८ सप्टें, २०१२

शार्दूलविक्रीडित



शार्दूलविक्रीडित



(शार्दूल म्हणजे सिंह. शार्दूलविक्रीडित म्हणजे सिंहाचा खेळ. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १९ अक्षरे आणी म स ज त त ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्‍हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे.त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. शार्दूलविक्रीडित वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -आम्ही कोण म्हणून काय पुसता ? ही कविता होय. ही चाल लग्नातल्या मंगलाष्टकालाही चालते
हा वृत्तबद्ध कविता करण्याचा ९५% जमलेला प्रयत्न आहे !)



कवितेचे नाव : शार्दूलविक्रीडित
वृत्त : शार्दूलविक्रीडित
कवितेचा विषय :शार्दूलविक्रीडित. ..सिंहाचा खेळ.


धाडसाचे वारे वाहत होते. वृद्ध झाडे जोर जोरात हलत होती. ठिणग्या उडत होत्या ... वणवा पेटणार होता.. अशाच एका ठिणगीकडे सिंहाच्या एका छाव्याची नजर गेली. आणी मग ......



वारे वाहत धाडसी धडधडे ; कल्लोळ ज्वालाग्रही
झाडे घासत ही परस्पर उडे ; तो जाळ भूमीवरी
सिंहाचा सुकुमार पुत्र अवघा ; झेपावला त्यावरी
खेळाया गवसे पहाच भलते ; शार्दूल क्रीडा करी. ॥


1 lion.jpg



छावा त्या विस्तवास खेळ समजी ; जाळात घेई उडी
दाहाची न मला क्षिती उब हवी ; गर्जोन ऐसे कथी
छातीशी कवटाळुनी हृदय ते ; उन्माद ज्वाला पिते
आगीचे अवघे शरीर बनते ; खेळे नसातून ती ॥

अंगारा सम नेत्र जाळच नखे ; हा पोत पंजा बने
जीभेची जणू हो मशाल जळती ; भाषाच ज्वालामुखे
वाटे तो नर स्वाभिमान जळता ; आगीस वाटे जनी
ज्वाला चित्त बने शरीर जळते ; आत्माच यज्ञाहुती ॥

पेटोनी हर चंदनी तरू उठे ; त्यांचा सुवासी हवी
त्या रानात घुमे पवित्र बनले ; युद्धात गेले बळी
ऐसा हा वणवा जळे धडधडा ; ज्वालाहुती पेटल्या
ज्वाला सिंह पळे धडाड वनी हो ; शार्दूल क्रीडा पहा ॥



2lion.jpg



ही शार्दूल मशाल जाळ जळती ; धावे वनी वाटण्या
आत्म्यातील जहाल तेज दिधण्या ; रानातल्या बांधवा
साक्षात्कार ज्वलंततेच मधला ; सर्वांस दर्शावण्या
आत्मा ना बनतो ज्वलंत कधिही ; दाहास घेण्याविना ॥

चीं चित्कार उठे नभात - गगनी ; ती माकडे भ्याडशी
सैरावैर पळा पळाच जनहो ; शार्दूल ज्वाला वनी
भ्यालेली हरणी पळेच घुबडे ; डोळे मिटोनी खरी
धावोनी वटवाघुळांसह वनी ; ती शोधती बोळकी ॥

सिंहाचे हृदयी स्वगर्व वसतो ; शार्दूल ज्वाला जशी
शार्दूलासम पाहिजे हृदयही स्वीकारण्या आग ती
ज्वालासिंह विचार आग जळती; भ्यांडास भीती तिची
जाळोनि स्वशरीर काय घुबडे ; घालीत अत्माहुती ?

शार्दूला सम धैर्य ना वसतसे : प्राण्यांतही जाणत्या
दोषी का म्हणता गरीब घुबडा ? मूर्खास बुद्धी किती ?
ज्वालासिंह परंतु व्यर्थ जळला ; शार्दूल क्रीडा वृथा
राखेच्या सम ते शरीर बनले ; शार्दूल राखे जसा ॥

येता एक झुळुक चंदनमयी; मंत्रावली राख ही
राखेतून पुनः उठेल उडण्या ; शार्दूल पेटोनिया
निद्रेचा लखलाभ होत घुबडा ; शार्दूल जागा खडा
राजेही घुबडे असोत वनिची शार्दूल नेता खरा


.
.3lion.jpg
.
.
.
झेपावेल सदा अवध्य नर तो ; शार्दूल क्रीडा पहा ॥







.
.
अभिराम दीक्षित. श्रीलंका २००५

४ टिप्पण्या:

  1. गणवृत्ताचा तुमचा अभ्यास दिसतो.दुरूस्ती योग्यच वाटली त्यामुळे रचनाकर्त्यास राग येइळ्से वाटत नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. मंगलाष्टके या शार्दुलविक्रिडित वृत्ततामध्ये असतात.अन्य काव्य इतर चालीतही म्हणता येते. अभिराम तुमचा हा काव्यपैलु माहितच नव्हता ,झकास.
    मी शाळेत प्रथम वृत्त,गण इ.शिकलो तेव्हा शार्दुलविक्रिडीत मध्ये एक काव्य केले होते त्याच्या पहिल्या दोनच ओळी मला आठवत आहेत त्या अशा,

    तारे पाहुनिया नभी मन कथी,ते रत्नभांडारही ।
    देवाचे विखरे सुवैभव खरे,माना कुबेरागृही ॥

    उत्तर द्याहटवा
  3. (वृत्तबद्ध कविता करण्याचा ९०% जमलेला प्रयत्न ! )

    उत्तर द्याहटवा
  4. उत्तम कल्पना व तीजवर प्रभावी शब्दरचनेची वस्त्रे. मुख्यत्वे वीर रस व काही ठिकाणी रौद्ररसोत्पत्ती उत्तम साधली आहे. ही कविता वाचल्यावर केशवसुतांची आवर्जून आठवण व्हावी इतकी सुरेख साधली आहॆ.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *