३१ ऑग, २०१५

ॲरिस्टोटल च्या चश्म्यातुन - तर्कदोष (fallacy)



ॲरिस्टोटल च्या चश्म्यातुन - तर्कदोष (fallacy)


इग्लंड  मधल्या एका रेल्वे गाडीत दोन प्रवासी सामोरा समोर बसले होते . पेपर वाचत होते. दोघे स्कोटिश होते . पहिल्या पानावर एका तरुणीच्या खून आणि बलात्काराची बातमी होती. बातमीचा मथळा पाहताच दोन्ही स्कोटिशान्नि नाके मुरडली. असले रानटी  काम कोणताच स्कोटिश करू शकत नाही  हे त्यांच्या मनात क्षणात चमकून गेले . बातमी पुढे वाचतात… तो हि घटना स्कोटलन्ड मध्येच घडलेली असते.  दोन्ही स्कोटिशाना आश्चर्याचा धक्का बसतो. पुढे वाचतात तर तो खुनी आणि बलात्कारी माणुस चक्क एक स्कॉटिश निघतो  ! दोघे स्कोटिश मान हलवत म्हणतात …. मग तो " खरा " स्कोटिश नसणार !


अशा प्रकारे विचार करण्याला तर्कदोष  - फेलसि असे म्हणतात. इथे आपले स्कोटीश जातभाई वाईट कृत्य करूच शकत नाहीत असे गृहीत धरलेले आहे.  पण नवा अनुभव आल्यानंतर जुने निष्कर्ष बदलले पाहिजेत . पण तसे न करता … स्कोटीश असण्याची व्याख्याच बदलून टाकली आहे . स्कोटीश च्या आधी  "खरा"  हा शब्द जोडून …. आपल्या निष्कर्षात बसतील तेव्हढेच स्कोटीश " खरे " म्हणायचे असतात हा तर्कदोष "खरा"  हिंदू दहशतवादी नसतो किंवा "खरा" मुसलमान शांतता प्रिय असतो असाही वापरता येईल . इथे जो शांतात प्रिय नसेल त्याला "खोटा" म्हटले कि आपला तर्कदुष्ट युक्तीवाद पूर्ण होतो.






फेलसि - तर्कदोषांचे वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्न ॲरिस्टॉटलने (इ. स. पू. ३८४–३२२) केला. हे वर्गीकरण अजूनही बरेचसे रूढ आहे व तर्कदोषांचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात येणारी बरीचशी परिभाषाही ॲरिस्टॉटलच्या वर्गीकरणावर आधारलेली  आहे.

ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोचा शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचा गुरू होता. प्रस्तुत लेखात ॲरिस्टॉटल ने केलेले तेरा तर्कदोष पहायचे आहेत . इथे हे समजून घ्यायला हवे कि जगभरातल्या सर्व माणसात हे तर्कदोष कमी अधिक प्रमाणात आढळतात . मानवाची उत्क्रांती होत असताना प्रतिकूल नैसर्गिक स्थितीत टिकून राहताना फार विचार करत बसायला मानवी मेदुकडे वेळच नव्हता . फटकन निष्कर्ष काढण्यासाठी तर्कदोष उपयुक्त आहे त्यामुळे उत्क्रांतीत तो सिलेक्ट झाला आहे पण योग्य निष्कर्ष काढण्यासाठी या नैसर्गिक तर्क दोषातून मुक्त व्हावे लागते . त्यासाठी लोजिकल - तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायला मेदुला शिकवायला लागते .
प्रस्तुत लेखात तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्यासाठी कोणते तर्कदोष (फेलसि ) टाळायला हव्या ? त्या बद्दल ॲरिस्टॉटल चे मत पाहू .

ॲरिस्टॉटल ने चुकीच्या भाषेमुळे निर्माण होणारे (भाषिक ) आणि चुकीच्या विचार पद्धतीमुळे निर्माण होणारे तर्कदोष म्हणजे आशयिक अशी विभागणी केलेली आहे.






भाषिक तर्कदोष :


१) शब्दच्छल : 

एका शब्दाचे अनेक अर्थ भाषेत असतात . शब्दाच्या मुळ अर्थाचा छळ करून वेगळाच अर्थ  युक्तिवादात वापरला जातो . कायद्याच्या कचाट्यातुन सुटण्यासाठी सुद्धा हा तर्कदोष मुद्दाम वापरला जातो . नरो वा  ? कुंजरो वा ??  अश्वत्थामा मेला आहे असे धर्मराज सांगतो . त्यावेळी तो अश्वत्थामा या हत्तीचा उल्लेख करत असतो . पण त्यावरून अश्वत्थामा ह्या द्रोणाचार्यांच्या मुलाचा वध झाला आहे असे सुचित होते .

नरेंद्र मोदींना तुम्ही हिंदू राष्ट्रवादी आहात काय ? असा प्रश्न विचारला गेला होता . त्यावर मोदिनी मी हिंदू आहे आणि राष्ट्रवादी आहे असे उत्तर दिले होते . त्यामुळे त्यांचे समर्थक हि खुश होणार  आणि कुणि मोदिना त्यावर विरोधही करू शकत नाही . कारण हिंदू असणे पाप नाही . राष्ट्रवादी असणे तर त्याहून नाही . मुळातला प्रश्न तुम्हाला हिंदू धर्माचे राज्य आणायचे आहे काय ? घटना बदलायची आहे काय ?  सेक्युलर घटना मोडुन धार्मिक हिंदुराष्ट्र हवे आहे का ? असा आहे . पण मोदिनी शब्दाची फोड करून शब्दच्छल या तर्कदोषाचा युधिष्ठीर  - धर्मराजाप्रमाणे वापर केलेला आहे !

२) वाक्य छळ : 


हा तर्कदोष युक्तिवादात एक वाक्य दोन अर्थांनी घेतल्यामुळे घडतो. उदा., हे वाक्य पहा :

आई आणि ती मुलगी खेळत होत्या  - मेंदी लावलेल्या हाताने .

नेमकी मेंदी कोणि लावली आहे ? आईने ? मुलीने ? कि दोघांनी ? काहीच अर्थबोध होत नाही . प्रस्तुत उदाहरण जरी साधारण वाटले तरी वाक्य छळ हा तर्कदोष उजून गंभिर वळण घेऊ शकतो  . जसे की : -

तू    माझी बायको   मी    तुझी बायको    सिनेमाला जाऊ ! या वाक्यात योग्य ठिकाणी स्वल्पविराम दिले नाहीत तर गंभिर परिस्थिती उद्भवू शकते .






३ / ४ )  गुणाकार आणि भागाकार (समाहार आणि विभाजन ) :   


या  एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . फारच कमी निरिक्षणातुन निष्कर्ष काढण्याची सवय सर्व प्राणिमात्राना आहे . माणुस हि त्याला अपवाद नाही .  वाद विवादात हा तर्कदोष खूप वेळा वापरला जातो .

उदाहरणार्थ : पुणे हे कंजूष  माणसांचे गाव आहे . स्वत:ला आलेल्या थोड्याश्या अनुभवांना येथे कल्पनेने गुणले आहे आणि एका अक्ख्या शहराविषयी विधान केलेले आहे .

तसा कल्पनेतला भागाकारही (विभाजन ) चुकीच्या निष्कर्षांना जन्म देतो . उदाहरणार्थ : बिहार हे गरीब राज्य आहे म्हणून सर्व बिहारी गरीब आहेत म्हणुन लालू हा एक गरीब मनुष्य आहे . सर धोपटिकरण किंवा जनरलायझेशन करायच्या मानवी प्रवृत्तीमुळे हा तर्कदोष निर्माण होतो .



५) आघात

वाक्य उच्चारताना किंवा वाचताना चुकीच्या शब्दावर जोर दिला तर हा तर्कदोष निर्माण होतो .
"तो काल संध्याकाळि येणार होता . " या वाक्यातल्या  वेगवेगळ्या  शब्दावर जोर देऊन अनेक अर्थ काढता येतात . उदा : -

"तो काल संध्याकाळि येणार होता . " - तू का आलास ?
"तो काल संध्याकाळि येणार होता . "  - आज का आला ?
"तो काल संध्याकाळि येणार होता . "  - सकाळी का आला ?
"तो काल संध्याकाळि येणार होता . "  - आलाच नाही !

चुकीच्या शब्दावर जोर दिला कि तर्कदोष तयार होतो . 

 तू शेजार्या विरुद्ध खोटी "साक्ष" देऊ नको . इथे साक्ष ऐवजी " शेजार्याविरुद्ध " या शब्दावर जास्त जोर दिला तर शेजारी सोडुन इतर लोकाविरुद्ध खोटी साक्ष द्यायला हरकत नाही . असा चुकीचा अर्थ निघू शकतो.





६) व्युत्पत्तीदोष : 


ज्या अर्थाने शब्द बनला त्या अर्थाने वापरला पाहिजे . शब्दाआधी अ प्रत्यय लावला तर विरुद्धार्थी शब्द बनतो . अ + स्वीकार = स्वीकार न करणे . उदाहरणार्थ अमुल्य चा अर्थ आहे ज्याचे मुल्य (किंमत ) करता येत नाही असे  . पण तुमचे मत अ + मुल्य (फुकट ) आहे असे त्याचा अर्थ लावला तर तो तर्कदोष ठरेल .






आशयिक तर्कदोष :


१) गृहीत प्रश्न दोष : 


तू बायकोला मारणे सोडलेस का ? तू दारू पिणे सोडलेस का ? भाजपा लोकशाही मानणार  का ? या प्रश्नात एक तर्कदोष आहे . समोरचा माणुस दारू पितो, बायकोला मारतो, लोकशाही धिक्कारतो  हे आधीच  गृहीत धरण्यात आलेले आहे . पहिले गृहीत सिद्ध न करताच हा प्रश्न विचारणे तर्कदोष ठरते  .


२) विवाद अज्ञान तर्कदोष :

हा असंबद्ध युक्तिवाद करणार्यांचा तर्कदोष आहे .   वाद विवाद करण्याचे सामन्य नियम माहित नसणारी माणसे हा तर्कदोष वारंवार करतात. आपण युक्तीने मुळ प्रश्नाला बगल दिली ! असे त्याना वाटत असते . वस्तुत: हा तर्कदोष आहे . हि युक्ती तर्कशास्त्राच्या अज्ञानातून सुचलेली असते . याचे ४ उपभाग आहेत




२अ ) व्यक्तीयुक्ती  / हेत्वारोप :  


यात विरोधकाच्या मताचे खंडन केले जात नाही . सरळ हेतूवर शंका घेतली जाते . उदाहरणार्थ आमच्या विरुद्ध लिहिण्यासाठी तुला पैसे मिळतात असे म्हणणे . किंवा तुझ्या मनातला सुप्त जातिवाद हे बोलतो आहे …. असे म्हणुन विरोधकाच्या व्यक्तिमत्वावर / हेतूवर / चारित्र्यावर शितोडे उडवले जातात . मग त्याच्या मतांचे खंडन करण्याची गरजच उरत नाही .  हा तर्कदोष सर्व राजकारण्यांकडून वापरला जातो . मोदींच्या जुन्या विवाहावर टिका करणे किंवा सोनिया गांधींच्या परदेशी मुळाचा उल्लेख  करून त्यांच्या विचारांचे खंडन टाळणे हा तर्कदोष व्यक्तीयुक्ती / हेत्वारोप म्हणुन गणला जाइल .


२ब ) भीती युक्ती : 


आपले मत पुराव्याच्या आधारावर सिद्ध करायचे नाही . ताकदीची  किंवा नुकसानीची भीती वारून युक्तिवाद टाळणे याला भीती युक्तीचा  तर्कदोष म्हणता येईल . समान नागरी कायदा करू नका . मुस्लिम  चिडतील . दंगल होईल . हा  तर्कदोष आहे . अंधश्रद्धा विरोधी कायद्याने हिंदू चिडतील म्हणुन तो करू नका हा ही तर्कदोष आहे . हि भितीयुक्ती हा भारतीय राजकारणाचा पाया बनला आहे . भीती दाखवली कि युक्तिवाद संपला आपण जिंकलो असे वाटणे हा ॲरिस्टोटल ने तर्कदोष ठरवला आहे .








२क ) लोकभावना युक्ती : 


आपला मुद्दा युक्तिवादाने सिद्ध न करता लोकांच्या भावनेचा हवाला देण्यात येतो . जगातले इतके कोट्यावधि लोक हजारो वर्षे धर्मावर श्रद्धा ठेवतात . मग धर्म चूक कसा असेल ? हा तर्कदोष आहे . नेक लोक अनेक वर्षे मुर्खपणाहि करू शकतात .


२ड ) आदर युक्ती : 

एखाद्या महान माणसाचा हवाला देऊन स्वत:चे मत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो . उदाहरणार्थ : गांधीजी धार्मिक होते. महान माणसाची सर्वच मते योग्यच  असतील असे नाही .  पैगंबराने अनेक विवाह केले . ज्ञानेश्वरांनी चातुर्वण्यावर आघात केले नाहीत . तुकोबा वैष्णव होते .  शिवाजी महाराजांनी आठ लग्ने  केली होती . आंबेडकरांचा फाळणीला पाठिंबा होता  .  समजा  हे सर्व खरे आहे . पण केवळ ह्या दाखल्यांवरून . आजचे युक्तिवाद करता येत नाहित.  अगदी आजच्या काळातल्या इस्रोच्या वैद्न्यानिकांनी बालाजीला साकडे घातले यावरून धर्माची आवश्यकता सिद्ध होत नाही . महान आणि आदरणीय व्यक्तीमत्वांचे हवाले देत युक्तिवाद करणे हि युक्ती समोरच्याला गप्प करायला ठीक असली तरी  तो तर्कदोष आहे. पण व्यक्तीपुजेने बद्ध समाजात हा तर्कदोष सहजच चालून जातो .


३) चक्रविचार : 

यात अ ने ब सिद्ध केले जाते आणि मग पुन्हा   ब ने अ सिद्ध केले जाते . येशु प्रेषित आहे कारण बायबलात तसे लिहिले आहे आणि बायबल दैवी ग्रंथ आहे कारण येशु देव तसे म्हणतो . खरे पाहता या दोन्ही गोष्टी स्वतंत्र पणे सिद्ध केल्या पाहिजेत.  चक्रविचार हा तर्कदोष सर्वच इझंम वाल्या मंडळींकडून थोडाबहुत वापरला जातो . वेद हि ईश्वरी वाणी अपौरुषेय आहे कारण वेदातच  तसे म्हटले आहे किंवा आंबेडकरांनी म्हटले कि जेव्हढा बुद्धधर्म विज्ञान निष्ठ असेल तोच खरा बुद्धधर्म ! हि दोन्ही आर्ग्युमेण्ट यातच मोडतात .







४) छद्म कारण दोष : 


यात वेगळ्याच कारणाचे खण्डन करून भलताच परिणाम चूक ठरवला जातो . पक्षि उडतात मग गुरुत्वाकर्षण कसे काय अस्तित्वात असू शकेल  ?  वास्तविक पाहता पक्षि किंवा विमाने उड्ण्याचा आणि गुरुत्वाकर्ष्णाच्या सिद्धांताचा काहीच संबध नाही .




 राजचे आडनाव ठाकरे आहे मग तो हिंदुत्व वादिच  असणार हा हि तर्क दोषच.  कारण आडनावाचा आणि विचारसरणिचा काहीच संबध नसतो !









५) उपाधी तर्कदोष: 


 याचं अॅरिस्टॉटलने दिलेलं उदाहरण सांगतो. हा कुत्रा बाप आहे, हा कुत्रा तुझा आहे. म्हणून हा कुत्रा तुझा बाप आहे. हे विधान उघडच तर्कसंगत नाही.





६) सामान्य-विशेष-संभ्रम : 


 सामान्य नियम जेव्हा आपण विशिष्ट वस्तुंना किंवा घटनांना उद्देशून लावतो, तेव्हा त्याचं हे उपयोजन काही अटींनी मर्यादित झालेलं असतं असं आपण मानतो. पण अनेकदा आपण या अटी स्पष्टपणे नमूद करत नाही. उदाहरणार्थ, ‘प्रत्येक माणसाला आपल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार असतो,’ हे सामान्य तत्त्व जर आपण घेतलं, तर माणसाला वेड लागलेलं नाही, तो शुद्धीवर आहे इत्यादी अध्याहृत अटी त्याचं उपयोजन मर्यादित करतात. अशा सामान्य तत्त्वाच्या उपयोजनावर मर्यादा घालणार्या अटी लक्षात न घेता, जर ते तत्त्व एका विशिष्ट वस्तुला लावलं, तर तो सामान्य-विशेष-संभ्रम तर्कदोष होय. उदाहरणार्थ, दारूच्या धुंदीत असलेल्या माणसाला आपल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार असतो असा निष्कर्ष मी काढला, तर हा तर्कदोष घडेल.







आता आपण पुढे नव्याने वापरात आलेले तर्कदोष पाहू. आपल्याला हवी तेवढी माहिती गोळा करायची नको त्या माहितीकडे दुर्लक्ष करायचं. मग आपोआपच आपल्याला हवे ते निष्कर्ष निघतात. फोर्टमध्ये राहणार्या माणसांची स्थानिक स्थिती पाहून सगळी मुंबई श्रीमंत आहे असा निष्कर्ष काढणं यास चेरी पिकिंग फेलसी असं नाव आहे.

वदतोव्याघात हा एक अजून   तर्क दोष . यात आपण आपले म्हणने आपणच खोडून काढत असतो . उदाहरणार्थ ती म्हातारी बाई फार तरुणपणिच मरून गेली किंवा ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या . म्हातारी बाई तरुणपणिच मरू शकत नाही कारण ती म्हातारी आहे असे आपण आधीच म्हटले आहे . ब्राह्मण हि एक जात आहे . आणि जर भुतकाळात इतिहासात जाती नसलेली व्यवस्था अस्तित्वात असेल तर जाती निर्माण करायला … ब्राह्मण हि जात कोठून उत्पन्न झाली  ?


सगळ्यात शेवटचं म्हणजे ः स्ट्रो मेन फेलसी ः यामध्ये दुसर्याचं मुख्य म्हणणं ऐकून घ्यायचं नाही आणि निरर्थक लहान मुद्यावर वाद घालत वेळ काढायचा याला स्ट्रो मेन फेलसी असं म्हणतात. स्ट्रो मेन म्हणजे बुजगावणं. शत्रुच्या सैन्यावर हल्ला न करता शत्रुच्या बुजगावण्यावर हल्ला करायचा आणि मग विजयाचा डंका पिटायचा… प्रस्तुत लेखातल्या मुख्य विषयाकडे दुर्लक्ष करून लहानसहान नजरचुकीवर हल्ला करून बुजगावणं मारल्याचा आनंद व्यक्त करता येईलच की! त्यालाच म्हणायचं स्ट्रो मेन फेलसी!







(संदर्भ स्रोत : मराठि विश्वकोश , तत्वज्ञान कोश , गुगल ! )

.

इसापनीती # कथा पहिली - वटवाघुळ #

इसापनीती # कथा पहिली - वटवाघुळ #
वाघ , सिंह , गाय , डुक्कर याना प्राणि म्हणतात . कावळे , गरुड , पोपट , चिमणी याना पक्षी म्हणतात . प्राणि आणि पक्षी यात कायम भांडणे असतात . त्यांची जमीन एक नाही. हवा एक नाही. पाणि एक नाही. अन्न एक नाही. भक्ष्य एक नाही. लक्ष एक नाही. तरीही ते कायम भांडतात . प्राणि विरुद्ध पक्षी हा सनातन व नित्यनूतन व सार्वकालीन व निष्कारण असा झगडा आहे .
प्राणि विरुद्ध पक्षी या महान संघर्षात वटवाघुळाने कोणाची बाजू घ्यावी ? कधी प्राण्याच्या विरुद्ध तर कधी पक्ष्यांच्या विरुद्ध वटवाघुळ प्रतिध्वनी काढत बसते . कोणत्याच गटात जात नाही .
वटवाघुळे म्हणजे पंख असलेले सस्तन प्राणि . किंवा स्तन उगवलेले पक्षी . किंवा पंख फुटलेले प्राणि . किंवा चोच नसलेले पक्षी . किंवा जमिनीवर न रहाणारे प्राणि . किवा घरटे न बांधणारे पक्षी .
या - पण - किंवा - किंतु - परंतु - मध्ये वटवाघुळ अडकते . त्याला उगीचच वाटते आपण फार फार विचारी आणि तटस्थ आणि साक्षेपि आणि सम्यक आहोत .
" खरेतर ते गंडलेले असते "
त्याला आप्तजन नाहीत .
त्याला मानसन्मान नाही .
त्याला प्राण्यात जागा नाही .
.पक्षात स्थान नाही .
तात्पर्य : वट्वाघुळास निद्रानाश जडतो . ते रात्री बेरात्री जागे राहते . अस्वस्थपणे .
शुभरात्री !

कार्ल मार्क्स : समिक्षेचि चिकित्सा

  कार्ल मार्क्स : समिक्षेचि चिकित्सा

सर्वप्रथम मी प्रशांत निलकुंड आणि अमित शिंदे  यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्या मार्क्सावरील लेखनाची चिकित्सा केल्यामुळे मला नवे शिकण्याची संधि मिळाली.  नवे वाचण्याची प्रेरणा मिळाली . सतत शिकत राहणे हि बुद्धिवाद्याचि कसोटी आहे . माझे विचार बदलायला मी उत्सुक  आहे . लाल बंधु ती तयारी दाखवत नाहीत हि खंत आहे .  माझ्या दोन तीन संदर्भातल्या ढोबळ चुका दाखवल्याबद्दल मि त्यांचा आभारी आहे . मार्क्स वंशवादि होता - याचे  खंडन वा नवे पुरावे मात्र दिसले नाहीत. याउलट मार्क्स - एंजल्स जातीवादी - वंश श्रेष्ठत्व वादि  असल्याचे नवे पुरावे आणि आणि युक्तिवादाचि  जंत्रीच  खंडनकर्त्यांच्या लेखनात दिसते  . वंश जातिवाद या जीवशास्त्रातील संकल्पनेचा विकास - ऐतिहासिक - युरोपियन अर्थ त्यासाठी समजून घ्यावा लागणार आहे. 

अ ) लेख लिहिल्यानंतर सुरवातीला काही तरुण  मार्क्स भक्तांनी हे पुरावे आणि संदर्भच नाकारले होते.  . श्री प्रशांत निलकुंड यांनी ते पुरावे तपासले . खरे आहेत याची खात्री केली आणि त्याच पुराव्यातून वेगळा अर्थ निघतो असे प्रतिपादित केले . अमित शिंदे यांनी तर मार्क्सचे वर्ण द्वेष्टे  पत्र स्वत:च भाषांतरित करून दिले. त्याबद्दल शतश: आभारी आहे . प्रशांत - अमित कृत चिकित्सा  --- चर्चा परिघातल्या बहुतेक  मार्क्स भक्तांनी  लाइक शेअर केली आहे. निदान  मार्क्स वाद्यांच्या  अधिकृत वेबसाईट वरील पुरावे तरी खरे मानून या वादास उत्तम दिशा मिळाली आहे . मार्क्स्वाद्यांच्या निस्वार्थी वृत्तीबद्दल मला आदरच आहे . प्रश्न अंधश्रद्धेचा आहे . १८६० साली सारा युरोप वंश्वादि होता हे सत्यच कोणि समजून घेताना दिसत नाही . असो .  पुराव्याची सत्यता सर्वमान्य झाल्याने . आता प्रश्न फक्त पुराव्यांच्या  अर्थाचा, कोण्टेक्स्ट चा  आणि भाषांतराचा उरतो .  

आ ) दोन ठिकाणी माझी भाषांतराची चूक झाली आहे . ती मी मान्य करतो . लासाले आणि लाफाए याच्या फ्रेंच - जर्मन स्पेलिंगच्या आकलनात , आणि मार्क्सच्या जर्मन वृत्तपत्राच्या नावाच्या भाषांतरात झालेली चूक मी अवश्य सुधारेन . जर्मन इंग्लीश भाषांतर करणार्या साईट कडून चुकीची माहिती मिळाल्याने हे घडले. 

पुढिल चर्चेच्या सोयीसाठी मुळ लेखातले संदर्भ क्रमांक वापरू 

------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ १) मार्क्सचे  जातीवादी पत्र  मार्क्सवादी अमित शिंदे यांनी भाषांतरीत केले आहे . तेच संदर्भ म्हणून वापरू . मार्क्स लिहितो - 

" आता मला अगदी स्पष्ट झाले आहे की — जशे की त्याच्या डोक्याचा आकार आणि केसांची वाढ सुद्धा दर्शवते की हा इजिप्त मधून मोझेसची साथ देणाऱ्या निग्रो वंशातून निपजला आहे (किंवा मग त्याची आई किंवा आजीचा "निग्गर"शी संबंध आला असेल). आता, एकीकडे हे ज्युविश- जर्मन मिश्रण आणि दुसरीकडे त्याचे निग्गर मूळ (बेसिक निग्रोइड स्टोक ), अशाच विचित्र माणसाला (प्रोडक्ट) जन्मास घालणार. ह्या माणसाचा हेकटपणा सुद्धा निग्गर सारखाच आहे. " 

हे पत्र मार्क्सने   लासाले / लाफ़ाए - कोणालाही लिहिले तरी वंशवाद तसाच राहतो .  मार्क्स ला लासाले छळत होता- म्हणून मार्क्सला शिव्या द्यायचा अधिकार आहे असे  मार्क्स भक्तांचे  आग्रही प्रतिपादन आहे.

मार्क्स आणि मार्क्सवादी सगळ्या शिस्ट्म वरच चिडलेले असल्याने त्यांचा शिव्या द्यायचा अधिकार मान्यच करू ! मुद्दा कोणत्या शिव्या दिल्या ? याचा आहे. एखाद्याचा सात्विक संताप जात/ वंश याचा उद्धार करायची  परवानगी देतो काय ? भारतात तसे केल्यास एट्रोसिटि खाली गुन्हा दाखल होऊ शकतो .

भारतीय समाज व्यवस्थेत मार्क्स चे पत्र अशाप्रकारे रुपांतरित होते - 

 समजा मार्क्सबुवा  जोशींचे  एका कोकणस्थ ब्राम्हण मित्राशी भांडण झाले . त्याने मार्क्स ला   छळले . मग मार्क्स ने  चिडून म्ह्टले कि - " तुझे डोळे पुरेसे घारे  नाहीत, कातडीचा रंग निमगोरा आहे . म्हणजे तू ब्राम्ह्णाचि अवलाद नसून दलिताची असणार. परशुरामाने काही दलितांना सामावून घेतले तू त्यातला असशील….  नाही तर तुझी  आई  दलीताशी रत झाली असेल.  ब्राम्हण - दलिताच्या मिश्रणातून  तुझ्यासारखाच  विचित्र  प्रोडक्ट जन्माला येणारा . तुझा हेकटपणा सुद्धा दलीता सारखाच आहे." -  - - मार्क्स्बुवा जोशी .

इथे मी दलित हा शब्द वापरला आहे . मार्क्स ने असा सभ्य शब्द (जर्मन : नेगार) … न वापरता सर्वत्र  निग्गर हा शब्द वापरला आहे . निग्गर हि  शिवी आहे . हलकट हुच्च वर्णिय लोक दलितांसाठी ज्या शिव्या वापरतात त्या वरील मार्क्स बुवा जोशिंच्या पत्रात लिहिल्या कशा वाटतील ? कल्पना करून बघा …आणि पत्र पुन्हा वाचा …. 

भारतीय चष्म्यातून  मार्क्सच्या विषारी वांशिक भाषेचा बोध होणार नाही. त्यासाठी तत्कालीन युरोपीय समजुती पहाव्या लागतील .   

क्रेनिओलोजि : कवटी शास्त्र : तत्कालीन युरोपातले लोकप्रिय (छद्म ) विज्ञान 

इथे मार्क्स ने डोक्याचा आकार आणि आणि केसांचा पोत याचा उल्लेख केला आहे.  याचा तत्कालीन युरोपीय संदर्भ पहावा लागेल . सोशल डार्विनिझम त्याकाळी लोकप्रिय होता . कवटीच्या आकारावरून  बुद्धिमत्ता ठरवणे , नोकर्या देणे , डोक्याच्या आकारावरून गुन्हेगार ओळखणे वगैरे गोष्टी तेव्हा युरोपात घडत आहेत . मार्क्सचे पत्र १८६२ सालचे आहे.त्याकाळी  क्रेनिओलोजि  हे शास्त्र युरोपात लोकप्रिय आहे. कवटीच्या आकारावरून 
" जन्मजात गुन्हेगार " शोधण्यासाठी या (खोट्या ) शास्त्राचा युरोपात मुक्त उपयोग होतो आहे . त्याकाळी मार्क्सने केलेला हा उल्लेख आहे . हा उल्लेख निश्चित पणे वंश जाती वादि  आहे. मार्क्स चा उद्गार कितीही चिडून -- कोणाही बाबतीत---- असला तरीही जाती - वंश वादिच आहे .     

मार्क्स त्याच्या पत्रात विरुद्ध बाजूच्या व्यक्तीचा अपमान करण्यासाठी त्याला निग्गर म्हणतो आहे . संतापुन विरोधकाला  हीन लेखण्यासाठी….   शरीर रचने वरून जात ठरवणे , वांशिक हीनता , जातीय शिव्या देणे मार्क्स वाद्यांना आजही समर्थनीय आणि योग्य वाटते. प्रशांत - अमित या दोघांनीही याबद्दल मार्क्स ला उदार मनाने माफ केले आहे . यातच सारे आले.
----------------------------------------------------------

संदर्भ २)  निग्रो हि उत्क्रांतीत खालच्या दिशेने घसरलेली जमात : कार्ल मार्क्स 

हे ट्रिमो ने केलेले संशोधन फलदायी (प्रेग्नंट ) आहे . असे मार्क्स म्हणतो . संशोधन ट्रिमो चे असले तरी मार्क्स ला ते मान्य आहे . मार्क्स ट्रिमो  च्या प्रभावात होता  हे प्रशांत मान्य करतात . परंतु  हे वाक्य मार्क्सचा वंशवाद सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही असेही दोघे म्हणतात . गंमत आहे . 

त्याच पत्रात मार्क्सने असेहि म्हटलेले आहे : " ट्रीमो चे संशोधन डार्विन पेक्षा अधिक योग्य आहे . त्याच्या विचाराचे ऐतिहासिक आणि राजकीय उपयोजन  महत्वाचे आणि   अधिक फलदायी ठरते " 

मार्क्सने ट्रीमो चे  शिष्यत्व अध्यात्मिक कारणासाठी पत्करलेले नाही . त्याला ट्रिमोच्या विचाराचे राजकीय उपयोजन करायचे आहे. 

ऐतिहासिक आणि राजकीय उपयोजन याचा मार्क्सवादाच्या चष्म्यातून  काय अर्थ होतो ? मार्क्स स्वत:ला शास्त्रीय समाजवादी समजत असे. तत्कालीन वैद्न्यानिक आणि शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग नव्या समाजाच्या उभारणीसाठी त्याला करायचा आहे. एकदा निग्रो हे हीन वंशाचे आहेत हे मान्य केले कि त्याचा राजकीय अन्वयार्थ काय निघतो ? हे प्रशांत आणि अमित दोघेही समजून घेतील अशी आशा बाळगुया . 

ट्रिमो ची स्तुती आणि श्रेष्ठत्व प्रतिपादित करण्यासाठी मार्क्सने दोन परीच्छेद  त्याच पत्रात लिहिले आहेत . अमितजिंनि कृपया ते पुर्ण पत्र भाषांतरीत करून द्यावे . सर्व पत्र ट्रिमो स्तुति आणि वंशवादाने बरबटले आहे . रशियन लोक आणि पूर्व युरोपातले लोक टेलेंट आणि टाइप ने वेगळे आहेत अशी पत्राची शेवटची ओळ आहे . मार्क्स एंजल्स चा स्लाव वंशियाचा द्वेष दाखवणारी शेकडो उद्धरणे नेट वर मिळतील .  

आता थोडे उत्क्रांतिशास्त्र : इव्होल्युशन --- " डिजनरेटेड काळे "

त्याकाळी उत्क्रांती वादाचा काय अर्थ घेतला जात होता ? हे महत्वाचे आहे . माकडापासुन माणुस उत्क्रांत होत आला….  माणुस श्रेष्ठ जमात आहे असे तत्कालीन मत होते . मार्क्स निग्रोंना (आफ्रिकन योग्य शब्द ) उत्क्रांतीत मागे "राहिलेली" जमात समजत नाही .   मागे "गेलेली" जमात समजतो . तत्कालीन उत्क्रांतिशास्त्रात हा प्रचंड महत्वाचा फरक आहे . मार्क्स ने काळ्यांना " डिजनरेटेड " टाइप असे म्ह्टले आहे. मागे राहिलेली जमात उत्क्रांत व्हायची शक्यता मानलि जात असे .उत्क्रांतीच्या प्रवाहात  खाली घसरलेल्यांचि उत्क्रांती शक्य नाही असे त्या काळचे मत आहे . जगाण्यासाथि नालायक ठरलेल्या जमाती - सर्व्हायव्हल ऑफ फ़िटेस्ट च्या तत्कालीन (चुकीच्या ) समजुती लक्षात घ्याव्या लागातील . मार्क्सचे उद्गार अतिशय अर्थपूर्ण आहेत. मार्क्स हा त्या काळचा प्रचंड विद्वान मनुष्य आहे आणि तो अतिशय योग्य प्रकारे शब्दांची मांडणी करत असे . हा  " डिजनरेटेड " शब्द कम्युनिस्ट मेनिफ़ेस्टोत भयंकर प्रकारे वापरला आहे . 

बुर्झ्वा - प्रोलाटिरियेट - ल्युम्पेन प्रोलाटिरियेट

मार्क्सवादी परीभाषेतले हे शब्द अतिशय महत्वाचे आहेत . त्यावरच अक्खा मार्क्सवाद उभा आहे . त्याचे सामान्य अर्थ असे - 

बुर्झ्वा = भांडवल दार श्रिमंत 
प्रोलाटिरियेट = कामगार वर्ग 
" ल्युम्पेन"  प्रोलाटिरियेट = फालतू माणसे त्यांचा क्रांतीत काही उपयोग नाही 

हे ल्युम्पेन लोक्स "डेंजरस क्लास" आणि " सोशल स्कम "  असून - बहुदा संपुन जातील किंवा क्रांतिमार्गात अडथळा आणतील असे मार्क्सचे मत होते . ल्युम्पेन लोक्स हे लाचखाऊ असतात भांडवल दरांना विकले जातात असे तो मेनिफ़ेस्टोत लिहितो . 

ल्युम्पेन कोण ? मार्क्सने दिलेली ल्युम्पेन ची यादी पहा  : -
" भिकारी, वेश्या , चोर , बेकार , इंडस्ट्रीत कामाला नसलेले लोक , डीक्लास, डिजनरेटेट   एलिमेंट " 


इथे मार्क्स ने डिजनरेटेड इलिमेंट कोणाला म्ह्टले आहे ? व्हाइट कोकेसियन वंशाप्रमाणे - ज्ञात इतिहास नसणारे , गुलाम वगैरे लोक या वर्गात येतात असे तत्कालीन इंटरर्प्रिटेशन आहे.  . 
------------------------------------------- 

संदर्भ 3) मार्क्स्कृत गुलामीचे समर्थन : -

हेगेलियन पद्धतीने प्रूदौंच्या लेखातले उद्धरण मार्क्स फिरवून दाखवतो . परीच्छेद  बदलतो आणि मग गुलामीचे समर्थन करतो .  युरोपियन अप्रत्यक्ष गुलामी -  अमेरिकी प्रत्यक्ष गुलामिहून भिन्न आहे असे स्पष्टपणे सांगतो . मार्क्स लिहितो -

" (काळ्या) गुलामाशिवाय कापूस नाही . कापसाशिवाय यंत्रमाग नाही -  कि नवी औद्योगिक क्रांति नाही. गुलामीमुळे वसाहतींना मुल्य प्राप्त होते . वसाहतींमुळे जागतिक व्यापार संभवतो , व्यापारामुळेच मोठे उद्योग उभे राहतात . गुलामी हि अतिशय महत्वाची अर्थशास्त्रीय कल्पना आहे . जर गुलामी रद्द केली तर अमेरिके सारखा प्रगीतीशील देश एक पितृसत्ताक सामंतशाहि देश (patriarchal country) बनून जाईल . जर अमेरिकेचा नाश झाला तर सर्व आधुनिक अर्थशास्त्र आणि प्रागतिक संस्कृती नष्ट होऊन जाइल. " 


पितृसत्ताक सामंतशाहि देश (patriarchal country) मार्क्सला आवडत नसत . गुलामी रद्द केली तर अमेरिका अशाच प्रकारचा वाईट देश बनून जाइल असे मार्क्स लिहितो आहे . हे गुलामीचे समर्थन नसेल तर मग काय आहे ? 

सर्वात महत्वाचे म्हण्जे एंजल्स ने या पेरेग्राफ साठी एक तळटिप लिहिली आहे . आणि मार्क्सने केलेले गुलामीचे समर्थन कसे योग्य आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पान कर ५० वर ती तळटिप आहे. एंजल्स हाच मार्क्सचा समकालीन , मित्र आणि सर्वश्रेष्ठ भाष्यकार होय . तो क्रिटिक चे समर्थन कशाला करेल ? कायच्या काय ?  क्रिटिक आणि हेगेलीय्न उद्धरण आधीच्या परीच्छेदात संपले आहे. मार्क्सने गुलामीच्या समर्थनार्थ  विधान मांडले आहे - थिसिस . मार्क्सने गुलामीचे समर्थनच केले आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------
वरील ३ संदर्भावरुन सहज सिद्ध होते कि 
१) मार्क्स रंग, केस , डोक्याचा आकार यावरून वंश आणि जातीत भेद करतो . तसे करणे त्याला शास्त्रीय वाटते . 
२) मार्क्स आफ्रिकन काळ्यांना उत्क्रांतीत डिजनरेट झालेली जमात समजतो . 
३) मार्क्स काळ्यांच्या गुलामीचे समर्थन करतो .  
--------------------------------------------------------------------------------------------

मार्क्स कृत इथनोलोजिकल नोटबुक नावाचे पुस्तक आहे . ते अगदी उशिरा भाषांतरीत  झाल्याने कदाचित पोलिट  ब्युरोच्या सदस्यांनी सुद्धा वाचले नसेल . त्यात मार्क्सचा वंशवाद अतिशय उघडपणे व्यक्त झाला आहे . त्याकाळात   इथानोलोजी म्हणजे वंशशास्त्र असाच अर्थ प्रचलित आहे. मार्क्स च्या इथनोलोजिकल नोटबुक बद्दल सविस्तर लिहीन, स्लाव इत्यादी राष्ट्रे व बाबासाहेबांचे मत याची चर्चा पुढच्या भागात करू . मार्क्स्वाद्यांच्या निस्वार्थी वृत्तीबद्दल मला आदरच आहे . प्रश्न अंधश्रद्धेचा आहे . १८६० साली सारा युरोप वंश्वादि होता हे सत्यच कोणि समजून घेताना दिसत नाही . असो (क्रमश:) 
   


------------------------------------------- 
सर्वप्रथम चिकित्सेसाठी धन्यवाद . मी दिलेले संदर्भ खोटे आहेत समग्र खंडातला व्होल्युम नंबर सांगा असे काल पर्वाचे मार्क्सवादी बोलत होते . आपण संदर्भ तपासलेत . खरे असल्याची खात्री केलीत आणी माझेच संदर्भ वापरून त्याच्या विश्लेषणावर मत व्यक्त केलेत . आधीचे मार्क्सवादी विनाकारण खोटारडे आरोप करत होते हेच यातून दिसून येते .
१) आपला एक मुद्दा अंशत: मान्य आहे, त्यावर भाष्य करेन . नवे शिकणे आणि स्वत:ची मते बदलणे हे मनुष्याचे लक्षण आहे . तसे मी हि करायला कायम उत्सुक आहे .
२) इतर ४ मुद्दे चूक आहेत . मार्क्स वंश्वादि असल्याचे सत्य तुमच्या विश्लेशणानंतरही तसेच राहते . यावर सविस्तर भाष्य लवकरच करेन .
३) बुद्धिभेद जाणुन बुजून केल्याचा आरोप चूक आहे . हा आकलनातला फरक आहे . असे न केल्यास बरे . राहुलच्या पोस्टवरिल मार्क्सवादी संपादक झाटे , गांड, भट असे शब्द वापरून बोलत आहेत . त्यांच्या बौद्धिक पातळीवर जाउन मी प्रतिवाद करू शकत नाही .
प्रशांतजि आपल्या आकलनातला फरक कमी करण्यासाठी करण्यासाठी यावर सविस्तर भाष्य मी करेन - मार्क्स चा वंशवाद सिद्ध करणारे आणखीही काही थेट पुरावे आहेतच .
माझ्या परवाच्या ब्लोगवर आणखी काही आक्षेप असल्यास ते नोंदवावे अशी विनंति मी …। आणि …। याना करतो .त्यामुळे काल अपव्यय टळेल या ब्लोग संदर्भातिल सर्व आक्षेपांची चर्चा झाल्यावर मला पुढे सरकता येईल . मार्क्स वंशवादि होता हे सत्य मान्य करणे किती जळफ़ळाटिचे होते - यावरूनच मार्क्सवाद हा एक धर्म असल्याचे सिद्ध होते . असो
------------------------------------------- 
संदर्भ 1. मार्क्सचे एंगल्सला पत्र, 30 जुलै 1862 यात मार्क्स त्याचा समकालीन ज्यू जर्मन विचारवंत लासाले विषयी आपला राग व्यक्त करत आहे, जावयाविषयी (लाफाए) हे बोलणे नव्हे. या पत्रात मार्क्सची स्वत:ची आर्थिक स्थिती कंगाल असल्याचे स्पष्ट होते. सावकार, देणेकरी तगादा लावत आहेत. मार्क्स आपल्या कुटुंबाची इभ्रत वाचवण्याच्या प्रयत्नात आहे आणि अशावेळी आर्थिक मदत करण्याऐवजी त्या वेळी त्याचा पाहुणचार झोडणारा त्याचा "मित्र" लासाले त्याला मदतीच्या बदल्यात त्याच्या मुलीला प्रशियन सरदार हात्झफेल्डला सादर करण्याचा सल्ला देतोय. लासालेच्या पाहूणचारासाठी मार्क्सच्या बायकोने असेल नसेल ते गहाण टाकले आहे हे ही तो सांगतोय. या पार्श्वभूमीवर त्याने लासालेला दिलेल्या शिव्या मार्क्सचा वर्णद्वेष म्हणून ग्राह्य धराव्या का?
संदर्भ 2. मार्क्सचे एंगल्सला पत्र, 7 ऑगस्ट 1866 याच्या उत्तरार्धात मार्क्स ट्रिमोच्या आकलनाबद्दलच्या नव्या कामाबद्दल बोलतोय. आपण घेतलेले वाक्य "he shows that the common negro type is only a degeneration of a far higher one." हे ट्रिमोचे आहे, मार्क्सचे नव्हे. मार्क्स ट्रिमोच्या त्या काळी नावीन्यपूर्ण असलेल्या पंक्चुएटेड इक्विलिब्रियमच्या इव्होल्यूशनरी थिअरीमुळे (या थिअरीला निओडार्विनियन्सनी नंतर खोडून काढले आहे) प्रभावित झाला आहे. याचा अर्थ त्याने ट्रिमोचे शिष्यत्व पत्करले असा घ्यावा काय? 1866 मध्ये ट्रिमो प्रख्यात होता ही बाब इथे महत्वाची आहे.
संदर्भ 3. The Poverty of Philosophy, Karl Marx 1847, हा प्रूदौंच्या The Philosophy of Poverty वरील क्रिटिकल थिसिस आहे. यात मार्क्स प्रूदौंने विदित केलेल्या "प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, चांगली आणि वाईट. यातली चांगली घ्यावी वाईट त्यागावी, म्हणजे सर्व समस्या सुटतील वगैरे वगैरे" तत्वज्ञानाला एक एक मुद्दा घेऊन सुरुंग लावतो आहे. आपण यात जे चौथे निरीक्षण (Fourth Observation) घेऊन मार्क्सला गुलामी मंजूर होती असे विधान करता ते निरीक्षण मुळात प्रूदौंचे तर्कट लावल्यास गुलामीचे विश्लेषण कसे होईल याबद्दलचे मार्क्सचे विश्लेषण आहे, मार्क्सचा स्वत:चा विचार नव्हे. या तर्कटाचा फोलपणा त्याच निरीक्षणात मार्क्स नोंदवतो हे नजरेआड करता कामा नये. ("By taking the economic categories thus successively, one by one, and making one the antidote to the other, M. Proudhon manages to make with this mixture of contradictions and antidotes to contradictions, two volumes of contradictions" p.50, last lines of Fourth Observation) एखाद्या सिद्धांताचे तार्किक खंडन करताना तो सिद्धान्त विरोधाभासी कसा आहे हे मार्क्स दाखवून देत असताना त्याने जो सिद्धान्त खोडायचा त्याचा वापर करून केलेले विधान म्हणजेच मार्क्सचे मत आहे असे मानणे अतिशय चुकीचे होईल. हे पूर्ण डोक्युमेंट क्रिटीक आहे, थिसिस नव्हे.
आंबेडकर  आंबेडकर  आंबेडकर 

संदर्भ 5. यात आपण म्हणता ते वृत्तपत्र न्यू राईश वगैरे नसून नोय र्हाइनिश झायटुंग आहे ज्याचा अर्थ "र्हाइनप्रदेशातील नवे वृत्तपत्र" असा आहे. या पेपरचे संपूर्ण नाव : "Neue Rheinische Zeitung: Organ der Demokratie" . तुमच्या माहितीसाठी र्हाइन ही नदी आहे. कलोन हे शहर या नदीकाठी वसले आहे जिथे कार्ल मार्क्सने हा पेपर काढला होता. हिटलरचे "राईश" म्हणजे "एंपायर" होते. मार्क्सला हिटलरशी नेऊन जोडण्याच्या खटपटीत नावांचे चुकीचे अर्थ कृपा करून काढू नका. या वृत्तपत्रातील तुम्ही संदर्भ दिलेला अग्रलेख 14 फेब्रुवारी 1849 चा आहे. आपण दिलेल्या ओळी त्या काळात त्या प्रांतात असलेल्या स्लाविक लोकांमध्ये राष्ट्रवाद शिरोधार्य मानून स्वातंत्र्य मिळवण्याचे बळ तेव्हा नाही या कटू सत्याला अधोरेखित करताना आलेल्या आहेत. या काळात बहुतांश स्लाविक प्रदेश ऑस्ट्रिया+हंगेरी, तुर्कस्तान, जर्मनी, पोलंड आणि रशिया असाच पारतंत्र्यात होता. तेव्हाच्या स्लाव लोकांच्या स्थितीवर हा अग्रलेख नेमके बोट ठेवतो. फुटीर राष्ट्रवाद्यांच्या नादी लागू नका अथवा मोठी राष्ट्रे चिरडून टाकतील अशी समज देऊ इच्छितो तर यात स्लाव वंशाचा द्वेष कुठून आला?
------------------------------------------------------------------------------------------------------

मार्क्स, मार्क्सवाद आणि 'प्रबुद्ध' टीकाकार


अभिराम दिक्षित यांनी मार्क्सच्या काळाचे ऐतिहासिक संदर्भ सोडून, त्याच्या लिखाणातील हवे ते बाजूला करून, त्याचे वंश विरोधी लढ्यातील योगदान दुर्लक्षून, त्याला 'वंशवादी' आणि 'जातीयवादी' धडपड केली आहे. त्यासाठी ह्या पश्चिम-विरोधी माणसाने पश्चिमेकडील पुस्तके संदर्भ म्हणून वापरली आहेत. वैचारिक भूमिका पराभूत झाल्यानंतर जे काही करावयाचे असते ते सर्व त्यांनी सुरु केले आहे. सामरिक युद्धात शत्रूच्या कमकुवत स्थळांवर आणि वैचारिक युद्धात शत्रूच्या शक्तीस्थळांवर हल्ले करावयाचे असतात, हे सामरिक तत्व विसरून "मार्क्सवादा"वर हल्ला न चढवता त्यांनी "मार्क्स"वर हल्ला चढवला आहे. त्यांच्या मांडलेल्या मतांचे खंडन करण्यासाठी हे मालिका. ह्यात काही राहिले असेल, सुटले असेल तर माझ्या मार्क्सवादी मित्रांनी, मार्क्सचा विचार निदान पुरोगामी आहे असे मानणार्यांनी भर घालावी हि विनंती करून सुरुवात करत आहे. एका वेळी एका मुद्द्यावर मत मांडून हि मालिका पुढे सरकवण्याचा प्रयत्न रहिल.
भाग एक -
अभिराम दिक्षित यांनी "मार्क्स मत : हीन वंशाचे काळे कृष्णवर्णीय" ह्या उप-शीर्षकाखाली ट्रीमोबद्द्ल मार्क्सला विलक्षण आत्मीयता असल्याचे भासवले आहे. यातील सत्य काय आहे हे तपासण्यासाठी ट्रीमोबद्दल मार्क्स काय म्हणत आहे हे सर्व प्रथम बघुयात. हे पत्र मार्क्सने एंगल्सला ७, ऑगस्ट १८६६ रोजी लिहिलेले आहे. त्यात मार्क्स लिहितो -
“त्याचे (ट्रीमोचे) ऐतिहासिक आणि राजकीय उपयोग डार्विनच्या तुलनेत जास्तच महत्वाचे आणि गर्भार्थ असलेले आहेत. काही विशिष्ट प्रश्नांवर, उदाहरणार्थ राष्ट्रीयतेच्या प्रश्नावर, वगैरे, केवळ ह्यात  निसर्गातील त्याचे मूळ मिळते. उदाहरणार्थ, तो पोल डूचीन्ग्स्की प्रमाणे रशिया आणि पाश्चिमात्य स्लाव प्रदेशा मधील भूगर्भशास्त्रीय फरक रशियन्स स्लाव नसून तार्तार्स आहेत वगैरे म्हणून सांगत नाही, तर तो हे म्हणतो की रशियामध्ये अस्तित्वात असलेल्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे स्लाव तार्तारीकरण आणि मंगोलीकरण झाले आहे; त्याच प्रमाणे (त्याने मोठा कालावधी आफ्रिकेमध्ये घालवला आहे) त्याने दाखवले आहे की सामान्य निग्रो जमात ही उच्च वंशाचा दर्जा घसरून तयार झालेली जात आहे.”
संदर्भ: https://marxists.anu.edu.au/archive/marx/works/1866/letters/66_08_07.htmतुम्ही म्हणता तशी कुठली स्तुतिसुमने मार्क्सने ट्रीमो वर उधळलेली दिसत आहेत? उलट मार्क्स एकंदरीत अविर्भाव हा नवशिक्या विद्यार्थ्याचा आहे. इथे मार्क्स एंगल्सला त्याने जे काही नवीन वाचले आहे त्याबद्दल आणि त्याचे राजकीय आणि ऐतिहासिक उपयोजन काय होऊ शकते ह्याबद्दलचे अन्वयार्थ, गर्भार्थ पुरेसे उदाहरण देऊन मांडत आहे. त्याचा अर्थ कुठेही हा होत नाही कि मार्क्स ट्रीमोचे विचार उचलून धरत आहे. मार्क्स केवळ ट्रीमोच्या विश्लेषणामधील भौतिकवादी दृष्टीकोण अधोरेखित करत आहे, जो 'पोल डूचीन्स्की'च्या मनोगतवादी दृष्टीकोनाच्या तुलनेत मार्क्स हे बोलत आहे, हे नमूद करण्यासारखे आहे.
आता हा सबंध उतारा तुम्ही कसा प्रोजेक्ट केलाय ते बघुयात :

"मार्क्सचा वर्गलढा आणि समता गोर्या राष्ट्रातील गोर्या लोकांसाठी आहे . इतर राष्ट्रांना मार्क्स वाद लागू  असला  तरी शुद्ध वंश , हीन दर्जाचे वंश , मारून टाकण्याच्या लायकीचे वंश , गुलाम व्हायच्या लायकीचे वंश या तत्कालीन संकल्पना  मार्क्सच्या डोक्यात फ़िट्ट आहेत . ट्रीमोअ या वंशवादि शास्त्रज्ञा वर स्तुतिसुमने उधळत मार्क्स ने खालील मत व्यक्त केले आहे"
" ट्रीमो चे संशोधन डार्विन पेक्षा अधिक योग्य आहे . त्याच्या विचाराचे ऐतिहासिक आणि राजकीय उपयोजन  महत्वाचे आणि   अधिक फलदायी ठरते …. ट्रिमो ने दाखवून दिले आहे कि काळ्यांचा निग्रो वंश हा  उत्क्रांतीत हीन दर्जाला घसरलेला वंश होय . "बघा, तुमच्या लिखाणामध्ये मनोगतवाद (Subjectivism) किती ठासून भरला आहे. तुम्ही ह्यावरून कसा काय निष्कर्ष काढला कि मार्क्सचा वर्ग लढा आणि समता गोऱ्या राष्ट्रांतील गोर्यांसाठी आहे म्हणून? आणि शुद्ध वंश , हीन दर्जाचे वंश , मारून टाकण्याच्या लायकीचे वंश , गुलाम व्हायच्या लायकीचे वंश या तत्कालीन संकल्पना  मार्क्सच्या डोक्यात फ़िट्ट आहेत, वगैरे वगैरे? आणि हो, वरील उतारा हा पुरावा आहे कि तुम्ही उताऱ्यामधील हवा तो भाग कसा सोयीस्कर उचलला आहे, तुमचे पूर्वग्रह वाचकांवर लादण्यासाठी!
आता मार्क्स व एंगल्स 'निग्गर' (आफ्रिकन अमेरिकन म्हणणे जास्त योग्य) लोकांबद्दल काय म्हणत आहे ते बघुयात.

1. “उत्तोरोत्तर जोहन्सन यांचे धोरण मला सुद्धा पटेनासे झाले आहे. निग्गर-द्वेष अधिकाधिक हिंसक होत चाललेला असताना, जोहन्सन त्यांचे अधिकार दक्षिनेमधील जुन्या जमीनदारांच्या चरणी बहाल करत आहेत. जर हे असेच चालू राहिले तर सगळे जुने फुटीरतावादी हरामखोर येत्या ६ महिन्यात वॉशिंगटन मधील कॉंग्रेस मध्ये दाखल होतील. काळ्या लोकांना मताधिकार दिल्याशिवाय काहीही साध्य होऊ शकणार नाही, आणि अश्या वेळी जोहन्सन हा निर्णय पराभूत, भूतपूर्व गुलामांच्या मालकांच्या हातात सोपवत आहेत.”
संदर्भ: https://marxists.anu.edu.au/archive/marx/works/1865/letters/65_07_15.htm
2. “अमेरिकन गृह-युद्धावरच्या तुझ्या मताशी मी सहमत नाही, सगळं आलबेल आहे ह्यवर माझा विश्वास नाहीये. अगदी सुरुवातीपासूनच, उत्तरेकडील सैन्यामध्ये सीमेवरील गुलामांवर राज्य करणाऱ्या राज्याच्या प्रतीनिधींचे प्राबल्य होते, जे ब्रेकीनरिजचा कट्टर समर्थक माक्क्लेलन ला उत्तरेस ढकलण्यास कारणीभूत होते. त्या उलट दक्षिणेकडील सैन्य अगदी सुरुवाती पासूनच एकसंध राहिले होते. उत्तरेकडील सैन्यात अस्तित्वात असलेल्या गुलामगिरीनेच दक्षिण समर्थक शक्तीचे रूप धारण केले. दक्षिणेकडील सैन्य उत्पादक श्रम गुलामांकडून करून घेत होते आणि म्हणूनच रणांगणावर एकसंध राहू शकले. त्यांच्या कडे एकसंध सैनिकी नेतृत्व होते; जे उत्तरेकडे नव्हते. ……. माझ्या मते, हे सगळं बदलेल. शेवटी उत्तरेकडील सैन्य पुरेश्या गांभीर्याने, आणि क्रांतिकारी (युद्धपद्धतींचा) आधार घेऊन युद्ध छेडतील आणि त्यांच्यावरील सीमा भागातील गुलामांवर राज्य करणाऱ्यांचे प्रभुत्व झुगारून लावतील. एक, केवळ एक 'निग्गर' पलटण दक्षिणेच्या सैन्यावर उल्लेखनीय दडपण आणू शकेल”.
संदर्भ: https://marxists.anu.edu.au/archive/marx/works/1865/letters/65_07_15.htm
अशी इतरही बरीच उदाहरणे देत येतील.
आता मार्क्स दासप्रथेबद्दल काय म्हणत आहे ते बघुयात.
1. “सध्या चालू असलेला दक्षिण आणि उत्तरेमधील संघर्ष हा दुसरे तिसरे काहीही नसून दोन व्यवस्थांमधील संघर्ष आहे, एकीकडे आहे गुलामगिरीची व्यवस्था आणि दुसरीकडे आहे मुक्त श्रमाची व्यवस्था. हा संघर्ष भडकला कारण ह्या दोन व्यवस्था आता उत्तर अमेरिकेमध्ये एकत्र नांदू शकत नाहीत. आणि हा संघर्ष कुठल्या तरी एका व्यवस्थेच्या विजयाबरोबरच थांबू शकतो."
संदर्भ: https://marxists.anu.edu.au/archive/marx/works/1861/11/07.htm
2. “ज्या दिवशी दासप्रथा की (अमेरिकेचे) एकीकरण ह्याचा निर्णय होईल त्याच दिवशी दासप्रथेला मृत्युदंड द्यावा लागेल. उत्तरेला (गुलामांच्या) मुक्तीशिवाय विजय मिळवणे शक्य नाही."
संदर्भ: https://marxists.anu.edu.au/archive/marx/works/1861/11/07.htm
3. "दास प्रथा अस्तित्वात असे पर्यंत उत्तर अमेरिकी संघराज्यातील प्रत्येक स्वतंत्र कामगार चळवळ पंगु होती"
संदर्भ: Marx, Capital, Vol. I, p. 414.
ह्या वाक्यांमधून हे सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ आहे की, इथे मार्क्स काळ्या लोकांना न्यूनतम मोबदला मिळणाऱ्या घटकांमध्ये गृहीत धरले जाण्याच्या विरोधात आहे. अमेरिकेत जर वर्गीय क्रांतीची पायाभरणी करायची असेल तर गोऱ्या (कामगारांना) काळ्यांच्या मुक्तीचा लढा लढवाच लागेल आणि  वांशिक आधारावर लढण्या ऐवजी दास प्रथा संपवून एका समान, सर्वसमावेशक कष्टकरी वर्गाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावा लागेल, हे त्याला अपेक्षित होते. अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे अमेरिकन गृह युद्धात मार्क्सने उत्तरेला दिलेला सशर्त पाठींबा. त्याचा हा पाठींबा दास्यप्रथेच्या मुक्ती संदर्भात आहे, हे सहजच लक्षात येते.
ह्या पश्चातही कोणी मार्क्सला "मार्क्सचा वर्गलढा आणि समता गोऱ्या राष्ट्रातील गोऱ्या लोकांसाठी आहे" म्हणून निकालात काढत असेल तर त्याच्या अकलेचे धिंडवडे निघाले आहेत असेच म्हणावे लागेल. पण केवळ अकलेचे धिंडवडे निघाले म्हणून गप्प बसतील तर ते आंधळे मार्क्स-विरोधक कशे ठरतील?
(क्रमशः)

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *