या १९ व्या वर्षा पर्यंत संघ हे नावही माहित नव्हते.… (पुढे औरंगाबाद्ला) संघातील अभ्यासू मंडळिंशी चर्चा करताना त्यांच्याशी बुद्धिवाद , धार्मिक विचार व हिंदुत्व या विषयांवर वाद होत असत… सावरकरी विचारामुळे आंम्ही अधार्मिक , नास्तिक व पाखंडी बनलो होतो हे त्याना (संघाच्या मंडळिंना) आवडत नसे... याच महाविद्यालयीन काळात नवाकाळ मध्ये गोळवलकर गुरुजींची चातुर्वणाचे समर्थन करणारी मुलाखत दोन अंकात प्रसिद्ध झाली. … (पुढे ) मुलाखतीतील वादग्रस्त मुद्द्यांचा खुलासा प्रसिद्ध झाला, परंतु त्यामुळे आमचे समाधान झाले नाही. "(१: ६-८)
स्वदेशी कि चातुर्वण ?
प्रा शेषराव मोरे यांच्या स्वदेशी विषयावरील लेखनात त्यांचा हा विचार अधिक स्पष्टपणे आलेला आहे . अप्रिय पण (२) या पुस्तकात हे लिखाण समाविष्ट आहे . या पुस्तकाचे प्रकाशन आम्हीच केलेले आहे . प्रा मोरे संघाची भूमिका निश्कोषित करतात : -
" 'स्वदेशी' याचा संघप्रणित अर्थ ' राष्ट्रकारणात हिंदु सांस्कृतिक विचाराचा , हिंदु जीवन मूल्यांचा , हिंदु जीवन पद्धतीचा स्वीकार असा आहे. स्वदेशी वस्तुंचा वापर हा अर्थकारणाचा… भागही हिंदु जीवन मुल्यांवर आधारित आहे. … हिंदु दृष्टीकोना प्रमाणे आर्थिक स्पर्धा हि हानिकारक व त्याज्य गोष्ट आहे . हिदुप्रणित अर्थकारण हे अध्यात्मावर आधारलेले आहे. या विचारांची मांडणी गोळवलकर गुरुजिंनिच आपल्या विचारधन मध्ये करून ठेवलेली आहे, व त्यांचे अनुयायी तीच भूमिका मांडत असतात.… गोळ्वलकरांचे म्हणणे असे कि , आर्थिक स्पर्धा नको , भौतिक सुखासाठी अखंड धावपळ हि पाश्च्यात्य जीवनशैली आहे .… सुखप्राप्तीच्या स्पर्धेतून रोगट वासना चेतावली जाते. " (२: ५९)
संघाची मांडणी सांगुन झाल्यावर त्यावर टिका करताना प्रा मोरे लिहितात कि , " आर्थिक स्पर्धेला संघ परिवाराचा असलेला तीव्र विरोध चातुर्वण्य व्यवस्थेतून आला आहे . गुणसिद्ध चातुर्वणाला ते (संघ ) यासाठी आदर्श मानतात कि , या व्यवस्थेत व्यावसायिक वा आर्थिक स्पर्धा नाही . प्रत्येक वर्णाने वा व्यावसायिक जातीने इतरांशी स्पर्धा न करता , हक्कांपेक्षा कर्तव्य आणि भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुख मोठे मानून आपला व्यवसाय करत राहणे हे वर्ण व्यवस्थेचे तत्वच संघाच्या स्वदेशीच्या मुळाशी आहे " अशा स्पर्धा विरोधी विचारांमुळे हिंदु समाजाचा घात झाला आहे असा मोरेंचा आक्षेप आहे . या संघविचाराचे खंडन पुढिल लेखात करताना शेषराव लिहितात :
" स्पर्धेसाठी आवश्यक गुण अंगि बाणवावेत अशी आमची इच्छाच नसते … . भरपूर पैसा… नको असतो असे नाही : पण त्यासाठी पाश्चात्यांप्रमाणे शास्त्रशुद्ध परिश्रम करण्याची तयारी नसते . भ्रष्टाचार करून , अधिकाराचा गैरवापर करून , गुन्हेगारी मार्गही वापरून शोर्ट्कटचि पद्धत वापरून , नशिबाला कौल लावून खूप पैसे मिळवण्याचा हिंदु प्रयत्न करतील . पण त्यासाठी कठोर परिश्रमाचा (स्पर्धेचा ) मार्ग ते वापरणार नाहीत . …. प्रत्येक क्षेत्रात हीच स्थिती आहे . आणि याचे मुळ कारण आमच्यात परिश्रम करण्याची , कार्यक्षमता जोपासण्याची , जगाबरोबर स्पर्धा करण्याची … प्रवृत्तीच नाही . स्पर्धा म्हणून तिला तुच्छ लेखणे ही आमची संस्कृती आहे . आम्ही स्पर्धा करत नाही याचाच आम्हाला गौरव वाटतो ! " (२:६६)
सेक्युलारीझम चा घटनेतील अर्थ काय ?
शेषराव मोरेंनि मांडलेला घट्नेतला खरा सेक्युलारीझम पुरोगामी गट मान्य करत नाही हि खंत त्याना आहे पण संघाने चालविलेला सेक्युलारीझम विरोधी प्रचारही मोरेंना मान्य नाही . ते लिहितात -
" आजची भारतीय घटना सेक्युलर आहे हि गोष्ट (सर्व भारतियांच्या ) आणि हिंदुच्याहि दृष्टीने अतिशय मोलाची आहे . परंतु …. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मागो वैद्य म्हणतात कि " सेक्युलारीझम या शब्दामुळे वाद होतात… हा बाहेरचा शब्द घटनेत घुसवण्यात आला… अशा प्राकारचे विचार संघ नेत्यांनी मांडलेले आढळून येतील. …. घटनेतील सेक्युलारीझम च्या अर्था बद्दल …. आम्ही दाखवून दिले आहे कि सेक्युलारीझम हा शब्द घटनेत अगदी आरंभापासून आहे आणि तोही धर्मस्वातंत्र्याच्या कलम २५ मध्ये आहे … घटनेने फक्त पारलौकिक बाबतीतले स्वातंत्र्य पाळण्याचा अधिकार दिलेला आहे …. ज्यास हिंदु किंवा मुसलमान जीवन पध्दती किंवा जीवन मुल्ये मानतात असा धर्म पाळण्याचे अधिकार घटनेने दिलेले नाहीत "(१: १९-२०)त्यापुढे जाउन मोरे असेही म्हणतात कि , "सेक्युलारीझम हे घटनेने दिलेले मुल्य आहे ; घटना सार्वभौम आहे . हे लक्षात घेऊन राष्ट्र हि संकल्पना त्याच्याशी जुळवून घेतली पाहिजे . सेक्युलारीझम च्या विरोधी असणार्या गोष्टी राष्ट्र या संकल्पनेत आणता येणार नाहीत . " ( १: २४)
प्रा मोरेंनि अजून काय बोलायला हवे ? विचारकलह (२) या पुस्तकात प्रा मोरेंनि माझी धर्म विषयक भूमिका असे एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे . त्यात मोरे काय लिहितात हे पाहू आणि मग लेखाच्या समारोपाकडे जाऊ
".धर्माविषयी भूमिका मांडायचे म्ह्टले कि धर्म चिकित्सा आलीच . … जगातील कोणताही धर्म असे स्वातंत्र्य अनुयायांना देत नाही . अशी धर्म चिकित्सा करणार्याला काही धर्म आपल्या धर्मातून बाहेर काढून टाकतील; काही धर्म तर त्याला मृत्युदंड फर्मावतील…. तेव्हा माझी धर्मविषयक भूमिका याचा अर्थ माझी धर्म चिकित्सा … त्याचा धर्म प्रणित अर्थ धर्मपाखंड किंवा धर्मद्रोह असाच असतो . तेव्हा या दृष्टीने माझी धर्मविषयक भूमिका याचा अर्थ बहिष्कृत होण्याची भूमिका असाही होऊ शकतो . धर्म चिकित्सा म्हणजे धर्माविरुद्धची लढाइच असते. माझी धर्म विषयक भूमिका सांगणे म्हणजे एक प्रकारे हि लढाइचि भूमिका मांडणे होय ! " (३:८९)
प्रस्तुत लेखात शेषराव मोरे लौकिक धर्म आणि ज्या अर्थाने संघपरिवारात कर्तव्य / जीवन पद्धती या अर्थाने धर्म हा शब्द वापरला जातो त्यातले भेद स्पष्ट करून सांगतात . आणि या सर्वच अर्थाने धर्म कालबाह्य झाले असा निष्कर्ष काढतात . लेखाचा समारोप करताना मोरे लिहितात " देव , आत्मा मोक्ष मुक्ती या अर्थाने मनाच्या समाधानासाठी मृत्यू पश्चात धर्माचे स्वातंत्र्य ज्याला हवे त्याला द्यावे मात्र - इहलोकात जिवंत असताना किती आणि कसा धर्म पाळायचा याचा निर्णय राज्य घटनेच्या आधीन राहून बुद्धिवादाने घेण्यात यावा . राज्य ज्यावर हरकत घेणार नाही तितकाच धर्म पाळता येईल . ( ३:९७ )
प्रा मोरेंच्या सर्वच वैचारिक लिखाणात असे हजारोनी संदर्भ सापडतील . यात प्रतिगामी काय आहे ? संघाचे काय आहे ? मोरे संघाचे विचार सांगतात असा पुरोगाम्यांचा आक्षेप आहे . जर पुरोगाम्यांचे खरे मानले तर संघाचे विचारच पुरोगाम्यांहुन अधिक पुरोगामी आहेत असे म्हणावे लागेल !
विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मोरे सरांची एक मुलाखत आम्ही नांदेड येथे घेतली होती. त्यात शेषराव मोरे म्हणाले " जातिव्यवस्था उध्वस्त करून हिंदु समाजाने एक व्हावे असा विचार आम्हाला पटतो . हा विचार बाबासाहेबांच्या धर्मांतर घोषणेनंतर सुद्धा त्यांनी पुरस्काराला आहे . अनायलेशन ऑफ कास्ट मध्ये १९३६ साली आंबेडकर तो शब्द वापरतात . हिंदु संघटन शब्दाचा राग करण्याचे कारण नाही . पण हे संघटन कोणते ? आणि कशासाठी ? ते महत्वाचे . धर्माच्या आधारावर हिंदु संघटित होऊ शकत नाहीत . हिंदु लोकांचे हजारो धर्म आहेत . हिंदुच्या व्यासपीठावरून धर्म हा शब्द उच्चारता सुद्धा कामा नये . प्रा. मोरे पुढे म्हणाले :
"ज्या वेळी हिंदु लोक धर्म मुक्त होतील , आधुनिक बुद्धिवादी विज्ञान निष्ठ होतील त्यावेळी हिंदुचे हित होईल आणि जातीव्यवस्था संपुन हिंदुचे संघटन सुद्धा होईल. "
प्रा मोरे लिहितात : हि अमेरिका - हे अध्यात्म आणि ती मनुस्मृती :
" अमेरिकेत अनैकता , हिंसाचार वाढलेला आहे . … म्हणुन अमेरिकन लोक आत्मिक समाधानासाठी भारतीय अध्यात्माकाडे वळू लागले आहेत असे सांगण्यात येते . आमचे मत असे कि , अमेरिकेतील अडचणी खर्या आहेत , पण त्यावरील इलाज अध्यात्म नाही . मनुष्याचे मन सामाजिक दृष्टया सुसंस्कृत बनविण्या संबधिचे बुद्धिनिष्ठ शिक्षण व संस्कार हा त्यावरील उपाय आहे .… मद्यपान , जुगार व्यसनाधीनता, विवाहपूर्व आणि विवाहबाह्य स्त्री पुरुष संबंध , स्त्री लंपटता इत्यादी दुर्गुणांचा इतिहास महाभारत कालापासून अध्यात्मिक भारतातही आढळतो. माणसे अध्यात्मिक असतात म्हणजे ती सामाजिक द्रुश्ट्या सुसंस्क्रुत होतात हा समज निव्वळ खोटा आहे . 'आमचे सारे अध्यात्मिक तत्वज्ञ एका हातात वेदान्त आणि दुसर्या हातात मनुस्मृती घेऊन वागत आलेले आहेत . ' हा डॉ आंबेडकरांचा आरोप ज्यांना समजलेला आहे त्यांना हा विषय अधिक खुलाशाने समजून सांगण्याची आवश्यकता नाही ; आणि ज्यांना तो समजलेला नाही त्यांना तो सांगुन फारसा उपयोग नाही ! अध्यात्म वैयक्तिक त्याचा परिणामही वैयक्तिक . या चिंतनाचा भौतिक परिणाम शून्य आहे . अध्यात्माने स्वत:च्या मनाचा शोध घ्यावा याला विज्ञान अजिबात विरोध करणार नाही . पण त्या आत्मिक शोधाच्या निष्कर्षां आधारे सामाजिक आचार आणि नितीमुल्ये मुळीच ठरवू नयेत " (३ : ९८)
हा काय संघाचा विचार आहे ? सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे ?
शेषराव मोरेंचे कोणतेच पुस्तक कोणताही लेख संघाच्या एकाही विचाराचे समर्थन करत नाही . मोरेंचे एकुण १३ ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यातले प्रत्येक पुस्तक संघाच्या एकातरी मुलभुत विचाराच्या आणि प्रचाराच्या निव्वळ विरुद्ध आहे . मोरें चे ग्रंथ आणि निष्कर्ष पाहू :
प्रा मोरेंचे ते १३ ग्रंथ : पुरोगामी कोण ? प्रतिगामी कोण ?
२) काश्मीर एक शापित नंदनवन : काश्मीर प्रश्न व त्यातील पं नेहरू , जिन्हा , हरिसिंह आणि शेख अब्दुल्ला यांच्या भूमिकांचे विस्तृत दर्शन या पुस्तकात आहे . काश्मीर कोणालाच भारतात नको होते पण हरिसींह आणि अब्दुल्लांच्या आडमुठ्या धोरणाने हा प्रश्न भिजत घोंगडे राहिला आणि भारताच्या गळ्यात पडला हे सत्य मोरे दाखवून देतात . सार्वमत घेऊन तेथील मुस्लिम प्रजेच्या मतानुसार निर्णय काय झाला असता ? काश्मीर पाकिस्तान कडे जायला हवे होते - हा मोरेंचा निष्कर्ष संघाशी कोठे जुळतो ?
३) १८५७ चा जिहाद : संघ आणि सावरकर या दोघांच्याहि विरुद्ध निष्कर्ष काढणारे हे पुस्तक आहे . त्यावरील सविस्तर लेख येथे वाचावा .
४) शासन पुरस्कृत मनुवादी : हि पुस्तिका पाडुरंग शास्त्री आठवले यांच्यावर लिहिलेलि आहे . मागील युती सरकारच्या काळात पांडूरंग शास्त्रिंना सेना भाजपा सरकारने पुरस्कार दिल्यावर हा ग्रंथ त्यांनी विरोध म्हणून लिहिला . तो पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केला . त्यात मोरेंनि शास्त्रिजिंचे जुनाट , बुरसटलेले , मनुवादी विचार दाखवून देत पुरस्कार देण्यास विरोध केला आहे .
५-८ ) अप्रिय पण आणि विचारकलह : हे प्रत्येकी दोन भागातले लेखसंग्रह आहेत आणि त्यात विविध विषयांना स्पर्श केलेला आहे . सर्वाचा उल्लेख करणे या लेखाच्या मर्यादेत बसणारे नाही. पण त्यातील एक लेख सुभाष चंद्र बोस यांवर आहे . आणि सुभाष बाबू कसे गांधीभक्त , इस्लाम प्रेमी आणि हिंदुत्व वाद्यांच्या विरुद्ध होते याच्या पुराव्यांची जंत्री तेथे आहे . (३:१०६) . त्यावरील विस्तृत लेख येथे वाचता येईल.
९ - १० ) सावरकरांचा बुद्धिवाद आणि सावरकरांचे समाजकारण : नास्तिक , बुद्धिवादी , विज्ञान निष्ठ आणि सेक्युलर सावरकरांचे दर्शन या दोन पुस्तकातून होते . सर्व धर्म ग्रंथ आज कालबाह्य झालेले आहेत असे गर्जून सांगणारे सावरकर इथे दिसतात . हा विचार संघाशी कोणत्या अर्थाने जुळतो ? (अधिक वाचनासाठी इथे क्लिक करा )
त्याचप्रमाणे इथे हे हि समजू न घेणे आवश्यक आहे कि मोरे रूढ अर्थाने सावरकरवादी किंवा भक्त नाहीत . अखंड हिंदुस्थान , १८५७ चे स्वातंत्र्य समर असे सावरकरांचे अनेक महत्वाचे विचार खोडून काढण्यासाठी मोरेंनि स्वतंत्र ग्रंथच लिहिले आहेत . तात्यांची इतिहासदृष्टी , सावरकरांनी डॉ आंबेडकरांच्या बौद्ध धर्मांतरावर केलेली टिका असे इतरही बरेच सावरकर विचार मोरेंना मान्य नसल्याचे त्यांच्या साहित्यात दिसते . मोरेंचा गोडसे विरोध तीव्र आहे . गोडसेवादि लोक सावरकरांना बदनाम करत आहेत असा त्यांचा आरोप आहे .
११ ) डॉ आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास : - या पुस्तकात प्रा मोरे अशी मांडणी करतात कि , बाबासाहेब आंबेडकर हे एक अभ्यासू आणि विद्वान राजकारणी होते . राजकारण - समाजकारण - धर्म कारण याबद्दल ते सतत अभ्यास करत आणि नव्या अभ्यासानुसार - मते बदलत असत . उदाहरण द्यायचे झाले तर भगवत गीता या हिंदु धर्म ग्रंथाबद्दल लिहिता येईल .
जोपर्यंत हिंदु राहून समता आणता येईल असे त्यांना वाटत होते तोपर्यंत बाबासाहेब गीतेला पुज्य मानत होते. हा हिंदु समाजावरचा विश्वास उडाल्यावर ते गीतेला मुर्ख ग्रंथ म्हणु लागले . पुढे घटना परिषदेत दाखल झाल्यावर ....जेंव्हा त्यांना हिंदु कोड बिल पास करून हिंदु स्त्रियांचे भले करायचे होते तेंव्हा........ ते बिल पास करायला त्यांना सवर्ण हिंदुंचा पाठिंबा हवा होता....... आणि त्यावेळी दो आंबेडकरांनी गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत पण ........त्या बुद्धाकडुन उधार घेतलेल्या आहेत असे मत व्यक्त केले .
समता आणणे आणि लोकशाही रुजवणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते . त्यासाठी त्यांनी धर्म मिमांसा आणि इतिहास मीमांसा लिहिली , त्यात वेळोवेळी बदल केले , कारण त्यांना इतिहास केवळ लिहायचा नव्हता तर घडवायचाहि होता . अशाप्रकारे डॉ आंबेडकरांच्या कालानुरूप बदलत जाणार्या भूमिकांचा वेध प्रा मोरेंनि घेतला आहे . आंबेडकरांचे १९३५ सालच्या आधीचे सिलेक्टिव्ह विचार सांगुन संघाचे समरसता वादि लोक डॉ आंबेडकरांचे अपहरण करत आहेत असे प्रा शेषराव मोरे यांचे मत या ग्रंथात व्यक्त होते.
- डॉ आंबेडकरांच्या विचाराची त्या काळानुरुप मांडणी करून त्यांचे वैचारिक अपहरण कोणि करू नये यासाठी लागणारी भूमिका प्रा मोरेंनि या पुस्तकात तयार करून ठेवली आहे .
प्रा शेषराव मोरेंचि १३ पुस्तके प्रसिद्ध आहेत . त्यातले ११ ग्रंथ आपण वर पाहिले . यातला कोणता ग्रंथ संघवादि आहे ? प्रतिगामी आहे ? तरीही प्रा मोरेंना पुरोगामी कंपु संघाचे हस्तक का म्हणतो ? याचे उत्तर प्रा मोरेंच्या शेवटच्या दोन पुस्तकात आहे. ती पुस्तके आहेत ….
१२ - १३ ) मुस्लीम मनाचा शोध आणि चार आदर्श खलिफा : इस्लाम धर्माची तटस्थ चिकित्सा आणि मांडणी या दोन ग्रंथात आढळते . कुराण हदीस आणि जगमान्य इस्लामी पंडितांचे पुरावे देऊन मोरेंनि प्रस्तुत पुस्तके लिहिली आहेत . मुस्लिम मनाचा शोध या ग्रंथाला जमाते इस्लामीच्या पंडितांनि प्रस्तावना लिहून मोरेंचे कौतुक केलेले आहे . इस्लामी पंडित म्हणतात कि या कामाबद्दल अल्लाह मोरेंवर स्वर्गातून पुष्पवृष्टी करेल . त्यामुळे या चिकित्सेत थोडाही द्वेष नाही हे वेगळे सांगायची गरज नाही . मोरेंचि या ग्रंथातील मांडणी पुढील प्रमाणे : -
" इस्लाम हा केवळ धर्म नसून ती एक जीवन पद्धती (दिन )आहे . सर्व सामजिक आर्थिक आणि ऐहिक कायद्याचे नियमन इस्लाम ने करावे अशी इस्लामी धर्मशास्त्राची भूमिका आहे . इतर सर्व धर्म अपुर्ण आहेत . इस्लाम परिपुर्ण आहे . मूर्तीपूजा पाप आहे . आणि एकमेव देव अल्लाहचा एकमेव परिपुर्ण धर्म इस्लाम , इस्लामी कायदे शरिया , इस्लामी जीवनपद्धती याचा स्वीकार सार्या जगाने केला पाहिजे . या साठी सतत प्रयत्न - पराकाष्ठा म्हणजेच जिहाद करत राहणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य म्हणून इस्लामी धर्मशास्त्राने सांगितले आहे . सर्वप्रथम हा जिहाद स्वत:च्या मनातील गैर इस्लामि प्रवृत्तीविरुद्ध करायचा आहे , मग लेखणी आणि वाणीने इतर धर्मियांना इस्लामचे महत्व सांगायचे आहे . तरीही काफ़िरां नि ऐकले नाही तर जिहाद बा सैफ - तलवारीचा जिहाद करावा अशी इस्लामी धर्माज्ञा आहे. दार उल हरब (शतृभूमी ) ला दार उल इस्लाम बनवण्यासाठी वेळोवेळी तडजोडी करत अल्लाच्या अंतिम उद्दिष्टासाठी वेगवेगळ्या कालोचित मार्गाने जिहाद करत राहिले पाहिजे "
हे इस्लामचे स्वरूप जमाते इस्लामिला आणि त्यांच्या पंडितांना मान्य आहे . मुस्लिम समुदायाचे धार्मिक नेतृत्व करणार्याना जे मान्य आहे ते हिंदु पुरोगाम्यांना मात्र मान्य नाही .
प्रा मोरे आणि संघाची भूमिका : साम्य आणि भेद :
यापुढे जाउन हे हि सांगितले पाहिजे कि संघ कधीही धर्म चिकित्सा करत नाही. हिंदु किंवा इस्लाम याची कोणतीच चिकित्सा न करता त्यांचे राजकारण चालते . याबद्दल मोरेंनि संघाला दोष दिला आहे . आणि संघाने सर्व धर्म सामादार मंच , सर्व पंथ समभाव इत्यादी धार्मिक घोळ न घालता आधुनिक बुद्धिवादी दृष्टीकोन स्वीकारावा असे आवाहन केलेलं आहे . हिंदुंच्या हितासाठी बोलणे मोरेंना गैर वाटत नाही . हिंदुचे हित आधुनिक बुद्धिवादी होण्यात आहे आणि ते संघ करत नाही हा मोरेंचा आक्षेप आहे . हिंंदु मुस्लिम समस्येबाबत पुरोगामी गट चुकीची भूमिका घेतो . या बाबतीत हिंदुच्या बाजूनेही काही मुद्दे आहेत असे मोरेंना वाटते आणि त्या बाबतीत मोरेंचे संघाशी मतैक्य असणे स्वाभाविक आहे . पण लोकशाही आणि घटना यांच्या चौकटीतच हिंदूची बाजू मांडली गेली पाहिजे असा मोरेंचा आग्रह आहे .
संघाला असे बुद्धिवादी होण्याचे आवाहन कोणत्या पुरोगाम्याने केले आहे ? सतत कोन्पिरसी थेअर्या चाललेल्या . संवाद आणि चर्चा यावर पुरोगाम्यांचा विश्वास आहे काय ? असेल तर यातून संघ का वगळावा ? संघात माणसे नसतात ? संघाच्या व्यासपीठावर गेले कि माणुस बाटतो असे बरेच पुरोगामी मानतात . याची भरपूर उदाहरणे देता येता येतील. असे बाटल्याचे आरोप नरेंद्र जाधवांपासुन गंगाधर पानतवणे पर्यंत लेखक विचारवंतावर झाले आहेत . मग तेथे जाउन त्यांनी कोणते विचार मांडले ? याचेही पुरोगाम्यांना देणे घेणे नसते . हि पुरोगाम्यांची वैचारिक अस्पृश्यता होय . शिवाय हिदू , हिंदू हित , इस्लाम चिकित्सा हे शब्द वापरणे हाच पुरोगाम्यांच्या दृष्टीने अपराध आहे . अन्यथा मोरेंना प्रतिगामी म्हणण्याचे काय प्रयोजन ?
संघी सनातनी आणि ढोंगी पुरोगामी : एकाच नाण्याची एकच बाजू
संघ आणि पुरोगामी यांच्या विचारात मूल्यात्मक अर्थाने काहीही फरक नाही . परंपरेचे प्रेम , महापुरुष , उलट सुलट अर्थाने धर्म ग्रंथाचे प्रामाण्य, पुराण पोथ्यातले स्वत:चे जातीय पूर्वज याचा अभिमान , आणि इस्लामची चिकित्सा न करणे या बाबतीत संघ आणि पुरोगामी यांचे एकमत आहे . सन्मानिय अपवाद फक्त नियम सिद्ध करण्याइतकेच !
हिंदू संस्कृती मध्ये इतरांहून काहीतरी भारी आहे असे संघाला विनाकारण वाटते . चातुर्वण आणि वेदातली विमाने स्वत:ला विनाकारण भारी समजण्याच्या अंधश्रद्धेतून येतात . त्या आत्मगौरव आणि छद्म विज्ञानाचा अवश्य विरोध केला पाहिजे . पण पुरोगाम्यांनाहि त्यांची हजारो वर्षे जुनी परंपरा आहे आणि ती भारी आहे या अंधश्रद्धेतून बाहेर काढले पाहिजे . मानव केंद्रि विचार , उदारमत वाद आणि पुरोगामित्वाचा जन्मच मुळी फ्रेंच राज्यक्रांति नंतरचा आहे . पुरोगाम्यांना हे मान्य नाही आणि म्हणून मुल्यात्मक अर्थाने ते संघाचेच प्रतिगामी इतिहासवादी विचार वेगळ्या भाषेत मांडत असतात .
हिंदू संस्कृती मध्ये इतरांहून काहीतरी भारी आहे असे संघाला विनाकारण वाटते . चातुर्वण आणि वेदातली विमाने स्वत:ला विनाकारण भारी समजण्याच्या अंधश्रद्धेतून येतात . त्या आत्मगौरव आणि छद्म विज्ञानाचा अवश्य विरोध केला पाहिजे . पण पुरोगाम्यांनाहि त्यांची हजारो वर्षे जुनी परंपरा आहे आणि ती भारी आहे या अंधश्रद्धेतून बाहेर काढले पाहिजे . मानव केंद्रि विचार , उदारमत वाद आणि पुरोगामित्वाचा जन्मच मुळी फ्रेंच राज्यक्रांति नंतरचा आहे . पुरोगाम्यांना हे मान्य नाही आणि म्हणून मुल्यात्मक अर्थाने ते संघाचेच प्रतिगामी इतिहासवादी विचार वेगळ्या भाषेत मांडत असतात .
संस्कृती आणि नैतिकतेचे मापदंड सतत बदलत असतात - याला बुद्धिवाद असे म्हणतात . परंतु … पुरोगाम्यांची स्वत:ची अशी काही हजारो वर्ष जुनी धार्मिक वांशिक परंपरा आहे . पुरोगामी परंपरा हा मजेशीर शब्द त्यातूनच जन्माला आहे . शिवाय इस्लामची चिकित्सा न करता. इस्लाम हा एक पुरोगामी समतेचा सेक्युलर धर्म आहे असा जावई शोध पुरोगाम्यांनी लावला आहे . त्यासाठी डॉ आंबेड्करांच्या इस्लाम चिकित्सेकडे साफ डोळेझाक केली आहे. डॉ आंबेडकरांचि इस्लाम चिकित्सा वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.
हिंदुना धर्म मुक्त करणे हे हिंदुचे हित आहे असे म्हणणे आणि इस्लामची चिकित्सा करणे या दोन्ही गोष्टी पुरोगामी गट अपराध समजतो . . अतिशय दर्जेदार अपराध करणार्यांना पुरोगामी भाषेत संघाचा हस्तक असे म्हटले जाते . त्यामुळे मोरे हे आपोआपच संघाचे हस्तक ठरतात .
यात वास्तविकता अशी आहे कि सध्या पुरोगामी म्ह्णवणार्यांचि विचारधारा रिजिड आहे . ती कम्युनिस्ट साचेबंद विचाराला बांधलेली आहे . गेल्या साठ वर्षात यांनी स्वत:त कोणतेही बदल केलेले नाहीत . त्यामानाने संघाने अधिक बदल केलेले आहेत . . विचार बदलता येतात . आपल्या गटापेक्षा वेगळे पुरोगामी विचार असू शकतात . हे पचवणे सुद्धा पुरोगाम्यांना शक्य नसल्याने ते संघाला कावेबाज आणि मोरेंना हस्तक म्हणून मोकळे होतात .
खरे तर मराठी पुरोगामी हाच एक मोठा विनोद आहे . शरद पवारांच्या राजकारणाला जशी जातीय आणि धार्मिक समीकरणे लागतात ती जुळवणार्यांना महाराष्ट्रात पुरोगामी म्हणतात . शेषराव मोरेंचे विचार या पठडीत बसत नाहीत हाच त्यांचा अपराध आहे .
- डॉ अभिराम दीक्षित
------------------------------------------------------------------------------------
संदर्भ : (१:२० ) हा संदर्भ पहिल्या संदर्भ ग्रंथातील विसावे पान असा वाचावा .
१) हिंदुत्व : संघ आणि सावरकर या ब ल वष्ट लिखित पुस्तकाला प्रा मोरे यांनी लिहिलेली प्रस्तावना . कोण्टिनेण्टल प्रकाशन २०१३
२) लेखसंग्रह: अप्रिय पण भाग २ . प्रकाशक : अभिनव निर्माण प्रतिष्ठान , २००८
३) लेखसंग्रह : विचारकलह : भाग २ . प्रकाशक : अभिनव निर्माण प्रतिष्ठान , २००८
.
Nice Abhi...
उत्तर द्याहटवाहिंदूंना धर्ममुक्त करणे हेच हिंदू हित ही कसली जबरदस्ती ??? आणि कितीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा - " समाजासाठी घटना आहे , घटनेसाठी समाज नाही !!" ... या वाक्यानंतर मला आंबेडकरविरोधी , मनुवादी ही लेबले मारली जाणार नाहीत ही अपेक्षा ( नाहीतर अभिराम जी आणि फुरोगामी लोक्स यांच्यात फरक तो काय ???)...
उत्तर द्याहटवाहिंदूंना धर्ममुक्त करणे हेच हिंदू हित ही कसली जबरदस्ती ??? आणि कितीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा - " समाजासाठी घटना आहे , घटनेसाठी समाज नाही !!" ... या वाक्यानंतर मला आंबेडकरविरोधी , मनुवादी ही लेबले मारली जाणार नाहीत ही अपेक्षा ( नाहीतर अभिराम जी आणि फुरोगामी लोक्स यांच्यात फरक तो काय ???)...
उत्तर द्याहटवाSanghala sanghtan karayachay tya mule badala la vel lagato.. sanghatanet ekdum badal ghadvale jat nahi te halu halu Hoatat .. ani sangh badltoy he nishchit.. Samajat fakt buddhinishta lok rahat nahi shradhalu andhshradhalu etc ase kititari prakarache lok rahat ani hya saglyat sanghtan karayach mhanal tar tadjod alich pan jasa samaj badalato tasa sangh badaltoy .. Sangh lavchik ahe mhanun 90 yr tikala.. Purogami kahi karu shakat nahi sanghtana bandhyala tyag ani chritra lagat he tyanchyakad nahi ( apvad ahet pan ego problem tyamul apyashi ) ani more sir ani tumachya saglyanch kam sanghatlya budhinishtana changali vaicharik disha detey ani samajala pan .. Badal nakki hoiel vel lagel sangh 90 yr chalaly apan hi chalal pahije ..
उत्तर द्याहटवाहिंंदु मुस्लिम समस्येबाबत पुरोगामी गट चुकीची भूमिका घेतो . या बाबतीत हिंदुच्या बाजूनेही काही मुद्दे आहेत असे मोरेंना वाटते आणि त्या बाबतीत मोरेंचे संघाशी मतैक्य असणे स्वाभाविक आहे .
उत्तर द्याहटवाया एकाच गोष्टसाठी मोरे सरांवर संघी असल्याचा आरोप होतो