२८ मे, २०१५

सावरकर विचाराचा चिकित्सक आलेख


#########################################
जग अनित्य आहे . ते सतत बदलत असते गौतम बुद्ध
#########################################

लहानपणापासून मोठे होत असताना माणुस शिकत जातो.  नवे विचार सुचतात , बदलतात - कधी  पुन्हा पाहिल्यासारखे होतात.  मानवी स्वभावाचे हे गुणविशेष सर्व इतिहास पुरुषांना देखील लागू असतात . सावरकरांची विविध विषयावरील त्रोटक मते आणि वाक्ये वाचून  वाचक निश्चित पणे गोंधळुन जाइल . त्यांचे गायीबद्दलचे विचार एकिकडे त्यांचे हिंदुत्व दुसरीकडे , मुस्लिम विरोध एका टोकाचा आणि १८५७ च्या पुस्तकातली इस्लाम स्तुती दुसर्या टोकाला , वेद हे पाच हजार वर्ष जुने ग्रंथ असतील तर ते पाच हजार वर्ष मागासलेले ग्रंथ आहेत असे म्हणणारे बुद्धिवादी सावरकर एका बाजुला आणि डॉ आंबेडकरांच्या बौद्ध धर्मांतरावर   अतिशयोक्त टीका करणारे हिंदुसभेचे  अध्यक्ष दुसर्या बाजूला !

नवे शिकत सतत विचार बदलत जाण्यात काहीच चूक नाही .  त्या विचाराचा   परिणाम अधिक महत्वाचा आहे .

हे सर्व विचार एकाच व्यक्तीचे आहेत . सावरकरांनी  कोणत्या काळात ते मांडले हे पाहिले तर त्याचा एक चिकित्सक आलेख   काढता येईल . प्रस्तुत लेखाचा तोच हेतू आहे . समकालीन राजकारणाचा हा वेगळ्या अंगाने घेतलेलेला शोध आहे . सावरकरांच्या  जाहीर राजकीय भूमिका  कालानुक्रमे पाहू . १९०७ , १९११,१९२४, १९३७ आणि १९४८ या पाच   टप्प्यात सावरकरांचे बदलते विचार पहायचे आहेत . हे विचार निश्चितपणे परस्पर विरोधी आहेत . त्यातले उपयुक्त  कोणते ? याचा फैसला वाचकांनीच करायचा आहे.







१ ) समाजवादी  क्रांतिकारकांचा राजपुत्र  : साल १९०७ वय वर्ष चोवीस 

 सावरकर लंडन मध्ये शिकत असताना शामजी कृष्ण वर्मांच्या संपर्कात आणि संस्थात एकरूप होते . शामजी कृष्ण वर्मा हे इंग्लंड मधील समाजवादी , मुक्त चिंतक (फ्री थिंकर्स ) उदारमतवादी युरोपियनांच्या  चांगलेच संपर्कात होते . या गटात अनेक मुस्लिम क्रांतिकारी सामील होते . मिर्झा अब्बास , असफ अली , सिकंदर हयात खान यांच्याशी सावरकरांचा परिचय आणि मैत्री याच काळात घडली आहे . मिर्झा अब्बास यांनी इंग्लंडमधुन भारतात पिस्तुले पाठवण्याच्या कामी सावरकरांना सहाय्य केले होते . असफ अलिंनि  आपल्या मित्राचे वर्णन करताना लिहिले आहे " सावरकर हा माणुस तलवारीच्या धारी सारखा तल्लख आणि   पर्वतावरच्या धबधब्यासारखा  अस्वस्थ आहे. जेमतेम वीस  वर्षाचा हा देशभक्त त्याच्या संपर्कात येणार्या  प्रत्येक व्यक्तीच्या मनावर गारुड घालत  जातो  " संदर्भ :(5 Stormy years: Srivastav Pg 25,1983 ).





इंग्लंड मधील वास्तव्यात बंदुकिचा सराव 

तरुण क्रांतीकारकांना मोहवून टाकणारे भाषण, भीषण भाषा आणि भावना  भेदन या जोरावर अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेला सावरकरांनि जन्म दिला.   याच काळात त्यांची  मैत्री सेनापती बापट यांच्याशी झाली. या दोघांनी रशियन क्रांतिकडून  रासायनिक बॉम्बचे तंत्र बंगालात खुदिराम बोस पर्यंत पाठवले . बापटांशि सावरकरांची  मैत्री शेवट्पर्यंत कायम होती पण बापट हिंदु महासभेत आले नाहित. गांधिवादिच राहिले.


विशीतल्या विनायकाचे तेजस्वी लिखाण : १८५७ चे स्वातंत्र्य समर  



 तरुण वयात , इंग्लंडमधिल वास्तव्यात सावरकरांनी १८५७ च्या उठावा वरचे गाजलेले पुस्तक लिहिले . या पुस्तकात हिंदु मुस्लिम ऐक्याचे तुफान समर्थन आहे. पुढील काळात भगतसिंग आणि सुभाष बाबू या  ऐक्य समर्थकांनी या पुस्तकाच्या आवृत्त्या काढल्या आहेत .  बहादुरशा जफर ला बादशहा बनवण्या साठी हे  युद्ध लढले गेले होते . खुल्क   खुदाका , मुल्क बादशहा का और अंमल झाशी कि राणी का ! अशी घोषणा  नानासाहेब पेशव्यांनिहि  दिली होती . १८५७ च्या उठावात सामील झालेल्या सर्वांची हीच युद्धघोषणा होती . त्याचे मराठी भाषांतर " नीती अल्लाह ची, जमीन बादशाहाची आणि प्रशासन  स्थानिक जमादाराचे  " असा होतो . सावरकरांनी अशा हिंदु मुस्लिम ऐक्याचे जोरदार समर्थन केले आहे . बाहदुरशहा जफर भारताचा बादशहा होणे हे विशीतल्या  सावरकरांना स्वातंत्र्यच वाटते आहे . या पुस्तकात जिहाद हा शब्द अनेकदा कौतुकाने आला आहे
 आपली मातृभूमी प्रियतमा तिच्या स्वातंत्र्यासाठी जिहाद करण्यास तयार झालेली आहे... ...   गोर्या फिरंग्यांचे ताब्यातून हिंदुस्थानची मुक्तता करण्यासाठी इराणी (मुस्लिम) सैन्य लवकरच येत आहे. तेंव्हा या काफिर इंग्रजांच्या  ताब्यातून मुक्त होण्यासाठी समरांगणात उडी घ्यावी"  . अशा अर्थाची  वाक्ये सावरकरांच्या १८५७ वरील पुस्तकात सर्रास आढळतात. (संपुर्ण संदर्भ येथे क्लिक करा )
१९१० पर्यंत  सावरकरांचे  मुख्य सहकारी सुद्धा समाजवादी होते. मादाम भिकाजी रुस्तुम कामा यांनी स्टुटगार्ड च्या आंतर राष्ट्रीय परिषदेत स्वतंत्र भारताचा नवा  ध्वज फडकावला होता .  या  तत्कालीन ध्वजाचे  करते डिझायनर सावरकरहि  होते . हि  स्टुट्गार्ड ला भरलेली समाजवादी परिषद होती . (२२ ओगस्ट १९०७) .



मादाम भिकाजी रुस्तुम कामा 
हिंदु , मुस्लिम आणि बौद्ध यासाठी तीन रंग , हिंदु मुस्लीम एकतेसाठी  सूर्य चंद्र आणि तत्कालीन भारतातील आठ प्रांत (प्रोव्हिन्स ) दर्शवणारी आठ कमळे असा हा सर्व धर्म समभावी ध्वज - 
 (हिरव्या रंगाचे स्थान सर्वात वर आहे )

या काळात सावरकर हिंदु आणि मुसलमान ऐक्याचे पुरस्कर्ते होते . २४ ओक्टोबर १९०९ रोजी सावरकरांनी  लंडन मध्ये दसरा उत्सव घेतला होता : कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधीना बोलावले होते.  अभिनव भारत या त्यांच्या क्रांतिकारी संघटनेत अनेक मुस्लिम होते . त्यांच्यावर समाजवादी विचारसरणीची छाप होती . भारताची भावी राज्यघटना कशी असावी ? यावर चर्चा करण्यासाठी सावरकर विविध विचारवंत  - क्रांतिकारकांना या काळात भेटले आहेत. त्यापैकी एक कम्युनिस्ट विचारवंत लेनिन आहेत .
संदर्भ :  (http://www.savarkar.org/en/armed-struggle/savarkar-london)

याकाळात  सरोजनी नायडुंनि - क्रांतीकारकांचा राजपुत्र  असे संबोधन सावरकरांना वापरले होते. ते एक सार्वत्रिक समकालीन आकलन होते.

अभिनव भारत हे नाव सावरकरांना मेझीनिच्या यंग इटाली वरून सुचले आहे. अभिनव भारत संस्थेने इंग्लंड बर्यापैकी दणाणून सोडले होते . मेझिनी हा लोकशाहीवादी आणि समाजवादा कडे कल  असलेला विचारवंत आहे.

अभिनव भारत संस्थेचे तरुण क्रांतिकारक (डावीकडून )
  उभे - मित्रा, एम पिटी आचार्य , हरनाम सिंग,  सैय्यद हैदर , राजन , गाय अलरेड
बसलेले - व्हीव्ही एस अय्यर , शर्मा ,विनायक  सावरकर , निरंजन पाल , आर एम खान , अमीन 
#################################################################################
         आकाशात पतितं तोयं , यथा गच्छति सागरे , सर्व देव नमस्कारम , केशवं प्रति गच्छति | 
(अर्थ : आकाशातून पडणारे पाणि ज्याप्रमाणे शेवटी सागरालाच मिळते , त्याप्रमाणे कोणत्याही देवाला केलेला नमस्कार शेवटी एकाच ठिकाणी पोचतो: सर्व धर्म समभाव 
#################################################################################


 वयाच्या विशीत सावरकर धर्माचा उपयोग स्वातंत्र्य  लढ्यासाठी करत असत . हिंदु आणि मुस्लिम असा भेद ते मानत नसत . सर्व देवांना  एकच मानत . सर्व धर्म समभावाची हि  धार्मिक शिकवण आहे. भारतीय परंपरा आहे.  सावरकरांच्या तत्कालिन लेखनात हि धार्मिकता स्पष्ट जाणवते .   येणारा काळ त्याना सेक्युलर (इहवादि) आणि नास्तिक बनवणार आहे. पुढे राजकीय हिंदुत्व वादि देखील  बनवणार आहे.

संगित शारदा नाटक सुरु असताना अनंता कान्हेरेने कलेक्टर जेक्सन मारला मदनला धीग्राने लंडन मध्ये कर्झन वायली ची हत्या केली  

सावरकरांनी इंग्लंड मधून काही ब्राउनिंग पिस्तुले भारतात पाठवली होती. त्यातल्या एकाचा वापर करून अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जेक्सन ला यमसदनी धाडले. लंडन येथे  मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला ठार मारले
या दोन्ही कारस्थानाचे  सूत्रधार म्हणून अटक झाली . ब्रौनिंग पिस्तुले आणि जहाल शिकवण दोन्हीही सावरकरांची होती.   लहानपणीच घरातल्या त्यांनी अष्टभुजा देवीसमोर स्वातंत्र्यासाथि मारण्या मारण्याची शपथ घेतली होती . भारतात क्रांतियुद्ध पेटवणे हा त्यांना ईश्वरी संकेत वाटत असे. या काळात ते सर्व धर्म संभावी आणि ईश्वरावर श्रद्धा असलेले आस्तिक होते. कैद झाल्या नंतर अटकेतल्या  आस्तिक सावरकरांनी क्रांतीकारी मित्रांना लिहिलेले शेवटचे पत्र -  

आस्तिक सावरकरांनी क्रांतीकारी मित्रांना लिहिलेले शेवटचे पत्र 



२) अंदमानचा नास्तिक  : साल १९११ वय वर्ष अट्ठावीस 

बोटीतून उडी मारून पळुन जाण्याचा त्यांचा प्रयत्न १९१० सालचा आहे . ह्या प्रयत्नात नाट्य कमी आहे . कायद्याचा तांत्रिक मुद्दा अधिक महत्वाचा आहे . इंग्लंड - फ्रांन्स आंतराष्ट्रीय जल सीमा आणि आणि गुन्हेगार ह्स्तांतरणाच्या कायद्यात हे प्रकरण हेगच्या आंतर राष्ट्रीय न्यायालयात गेले . त्यामुळे बरेच गाजले . या  उडिबद्दल अनेक अपसमज प्रसूत झाले होते . गवगवा झाला . सावरकर  तीन दिवस सतत पोहत होते - ब्रिटिश गोळ्या झाडत पाठलाग करत होते वगैरे . … भक्त दर्शनाला येऊ पहात (रत्नागिरी वास्तव्य )
 " मी काही पाच - दहा मिनिटाहून अधिक  पोहलो नाही आणि कोणि गोळ्याही झाडल्या नाहीत.(उडी प्रकरण) ते तितकेसे कठिण सुद्धा नव्हते  " असे सावरकर भेटायला येणार्या भक्तांना सांगत तेंव्हा त्यांचे कोमेजलेले चेहरे पाहून त्याना गंमत वाटत असे! *(स्मृतीपुष्पे :  बापट )
 उडी  मारून पळण्याचा  प्रयत्न फसला . पण पळुन जाण्यात - फसवण्यात त्याना काही गैर वाटत नव्हते हे ओघानेच आले . किंवा तुरुंगात राह्ण्या वरही त्यांची फारशी श्रद्धा नसावी. याचा संदर्भ माफिशी जोडता येईल . माफीचे प्रकरण फार शोधायची गरज नाही त्याबद्दल सविस्तर माहिती सावरकरांनी माझी जन्मठेप मध्ये दिलेली आहे.


अंदमानातल्या  म्युझियम मधील कोलू  ची प्रतिकृती : कोलुने खोबरे दळून तेल काढायची  शिक्षा सावरकरांना अनेकदा झाली होती . 

१९११ साली सावरकरांना ५० वर्षाची शिक्षा ठोठावली गेली. त्यातली ११ वर्षे सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात काढली आहेत. हि अकरा वर्षे हालाखीची , श्रमाची , कोलूची , विजनवासाची आहेत . येथे सावरकरांच्या राजकीय भूमिकेत प्रक्षोभ आढळतो .  या काळात सावरकरानि   दीर्घ वाचन - लेखन केले.   साहित्य - इतिहास - कविता याबरोबरच सामान्य कैद्यांचा सहवास त्याना लाभला . इथे सावरकर नास्तिक (अज्ञेय वादी) बनतात.

तुरुंगातील कष्ट आणि हाल सोसताना त्यांच्या मनात येऊ  पाहणारे आत्महत्या , सृष्टीचे ध्येय , मनुष्याचे ध्येय आदी विचाराचा बौद्धिक काथ्याकुट करताना ते लिहितात:
"कसले स्वत:चे कर्तुत्व घेऊन बसला आहेस ? तुझे,  त्यांचे, ह्या सर्व मनुष्यजातीचे काय … पण ह्या सूर्याचे देखील ह्या प्रचंड विश्वाच्या उलाढालीत तिळमात्र तरी महत्व आहे काय ? " (माझी जन्मठेप २:८४ )
हाच विचार पुढे त्यांच्या एका लेखात अधिक विकसित झालेला  आहे : - " मनुष्य जातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले आणि प्रतिकूल ते वाईट अशी नीती - अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे . देवास आवडते ते चांगले - आणि मनुष्याला  जे सुखदायी ---- तेच  देवाला आवडते----- ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत ; कारण त्या असत्य आहेत . " (संदर्भ ६:६)

" अकराशे आठ सत्यनारायणांच्या पूजा केल्या तरी ऐहिक यश मिळणार नाहि. …. सारे जग निर्देव करू निघालेला रशिया आज परम बलिष्ठ म्हणून यशस्वी झालेला आहे. …. श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली , प्रत्यक्ष मादिनेतली मशीद घोडशाळा बनली  , जेहोवा चे सुवर्ण मंदिर तडकले , जीजसला रोमने कृसिफाय केले …। रामास हराम समजणारे सुद्धा …वैज्ञानिक बळाने यश मिळवू शकतात.….  अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्य संपादावे … चळवळीत ते  सामर्थ्य असेल तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून काही अडत नाही. ते सामर्थ्य नसेल तर कोटि कोटि जप केले तरी काही फरक पडत नाही . हाच सिद्धांत !''   (संदर्भ ६:१३)

अंदमानातला छळ ,  मानसिक त्रास, विजनवास, दीर्घ एकांत, चिंतन यातून सावरकर नास्तिकते कडे झुकू लागतात . आणि सर्व धर्मांची चिकित्सा करू लागलेले दिसतात. हे त्यांचे तत्वचिंतन आहे. मनुष्याचा देव त्यांनी नाकारला आहे आणि विश्वाची आद्यशक्ति (देव) म्हणून वैज्ञानिक नियम ग्राह्य मानले आहेत .
(संदर्भ : ६:६)

त्या काळात हे आश्चर्य कारक आहे.

#################################################################################
न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।
नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥

स्वर्ग नाही, मोक्ष नाही, परलोकीचा  आत्मा नाही 
वर्ण -आश्रम ,  कर्मकांडे फळ  तुला  देणार नाहीत ।। - चार्वाक 
#################################################################################

. २००१ साली प्रकाशित झालेल्या समग्र सावरकर वाड्:मयाच्या पाचव्या खंडातल्या १९८ व्या पानावर  सावरकरांचा एक विनोदी  लेख आहे . त्याचे नाव काशितली दोन सम्मेलने : माकड महासंमेलन आणि भाकड महासंमेलन .  काशी नगरीस ज्ञानवापी असेही म्हणण्याचा प्रघात आहे . तर काशीला ब्राह्मणांचे एक संम्मेलन   भरले होते . श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म आज लागू आहे काय ? या विषयाचा निवाडा लावण्यासाठी हे आयोजन होते .  त्याचवेळी सावरकरांनी हा लेख लिहिला आहे .  तात्याराव सावरकरांनी आपले एक "" मनकवडे ""  नावाचे काल्पनिक वार्ताहार काशीच्या ज्ञानवापिस पाठवले.……  




तर श्री मनकवडेना दोन संमेलने दिसली --- पहिले संमेलन माकडांचे होते . काशीस पूर्वी माकडे मुक्त संचार करत . अद्वातद्वा उड्या  मारीत शेपटीने झाडास लोंबकाळित --  भू:भु:क्कार करीत माकडांचे दिवस सुखात चालले होते . मग एके दिवशी काशीच्या ज्ञानवापीत वीज आली. विजेच्या ताराही आल्या . विजेच्या ताराना  शेपटी लागल्यावर विजेचे झटके  आणि चटके बसू लागले. मग माकड महासंमेलनात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला . कि विजेच्या ताराना शेपटीने लटकावे का ? काही माकडे म्हणाली " छट्ट  हा प्रश्नच गैरलागू आहे . विजेच्या तारा नावाचा काही पदार्थ असता तर आपल्या त्रिकालदर्शी पूर्वजांनी माकड-स्मृतीत तसे लिहिले नसते काय ? ज्या अर्थी माकडस्मृतीत वीज नाही तर ती आताही अस्तित्वात असू शकत नाही.  शेवटी बराच गिचगीचाट झाला. माकडी भाषेतल्या दुरगम्य चर्चेतून असे निष्पन्न झाले कि - परिस्थिती बदलली आहे तेव्हा माकड स्मृतीत बदल केला पाहिजे……………………… त्याच वेळी अज्ञान वापिस ब्राह्मणाचे दुसरे संमेलन भरले होते त्याचा निष्कर्ष आला कि परिस्थिती हा शब्दच धर्म बाह्य आहे . अधम धर्म विरोधी आहे . शुद्ध संस्कृत भाषेत ओरडत… गिल्ला करत …  असा ठराव पास झाला कि परिस्थितीचा पालट विचारात घेणे हा धर्मद्रोह आहे . पाखंड आहे …………… लेखाचा समारोप करताना सावरकर लिहितात " या ब्राह्मण संमेलनातील ठरावामुळे डार्विनच्या उत्क्रांतीवादास मोठाच धक्का बसला . प्राप्त परिस्थितीत माकडाचा विकास होऊन माणुस झाला…. यापेक्षा माणसाचा विकास होऊन माकडे निर्माण झाली हेच मान्य करणे क्रमप्राप्त आहे. अज्ञान वापितले पंडित धर्म संमेलन हेच दर्शवते !"  

भारतीय राजकारणाचे बदलते प्रवाह 

१९१८ साली एडविन मोण्टेग्यु  यांनी ब्रिटिश संसदेला आपला रिपोर्ट सादर केला . भारतात स्वायत्त संस्था स्थापन करत शेवटी भारताला पुर्ण स्वातंत्र्य  देण्याचा विचार यात तत्वत: मान्य केला आहे .  भारतीय राजकारणाला निर्णायक वळणे मिळत होती.

स्वातंत्र्य म्हणजे काय ?
१९१८ साली भारताला कधीतरी पुर्ण स्वातंत्र्य देण्याची चर्चा  ब्रिटिश सुरु करतात. भारताचे स्वतंत्र्य एका रात्रीत मिळालेले नाही . एडविन मोण्टेग्यु पासून क्रिस्प पर्यंत आणि  गोलमेज परीषदातुन   भारतीय स्वातंत्र्याचि  चर्चा चालू आहे . ट्रान्सफर ऑफ पॉवर - सत्तांतराचा इतिहास म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य लढा आहे .    हे स्वातंत्र्य टप्प्या टप्प्याने हवे यावर एकमत आहे . कारण भारतीय राज्य चालवण्यासाठी संस्थात्मक उभारणी झालेली नाही . मुळात  स्वातंत्र्य म्हणजे काय ? यावर भारतीयात एकमत होत नाही. 

एकत्र पाणि पिण्याचा हक्क दलिताना नाकारणारे राज्य आणि राष्ट्र  डॉ आंबेडकरांना नको आहे. त्यांचा कोन्ग्रेस वर विश्वास नाही . पेरियार स्वामिना हिंदि भाषिकांची दादागिरी नको आहे . त्यांनी स्वतंत्र द्रविडिस्तान ची मागणी गेली आहे. जिन्हांचा मुस्लिम लीग प्रमाणा बाहेर सत्तेचा वाटा मागतो आहे . अन्यथा पाकिस्तान ' स्वपराक्रमाने ' मिळवू अशी दंगलिंचि धमकी देतो आहे . ५५० संस्थाने भारतात आहेत . त्यापैकी बहुतेकांना  भारतात सामील होण्याची इच्छा  नाही. 

१९१८ नंतर ब्रिटिशांशि लढणे हे राजकारणात महत्वाचे उरले नाही. सवर्ण - दलित , हिंदु- मुस्लिम , हिंदि - तामिळ असे वाद सामोपचाराने किंवा संघर्षाने सोडवणे हेच भारतीय राजकारणाचे महत्वाचे ध्येय  बनले . सावरकरांच्या  १९२४ सालच्या राजकीय आणि सामजिक भूमिकांची हि पार्श्व भूमी आहे .
भारतीयात एकता नव्हती समताही नव्हती - हिंदु मुस्लिमात नव्हती , हिंदि - तामिळात नव्हती , सवर्ण दालीतात नव्हती.
हिंदुच्या सहा हजार जाती, डझनभर भाषिक वाद ,  शीख ,मुस्लिम  या  सार्यांचे एकमत करणे आणि गोलमेज परिषदेत राज्यघटनेचा मसुदा ठरवणे हा भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीचा (सत्तांतराचा)  मार्ग होता . अन्यथा भारत  नाही  तर वेगवेगळ्या नावाचे शेकडो  वेगवेगळे देश स्वतंत्र झाले असते.   धर्म -  भाषावाद, जातीप्रथा , मूर्खता , अंधश्रद्धा  यांनी हिंदू समाज जराजीर्ण झाला होता . हिंदुचे भले करण्यासाठी त्यांच्या धार्मिक समजुती बदलाव्या लागतील हे सावरकरांनि  ताडले.



############################################################################### 

धर्म: मतिभ्याम् उद्गत: - कर्ण ( महाभारत )
जे बुद्धीला पटते तेच (योग्य) धर्म्य आहे

############################################################################### 



 ३) रत्नागिरीचा समाज सुधारक : साल  १९२४ वय वर्ष एक्केचाळीस  

 अंदमानात सावरकर नास्तिक बनू लागले पुढे धर्म चिकित्से कडे वळले.  प्राप्त परिस्थितीत हिंदूची जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता सावरकरांना मोडायची आहे. सात स्वदेशी बेड्या मोडल्याशिवाय हिंदुना राजकारणात भविष्य नाही असे सावरकर म्हणतात . या सात बेड्यात  रोटिबंदि , वेदोक्त बंदि वगैरे आहेतच पण त्यातली एक बेडी बेटि बंदीची आहे. त्यांनी  या काळात आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केलेला दिसतो .

सावरकरांनि  या काळात हिंदु संघटना हा शब्द आजच्या धार्मिक अर्थाने वापरलेला नाही . जाति  हि विस्कळित अव्यवस्था संपवुन हिंदुना संघटित करुया अशा  अर्थाने वापरला आहे . याच अर्थाने बासाहेब आंबेडकर किवा गांधिनिहि हिंदु संघटना हा शब्द या काळात वापरलेला आहे.

सदर चित्र सावरकरांनी रत्नागिरीत केलेल्या कामाचे वर्णन करणारे समकालीन चित्र आहे. आजची रत्नागिरी असे चित्राचे नाव आहे . "र"  लिहिण्याची निराळी पद्धत हा सावरकरांच्या लिपिशुद्धिचा प्रयास आहे. पूर्वी टंकलेखन आणि खिळे जुळवणी करून छपाई होत असे . टाइप राइटर ची  बटने कमी करण्यासाठी लिपिशुद्धी सुचवली होती. त्यामुळे जोडाक्षरे कमी होतात .  

सदर चित्रात हिंदु संघटना नावच्या देवीच्या हातात   विज्ञान नावाचा परशु दिसतो. पोथीजात जातिभेद नावाचा राक्षस हि देवी मारते आहे !  या काळात सावरकरांनि  लिहिलेल्या पुस्तकांची - लेखांची नावे सुद्धा बरेच काही सांगुन जातात . विज्ञान निष्ठ निबंध , जात्युच्छेदक निबंध , अंधश्रद्धा निर्मूलक कथा , क्ष किरणे अशी त्यांच्या संग्रहाची नावे आहेत . जातिभेदाचा पाया वंशवाद आणि पोथिनिष्ठा आहे. " अनुवंश छे ! आचरटपणा !!  " नावाच्या लेखात सावरकरांनि वंशवादि  जन्मजातिचा धुव्वा उडवला आहे . दोन शब्दात दोन संस्कृती या लेखात पोथिनिष्ठे  बाबत ते  लिहितात : -
" तो युरोप प्रत्यही अधिक काही शिकून अधिक शहाणा होत आहे . बापाहून शहाणा निघालोच कि नाही ? म्हणुन हुन्कारत आहे . बापाला जे कळत नव्हते ते शिकलो । तर बापाचे बापपण काय उरले? ... हि आमची भीती !
हिंदूसंस्कृतीचे महासूत्र म्हणजे स्मृतीश्रुती पुराणोक्त हेच होय ! आजच्या युरोपियन संस्कृतीचे ' अद्यायावत '.... त्याच्या अगदी उलट ! ते पूजक " आज" चे  आम्ही "काल" चे । ते "ताज्या" चे भोक्ते आम्ही "शिळ्या" चे ! एकुण पाहता युरोपियन संस्कृती "अद्यतन"  आमची "पुरातन"  !
 धर्मग्रंथ पाच हजार वर्षापूर्वीचा धरला तरीही पाच हजार वर्ष मागासलेला ! जग पाच हजार वर्ष पुढे गेलेले .....परंतू अजूनही आजचे विज्ञान न शिकता .....पाच हजार वर्षापुर्वीच्या शहाण पणाहुन  - अधिक शहाणे व्हायचेच नाही असे आम्ही ठरवून बसलो आहोत .
प्रकृती आणि काळ हि असा.... त्या स्वत:स अपरिवर्तनीय आणि त्रिकाल बाधित समजणार्या धर्मग्रंथांच्या ताडपत्रांचा चुराडा उडवीत …सारखा स्वच्छंद धिंगाणा घालीत असता .......त्या ग्रंथांच्या शेवटच्या अक्षरापलिकडे पाउल टाकायचेच नाही …. असा मूर्ख हट्ट धरणार्या लोकांची संस्कृती त्या त्या धर्म ग्रंथाच्या..... प्राचीन मागास संस्कृतीपेक्षा कधीही अधिक विकासु शकणार नाही ..... हे वेगळे सांगायला नको ! " (संदर्भ : ६:६५)   

रत्नागिरीतील सहभोजन 

 सावारकरांनी  अनेक जुनी मंदिरे दलितांना उघडी करून दिली होती , काही आंतरजातीय विवाह लावून दिले होते हे  पतित पावन मंदिरापेक्षा अधिक महत्वाचे आहे. डॉ आंबेडकरांच्या काळाराम  मंदिर प्रवेश सत्याग्रहाला सावरकरांनि  पाठिंबा दिला होता.

डॉ  आंबेडकरांनी या  कामाबद्दल सावरकरांचे  कौतुक करणारे पत्र लिहिले होते.  आंबेडकर लिहितात -
 " नुसति अस्प्रुश्यता जाउन भागणार नाही . चातुर्वण्याचे उच्चाटन झाले पाहिजे . ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटलि आहे , त्यापैकी आपण एक आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो " . (कीर लिखित आंबेडकर चरित्र पृष्ठ २३९, सहावी आवृत्ती )
जाती , भाषा , वंश , प्रांत यापलीकडे जाउन हिंदु समाजाने विज्ञान निष्ठ व्हावे , एकसंघ व्हावे असे विचार सावरकरांनी माडले आहेत . असाच बुद्धिवादाचा उपदेश   या काळात  त्यांनी मुस्लिमांना केला आहे . अतातुर्क केमाल पाशाने तुर्कस्थानात पुरोगामी सेक्युलर अशी राजवट आणली होती . मुस्लिम पुरोगाम्यात केमाल चे स्थान कोहिनूर हिऱ्यासारखे आहे. केमाल चे कौतुक करताना सावरकर लिहितात -
"धर्म निराळा , निर्बंध (कायदा ) निराळा , एक शब्दनिष्ठ श्रद्धेचा प्रांत , एक प्रत्यक्ष निष्ठ प्रयोगाचा, त्याचा विषय परलोक नि याचा विषय इहलोक " (४:२११)
 रिलिजन आणि स्टेट वेगळे असावेत. धर्माने इहलोकात लुडबुड करू नये. धार्मिक कायदे नको . अशी सेक्युलर (इहवादी)  , विज्ञान निष्ठ भूमिका घेताना सावरकर दिसतात.

या काळात त्यांनी हिंदु  / संघटन वगैरे शब्द   जातिभेद निर्मुलन , विज्ञान निष्ठा,  शिक्षण अशा अर्थाने वापरलेले दिसतात . बुद्धिवाद शिकवणे - भावी भारताची रचना आधुनिक पायावर करणे अशी त्यांची ध्येये  दिसतात. राजकारणात धर्म आणू  नये . विज्ञान निष्ठा बुद्धिवाद शिकवावा म्हणून त्यांनि गायीच्या प्रतीकाची निवड मुद्दाम हून केली आहे .   त्यामागे अतिशय महत्व पुर्ण कारणे आहेत. आधुनिक राज्यशास्त्रातील व्यक्तीस्वातंत्र्य आणि आणी धर्मनीर्बंधाचा निर्णायक सवाल गोहत्या आंदोलना संदर्भात चर्चिला जातो . आणि हे राजकारणाचे एक महत्वाचे वळण असते . त्यातून पुढच्या दिशा ठरतात . एकदा धार्मिक कायदे सुरु झाले कि शरियत चे पाकिस्तान अथवा  स्मृतीचे विषम हिंदुराष्ट्र हा शेवट आहे. रिलिजन आणि स्टेट वेगळे असावेत. धर्माने इहलोकात लुडबुड करू नये. धार्मिक कायदे नको . अशी सेक्युलर (इहवादी)  , विज्ञान निष्ठ भूमिका घेताना सावरकर दिसतात.






सावरकरांचे हे असले  विचार बहुसंख्य हिंदुत्व वाद्यांना मान्य होणे शक्य नाही. संघाचे गोळवलकर गुरुजी सुद्धा चांगलेच संतापले होते .  गोळवलकर लिहितात
" सावरकर हिंदु महासभा आदिंचे ….  हिंदुत्व पोकळ आहे... नकारात्मक आहे .. निव्वळ प्रतिक्रियावादी आहे... त्यात हिंदु जीवन मुल्यांचा अभाव आहे... आणि  हिंदु सभेला   कोङ्ग्रेसचाच संमिश्र राष्ट्रवाद मान्य असणे हि एक विकृत धारणा आहे " . (विचारधन ५८-५९ भाविसा २००१) 
गोळवलकरांच्या मते सावरकरांचे हिंदुत्व निव्वळ प्रतिक्रियात्मक आहे . मुस्लिम लीगला विरोध म्हणून ते हिंदुचे नाव घेतात . हि भूमिका गोळवलकरांना मान्य नाही . त्याना हिंदु धर्माचे / तत्वज्ञानाचे  आचरण महत्वाचे वाटते. गोळवलकरांच्या  विचारधन पुस्तकातला प्रक्रियात्मक राष्ट्रवाद हा भाग महत्वाचा आहे . (विचारधन ५८-५९ भाविसा २००१)

राजकीय हिंदुत्वाचा जन्म 
भारतीय लोकशाहीच्या राजकारणात हिंदुत्व हा शब्द प्रसवण्याचे दायित्व  विनायकाचे आहे ! सावरकर हिंदुत्व वादि होण्यामागे दोन कारणे आहेत : तत्कालीन घटना आणि अभ्यास

१) तत्कालीन घटना : 
  • मुस्लिम लीगचा राजकारणातला वाढता जोर, खिलाफत आंदोलन .  
  • मोपल्यांचे बंड : मोपला मुस्लिमांनी खिलाफतीच्या जोशात इग्रजांविरुद्ध बंड पुकारले होते . इंग्रज , हिंदु आदी काफिराना-  हाकलून मारून इस्लामी करून - दार उल इस्लाम निर्माण करण्याचे ते स्वप्न होते . पण फसले . इंग्रजानी चाप लावला. 
  • (चार्ली हेब्डो सारखे ) श्रद्धानंद  प्रकरण : मुहम्मद पैगंबरावर टीकात्मक पुस्तक लिहिल्याने स्वामी श्रद्धानंदांचा खून अब्दुल रशीद ने केला . गांधीजिंनी पुरेसा निषेध केला नाही उलट त्याला आणि मोपल्यांना धर्मनिष्ठ मुस्लिम   असे संबोधले .  (धर्मनिष्ठ म्हणण्यात काही  फारसे चूक नाही शिवाय  गांधीनी   श्रद्धानंदां बद्दल दोन भावनोत्कठ  मृत्युलेख लेख लिहिले होते . असो ! )
२) अभ्यास  : 
  • इस्लाम धर्म , कुराण याचा अभ्यास सावरकरांनी या काळाच्या आसपास केलेला दिसतो . इस्लाम धर्मात असहिष्णुतेची, धार्मिक हींसेचि,  (शरिया ) धर्मराष्ट्र स्थापनेची आणि काफिर द्वेषाची मुळे आहेत असे  त्यांच्या लक्षात येते . १८५७ चे स्वातंत्र्य समर लिहिताना इस्लामचा गौरव करणारे सावरकर  - आता मात्र सावध भूमिका घेऊ लागतात.  
  • हिंदुंच्या  सनातन  धर्मात असलेल्या मागास कालबाह्य विषम आणि अन्यायी गोष्टी  हळूहळू  त्यांच्या लक्षात येत  होत्या. मोपला बंडात पराभूत हिंदुत  जातिभेद , विषमता , अस्पृश्यता आणि अडाणी पोथिनिश्ठा   भयानक होती हे त्यांना उमजू  लागले .   मला काय त्याचे ?  या कादंबरित या नव्या आकलनाची  साक्ष दिसते . 
यातून सावराकारांचे हिंदुत्व जन्मले. ते धार्मिक नाही . राजकीय आहे .  मुस्लिम आणि ख्रिश्चन नसलेल्या  भारतीय समाजाला  सावरकर हिंदू म्हणतात.  त्यात धर्माचे काही देणे घेणे नाही . ख्रिस्ती आणि इस्लामने  ज्याना काफिर , हिडन , पेगन म्ह्टले आहे त्या भारतीय लोकांना  सावरकर हिंदू म्हणतात ! पुढे त्यांनाच हिंदुराष्ट्र असेही म्हणतात!!


हिंदु : राष्ट्रवादाची नवी व्याख्या  : (दयानंद ते  टिळक ते  सावरकर )


आधुनिक काळात काफर संघटनाचा  आणि एतद्देशीय राष्ट्र वादाचा प्रथम   प्रयत्न स्वामी दयानंद सरस्वतिंनि केला. वेद , स्मृती,  पुराणातील संस्क्रुत भाषेचे नवे आणि वेगळे अर्थ काढले.  स्वामीजींनी आधुनिक राष्ट्रवादी वेदाभिमानी असा " आर्य "   समाज , आर्यावर्त , आर्य राष्ट्र संकल्पित केले . नाव  आर्य आणि प्रमाण वेद असले तरी आशय पुरोगामी होता . स्वामीजी जातिभेद , भटशाहि , मूर्तीपूजा आणि अस्पृश्यता यांच्या विरोधी होते .  शाहू महाराज आर्य समाजिस्ट होते. महात्मा फुले दयानंदाचे समर्थन करत होते. मात्र हा आर्य शब्द दक्षिण भारतीयांना  रुचत नसे . तामिळनाडूत द्रविड चळवळ जोरात होती - आर्यांना परकीय मानले जात असे. भारतीय नव राष्ट्रवादाचे वारू सह्याद्री खाली सरकेना !
टिळक स्वत:चे लोकमान्यतव कायम ठेवू इच्छित होते . त्यांनी दयानंदाप्रमाणे क्रांतिकारी सामजिक भूमिका घेतल्या नाहीत . पण भारतीय राष्ट्रवाद दक्षिणेतहि रुजावा   म्हणून स्वामिजिंचे वेदप्रामाण्य कायम ठेवत , आर्य शब्द टाळून. पुन्हा काफ़िरांचि व्याख्या केली .  लोकमान्य टिळकांनी केलेली हिंदूची धार्मिक व्याख्या अशी आहे : -
प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानामनेकता ।
उपास्यानामनियमः एतद् धर्मस्य लक्षणम् ॥
(अर्थ: वेद प्रमाण मानणे आणि अनेक दर्शने , साधने , विविध उपासना पद्धती असणे हेच धर्माचे लक्षण होय.)


वेदांचे प्रामाण्य बुद्धिवादी सावरकरांना मान्य असणे शक्य नव्हते. जैन बौद्ध शीख लिंगायत इत्यादी अवैदिक लोक टिळकांच्या व्याख्येत बसत नव्हते . टिळकांची धर्म व्याख्या संस्क्रुतात आणि अनुष्टुप छंदात आहे. त्याला असहमती दर्शवत सावरकरांनि अनुष्टुप छंदातच दुसरी व्याख्या केली :  

आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका । 
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥
(अर्थ : सिंधु नदीपासून सिंधु सागरापर्यंत पसरलेला  भारत ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे तो हिंदु )


या बदलत्या व्याख्यांना , बदलत्या राजकारणाचे संदर्भ आहेत . टिळकांची व्याख्या आर्य द्रविड हा भेद टाळण्याचा प्रयत्न करते . टिळकांना दक्षिणेतहि कॉंग्रेसची राष्ट्रीय चळवळ रुजवायची आहे . पण वेदप्रामण्य आणि धार्मिकता त्यांच्या व्याखेत आल्याने - जैन बौद्ध शीख नास्तिक आदी अवैदिक लोक बाहेर जातात . सावरकर अधिक व्यापक व्याख्या करत आपले बदलले राजकीय धोरण दाखवून देतात .  त्यांच्या व्याखेत भौगोलिक भारत आणि भौगोलिक हिंदु असे दोन्ही दिसते. मातृभूमी हा शब्द न वापरता पितृभूमी फादर लेंड हा युरोपीय शब्द त्यांनी योजला आहे. 



४) हिंदुमहासभेचे अध्यक्ष : साल १९३७ वय वर्ष ५१ 

बुद्धिवादाकडुन प्रतिक्रियात्मक राष्ट्रवादाकडे सावरकरांचा प्रवास चालु झालेला दिसतो . हिंदु महासभेचे अध्यक्षपद  ते स्वीकारतात. हा पक्ष सनातनि होता . आजही आहे .  हिंदुमहासभेच्या अधिवेशनात साधे  सहभोजन  हि विरोधाशिवाय होत नव्हते . हिंदु महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका सारांशाने पाहुया  : - (हींदुमहा सभेची अध्यक्षिय भाषणे )
१) एक व्यक्ती एक मत . मुस्लिमांना लोकसंखेच्या प्रमाणाहुन जास्त सत्ता  अधिकार नाही.
२) कॉंग्रेसने राष्ट्रीय रहावे .मुस्लिम  लीग शी लढण्याचे जातीय काम हिंदु सभेने करावे
३) मुस्लिमांना संख्येच्या प्रमाणात  मतदार संघ द्यावेत.
४) फाळणीला विरोध. अखंड हिंदुस्थानचा पुरस्कार.

मुस्लिम लीगचा  दावा होता  कि बहुसंख्य हिंदु लोकसंखेच्या बळावर आपले दमन करतील म्हणून आम्हाला लोकसंख्याच्या टक्केवारिपेक्षा अधिक राजकीय  जागा हव्या . कोङ्ग्रेसला हिंदुसभेच्या घोषणा आणि मागण्या जातीय वाटत होत्या. हिंदु समाज कोङ्ग्रेसचा समर्थक होता . हिंदुसभा आणि सावरकर राजकारणात एकाकी पडु  लागले. त्रस्त आणि संतप्त होऊ लागले .




सावरकर हिंदु महासभेत जायच्या आधी पन्नास वर्ष , १८८७ साली सर सय्यदांनि द्विराष्ट्रवाद मंडला होता. हिंदु आणि मुस्लिम हि दोन वेगळी राष्ट्रे आहेत . सत्तेचे वाटप दोन्ही राष्ट्राना समान व्हावे . म्हणून ३०% मुस्लिमाना ५०% राजकीय सत्ता द्या . असा द्विराष्ट्रवादाच्या मागणीचा आशय आहे . सर सय्यद , इक्बाल , जिन्हा या सार्यांनी थोड्या फार फरकाने हीच योजना मांडलि आहे . सावरकरांना द्विराष्ट्रवाद मान्य होता पण सत्तेचे वाटप मात्र  समान नाही अशी त्यांची भूमिका होती !  एक व्यक्ती एक मत असे ते म्हणतात . तात्यांनी केलेला हा व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि धर्मस्वांतंत्र्याचा धिक्कार  आहे!!

इस्लाम धर्मात मुस्लिमांसाठी बंधुभाव उम्मत / इस्लामी राष्ट्राच्या शरियतच्या स्पष्ट संकल्पना आहेत. डॉ आंबेडकरांनी या प्रश्नाचे सखोल विवेचन केले आहे . (ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा  ) 




नकाशा : अखंड भारतातली मुस्लिम लोकसंख्येची घनता 


फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५  साली -  बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. --  " पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " ( - Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) पान  १४६)

त्यावेळच्या  अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे  ३० % हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि  गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते .  

सावरकरांना तत्कालीन  हिंदु समाजाने स्वीकारले नाही. त्याची अनेक कारणे असू शकतील : 
  •  भाषा  , मांडणी आणि विचार सहज सोपा नाही . समजायला अवघड आहे . त्यांनी   हिंदित भाषणे केल्याची फारशी नोंद  नाही. सफाईदार  इंग्रजी आणि पारिभाषिक  मराठीत बोलत. बहुसंख्याना ते समजत नसे . 
  • व्यक्तिगत भेटीगाठी स्नेहसंबंध जपत नसत . गोळवलकर गुरुजिना आपोइंट्मेंट का घेतली नाही ? असे विचारून उंबरठ्यावरून परतावले होते . अभिनाव भारतातल्या जुन्या मुस्लिम मित्र मंडळिना भेटणे टाळत.   
  • मुस्लिम विरोधी उग्र आणि आक्रमक धोरण तत्कालीन हिंदु समाजाला आवडत नसावे. किवा हे आक्रमक लोक उद्या आपल्यावरच  उलटतील अशी भीती मागास जाती , अल्प्संख्य भाषिक याना वाटत असावी . 
  •  हिदू महासभेच्या राजकारणात - रामराज्य परिषद सारख्या सनातनी संघट्ना होत्या. सावरकर  सनातन्या बरोबर सतत तडजोडी करत गेले. ते त्यांना हिंदु संघटन वाटु लागले . शब्दाचा अर्थ बदलत गेला. "एका खिशात सनातनी दुसर्या खिशात पुरोगामी म्हणजे हिंदु संघटन "असे सावरकर म्हणाले होते. हे धोरण विचित्र आहे असे मला वाटते . 
  • कोन्ग्रेस विरोधासाठी तत्वाशी तडजोडी करत एकदा हिंदुसभेने थेट मुस्लिम लीगशी युती केली होती. आणि एक वर्ष सिंध प्रांतात एकत्र सरकार चालवले होते . (कीर लिखित सावरकर चरित्र पान ३४०, १९९९)
  • मुस्लिमांचे हैद्राबाद संस्थान भारतात सामील होता नाही म्हणून त्रावणकोरच्या हिंदु संस्थानाने भारतात सामील होऊ नये असे जाहीर विधान सावरकर करतात . प्रतिक्रियात्मक राजकारणात झालेली हि फरफट आहे . 
  •  अखंड हिंदुस्थान पाहिजे  , द्विराष्ट्रवाद पण मान्य आणि   अखंड भारतातले  हिंदु  लोक्स मुस्लिम लीग ला वठणीवर आणतील - त्यासाठी सनातनी लोकांबरोबर युत्या केल्या पाहिजेत. …… कोन्ग्रेस विरोधासाठी   मुस्लिम लीगशी हिंदुसभेचि युती , त्रावणकोर बद्दलची विधाने या सावरकरांच्या भूमिकांचे अर्थ त्याकाळी लोकांना समजले नसावेत . मला आजही समजत नाहीत !

सावरकरानी अखंड भारताच्या भूगोलाचा ध्यास घेतला होता. त्यात   राजकीय हित कोणाचे होते  ? प्रतिक्रियात्मक राजकारणातली फरफट अतिशय दु:खद आहे .  अखंड भारतात सावरकर मुस्लिमांना लोकसंखेच्या प्रमाणात राजकीय राखीव जागा देत होते. मुस्लिम लीगला हि गोष्ट पटली नाही .  त्याना त्याहून  अधिक जागा आणि सत्तेच्या चाव्या हव्या होत्या . गांधीजिंच्या वाढीव  योजना सुद्धा मान्य झाल्या नाहीत . पुढे फाळणी झाली .भीषण हत्याकांड झाले .  सावरकर उद्विग्न झाले . त्रस्त आणि संतप्त झाले. 






५) खंडित भारतातला सूडाचा प्रवास : साल १९४८ वय वर्ष ६५ 

हिंदु लोक्स आपले ऐकत नाहीत आणि गांधींच्या मागे लागतात याची सावरकरांना खंत वाटते . त्यांच्या समकालीन लिखाणातून तो उद्वेग स्पष्टपणे जाणवतो. लहानपणिच त्यांनी देशासाठी मरण्याची आणि  मारण्याचीहि  प्रतिज्ञा केली आहे. " देशासाठी मारता मारता मरेतो झुंजेन" अशी प्रतिद्न्या आठ वर्षाच्या विनायकाने घरातल्या अष्टभुजा देवीसमोर घेतली होती .  अखंड भारतमातेवर त्यांचे प्रेम आहे . एखाद्या देवाची पूजा करावी तशी ते त्या भारताची पूजा करत असत . नास्तिक आणि बुद्धिवादी झाल्या नंतरही त्यांची देशभक्ती तशीच राहिली. लाहानपणी मनावर अष्टभुजा आरूढ होती तिचे भारत मातेत रुपांतर झाले .   



फाळणी त्यांचे काळिज चिरून गेली आहे. त्यांच्या आराध्य देवतेचे तुकडे पडले आहेत. सिंधु नदीसाठी सावरकर तळमळत आहेत . याच पार्श्व भूमीवर  नथुराम गांधिजिंचा भ्याड खून करतो . (गांधि हत्येवरिल लेखासाठी येथे क्लिक करा )  
या खुनात सावरकर सहभागी होते का ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एक महत्वाचे तथ्य समजावून घ्यावे लागेल . कि देशभक्ती आणि राष्ट्रवाद या दोन वेगळ्या संकल्पना आहेत : - 

देशभक्ती = भारतीय परंपरांचा अभिमान  - यात परंपरेवर / धर्मावर टिका करणे चूक मानले जाते      
राष्ट्रवाद = आधुनिक युरोपीय संकल्पना  . बंधुत्व महत्वाचे , समाजवादी विचार , समता , धर्म चिकित्सा 

 
देशभक्ती आणि राष्ट्रवाद


या दोन विचाराभोवती  सावरकरांचे भावविश्व खेळत राहते. कधी ते देशभक्तीची भूमिका घेतात तर कधी राष्ट्रवादी बनतात. सत्यनारायणाची गंमत करतात , वेदाची टवाळी उडवतात त्याना मागास म्हणतात . पण इतिहासात मात्र त्याना सर्वत्र हिंदुंचे पराक्रम दिसत असतात . सावरकरांनी हिंदु इतिहासाची सहा सोनेरी पाने म्हणून एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी हिंदुंचे भारतातले सहा विजय वर्णन केलेले आहेत .  एकदा पराभूत झाल्याशिवाय पुन्हा विजयी कसे होता येईल ? सहा वेळा विजयी होण्यासाठी आधी सहा वेळा  पराभूत व्हावे लागत असते. हे सरळ साधे लॉजिक आहे. 

सावरकरांची इतिहासदृष्टी प्रचारकी  देशभक्तासारखीच जहाल आहे. त्यात त्यांनी वैदिकांचे विनाकारण गौरवीकरण केलेले आहे . बुद्ध जैनादि अहिंसक विचाराला  पराभवाचे कारण मानले आहे. सावरकरांच्या जातीनिर्मूलक कार्याचा बाबासाहेबांनी गौरव केला आहे हे आपण आधी पाहिले आहे.  ज्या धर्माला आणि संस्क्रुतिला सुधारणेची प्रचंड गरज आहे हे सावरकर मान्य करतात तरी  त्यांचा इतिहास मात्र कायम विजयाचाच आहे असे भक्तिभावाने लिहितात . डॉ  आंबेडकरांचे मतभेद इथून सुरु होतात .


डॉ  आंबेडकरांशि  मतभेद : मनभेद : टीका टिप्पणी 
हीदुंचा इतिहास पराभवाचा आहे . असे आंबेडकरांचे मत आहे . त्याला विरोध करण्यासाठी सावरकरांनी सहा सोनेरी पाने हे पुस्तक लिहिले .  सावरकरांना अखंड भारत हवा आहे . त्याला विरोध असणारे आंबेडकरांचे पुस्तक म्हणजे - पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया . बाबासाहेब  लिहितात : -

""भाबड्या मनाच्या हिंदु सभेच्या देशभक्तांना वाटते कि हिंदुनि हिंसक पावित्रे घेतले कि मुसलमान ऐकतील . ते शक्य नाही …. खरे तर   हिंदु महासभा सुद्धा संवादाच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा आहे कारण त्याना एकता नकोच आहे. उदाहरणार्थ : ( ३०  % मुस्लिम असलेल्या अखंड हिंदुस्थानाच्या वास्तवात   )  " हिंदुस्थान हिंदुचा ! "  अशी घोषणा हिंदु  सभेच्या अध्यक्षांचि आहे . वास्तव स्थिती  पाहता हि घोषणा अतिशय अहंकारी आणि अक्षरश :  अर्थहिन आहे .  कोणत्या बळावर हिंदुस्थान अखंड  ठेवणार ? हे बेरिस्टर सावरकर सांगतील काय ? " ( पान २७०- Volume 8.   Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.1989)
  धार्मिक कारणांमुळे हिंदु मुस्लिम ऐक्य अशक्य आहे म्हणुन बाबासाहेबांनी फाळणीला पाठींबा दिला होता. (ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा  ) 

या संदर्भातले आंबेडकरांचे  लेखन अधिक वास्तव वादि आहे. सावरकरांचे स्वप्नाळू देशभक्तीचे आहे. इतीहासाचे अवडंबर  , व्यक्तिपूजा , प्रतीमाप्रेम हि तप्तमुद्रा  देशभक्तीच्या कपाळावर कायमची अंकित झालेली आहे . डॉ आंबेडकरांच्या बौद्ध धर्मांतरावर सावरकरांनी सडकून टिका केली होती. त्यात कठोर भाषा वापरली होती . त्यामुळे सावरकरांबद्दल बाबासाहेबांचे  आणि त्यांच्या अनुयायांचे मत कायमचे वाइट बनले.  

सावरकरांचि    व्याख्या या देशाला जो पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो राष्ट्रीय अशी आहे . बौद्ध धर्म तर अस्सल भारतीय आहे. आंबेडकरांच्या बौद्ध धर्मांतराला विरोध करण्यासारखे काहीच लोजिकल कारण दिसत नाही . पशुहून हीन वागणुक दलिताला देणारा अधर्म सोडुन….  बौद्ध धम्म  स्विकारणे काय गैर  आहे ? 
सावरकर गांधिंचि आणि बुद्धाची अहिंसा एकच समजत असावेत. गांधिंचा विरोध  त्यांनी राजकारणा पल्याड  जाउन केला होता. गांधी -बुद्ध अहिंसा अशी काहीशी खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली असावी.तोच  आकस त्यांना बुद्धाच्या अहिंसेबद्दल असावा असे सन्यस्त खड्ग या नाटकावरून वाटते .   
सावरकरांच्या हीदुच्या व्याखेत सिंधू  नदी येते . सिंधु संस्क्रुतिचा त्याना अभिमान आहे.  "स" चा "ह" होऊन (जसे शंभर - हंड्रेड) सिंधु नदीपासून हिंदु हे नाव मिळाले असे ते म्हणतात …  
सिंधु नदि पाकिस्तानात गेली म्हणून   क्रुद्धपणे सिंधु  सुक्त गात राहतात  ….
त्यांच्या लेखनातून गांधिंचा आणि मुस्लिमांचा संताप -  द्वेष व्यक्त होवू लागतो …….
(सहा सोनेरी पाने )


गांधिजिंचा खून 

नथुराम सावरकरांचा परिचित होता .  त्याने गांधिजिंचा खून   केला . त्याला गांधी फाळणीला जवाबदार वाटत होते. खरे तर फ़ाळणिची पद्धत दु:खद असली तरी अंतत: त्याने हिंदुचे काही नुकसान झाले नव्हते . आजची पाक - बांग्लादेशची  परिस्थिती पाहून - अखंड भारताचा अंदाज करता येतो.   (गांधि हत्येवरिल लेखासाठी येथे क्लिक करा )  

गांधी हत्या : आरोपी क्रमांक आठ : विनायक दामोदर सावरकर 


सावरकर या कटात होते काय ? न्यायालयाने त्यांना पुराव्या आभावी दोषमुक्त केले आहे . इथे त्याना गांधी हेच सर्वस्वी जवाबदार वाटत होते काय ? शक्य आहे . सावरकरांना हिंदु मुस्लिम प्रश्न दादागिरीने सुटेल असे वाटत होते . गांधी त्यात अडथळा होते . पण म्हणुन गांधिंचा खून करावा असे त्यांना वाटेल  ?

सावरकरांना नैतिकदृष्ट्या राजकीय हत्या योग्य वाटत .  त्यांनी आधी ब्रिटिशांना मारले होतेच . इथे मुद्दा फक्त सारासार अकलेचा आणि बुद्धिमत्तेचा आहे . सावरकर बुद्धिमान आहेत यात मला काही शंका नाही . गांधिहत्येचा परिणाम काय होईल ? त्याने  किती राजकीय नुकसान होईल . पुढचे भविष्य कसे भीषण असेल …. याचा अंदाज सावरकरांना असावा. त्यामुळे ते या खुनात सूत्रधार म्हणून सहभागी असतील असे मला तरी वाटत नाही . आता आपण फक्त अंदाजच करू शकतो . 

१९४८ साली सावरकरांचा वैचारिक प्रवास थांबतो . समकालीन राजकारणात अदखलपात्र बनतो . नथूरामच्या कृत्याने  सावरकरांचे  राजकीय जीवन संपुष्टात आणले . त्याचे कृत्य भ्याड आणि मूर्खपणाचे  होते. सावरकरांनि नथुरामचा तीव्र निषेध वारंवार करायला हवा होता. तसे घडलेले दिसत नाहि. त्यामुळे प्रत्यक्ष खुनाच्या कटात असो / नसो -  सावरकरांवर यासंदर्भात टिका होत राहिली आहे . राहणार आहे . 


   


समारोप :  
सिद्धहस्त कवी 
राष्ट्रवादावर निस्सीम प्रेम करणारे देशभक्त 
 सावरकर 
हा भारतीय राजकारणाच्या वाटेवरचा मैलाचा दगड आहे 
इथून पुढे दोन रस्ते फुटतात 
एक रस्ता आधुनिक बुद्धिवादाच्या लोकशाहीच्या आणि धर्म निरपेक्षतेच्या वाटेने जातो. 
दुसरा रस्ता इतिहासाच्या उत्खननातून परंपरांच्या पुनरुज्जिवनाकडे जातो.  

हिंदु महासभेच्या अध्यक्षाला जे अखंड हिंदुराष्ट्र हवे होते. 
ते वास्तवात येणार नाही .  निदान येता कामा नये !

ज्या अर्थाचे हिंदु संघटन रत्नागिरीतल्या सावरकरांना हवे होते - 
तसे जातीनिर्मुलन  येणारा काळ घडवणार आहे … निदान तसे घडले तरी पाहिजे !

फाळणी घडून गेली आहे . हिंदु मुस्लिमाचे  सहजीवन अपरिहार्य आहे . 
भारतीय हिदुना आणि मुस्लिमांनाहि  विज्ञान निष्ठ , बुद्धिवादी बनवणे आवश्यक आहे . 
वांझोटा द्वेष न करता प्रबोधनाचे शास्त्र  धर्म निरपेक्ष पणे सर्वाना लागू होईल - निदान तसे झाले तरी पाहिजे ! 


- डॉ अभिराम दिक्षित 

---------------------------------------------------------------------------
(६:६०)  हा संदर्भ २००१ साली प्राकाशित झालेल्या, समग्र सावरकर वाङ्ग्मयातिल ६ वा खंड आणि ६० वे पान असा वाचावा. इतर संदर्भ लेखात पुर्ण दिले आहेत.  
  

१७ टिप्पण्या:

  1. उत्कृष्ट विवेचन
    समारोप जास्त आवडला

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम लेख .. आजचा राजकारण्यांनी धडे घ्यावेत हि अपेक्षा आहे

    उत्तर द्याहटवा
  3. उत्तम मांडणी..बुद्धिवादी लेखन..मस्त।

    उत्तर द्याहटवा
  4. संस्कारीत सावरकरप्रेम व आजचे पुरोगामित्व याची सांंगड सोपी व स्पष्ट करणारे उत्क्रुष्ट विश्लेषण...
    कालसुसंंगत विचार व धारणाबदल हा सावरकरांंच्या वैज्ञानिक विचार व विज्ञान विश्वासाचा एक पुरावा म्हणावा!

    उत्तर द्याहटवा
  5. "खरे तर फ़ाळणिची पद्धत दु:खद असली तरी अंतत: त्याने हिंदुचे काही नुकसान झाले नव्हते . आजची पाक - बांग्लादेशची परिस्थिती पाहून - अखंड भारताचा अंदाज करता येतो."
    I don't intend to doubt the intent of being impartial on your part. The article too is a great read. But this line is completely unacceptable. First of all, why do you look at it from Hindu point of view? Second, forget Pakistan and Bangladesh, do you think Nepal and Sri Lanka being separated from India has resulted in no loss ( in the same sense you want to use the word Nuksan) to us? Third, in what way we are better than Pakistan or Bangladesh as a political entity? Politically? Strategically? Economically? Socially? Fourth, how does " suffered no losses" apply to the Hindus living in undivided India? Were they given the property of Muslims who left India for Pakistan? Last - if tomorrow India carves off one more peace of land into a new Muslim country, say a new country out of parts of Assam or W. Bengal or Kerala, are you going to say the same. I think your philosophy fits for every division of India - Naxal belt, North East, Dalitstan, Dravidstan, Khalistan, Kashmir, ... All these separations will really not harm Hindus, right?

    उत्तर द्याहटवा
  6. सकस,वैचारिक व विश्लेषणात्मक विवेचन.
    आवडला.

    उत्तर द्याहटवा
  7. छान लेख आहे डॉक्टर. तात्यारावांचे समग्र विवेचन आणि त्यांचा जीवनपट छान मांडलात.

    उत्तर द्याहटवा
  8. हे कालसुसंगत सावरकर आजच्य तथाकथीत संस्कृती मार्तंडांना, राजकारण्यांना झेपणार ,हवे आहेत काय?झ्तकें प्रखर,परखड,विज्ञाननिष्ठ वगैरे_

    उत्तर द्याहटवा
  9. खुलक खुदा का ,मुलक बादशाह का अमल झासी के राणी का ह्याला समकालीन संदर्भ काय ? झासी की राणी उठावात फार उशिरा आली होती.नानासाहेब पेशव्यांचे हस्तक तात्या टोपे आणि अझीमुल्ला खान ह्यांनीच उठावाची तयारी व नियोजन केलं होतं.ठरल्या तारखेच्या 3 आठवडे आधी अकस्मात ठिणगी उडाल्याने बंडवाले संभ्रमात पडले त्यामुळे उठवाच संचालन अयोग्य रीतीने होऊन तो फसला.झाशी ची राणी ह्या सर्व तयारीत कुठेच नव्हती.जेव्हा इंग्रजांनी तिचं दत्तक प्रकरण अमान्य केलं तेव्हा ती उठाव करणाऱ्या ना सामील झाली. त्यामुळे अमल झाशी के राणी का ही तद्दन नंतर कोणीतरी उठवलेली वावडी आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हि घोषणा सर्व ऐतिहासिक कागदपत्रात आहे . अधिक माहितीसाठी शेषराव मोरे यांचे 1857 चा जिहाद हे पुस्तक पहावे

      हटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *