२१ एप्रि, २०१६

नव - निर्माणाचा प्रामाणिक प्रयत्न

नव - निर्माणाचा प्रामाणिक प्रयत्न 

पंडित दिन दयाल उपाध्याय  हे भारतीय जनसंघ आणि भाजपा यांच्या राजकीय विचाराचे महत्वाचे दार्शनिक मानले जातात. कम्युनिझम आणि भांडलशाहि पेक्षा वेगळा , कोन्ग्रेस आणि समाजवाद्याहून भिन्न आणि   लेबल लावता येणार नाही असा अतिशय वेगळा राजकीय विचार त्यांनी मांडला. त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि विचाराची छाप आजही भाजपा च्या नेत्यांवर आहे. भाजपा आज पुर्ण बहुमताने सत्तेत आहे. त्यामुळे त्यांच्या पूर्वसुरींच्या विचाराची चिकित्सा अतिशय महत्वाची आहे.

नानाजी देशमुख


 स्व. नानाजी देशमुख हे माझे नातेवाइक. त्यांनी पं. दीनदयालजिंचि मला सांगितलेली एक आठवण बोलकी आहे.  नानाजी आणि पंडितजि आग्रा येथिल वास्तव्यात एकदा  बाजारात पिशवी घेऊन भाजी आणायला गेले होते. त्यावेळी दिनदयालजिंच्या खिशात तीन चार पैसे होते . हि गोष्ट बहुदा १९४२ सालची आहे . त्यावेळी दिनदयाल तिथे एम ए करत होते. या दोघांनी दोन पैशाची भाजी विकत घेतली . मुक्कामी  परत आल्यावर दिन दयाल प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांच्या लक्षात आले आपल्या खिशात कुणाकडून तरी आलेला एक खोटा पैसा होता. तो चुकून त्या भाजीवाल्या बाईला दिला. मग नानाजिंना घेऊन   दीनदयाल पुन्हा बाजारात गेले. पुन्हा ती भाजीवाली  शोधली . तिचा बटवा पुन:पुन्हा तपासून त्यातला खोटा पैसा शोधून काढला . तिला खरा पैसा दिला - खोटा पैसा पुन्हा परत घेतला .  पुन: मुकामी परत येताना तो पैसा पंडितजिंनि तळ्यात फेकून दिला. आणि  म्ह्टले " आपण आपल्या नकळत चुकूनही जरी समाजाला फसवले तर ते सर्वात मोठे पाप !"

जमीनदारी नष्ट करण्याच्या कायद्याला समर्थन दिले नाही म्हणून दीनदयालजिंनि स्वत:च्या पक्षाचे  सहा आमदार राजस्थान विधानसभेतून निलंबित केले होते, हि घटना प्रसिद्ध आहे . अशी नैतिकता १९४७ नंतरच्या भारतीय राजकारणात दुर्मिळ आहे.

प्रस्तुत लेखात आपण पंडितजिंच्या विचाराची चिकित्सा करायची आहे . तत्पूर्वी त्यांचे न्यायप्रिय आणि प्रामाणिक व्यक्तित्व समजून घेणे आवश्यक आहे.

लेखकाची भूमिका : 

भाजपा मध्ये अंतर्गत लोकशाही मजबूत आहे  आणि निवडणुकीच्या तंत्रात हा पक्ष अतिशय सक्षम आहे. संघाच्या केडरचे बळ, सर्व पातळीवरील सक्षम नेतृत्व आणि उत्तम आर्थिक स्त्रोत यामुळे भाजपा हा भारतीय राजकारणातील सर्वात प्रबळ पक्ष - म्हणून उदयाला आलेला आहे . परंतु  राजकारणाच्या वैचारिक वाद विवादात आणि  राज्यशास्त्राच्या एक्याडमिक चर्चेत काहीतरी अडले आहे. भाजपाच्या नेत्यांची बहुतांश वक्तव्ये वादग्रस्त का ठरतात ? त्यावर चहुबाजुंनि टिका का होते ? त्यावर काही उपाय आहे का ? याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात केला आहे . आजची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय राष्ट्रवादाच्या दृष्टीने हा सवाल निर्णायक आहे.


एकात्म मानववाद 
मानवेंद्र्नाथ रॉय
मानवेंद्र्नाथ रॉय यांनी  (Radical Humanism) मूलगामी  मानवतावादाची घोषणा केली होती. (Reason, Romanticism and Revolution) कारण , कलीकास्वप्न आणि क्रांती  यावर रॉय यांचा मानवतावाद उभा होता.   त्यास प्रत्युत्तर म्हणून  २२ ते २५ एप्रिल १९६५ रोजी  सलग चार भाषणे देऊन पंडितजिंनि एकात्म मानववाद मांडला. हि भाषणे अर्चना प्रकाशन, भोपाळ यांनी २०१० साली प्रकाशित केली आहेत. प्रस्तुत लेखासाठी ते पुस्तक संदर्भ म्हणून वापरले आहे. या लेखातील संदर्भाचा कंसातिल आकडा त्या पुस्तकाचा  पृष्ठ क्रमांक आहे.

१९६५ सालीच एकात्म मानवता वाद जनसंघाने  आपली राजकीय विचारसरणी म्हणून स्वीकारला .  या एकात्म मानवतावादाची स्वत:ची स्वतंत्र परिभाषा आहे. ती परिभाषा आणि हा विचार आजही - पन्नास वर्षा नंतरही -  भाजपाच्या जेष्ठ नेत्यांच्या भाषणातून डोकावताना दिसते. इतका तो परिणामकारक आहे .


नव -निर्मिती 

पंडितजिंच्या विचारावर गोळवलकर गुरुजींची सावली आहे . तरीही हि राजकीय मांडणी गोळवलकरांची नाही . एकात्म मानववाद हे दीनदयाळांचे स्वतंत्र चिंतन आहे . त्यातील काही संकल्पना  अतिशय नाविन्यपूर्ण आणि खर्या अर्थाने आधुनिक पुरोगामी आहेत. असे महत्वाचे एकुण आठ आधुनिक विचार या ८० पानि  भाषणात आलेले आहेत.  

१) बेबंद भांडवल शाहीला विरोध कारण ती व्यक्तीचे शोषण करते व त्याला बाजरू बनवते (२१, ६३)

२) कम्युनिझम ला विरोध कारण त्यात व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे दमन होते. (२१)

३) भांडवल शाही , कम्युनिझम आणि युरोपीय बनावटिचा राष्ट्रवाद यातील आपल्या देशाला उपयुक्त ते घ्यावे - अंधानुकरण कसलेच करू नये. युरोपीय राष्ट्रवाद क्रौर्य आणि द्वेषावर उभा आहे . हिटलरि राष्ट्रवाद  वाइट आहे. विश्व के लिये संकट ! (१५, १९)

४) पुरोगामी आणि प्रतिगामी या दोघांचा निषेध : पुरोगामी विचार भारतात युरोपातील थेअर्यांचे प्रतिबिंब पाहतो ते अंधानुकरण आहे. प्रतिगामी लोकांना काळाचे चक्र उलटे फिरवून जुनी व्यवस्था आणायाची आहे . ते चूक आहे . अशक्यही आहे. (१७,१८)

५) संस्कृतीचा नवा अर्थ : भारतीय संस्कृती हि प्रकृती आहे. ते वास्तव आहे . वास्तवाकडे कडे दुर्लक्ष  करून चालणार नाही. संस्कृतीचे  संरक्षण करायची हि गरज नाहि. त्यात योग्य ते बदल केले पाहिजेत. पण ती  उध्वस्त करू नये. (२१, ७८)

६) मानवी जीवन बहुरंगी आहे त्याला आर्थिक , राजकीय , सामजिक अशापैकी एकाच चश्म्यातुन पाहणे गैर आहे . मानवी जीवनाचा सर्वंकश विचार व्हावा.  (४३,२२)

७) किमान जन्मसिद्ध अधिकाराची संकल्पना : अन्न वस्त्र निवारा याबरोबरच मोफत आरोग्य सेवा ,  मोफत प्राथमिक व  उच्च शिक्षण तसेच रोजगार याला उपाध्याय भारतीय नागरिकांचे जन्मसिद्ध अधिकार मानतात. (६८)

८) स्वदेशीवर भर , सत्ता आणि संपत्तिचे विकेंद्रिकरण ,  यंत्रांचा कालसुसंगत योग्य वापर ,कामगार - सर्वहारा  मानवाची प्रतिष्ठा आणि   रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना चालना (७६, ७७)


चर्चेतील विचारवंत आणि नवी परिभाषा 

राज्यशास्त्रीय परिभाषा आणि बुद्धिवादी पद्धती वापरत  पंडितजिंनि -  मार्क्स , हेगेल , डार्विन आणि मग्डुगल (William McDougall)  या चार पाश्चात्य तत्व वेत्त्यांच्या  विचाराची साररूप समिक्षा केली आहे. हेगेल ने मांडलेला  थिसिस - एण्टि थिसिस आणि सिंथेसिस चा  संघर्ष मय विचार , मार्क्स च्या विचारातील दमन - व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आणि आणि सर्वहाराचि अनुत्पादक हुकुमशाही यावर पंडितजिंनि नेमके बोट ठेवले आहे. (२१) १९६५ सालीच सोव्हिएत युनियनच्या भरभराटीच्या काळात त्यांनी कम्युनिस्टांच्या नेमक्या विकृतीवर प्रश्नचिन्ह उभे केले. आज काळाच्या कसोटीवर पंडित दिनदयाल उपाध्याय यांचे विचार खरे ठरलेले दिसतात . कम्युनिझम चा अंत  पाहू शकणारे ते द्रष्टे पुरुष होते. 




पंडित दिनदयाल उपाध्याय


डार्विन आणि मग्डुगल याबाबत मात्र पंडितजिंचे मंड्न तत्कालीन आकलनामुळे मर्यादित बनले आहे . डार्वीन बद्दल दीनदयाल जी लिहितात -

"बळी तो कान पिळी . मोठा मासा छोट्या माश्याला खातो .  असा डार्वीनचा  मत्स्य - न्याय   आहे . (Survival of the fittest) जिसकी लाठी उसकी भैंस - असा डार्विन वर आधारित  संघर्ष सिद्धांत विकृत आहे. हा नियम म्हणजे व्यवस्था नव्हे - तर हा जंगलचा कायदा चालू नये म्हणून व्यवस्था बनवली पाहिजे." (२३)

१९६५ साली डार्विनचे असे-  बळी तो कान पिळी - आकलन सार्या जगाचेच होते. आज २०१६ साली ते डार्विन बद्दलचे आकलन पुर्ण बदलले आहे. विस्तारभयास्तव अधिक खोलात जात नाही पण ज्या  मग्दुगल (William McDougall) या सामाजिक मानसशास्त्रज्ञाला (३८ ) पंडितजि प्रमाण मानतात तो आज कालबाह्य  समजला जातो.  

पंडितजि डार्विनला वंशवादि समजतात आणि त्यावर टिका करतात. मग्दुगल ला राष्ट्रवेत्ता समजतात आणि त्याच्या संकल्पना  वापरत एकात्म मानववादाची मांडणी करतात. पंडित दीनदयाल उपाध्याय यांची मांडणी १९६५ सालच्या जगाच्या आकलनाप्रमाणे योग्य असली तरीही आज २०१६ साली  त्यात नव्याने भर टाकण्याची गरज आहे. 

पंडित दीनदयाल उपाध्याय राज्यशास्त्राचे अभ्यासक , पाश्चात्य विचाराचे चिंतक - टीकाकार आणि नव्या मांडणिचे चाहते होते.पंडित दिन दयाळजिंच्या अनुयायांनी त्यांच्याच पावलावर चालत सतत आधुनिक आणि नव्या मांडणिचा ध्यास घेतला पाहिजे . संस्कृती रक्षण नव्हे तर संस्कृती सुधार हा पंडितजिंचा  अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे . त्यांच्या स्वत:च्या १९६५ सालच्या मांडणिलाहि तो लागू आहे. 

मग्डुगल चा संदर्भ देत पंडितजि म्हणतात-   " माणसाला ज्याप्रमाणे मेंदु असतो - त्याप्रमाणे समाजाला सुद्धा मेंदु असतो .  प्रत्येक समूहाला एक मुल प्रकृती - समाज मन असते. सिद्धांत आणि नीती मध्ये यास चिति असे म्हणतात. '' (३४, ३८)

चिति , राष्ट्राचा आत्मा , धर्म , अर्थ , काम,  मोक्ष, पंथ निरपेक्षता , धर्म राज्य अशा पारिभाषिक शब्दात पंडितजि आपला एकात्म मानवतावाद मांडतात. पंडितजिंचा नव्या मांडणिवर आणि नव्या आकलनावर भर होता असे या भाषणावरून स्पष्टच दिसते. दिनदयाल जी आर्थिक , सामाजिक बाबतीत  त्यांच्या पुर्वसुरिंच्या बरेच पुढे आलेले दिसतात त्यांनी १९६५ च्या  काळात तत्कालीन आकलन आणि परिभाषा वापरत मांडणी केली आहे . त्यांचा वारसा पुढे चालवणे म्हणजे सध्यस्थितीत   नवे विचार रुजवणे . 


भाजपाची खरी अडचण  


भारतीय जनता पक्षाचि खरी अडचण हि जुनी परिभाषा आहे. १९६५ सालची परिभाषा आज बदलायला नको काय ? जेंव्हा जनसामान्यांशि संवाद साधायचा आहे तेव्हा त्यांना समजेल अशा भाषेत बोलायला नको काय ? आजच्या राजकीय चर्चा आजच्या परिभाषेत नकोत काय ? राहुल गांधी यांनी नुकताच भाजपावर मनुवादी असल्याचा आरोप केला आहे . भाजपा प्रतिगामी , पुराणमतवादी , जातीवादी , वर्णवादी असल्याचे आरोप सतत होत असतात. भाजपला घटना बदलायची आहे - धर्म शास्त्राचे राज्य आणायचे आहे . अशीही टिका होत असते. राजनाथजिंनि मागे पंथ निरपेक्षतेबद्दल एक विधान केले होते . ते बरेच गाजले. पंथ निरपेक्षता  शब्द गोळवलकर गुरुजिंच्या साहित्यात येतो तसे . त्याचे विवेचन दिन दयाळांनि केलेले आहे . सध्या चर्चेत असणारे संविधानातील   बदल , भारतमाता , धर्मराज्य,  सेक्युलारीझाम यावर पंडितजिंनि या भाषणात विस्तृत भाष्य केले आहे . त्यातून आज काय अर्थ निघतो ते पाहुया . आणि तसा अर्थ भाजपाला अभिप्रेत आहे काय ? यावरही भाष्य करुया .

धर्म म्हणजे काय ? 


पंडित दीनदयाल म्हणतात
" धर्म म्हणजे नियम , व्यवस्था , आचरण ,संहिता - ज्या अर्थ आणि काम यासंबंधि लागू असतात . धर्म म्हणजे सृष्टीनियम. धर्म म्हणजे मानवी जीवनाची धारणा करणारे नियम  " (२४,२८,२९)
पंडित दीनदयालांच्या संकल्प्नेतला धर्म एका जागी स्थिर नाही तो सतत बदलत आहे . नित्यनूतन आहे. धर्माच्या स्वरूपाविषयी भाष्य करताना पंडितजि लिहितात -
"धर्मनियम काळ आणि युग यानुसार बदलत असतात . म्हणुन देश काल परत्वे धर्माचे पालन करावे "(४८)
पंडितजिंचा हा विचार खरोखर आधुनिक आणि द्रष्टा आहे. काळाच्या पुढे पाहणारा आहे . 

दिनदयालजिंचा धर्म सर्वव्यापी आहे . राष्ट्र (Nation) आणि राज्य (State) यातला भेद त्यांनी स्पष्ट करून सांगितला आहे.   राज्य म्हणजे सरकार (४५) आणि राष्ट्र म्हणजे भूमातेशी मनाने जोडला गेलेला लोकसमूह (३७) अशी त्यांची व्याख्या आहे .

पंडितजि म्हणतात कि राष्ट्राची चिति (समूह मानस ) हा राष्ट्राचा आत्मा आहे . योग्य काय आणि अयोग्य काय ? हे ठरवणारी गोष्ट म्हणजे चिति .  यासाठी त्यांनी मग्डुगल चा दाखला दिला आहे. (३४,३८). राष्ट्राची संस्कृती बदलू शकते . धर्मनियम बदलू शकतात . (३९,४८)परंतु राष्ट्राचे चे समुहमानस म्हणजेच चिति बदलू शकत नाही . 

इथे पंडितजिंनि राष्ट्राला स्वयंभू मानले आहे . आणि राज्य (सरकार ) हि राष्ट्राची गरज भागवणारी निमित्तमात्र संस्था मानली आहे. (४१) आणि धर्म हा राज्य संस्थेहुन  वरचढ मानला आहे . यापुढील भाष्यावरून वाद सुरु होतात .

राज्यापेक्षा धर्म श्रेष्ठ आहे हे समजून देताना , पंडितजि वैदिक राज्याभिषेक विधीचे  उदाहरण देतात. त्या विधीत राजा तीनदा म्हणतो कि मला कोणीही शिक्षा / दंड देऊ शकत नाही . अदंण्ड्योस्मि ! अदंण्ड्योस्मि !अदंण्ड्योस्मि ! मग पुरोहित त्याचा पाठीत धर्मदंडाने हलकीशी चापट मारून ! म्हणतो कि धर्मदंड्योअस्ति !म्हणजे हे राजा तुझ्यावर धर्म दंड आहे ! धर्म श्रेष्ठ आहे !! (५३)

पण याचा अर्थ थिओक्रेटिक स्टेट नव्हे . थिओक्रेटिक स्टेट म्हणजे विवक्षित पंथाचे राज्य असा पंडितजिंचा युक्तिवाद आहे. (५५) इथे धर्म आणि पंथ यातला फरक समजून घेतला पाहिजे . पंथ म्हणजे उपासना पध्दती - पूजा , नमाज , प्रेयर , आरती इत्यादी . आणि धर्म म्हणजे मुलभूत नियम जसे कि आई वडिलांचा आदर करावा . मातृधर्म , पितृधर्म , शेजारधर्म इत्यादी . (५२)

धर्म म्हणजे रिलिजन नव्हे ---तर पंथ म्हणजे रिलिजन होय - असा हा युक्तिवाद आहे .

भाषा आणि गैरसमज 

या सर्व विवेचनातून फार विचित्र निष्कर्ष निघू शकतात . तसे ते निघतात . त्यामुळेच राजनाथ सिंह यांच्या विधानावरून मागे गदारोळ उडाला होता . धर्मनिरपेक्षता चूक - पंथ निरपेक्षता बरोबर ! असे विधान त्यांनी केले होते . (TOI 27 November 2015)

याचा अर्थ भाजपाला सनातन हिंदु धर्माच्या कायद्याचे राज्य आणायचे आहे असे घेतला जातो . मनुवादी असल्याची पावती फाटते. मानुस्मृतीनुसार शुद्रांचे दमन करण्याची कटकारस्थाने म्हणून संघ भाजपाच्या कृत्यांकडे पाहिले जाते . हे सर्व का ? तर एका विशिष्ट परिभाषे मुळे !

पहिला प्रश्न असा कि , पत्रकार - जनसामान्य - अभ्यासक यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी बोलावे काय ? कि स्वत:च्या कोड ल्यांग्वेज मध्ये म्हणजे पारिभाषिक शब्द  रचनेत बोलावे . सगळे जग रिलिजन चे भाषांतर धर्म असे करते . धर्म - पंथ हा प्रकार समजून सांगण्यासाठी मी वरचे दिड हजार शब्द वापरले आहेत. दर वेळी हे दिड हजार शब्द बोलावे लागतील अथवा पारिभाषिक शब्दयोजना टाळावी लागेल . अन्यथा भाजपा प्रतिगामी असल्याचे गैरसमज पसरत जातील.


पण गैरसमज नव्हेच !

दीनदयाल यांची मांडणी नाविन्य पूर्ण आणि अभिनव आहे हे आपण पाहिलेच . पंडितजिंनि त्यांच्या १९६५ च्या आकलना नुसार आजून काही निष्कर्ष काढले आहेत . २०१६ साली त्यात भर घालणे - बदल करणे हेच दिनदयाल यांचा वारसा पुढे नेण्याचे लक्षण आहे .

समाज आणि व्यक्ती याचे संबंध कसे असावेत ? यावर भाष्य करताना दीनदयाल  म्हणतात - " समाज आणि व्यक्ती  याचा संघर्ष नको. जाती विरुद्ध जातीचा संघर्ष नको. आपल्या वर्णांची कल्पना विराट पुरुषाच्या चार अंगापासुन आलेली आहे. विराट पुरुषाच्या  डोक्यापासून ब्राह्मण , बाहुतून क्षत्रिय उरातून वैश्य आणि पायातून शूद्र निर्माण झाले . डोके, हात पाय यांचे काही भांडण असते काय ? (४४)

हा चातुर्वर्णाचा पुरस्कार आहे . यातली पायाची उपमा का सहन केली जावी  ?  अशा उपमा वापराण्याने २०१६ साली जातीय संघर्ष वाढतील ? कि कमी होतील ?

चातुर्वण्याच्या समर्थनार्थ वापरला गेलेला "विराट" शब्द शेवटच्या  भाषणाच्या समारोपात पुन्हा वापरला गेला आहे. पंडितजि लिहितात -

" जैसे राष्ट्र का आधार चिति होता है , वैसेही जिस शक्ती से राष्ट्र कि धारणा होती ही उसे विराट कहते है । … हमे अपने राष्ट्र के विराट को जागृत करने  का काम करना है । "(७९)

यानंतर जर कोणि म्हटले कि , संघ भाजपाला भारतात चातुर्वण आणि शुद्रांचि गुलामगिरी पुन्हा आणायची आहे . तर त्याला उत्तर कसे देणार ? हा समज म्हणावा कि गैरसमज ? या पारिभाषिक शब्दांच्या अर्थाचा कीस पाडत त्यातून अजून दहा अर्थ काढता येतील . श्रोत्यांपैकी कोणालाहि  काहीही समजणार नाही !  राहुल गांधिंसाराखे  नवखे राजकारणीसुद्धा भाजपला मनुवादी म्हणत आहेत याची नोंद घेतली पाहिजे.

एक मात्र निश्चित कि हि परिभाषा भाजपाच्या हिताची नाही . देशाच्या हिताची तर नाहीच नाही .

दीनवाणे धर्म 

मी स्वत: नास्तिक आहे . धर्म पंथ यातले काहीही मानत नाही . तरीही हिंदु समाजाचे हित व्हावे , त्याचे रक्षण व्हावे, प्रबोधन व्हावे असे मला वाटते . हिंदु हा शब्द मी येथे समाज या अर्थाने वापरला आहे . मुस्लिम समाजाचे हि प्रबोधन व्हावे हित व्हावे असे वाटल्यास तो सेक्युलारीझम चा आग्रह धरेल .

 पंथ कि धर्म निरपेक्षता कि अधार्मिकता या वादातून काहीही साध्य होणारे नाही .  

सेक्युलारीझम म्हणजे कायदे आधुनिक असतील . शासकीय निर्णयातून धर्म वगळा. धर्म दूर ठेवा म्हणजे सेक्यूलारिझम. म्हणजे च इहवाद. हा सेक्युलारिझम आपल्या संविधानाचा पाया आहे. दही हंडीचे किती थर रचावेत ? किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही . सर्व हक्क शासनाकडे आहेत . यालाच सेक्युलारीझम असे म्हणतात.

धर्म आणि पंथ या दोन शब्दा बद्दल पुरेसा गोंधळ आहे . अनेकांना वाटते पंथ म्हणजे उपासना पद्धती आणि धर्म म्हणजे कर्तव्य ! म्हणून ते पंथ निरपेक्षता हवी म्हणतात …. हा भ्रम आहे  . धर्म / कर्तव्य हे सुद्धा राज्यघटनेच्या आधीन राहून पार पाडायचे आहेत.  अगदी माता पिता पुत्र पत्नी या बाबतीतली कर्तव्ये सुद्धा कायदा ठरवतो - धर्म नाही .


--- वृद्धाश्रम पुराणात नाहीत - तरी  ते बेकायदेशीर ठरवता येत नाहीत
--- धर्मातला वानप्रस्थाश्रम कायद्याने सक्तीचा  करता येत नाही

सेक्युलारीझम हा शब्द घटनेत पहिल्या दिवसापासून आहे . धर्म निरपेक्षता स्पष्ट करणाऱ्या घटनेच्या २५ व्या कलमात तो आहे . पुढे हा शब्द घटनेच्या प्रास्ताविकात सुद्धा घातला गेला . पण त्यामुळे त्याच्या अर्थात काहीच फरक पडत नाही .

या आधुनिक कायद्या संदर्भात बोलत असताना  चिति, विराट , धर्म , पंथ वगैरे पारिभाषिक शब्द सोडुन दिले पाहिजेत. पंथ म्हणजे उपासना पद्धती आणि हिंदु म्हणजे जीवनशैली असे म्हणणेही सोडुन दिले पाहिजे. 

इस्लामचे हि म्हणणे नेमके हेच आहे . ते स्वत:ला उपासना पद्धती मानत नाहीत. "दिन " मानतात. दिन म्हणजे जीवनशैली . काय खावे , प्यावे , ल्यावे याचे नियम म्हण्जे दिन . किती लग्ने करावीत ? काफ़िरांशि कसा व्यवहार करावा ? याचे नियम म्हणजे दिन . म्हणजेच जीवनपद्धती

 माझा तो धर्म आणि तुझा तो पंथ असे म्हटल्याने सर्वच धर्म दिनवाणे ठरले आहेत !



सेक्युलारीझम  : हिंदु हिताचे शस्त्र 

राजकीय , सामाजिक बौद्धिक , वैचारिक नेतृत्वाचा हिंदु समाजात दुष्काळ आहे . स्वत:स हिंदु म्हणवणारे राजकीय नेतृत्व उभे राहिले आहे पण त्या समाजाच्या हिताचे काय ? सामाजिक प्रश्नांचे काय ? वैचारिक गोंधळाचे काय ?



डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांचे फ़ोटो लावणे हि एक चांगली गोष्ट आहे . त्यांचे विचारही आत्मसात केल्यास अजून उत्तम होईल . बाबासाहेबांनी  सेक्युलारीझम वर नेमके   भाष्य केले आहे . याविषयीच्या घटना परिषदेतील चर्चेत बाबासाहेब म्हणतात -

" भारतातील (सर्व ) धर्म केवळ असामाजीकच नव्हे तर समाजविरोधी आहेत. मीच सत्य  इतर असत्य (वा मीच धर्म इतर पंथ ) असे ते धर्म मानतात . मुस्लिमांचा असा विश्वास आहे कि , इस्लाम वर श्रद्धा जे ठेवत नाहीत त्यांच्याशी बंधुत्वाचा व्यवहार करू नये . " (समग्र डॉ आंबेडकर खंड १३ पृष्ठ ४२३, ४२५)

श्रद्धेचे स्वातंत्र्य देण्यासाठी सेक्युलारीझम नाही तर धर्मात बदल करण्यासाठी आहे.

धर्म पंथाचे शाब्दिक घोळ पंडितजिंच्या एकात्म मानववादात आहेत. पण तो पंडितजिंचा  उद्देश होता काय ? धर्मातील बदलाला - सुधारणेला विरोध करणे हा दीनदयाल उपाध्याय यांचा हेतू होता काय ? मला वाटते-  त्यांचा हेतू तसा नसावा . नाहीतर धर्म नित्यनूतन सतत बदलणारा आहे असे पंडितजि म्हणाले नसते . (४८ )

१९६५ साली दिन दयाल उपाध्याय यांनी पाश्चात्य राज्यशास्त्र,  तत्व विचार , अर्थशास्त्र याचे खंडन मंडन करत जनसंघाला आधुनिक राजकारणाचे परिप्रेक्ष दिले .

आज २०१६ साली जर तो वारसा पुढे चालवायचा असेल तर धर्म- पंथ - अधर्म इत्यादी कालबाह्य शब्द सोडुन देऊन , आधुनिक राष्ट्रवाद , बुद्धिवाद आणि सेक्युलारीझम यांची कास धरणे आवश्यक आहे. दिनदयाल उपाध्याय यांनी आरंभिलेले नवनिर्मितीचे चक्र गतिमान ठेवत या विषयांवर अभ्यास, चिंतन,  मनन,  नूतन मंडन हीच पंडित दीनदयाल उपाध्याय यांना आदरांजली ठरेल .

हिंदु समाजाचे हित करू पाहणारे भले पाहू इच्छिणारे अनेक  लोक भाजपात आहेत या विश्वासापोटि अतिशय तळमळीने प्रस्तुत लेख लिहितो आहे . मंथन - प्रबोधन हा राष्ट्रवादाचा आणि राजकारणाचा पाया आहे निदान तसे झाले तरी पाहिजे.

 एकात्म मानववाद  
-----------------------------
बटाट्याचे पोते आणि किराण्याचे दुकान
-----------------------------

डॉ आंबेडकर म्हणाले होते, हिंदू म्हणजे काय – तर किराण्याचं दुकान. किराण्याच्या दुकानात आपण गेलो; कांदे मागितले कांदे मिळतील; बटाटे मागितले बटाटे मिळतील;   किराणा मागून बघा; किराणा मिळणार नाही. किराण्याच्या दुकानात किराणा सोडून सगळं मिळतंय. हिंदूंच्या बाजारात हिंदू सोडून सगळं मिळतंय !

कार्ल मार्क्स ने तुच्छतेने शेतकऱ्यांना बटाट्याच्या पोत्यांची उपमा दिली आहे.  पोत्यात बटाटे गुंडाळलेले असतात; पोते ओतले कि ते सैरावैरा पळू लाग्तात. मार्क्सची उपमा मोठ्या संख्येने शेतकरी असलेल्या हिंदु समजाला तंतोतंत लागू पडते.

एका बाजूला नाकाला  फडकी बांधणारे अहिंसक आहेत , मंदिरात हजारो बोकडांच्या बळिप्रथेत रक्तमासाचा चिखल तुडवणारे काळुबाइचे भक्तही आहेत. एका बाजूला ब्राम्ह्चार्याचे स्तोम आहे दुसर्या बाजूला योनिपुजा आणि घटकंचुकिचा खेळ आहे. " पीत्वा , पीत्वा , पुन: पीत्वा " अशा रीतीने दारू पिउन अवग्रहण  , वमन आणि पतन हे सायुज्य मुक्तीचे टप्पे आहेत असे सांगणारे शैव तांत्रिक आहेत. सुक्ष्मातुन खून करणारे सनातनी आहेत , योगसामर्थ्याने सिद्धी प्राप्त करणारे साधक आहेत आणि मनुष्य विष्ठा खाउन तसलेच दैवी सामर्थ्य प्राप्त करणारे वारली जमातीचे भगत हि आहेत. (स.ह.दे. २३३)

पोराच्या अमेरिकेतील शिक्षणासाठि तयारी  म्हणुन त्याला मातृभाषेत बोलायला बंदि घालणारे  मध्यम वर्गीय प्रेमळ पालक आहेत ,    पोलिसांचा मार खाण्यासाठी तयारी व्हावी म्हणून  मुलाना लहान पणा पासून लाथा बुक्क्यांनी बडवणारे तितकेच प्रेमळ पालक पारध्यात ही आहेत.

धनाढ्यांच्या  शौचकुपाला सोन्याच्या सीटा  आहेत म्हणे , कचरापेटीत वाकवाकून अन्नकण शोधणार्या आणि … " बाई केर आहे का हो ? " असे विचारणार्या कंगाल लहान मुली रस्तोरस्ती फिरत आहेत . (स.ह.दे. २३३)

 ------------------------------

 या किराणा दुकानात आणि बटाट्याच्या पोत्यात , चिति कुठे आहे ? समाजमन कोठे आहे ? कसले धर्म पंथ अर्थ काम मोक्ष ? एकात्म मानव वाद या सार्यांना कवेत घेईल अशी आशा करुया .

जर हिंदु समाजाला चिति , म्हणजेच समाजमन असेल तर ते सतत परिवर्तनशील राहिले पाहिजे . याबाबतीत काही श्रेय संघाला आहेच . संघटन , शिस्तबद्धता हा हिंदु समाजाच्या मनात बिलकुल नसलेला गुण  थोडाफार तरी रुजला आहे . हे समाजमन सुद्धा सतत बदलत राहिले पाहिजे उत्क्रांत - आधुनिक होत राहिले पाहिजे .

एकात्म मानववादाच्या नवनिर्मितीचा प्रामाणिक प्रयत्न पं दिन दयाळ उपाध्याय यांनी केला . ते नव निर्माणाचे चक्र अखंड गतिमान ठेवणे हीच त्यांना आदरांजली !





१६ एप्रि, २०१६

असत्य ? अज्ञान ? कि विद्वेष ?

परिवर्तनाचे आंबेडकरी पर्व: हिंदुत्व विचारधारेचे विधायक टीकाकार असा एक लेख श्री राज कुलकर्णी यांनी दहा एप्रिल च्या दिव्य मराठीत लिहिला आहे. विधायक टिका म्हणजे भले करण्यासाठी केलेली टिका. तशीच विधायक टिका राज यांच्या लेखनावर करण्यासाठी प्रस्तुत लेखन प्रपंच .

राज कुलकर्णी यांचा मुद्दा अंशत:मला मान्य आहे. डॉ आंबेडकर हे हिंदुत्व वादी नव्हते. त्यांना तसे प्रोजेक्ट केले जात आहे. . सावरकरांनी बाबासाहेबांच्या धर्मांतरावर केलेली टिका अयोग्य , अस्थानी आणि अनावश्यक होती . राजचे हे दोन मुद्दे मान्य करून आपण पुढे जाऊ. 

लेखाच्या उर्वरित भागात असत्य प्रतिपादने , खोटे आरोप आणि गंभिर तार्किक चुका केल्या आहेत.
 राज यांनी सावरकर आंबेडकर यांचे संबंध सांगण्यासाठी चवदार तळे ते नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह हा काळ निवडला आहे . मुळ लेखात यावेळी सावरकर काय करत होते असा प्रश्न आहे . पुढिल चर्चेत सावरकरांनी फक्त लेखी पाठिंबा दिला प्रत्यक्षात काय केले ? असा रोकडा सवाल राज करतात.



सावरकर बंधु : विनायकराव आणि डॉ  नारायण 



चवदार तळ्याची कोर्ट केस 

याबाबत खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्रात बरीच माहिती आहे . यातील तिसर्या खंडात पृष्ठ २५१ पासून महाडच्या चवदार तळ्याच्या केस मधील साक्षि आहेत . हा कोर्ट  केस चा भाग असल्याने . सरकारदरबारी अंकित झालेला महत्वाचा भाग आहे. हा खटला अनेक वर्षे चालला या केस मध्ये (पूर्व ) अस्पृश्यांच्या बाजूने साक्षि देणार्यांची नावे आहेत. त्यातले दुसरे नाव डॉ ना दा सावरकर असे आहे. सावरकरांचा लहान भाऊ नारायण (पूर्व ) अस्पृश्यांच्या बाजूने साक्षिदार होता असे खैरमोडे यांनी नमूद केले आहे. चांगदेव खैरमोडे हे बाबासाहेबांचे सहकारी आणि विश्वसनीय चरित्रलेखक  म्हणून मान्यता प्राप्त आहेत . (खैरमोडे खंड ३ पृष्ठ २५७).  सावरकर स्वत: ब्रिटिशांच्या स्थानबद्ध्तेत होते म्हणून स्वत:च्या लहान भावास या उलाढालीत  पाठवले होते. याच केस मध्ये डॉ आंबेडकर यांची साक्ष झालेली आहे .

कोर्टा पुढिल साक्षित बाबासाहेब म्हणतात
"आपल्यामध्ये हिंदु समाजाचे संघटन व ऐक्य व्हावे आणि परधर्मियांचे हल्ले हिंदु धर्मियांवर होऊ नयेत , ह्या बाबतीत डॉ सावरकर यांचे ह्यांचे जे प्रयत्न चालू आहेत. त्या बाबतीत डॉ सावरकर यांचे व माझे एकमत असून सहकार्य हि आहे. "   (खैरमोडे खंड ३ पृष्ठ २५५)   






हि डॉ आंबेड्करांनि कोर्टासमोर दिलेली साक्ष आहे. त्यात सावरकरांच्या भावाशी असलेल्या सहकार्याचा व कोणत्या मुद्द्यावर हे सहकार्य आहे त्याचा अतिशय  स्पष्ट उल्लेख येतो. हिंदुचे हित करण्यास जातिभेद मोडण्यासाठी सहकार्य आणि इतरत्र  नाही  (ब्रिटिश सरकारविरोधी क्रांतिकार्य -वगैरे गोष्टीत). अशी भूमिका बाबासाहेबांनी कोर्टात घेतली आहे. बाबासाहेब  निष्णात वकील होते . राजसाहेब सुद्धा शिक्षित वकील आहेत . कोर्टातली साक्ष हा किती महत्वाचा ऐतिहासिक पुरावा आहे याचे ज्ञान त्याना असणार आहे.

चवदार तळ्याप्रमाणेच नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहा वेळेला डॉ नारायणराव सावरकर यांना वि दा सावरकरांनी स्प्रुश्यांना  समज देण्यासाठी धाडले होते. एकटे नारायणच नव्हे तर रत्नागिरी हिंदु सभेचे अनेक कार्यकर्ते नाशिकात दाखल झाले होते. सावरकर , उदगावकर व धडफ़ळे    यांनी मंदिरात जिथपर्यंत स्प्रुश्यांना प्रवेश आहे तिथपर्यंत अस्प्रुश्यांनाहि प्रवेश दिला पाहिजे अशी भूमिका मांडली. सनातन्यांनि सावरकरांची मागणी धुडकावुन लावली. (पृष्ठ १३, आंबेडकरी चळवळ , य दि फडके)

नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाला पाठिंबा देणारे व नाशिककर हिंदुबंधूंना विनंती करणारे वि दा सावरकरांनी लिहिलेले पत्र बोलके आहे. सावरकरांनी सवर्णाना माफी मागायचा सल्ला दिला आहे . सावरकर लिहितात :
"यास्तव पूर्वास्पृश्य हिंदुबंधू मंदिरापाशी येताच तुम्ही त्यांचे उत्कट प्रेमाने स्वागत करा.आणि..दोन्ही कर जोडून झाल्या गेल्याची क्षमा याचना करा." - सावरकरांचे पत्र 
१९३१ला ’मुंबई इलाखा अस्पृश्यता परिषदे’च्या अध्यक्षपदावरून रत्नागिरी येथे भाषण करताना काळाराम मंदिर सत्याग्रहाचा उल्लेख करून सावरकर म्हणाले:
"मी मोकळा असतो तर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात स्वत: झुंजलो असतो."  
सावरकरांनी अजून काय करायला हवे होते ? सावरकरांनी काहीच केले नाही हे  राज कुलकर्णी कशाच्या आधारावर लिहितात हे कळायला मार्ग नाहि. हे जर अज्ञान म्हणून सोडुन दिले तरी विसंगति, तर्कदोष आणि शब्दच्छल याचे स्पष्टीकरण कसे देणार ?

कुलकर्णी जा काळाची चर्चा करत आहेत, त्या काळात सावरकर रत्नागिरीत स्थानबद्धतेत होते त्याना राजकारणात प्रवेश घ्यायला बंदि होती. त्यांनी हिंदुसभा नावाचे समाज सुधारणा मंडळ काढले होते. या रत्नागिरी हिंदुसभेचा आणि हिंदुमहासभा या राजकीय पक्षाचा काहीही संबंध नाही . हे नामसाधर्म्य अयोग्य रीतीने वापरत कुलकर्णी यांनी बाबासाहेबांनी तत्कालीन हिंदुमहासभा या राजकीय पक्षावर केलेली टिका सावरकरांशि  जोडलि  आहे. हा शब्द्च्छ्ल नावाचा तर्कदोष होय.

रत्नागिरीतून मुक्त झाल्यावर सावर स्वतंत्र भारत प्रजासमाजवादी नामक पक्षात गेले . पुढे फार नंतर हिंदुमहासभेत गेले. तो काळ फार पुढचा आहे - कुलकर्णी काळाची गल्लत आणि नावाची गफलत करतात.    


या सर्व घटना क्रमाबद्दल राज कुलकर्णी याना अज्ञान आहे कि ते दडपून खोटे लिहित आहेत हे कळावयास मार्ग नाही . चवदार तळ्याच्या शुद्धी चा  उलेख कुलकर्णी विचित्र पद्धतीने करतात आणि त्याचा संबंध सावरकरांशि जोडल्यासारखे सूचित होते .   बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या आंदोलना नंतर तळे बाटले असा ओरडा मूर्ख सनातन्यांनि सुरु केला - त्याला सावरकर पक्षाचे तरूण विरोध करू लागले - सनातन्यांचि टिंगल करू लागले हा इतिहास आहे.  




या संदर्भात बाबासाहेबांच्या जनता पत्रातील समकालीन लिखाण महत्वाचे आहे . सावरकर पक्षाचे तरुण हा उल्लेख बाबासाहेबांच्या जनता पत्रातील आहे. (जनता पत्र १ मार्च १९३१ )  त्यात  पुढे असेही लिहिलेले आहे कि , 

 " चवदार तळे बाटले म्हणुन काही सनातनी ते तळे शुद्ध करून घेत होते त्याला सावरकर पक्षाच्या तरुणांनी हरकत घेतली आणि शुद्ध कराल तर आमच्या घरातील अशुद्ध पाणि आणुन तळ्यात पुन्हा टाकू … पुन्हा शुद्धी केली तर पुन्हा टाकू - तुम्हाला सतावून सोडू  ! असे सनातन्यांना बजावले.  (डॉ  आंबेडकरां चे जनता पत्र १ मार्च १९३१ )

जनता पत्र पुढे म्हणते : -

 सावरकर पक्षाचा याहिपेक्षा मोठा विजय विश्वेश्वराच्या सार्वजनिक भोजनात झाला , (तेथे जातीनुसार वेगळ्या पंगती बसत असत. ) - सावरकर पक्षिय तरुणांना आमंत्रण नव्हते , तरी देवीच्या प्रसादासाठी त्या घरातील सावरकरपक्षिय तरुण तेथे उपस्थित होऊन प्रत्येक रांगेत एक एक घुसला ,  म्हातार्या कोतार्यांचि धांदल उडाली ! धर्म बुडाला ! देव भ्रष्ट झाला असा आक्रोश सुरु झाला . शेवटी एकच पंगत बसली " (डॉ  आंबेडकरां चे जनता पत्र १ मार्च १९३१ )

सावारकरांनी अनेक जुनी मंदिरे दलितांना उघडी करून दिली होती , काही आंतरजातीय विवाह लावून दिले होते हे पतित पावन मंदिरापेक्षा अधिक महत्वाचे आहे. डॉ आंबेडकरांच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला आणि चवदार तळे आंदोलनाला सावरकरांनि अतिशय सक्रिय  पाठिंबा दिला होता.

डॉ आंबेडकरांनी या कामाबद्दल सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते. आंबेडकर लिहितात -
" नुसति अस्प्रुश्यता जाउन भागणार नाही . चातुर्वण्याचे उच्चाटन झाले पाहिजे . ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटलि आहे , त्यापैकी आपण एक आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो " . डॉ आंबेडकर  (कीर लिखित आंबेडकर चरित्र पृष्ठ २३९, सहावी आवृत्ती ) 

बाबासाहेब केवळ एवढ्यावर थांबलेले नाहित. बाबासाहेब मुंबईच्या प्रांतिक विधिमंडळात नियुक्त आमदार होते . २७ सप्टेंबर १९२७ रोजी त्यांनी सभापतिंकडे ठराव पाठवला कि सावरकरांची रत्नागिरी स्थानबद्धतेतून मुक्तता करण्यात  यावी जेणेकरुन त्यांचे कार्य देशभर चालावे.   ( पृ. ७३ शोध सावरकरांचा- य दि )

सुधारक सावरकरांना बाबासाहेंबांचा पाठिंबा होता. त्यात काही कुरबुरी., नंतर स्पष्टीकरणे आहेत पण मुख्यत: या काळात त्यात  फारसा संघर्ष दिसत नाही . असेलच तर ऐक्य आणि मनोमिलन दिसते. मनुस्मृती जाळल्या नंतर सुद्धा हे सहकार्य टिकून आहे .   आता हिंदुत्वा बद्दल बोलू .


 हिंदुत्व म्हणजे काय ?


हिंदुत्व हा शब्द अनेक अर्थाने वापरला गेला आहे. बाबासाहेबांनी हिंदुधर्म सोडला बुद्ध स्वीकारला त्याअर्थी त्याना हा धर्म मान्य नव्हता हे उघड आहे. पण हिंदु समाजाचे हित त्याना मान्य होते . बाबा साहेबांच्या फ़ाळणिविशयक पुस्तकातला संदर्भहीन उतारा राज कुलकर्णी यांनी दिलेला आहे . बाबासाहेबांचे हे पुस्तक वकिली बाण्याने लिहिलेले आहे . त्यातील पूर्व पक्ष  हे लेखकाचे मत नसते. 




फाळणी मुळे हिंदुचा राजकीय विजय झाला आणि हजार वर्षाच्या धार्मिक भांडणातुन हिंदुंचि मुक्ता झाली . या विषयावर बाबासाहेब आंबेडकरांचि मते अतिशय अभ्यासपुर्ण आहेत. फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - 

" जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक ,  ,  परिणामशुन्य राज्य बनेल । जणु जिवंत प्रेत    , न पुरलेला मृतदेह " -  डॉ आंबेडकर 
(पाकिस्तान ३ ४ ०.  Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page ३ ४ ० ) 





फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५  साली   बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. --  

" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " -  डॉ आंबेडकर

(Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page 146 ) 

समता आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला होता . त्यांनी सनातनी वृत्तीचा आयुष्यभर धिक्कार केला . मनुस्मृतीला काडी  लावली . हिंदुच्या सनातन वैदिक धर्माचा त्याग केला . पण  राजकीय दृष्ट्या त्यांना देशहिताची आणि हिंदुच्या राजकीय सामाजिक प्रगतीची चाड होती . धम्म स्वीकारापुर्वी एक वर्ष - बाबासाहेबांनी फ़ाळणिबद्दल देवाचे आभार मानले आहेत. परमेश्वर न मानणार्या बाबासाहेबांनी हलक्याश्या विनोदात लिहिलेले वाक्य अतिशय बोलके आहे .  १९५५ सालीच  बाबासाहेब आंबेडकर लिहितात कि - 

" जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे "  -  डॉ आंबेडकर 

(Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page 146 ) 

इथे बाबासाहेब शाप कशाला म्हणत आहेत ? आणि देश व हिंदुबद्दल त्यांची मते १९५५ सालीही काय आहेत ? ते उघड आहे .



असत्य ? अज्ञान ? कि विद्वेष ?  


श्री  राज कुलकर्णी हे माझे चांगले मित्र आहेत. पंडित नेहरुंचे उत्तम अभ्यासक आहेत. हे सारे तथ्य त्याना माहित नसेल तर नव्या माहितीचा स्वीकार करावा आणि आपली जुनी मते बदलावि. तसे करायचे नसल्यास अज्ञान पांघरुन असत्य बोलत रहावे . जर काही विशिष्ट द्वेषामुळे ते असे करत असतील तर ---
द्वेष पेरला तर द्वेषच उगवतो -  इतके नम्रपणे सुचवू इच्छितो . 

डॉ  अभिराम दिक्षित 

३ एप्रि, २०१६

हिंदुराष्ट्राचा लोच्या

हिंदुराष्ट्राचा लोच्या

मी हिंदु हितवादी आहे. या समाजाच्या हिताच्या चष्म्याने पाहिल्यास , हिंदु राष्ट्राच्या प्रस्थापित कल्पना , स्वप्ने आणि घोषणा या हिंदु समाजासाठि घातक आहेत , त्याच्या मुळावर येणार्या आहेत असे माझे मत आहे. हिंदु राष्ट्राच्या काही पोप्युलर संकल्पना क्रमाने पाहुया . आणि शेवटी योग्य पर्याय निवडूया.

१) सध्याच्या भारताचे हिंदु राष्ट्र करणे हा एक पर्याय आहे. म्हणजे नेमके काय करायचे ? सध्याची सेक्युलर घटना बदलायची ? आणि हिंदु कायदे आणायचे ? असे काही जुने कायदे आणायचे म्हणजे काय ? स्मृती पुराणे यातील वैवाहिक सामजिक कायदे आणायचे काय ? इसीस ला ज्याप्रमाणे शरीयत नावाच्या जुन्या इस्लामी कायद्याचे राज्य आणायचे आहे. तसे काही कारायचे आहे काय ? हरकत नाही . पण असे केले तर भारताचे हजारो तुकडे पडतिल. हिदू समाजात जाते जाते कुलाचार: हा नियम आहे. कायदा म्हणजे आचार .  प्रत्येक जातीचा कुळाचार , कुळधर्म वेगळा आहे . स्मृती पुराणावर आधारित विषम कायदे गृहयुद्धातून भारताचे स्मशान बनवतील.





.
.
२) अखंड हिंदुराष्ट्र नावाचा अजून एका प्रकार हि अतिशय लोकप्रिय आहे . भारत + पाकिस्तान + बांग्लादेश = अखंड भारत = ३०% हून जास्त मुस्लिम लोकसंख्या . हे लोकशाही मार्गाने मुस्लिम राष्ट्र बनेल. त्यातील मुस्लिमाना हिंदु करण्याच्या किंवा संपवण्याच्या योजना कोणि बनवत असेल तर ते मूर्ख आहेत . अमानुष आहेत . ते शक्य नाही . योग्यही नाहि.
.
.
३) तिसरा मुद्दा मुस्लिम केंद्रि आहे. मुस्लिमांचा मताधिकार काढुन घेणे हे काही उजव्यांचे दिवास्वप्न आहे. मुर्खपणा आहे. मुस्लिम राष्ट्र्वादि नाहीत - हे खरे असले तरी हिंदुसुद्धा राष्ट्रवादी नाहीत हे हि सत्यच आहे .   . जर राष्ट्रवादी असणे हा मताधिकाराचा क्रायटेरिया लावला तर सर्व प्रथम हिंदुचा मताधिकार काढुन घेतला पाहिजे.
.
.
आता शहाणपणा असा की हिंदुना राष्ट्रीय बनवणे हा हिंदुच्या राष्ट्रवादाचा अर्थ असायला हवा. हिंदुच्या धार्मिक परंपरेत राष्ट्रीय काही नाही. एक तर स्वत:ची जात आणि त्यापुढे गेले कि थेट मानवतावाद हि हिंदु मानसिकता आहे. अध्यात्म , अष्ट दर्शने आणि परसेप्शन वर उभे असलेले तत्वज्ञान फार तर मनोरंजन करेल . कोणतेहि सामजिक - राष्ट्रीय तत्व शिकवू शकणार नाहि.  

राष्ट्रवाद हे आधुनिक मुल्य आहे. पारंपारिक नाहि. बंधुत्व हा त्याचा पाया आहे. समता बंधुता आणि व्यक्ति स्वातंत्र्य ज्या काळात युरोपला स्फुरले - त्याच काळात राष्ट्रवाद स्फुरला आहे. जपानवर वर अणुबॉम्ब पडल्यावर तिथल्या उच्चवर्णीय सामुराय नि यापुढे हजार वर्षे गवत खाउन जगण्याची आणि जपान मधील मागास घटकांचा  विकास करण्यासाठी स्वत:ची  सत्तास्थाने सोडण्याची भूमिका घेतली होति. याला राष्ट्रवाद म्हणतात.

हे बंधुत्व सांस्कृतिक राष्ट्रवादातून येणार नाहि.  आधुनिक बुद्धिवादी विज्ञाननिष्ठ विचार हवा . हिंदु समाजाचे सर्व पक्षिय  सामजिक , राजकीय आणि बौद्धिक नेतृत्व पंगु आहे . त्यामुळे या हिंदु समाजाच्या हितार्थ उभे राहणे अधिक अधिक आवश्यक ठरते.

मुळात राष्ट्रवाद हा सुद्धा आपद्धर्म होय. मानवता हे चिरंतन सत्य आहे. आजच्या काळात मात्र राष्ट्रवाद आवश्यक ठरतो. एकमेकाच्या उरावर बसलेले देश आहेत. भारताला  आणि हिंदु समाजाला नष्ट करण्याची प्रतिज्ञा घेतलेले सक्षम शत्रू आहेत. इसीस , चीन , पाकिस्तान वा भारतातील कडवे इस्लामी, अतिलाल  डावे हे सारे शत्रू - शत्रू म्हणून असताना . मानवतेच्या गप्पा मारणे मुर्खपणा आहे. राष्ट्रवाद शत्रू केंद्रि  असतो . शत्रू नसतील तेंव्हा तो स्विच ऑफ केला पाहिजे.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादाला एक धनात्मक मुल्य आहे. ते मुल्य बंधुत्वाचे आहे.    राष्ट्रवाद ज्याप्रमाणे परके कोण ? हे ठरवतो . त्याचप्रमाणे आपले  कोण ? हे सुद्धा ठरवत असतो. भारतातल्या नागरिकांना बंधु मानणे - त्यासाठी त्याग , सचोटी , प्रामाणीकपण बंधुत्व  दाखवणे हि राष्ट्रवादाची उपयुक्त बाजू आहे.

सर्व भारतीयांचे एक राष्ट्र बनवणे . आधुनिक बुद्धिवादी समान संधि असलेल्या समता पूर्ण एकमय राष्ट्राची उभारणी करायची असेल . तर हिंदुना आधी राष्ट्रवादी बनवले पाहिजे. निदान त्याने ८०% काम पुर्ण होईल ! हिंदुना राष्ट्रवादी बनवणे असा अर्थ घ्यायला हवा. हे काम प्रस्थापित प्रती - पुरोगाम्यांच्या आवाक्याबाहेरचे दिसते .



धर्म क्षेत्र काशी येथील भिकारी 



-----------------------------
बटाट्याचे पोते आणि किराण्याचे दुकान
-----------------------------

डॉ आंबेडकर म्हणाले होते, हिंदू म्हणजे काय – तर किराण्याचं दुकान. किराण्याच्या दुकानात आपण गेलो; कांदे मागितले कांदे मिळतील; बटाटे मागितले बटाटे मिळतील;   किराणा मागून बघा; किराणा मिळणार नाही. किराण्याच्या दुकानात किराणा सोडून सगळं मिळतंय. हिंदूंच्या बाजारात हिंदू सोडून सगळं मिळतंय !

कार्ल मार्क्स ने तुच्छतेने शेतकऱ्यांना बटाट्याच्या पोत्यांची उपमा दिली आहे.  पोत्यात बटाटे गुंडाळलेले असतात; पोते ओतले कि ते सैरावैरा पळू लाग्तात. मार्क्सची उपमा मोठ्या संख्येने शेतकरी असलेल्या हिंदु समजाला तंतोतंत लागू पडते.

एका बाजूला नाकाला  फडकी बांधणारे अहिंसक आहेत , मंदिरात हजारो बोकडांच्या बळिप्रथेत रक्तमासाचा चिखल तुडवणारे काळुबाइचे भक्तही आहेत. एका बाजूला ब्राम्ह्चार्याचे स्तोम आहे दुसर्या बाजूला योनिपुजा आणि घटकंचुकिचा खेळ आहे. " पीत्वा , पीत्वा , पुन: पीत्वा " अशा रीतीने दारू पिउन अवग्रहण  , वमन आणि पतन हे सायुज्य मुक्तीचे टप्पे आहेत असे सांगणारे शैव तांत्रिक आहेत. सुक्ष्मातुन खून करणारे सनातनी आहेत , योगसामर्थ्याने सिद्धी प्राप्त करणारे साधक आहेत आणि मनुष्य विष्ठा खाउन तसलेच दैवी सामर्थ्य प्राप्त करणारे वारली जमातीचे भगत हि आहेत. (स.ह.दे. २३३)

पोराच्या अमेरिकेतील शिक्षणासाठि तयारी  म्हणुन त्याला मातृभाषेत बोलायला बंदि घालणारे  मध्यम वर्गीय प्रेमळ पालक आहेत ,    पोलिसांचा मार खाण्यासाठी तयारी व्हावी म्हणून  मुलाना लहान पणा पासून लाथा बुक्क्यांनी बडवणारे तितकेच प्रेमळ पालक पारध्यात ही आहेत.

अंबानिच्या शौचकुपाला सोन्याच्या सीटा  आहेत म्हणे , कचरापेटीत वाकवाकून अन्नकण शोधणार्या आणि … " बाई केर आहे का हो ? " असे विचारणार्या कंगाल लहान मुली रस्तोरस्ती फिरत आहेत . (स.ह.दे. २३३)

------------------------------

 भारतीय राष्ट्रवादा समोरची सगळ्यात मोठी अडचण हिंदुच आहेत. अशा या बटाट्याच्या पोत्याविषयी आत्मियता ठेवणे  आणि त्यांच्या हिताचा विचार करणे मला नैतिक दृष्टया  योग्य वाटते.    राष्ट्रवाद हे एक उपयुक्त मुल्य आहे.  त्यात इतरांचा द्वेष करण्याचे कारण नाही . आत्मियता महत्वाची . जर ८०% हिंदु समाजाला राष्ट्रवाद आणि बंधुत्व शिकवता आले . तर उरलेल्या २०% ना ते शिकवणे अगदीच सोपे आहे . हिंदु राष्ट्रवादाचा असा अर्थ घेतला पाहिजे.



सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *