२५ ऑक्टो, २०१५

देवाने क्वार्टर का बनवली ? (नास्तिक पुराण भाग २ )


आमच्या कॉलनितला -  माझा एक जुना मित्र -  हल्ली फार दारुडा बनला आहे. सुरवातीला शनिवारी  एक क्वार्टर प्यायचा, मग मंगळवार - गुरुवार - शनिवार चे दारु व्रत सुरु झाले . मग रोज पिऊ लागला.  कोटा वाढत - वाढत गेला . आता  पट्ठ्या दिवसाला अक्खी बाटली = १ खंबा  = ४ क्वार्टर… रीचवू लागला आहे . भल्या सकाळी  - पहाटे सहालाच मदिरेची आचमने   सुरु  करतो  . असो .  एकदा मी त्याला रस्त्यात पकडून  त्याचे बौद्धिक घेत होतो . दारू पिण्याचे दुष्परिणाम वगैरे - वगैरे समजावत होतो  …….तेंव्हाहि  स्वारी अर्थातच टुल होती. त्या टुल अवस्थेतही त्याची दारुवरील निष्ठा कमी झाली नव्हती. बर्याच वाद विवादनंतर त्याने दारू बंद नाही केली  तरी दारूचे प्रमाण कमी करायचे मान्य केले . हुश्श ! क्षणभर पॉज घेतला आणि मग बेवड्याने ब्रम्हवाक्य उद्गारले :

" देवाने क्वार्टर का बनवली असेल ?  काहीतरी विचार करूनच क्वार्टर बनवली असेल ना ? हे माप देवाच ! यापुढे एक क्वार्टर हून जास्त नाय पिणार . जेंव्हा देवाने क्वार्टर बनवली - ती  दिवसाचा कोटा म्हणून  ! त्याहून  अधिक पिणे हे पाप आहे !"  

बेवड्याचे वाक्य म्हणून हसून सोडून देऊ नका . बेवड्याने स्वत:च्या  नकळत…  एका महत्वाच्या तात्विक प्रश्नाला हात घातला आहे.

देवाने पृथ्वी का बनवली ? देवाने ऋतुचक्र का बनवले ? देवाने फळे - फुले - झाडे का बनवली ? देवाने माणुस का बनवला ? देवाने क्वार्टर का बनवली ? 






क्वार्टर काही देव बनवत नसतो - दारुच्या कारखान्यात ती बनते. हे शुद्धीतल्या माणसाला सहज कळते . इतर प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी थोडी शुद्धी वाढवावी लागते. नशा कमी करावी लागते.
देवाने क्वार्टर का बनवली ? 
हा प्रश्न अतिशय मुलभुत आहे - देव क्वार्टर बनवत नाही पण दारुगुत्तेवाला तरी देवानेच बनवला ना?  विश्वाच्या देवाचे ध्येय काय ? निर्मिक - निर्माता देव काय सांगतो ? 

माणसाच्या विचार सृष्टीत दोन प्रकारचे देव आहेत . विश्वाचा देव आणि मनुष्याचा देव.

मनुष्याचा देव आपल्या रोजच्या व्यवहारात आहे .  आपण त्याला नवस बोलतो , नमाज पढतो, आरती करतो , प्रसाद देतो,  कधी क्रुसावर टांगुन अश्रू ढाळतो . हे दोन प्रकारचे देव सर्व धर्मात आहेत . इसाई , इस्लाम  धर्मात त्याला एकच मानले  आहे तरी हि दोन्ही कामे मात्र  त्याना  करावीच लागतात. 

१) विश्वाचा देव :  हा  सहसा अव्यक्त निराकार असतो.   क्वार्टर - क्वार्टर वाला - दारुगुत्तेवाला - व्यसन मुक्तीवाला. चोर आणि पोलिस  या सार्याना निर्माण करतो. जन्म देतो . त्यांची मने आणी हेतूही तो तयार करतो. या विश्वाच्या  हेतूचा बोध म्हणजेच  , समग्र तत्वज्ञान होय .
 क्वार्टर :  पिणार्या -विकणार्या - बनवणार्या - व्यसनमुक्ती केंद्र चालवणार्या माणसांची साखळी तो - विश्वाचा देव - तयार करतो.

२) मनुष्याचा देव : हा व्यावहारिक असतो .  उपास , उपासना , नवस , नमाज, नागबली, प्रार्थना , यज्ञ याग,   कर्मकांड, ब्राम्हण भोजने  याबदल्यात हा माणसांची व्यक्तिगत कामे करून देतो . क्वार्टर खरेदी करण्यासाठी पैसे आणि पैशासाठी नोकरी  देणारा हा देव आहे.  हा सेटिंग करतो. पोरे पैदा करून देतो , पोरी सुद्धा पटवून देतो - सर्व धर्मात याचे खासा विधी आहेत .

 बुद्धिमान माणसाला मनुष्याच्या देवाचे कपडे काढणे काढणे सोप्पे असते. असले देव  अट्टल मानवी गुणधर्म दाखवतात, --  लबाड्या करतात , हाणामार्या करतात, द्वेष करतात , चिथावणी देतात , वर्ण , शोषण , विषमता , जिहाद, क्रुसेड  सारे काही जन्माला घालतात. निदान शुद्धीतल्या माणसाला  हि फालतुगिरी आहे हे कळायला हरकत नसावी. मुद्दा विश्वाच्या देवाचा आहे !






ग्रह , तारे , नक्षत्र , पृथ्वी ,  माणुस, प्रेम , मैत्री ,  हास्य …… कीटक , प्लेग , महामारी , युद्ध आणि भुकंप हे सारे एकाच वेळी तयार करणारा देव अनाकलनीय आहे .

 देवाचे हे स्वरूप भयावह , अफ़ाट , महान , पितृतुल्य आणि गूढ आहे ---- त्याचे कोणी खंडन करू शकत नाही -- कारण खंडन करणार्याचे मन, मेंदु , बुद्धी आणि हेतुसुद्धा "तो" च ठरवत असतो !!

विश्वाच्या देवाला बायपास  करण्यासाठी मनुष्याच्या देवाने उपास तापास कर्मकांडे नमाज आरत्या तयार केल्या आहेत . करोडो प्रकाशवर्षे आणि अब्जावधी किलोमिटर लांबीचे विश्व तयार करणारा देव पाच फुट माणसाच्या फालतू सुखदु:ख , संपत्ति , वासना ,  भ्रष्टाचार आणि डील फीट  करण्यासाठी मनुष्याचा देव नावाचा मध्यस्त नेमतो अशी श्रद्धा आहे. त्यासाठी धर्म तयार करतो अशीही श्रद्धा आहे.

एका प्रश्नाची निट चर्चा केली तर विश्वाच्या देवाचे हे लफडे समजायला निश्चित पणे मदत होईल - तो प्रश्न आहे
देवाने क्वार्टर का बनवली ?"  

हिंदुचा देव, मुस्लिमांचा अल्लाह आणि ख्रिस्त्यांचा गॉड 

चला तर मग या तिघांना हा प्रश्न विचारूया ! इथे एक मात्र लक्षात ठेवले पाहिजे कि --  हा प्रश्न राम , कृष्ण  , मुहम्मद , जिजस , बुद्ध आणि  महावीर याना नाही . इंटर्नेट वर यातल्या प्रत्येकाच्या विरोधातले आणि  बाजूचे असे  भरपुर लिखाण उपलब्ध आहे. आपल्याला त्यांच्या जन्मदात्याला  प्रश्न विचारायचा आहे ! आपला प्रश्न राम,  दशरथ , दशरथाचा फादर  … आणि सार्या  मानवजातिचे निर्माण ,  नियमन, निर्दालन -  हेतूत:  करणार्या हिंदुच्या देवाला आहे , येशूच्या आकाशातल्या बापाला आहे …. आणि अडाणी निरक्षर  मुहम्मादाला दिव्य कुराण सांगणार्या इस्लामी अल्लाहला आहे.  हा बाप प्रश्न आहे ! -  तू क्वार्टर का बनवली  ? 

ल्ला - गॉड - देव यांना लघुरुपात अगॉद  म्हणूया. पण प्रश्न विचारताना एकेकाला पकडून विचारूया. कारण प्रत्येकाचे उत्तर वेगळे आहे .  ….


अगॉद  अल्ला-गॉड-देव तसे बुद्धिमान समजले जात असले तरी सतत युद्धमान असतात. भांडणे न करता  हे उत्तर  हि त्रिमूर्ती कसे देते हे पाहणे मनोरंजक ठरेल.  कारण सर्व धर्मातल्या सर्व देवतांचा जन्म याच प्रश्नातून झाला आहे . हा बाप प्रश्न आहे ! -  तू क्वार्टर का बनवली  ?

-----------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------

या अवखळ जगातले सौदर्य , प्रेम , जिव्हाळा , खोबरे, सरबत, आनंद पाहून देव मानणे सोपे आहे ---- 
  दारिद्र्य , भूकंप , भूक , विषमता , रोगराई आणि महामारी पाहिल्यावर खरा प्रश्न  उभा राहतो.  आणि आपापल्या परीने अगॉद ने याचे उत्तर दिले आहे. 
-----------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------


हिंदुचा देव : पुनर्जन्माचा कावा 

हिंदुच्या समृद्ध अडगळीत विश्वाचा देव उलगडणारी  अष्टदर्शने आहेत . हा  धर्माचा तात्विक भाग झाला. प्रथम मुद्दा आचार धर्माचा घेऊ. आचार धर्म हा मनुष्याचा देव .  हिंदु हि भौगोलिक ओळख आहे . धर्म नाही . हिंदुचे हजारो आचार धर्म आहेत. जाते जाते कुलाचार : जातीचा कुळाचार हा धर्म समजला जातो . कुळाचार म्हणजे आपले देव , त्याची पूजा , संस्कार , जेवण , कपडे, सण , बारसे , लग्न , समारंभ , मयत  याची परंपरा . सर्व जातीच्या सर्व कुलाचारात पुनर्जन्माचे स्थान महत्वाचे आहे . किंबहुन पुनर्जन्माचा सिद्धांत  हाच हिंदुच्या हजारो  धर्माचा मसावी होय . मयताच्या लाडूला कावळा शिवणे  हा विधी सर्व हिंदू जातीत हिट आहे. कारण पुनर्जन्म सगळ्यांना फीट  आहे .





" मेरे करन  अर्जुन आयंगे "  म्हणून टाहो फोडणारी वेडी म्हातारी  हा आमच्या हिंदुचा  लसावि आहे. पुनर्जन्मावर बॉलीवूड मध्ये अनेक सिनेमे बनतात . आणि त्यांचे हिंदू  प्रेक्षक ते सिनेमे हिट करत असतात . इथे मुद्दा हिरो  कोणत्या धर्माचे आहेत ? हा कधी येत नाही . मुद्दा पुनर्जन्म हिट आहेत -  हा आहे.

पूर्व संचित हि हिंदूची महत्वाची कल्पना आहे . मागच्या जन्माच्या कर्मा नुसार पुढचा जन्म मिळतो .   हि कल्पना भविष्य सांगताना , कुंडली काढताना , मुंज , लग्न , सोळा संस्कार , मयत आणि तेरावे घालताना महत्वाची असते . आणि बॉलीवूडचे सिनेमे हिट करताना सुद्धा महत्वाची असते.

‘कर्मफलसिद्धान्त किंवा कर्मविपाक’ नावाचा सिद्धान्त, हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात (एवढेच नव्हे, तर भारतात निर्माण झालेल्या शीख ,बौद्ध,  जैनादि सर्वच धर्मामध्ये थोड्याफार फरकाने ) सुप्रसिद्ध व मान्यताप्राप्त आहे. माणूस जी बरीवाईट कर्मे करतो, त्याचे बरेवाईट फळ, त्याला ‘या जन्मात’ किंवा त्याच्या आत्म्याला ‘पुढील जन्मात भोगावेच लागते’ असे हा सिद्धान्त सांगतो. तसा स्पष्ट उल्लेख मुंडक, छांदोग्य व बृहदारण्यक या उपनिषदांमध्ये आहे, तसेच ‘पुनर्जन्म’ ही वैशिष्टय़पूर्ण उपनिषदीय कल्पनासुद्धा मूलत: त्यावर म्हणजे कर्मफलसिद्धान्तावर आधारलेली आहे. (बेडेकर शरद, लोकसत्ता लिंक)

सुख आणि दु:ख हे माणसाला आलटून पालटून भोगावे लागते. दु:ख का ? याचे हिंदु उत्तर आहे -  पूर्वजन्माचे संचित ! मागील जन्मातले पाप / पुण्य या जन्मातल्या सुख दु:खाचा हिशोब करत असते . भगवद्गीतेत त्याचे उल्लेख येतात आणि हिंदुच्या मनावर ते कोरले गेले आहे . भले त्यांनी गीता वाचली नसेल .

                        वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि।  
                                                तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही।।      गीता २- २२                        

जुने कपडे बदलून नवे धारण करावेत त्याप्रमाणे आत्मा नवे शरीर धारण करत असतो .  हि नवी शरीरे म्हणजेच नवा जन्म - पुनर्जन्म  आहे . असे पुनर्जन्म हे आपोआप घडत असतात . देव लोक्स मात्र आपोआप मानवी जन्म घेत नसून स्वत:च्या इच्छेने वा दुसर्या देवाच्या शापाने घेत असतात .

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
                           तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ गीता  ४-१३  

हिंदूचे भगवंत पुढे म्हणतात कि,  ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांचा समूह, गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या   मी कर्ता असूनही अर्जुना , मला- तू अकर्ताच समज.  कारण हा जो पुनर्जन्माचा सिद्धांत आहे तो खरे तर देव आणि सृष्टीनिर्मात्या इश्वराच्याहि वर मानला गेलेला आहे . हे जे नवे जन्म मिळणार आहेत ते मागील जन्माच्या कर्मानुसार आणि या जन्मीच्या गुणानुसार मिळणार आहेत . मागील जन्मातील पूर्वसंचित - या जन्मीचे गुण ठरवत असते हे ध्यानात ठेवले पाहिजे . 

पुनरजन्म , कर्मविपाक आणि चातुर्वण याची अशी गुंफ़ण आहे . 

-----------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------

दु:ख , रोग , भुकंप , विषमता , जाती श्रेणी  का आहे ?
अस्पृश्यता  का आहे ? देवाने   क्वार्टर का  बनवली ? 
यावर   हिंदु देवाने उत्तर दिले आहे -- पुनर्जन्म ! मागील जन्मीची पापे फेडण्यासाठी या जन्मी दु:ख भोगण्यासाठी देव त्याला क्षूद्र वा  बेवडा बनवतो ! खरोखर कित्ती कित्ती थोर  आहे हा हिंदु देव ! मागील जन्मीच्या पापाबद्दल कावा करून तो  बेवडा आणि क्वार्टर बनवतो !

-----------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------

हिंदुच्या देवानाहि दारू व्यर्ज नाही . श्रीकृष्णाचे यदुकुलिन वंशज दारू पिउन झिंगले - त्यात मारामार्या झाल्या आणि या यादवी युद्धात त्या कुलाचा नाश झाला हि गोष्ट आपण वाचली असेलच . यादवी हा शब्द सुद्धा तिथूनच आला आहे .  सोमरस पान  हा वैदिक यज्ञात महत्वाचा भाग आहे . देवाना यज्ञात आहुती म्हणूनसुद्धा सोमरस द्यायचा असतो . तो सोमरस  त्या बाप्पाला डायरेक्ट पोचत असतो ! सोमरस हे एक मादक पेय आहे . भगवान शिवशंकर स्वत: सुद्धा भांग पीत असत आणि त्याचे भक्त आजही ती प्रसाद म्हणुन घेतात . आजही काशी येथे सरकारमान्य भांग विकणारी दुकाने महादेवाच्या मंदिराच्या आवारात आहेत .

  .


 मुस्लिमांचा अल्लाह : राजकारणी देव 

इस्लामला शराब हराम आहे हे आपल्याला ऐकून माहित असेलच ! 
नास्तिक बुद्धीने कुराण हदीस आणि पैगंबर चरित्र याचा अभ्यास केला कि अल्लाहचा एक गुण ध्यानात येतो ते म्हणजे हा देव राजकारणी आहे . हा स्वर्गाची (जन्नत ) आश्वासने देतो .  जहन्नूम म्हणजे नरकाची भीती दाखवतो - आणि खलिफ़ाचि गादि  शाबूत ठेवतो. प्रश्न असा आहे कि , सर्व शक्तिमान अल्लाह…  काफिर आणि क्वार्टर सारखे  नापाक पदार्थ का बनवतो ?

काफिर बनवतो ते एक कट  म्हणून . आणि कपट  म्हणूनच क्वार्टर बनवतो . हे एक अल्लाचे भारी आहे .  सर्व शक्तिमान असून सुद्धा तो काफिरा ची निर्मिती आणि क्वार्टर चे  प्रोडक्शन चालू ठेवतो . त्यामुळे मोमिनांचि श्रद्धा मजबूत ठेवता -येते  म्हणून अशा अडचणी अल्लाने  मुद्दामहून निर्माण केलेल्या असतात .






बनिये का दिमाग और मियाभाई  कि डेअरिंग अल्ला जवळ आहे . म्हणुन तो रईस  आहे . आणि इस्लामी बंद्यांचि लढाऊ धर्मभावना जागृत रहावी म्हणून अल्ला इब्लीस काफिर आणि नापाक शराब बनत असते  . त्यामुळे अल्लाहने   काफ़िरंच्या हृदयावर अज्ञानाची मोहोर ठोकली आहे . आणि बनिया दिमाग वापरात डेअरिंग मात्र मियाभाय ला आंदण दिले आहे .  यामुळे इमान म्हणजे श्रद्धा मजबूत राहते .

इमान म्हणजे काय ?
 (१ ) अल्लाह त्याचे (२) देवदूत , देवदूत सांगतात ते (३) कुराण , कुराण देवदुताने ज्याला सांगितले तो  (४) प्रेषित मुहम्मद आणि कुराणानुसार वागल्यास (५) अंतिम निर्णय दिनी  होणारा अल्लाचा फैसला स्वर्ग कि नरक ? या पाच गोष्टीवर श्रद्धा ठेवण्याला इमान  असे  इस्लाम धर्मात म्हणतात.  यातले एकही खोटे म्हणून चालत नाही कारण प्रत्येक गोष्ट दुसर्यावर अवलंबुन असते . एकाला मानले नाही तर दुसरे खोटे ठरते ….  क्रमाने सारेच खोटे ठरते .



आता हे ईमान कायम ठेवणे हि अल्लाची जवाबदारी नसून मोमिनांचि जवाबदारी आहे . अल्लाने  काफिर आणि क्वार्टर का तयार केले ?  असा उद्धट प्रश्न विचारू नये हे खरेच .... पण कोण्या इमान वंताच्या  टाळक्यात हे प्रश्न आलेच  तर अल्लाहने कुराणात त्याचे उत्तर देऊन ठेवले आहे . ते उत्तर असे आहे:

                                                     कुराण ३:५४ ومكروا ومكر الله والله خير الماكرين

हे ( काफिर) अल्लाविरुद्ध कट करतात आणि अल्लाही त्याविरुद्ध कट करत असतो . अल्ला हा सर्वश्रेष्ठ कटकर्ता आहे . या अरबी आयातीत  मक्कार (कपटी) हा मुळ धातू वापरला आहे . हा शब्द मराठीतही आल्याने त्याची  अर्थछटा  आपणास माहित आहेच ! अशा अर्थाच्या अनेक आयती कुराणात आहेत . त्या एकत्रित रित्या इथे पाहता येतील  

एकुणात काफ़िरांच्या हृदयावर  अल्लानेच अज्ञानाची मोहोर ठोकली आहे . मग क्वार्टर नावाची सैतानी गोष्ट हि अल्लाच्या अशाच  व्यापक कटाचा भाग असते .दारू पिऊ नये कारण दारू पाजून मुस्लीमात फूट पाडणे हा सैतानाचा डाव आहे असेही अल्लाने एका ठिकाणी म्हटले आहे.   (कुराण ५ : ९०, ९१) 

 कधीकधी सैतान अल्लाहला भारी पडतो , किंवा तोही अल्ला च्याच कटाचा एक भाग असतो . एकून मामला गोलं गोल  आहे . असले बौद्धिक प्रश्न विचारीत बसण्यापेक्षा सरळ अल्लाच्या आज्ञेचे पालन करावे आणि स्वर्गात जागा बुक करावी . स्वर्गात मात्र अल्लाने दारूची सोय केलेली आहे .कुराणात स्वर्गातल्या दारुविषयी असे म्ह्टले आहे -  


                                                                             कुराण ४७:१५ 

                                                           47:15

कुराणातल्या स्वर्गात केवळ दुध , तूप आणि मधाच्या नद्या नाही , जे पितात त्यांच्यासाठी दारुच्या नद्या सुद्धा आहेत .          कुराण ४७:१५ 

पण हि दारू पिणाचि परवानगी जे इमान्वंत बंदे स्वर्गात जातील त्यांनाच आहे . भूलोकात दारुबंदी आहे .
 अर्थात हि दारू स्वर्गीय असल्याने ती चढत नाही ! आता चढत नाय तर प्यायाचीच कशाला ? असा चावट प्रश्न कुणि विचारू नये ! अल्लाला चावटपणा आवडत नाही !!



ख्रिस्त्यांचा गॉड : मद्यसमर्थक भगवान 

हिंदुचे देव काही दारूचे विरोधक नाहीत . अल्लाने स्वर्गात  फक्त दारू दिली आहे . पण हे दोघेही बळच कर दारुबंदिचा आग्रह धरत असतात. गॉड त्या मानाने बरा ! त्याचे देवदास सतत पीत असतात . ख्रिस्ती पाद्री वाइन घेतात. येशूचे रक्त आणि मांस म्हणुन पाव आणि वाइन चर्च  मध्ये वाटली जाते . इथे हा प्रसाद आहे हे ध्यानात धरावे . येशूच्या देवदासांनि कधीही दारुचा निषेध केलेला नाही . पण इतर वाइट गोष्टी का घडतात ? दुष्काळ , पूर , भूकंप हे सारे का घडते ?






पापी सैतान कधी कधी देवाला वरचढ ठरून अशी कामे करतो . हि वाट बायबल मध्येही मोकळी आहेच .जेनेसिस हा बायबलचा पहिला अध्याय त्याची पहिली ओळ म्हणते कि देवाने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली . (जेनेसिस १:१) आता जे त्या देवाने बनवले ते त्याच्याच इच्छेने चालणार ! पाश्चात्य बुद्धिवाद्यांनी हा प्रश्न अनेकदा चर्च ला विचारला आहे . त्यासाठी बायबल मधीलच काही व्हर्सेस काढून दाखवल्या आहेत . उदा बायबल मधील खालील श्लोक पाहू .




Deuteronomy 11:17

 then the anger of the Lord will be kindled against you, and he will shut up the heavens, so that there will be no rain, and the land will yield no fruit, and you will perish quickly off the good land that the Lord is giving you.

  देव चिडला कि दुष्काळ , भूकमारी , रोगराई , वणवे आणि भुकंप होतात असे वर्णन बायबल मध्ये ठीक ठिकाणी येते.  (उदा : James 5:17. आणि  Numbers 16:30-34). सीन म्हणजे पापमुक्ती नावाची कल्पना ख्रिस्ती धर्मात मध्यवर्ती  आहे . मनुष्य पापी असल्याने त्यावर देवच संकटे ढकलतो  Romans 8:19-21.  मुळात मनुष्य हा देवाचे बाळ असला तरी तो पापी आहे . एडम इव्ह ने ज्ञान वृक्षाचे फळ खाल्ल्यापासून  मनुष्य पापी आहे . मग बिचारे चर्च या माणसाला पाप्तून मुक्त करण्यासाठी येशूची दिक्षा देत फिरत असते . आणि त्याउप्पर हे सारे देवाचेच प्लानिंग आहे तो वाइटातुन चांगले काढतो , अशी मखलाशीही आहे . (Romans 8:28).

कदाचित त्यामुळेच भुकंप , पूर इत्यादी  काही आले कि तेथे चर्च धावून जाते आणि सेवाकार्यातून येशूच्या धर्माचा प्रसारही करते. वाइटातुन ख्रिस्त्यांसाठि  चांगले घडते ते असे !!




समारोप 


ख्रिस्ती देव मद्य समर्थक आहे . त्याचे देवदास दु:ख आणि रोगराई बरी न करता तिथे जाउन पाप मुक्तीचे धार्मिक औषध वाटत फिरतात. अगदी मदर तेरेसाही रोग्यांना बरे न करता त्यांची सेवा करत त्यांना पाप मुक्तिकडे घेऊन जात असे . त्यावरील पुर्ण लेख येथे वाचता येईल .  मुस्लिमांचा अल्लाह स्वर्गात दारू देण्यास तयार आहे , पण त्यासाठी अट हि कि भूतलावर धर्म सोडुन इतर कोणतीही नशा करायची नाही . हिंदुचा देव त्याहून भिन्न आहे . त्याच्या पुनर्जन्माच्या सिद्धांताला खुद्द देवाचीही गरज भासत नाही इतका तो मुलभुत आहे … आणि सर्व दु:खांची उत्तरे पूर्वजन्मीच्या कर्मात तिकडे मिळुन जातात . 

अगॉद  हि सगळी लबाडी आहे असे म्ह्टले तर भावना दुखवायचा संभव आहे . पण खरोखर हि काही लबाडिच असावी असे वाटत नाही … मानवी विकासाच्या रानटी  टप्प्यावर जेंव्हा अनेक उत्तरे मिळत नव्हती तेंव्हा माणसाच्या डोक्यातून देव जन्माला. पाउस का पडतो ? फुले का फुलतात ? आंबा गोड का लागतो ? या प्रश्नांची उत्तरे देवाने दिली . पण खरा अवघड प्रश्न पुढे आ वासून उभा होता …। 

दुष्काळ का पडतात ? भुकंप का होतात ? रोगराइत माणसे का मरतात ? देवाने क्वार्टर का बनवली ?

अगॉद  देवाला याचे उत्तर देता येईना … मग माणसाच्याच मेंदुतुन धर्म जन्मला असावा . त्याने अल्लाचे कट , ख्रिस्त्यांचे पाप हिंदुचे कर्म वगैरे शोधून काढले असावे .  देवाच्या आणि पर्यायाने धर्माच्या नावे नीतीनियम सांगायची पद्धत चालू झाली असावी . 

आज आपल्याला यातील बहुसंख्य गोष्टींची माहिती आहे . भूक , रोगराई , भूकंप आणि दुष्काळ का पडतात ? ते आपल्याला माहित झाले आहे . अनेक रोगावाराची औषधे हि मिळाली आहेत . जीवसृष्टीची निर्मिती कशी झाली ? आणि खगोलशास्त्रातील  अवकाश कसे आहे ? याबाद्दल आपल्याजवळ बरीच माहिती आहे . कोणत्याही ध्र्म्ग्रंथात हि माहिती नाही . हे देवालाही माहित नाही , कारण या देवाचा जन्म ज्या आपल्या रानटी  पुर्वजांच्या मेंदुतुन झाला.  त्यांना ती माहिती नव्हती . पण आता अगॉद   देव आणि धर्म याचे काही प्रयोजन उरते काय ? 

तरीही देव अजून शिल्लक आहेतच. धर्मही आहेत . ते अधिक अधिक टोकदार बनत आहेत .  हिंसक बनत आहेत . प्स्युडो सायन्स ची निर्मिती कारून आजचे रानटी  लोक देवा धर्माला जगवू पाहत आहेत. धार्मिक पूर्वजांना लबाड म्हणण्यात अर्थ नाही . त्याकाळी ज्ञान फार सीमित होते … पण आजच्या धर्म धुरिणांना लबाडच म्हणावे लागेल . वा दया दाखवून मूर्ख अंधश्रद्धाळु इतकेच म्हणता येईल . 

मानवी जीवनात भावनेला महत्वाचे स्थान आहे . आणि फारसा विचार करायच्या भानगडीत आपण  पडत नाही . ज्या दिवशी विचार केला त्यादिवशी  धर्म संपला . देव मेला. जर देवा धर्माविरुद्ध लढायचे असेल तर नव्या नास्तिक अस्मिता , नवे नास्तिक देव , नवे नास्तिक पंथ कामाचे नाहीत . ती वाटचाल विरुद्ध दिशेने असेल . लोकशाही मार्गाने चर्चा करून . विचार फुलवत नेउन यातून मार्ग मिळेल आणि नव्या नास्तिक  नैतिक पायावर मानवता उभी करता येईल . 

नीती आणि तत्वज्ञान याचा विचार आणि चर्चा सुरु केली कि फटाफट सारे अगॉद  देवधर्म मरून पडू लागतात . 


आगामी : 
नास्तिक पुराण भाग ३  : नास्तिकता :   थोडे नैतिक थोडे अध्यात्मिक 

१)  माझ्या कारट्याचे देव : http://drabhiram.blogspot.hk/2015/10/blog-post_10.html
२) देवाने क्वार्टर का बनवली ? : 
३) नास्तिकता :   थोडे नैतिक थोडे अध्यात्मिक  
४ ) माणुसकीचा झरा : नास्तीकता 



२ टिप्पण्या:

  1. मानवी जीवनात भावनेला महत्वाचे स्थान आहे . आणि फारसा विचार करायच्या भानगडीत आपण पडत नाही . ज्या दिवशी विचार केला त्यादिवशी धर्म संपला . देव मेला. जर देवा धर्माविरुद्ध लढायचे असेल तर नव्या नास्तिक अस्मिता , नवे नास्तिक देव , नवे नास्तिक पंथ कामाचे नाहीत . ती वाटचाल विरुद्ध दिशेने असेल . लोकशाही मार्गाने चर्चा करून . विचार फुलवत नेउन यातून मार्ग मिळेल आणि नव्या नास्तिक नैतिक पायावर मानवता उभी करता येईल .

    Please, explain this para in detail.

    उत्तर द्याहटवा
  2. is there any way that this article can be rewritten in Hindi or English so i can share it with non marathi friends who keep on fighting with me over nonsense god theory?

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *