३ ऑक्टो, २०१५

प्राकृतकन्या संस्कृत

--------------------------------------------------------------------------
प्राकृतकन्या संस्कृत 
--------------------------------------------------------------------

प्राकृत चा अर्थ प्रकृतीत असलेली नैसर्गिक भाषा . आणि संस्कृत  म्हणजे संस्कार करून बनवलेली कृत्रिम भाषा . निसर्गातल्या कच्च्या मालापासून कृत्रिम गोष्टी बनतात. नैसर्गिक मातीवर संस्कार करून त्याच्या विटा बनवल्या जातात .   त्याचप्रमाणे  प्राकृतातून संस्कृत बनते. प्राकृत आणि संस्कृत हि त्या भाषांची नावेच इतकी स्पष्टवक्ती आहेत .

भाषा तद्न्य विश्वनाथ खैरे यांच्या म्हणण्यानुसार - संस्कृत हि भारतीय भाषांची जननी नाही. तर सर्व भारतीय भाषा ह्या संस्कृतच्या पितृभाषा आहेत. संस्कृत चे व्याकरण आदी साचेबद्ध नियम पाहिले. त्या भाषेतली यांत्रिकता पाहिली ... तर सहजच लक्षात येते कि हि एक हेतुपूर्वक बनवलेली भाषा आहे. जागातील दुसरी कोणतीही भाषा इतकी नियमबद्ध नाही . त्यामुळे संस्कृत कळणे अवघड पण इतर भाषांच्या मानाने शिकणे सोपे असते . काही नियम पाठ केले  कि संस्कृत शिकता येते.

संस्कृत भाषेचे गणिती नियम तिला स्थिर ठेवतात त्यामुळे हजारो वर्ष त्यातले श्लोक जसेच्या तसे राहतात - त्यात काना मात्रेचाहि  फरक पडत नाही . संस्कृत मधील शब्द मात्र विविध धातू पासून बनवले आहेत . हे धातू प्राकृत भाषातून उधार घेतले आहेत.  




द्रविड म्हणून वेगळी मानली गेलेली तामिळ भाषा उदाहरणार्थ घेऊ . 

हि भाषा संस्कृत पेक्षा अधिक पुरातन असल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत .

तामिळ भाषेतला पेरू / पेरियार - संस्कृत मध्ये येताना पितृ झाला. आगायम  / आकाशं हा शब्द तामिळ मध्ये आकाश याच अर्थाने येतो . पाण्यासाठी संस्कृत आणि तामिळ मध्ये तंतोतंत एकच शब्द आहे तो म्हणजे 'नीर ' . भूमी हा शब्द तामिळ मध्ये भूमी/पृथ्वी  याच अर्थाने येतो . रक्त / रत्त हा शब्द या दोन्ही भाषात रक्त याचा अर्थाने येतो .

ज्या दोन भाषातले जमीन , आकाश , पाणि, रक्त आणि पिता हे शब्द विलक्षण साम्य  दाखवतात - त्या दोन भाषा फार लांबच्या नातेवाइक असू शकत नाहीत . विश्वनाथ खैरे नि पुराव्या सकट शास्त्रीय पद्धतीने याचे मंडन केले आहे. आणि प्राकृत भाषांकडे संस्कृतचे सामाइक मातृत्व दिले आहे .



--------------------------------------------------------------------------
 एक्स्चेंज सेंटर :  संस्कृत 
--------------------------------------------------------------------------

कालौघात अनेक भारतीय भाषातले धातू संस्कृत मध्ये आयात करण्यात आले. त्यांची धातुसाधिते बनविण्यात आली. शब्द बनवण्याचे काटेकोर नियम पाणिनीय व्याकरणात आले. काळाच्या ओघात असा प्रचार झाला कि हि जननी भाषा ! मग इतर   भारतीय  भाषांनिहि  संस्कृतातून काही शब्द उचलले ...

त्यामुळे संस्क्रुत हि एक एक्स्चेंज सेंटर ठरली .

संस्कृत मधील साचे बद्ध  नियमाचा अजून एक फायदा आहे . तो म्हणजे यात नवे शब्द बनवणे सोपे जाते . कोम्प्युटर , केल्क्युलेटर ला मराठीत शब्द नाहीत . असूही शकत नाहीत . संगणक आणि गणकयंत्र हे आपण बनवलेले दोन शब्द इतके रूढ झाले आहेत कि ३० वर्षापुर्वीच्या मराठीत संगणक हा शब्दच नव्हता हे कोणास आज सांगूनही पटणार नाही.

वर्तमान पत्र , यष्टी रक्षक ,  टंकलेखक हे सारे शब्द सहज वापरत मराठीचा उलटा प्रवास संस्कृतच्या दिशेने चालू आहे काय ? असा प्रश्न पडतो . ज्ञानेश्वरीचा अध्याय आणि उद्याच्या वर्तमान पत्रातील आग्रलेख (हा हि  संस्कृत शब्द !) एकत्र पाहिले तर सहजच लक्षात येते कि मराठीत आधी कमी (तत्सम -तद्भव ) संस्कृत शब्द होते. आज जास्त आहेत .

 आजच्या बोली मराठीत सुद्धा संस्कृत शब्दांची टक्केवारी ज्ञानेश्वर कालीन भाषे पेक्षा अधिक आहे.

सर्वच प्राकृत भाषांनी नवे शब्द बनवण्यासाठी संस्कृतचा आधार घेतलेला दिसतो . त्यामुळे भारतीय प्रमाण भाषात कमालीचे साधर्म्य आले आहे .

लाऊड स्पीकर हा नवा शोध होता . त्यास देशी प्राकृत भाषात काही प्रतिशब्दच नव्हता. प्राकृत भाषात  आज सर्वार्थाने रूढ झालेले लाउड स्पीकरचे भाषांतर पाहू

१) मराठी =  ध्वनिवर्धक
२) मल्ल्याळम =  उच्च भासिनी
३) कानडी = ध्वनिवर्धक
४) बंगाली = शब्द  (बी) विवर्धक

प्राचीन भारतात छापण्याची कला अवगत झाली नव्हती . ज्ञान मुख्यत: मौखिक असे. पाठ करावे लागत असल्याने ते गाण्याच्या रुपात श्लोकबद्ध स्वरूपात संचित सोपे  होते.  त्यासाठी आखीव रेखीव गणितासारखी भाषा आवश्यक होती . समास - संधिविग्रहाचे काटेकोर नियम या गेयतेसाठी येतात.



सर्वच प्राकृत भारतीय भाषातले शब्द संस्क्रुत बनवताना धातू म्हणून उचलले गेले. याला लबाडी म्हणता येईल किंवा याकडे राष्ट्रीय एकात्मते  चे प्रतिक म्हणून पाहता येईल .पण तेंव्हाच असेही  लक्षात येईल कि देश असा कृत्रिम मार्गाने बनवावा लागतो .

संस्कृत हि ज्ञानभाषा ठरली याची कारणेही स्पष्ट आहेत . ज्ञान पाठ करण्यासाठीच संस्कृत चा जन्म झाला होता. पण पाठांतर घोकमपट्टी हि ज्ञानाची प्राथमिक अवस्था आहे . त्यानंतर विवाद - विचार - प्रयोग - नवनिर्मिती  असे बुद्धीला खुलवत न्यावे लागते. छापण्याच्या तंत्राचा उदय झाल्यानंतर संस्कृतचे महत्व कमी होऊ लागलेले दिसते.

 तात्पर्य -

प्राकृत भाषा निसर्गाने   केली !
संस्कृत मानवे प्रयत्ने  निर्मिली !!

संस्कृत विरोधक आणि समर्थक या दोघांनीही हे  तथ्य समजून घेतले पाहिजे.


- डॉ. अभिराम दीक्षित

-------------------
 (अजून एक महत्वाचा मुद्दा असा कि वेदाची भाषा पाणिनीय संस्कृत नाही . वेदाची भाषा आर्ष  आहे . हि तत्कालीन ग्रामिण लोकभाषा आहे . संस्कृत  नाही. वेद ऋचा सुद्धा तत्कालीन गुराखी , मेंढ्पाळ , गोपालक , याज्ञिक यांच्या लोकभावना व्यक्त करणारी लोकगीते  आहेत . वेदात विमाने नाहीत .  . ते एक पुरातन असे लोककाव्य आहे . भाषातज्ञ खैरे यांनीच वेदातली गाणी म्हणून काही रुचा भाषांतरीत केल्या आहेत . त्या वाचल्या कि आर्ष लोकबोली आणि लोकजीवन याची बरीच माहिती मिळते .   त्याविषयी कधीतरी सविस्तर लिहीन )

1 टिप्पणी:

  1. समान शब्द हे भाषा नात्याचे द्योतक नव्हे. उसनवारीत झालेल्या तोडनोडीमुळेही हे शक्य आहे.
    वर्ऩनात्मक पाणिनीय व्याकरण जेव्हा भाषक आदेशात्मक म्हणून वापरतात तेव्हा संस्कृतसारखी स्थिती होते.
    इंग्रज कालीन अस्मितेच्या प्रश्नातून भारतीय भाषा संस्कृतच्या जवळ जाऊ लागल्या.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *