२२ सप्टें, २०१२

सैतानाचे वरदान



 मनमोहन सरकारने रिटेल बाजारात विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे. त्याविरुद्ध कम्युनिस्ट, मंदिरनिष्ठ; वंगव्यस्त, आणी द्रविड्स्त मंडळींनी अनुक्रमे क्रांती, धर्मयुद्ध,  थयथयाट  आणी तांडव सुरू केलेला आहे. राजकारणातल्या अवघड प्रश्नांना हातच घालायचा नाही. वास्तव समजूनच घ्यायचे नाही. महागाई, महागाई च्या भंपक बांगा ठोकत स्वस्त प्रसिद्धीची पायवाट वारंवार तुडवण्याचे कारण काय ?

आज शेतीमालाचे मार्केट कसे आहे ? शेतकरी माल पिकवतो. ट्रक ट्रान्सपोर्ट वाले तो माल -  कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृ उ बा स) आणून टाकतात. कृ उ बा स शिवाय शेतकरी कोणालाही माल विकू शकत नाही. मोनोपली आहे. मराष्ट्रात  झाडून सगळ्या कृ उ बा स राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याला अशी समिती आहे. ही समिती निवडतो कोण ? तर मार्केट मधले व्यापारी. इथे लायसन्स राज आहे. नव्या व्यापार्यांना ह्या उद्योगात यायचे असेल तर कृ उ बा स (कृषी उत्पन्न बाजार समिती) चा परवाना लागतो. आतले व्यापारीच ही समिती निवडत असल्याने त्यांच्या बगलबच्च्यांशिवाय कुणालाही लायसन्स मिळत नाही. सरकारचे ह्यावर नियंत्रण असते.. अतिशय सभ्य भाषेत कृ उ बा स  चे वर्णन -  सरंजामशाहीचे हलकट अपत्य - असे मी करेन. अनेक कृ उ बा स वर सरकारी प्रशासक आहेत. वर्षानुवर्षे निवडणुका झालेल्या नाहीत. उरलेल्या  कृ उ बा स मधे नकली लोकशाहीचा ढोंगी तमाशा चालतो. उमेदवार आणी विजेते फिक्स असतात. मार्केट यार्डात पिढिजात दुकानांचे गाळे राखणार्यां - मोजक्या कुटुंबांचे अनिर्बंध साम्राज्य कृ उ बा स वर असते. हे पिढिजात सरंजामी मालक शेतकर्याला हवे तसे पिळतात. शेतमालाचा भाव कसा ठरतो ? याच्या काही पारंपारिक पद्धती आहेत.

हत्ता पद्धत ही सर्वात किळसवाणी पद्धत. दलाल  भाव ठरवताना एकमेकांच्या समोर बसून एकमेकाचे हात हातात घेतात, हातांवर मोठा हातरुमाल टाकतात आणि काही न बोलता एकमेकांची बोटे धरतात. त्या बोटधरणीतून मालाचे भाव ठरतात. त्या बोटधरणीतून एकमेकांना भाव पटला तर सौदा होतो, नाहीतर सौदा बिघडतो. इतरांना काय झालेय ते काही कळत नाही.या हाताच्या बोटधरणीतून होणार्‍या सौद्यास म्हणतात हत्ता. हस्त - हात - हत्ता.  गुप्त लिलाव. हत्ता पद्धत ही दलालांचे पोट भरण्याची आणि शेतकर्‍यांना लुटण्याची गुप्त लिलाव पद्धती. अशा अनेक पारंपारिक गुप्त लिलाव पद्धती आहेत. १०० मधून चालू रेट वजा करून गुप्त भाषेत बोलणे वगैरे. मुंबईच्या मार्केट यार्डात ( कृ उ बा स ) हत्ता पद्धती सर्रास वापरतात. इतर अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या गुप्त पद्धती चालतात. बेकायदेशीरपणे चालतात.  पुण्यासारख्या शहरात रेट फोडले जातात. पण भाव किती असावा ? हे  मर्केट यार्ड मधले सरंजामदारच ठरवतात. शेतकरी भावासाठी आंदोलन करतात तेंव्हा हमीभावाची भीक सरकारकडून तोंडावर मारली जाते.

हा हमीभाव काय आहे ?  शेतमालाची किमान किंमत म्हणजे हमीभाव. ही सरकार जाहिर करते.अनेकदा ही तूट करदात्यांच्या पैशातून भरली जाते. कृ उ बा स मधल्या व्यापार्‍यांना त्याची झळ बसत नाही. शेतकर्‍याना सबसिड्या मिळतात हमीभाव मिळतो वगैरे वगैरे शहरी मध्यवर्गियांना माहित असते. भारतातला खूप मोठा वर्ग शेतीवर अवलंबून आहे. पण खरे पाहता शेतीला निगेटिव्ह सबसिडी आहे. हे संतापजनक आहे. कोका कोला आणी बिसलेरी किती रुपयाला विकावी यावर सरकारी बंधन नाही. कारण ह्या वस्तू जिवनावश्यक गरजेच्या नाहीत. गहू, तांदूळ, भाज्या ह्या वस्तू जिवनावश्यक. मग ह्याचा दर सरकार ठरवते. कसा ? तर साखर महागली की साखर आयात करते. मागणी पुरवठा नात्याने भाव पडतात.म्हणजे बहुसंख्य शेतमालाची कमाल किंमतही सरकार ठरवते.  जेंव्हा भाव चढतात तेंव्हा तोटा शेतकर्याचा होतो. जेंव्हा भाव पडतात तेंव्हाही तोटा शेतकर्‍याचा होतो. हत्ता सारख्या गुप्त पद्धती,    कृ उ बा स वर मोजक्या कुटुंबांचे अनिर्बंध साम्राज्य, नकली निवडणुका,  घोषित / कुठे अघोषित मक्तेदारी - मोनोपली. तोटा शेतकर्‍याचा होतो.


त्या शेतकर्‍याकडून त्याच्या घरी जाउन माल उचलणार्‍या वेगवेगळ्या कंपन्या आल्या तर? बाजारात स्पर्धा निर्माण होईल-  भाव चढतील. मुख्य म्हणजे बाजार खुला होईल. पारदर्शकता यील. भ्रष्ट आणी गुप्त मक्तेदारीला आळा बसेल. बाजारात व्यावसायीकता यील.  शेतकर्‍याला फायदा होईल.




हजारो शेतकर्यांच्या आत्महत्या घडून गेलेल्या आहेत. कर्जामुळे . का बरे ? शेतीवर अतिशय कमी फायदा मिळतो. किंवा तोटा होतो. शेतकर्‍याचा फायदा कसा वाढवता यील? एकतर शेतमलाचे वेस्टेज थांबवता येईल. लाखो किलो गहू सडून गेल्याच्या बातम्या आपण वाचतो आणी हळहळतो. का सडतो गहू ? का सडतात आणी फुकट जातात भाज्या ? शीतग्रुहे कुठे आहेत ? उत्तम प्रतीचा ट्रान्सपोर्ट कुठे आहे.? चांगली गोदामे कुठे आहेत ?  हे सर्व उभे करण्यासाठी जे प्रचंड भांडवल लागते ते कुठे आहे ? आता पररदेशी कंपन्यांचे महाप्रचंड भांडवल गुंतणार आहे ते शेतकर्‍याच्या हिताचे आहे. एव्हढी साधी गोष्ट समजण्यासाठी अर्थतज्ञ असण्याची गरज नाही.


कृ उ बा स आज मूठभर दलालांच्या हातात आहे. ग्राहकाला किती दराने माल विकायचा ? हेही मुठभर लोकच ठरवतात. खरेदी आणी विक्रीत किती फरक असावा ? दलालाने किती कमवावे? हे लोकशाहीत सरकार ठरवू शकत नाही. मग हमिभाव आणी आयात निर्यात धोरणातून सरकार जिवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित करते. हे बसते शेतकर्‍याच्या बोकांडी. दलालांना कायदा नाही; नफ्याची मर्यादा नाही; आणी सर्वात महत्वाचे म्हणजे स्पर्धा नाही.      कृ उ बा स वर मोजक्या लोकांचेच नियंत्रण राहते. नव्या लोकांना त्यात प्रवेशच  नाही. अडत्यांचे - दलालांचे राज्य आहे.

आज कोका कोला आणी पेप्सीच्या किमती फार चढताना दिसत नाहीत. कारण मार्केट मधे टिकण्यासाठी या दोघांना स्पर्धा करावी लागते. किमती कमी ठेवाव्या लागतात. हे स्पर्धेचे तत्व शेतमालाला लागू होईल तेंव्हा त्याचा फायदा ग्राहकांना होईल. फायदा शहरी मध्यमवर्गियांना ही होईल. शेतकरी संघटनेने एफ डी आय चे स्वागत केलेले आहे.


विरोधकांचे काय चालले आहे ?

वंगव्यस्त अक्रस्ताळी ममतादीदी ची - मा, मिट्टी आणी मानुष -  ही घोषणा -  बंगाली माणुशचे राजकारण, बंगालची मिट्टी आणी दुर्गा मा. एव्हढीच मर्यादित आहे. दीदीला कोणताही राष्ट्रीय अजेंडा नाही. आर्थिक अजेंडा नाही. बंगालच्या स्थानिक निवडणुकांसाठी ह्याला पाड त्याला गाडचे राष्ट्रीय (?) राजकारण चालू आहे. दिखाउपणा. नाटकी भाषणे आणी अनभ्यस्त भावनीक राजाकारण यावर दीदींची ममता आहे. द्रमुक चे ही तसेच.

 मार्क्सबाबाचे धर्मांध अनुयायी मेनिफेस्टोच्या कॅपिटलात जे नसेल - ते सर्व काफिर मानणार हे उघड आहे. "भारत देश हा खरे राष्ट्रच न्हवे. त्याचे कैक तुकडे पडल्याशिवाय गरिबांचे शोषण थांबणार नाही." असे कम्युनिस्टांचे म्हणणे जाहीर आहे. त्यांना झालेला अमेरिकाफोबिया नावाचा मानसिक आजार आधिच डयग्नोस झालेला आहे. कम्युनिस्टांच्या  मागे भाजपाने लागावे हीच खरी धमाल आहे. ज्या कम्युनिस्टाना लाल  माकडे म्हणून आजपर्यंत शाखा शाखात हिणवले - त्यांचीच वैचारिक शेपूट का धरताय ?   गणपतीच्या वर्गणीपलिकडे सेना मनसेला अर्थकारणातले गम्य नाही. भाजपेयींना तर सव्वा रुपये दक्षिणेची परंपरागत सवय मोडवत नाहीसे दिसते. कम्यनिस्टांच्या विरुद्ध  भूमिका घेणे म्हणजे राष्ट्रवाद. अशी नवी हिंदुत्वाची व्याख्या त्यांना शिकावी लागेल असेही वाटते. नाहितर भट्टीतल्या अणूपासून शेतमातीच्या ब्रम्हांडापर्यंत. कम्युनिस्टांच्या लाल मारुतीपुढे  - भीमरूपी महारुद्रा म्हणणारा पक्ष  - अशी कायमची हिंदू ओळख मिळेल.


बरे रिटेल क्षेत्रात परदेशी कंपन्या आल्या तर देशातला पैसा बाहेर जाईल हो.. अशी देशभक्तीची करूण  किंकाळीही ऐकू येते आहे. पैसा म्हणजे काय वाटलं तुम्हाला ? नोटा ? का सोनं ? तसे असते तर सरकारी टाकसाळीत भरपूर नोटा छापाव्या आणी गरिबांना त्या मोफत वाटाव्यात. गरिबी हटाव चा  रामबाण उपाय. नाही का ? पूर्वी युरोपातल्या एका देशाला आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींचा शोध लागला. भरपूर सोन आणल खणून. तेंव्हा सोन्याच्या मोहोरा प्रचारात होत्या. पाडली नाणी. बाजारात भरपूर सोन्याची नाणी आली. त्यामुळे सोन्याची किंमत कमी झाली अन वाढत्या चलनफुगवट्याने  - महागाईने देश बुडाला. रशियाच्या बाबतीत एक जोक सांगितला जातो. सोव्हीएत रशियाच्या पडत्या काळात एक बाई ब्रेड आणायला गेली होती.चलनफुगवटा - महागाई प्रचंड. तिच्याजवळ टोपलीभर रुबल होते.ब्रेड खरेदीसाठी तेव्हडे आवश्यक होते.  वाटेत चोराने टोपली पळवली. पण आतले रूबल फेकून दिले. कारण टोपलीची किंमत कितीतरी पटीने जास्त होती.


पैसा म्हणजे उत्पादनक्षमता. त्या देशातली अर्थव्यवस्था, पायाभूत सोयी. आर्थिक व्यवहारांची संख्या. जनतेचा काम करण्यातला उत्साह. उत्पादन क्षमता म्हणजे पैसा. नोटेतून तो फक्त व्यक्त होतो. नोट म्हणजे पैसा न्हवे. नवे भांडवल नवे तंत्रज्ञान देशात आले तर उत्पादन क्षमता वाढेल का कमी होईल ? स्पर्धा आली तर आपली उत्पादन क्षमता वाढेल का कमी होईल ?

इतर अनेक क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे.  आयटी मधे परदेशी गुंतवणुक आहे. १०० % पर्यंत परवानगी आहे.  त्या क्षेत्रात देशी उद्योग झोपले का ? देशातला पैसा बाहेर गेला का ? नव्या उभारीने भारतीय उद्योग परदेशी कंपन्यांशी स्पर्धा करते झाले. नवे तंत्रज्ञान आपण शिकलो. आपली उत्पादन क्षमता वाढली. पैसा वाढला.


मूल्यवर्धन हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. स्पर्धेशिवाय क्वालिटी कशी सुधारेल. वर्षानुवर्ष तेच दलाल - तोच बाजार - तोच शेतकरी. बदल शून्य. स्पर्धा शून्य. परिवर्तन हाच प्रक्रुतीचा नियम आहे. कायदा पाळा गतीचा . काळ मागे लागला. थांबला तो संपला.ईर्षा , स्पर्धा आणी मुक्त बाजारपेठ हा नव्या जगाचा मंत्र आहे. तो न म्हणणारे डब्यात जाणार आहेत.

भारत देश हजारो वर्षे परकीयांच्या गुलामीत पिचला आहे. जातीव्यवस्थेमूळे अशक्त, भ्याड आणी अनुत्पादक झालेला हिंदू समाज हे त्याचे एक प्रमूख कारण आहे. सावरकरांनीही जातीभेदाच्या सात स्वदेशी बेड्या तोडा असे म्हटले आहे. जातीभेद केवळ मानीव आणी पुस्तकी (ग्रंथप्रामाण्य) आहेत असे ही सावरकर म्हणतात. वस्तुस्थिती काय आहे ? जातीव्यस्था ही एक उत्पादन व्यवस्था आहे. लोहाराची, सुताराची, कुणब्याची, अन दलालाची कामेही वंशपरंपरा चालत येतात. त्यात स्पर्धेला वाव नसतो. लोहाराच्या घरात उत्तम दलाल जन्मला तर ? याच्या उलटे झाले तर ? व्यक्तीची उत्पादन क्षमता ही व्यवस्था ठेचून टाकते. निकोप स्पर्धेला वाव देत नाही. त्याला भणंग तत्वज्ञानाचा मुलामा देत तोंड वर करत म्हणते - पहा पहा, आमच्या महान संस्क्रुतीत स्पर्धा नाही ! ईर्षा (साहस) नाही. सहकार्य आहे. कसल डोंबलाच सहकार्य ?

शिवाजी महाराजांना भवानीने तलवार दिली न्हवती. ती त्यानी पोर्तुगाल वरून मागवली होती. स्वदेशाचे स्वातंत्र्य म्हणून आले. स्वदेशीच्या भक्तांना एव्हढेही समजू नये ?
















भारतातली शेती पावसावर अवलंबून आहे. दुष्काळाचे अस्मानी संकट शेतकऱ्याच्या डोक्यावर असतेच. ज्येष्ठ विचारवंत अमर हबीब म्हणतात बंद बाजारपेठेचे सुलतानी संकट त्याहून मोठे आहे.  सुलतानी संकटापासून कोण वाचवेल?





साहस, स्पर्धा, मुक्त - पारदर्शक - भ्रष्टाचारमुक्त - खुली बाजरपेठ हे भारतदेशासाठी वरदान आहे.



स्वतःची कोळश्याहून काळी पापे झाकण्यासाठी ते काँग्रेसने दिले. म्हणून वरदान आपण नाकारणार आहोत काय ?

११ सप्टें, २०१२

रामदासाचा मूर्ख


सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ।। असे एक समर्थवचन आहे. बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना ; रामदास स्वामिंच्या वेळी महाराष्ट्रात बटाटा न्हवताच; तो युरोपियनांनी मागाहून आणला हे जसे माहित नसते तसेच - ह्या समर्थवचनाचा अर्थ (संस्कृती रक्षक) धर्मप्रेमी कसा लावतात? हे मला देखील माहित नाही. मी मात्र माझ्या परीने ह्या ओळीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. पूर्वजांची कीर्ती सांगणारा माणूस मूर्ख म्हटला पाहिजे असा त्याचा अर्थ. पुरा श्लोक असा आहे -


आपली आपण करी स्तुती| स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ||१२||


" क्ष " नावाचं येडं स्वतः संकटात आहे तरी स्वतःच स्वतःची स्तुती करतो आहे. वडलांची कीर्ती सांगतो आहे तो क्ष मूर्ख म्ह्टला पाहिजे. मूर्खलक्षणात हे येते. हे मूर्खलक्षण त्रिकालाबाधित असल्याने क्ष च्या बापाला, त्याच्या आज्याला आणि पणज्यालाही लागू होते. म्हणजे पूर्वजांची कीर्ती सांगत बसू नये - स्वतःच्या हाताने काहितरी करून दाखवावे असा ह्या श्लोकाचा अर्थ घेता यील. रामदास प्रयत्नवादी असल्याने त्यांनी स्वतःच्या हाताने काहितरी करण्यावर भर द्यावा हे ठीकच. पण बापजाद्यांचा उदोउदो करत सुद्धा प्रयत्नवादी रहाता यीलच की ! खरी गोम इथेच आहे.

किंबहूना बापजाद्यांचा उदोउदो करण्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत असेही बहुत समर्थभक्त वदतील. पण असे केल्याने संकटाचा नायनाट, विपत्तीचे हरण होत नाही हा मुद्दा आहे. मानवांचे पूर्वज माकड होते हे शास्त्रीय सत्य आहे. त्यानंतर आपल्या रानटी पूर्वजांची निर्मिती झाली. आजच्या मानवजातीचे पूर्वज रानटी होते. हा मुद्दा आहे.






गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर मनुष्याची झालेली प्रगतीच दिसून येते. हाच नियम गेल्या दहा शंभर आणी हजार वर्षालाही लागू पडतो. मनुष्य आपल्या ज्ञानाचा संग्रह करतो आणि तो पुढच्या पिढीला देतो. हे ज्ञान पाठांतरित, मुद्रित किंवा किंवा कशाही स्वरूपात पुढच्या पिढीला देता येते. त्यामुळे आज्यापेक्षा नातवाकडे जास्त ज्ञान असते. नातू जेंव्हा आजा होतो तेंव्हा त्यालाही हा नियम लागू होतो.
हा नियम खुद्द समर्थ रामदास स्वामींनाही लागू होतो. त्यांना वंशपरंपरेने जे ज्ञान मिळाले होते त्यात त्यानी दासबोध रचून भरच टाकली असे म्हणावे लागते. आणी त्यानंतरच्या पिढ्यांनी समर्थांचाच कित्ता गिरवत त्यात अधिकाधिक भर टाकली हे ओघानेच येते. बटाट्याच्या किसाचा उल्लेख म्हणुनच केला. बटाटा हे अन्न युरोपियनांनी भारतात आणले. त्या आधी ते भारतात न्हवते त्यामुळे ते उपवासासाठी धर्म्य असण्याचा प्रश्नच न्हवता. धर्म आणी संस्क्रुती काळबरोबर बदलत जातात. बदलले पाहिजे  आणी मग समर्थशिष्य कल्याण आणि उद्धवाच्या नशिबात नसलेली चमचमीत साबुदाण्याची खिचडी मला खायला मिळते. साबुदाणा ही पोर्तुगीजांनी आणलेली गोष्ट आहे हे ही लक्षात ठेवावे लागेल.

http://en.wikipedia.org/wiki/Tapioca



हल्लीची पिढी एकदम चुकार म्हणत बोटे मोडणे सोपे आहे - पण पूर्वीच्या पिढीतहि असेच म्ह्टले जायचे हे एकदम सत्य आहे . खरी गोष्ट अशी आहे की - बापाचे ऐकायचे असे आपण ठरवले असते तर आपण आजही गुहेत राहत असतो. जी गोष्ट विज्ञान आणी तंत्रज्ञानाबाबत खरी आहे. तीच गोष्ट नीती आणि सदाचाराबाबतही खरी आहे. हिंदुधर्म जर परिपूर्ण असता - तर दासबोध लिहिण्याची गरज काय होती ? जुन्याच एखाद्या ग्रंथाच्या प्रती समर्थानी काढल्या असत्या तर चालले असते की. कष्ट करोनी घसरावे म्लेंच्छावरी असे आधी कुणी म्हटले न्हवते. रामदासाने ते म्हटले. त्यात आपण पूर्वजांचा अपमान करत आहोत असे त्यांना वाटले नाही. नवनिर्मीती हा निसर्गनियम आहे. रामदासांचे  मला पटत नाही. माझे जातिव्यवस्थेबद्दलचे विचार वेगळे आहेत असे म्हणणे हा रामदासाचा अपमान नाही. कलियुग होउन गेले आहे आणि सत्ययुग आता आणायचे आहे .








समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत. लहान मुल जन्मते, रांगते, उभे राहते, चालते, धावते त्याची प्रगती होते हा निसर्गनीयम आहे. त्याचप्रमाणे पुढच्या पिढीकडे आपण ज्ञान संक्रमित करत जातो आणी पुढ्च्या पिढ्यांची प्रगती होते हाही निसर्गनियम आहे. ह्या नियमातून रामदासाची सुटका नाही. परशुरामाची सुटका नाही;मुह्हम्मद, तुकाराम, बुद्ध आणी आंबेडकरांचीही सुटका नाही.


हे जेव्हढ्या लवकर कळेल तितके उत्तम !

आपणासी जे ठावे | ते इतरांसी सांगावे |
शहाणे करूण सोङावे अवघेजण - रामदास



  - डॉ. अभिराम दीक्षित, पुणे

८ सप्टें, २०१२

शार्दूलविक्रीडित



शार्दूलविक्रीडित



(शार्दूल म्हणजे सिंह. शार्दूलविक्रीडित म्हणजे सिंहाचा खेळ. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १९ अक्षरे आणी म स ज त त ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्‍हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे.त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. शार्दूलविक्रीडित वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -आम्ही कोण म्हणून काय पुसता ? ही कविता होय. ही चाल लग्नातल्या मंगलाष्टकालाही चालते
हा वृत्तबद्ध कविता करण्याचा ९५% जमलेला प्रयत्न आहे !)



कवितेचे नाव : शार्दूलविक्रीडित
वृत्त : शार्दूलविक्रीडित
कवितेचा विषय :शार्दूलविक्रीडित. ..सिंहाचा खेळ.


धाडसाचे वारे वाहत होते. वृद्ध झाडे जोर जोरात हलत होती. ठिणग्या उडत होत्या ... वणवा पेटणार होता.. अशाच एका ठिणगीकडे सिंहाच्या एका छाव्याची नजर गेली. आणी मग ......



वारे वाहत धाडसी धडधडे ; कल्लोळ ज्वालाग्रही
झाडे घासत ही परस्पर उडे ; तो जाळ भूमीवरी
सिंहाचा सुकुमार पुत्र अवघा ; झेपावला त्यावरी
खेळाया गवसे पहाच भलते ; शार्दूल क्रीडा करी. ॥


1 lion.jpg



छावा त्या विस्तवास खेळ समजी ; जाळात घेई उडी
दाहाची न मला क्षिती उब हवी ; गर्जोन ऐसे कथी
छातीशी कवटाळुनी हृदय ते ; उन्माद ज्वाला पिते
आगीचे अवघे शरीर बनते ; खेळे नसातून ती ॥

अंगारा सम नेत्र जाळच नखे ; हा पोत पंजा बने
जीभेची जणू हो मशाल जळती ; भाषाच ज्वालामुखे
वाटे तो नर स्वाभिमान जळता ; आगीस वाटे जनी
ज्वाला चित्त बने शरीर जळते ; आत्माच यज्ञाहुती ॥

पेटोनी हर चंदनी तरू उठे ; त्यांचा सुवासी हवी
त्या रानात घुमे पवित्र बनले ; युद्धात गेले बळी
ऐसा हा वणवा जळे धडधडा ; ज्वालाहुती पेटल्या
ज्वाला सिंह पळे धडाड वनी हो ; शार्दूल क्रीडा पहा ॥



2lion.jpg



ही शार्दूल मशाल जाळ जळती ; धावे वनी वाटण्या
आत्म्यातील जहाल तेज दिधण्या ; रानातल्या बांधवा
साक्षात्कार ज्वलंततेच मधला ; सर्वांस दर्शावण्या
आत्मा ना बनतो ज्वलंत कधिही ; दाहास घेण्याविना ॥

चीं चित्कार उठे नभात - गगनी ; ती माकडे भ्याडशी
सैरावैर पळा पळाच जनहो ; शार्दूल ज्वाला वनी
भ्यालेली हरणी पळेच घुबडे ; डोळे मिटोनी खरी
धावोनी वटवाघुळांसह वनी ; ती शोधती बोळकी ॥

सिंहाचे हृदयी स्वगर्व वसतो ; शार्दूल ज्वाला जशी
शार्दूलासम पाहिजे हृदयही स्वीकारण्या आग ती
ज्वालासिंह विचार आग जळती; भ्यांडास भीती तिची
जाळोनि स्वशरीर काय घुबडे ; घालीत अत्माहुती ?

शार्दूला सम धैर्य ना वसतसे : प्राण्यांतही जाणत्या
दोषी का म्हणता गरीब घुबडा ? मूर्खास बुद्धी किती ?
ज्वालासिंह परंतु व्यर्थ जळला ; शार्दूल क्रीडा वृथा
राखेच्या सम ते शरीर बनले ; शार्दूल राखे जसा ॥

येता एक झुळुक चंदनमयी; मंत्रावली राख ही
राखेतून पुनः उठेल उडण्या ; शार्दूल पेटोनिया
निद्रेचा लखलाभ होत घुबडा ; शार्दूल जागा खडा
राजेही घुबडे असोत वनिची शार्दूल नेता खरा


.
.3lion.jpg
.
.
.
झेपावेल सदा अवध्य नर तो ; शार्दूल क्रीडा पहा ॥







.
.
अभिराम दीक्षित. श्रीलंका २००५

७ सप्टें, २०१२

युवकांच्या चश्म्यातून - आरक्षण.



थोड्या दिवसापूर्वी एका वाद विवाद स्पर्धेला परिक्षक म्हणून गेलो होतो. आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धा होती. २० ते २५ वर्षाची मुलं - मुली स्पर्धक होती. धर्माच्या आधारावर आरक्षण द्यावे का ? दिल्यास ते देशाच्या एकतेला बाधक होईल का ? - असा विषय होता.  प्रत्येक कॉलेज मधून दोन्ही बाजूंनी बोलण्यासाठी एक - एक विद्यार्थी पाठवायचा नियम होता. - तरुणांची भाषणं ऐकून टाळकं भणाणून गेलं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी मी समारोपाला थोडसं बोललो. जे बोललो त्यात  भर टाकून लिहतो.








 रामभाउ म्हाळगी प्रबोधिनी च्या मुंबईतल्या कार्यालयात झाली स्पर्धा. विनय सहस्त्रबुद्धे, रविंद्र साठे आणी लोकसत्तेचे मुकुंद संगोराम  कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

मी म्हणालो -

तुमची भाषणं मी ऐकली. टाळकं भणाणून गेलं. घोर निराशेनी - पण थोडा आशेचा किरणही दिसला. आशेचा किरण हा की - अतिशय जिव्हाळ्याच्या - भावनिक - अस्मितेच्या  प्रश्नावर; चर्चा वाद - विवाद करण्याची तुमची तयारी आहे. नाहीतर सध्या मुद्दे  - गुद्द्यांनी आणी लाथांनी सोडवायची पद्धत आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात आहे. मधल्या खाण्याच्या वेळेला तुम्ही एकत्र हसत खेळत होता. नंतर स्टेजवर येउन तावातावाने भांडत होता. लोकशाहीचा पप्पा आणी पुरोगामिपणाचा फादर म्हणजे व्हॉल्टेर हा फ्रेंच विचारवंत. तो म्हणाला होता. "I do not agree with what you have to say, but I'll defend to the death your right to say it" . तुझे विचार मला अजिबात मान्य नाहित. पण वेगळे विचार बाळगण्याच्या - तुझ्या हक्काच्या -  रक्षणासाठी -  मी मरण पत्करायला तयार आहे. याला म्हणतात पुरोगामीपणा ! माणूस विचार करणारा प्राणी आहे यावर श्रद्धा बाळगणार्‍याला मी पुरोगामी म्हणेन. चर्चा करून समोरच्याचे विचार बदलता येतात हा पायाच आहे आहे पुरोगामीपणाचा. अशा प्रकारे ज्ञानाचे आदान प्रदान करत समाज प्रगतीच्या दिशेने पुढे न्यायचा. गामी म्हणजे जाणारा पण जायच कुठे ? पुरो - प्रगतीच्या दिशेला. पुरो - गामी.




                                                                         व्हॉल्टेर


आता निराशेबद्दल आणी डोकं भणाणण्या बद्दल - तुम्हा सर्वांचीच एक गोष्ट मला जाम खटकलीय.  जातीय आरक्षण आणी धार्मिक आधारावरच आरक्षण - यात जमीन आस्मानाचा फरक आहे. हा फरक कुणीच नीटपणी ध्यानात घेतला न्हवता. आरक्षणाचे समर्थक दोन्ही प्रकारच्या  आरक्षणाला पाठिंबा देत होते. आणी विरोधक दोन्हीला विरोध. आजचा विषय 'आरक्षण योग्य का अयोग्य ? ' असा न्हवताच मुळी. मित्रांनो ! विषय धार्मिक आरक्षणाबद्दल होता. त्याहून गंभीर गोष्ट म्हणजे अभ्यासाऐवजी -  "स्व" जास्त डोकावत होता. ज्यांना आरक्षण मिळतय ते त्याच्या बाजूचे आणी मिळत नाही ते विरोधक अशी स्पष्ट विभागणी दिसली ! काहि अपवाद होते. पण मोजकेच. त्याहून धक्कादायक म्हणजे , भारताचे संविधान, त्यातले धर्मस्वातंत्र्य , सेक्यूलर, सर्वधर्मसमभाव आणी धर्मनिरपेक्षता याबद्दल सर्वांनीच दाखवलेले भीषण अज्ञान. तुम्ही सर्व राज्यशास्त्र, इतिहास अशा कलाशाखांचे विद्यार्थी आहात तेंव्हा तुमच्याकडून काही नवे शिकण्यासाठी आलेला मी .....विज्ञानाचा विद्यार्थी.....असो. एक गोष्ट मात्र तुम्ही मला आज शिकवलीत. कोणती ? ते शेवटीच सांगतो भाषणाच्या.


आरक्षणाच्या विरोधकांनी आर्थिक आरक्षणाचा बूट वारंवार उगारला. सगळ्याच गरिबांना द्या वगैरे वगैरे. आरक्षण म्हणजे काय - गरिबी हटाव चा सरकारी कार्यक्रम वाटला की काय तुम्हाला ? का भीक वाटली ? गरिबांना मदत म्हणून भरपूर सरकारी योजना असतात. वेगळ्या रंगाच रेशनकार्ड असतं,  सबसिड्या असतात. बहुसंख्य दलित गरिब आहेत हे खरे आहे.  पण ते गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण दिलेलं नाही. सामाजिक गरजेतून दिलेलं आहे. बर... आरक्षणाची सुरवात कोणी केली ? आंबेडकरांनी ? अजिबात नाही ! शाहू महाराजांनी ? बिल्कूल नाही ! आरक्षणाची सुरवात केली भगवान मनूनी ! किती टक्के ? तर १०० % ...कोणाला ? तर उच्चवर्णीयांना. हे विपरीत आरक्षण होतं मित्रांनो. ब्राह्मण, क्षत्रीय आणी इतर पुढारलेल्या जातींनी गेली हजारो वर्षे या विपरीत आरक्षणाची मजा घेतली. १००% सत्ता, १००% धर्माधिकार, १००% न्यायव्यस्था, १०० % उच्च उत्पादनाचे उद्योग, १००% शेतजमीनी  गेली हजारो वर्षे ठराविक जातींच्याच हातात होत्या. पुण्याच्या एका विद्यार्थ्यानं मगाशी लंगड्या घोड्यांची गोष्ट सांगितली. त्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेल आहे. घोड्यांची शर्यत लावली. सगळे घोडे तगडे. एक मात्र लंगडा. मुद्दाम लंगडा केलेला घोडा. कुणी केला त्याला लंगडा ? तर तगड्या घोड्यांनी. ही काय स्पर्धा झाली ? मेरीट माय फूट ! त्या लंगड्या घोड्याला आरंभरेषेच्या थोडं पुढे उभ कराव लागेल. तेंव्हाच खरी स्पर्धा होईल. हे आहे सामाजिक आरक्षण. २२.५ %. लोकसंखेच्या प्रमाणात. दलित आणी आदिवासिंना , भटक्या आणी विमुक्तांना दिलय. रेषेच्या पुढं उभ केलय. काय चुकलं ? गेली हजारो वर्षे अभ्यासाची परंपरा नाही. पाढे बापानी शिकवले नाहित. आईनी अभ्यास घेतला नाही. देवळात यायला बंदी. शिकायला बंदी. अस्पृष्यता. मग रेषेच्या पुढे उभ करा त्याना. त्यालाच म्हणतात सामाजिक आरक्षण. सरकारी जावई न्हवे. दुबळा भाउ म्हणा.

दुसरी गोष्ट आर्थिक आरक्षणाची. तेही आहेच की दिलेलं . फक्त गरीब व्यक्तींना ते दिलेलं नाही. गरीब जातींना दिलय. त्याला म्हणायच ओ. बी. सी. आरक्षण. गरीब व्यक्तींना कसं देणार आरक्षण ?  गरीब शोधायचा कसा ? माझ  हॉस्पिटल आहे. भावाचा कारखाना आहे. बायकोच्या नावावर काही नाही. ती झाली की गरीब !  माझ होस्पिटल बायकोच्या नावावर केलं की मी झालो गरीब ! समजा एक श्रीमंत व्यापारी आहे. सोन्याच्या दागिन्यांच दुकान आहे त्याचं. . डान्स बार मधे उधळल्या - गड्याच्या गड्या -  नोटांच्या. दारू प्याला.शौक केला. बाई ठेवली. उधळले सगळे पैसे. झाला गरीब. बोला.. देणार त्याला आरक्षण ? एक महा मूर्ख आहे महिपतराव , एक आळशी  आहे सुस्तराव ... दोघेही गरीब आहेत. देताय आरक्षण ह्या दोन रावांना  ? म्हणे आर्थिक आधार ! सरसकट गरीबांना आरक्षण देता येत नाही हो. तो का गरीब झाला हे पहाव लागत. तो त्याच्या वैयक्तिक दुर्गुणांमुळे गरिब आहे का ? की त्याला संधी नाकारलीय व्यवस्थेनं. श्रीमंत होण्याची संधी. भारतात जातिव्यवस्था आहे. ते एक भयानक वास्तव आहे. जेंव्हा जातीच्या जाती गरीब रहातात. तेंव्हा नक्कीच त्याना संधी नाकारलेली असते. समाजान. व्यवस्थेन. अरे सुतारान सुतारच राहायच. लोहारान लोहार. जास्त पैशे मिळणारे धंदे करायचेच नाही त्यानं. कोणी नाकारली संधी ? -  पैशे मिळवण्याची संधी? व्यवस्थेन. म्हणून अनेक जाती गरीब राहिल्या. मग आला मंडल आयोग. मंडल न काय केलं ? निकष लावले. र्थिक, सामाजिक आणी शैक्षणीक . (आसाशै ) मंडल ने पहाणी केली सगळ्या जातींची. शिक्षणाचं प्रमाण कुठल्या जातित कमी आहे ? कोणत्या जाती गरीब आहेत ? त्यांना म्हटलं ओ.बी.सी. आणी दिलं आरक्षण. या ओबिसीत माळी आणी कुणबी यासारख्या शेतकरी जाती आहेत. दैवेज्ञ ब्राह्मण ही उच्चवर्णीय जात ही आहे ओबीसी आरक्षणात. तेंव्हा गरीब किंवा मागास उच्चवर्णीयांना आधीच आरक्षण मिळालेलं आहे.  पुन्हा द्यायचा प्रश्नच कुठे येतो ?  तेंव्हा लक्षात ठेवा आर्थिक आधारावर आरक्षण व्यक्तीला देता येत नाही. गरीब जातीना देता येत  - ते दिलेलंच आहे. मग आर्थिक आरक्षणाचा बूट काय म्हणून?

जातिय आरक्षणाचा काहिना  - काही व्यक्तीना गैर फायदा होतो म्हणे. मागासवर्गीय कलेक्टरचा मुलगाही आरक्षण मिळवतो. अरेच्च्या पुन्हा तेच तेच. जातिच्या लॉब्या असतात की नाही ? ज्यांच्या लॉब्याच नाहीत सत्ताकारणात. त्याना पुढे आणायला आहे आरक्षण. ते व्यक्तीला नाहीच -  समाजाला आहे. बटाट्याची तुलना बटाट्याशी करा हो - टोमेटोशी नको. जर ठराविक समाजाला आरक्षण आहे तर - "व्यक्ती गैरफायदा मिळवतेचा" -  टॉमेटो आणला कुठून ?  हरेक व्यक्तीच्या मागासपणाची कारण शोधणं सरकारला शक्य नाही. जातींच्या मागासपणाची कारणं शोधता येतात आणी त्यावरचा उपाय म्हणजे आरक्षण. मग विचारता हे संपेल कधी ? प्रश्न विनोदी आहे. आरक्षण म्हणजे सत्ताकारणातला न्याय्य वाटा. तो संपायला कशाला पाहिजे ? जेव्हढे टक्के हक्काचा वाटा आहे. तो मिळालाच पाहिजे. कायम.निरंतर.मिळाला पाहिजे आणी  अनुशेष म्हणजे काय ? मागासांना आरक्षण आहे २२.५ % + २७.५ % ओबीसींना = ४९ %.

एकूण आरक्षण ४९ %

बर हे आरक्षण कागदावर आहे. खरोखर जागा भरल्या किती. दिल्लीत कॅबिनेट सचीव दर्जाच्या ९६ पोस्ट आहेत. दलित किती त्यातले १ . फक्त एक. म्हणजे एक टक्का. ओबीसी कीती. अ ग्रेडचे केंद्र सरकारी अधिकारी घेतले तर त्या ओबीसी ४% हून कमी आहेत. म्हणजे ४९% आरक्षण फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात ते आलेलच नाही. राखीव जागांचा अनुशेष भरून काढणे अजून बाकी आहे. आधी अनुशेष भरा नंतर तोंड वर करून विचारा की - संपेल कधी ? पदोन्नती मध्ये आरक्षण दिलं पाहिजे ते म्हणूनच. अनुशेष भरण्यासाठी.

आरक्षणा बाबत दहा  वर्षाचा बोगस मुद्दा 

बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितलं होतं कि आरक्षण दिल्यानंतर १० वर्षांनी त्याचं परीक्षण केलं जावं…

दर दहा वर्षांनी पाहणी करावी आणि आरक्षणाचि वैधता ठरवावी असे बाबासाहेब आंबेडकर म्ह्टले होते . हा मुद्दा निवडणुकीतील राजकीय आरक्षणाचा होता. त्याप्रमाणे दर दहा वर्षांनी तशी पहाणी केली जाते . ओपन राजकीय क्षेत्रातुन किती टक्के मागास वर्गीय निवडुन आले ते पाहिले जाते … त्याचे प्रमाण नगण्य असते म्हणून पुन्हा आरक्षण दर दहा वर्षांनी मिळते .नोकरी आणि शिक्षणातिल आरक्षण बाबासाहेबंनि दिलेले नाही . बाबासाहेबांचे महानिर्वाण  १९५६ सालचे आहे.   शिक्षणातिल आरक्षण १९८२ सालचे आहे .  ज्याप्रमाणे राजकीय आरक्षणाचि दर दहा वर्षांनी वैधता तपासली जाते त्याप्रमाणेच शैक्षणिक आरक्षणाचि दर पाच वर्षांनी वैधता तपासली जाते. ते वैध असते म्हणून दिले जाते.

संदर्भ : https://web.archive.org/web/20090619063917/http://www.education.nic.in/cd50years/g/S/I6/0SI60301.htm


..बाकी हा मुद्दा फक्त राजकीय आरक्षणा  बाबत सत्य आहे. नोकरी आणि शिक्षण याबातीतील अरक्षणा बाबत बाबासाहेबांनी हे विधान केलेलेच नाही . कारण तिथे आरक्षण द्यायचा क्रायटेरियाच वेगळा आहे.   तिथेही जेव्हा मागास सबळ होतात तेव्हा आरक्षणाची  गरज संपते .

४९% आरक्षण फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात ते आलेलच नाही. राखीव जागांचा अनुशेष भरून काढणे अजून बाकी आहे. आधी अनुशेष भरायचे . मग ओपन मधून सुद्धा लोकसंखेच्या प्रमाणात दलित - मागास जेव्हा भारती होतील - तेव्हा आरक्षणाचि गरज संपते .

बाकी दहा वर्षाचा मुद्दा बकवास 

घरात घुशी झाल्या म्हणून कोणी घर जाळत नाही. तस  कुठल्याही सरकारी योजनेत काही दोष रहाणारच. म्हणून कुणी योजनाच बंद करत नाही. शिवाय श्रीमंत ओबीसींना म्हणजे क्रीमी लेयरला आरक्षणाचे लाभ मिळतही नाहीत. तशी तरतूदच कायद्यात आहे. प्रथम अनुशेष भरला पाहिजे. सत्तेत हक्काचा वाटा मिळाला की हळूहळू लंगडा घोडा तगडा होईल. स्वतःच्या हिमतीवरच पळू लागेल. स्पर्धा करेल ओपनशी. माझ्या एका मित्राची गोष्ट. विजय. तो ओबीसी आहे. ओबीसीच्या सीटांचे मार्क क्लोज झाले ओपनच्या वर. त्याला आरक्षणाचा काहिच उपयोग झाला नाही. ओपनलाही काही तोटा नाही. त्या कॉलेजपुरत तरी -  आरक्षण नसल्यातच जमा. या एव्हढ्या शर्यतीपुरता घोडा तगडा झालाय. आरक्षण अस संपतं. आपोआप. हा मुद्दा एका एकाही स्पर्धकान मांडला नाही.


क्रिमी लेयर फक्त ओबिसिना का ? 

ओबीसी आणि एस सी या दोन्ही आरक्षणाचे हेतू भिन्न आहेत . ओबिसिना  (आसाशै ) आणि एससी ना अस्पृश्यता आणि शोषण याविरुद्ध आरक्षण आहे .

१) ओबीसी आरक्षण हे प्रामुख्याने (आसाशै ) आर्थिक/सामजिक /शैक्षणिक मागास जातीना दिले आहे. (मंडल आयोग क्रायटेरिया ) माळी , साळी,   कोळी,  सुतार,  दैवज्ञ ब्राम्हण अशा बारा बलुतेदार  जाती ओबीसीत येतात. यांचे  (आसाशै ) उत्थान झाले कि क्रिमी लेयर लावून वगळता येते. कारण ज्या  क्रायटेरियावर आरक्षण दिले आहे - त्याची पूर्तता होते

 २) एससी / एस टी  चे आरक्षण हे पूर्व अस्पृश्य  शोषित आणि दुर्लक्षित जातीना आहे. यात नवबौद्ध , महार , मांग , चांभार, ढोर , आदिवासी या जाती येतात   त्यांचे (आसाशै ) उत्थान झाले तरी इतरांच्या  (मनातली ) अस्पृश्यता - शोषण आणि हलके मानले जाणे संपत नाही - भेदभाव तसाच राहतो -  म्हणून  एससी / एस टी ला (आसाशै ) क्रिमी लेयर लावता येत नाही . यावर यदी फ़डकेंच्या "खरी हि न्यायाची रीती"   या पुस्तकात  विस्तृत विवेचन आहे.


मुस्लिम आरक्षण.

आता आपण आजच्या खर्‍या विषयावर येवू. धार्मिक आरक्षण. म्हणजे मुस्लिम आरक्षण. कारण मुसलमान अल्पसंख्यातले बहुसंख्य आहेत. मुस्लिमांना आरक्षण द्यावे का ? दिल्यास भारतातली एकात्मता वाढेल का कमी होईल ?


संविधान आणी सर्वधर्म समभाव हा विषय प्रत्येकाने चघळला. आणी प्रचंड घोळ घातला. सभ्य स्त्री - पुरुष हो - आपल्या राज्यघटनेत सर्वधर्मसमभाव नाही. धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य ही घटनेत नाही.  घटनेत सेक्यूलारिझम आहे. सर्वधर्मसमभाव आणी सेक्युलारिझम या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत.

सर्वधर्म समभाव. सर्व धर्म सारखेच आहेत. त्यांची शिकवण एकच आहे. सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छती -  ही हिंदुधर्माची शिकवण आहे. संविधानातला कायदा न्हवे ! उलट धर्मपालनाचे कोणतेच हक्क संविधान देत नाही.

तुम्ही सगळे प्रेमात पडायच्या वयाचे आहात.   आणी कुणाच्यातरी प्रेमात पण असणार. जो - जी नसेल त्यान कार्यक्रम संपल्यावर मला येऊन भेटावं. शनिवारवाड्यावर जाहिर सत्कार करण्यात यील. असो ..समजा तुम्ही ट्रेन नी कुठेतरी प्रवास करत आहात. समोर एक अप्सरा बसली आहे. यौवन बिजली.. पाहून थिजली.. इंद्रसभा भवताली. अप्सरा दिसली. तुम्ही मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करत आहात. असे प्रेम करण्याचे स्वातंत्र्य ती अप्सरा तुम्हाला अवश्य दील. पण मनातल्या मनात. मांडे खा. पण मनातल्या मनात. तिला ट्रेनमधे डोळा मारला ; की काय खायच ? सँडल !


भारताच्या राज्यघतनेत सेक्युलारिझम आहे. म्हणजे इहवाद आहे. कुठल्याही धर्मावर तुम्ही श्रद्धा ठेवू शकता. प्रेम करू शकता पण कसं ? मनातल्या मनात ! तुम्ही म्हणाल आमच्या धर्मात अस्प्रुश्यता आहे. आम्ही ती पाळणार... मग काय खायचं ? सँडल.

तुम्ही म्हणाल आमच्या कुराणात लिहिलिय . मूर्त्या फोडा. काफरांविरुद्ध जिहाद करा. म्हणा की. पण. मनातल्या मनात म्हणायच. खरोखर कुणी जिहाद करू लागला- तर काय खायच ? ....सँडल.
धर्माच्या चिकित्सेत संविधान शिरत नाही. पण २५ व्या कलमात बजावून सांगतं - धर्म पाळायचा पण मनातल्या मनात. इहलोकात कसं जगायच ? ते कायदा ठरवेल. लग्नाच वय किती असावं ? कायदा ठरवेल धर्म नाही.

संविधान नावाची अप्सरा हातात सँडल घेऊन उभी आहे . मनातल्या मनात धर्म पाळा की ! पण तुमच्या घरात - नाही - नाही तुमच्या बेडरुम मध्ये किती बायका असाव्यात ? त्याच्याशी कसा व्यवहार करावा ? हे कायदा ठरवणार आहे . तुम्ही तुमच्या धर्माचे किती पालन करावे ? हेही कायदा ठरवणार आहे !

सर्व धर्म चांगले आहेत ते जवळ घ्या म्हणजे सर्वधर्म समभाव. शासकीय निर्णयातून धर्म वगळा. धर्म दूर ठेवा म्हणजे सेक्यूलारिझम. म्हणजे च इहवाद. हा सेक्युलारिझम आपल्या संविधानाचा पाया आहे.  आणी अशा प्रकारचा पारलौकिक श्रद्धेसाठीचा कोणताही धर्म तुम्ही पाळू शकता. नवा धर्म बनवू शकता. धर्म बदलू शकता. धर्मांतराचे स्वातंत्र्य ही आहे.(मनातल्या मनात.)


आता मला सांगा. शासकीय निर्णयात धर्म आणायचा नाही हाच जर सेक्युलारिझम चा अर्थ आहे तर धर्मावर आधारित आरक्षण कसे काय देता यील ? दुसरं धर्म ही ऐच्छीक गोष्ट आहे. धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य आहे तर धर्मावर आधारित आरक्षण कसे देता यील ?


नीट विचार करा. समजा मुस्लिमांना आरक्षण दिलं. तर मुस्लिम कोण ? हे ठरवायचं कसं ? सुन्नी म्हणतात की शिया हे खरे मुसलमान नाहीत. कादियानी / अहमदिया पंथाचे लोक खरे मुसलमान नसून ते काफिर आहेत. त्यांच्या विरुद्ध जिहादचे फतवे ही निघतात पाकिस्तानात. मुसलामान कोण ? व्याख्या काय मुसलमानाची ? नाव ? समीर आणी कमल नावाच्या मुसलमानांना मी ओळखतो. अंतुले आडनावाचे मुसलमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.  सरकारने मुसलमानाची पहिल्यांदा व्याख्या करावी लागेल. टोपी, दाढी, नमाज हे सर्व नाकारणारे ही मुसलमान असतातच.

म्हणजे शेवटी सरकारला अ‍ॅफीडेव्हीट घ्यावे लागेल की मी मुसलमान आहे. आणी मगच आरक्षण देता यील.

पण गोची अशी आहे की घटनाकारांनी धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.  आरक्षण मिळवण्यासाठी मी काय करावे ? एक अ‍ॅफीडेव्हीट करावे. मी मुसलमान आहे. आरक्षणाचा लाभ मिळाला की पुन्हा धर्म बदलावा. हिंदू व्हावे. आता सरकार काय करणार ? माझी नोकरी काढून घेणार ? बर मी समजा सुमडीत धर्म बदलला. गुपचूप.  तर सरकारला कसे कळणार ? आरक्षणाचा लाभ मिळालेले लोक इस्लाम पाळतात का ? यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकार मौलवींची कमीटी नेमणार आहे काय ?

अहो दिवसातून पाच वेळा धर्म बदलता येतो. एक अ‍ॅफीडेव्हीट खेळ खलास. जी गोष्ट ऐच्छीक आहे ती गोष्ट कुठल्याही सवलतीसाठी अट म्हणून घालता येत नाही. एवढी साधी गोष्ट सरकारला कळू नये.

जातीचे खोटे दाखले मिळवून सवलती लाटणार्यांवर कायदेशीर कारवाई करता येते. कारण जात बदलता येत नाही. त्यात जन्म घ्यावा लागतो. पण धर्म ही ऐच्छीक बाब आहे. त्यावर आधारित सवलती देता येत नाहीत. धर्मांतराचे स्वातंत्र्य आणी धार्मिक आधारावर सवलती एकाच वेळी कशा देता येतील ? 

समजा उद्या तोगाडीयांनी हिंदू बांधवांना आवाहन केल - कोर्टात अ‍ॅफीडेव्हीट करून सवलती आणी आरक्षण लाटण्याच.. काय करणार तुम्ही ?


सर्वात महत्वाच  - आज मुस्लिमांना आरक्षण आहेच. मुस्लिमातल्या मागास जातींना आरक्षणाचा लाभ मिळतोच आहे. सर्वच धर्मातल्या मागास आणी गरीब जातींना आरक्षण आहे. ते तसेच राहिले पहिजे. पण सरसकट सर्व मुस्लिमांना आरक्षण मिळू शकत नाही. कोणत्याच धार्मिक आधारावर आरक्षण मिळू शकत नाही.  फक्त एका स्पर्धकाने हा मुद्दा मांडला त्याला पहिलं बक्षिस देत आहोत.

मुस्लिमांना समजायला हव की धार्मिक आधारावरच आरक्षण घटनाविरोधी तर आहेच पण;  ते देता येणंही अशक्य आहे. त्यामुळेच ते कोर्टात टिकणार नाही. सरकार तुम्हाला उल्लू बनवते आहे.

 तुमच्या सर्वांकडून शिकलेली एक गोष्ट म्हणजे वक्त्याने उगीच बडबड करत बसू नये वेळ संपली की भाषण बंद करावं. तुम्ही सर्वांनी बरोब्बर दिलेल्या वेळेत भाषण संपवलीत. तुम्च्याकडून मी हे शिकलो. आता आचरणात आणतो आणी भाषण संपवतो.


 - डॉ. अभिराम दीक्षित, मुंबई

  -----------------------------------------------------------------------------------------------------------

टिप : प्रस्तुत लेखन मागासवर्गीय आयोगाने अभ्यास करून शोषित वर्गाला दिलेल्या आरक्षणाबाबत आहे. सध्या तलवारी उपसून राजकीय दडपशाही करून  आरक्षण  मागण्याचा धंदा जोरात आहे. लेखक मागास , अतिमागास आणि इतर मागास जाती जमातींच्या आरक्षणाचा समर्थक आहे. आरक्षण म्हणजे सत्ता  अणि शिक्षण यातले प्रतिनिधित्व.

ज्यांना सत्तेत/ शिक्षणात  पुरेसे  प्रतिनिधित्व नाही त्याना ते दिले पाहिजे . ज्या समाजाला असे प्रतिनिधित्व पहिल्या पासूनच आहे आणि तरी त्यात गरिबी आहे - त्यांच्या विकासा साठी अन्य प्रयत्न केले पाहिजेत . आरक्षण  नाही .  राजपूत , ब्राम्हण ,  जाट , मराठा अशा सत्ता संपन्न समाजां च्या आरक्षणाबाबत वरील लेख लागू होत नाही . त्यांनी केलेल्या मागण्या आणि दिलेली आरक्षणे कोर्टात टिकणारी नाहीत . 

६ सप्टें, २०१२

अवलिया विचारवंत - नरहर कुरुंदकर.







तीस वर्षापूर्वी एक प्रभावी वक्ता स्टेजवरच मरण पावला. तो मॅट्रीक पास झाला तेंव्हा त्याची पुस्तके बीए च्या अभ्यासक्रमासाठी लावली होती आणि बीए 'ना'पास झाला तेंव्हा एम ए चे विद्यार्थी त्याची पुस्तके अभ्यासत होते. त्यांची भाषणं जेव्हढी लोकांना चक्रावून टाकणारी असत तेव्हढाच त्यांचा म्रुत्यू ही होता. औरंगाबादेत भाषणाची सुरवात करताच रणांगणावरील योध्याप्रमाणे १० फेब्रूवारी १९८२ ला कुरुंदकर गुरुजी व्यासपिठावरच कोसळले. त्यावेळी त्यांच वय होतं पन्नास वर्ष. या उण्यापुर्या पन्नास वर्षात त्यांनी मानसशास्त्रापासून इतिहासापर्यंत विषयांचा अभ्यास केला, कलामिमांसेपासून राजकारणापर्यंत लेख लिहिले, आणी मनुस्म्रुतीपासून कुराणापर्यंत विषयांवर व्याख्याने दिली.
आपल्याकडची विचारवंत मंडळी सहसा अमुक जातीची, तमुक राजकीय विचारसरणीची किंवा एखाद्या नेत्याचे अनुयायी म्हणून ओळखली जातात. राजकीय विचारसरणीच्या बेड्या पायात ठोकूनच वैचारिक झेपा घेतल्या जातात. महाराष्ट्राच्या या वैचारिक काळोखात कुरुंदकर झगमगुन उठतात.
मनुस्म्रुतीवरच्या पुस्तकात ते लिहितात, मध्ययुगीन जगात सर्वच देशात विषमता होती. अमेरिका, युरोप ते अरबस्तानापर्यंतचा इतिहास गुलामिच्या आणी स्त्री छळाच्या काळ्या शाइने लिहिला आहे. पण ह्या गुलामिचे आपल्या धर्माने ज्या प्रमाणात समर्थन केलेले आहे, तेव्हढे जगाच्या पाठीवर कोठेही आढळणार नाही. कर्म करत रहा, फळ अत्ता मागू नकोस, पुढल्या जन्मी तुला ते मिळेलच. त्यानुसार तुझी जात ठरेल अन त्यावरून लायकी; ही धार्मीक शिकवण हिंदूना घातक ठरली. देशाला दुर्बल करणार्या . ह्या धार्मीक व्यव्स्थेचे समर्थक आजाही अस्तित्वात आहेत. ही कुरुंदकरांची खरी खंत होती. मनुस्म्रुतीत शुद्राला कर नाही असे मनुसमर्थक म्हणतात. पण त्याचवेळी शुद्राला धनसंचयाचा अधिकारच मनू देत नाही. तर तो कर भरणार कोठून ? अशा बाबी डोळ्याआड करतात. केवळ ग्रंथप्रामाण्यातून हे घडत नाही पण जातीचा दंभ मनूच्या उच्चवर्णीय समर्थकाना बौद्धीक गुलामगिरीत ढकलतो हे कुरुंदकर दाखवून देतात. परंपरेची बौद्धीक गुलामी अमान्य करणार्या उच्चवर्णीयांनाही मनू शूद्राचीच वागणूक देतो असे प्रतिपादून मनूच्या उच्चवर्णीय समर्थकानाही ते चक्रावून टाकतात.



सुभाषबाबूंचे आकलन करताना कुरुंदकर लिहितात - जे सशस्त्र क्रांतीकारक आहेत, ते सगळे अहिंसाविरोधी . जे अहिंसाविरोधी ते सर्व गांधीविरोधी आणी जो गांधीविरोधी तो हींदुत्ववादी अशी सोयीची समजूत मध्यमवर्गीयांनी केलेली आहे. सुभाषबाबूंनी त्यांच्या आझाद हिंद रेडीओवरच्या भाषणातून गांधीचा उल्लेख राष्ट्रपिता असाच केला होता. बंगाल मधल्या दास पॅक्ट नुसार ५२ % मुसलमानाना ६०% जागा मिळणार होत्या आणी सुभाषबाबू ह्या करारात सामील होते हे पटवून देत कुरुंदकर सुभाषबाबूंचे मुस्लीम प्रेम दाखवून देतात. स्वतःला गांधीवादी म्हणवणारे कुरुंदकर महात्मा गांधीचे अमक्या विषयावरचे विचार साफ चूक आहेत असे म्हणायला कचरत नाहीत. फाळणीच्या वेळी गांधीजींनी मुस्लीमांचे लांगुलचालन केले होते असा आरोप हिंदुत्ववादी करतात. त्याला उत्तर देताना कुरुंदकर म्हणतात " एका मुसलमानाला तीन मतांचा अधिकार देउन; लखनौ कराराच्या वेळी कोंग्रेस मधील मुस्लीम लांगुलचालनाचा पाया; खुद्द लोकमान्य टिळकांनी घातलेला आहे. हे हिंदुत्ववादी का विसरतात ?"




वाचकांच्या, श्रोत्यांच्या प्रस्थापित कल्पनांना तडाखे हाणत त्यांना संपूर्णतः नव्याने विचार करायला शिकवणे हे कुरुंदकरांचे वैशिष्ट्य होतेच. पण असे करताना कुरुंदकर अंगावर येत नाहीत. क्लिष्ट विषयांवर धक्कादायक भाष्ये करताना कुरुंदकरांची भाषा मार्मिक, प्रवाही तरी विचारप्रवर्तक अशी असते.

जमाते इस्लामी च्या संमेल्लनासमोर त्यांनी केलेले भाषण विशेष विचारप्रर्तक होते. जमलेल्या तमाम मौलवी, उलेमा आणी मुस्लीम श्रोतुसमुदायाला कुरुंदकर म्हणाले होते ''मी नास्तिक आहे. धार्मिक अर्थाने मी हिंदू नाही. पण मी मुसलमानही नाही. हे तुम्हाला मान्य आहे काय? एक मिनिट ... जगात चोर असतात हे वास्तव मान्य करण वेगळं आणी चोरांचा चोरी करण्याचा अधिकार मान्य करण वेगळं. मी मुसलमान नाही. पण माझा मुसलमान नसण्याचा हक्क तुम्हाला मान्य आहे काय ? अल्लाहने एकमेव सत्यधर्म सांगितला तो म्हणजे इस्लाम. अशी तुमची धारणा आहे. इतर सर्व घर्म अशुद्ध आहेत असे तुमचे म्हणणे आहे. त्या इतर धर्मीयांनी अल्लाचा धर्म स्वीकारलाच पाहिजे असा तुमचा आग्रह आहे मग माझ्यासारख्या नास्तिकाविषयी तर बोलायलाच नको !" मुस्लीम प्रश्न हा अल्पसंख्यांक प्रश्न नाही तर इतर धर्म खोटे आहेत या भुमिकेतुन तो जन्मला आहे असे कुरुंदकर म्हणतात. जमाते इस्लामी समोरचे भाषण मान्यतेच्या शांततेत पार पडते. पण कुरुंदकरांचे पुरोगामी मित्र चक्रावून जातात.

 

विनोबांना न पटणारा संत म्हणणारा हा गांधीवादी, इस्लाम धर्माची कठोर चिकीत्सा करणारा हिंदुत्ववाद्यांचा शत्रू आणि धर्मशास्त्रांचा नास्तिक प्रकांडपंडीत महाराष्ट्राला पुनःपुन्हा आठवावा लागणार आहे. त्यांनी ज्या प्रश्नांवर चिंतन केलं ते प्रश्न आजही ज्वलंत आहेत. यापुढेही रहाणार आहेत. बाबा आमटेंच्या कुरुंदकरांवरच्या ओळी आहेत :
वास्तवाच्या जाणीवांना वाचा यावी; तस बोलायचास
प्रज्ञेच्या दाहक हुंकारासारखा.
काळोख उजळत येणाऱ्या किरणांसारखा यायचा तुझा शब्द;
नीतीच्या वाटा प्रकाशत,आयुष्याचे अर्थ दाखवत.
त्यातून दिसायचे नवे प्रश्न नव्या दिशा;
कुणाला गवसायचा प्रकाश कुणाला संधी,
तर कुणाला सापडायचे ते स्वत:च.


 - डॉ. अभिराम दीक्षित, पुणे 

त्यांच्या चश्म्यातून - भाग ३ - जनतेचा प्यारा अश्फाक

पूर्वपीठिका


 १८५७ च्या बंडामुळे मुसलमान ब्रिटीशांना दुरावले होते. आता ब्रिटिशांशी मिळते घेउन आधुनिक शिक्षण मिळवले पाहिजे तरच मुस्लिमांचे भले होईल हे ओळखले - सर सय्यद अहमद खान यांनी. (१८०७ - १८९८). सय्यद अहमद खानानी- " ब्रिटिशांशी एकनिष्ठ मुसलमान "म्हणून एक पुस्तक लिहिले. अलिगढ विद्यापीठाचा पाया घातला. आता इंग्रजांशी भांडण्याच्या लफड्यात पडण्यात हशिल नाही ....हिंदू हेच खरे शत्रू आहेत ... असं त्यांना मुस्लिमांच्या मनावर ठसवायचं होतं. अलिगढ विद्यापीठाच्या या संस्थापकाला राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे आमंत्रण होते. सय्यदांनी ते लाथाडले. -
त्यानंतर मौलाना मुहम्मद कासीम यांनी १८६६ साली दार उल उलूम देवबंद ची स्थापना केली. त्यानी सर सय्यद अहमदांचे चाक उलटे फिरवायला प्रयत्नांची पराकाष्ठा केली.ब्रिटीशांना विरोध केला. देवबंदी विद्वानांनी नेहमीच पाकिस्तानलाही विरोध केला. . सगळी पृथ्वीच अल्लाहची आहे. त्यात पाक (पवित्र) - नापाक (अपवित्र) असे काही नाही. पाकिस्तानच्या छोट्याशा तुकड्यावर समाधान का मानावे ? अखंड भारतातच इस्लाम पसरला पाहिजे असे देवबंदिंचे उच्च विचार होते- आजही आहेत.
 ( त्यांच्या ब्रिटिश विरोधामुळे आज त्यांना राष्ट्रवादी म्हणून ओळखले जाते. आणी पाकिस्तान विरोधामुळे सर्वधर्मसमभावी समजले जाते. )
दरम्यान १९०६ -७ साली नवाब वकार व मोहसिन उल मुल्क यांच्या पुढाकाराने मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. ह्याच लीगने पुढे भारताची फाळणी घडवली.

१८५७ ते १९०० सालापर्यंत भारतातल्या मुस्लिम जगतात विविध प्रश्न चर्चिले जात होते... पाकिस्तान कसा असावा ? अखंड भारतच इस्लाममय करावा का ? आधुनिक शिक्षण घ्यावे का पारंपारिक ?
हिंदू मुस्लिम एकता - सहजीवन या फालतू प्रश्नावर अथवा शक्यतेवर एकाही मुस्लिम विचारवंताने / राजकारण्याने आपली लेखणी झिजवली नव्हती. काळोख पसरला होता.

ह्या काळोखात १९०० साली एक तारा चमकून उठला आणी १९२७ साली फासावर लटकून शहीद झाला. अश्फाक उल्ला खान. उमदा कवी, देखणा पैलवान, हळवा शायर, सिद्धहस्त लेखक, तगडा क्रांतिकारक आणी सच्चा देशभक्त.







१. पंडित रामप्रसाद बिस्मिल अन अश्फाक उल्ला खान ची जिगरी दोस्ती

भगतसिंगांचे पूर्वसुरी, सशस्त्र क्रांतिकारकांचे हिरो, हिदुस्थान रिपब्लिकन आर्मी चे ह्रुदयसम्राट म्हणजे राम प्रसाद बिस्मिल. ते कडवे हिंदू आणी आर्यसमाजिस्ट होते.

महर्षी दयानंद सरस्वतींनी स्थापन केलेली आर्यसमाज ही तत्कालीन हिंदूंची एक सुधारणा चळवळ होती. वेदाला प्रमाण मानणारी. मूर्तीपूजेचा आणी पुरोहितशाहीचा निषेध करणारी आर्यसमाजी मंडळी जातीभेदाची कडवी विरोधक असत. अस्प्रुष्यता हा हिंदू धर्मावरचा डाग समजून तो पुसण्यासाठी प्रयत्नशील असत. राजर्षी शाहू महाराज आर्य समाजिस्ट होते. आर्य समाज घडवत असलेल्या आंतरजातीय विवाहां बद्दल डॉ. आंबेडकरांनीही कैक वेळा गौरवोद्गार काढले होते.

 पुढे  मुस्लीमांत तबलीग  चा जोर वाढू लागला. तब्लीगी मौलवी - हिंदूना इस्लाम मधे येण्याचे आवाहन करत असत; अन साम दाम दंड भेद वापरून धर्मांतर करत असत. त्याला उत्तर म्हणून आर्य समाजिस्टांनी शुद्धीकरणाची मोहीम चालवली. परधर्मात गेलेल्यांना मोठ्या प्रमाणावर हिंदू करून घेतले जाऊ लागले. ही संख्या हजारोत होती. रामप्रसाद या शुद्धीकरणाच्या चळवळीत अग्रेसर असत. शिवाय ते बिस्मिल या टोपणनावाने उर्दू शेरोशायरी लिहित. त्या काळी रामप्रसाद कडवे मुस्लिमद्वेष्टे होते.

अश्फाक चा मोठा भाउ राम प्रसादांचा वर्गमित्र होता. रामप्रसांदाचे ओघवते वक्तृत्व; त्यांची रसरशीत शायरी , दणकट व्यक्तित्व आणी जाज्वल्य देशप्रेम यांविषयी अश्फाक ऐकून होता. त्यांचा चाहता बनला होता. त्यांना भेटू पहात होता त्यांच्यात सामिल होउ पहात होता. पण अश्फाक मुसलमान असल्याने रामप्रसाद त्याला टाळत होते. पण अश्फाक चिकाटी सोडत नाही त्यांच्या ह्रुदयात जागा मिळवतो. आर्य समाज मंदिरात दोघांच्या गाठीभेटी सुरू होतात. रामप्रसाद अश्फाकला शुद्ध करून हिंदू करायचा अटोकाट प्रयत्न करतात. अश्फाक दाद देत नाही. पण रामप्रसाद ची पाठही सोडत नाही. एका जाहीर भाषणात रामप्रसाद बिस्मिल मात्रुभूमीसाठी गोर्‍या इंग्रजांना ठार मारण्याचे उघड आव्हान करतात. त्यासाठी स्वतः मेलो तरी बेहत्तर म्हणतात.

या बहरून उठलेल्या अंतकाळात (फना) वाहून जाउदे माझे प्रेत;
की भुक्या मासोळ्या शत्रूच्या तलवारी आहेत.

बहे बहरे-फना में जल्द या रब! लाश 'बिस्मिल' की।
कि भूखी मछलियाँ हैं जौहरे-शमशीर कातिल की।।"

"आमेन" अश्फाक ओरडतो. प्रत्युत्तरादाखल (शायरीची जुगलबंदी) म्हणतो -

"कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है।
जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है।।"

भाषण झाल्यावर दोन्ही शायर मित्र भेटतात. रामप्रसाद अश्फाक ला म्हणतो - मैने पकडा तुम्हे - शायरी की जुगलबंदी तो ठीक है; लेकिन ये शायरी तुम्हारी खुद की ओरिजनल नही... अश्फाक हसत म्हणतो "ठिक आहे पंडितजी मान्य.. ही शायरी माझी नसून जिगर मोरादाबादीची आहे. .. पण ह्याच शायरीला तुम्ही असच पुढे वाढ्वून दाखवलं- ओरिजनली - तर मी तुम्हाला ऊर्दू शायरीचा सम्राट मानेन.... "

रामप्रसाद बिस्मिल च्या ओठातून शब्द बाहेर पडले -

"सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है।
देखना है जोर कितना बाजु ए कातिल में है?"

एका माहान क्रांतीगिताचा जन्म झाला होता. अश्फाक रामप्रसादला कडकडून मिठी मारतो. म्हणतो - उस्ताद राम तू उर्दू शायरीचा महासम्राट आहेस......आता हे काव्य.... . सार्‍या क्रांतिकारकांची भगवदगीता ठरणार असतं. एवढेच नव्हे तर त्या दोन मित्रांचं जिवनगीतही ठरणार असतं.

आर्य समाज मंदिरात राम प्रसाद बिस्मिल च्या बैठका चालत. इंग्रजी राज्य उलथून टाकण्याच्या योजना बनत. कट शिजत -

वक्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमां,
हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है ।
खींच कर लाई है सब को कत्ल होने की उम्मींद,
आशिकों का आज जमघट कूंचे-ऐ-कातिल में है ।

रामप्रसादची एकही बैठक अश्फाक चुकवत नसे. अश्फाक उल्ला खानने स्वतःचा नमाज चुकवला नाही की इस्लाम सोडला नाही. पण रामप्रसादचे म्हणणे पटून अथवा त्याच्या व्यक्तिमत्वाने भारून जाउन होणारे मुस्लिमांचे हिंदूकरण अश्फाक बिनविरोध पाहत असे. एखाद्याचा धर्म ही त्याची व्यक्तिगत बाब असल्याने अश्फाक च्या लेखी ह्या गोष्टी महत्वाच्या नव्हत्या. पण कडव्या वहाबी - तबलीगींना ; आर्य समाजाचे अस्तित्व संपवणे अत्यावश्यक वाटे. आर्य समाज मंदिरात अशीच एक बैठक चालली असताना मुस्लिम हल्ला बोल करतात. त्याना आर्य समाज नष्ट करायचाय. मुस्लिम जमाव चालून आत येतो. त्यांना थांबवायला पहिल्यांदा पुढे सरसावतो -अश्फाक उल्ला खान. आणी म्हणतो - माझ्या प्रेतावरून पुढे जा. ...त्याचे बलदंड शरीर; मुस्लिम समाजातला त्याच्या घराचा रुतवा आणी मुख्य म्हणजे त्याच्या हातातली बंदूक - याना तो मुस्लिम जमाव घाबरतो. पळ काढतो.


रामप्रसादला हे कळताच त्याला गदगदून येते. आपण मुस्लिमांचे शुद्धीकरण का करतो ? त्यांनी राष्ट्रीय बनावे, आपली संस्क्रुती मानावी म्हणूनच ना ? मग अश्फाक सारखे जिते जागते राष्ट्र्प्रेमी मुस्लिमाचे उदाहरण समोर असताना. शुद्धीचे प्रयोजनच काय ? त्या दिवसानंतर राम प्रसाद बिस्मिल एकाही मुस्लिमाला शुद्ध करण्याचा भानगडीत पडला नाही. दोन्ही मित्र क्रांतिकार्याला वाहुन घेतात. आता ध्येय एकच स्वातंत्र्यासाठी मारता मारता मरेतो झुंजायचे -


दिल मे तूफानों की टोली और नसों में इन्कलाब।
होश दुश्मन के उडा देंगे हमे रोको न आज ॥
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंजिल मे है ।
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है ॥


रामप्रसाद नी अश्फाकला लहान भाउ मानलं. दोघे एका ताटात जेवत. एकत्र रहात. अन स्वप्ने पाहत. उद्याच्या भारताची. जिथे धार्मिक झगडे नसतील, शेतकरी - कामकर्यांना न्याय मिळेल. जाती पाती नष्ट होतील. असा अखंड भारत जिथे - मनुष्य मनुष्याचे शोषण करू शकत नाही



२. काकोरी कट :

हिदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन च्या शाखा गावोगाव पसरत चालल्या. मनुष्य मनुष्याचे शोषण करू शकत नाही. असा असोसिएशन चा जहिरनामा होता. कार्यासाठी पैसा अपूरा पडू लागला. अश्फाक म्हणाला - खजिन्यातला पैसा आपला. इंग्रजाच्या बापाचा नाही -

कहां गया वह कोहिनूर हीरा; गयी किधर मेरी दौलत है ।
वह सबका सब लूट करके हमी को डाकू बता रहे है ॥

इंग्रज सरकारचा खजीना लुटायचं ठरलं. काकोरी स्टेशन वर गाडी अडवायची. अन खजिना लुटायचा. टोळी जमली. अश्फाक दिसायला रुबाबदार म्हणून तो सेकंड क्लास मधे बसणार. चेन खेचून गाडी थांबवणार. मग जनरल क्लास मधे बसलेल्यांनी धाबा बोलायचा-- खजिन्याची पेटी मिळवायची -- फोडायची -- अन पसार व्हायच. या कानाचा त्या कानाला पत्ता लागू द्यायचा नाही. बंदुका जमल्या. क्रांतिकारी सुस्सज झाले. दिवस ठरला. रेल्वेत भारतीयच असतील. शक्यतो प्राणहानी टाळायची. पण इंग्रज नडला तर फोडायचा.जर्मन बनावटीची माउसर पिस्तुले वापरण्यात आली.




 है लिये हथियार दुश्मन ताक मे बैठा उधर
और हम तैय्यार हैं सीना लिये अपना इधर
खून से खेलेंगे होली गर वतन मुश्किल में है
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है


अश्फाक नी चेन खेचली. गाडी थांबली. बंदुकीचे बार उडाले. खजिन्याची पेटी मिळाली. कुलुपावर हातोड्याचे घाव बसू लागले. घण् - घण् - घण् - घण्. कुलूप तुटेना. तगडा अश्फाक पुढे सरसावला. बंदूक टाकली. हतोडा उचलला.घण् - घण् . पेटी उघडली. खजिना मिळाला. पोबारा. सर्व क्रांतिकारक भूमिगत झाले. फरार झाले.






३. फरारी - अटक आणी कारागृह -


काकोरी कटातले बहुसंख्य आरोपी पकडले गेले.रामप्रसादला अटक झाली. ब्रिटीश पोलिस एका अश्फाक उल्ला खान नावाच्या मुसलमानाला शोधत होते. तो एकच आरोपी काही केल्या मिळत न्हवता. साहेब वेशांतर करून बनारस हिंदू विद्यापिठात जाउन लपले. त्यानंतर शांतपणे बिहारमधल्या एका इंजिनिअरिंग फर्म मधे चिकटले. एक वर्ष अश्फाक पोलिसांना मिळाला नव्हता. तो व्यवस्थित नोकरी करत होता. पण एक पठाण मित्राच्या फितुरीने त्याला अटक झाली. त्याविषयी अश्फाक लिहितो -

न कोई इंग्लिश है न कोई जर्मन,
न कोई रशियन है न कोई तुर्की|
मिटाने वाले हैं अपने हिंदी,
जो आज हमको मिटा रहे हैं||

ब्रिटिशांनी तुरुंगात फेकले बेड्या घातल्या. खटला भरला. तुरुंगात तो बेड्या वाजवत - वाजवत मातृभूमीची आरती करत राहिला. तो लिहितो -


ऐ मात्रुभूमी तेरी सेवा किया करूंगा
मुश्किल हजार आये हर्गिज नही डरूंगा
तेरे लिये जियुंगा तेरे लिये मरूंगा
बेडी बजाबजाकर तेरा भजन करूंगा


ज्या तुरूंगात अश्फाक ला ठेवले होते तेथे त्याला एक सुप्रिडेंट ओफ पोलिस भेटायला आला. त्याच नाव होतं तसद्दुक हुसेन. . हुसेन म्हणाला " मी तुला माफीचा साक्षीदार बनवतो. जिव वचेल. फाशी माफ होईल"
दात ओठ खात अश्फाक उत्तरला -


मौत और ज़िन्दगी है दुनिया का सब तमाशा,
फरमान कृष्ण का था, अर्जुन को बीच रन में|
जिसने हिला दिया है दुनिया को एक पल मे
अफसोस...... क्यो नही है वह रूह अब वतन मे ?
( रूह - आत्मा)


पोरगं मरणाला भीत नाही हे पहून हुसेन दुसरा डाव खेळला. एक डाव रडीचा. धर्माच्या सौदेबाजीचा. हुसेन म्हणाला - " अश्फाक नीट विचार कर. तू एक मुसलमान आहेस. या देशात ७ करोड मुसलमान रहातात आणी २२ करोड हिंदू. गांधी लोकशाहीच्या बाता मारतो. या कफिर हिंदूंच्या नादी लागून तू ब्रिटिशांविरूद्ध लढतोयस. इंडीयातून ब्रिटीश निघून गेले तर ? २२ कोटी हिंदू लोकशाही मार्गानी हिंदू इंडीया बनवतील...."
शांतपणे अश्फाक उत्तरला - " तू ज्या गोर्‍या मालकांनी फेकलेली हाडं चघळतोस त्यांना जाऊन सांग - या अश्फाकला ब्रिटिश इंडियापेक्षा हिंदू इंडीयाच जास्त प्रिय आहे"




केस कोर्टात उभी राहिली. जज्ज होते खान बहादुर ऐनुद्दीन. ते अश्फाकच्या नातेवाईकांच्या घनिष्ट संबंधातले होते. मुसलमान वकील करावा अशी गळ अश्फाकला घातली गेली. मग अश्फाक पेटला - हिंदूच वकील करणार म्हणून. त्याचा नातेवाईकांना सवाल होता. हिंदू - मुस्लिम ऐक्यासाठी आम्ही इथे मरायला तयार आहोत; आणी तुम्ही काय फलतूपणा चालवलाय ?

प्रत्यक्ष जज्ज कडून आलेली माफीची याचना त्याने साफ नाकारली. क्रुपाशंकर नावाच्या आर्य समाजिस्टाला वकील नेमले. त्यांनी अश्फाकच्या आठवणी लिहून ठेवल्यात. कृपाशंकर लिहितात - केसचा फैसला ऐकायला अश्फाक नटून थटून आला होता. तो आनंदी दिसत होता. क्रुपाशंकर म्हणाले - अफसोस तुला फाशीची शिक्षा झाली... अश्फाक उत्तरला - " अफसोस किस बात का ? हं एका गोष्टीचं दु:ख जरूर आहे... आम्ही आपापसात पैज लावली होती. की तुरुंगात मजबूत खादडायचं आणी वजन वाढवायच. त्या पैजेत मी पहिला नाही आलो. दुसरा आलो !"

भेटायला आलेले नातेवाइक रडारड करू लागले तेंव्हा अश्फाक घुश्श्यात बोलला - आज पहिला मुसलमान देशासाठी फासावर चढतोय आणी रडताय काय बावळटासरखे ?
पंडित रामप्रसाद बिस्मिल अन अश्फाक उल्ला खान ची जिगरी दोस्ती शेवटपर्यंत टिकली. दोघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.



४. पंडित रामप्रसाद बिस्मिल चे शेवटचे पत्र.

रामप्रसाद बिस्मिल हा एक विचारी ग्रुहस्थ. नव्या अनुभवातून शिकणारा. स्वतःला बदलणारा. हा उच्चवर्णात जन्मला. जातीपातीचा तिटकारा येवून आर्यसमाजिस्ट झाला. पुढे मुस्लिमांवर चिडून शुद्धीआंदोलनाचा नेता बनला. त्यानंतर अश्फाकच्या संगतीत राहून हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कर्ता बनला.त्याच्या फाशीच्या कोठडीत लिहिलेल्या अत्मकथेतून -






" हे माझ्या प्राणप्रिय सुर्‍हुदा ... अश्फाक ..मी प्रथम तुला मुसलमान म्हणून टाळले..मग तुला हिंदू करण्याचा .. शुद्ध करण्याचाही प्रयत्न केला.. पण हळूहळू माझ्या लक्षात येवू लागले की की तुझ्या ह्रुदयात थोडीही अशुद्धी नाही.. मग तुला शुद्ध काय म्हणून करायचे ? तुझ्या संगतीत माझ्या ह्रुदयातून हा विचारच निघून गेला की हिंदू आणी मुसलमान या काही वेगळ्या गोष्टी आहेत. मी हिंदीतून लेख लिहायचो तेंव्हा तू म्हणायचास ऊर्दूतून लिही.... ही देशभक्तीची अक्कल मुसलमानांच्याही टाळक्यात शिरू दे !


मी माझे जीवनकार्य पूर्ण केले आहे.मी सार्या भारताला मुस्लिमातून एक असा नवयुवक काढून दाखवला जो देशभक्तीच्या सार्‍या परिक्षात अव्वल आला आहे. मुसलमान विश्वासपात्र नाहीत असे म्हणण्याची आता कुणाची हिम्मत आहे काय ? हिंदू मुस्लिम एकता हीच आम्हा दोघांची अंतिम इच्छा आहे. हे माझ्या प्राणप्रिय सुर्‍हुदा ... अश्फाक ... मी रामप्रसाद बिस्मिल ज्याने आपल्या बापाचा पैसा राष्ट्रकार्यात फुकून टाकला अन आइ वडिलांना भिकारी बनवले.भावाचे भाग्य देशसेवेसाठी भेट दिले. तन मन धन देऊन आता फासावर लटकतो आहे. आता तर माझा सर्वप्रिय मित्र अश्फाकलाही मी मात्रुभूमीला भेट म्हणून देत आहे.तू केवळ शरीरानेच तगडा न्हवतास रे.. पण मनाने घट्ट अन अत्म्यानेही उच्च होतास. पण थांब....
मरते बिस्मिल रोशन लहरी अश्फाक अत्याचार से
होंगे पैदा सैकडो उनके रक्त की धार से "






5. अश्फाक के आखरी दिन

फाशीच्या काळकोठडीत अश्फाकने 'अश्फाक के आखरी दिन' या नावाचेआत्मचरित्र लिहिले. फाशीच्या आधी तीन दिवस ते लिहून संपवले मग उरलेला वेळ त्याने नमाजात घालवला. त्या आत्मचरित्राचे शेवटचे पान -
"तबलिगवाल्यांनो आणी शुद्धीवाल्यांनो. डोळे उघडा. आपापसात धर्मावरून भांड्ण्यात काय अर्थ आहे ? तुम्ही गोर्यांचे गुलाम आहात. गुलामांना कुठला आलाय धर्म ? तुम्ही धर्मसुधारणा तरी काय करणार आहात ? गुलामाना कोण सुधारू देतो ?भांडणं पेरणारे तबलिगवाले ब्रिटीशांचे दलाल आहेत. एवढी साधी अक्कल तुम्हाला नसावी ? २२ कोटी हिंदूना मुसलमान करणे अशक्य आहे. सात कोटी मुसलमानाही हिंदू करने अशक्य आहे.... हा ... पण आपापसात भांडून गुलामीचे जू पाठीवर बाळगणे सहज शक्य आहे.

हिंदूनो मुसलमानानो आणी कम्यौनिस्टानो एक व्हा. नही तो सारे हिंदोस्तान की बदवख्ती का वार तुम्हारे गर्दनोंपर है और गुलामी का वायस तुम हो.

कम्युनिस्टाना माझी विनंती आहे की (रशिया) परदेशी मेकअप उतरवा, अन अस्स्ल भारतीय पोशाख परिधान करा. टाय कोट वाले नेते भारताला नकोत. असली रंगात या - आणी देशासाठी मरा. तुमच्या काही गोष्टी मात्र मला मनापासून पटतात. शेतकरी, कामकरी, मागासलेले आणी शोषित यांचे भले झाले पाहिजे. आम्ही आज मरू मरणाला भितो कोण ?


हाथ जिनमें हो जुनून कटते नही तलवार से
सर जो उठ जाते हैं वो झुकते नहीं ललकार से
और भडकेगा जो शोला सा हमारे दिल में है
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

हम तो घर से निकले ही थे बांधकर सर पे कफ़न
जान हथेली में लिये लो बढ चले हैं ये कदम
जिंदगी तो अपनी मेहमान मौत की महफ़िल मैं है
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है


पण आम्ही एक स्वप्न पाहिले होते ......आपल्या शहरांची चमकधमक ज्यांच्यामुळे आहे. आपले कारखाने ज्यांमुळे चालू आहेत. ज्यांचे हात आपल्यासाठी पाणी उपसतात.मुसळधार पावसात आणी तळपत्या उन्हात जे आपल्यासाठी अन्न तयार करतात. त्यांच्या भल्याचे स्वप्न आम्ही पाहिले होते. मनुष्य मनुष्याचे शोषण करू शकत नाही अशा भारताचे स्वप्न आम्ही पाहिले होते. समतेचे स्वप्न पाहिले होते,,,,, एक स्व्प्न नवाब महमूदाबाद सारखी खुर्ची फाटक्या अब्दुल्ला मिस्त्रीलाही मिळेल आणी ... जगतनारायणांसारखी इज्जत धनिया चांभारालाही मिळेल.

माझ्या क्रांतिकारी बंधूंनो .. मी खुष आहे आनंदी आहे. फायरिंग लाइन वर हसत जाणार्‍या आणी खंदकात बसून गाणे म्हणणार्‍या सैनिकासारखाच ...
कारण मात्रुभूमीच्या चरणांवर रक्त सांडून हसत फाशी जाणारा मी पहिला मुसलमान आहे ............





६. अश्फाक की आखरी रात : - (त्याच्या जिवनावरचे काव्य)



"जाऊँगा खाली हाथ मगर ये दर्द साथ ही जायेगा,
जाने किस दिन हिन्दोस्तान आज़ाद वतन कहलायेगा?
बिस्मिल हिन्दू हैं कहते हैं "फिर आऊँगा,फिर आऊँगा,
फिर आकर के ऐ भारत माँ तुझको आज़ाद कराऊँगा".

जी करता है मैं भी कह दूँ पर मजहब से बंध जाता हूँ,
मैं मुसलमान हूँ पुनर्जन्म की बात नहीं कर पाता हूँ;
हाँ खुदा अगर मिल गया कहीं अपनी झोली फैला दूँगा, 
और जन्नत के बदले उससे यक पुनर्जन्म ही माँगूंगा."




*******************************************************************************************************
फुटका चश्मा

* अश्फाकचे अनेक सक्खे नातेवाईक फाळणीनंतर पाकिस्तान गेले
* एकही तथाकथित राष्ट्रीय मुसलमान अश्फाक च नाव घेत नाही
*बहुसंख्य हिंदूंना हे नावही माहित नाही
* सावरकरांनी रत्नागिरी वस्तव्यात "जनतेचा प्यारा अश्फाक" याच नावाने एक लेख लिहिला होता. पण राजापेक्षा राजनिष्ठ असलेल्या सावरकरभक्तानी त्यांचे समग्र वाङमय छापताना तो नेमका गाळला.
पंडित रामप्रसाद बिस्मिल अन अश्फाक उल्ला खान ची जिगरी दोस्ती आजही तशीच आहे. दोघांचही स्वप्न मात्र फुटलय..
अश्फाक मरेपर्यंत नमाजी मुसलमान होता. पण धर्मापेक्षा त्याला देश वरचढ वाटत होता. गोर गरिबांचे हित महत्वाचे वाटत होते...
हाच त्याचा गुन्हा होता. हिंदू मुस्लीम एकतेसाठी आम्हाला वहाबिंपुढे शेपूट हलवायचीय आणी तबलीगींचे तळवे चाटायचेत.. फक्त काँग्रेस नाही.. संघाच्या सर्व धर्म समादर मंचातही तीच डोकी दिसतात
हिंदूची एक घाणेरडी मानसिकता याच कारण आहे - सर्वधर्मसमभाव

सर्वधर्मसमभावचे खूळ सोडून आपण धर्मनिरपेक्षते कडे वाटचाल केली पाहिजे असे एक विचारवंत ओरडून ओरडून सांगत राहिला..... त्याच नाव -

हमीद दलवाई  - दलवाइंचे मुसलमान - त्यांच्या चष्म्यातून भाग पाच वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 


 - डॉ. अभिराम दीक्षित
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html

त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद







*********************************************************************************************************
पूर्वपिठीका



प्रा शेषराव मोरे हे शिक्षणाने इंजिनिअर आहेत. कुरुंदकरांच्या परंपरेतले आहेत. काही वर्ष इंजिनिअरिंग कॉलेज मधे नोकरी केल्या नंतर त्यांनी ती सोडली आणी नंतरचे आयुष्य इतिहास, धर्मचिकित्सा ह्या विषयांना वाहून घेतले. पुरोगामी राष्ट्रभक्त म्हणून त्याना संबोधता येइल. सावरकरांवरच्या सर्व आरोपांना उत्तरे देणारे त्यांचे २ ग्रंथ वाचनीय आहेत. सावरकरांचे हिंदुत्व - सत्य आणी विपर्यास आणी सावरकरांचे समाजकारण एक चिकित्सक अभ्यास अशी त्या ग्रंथांची नावे आहेत. यदी फडके , रावसाहेब कसबे वगैरे पुरोगामी विचारवंतांनी सावरकरांवर केलेल्या टीकेला मोरेंनी दिलेली सडेतोड उत्तरे या ग्रंथांतून मिळतील. दैनिक सामनातून १० वर्षापूर्वी प्रसिद्ध होणारे त्यांचे "अप्रिय पण" हे सदर अजूनही स्मरणात असेल. प्रा मोरेंना सावरकरांचे आंधळे अनुयायी मात्र म्हणता येणार नाही. १८५७ चा जिहाद हे मोरेंचे पुस्तक याची साक्ष आहे.४०० पानांचे हे पुस्तक तब्बल २०० इंग्रजी , मराठी ग्रंथांचा अभ्यास करून लिहिलेले आहे. ह्यातली एकही ओळ संदर्भाशिवाय लिहिलेली नाही. सावरकरांच्या २५ व्या वर्षी लिहिलेल्या स्वातंत्र्यसमर या ग्रंथात १८५७ मधे हिंदू मुस्लिम ऐक्य झालेले होते असे प्रतिपदित केलेले होते. त्यावेळी सावरकर हिंदुत्ववादी न्हवते. सावरकरांच्या पुस्तकात - दिन दिन च्या घोषणा, हिरवी निशाणे, जिहाद वगैरेंचे उल्लेख शंभराहून जास्त वेळा कौतुकाने आलेले आहेत. मोरेंचे निष्कर्श सावरकरांशी जुळणारे नाहित. मोरेंचे सर्व विचार पटोत अथवा न पटोत पण त्यांचे मुद्दे विचारार्ह आहेत यावर दुमत होण्याचे कारण नाही. भुमितीच्या प्रमेयाप्रमाणे त्यांनी सदर पुस्तक वाक्यावाक्याला मुस्लिम आणी इंग्रज अभ्यासकांचे पुरावे देत लिहिले आहे.




*********************************************************************************************************
१८५७ च्या घडामोडीत वहाबी मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. ख्रिश्चनांच्या विरुद्ध धर्मयुद्ध इस्लामच्या परंपरेत होतेच ते पुनरुज्जीवित करण्याचा वहाबींचा प्रयत्न होता. वहाबींची चळवळ ही भारतातील ईंग्रज राजवटीची शत्रू होती, यात वादच नाही. पण ती इंग्रज विरोधासाठी जन्मलेली चळवळ नाही. भारतातील मुस्लिमांचे राज्य अबाधित रहावे या प्रेरणेची ती चळवळ आहे. या मूळ प्रेरणेसाठी सुरवातीला मराठ्यांचा विरोध, शीखविरोध आणी नंतर इंग्रजविरोध हे टप्पे आपोआप निर्माण झाले.

नरहर कुरुंदकर (जागर,२४०)
*********************************************************************************************************





त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद
(संदर्भ : १८५७ चा जिहाद. प्रा शेषराव मोरे. राजहंस प्रकाशन. )


१. जिहादपूर्व दोनशे वर्ष वर्ष: मौलवींची गुरुशिष्य परंपरा

सम्राट अकबर खर्‍या इस्लामपासून मार्गभ्रष्ट झाला आहे. त्याला पदच्युत करण्यासाठी शेख सय्यद अहमद सरहिंदी या महान धर्मपंडिताचा उदय १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात होतो. राष्ट्रीय पुरुष म्हणून त्यांचा गौरव करताना मौलाना आझाद म्हणतात - "शेख सय्यदांमुळे अकबराच्या गैरस्लामी दिने इलाही चळवळीवर प्राणांतिक आघात झाला व ती कायमची नष्ट झाली". सरहिंदींचे महान विचार होते - राम व रहीम एकत्र मानणे हा मूर्खपणाचा कळस होय. इस्लामचा मान हा कफिरांचा अवमान करण्यात आहे. झिजियाचा खरा उद्देश काफरांची मानहानी करणे हा आहे. सत्यधर्माचा खरा मार्ग (शरा) हा तलवारीच्या धारेखाली असतो.मुजादिद अल सानि या नावाने इतिहास सरहिंदीना ओळखतो.

अकबराचा मुलगा (सलीम) जहांगीर हा बापाचेच धोरण पुढे चालवू पहात होता. त्याविरुद्ध सरहिंदीनी गर्जना केली- " सैन्याने आता बादशहाच्या आज्ञा पाळू नयेत. " आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी सरहिंदींनी शेकडो शिष्य देशभर पाठवून दिलेले होते. जहांगिर भडकला. त्याने सरहिंदींना सरळ बेड्या ठोकल्या. दिल्लीच्या उच्चासनावर बसलेल्या जहांगिराला आपल्या मांडीखाली काय जळतय याची कल्पना नसावी. सरहिंदींच्या शेकडो प्रचारकांनी आपले काम चोख बजावले होते. सैन्यावरील सरहिंदीची पकड असंतोष पैदा करू लागली. झक मारत जहांगिर सरहिंदीना सोडतो; एवढेच न्हवे तर सैन्याचे प्रमूख धर्मोपदेशक म्हणून त्यांची नियुक्ती करतो. इथुन सुरू होतो इतिहासाचा एक वेगळा अध्याय. मुल्ला मौलवींच्या सैन्यावरील पकडीची बखर. धर्मगुरूंच्या राजकीय उलाढालींचा इतिहास. सरहिंदीच्या शिकवणीला आलेले गोंडस फळ म्हणजे शिष्योत्तम औरंगजेब होय.






आजही अनेक अतिरेक्यांना जन्म देणार्या वहाबी चळवळीचा ऐतिहासिक आरंभ हिंदु काफ़िरांच्या विरोधासाठी नाही . सहिष्णू आणि सेक्युलर अकबराच्या विरोधासाठी मौलविंनि उभारलेल्या बंडाचि ती परिणती आहे . 



औरंगजेबाचे राज्य पुढे उताराला लागले. पुढ्चे शतक मुघल साम्राज्याच्या र्‍हासाचे होते. मराठे शिरजोर बनू लागले. सरहिंदींची विचारकूस जन्म देते शाह वलिउल्लाह यांना (१७०३ ते १७६२). पानिपतच्या तिसर्‍या युद्धासाठी अब्दालीला आमंत्रण देताना ते लिहितात - "... थोडक्यात येथील मुस्लिमांची स्थिती शोचनीय झाली आहे. राज्य व प्रशासनाचे सर्व नियंत्रण हिंदूंच्या हातात गेले आहे. श्रद्धाहीन काफरांच्या सैन्याला पराभूत करण्यासाठी; हे अमीर ; अल्लाहच्या विनम्र सेवकाची प्रार्थना ऐका". १७६१ चे पानिपत मराठी भाषेत एक वाक् प्रचार बनून उरते पण त्या आधीच १७५७ सालीच प्लासीच्या लढाइत इंग्लंडचा युनियन जॅक डौलाने फडकलेला असतो. आता भारतभर तोच फडकणार असतो. १७६४ च्या बक्सारच्या लढाइनंतर हे चित्र अधिकच स्पष्ट होते. त्यावेळी शाह वलिउल्लाह पैगंबरवासी झालेले असतात. त्यांच्या विचारांचा झेंडा घेउन उभा ठाकतो त्यांचा सख्खा मुलगा. शाह अब्दुल अझीज.


१८०३ साली ब्रिटीश दिल्लीचे स्वामी झालेले असतात. शाह अब्दुल अझीज फतवा जारी करतो - भारत हा आता दार उल हरब (युद्धभूमी) झालेला आहे. त्याला दार उल इस्लाम करणे ओघाने फतव्यात येतेच! दक्षिण आशियाच्या मुस्लिम इतिहासातील सर्वात महत्वाचा व युगप्रवर्तक फतवा म्हणून याचा उल्लेख मुस्लीम अभ्यासक करतात. ह्या फतव्याच्या आधार केवळ १८५७ लाच घेतला गेला असे नाही; १९२१ मध्ये मौलाना आझादांनी याच फतव्याचा उल्लेख करत मुस्लीमांनी ब्रिटिश इंडियातून हिजरत करून अफगाणिस्तान मधे जावे असे म्हटले होते. ब्रिटीशांना हिदुस्थानातून हाकलून द्यावे यासाठी पुकारायचा जिहाद ह्याच फतव्यातून जन्म घेणार होता.


(सरहिंदी) मुजादिद अल सानि चे शिष्य वलिउल्लाह - वालिऊल्लाह पुत्र अब्दुल अझीज चे पटटशिष्य - सय्यद अहमद शहिद - त्यांचे पट्टशिष्य अलिबंधू आणी अलिबंधूंचा पट्टशिष्य म्हणजे बहादुरशहा जफर अशी थेट नाळ जोडता येते.पकिस्तानात ती जोडतात. १८५७ चा उठाव यशस्वी झाल्यास बहादुरशहा जफर हाच हिंदुस्थानचा घोषित सम्राट होता. खुल्क खुदाका, मुल्क बादशहा और अंमल झासी की रानी का अशा टाइपची घोषणा नानासाहेबांनीही दिली होती. १८५७ यशस्वी झाल्यास लोकशाही प्रस्थापित होणार न्हवती किंवा पेशवे हिंदुपदपादशाहीची द्वाही फिरवणार न्हवते. खुल्क कोणाचा ? मुल्क कोणाचा ? आणी अंमल कोणाचा हे आधीच ठरले होते ! मुस्लिम इतिहासकार ही गुरुशिष्य परंपरा फार महत्वाची मानतात. वलिउल्लह यांची चळवळ आज वहाबी म्हणून ओळखली जाते.

ही गुरुशिष्य परंपरा पाकिस्तानात मोगल राजवटी एव्हढीच महत्वाची मानली जाते.
http://storyofpakistan.com/the-mughal-empire/








२. उठावपूर्व स्थिती आणी कारणे :


१८५७ चा उठाव घडण्यासाठी तत्कालिक आणी ऐतिहासिक कारणे दिली जातात.
ब्रिटिशांनी संस्थाने खालसा करणे, आर्थिक पिळवणूक, ब्रिटिशांचा धर्मप्रसार अशी १८५७ ऐतिहासिक कारणे दिली जातात. काडतुसाला गाय आणी डुकराची चरबी लावल्याचे धार्मिक कारण दिले जाते. मुद्दा असा आहे की धार्मिक कारणांनी सर्वसामान्य हिंदू पेटून उठतो काय ? औरंगजेबाच्या सैन्यातले किती हिंदू शिवाजी महाराजांना येउन मिळाले ? अधिकतर संस्थाने कोणाची खालसा झाली होती ? ब्रिटीशांच्या धर्मप्रसाराने कोण अधिक चिडणार होते ? हिंदू की मुसलमान ?
शिवछत्रपतिंचा महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा का पडला होता? हा उठाव मुख्यतः उत्तर भारतात झाला.(झासी, कानपूर, मीरत, दिल्ली, आग्रा, अलाहाबाद). या ठीकाणी प्रामुख्याने कोणाची राज्ये होती ? ब्रिटीशांच्या सैन्याचे तीन विभाग होते. १)मुंबई २) मद्रास ३) बंगाल. सर्व मुख्य उठाव बंगाल तुकडीतच का झाले ? त्यातही त्यात घोडदळच का आघाडीवर होते ? बंगाल घोडदळात कोणाची संख्या लक्षणीय होती ? हिंदू की मुसलमान ?
या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे मोरेंनी प्रस्तुत ग्रंथात लिहिलेली आहेत.




**********************************************************************************************************




१८५७ चा उठाव हा वस्तुतः ब्रिटीशांविरुद्ध मुस्लिमांनी घोषित केलेला जिहाद होता. .. हा उठाव सय्यद अहमदनी ब्रिटीश राजवटीमुळे भारत "दार उल हरब" झालेला आहे म्हणून जे आंदोलन सुरू केले होते त्याचे पुनुरुत्थान होय. हा उठाव म्हणजे भारताला "दार उल इस्लाम" करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला प्रयत्न होता.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(समग्र आंबेडकर वाङमय खंड ८ पृष्ठ २९५. महाराष्ट्र शासन)
*********************************************************************************************************










३. १८५७ घटना कशा घडत गेल्या. : सावरकर उवाच 





सावरकरांच्या १८५७ वरील ग्रंथातील काही वाक्ये आपण पाहू . ज्याला तात्याराव सावरकर स्वातंत्र्य युद्ध मानतात त्या १८५७ च्या पुस्तकात तात्यांनिच जिहाद हा शब्द अनेकदा वापरला आहे .  १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहितेवेळी सावरकर २५ वर्षांचे होते. त्यांनी त्यावेळी इस्लाम धर्माचा अभ्यास केला   न्हवता. जिहादचा नीट अर्थही त्यांना त्यावेळी उमगला न्हवता. सावरकर लिहितात : -

जानेवारी १८५७ : बातमी पसरली - गायीच्या आणी डुकराच्या चरबीची नवी काडतुसे येत आहेत. ती दातानी तोडावी लागणार आहेत.

जानेवारी ते मार्च १८५७: बातमीबरोबरच क्रांतीचा गुप्त संदेश देणार्‍या चपात्या फिरवल्या जातात.  १८५७ चे स्वातंत्र्यसमर मधे या चपात्यांना उद्देशून सावरकरांनी म्हटले आहे " जा ,हे क्रांतीच्या देवदूता, तसाच पुढे जा ! आपली प्रियतमा तिच्या स्वातंत्र्यासाठी जिहाद करण्यास तयार झालेली आहे....ही शुभवार्ता तिच्या लेकरांना कळवण्यासाठी दहादिशांना धावत जा ! तीरासारखा पुढे जा ! ... हे मायावी देवदूता .... (१८५७ - ७५)

१६ मार्च १८५७ : सादिक अल अखबार या दिल्लीच्या व्रुत्तपत्राची हेडलाईन : पर्शियातील दरबारी लोकांनी आपल्या सम्राटाला सल्ला दिला की आपण ब्रिटीशांविरुद्ध जिहाद करून हिंदुस्थान जींकून घ्यावा. याविषयी सावरकर लिहितात - " १८५७ चे आरंभी दिल्लीच्या मशिदींवरून याच अर्थी सार्वजनिक जाहिरनामे फडकू लागले ! ' फिरंग्यांचे ताब्यातून हिंदुस्थानची मुक्तता करण्यासाठी इराणी सैन्य लवकरच येत आहे. तेंव्हा या काफिर लोकांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी समरांगणात उडी घ्यावी" (१८५७ - ६५). हेच सावरकर उत्तरायुष्यात हिंदुत्ववादी झाले. पुढे उत्तरायुश्यात गांधींनी अफगाणिस्तानच्या अमिराला आवताण धाडले होते तेंव्हा सावरकरांनी पायताण उगारले होते.

२९ मार्च १८५७ : मंगल पांडे गोळी झाडतो. (मंगल पांडेचे मार्गदर्शक मित्र म्हणून नक्कीखान आणी वहाबी नेता पीर अली याचा सावरकरांकडून गौरवपूर्ण उल्लेख. ) (१८५७ -६७, २८५)

१० मे १८५७ : मीरत चा उठाव (घोडदळाकडून प्रारंभ). बंडखोर कैदी मुक्त. अनेक ब्रिटिशांना कायमची मुक्ती. याविषयीचे सावरकरांचे भाष्य मुळातुनच वाचण्यासारखे आहे !.

११ मे १८५७ : बंडखोर सैन्य दिल्लीत दाखल. बहादुरशहा जफर ला बादशहा घोषित केले. आज्ञापत्रांवर बहादुरशहाची राजमुद्रा झळकू लागली. " विजयाचा अधिपती ! धर्माची ज्योत ! इस्लामचा संरक्षक - सम्राट मुहंमद बाहदुरशहा." याविषयी सावरकर लिहितात " बादशहाचे राज्याहरोहण म्हणजे जुन्या मोगल सत्तेची पुनःस्थापना न्हवती. ते हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक होते." (१८५७ -२२८)

१९ मे १८५७ : दिल्लीतील सर्व ख्रिश्चनांचे शिरकाण त्यानंतर दिल्लीत हिंदूंविरुद्ध जिहादची घोषणा. सावरकर लिहितात - काही माथेफिरू मुस्लिमांनी हिंदूविरुद्ध जिहादची घोषणा केली. (१८५७ - २३०)

जून १८५७ : उत्तर भारतात बंडाचा वणवा पेटतो. सावरकर लिहितात - लखनौला तर मशिदी मशिदीतून मौलवींनी जिहाद सुरू करण्यासाठी उघड व्याख्याने देत असावे. पाटणा व हैद्राबाद येथे रात्रीरात्रीतून सभा भरत व निरनिराळ्या मौलवींकडून लोकांस स्वातंत्र्ययुद्धाचे व स्वधर्मयुद्धाचे शिक्षण देण्यात येई. (१८५७ - ६६)
१ नोव्हेंबर १८५८ : शिखांच्या मदतीने ब्रिटीश बंड चिरडतात राणीचा जाहिरनामा प्रकाशित. सावरकर - शिखांनी देशद्रोह केला असे म्हणतात. (१८५७ - १२४)


(१८५७ -१२४ हा संदर्भ समग्र सावरकर वाङमय खंड चार १८५७ चे स्वातंत्र्यसमर पृष्ठ १२४ असा वाचावा. वीर सावरकर प्रकाशन, मुंबई. १९६३)








शिखांच्या भूमिकेबद्दल सरदार खुशवंतसिंगांचे विचार - 

" मीरत आणी दिल्लीच्या बंडखोरांनी मोगल साम्राज्याच्या पुनःस्थापनेची घोषणा केली. आपल्या वाडवडिलांवर मोगलांनी केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या एकत वाढलेल्या शिखांचा - बहादुरशहा जफर सम्राट होण्याला तीव्र विरोध होता. शिखांनी दिलेल्या संरक्षणात होडसन ने राजपुत्रांना ठार केले. शीखांनी त्या बहादुरशहापुत्रांची प्रेते चांदनी चौकात लटकवली ..... त्याच ठीकाणी.... जेथे गुरु तेग बहादुरांना औरंगजेब बादशहाने ठार केले होते."
शिखांनी हा सूड उगवला होता : मेलेल्या मुस्लीमांच्या प्रेतांवर एक एक सपाटे लगावित ते ओरडत होते - हा घ्या गुरु गोविंदसिंगांसाठी... आणी हा ... आणी हा ..आणी हा ... तीन गुरुंसाठी.








४. ऊठावाचे प्रेरक, नायक आणी लाभधारक हिंदू की मुसलमान ?




नानासाहेब पेशवे : २० एप्रिल १८५९ रोजी नानासाहेबांनी ब्रिटिशांना लिहिलेले पत्र प्रामाणिक आणी वीरश्रीयुक्त आहे:
" मी असहाय्य म्हणून बंडखोरांना मिळालो ... सैनिक माझ्या (मूळ) प्रदेशातले न्हवते.... दबावाखातर मला बंडखोरांना मिळणे भाग पडले.... आता माझा नाईलाज आहे. मी तुमच्याशी लढायला तयार आहे.मी एकटाच राहिलो आहे. आपली लौकरच गाठ पडेल आणी त्यावेळी तुमचे रक्त सांडून ते गुढगाभर खोल साचेल. तुमच्यासारख्या सामर्थ्य वान राष्ट्राचा मी शत्रू आहे याचा मला अभिमान आहे. मरण तर एके दिवशी यीलच, त्याला भितो कोण ?"

नानासाहेबांचे हे निर्वाणीचे पत्र त्यांचा स्वदेशाभिमान आणी शौर्य तर दाखवतेच पण ते कोणत्या परिस्थितीत १८५७ च्या बंडात सामिल झाले ते ही दाखवते. हे माफीपत्र नाही. गनिमीकावा नाही. ब्रिटीशांना दिलेले उघड अव्हान आहे. नाइलाजाने आपण बंडात सामिल झालो असेच नानासाहेब म्हणतात.
फौजेची घोषणा होती - खुल्क खुदाका, मुल्क बादशहा , हुकुम नानासाहेब और फौज बहादुरका




तात्या टोपे  यांनी म्हटले आहे : पायदळाच्या आणि दुसर्‍या घोडदळाच्या तुकड्यांनी आम्हाला घेरले आणी नाना व मला खजिन्याच्या खोलित कैदी म्हणून ठेवले. त्यानंतर बंडवाल्यांनी आम्हाला बरोबर नेले.






झाशीची राणी नाइलाजाने युद्धात पडली पण शेवटच्या हौतात्म्याने भावी पिढ्यांसमोर आदर्ष निर्माण करून गेली.
तात्या, नाना किंवा झाशीची राणी देशभक्त आणी स्वाभिमानी होते यात शंका नाही; १८५७ च्या उठावात ते नाखुशीने आले पण आपल्या तेजाने झळाळून उठले.

१८५७ सालीच इंग्रज पराभूत झाले असते तर ? या देशात लोकशाही येणार होती काय ? हिंदुपतपातशाही येणार होती काय ? या प्रश्नात अजून एक प्रश्न आहे..... तर देशाचे भविष्य काय असते ?

हमीरपुरचा अलिबक्ष, बांद्याचा नवाब, मौलाना लियाकत अलि, हाजी इमादुल्लाह, बुलंदशहरचा वलिदाद खान, आग्र्याचा वजिर खान्,अलिगडचा गौस मुहम्मद खान, अयोध्येचा मौलाना अहमदशहा, आझमगडचा मुझफ्फर जहान; गोरखपूरचा मुहम्मद हसन, राहतगडचा नवाब, मुरादाबाद चा मज्जूखान हे या उठावाचे ऊठावाचे प्रेरक, नायक आणी लाभधारक होते.

हिंदुस्थानचा घोषित बादशहा होता : बहादुरशहा जफर




हे छायाचित्र १८५८ चे इंग्रजांच्या कैदेतल्या बादशहाचे आहे. बादशहा शायर होता. बादशहाला कैदेत टाकले. त्याच्या दोन मुलांची शिरे कापून ती त्याच्या समोर पेश करण्यात आली. त्यावेळी इंग्रजांचा एक हुजर्‍या बादशहाला म्हणतो,

"दमदमाये में दम नही अब खैर मानो जान की !
ऐ जफर, ठंडी हुई अब तेग हिंदुस्थान की !!"

त्यावर उसळून डोळ्याचा अंगार फेकीत बादशहाने दिलेला जवाब इतिहास सांगणारा मंत्र ठरला.

"गाजीयों में बू रहेगी जब तलक ईमान की !
तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की !!"

यातल्या गाजी आणी इमान या शब्दांचे अर्थ जरूर पहावेत.
http://www.islambasics.com/view.php?bkID=999999&chapter=9


५. उठाव काळातील जिहादी जाहिरनामे

या जाहिरनाम्यांचा सर्वधर्मसमभावी म्हणून गौरव केला जातो. संख्या शेकड्यात आहे. विस्तारभयास्तव केवळ बहादुरशहा व नानासाहेबांचे मोजके सर्वधर्मसमभावी जाहिरनामे बघू.

बहादुरशहाचे जाहिरनामे :

@ इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात सामिल होणे हे हिंदू व मुसलमान यांचे अनिवार्य कर्तव्य आहे.
@विविध मार्गांनी येथील धर्माना नष्ट करण्याचे काम इंग्रज करत आहेत. तेंव्हा सर्व हिंदूनी गंगा, तुळस व शाळिग्राम यांची तर सर्व मुस्लिमांनी खुदा व कुराण यांची शपथ घ्यावी की; इंग्रजांना ठार मारणे हे आपले धर्मकर्तव्य आहे.
(येथे मुस्लिमानी खुदाची अन कुराणची शपथ पण हिंदूंनी मत्र आपल्या देव आणी धर्मग्रंथांची शपथ न घेता झाडे, नदी अन दगडाची शपथ घ्यायची आहे. अल्लाशिवाय इतर सर्व देव हे सैतानाची रूपे आहेत हा वहाबी विचार यामागे आहे. अल्लसोबत इतर देवताना मान देणे यास शिर्क असे म्हणतात कट्टरवाद्यांच्या लेखी तो महान गुन्हा आहे. )
@ रोहिलखंडाच्या नवाबाला पठवलेल्या आदेशात बहादुरशहा लिहितो - खुदाच्या क्रुपेने हिंदुस्थानातून कुफ्र व शिर्क यांचे उच्चाटन झाले असून इस्लामची प्रस्थापना झाली
.. आता शरियत विरोधी एकही गोष्ट घडता कामा नये.



नानासाहेबांचे जाहिरनामे :

@ सर्वश्रेष्ठ व सर्वशक्तीमान खुदाच्या कृपेने व बादशहाच्या शत्रुसंहारक सुदैवाने ... ख्रिश्चन लोकाना पकडून नरकलोकी पाठवण्यात आलेले आहे. त्याबद्दल आनंद साजरा केला पहिजे.
@काफिर इंग्रज या देशात व्यापार करण्याच्या मिशाने आले
@ दयामाया न दाखवता काफिरांची कत्तल करा त्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल.
हि शिकवण नानासाहेबाच्या धर्माची नाही हे उघड आहे. आणी त्याच्या नावाने कोण जाहिरनामे काढत होता हे पुस्तकात उलगडले आहे.





६. ऊठाव काळातील हिंदू मुस्लिम संघर्ष

बहादुरशहाचा पुत्र व गादीचा सांभाव्य वारस जवानबख्त याने - एका वेळेस एक शत्रू - हे धोरण स्पष्टपणे व्यक्त केले होते. " काही दिवसांतच आम्ही काफिर इंग्रजांना पायाखाली तुडवू व त्यानंतर हिंदूंना ठार करू." (तळटीप पान १६७)
ब्रिटीशांना हाकलून देण्यासाठी हिंदूंच्या सहकार्याची आवश्यकता होती; तेंव्हा त्यांना चुचकारून धक्क्याला लावण्यात आले. पण वहाबींची मूळ प्रेरणा इस्लामी मूलतत्ववादाची असल्याने एकतेचे गारूड फार काळ टिकले नाही.
उठावकाळातील हिंदू मुस्लिम संघर्ष मोरेनी २० पानात लिहिला आहे.



*******************************************************************************************************
हिंदू मुस्लिमात संघर्ष न होणे देशासाठी आवश्यक आहे. पण हा सत्यशोधन टळणे हा त्यासाठीचा मार्ग न्हवे. १८५७ चा जिहाद हे पुस्तक पूर्ण वाचल्यानंतरच मोरेंचा जिहाद नेमका कशाविरुद्ध आहे ते कळू शकेल.
******************************************************************************************************

 - डॉ. अभिराम दीक्षित, पुणे 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html


कुरुंदकरांचा अकबर

त्यांच्या चश्म्यातून 
माझ्या लहानपणी मिस्टर इंडिया नावाचा एक सिनेमा आला होता. हातात वैज्ञानिक जादूचे घड्याळ बांधून अनिल कपूर अद्रुष्य व्हायचा. काहि केल्या तो मोगँबोला दिसायचा नाही. मग मोगँबो लाल काचेच्या चश्म्यातून बघायचा. अनिल कपूर दिसायचा. आपण चश्म्याचा रंग बदलला की नजरेसमोरचे दृष्य बदलते. कविळ झालेल्याला पिवळे दिसते म्हणतात. परकाया प्रवेश करून - दुसर्‍याच्या नजरेतून तिसर्‍याकडे पहाण्याची तर मजाच काही और आहे. असे करताना लेखकाने लिहिलेल्या शेकडो पानातून त्याचा द्रुष्टीकोन समजून थोडक्यात मांडणे आणी मूळ लेखकाच्या / विचारवंताच्या खुसखुशीत शैलीला धक्का लागू न देणे; ह्या दोन्ही जवाबदार्‍या पार पाडण्याचा आमचा मानस आहे.
 त्यांच्या चश्म्यातून - भाग १. -

**********************************************************************************************************

त्यांच्या चश्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर

(संदर्भ : आकलन, जागर, शिवरात्र)
धर्मवेडा तुर्की बाबर पनिपताची पहिली लढाई जिंकला. संग्रामसिंग विरुद्धच्या या लढाईला तो जिहाद म्हणत असे. आपला इस्लाम धर्म इतरांच्यावर लादणे हा त्याला आपला हक्क वाटत असे. हिदुस्थानचा हा पहिला तुर्की राजा. त्यामागे त्याचे बावळट पोर हुमायुन गादीवर बसले. राज्य संभाळता न आल्याने ते आपला जिव वाचवत पळत होते. त्या धवपळीच्या कालखंडात १५४२ साली त्याला मुलगा झाला. अबुल मुताह जलालुद्दीन महमद अकबर.


 


या परदेशी रक्ताच्या अकबराचे अनघा नावाच्या भारतीय दाईने संगोपन केल्याची नोंद आहे. १३ व्या वर्षी तो राजा झाला. पण राजधानीच न्हवती. दिल्लीचा ताबा त्यावेळी हिमू या पराक्रमी हिंदू राजाकडे होता. तो स्वत:ला विक्रमादित्य म्हणवून घेत असे. त्याने स्वतःचे हिंदू राज्य निर्माण केले होते. अकबराचा आणि त्याचा संघर्ष अटळ होता. पनिपतचे दुसरे युद्ध झाले. केवळ दैवयोगाने अकबराने ही लढाई जिंकली. हीमू काफराचे स्वतःच्या हाताने मुंडके उडवले. काफिरांना ठार करणारा धर्मयोद्धा म्हणून - गाझी - ही इस्लामी धर्मशास्त्रातली पदवी स्वतःला लावून घेतली. त्यावेळी अकबराचा मार्गदर्शक होता. - बहरामखान.


अकबर हा काही दयाळू संत न्हवे. सदगुणांचा पुतळा ही न्हवे. तो मध्ययुगातला विचारी राजा आहे. आणी नव्या अनुभवानी.... नव्या विचारानी माणसे बदलतात.... याचे उदाहरण आहे.


 पुढे मार्गदर्शक बहरामखानाशी अकबराचे वाजले. मग बहरामखानाची हकालपट्टी झाली. १५६२ सालपासून - वीस वर्षांच्या अकबराच्या स्वतंत्र कार्यकर्तुत्वाला आरंभ होतो. त्यावेळी तो पुत्रप्राप्तीसाठी आतुर होता. दरसाल अजमेरची यात्रा करत होता. पुत्रप्राप्तीसाठी यात्रा - जत्रा हा काही मोठा पुरोगामी द्रुष्टीकोन न्हवे ; पण अशा प्रकारची तर्कातीत धर्मश्रद्धा त्यावेळी सार्वत्रिक होती. अशाच यात्रेत राजा बिहारीमलची कन्या जोधाबाईशी अकबर लग्न करतो. त्याआधी तिला मुसलमान करून घेतो. हेही पुरोगामीपणाचे द्योतक न्हवे. तुर्की रक्ताचा अभिमान गळून पडलेला आहे पण विशीतला अकबर अजूनही धर्मनिष्ठ मुसलमान आहे.

उदारमतवादी मुसलमान व्हायचे की धर्मपिसाट मुसलमान व्हायचे हे दोनच पर्याय अकबरापाशी आहेत. जोधाबाईशी झालेल्या लग्नानंतर अकबर पहिला पर्याय निवडतो.


राजपूत विषयक अकबराच्या धोरणातला बदल इथपासून सुरू होतो. राजपूतांना सन्मानाने वागवणे. त्यांना मुसलमानांपेक्षा वरच्या हुद्द्यावरच्या जागा देणे वगैरे गोष्टी सुरू होतात. त्यावेळच्या काळाचा विचार करता ह्याला थोडाबहुत पुरोगामीपणाच म्हणावे लागते. त्याकाळात गोव्यातले पोर्तुगीज रक्तरंजित इन्विझिशन मधे मग्न आहेत. राणी एलिझाबेथ च्या इंग्लंडमधे - चर्चमधे उपस्थित राहण्यासाठी आयरिशांना कर द्यावा लागतो आहे. हिंदू धर्मपंडितात एकाहून एक कर्मठ भूमिका घेण्याची चढाओढ आहे. त्या काळातला अकबराचा हा मर्यादित उदारमतवाद आहे.


नंतर अकबर पुढचे पाउल टाकतो; आणि मुल्लामौलवी बिथरतात. "युद्धात जिंकलेल्या हिंदूना सक्तीने मुसलमान करण्यात येणार नाही" असा सरकारी आदेश अकबर काढतो.

 या आज्ञेने मौलवी चिडणे स्वाभाविक होते. मुस्लिम धर्मशास्त्रानुसार मुसलमान फक्त दोन कारणांसाठी लढतो. एकतर काफिरांनी त्रास दिल्यास करायचा जिहाद किंवा भविष्यात त्यांचा त्रास होउ नये म्हणून आधीच केलेला जिहादी हल्ला. हा हल्ला करताना; एकमेव सत्यधर्माचा - इस्लामचा प्रचार जगभर करण्याचे ध्येय ह्रुदयात बाळगायचे असते. बिगर मुस्लिमांशी होणारे प्रत्येक युद्ध हे धर्मयुद्ध - जिहाद मानले जावे असा मौलवींचा कायम आग्रह असतो. दोन मुसलमान राजे आपापसात भांडले तरच ते खाजगी भांडण मानले जाते. अकबर म्हणतो - की माझ्या हिंदूंशी झालेल्या लढायांचा आणी इस्लाम धर्माचा काही संबंध नाही. लढाई ही खाजगी गोष्ट आहे.


हा इस्लामी धर्मशास्त्रात उघड हस्तक्षेप आहे. १५६२ साली त्याने अजून एक सरकारी आदेश काढून सदर उल सदरचे - इस्लामी धर्मपीठाचे अधिकार कमी केले. पण अकबर इतके करून थांबला नाही १५६३ साली त्यानी हिंदूंवर असलेला धार्मिक यात्राकर रद्द केला. त्यापुढे जाउन १५६४ साली झिजिया कर रद्द केला. हिंदूंच्यावर झिजिया कर लावावा का ? हा इस्लामी पंडितातला एक विवादास्पद मुद्दा होता.


जो इस्लामी देश आहे तो दार उल इस्लाम (शांतताभूमी) आहे. जो देश मुस्लीमांचा नाही तो दार उल हर्ब (युद्धभूमी) आहे. इस्लाम हा एकमेव सत्यधर्म असल्याने त्याचा प्रचार आवश्यकच. त्यासाठी दार उल हर्ब ला दार उल इस्लाम बनवण्यासाठी लेखणी; वाणी आणी तलवारीने जिहाद करणे हे प्रत्येक इमानदार मुस्लिमाचे कर्तव्य आहे. दार उल हर्ब मधले लोक ज्यू किंवा ख्रिस्ती असतील तर ते अहले किताबी होत. एकेश्वरवादी होत. त्यांना जमल्यास मुसलमान करावे किंवा सूट म्हणून त्यांवर झिजिया कर लावला पाहिजे. पारशी वगैरे अग्निपूजक काफिरांना ठार मारले पाहिजे अथवा मुस्लिम केले पाहिजे. इथपर्यंत मौलवींत एकमत होते. प्रश्न हिंदूंचा होता. मुहम्मदाला हे लोक माहित नसल्याने त्यांबद्दल कुराणात स्पष्ट उल्लेख नाही. पण हे लोक मूर्तिपूजक असल्याने त्यांना मारावे किंवा अल्लाच्या एकमेव सत्यधर्मात आणावे असे एक गट म्हणत असे. मौलवींचा दुसरा गट हिंदूंची मूर्तीपूजा वरवरची असून ते मूलतः एकेश्ववरवादी असल्याने त्यांना झिजियाची सवलत दिली पाहिजे असे प्रतिपादित करे.

अकबराने दोघांचा गाशा गूंडाळला. इस्लाम धर्माची मूळची भूमिका शांतीचीच आहे असे तो म्हणू लागला. झिजिया सरळ माफ केला. अजून अकबर स्वतःला धर्मनिष्ठ मुस्लिम समजत असे.


तो नवा विचार करू पहात होता पण काळाच्या सर्व मर्यादा त्यालाही होत्या. १५६६ साली त्याने दुर्गावती राणीला युद्धात मारले. तिच्या सुनेला आणि बहिणीला पकडून स्वतःच्या जनानखान्यात टाकले. अकबराच्या अंतःपुरात ५००० स्त्रीया असल्याची नोंद आहे. तत्कालीन हिंदू राजांतही बहुपत्नित्व होतेच. महाराणा प्रतापाला ११ बायका होत्या. जितांच्या स्त्रिया जनानखान्यात घालण्याची प्रथा हिंदूतही होती.

अकबर त्याच्या आज्या प्रमाणे विपुल प्रमाणात दारू पित असे. बापाप्रमाणे अफू घेत असे. आणी स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य म्हणून सर्व मादकद्रव्ये एकत्र करून "सबरस" नावाचे पेय बनवून पीत असे. अकबराचा मोठेपणा सांगत असताना त्याची चैन, भोग, अतिरिक्त विलास नाकारण्याचे काहिच कारण नाही. १५६८ ला अकबराने चितोड जिंकले. हा आनंद साजरा करण्यासाठी पकडलेले ८००० राजपूत सैनिक मारले. त्यानंतर ३०,००० निरपराध नागरिकांची कत्तल केली. पण युद्धाला धार्मिक रंग येवू दिला नाही.


१५६३ ते १५६७ ह्या काळात अकबराच्या सन्निध्यात वेगवेगळे विद्वान आलेले दिसतात. प्रथम विरवर जो बिरबल या नावाने विख्यात आहे. राजा तोरडमल, राजा मानसिंग आणी वीरवर ह्या हिंदू मित्रांच्या सानिद्ध्यात एक वेगळाच अकबर आकारू लागला. अकबर स्वतः सुन्नी मुस्लिम असला तरी त्याचा लहानपण पासूनचा शिक्षक लतीफ कझवानी हा शिया मुस्लिम होता - त्याची धार्मिक भूमिका "सुलह ई कुल" या नावाने ओळखली जाते. साधारणपणे सर्वधर्म समभावाच्या जवळ जाणारी ही भूमिका आहे. अकबराच्या अंतःपुरातील हिंदू स्त्रियांचाही त्यावर प्रभाव पडत होता.

मुख्य म्हणजे नव्या अनुभवातून नवे शिकण्याची.... स्वतःची मते बदलण्याची एक विलक्षण शक्ती अकबराजवळ होती. त्याकाळी ती दुर्मीळ होती.


१५७३ साली तो गुजराथला गेला. त्यावेळी एका पारशी धर्मपंडिताशी त्याची भेट झाली. मूळचे इराणचे पारशी अग्निपूजक असतात. सैतान हा अग्नीपासून बनलेला आहे असे कुराणात लिहिलेले आहे. पारशी वगैरे अग्निपूजक काफिरांना ठार मारले पाहिजे अथवा मुस्लिम केले पाहिजे. इथपर्यंत मौलवींत एकमत होते. अरबांनी इराण जिंक्ल्यानंतर सर्व देश मुसलमान करण्यात आला. धर्मासाठी जिव घेवून भारतात पळालेले लोक म्हणजे पारशी. दस्तूर मेहराजी राणा या पारशी धर्मपंडिताशी चर्चा केल्यानंतर अकबराने म्हटले - पारशी हा देखील एक इश्वरी धर्म आहे !




शीख धर्माकडेही अकबराचे लक्ष होते. गुरू अर्जुनसिंग यांच्याशी अकबराने अनेकदा चर्चा केली. गुरु ग्रंथसाहेब हाही एक दैवी धर्मग्रंथ आहे असे अकबर मानू लागला. धार्मिक विषयांवर चर्चा करण्याचा छंद अकबराला लागला आणि इबादतखान्याचा जन्म झाला. शिया, सुनी, पारशी, शीख, जैन, बौद्ध, वैष्णव, शैव असे वेगवेळ्या पंथांचे पंडित बोलावून इबादतखान्यात अकबर त्यांच्याशी चर्चा करू लागला. येथे चार्वाकाचे अनुयायी येवून गेल्याचे नोंद आहे. या चर्चात परस्पर मतांचे मंडन , खंडन होत असे. कफिरांना कुराणचे खंडन करायचा अधिकार देणे मौलवींना पटण्याजोगे न्हवते.



 हळूहळू सर्वच धर्म खरे आहेत अशा भुमिकेवर अकबर येवून पोचला.


सैन्याच्या हालचालींमुळे शेते तुडवली गेल्यास; नुकसानभरपाइ देण्याचा हुकुम अकबराने याच काळात काढला. पुढे मुस्लिम धर्मगुरूंचा ब्लास्फेमीचा अधिकार अकबराने काढून घेतला. इस्लामचे प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांवर कुणी टीका केली तर मुसलमान ते सहन करू शकत नाहीत. अशी टीका करणार्यांचा छळ करण्याचा अधिकार मुस्लिम धर्मगुरूंकडे असतो. आजही सर्व मुस्लीम देशात हा कायदा आहे. १५७९ साली अकबराने हा कायदा रद्द केला.


राजा मानसिंग हा श्रद्धाळू वैष्णव होता. त्याने अकबराची वल्लभ संप्रदायाच्या संतांशी भेट घडवून आणली. भेटीनंतर अकबराने वृंदावनाच्या परिसरातले सर्व कर माफ करून टाकले. त्या परिसरात गोहत्याबंदीचा कायदा केला. १५८० साली अकबराने कायदा केला की - आजपर्यंत ज्याना जबरदस्तीने मुस्लिम करण्यात आले आहे - ते सर्व त्यांच्या मूळच्या धर्मात परत जाउ शकतात.


सुनी धर्ममतावर अकबराची फारशी श्रद्धा नाही असे शिया मुस्लिमांना वाटले. त्यांनी अकबराला शिया करण्याचा असफल प्रयत्न करून पाहिला. १५८० सालीच अकबराने ज्येसुईट मिशनर्यांना चर्चेसाठी बोलावले होते. अकबराला त्यांची स्वेच्छेने दरिद्री राहून आयुश्यभर जनसेवा करण्याची मिशनरी व्रुत्ती आवडली. पण मिशनर्यांचा प्रयत्न अकबराला ख्रिश्चन करण्याचा होता. त्याला मात्र अकबर बधेना. मिशनर्यांनी त्याला पाखंडी ठरवले.

मिशनरी लिहितात - " अकबर हिंदूसारखा मिश्या ठेवतो. दाढी ठेवत नाही. तो सूर्याची पूजा करतो. तो नास्तिक आणी पाखंडी आहे. फाजील जिज्ञासा हे त्याचे वैशिष्ट्य आहे."


 इस्लामचे प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांवर कुणी टीका केली तर मुसलमान ते सहन करू शकत नाहीत. अशी टीका करणार्यांचा छळ करण्याचा अधिकार  - ब्लास्फेमी.  अकबराने कायदा केला कि (स.व . ) मुहम्ममद पैगंबरांवर  विकृत टिका करायची नाही . पण सकारात्मक टिका किंवा टिपण्णी केली तर चालेल .  आणि हा  - अशी टिका करण्याचा अधिकार त्याने सर्व धर्मियांना दिला .  अकबराने ब्लास्फेमीचा कायदा रद्द केल्यामुळे मौलवी चिडले. त्यांनी अकबराविरुद्ध बंड केले. कलक्त्त्याला मोठे बंड झाले.

 अकबराचा पाडाव झाल्याशिवाय भारतात इस्लामला भविष्य नाही असे मौलवींना वाटत होते. त्यांनी अकबराला काफर म्हणून जाहीर केले आणी अकबराविरुद्ध जिहाद पुकारला. अकबराने उलेमा आणी मौलवींचे बंड क्रूरपणे चिरडले. अनेक शेख आणी फकीर हद्दपार केले. अनेकांना कंदाहरच्या बाजारात विकले. त्यांच्या दर्गे आणी मशीदिंच्या जमिनी जप्त केल्या. राजकीय गोंधळ घातल्यास वक्फ च्या जमिनी जप्त करणारा आणी इस्लामी धर्मवेड्यांना गुलाम करून कंदाहरच्या बाजारात विकणारा, अकबर हा पहिला आणी शेवटचा भारतीय.


अकबराला सुन्नी रहाण्यात रस राहिला न्हवता. त्याला शिया व्हायचे न्हवते. त्याला ख्रिश्चन बनवण्याचे मिशनर्यांचे सर्व प्रयत्न फसले होते. हिंदूत धर्मप्रसाराची सोयच न्हवती ! अकबराच्या डोक्यात वेगळीच चक्रे फिरत होती. त्याने सगळ्या धर्मचर्चा ऐकल्या होत्या. बर्या वाइट गोष्टी सगळ्याच धर्मात असतात असे त्याला वाटू लागले. वाईट गोष्टी टाळून सगळ्याच धर्मातल्या चांगुलपणा एकत्र केला तर ? दीने इलाही चा जन्म होत होता.

(या इलाही इलिल्लाही; मुहम्मद रसूलिल्लाहि.) अल्लाह एकच आहे. आणी मुहम्मद हा त्याचा शेवटचा प्रेषीत आहे हा इस्लामचा मूलभूत नियम आहे. अकबराने हा नियम मोडला आणी स्वतःलाच पुढचा प्रेषीत जाहीर केले. वेद; रामायण महाभारत यांची फारसीत भाषांतरे करून तो अभ्यासू लागला. त्याला आता एक परिपूर्ण आणी नवा असा धर्म - दीने इलाही बनवायचा होता.


मुस्लिमांच्या शाळातून, मदरशातून त्यावेळी प्रथम अरबी भाषा आणी नंतर धर्मशास्त्रांचा अभ्यास होत असे. अकबराने अशी भूमिका घेतली की या फालतू अभ्यासात काय अर्थ आहे ? शाळातून इतिहास, तत्त्वज्ञान, गणीत, वैद्यक, ज्योतिष याचा अभ्यास झाला पाहिजे. एका अर्थाने आधुनिक अभ्यासक्रमाची भूमिका आहे.

अकबराच्या म्रुत्युनंतर बर्याच वर्षांनी शिवरायांच्या एका पत्रात अकबराचा उल्लेख येतो अशी वदंता आहे.


शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाठवलेले पत्र 




 औरंगजेबाने जेव्हा धर्मांधपणा सुरु केला आणि जिझिया कर लावला तेंव्हा त्याला तुझ्या साम्राज्याचा नाश होईल असे पत्र   शिवाजी महाराजांनी पाठविले आणि त्यात  लिहिले  : - 


" सांप्रत अमुच्या संगे युद्धप्रसंगानंतर आपले संपत्ती खर्च झाले असता पादशहा-खजिना रिकामा जाहला, याकरिता हिंदू लोकांकडून जाजिया पट्टीचे द्रव्य उत्पन्न करून पादशाही गरजा त्याच्याआधारे पूर्ण करीत आहां असे ऐकण्यास आले. हि पादशाही निर्माण करणारा ( जलालुद्दीन) अकबर बादशहांनी न्यायाने ५२ वर्षे राज्य केले. त्यांनी ख्रिस्चन, ज्यू, मुस्लिम, दोउद पंथीय, काफर ( ansari), नास्तिक ( दहारिया ), ब्राह्मण ( वैदिक) आणि जैन धर्मगुरू या सर्व धर्म पंथीयांना वैश्विक हितसंबंध जोपासणारे प्रशंसनीय असे धोरण अवलंबले होते. त्यांच्या या अशा सहीष्णू हृदयाचे ध्येय एकच होते ते म्हणजे सर्व लोकांना आनंदी ठेऊन त्यांचे रक्षण करणे होय. त्यामुळेच त्यांची कीर्ती "जगत गुरु" या नावाने पसरली.
(Doubtful source of the letter ) 

१५८४ नंतर अकबर अश्रद्ध बनत चालला. कुराणात लिहिलेले सर्व चमत्कार खोटे आहेत असे म्हणू लागला. एका स्त्री चा चेहरा आणी मोराचे पंख असलेल्या घोड्यावर बसून प्रेषीत मुहम्मद स्वर्गात जावून अल्लाहशी बोलले असा उल्लेख कुराणात आहे.

 अकबराला हा चमत्कार अमान्य होता. ख्रिस्ती मिशनर्यांसमोरच्या चर्चेत अकबराने ही भाकडकथा आहे असे म्हटले. पण हेच नियम अकबर बायबल मधल्या चम्त्काराना लावू लागला तेंव्हा मिशनर्यांनी त्याला पाखंडी
 ठरवले.

 त्यापुढे जावून त्याने सर्वच धर्मातले सर्वच चमत्कार खोटे आहेत अशी भुमिका घेतली.

शेवटच्या चार्वाकाचा ऐतिहासिक उल्लेख अकबर बादशहाच्या काळात आढळतो . हा शहाणा अकबराची भेट घेऊन त्याला आपली नास्तिकता पटवून देत होता . धर्माची चर्चा आणि चिकित्सा करण्यासाठी अकबराने इबादतखाना नावाचे नवे ऑफिस उघडल्याचे इतीहासाने नोंदवले आहे. तिथे त्याने सगळ्या धर्माच्या पंडितांशि चर्चा केल्या . उत्तर आयुष्यात १५८२ साली अकबराने इस्लाम धर्म सोडून दिला आणि दिने इलाही नावाचा नवाच धर्म काढला .त्याच्या या नव धर्माला - धर्म ग्रंथच नव्हता . मौलवी / पंडित हि भानगड पण नव्हती . या नव धर्म स्थापनेवर कदाचित चार्वाक मताचा अंशत: प्रभाव असावा. अकबर कृत दिने इलाहीच्या काही मताशी चार्वाकाचे विलक्षण साम्य आढळून येते .

 पुढे जावून  अकबर  म्हणू लागला सर्वच धर्म मानवाने निर्माण केलेले आहेत. म्हणून काळानुसार धर्मात बदल केले पाहिजेत. त्याने नियम केला की पती पत्नीत १२ वर्षापेक्षा अधिक अंतर असता कामा नये. हा नियम खुद्द प्रेषितांच्या लग्नांच्या विरोधात होता. त्यांची एक पत्नी पंचेचाळीस वर्षानी लहान होती.अनेक लग्ने केलेल्या अकबराला आता एकपत्नित्व हवे होते. १५८२ नंतर त्याने आणखी लग्ने केली नाहीत. हिंदू आणी मुसलमान अशा दोघांनाही समान नागरी कायदा - एकपत्नित्वाचा कायदा लागू केला. हा तत्कालीन हिंदू आणी मुसलमान अशा दोन्ही धर्मातला हस्तक्षेप होता. त्याने स्क्तीने सती जाण्यावर बंदी घातली. विधवांना पुनर्विवाहाची परवानगी असावी असे त्याला वाटत होते. मुलगा १२ व्या वर्षी सज्ञान होतो; तेंव्हा त्याच्या परवानगीनेच त्याची सुंता १२ वर्षी करावी असा कायदा तो आणू पहात होता.



दिने इलाहीच्या स्थापने बरोबरच अकबराने जाहिर केले - समाजाच्या भल्यासाठी धर्मात हस्तक्षेप करणे हा राजाचा अधिकार आहे.

अकबर सुरवातीला कडवा मुस्लिम होता … तो नंतर बदलत गेला .सहिष्णू मुस्लिम झाल्यानंतर अकबर नास्तिक मताकडे झुकू लागला . शेवटी इस्लाम  त्यागून त्याने नवा धर्म काढला 


 अकबर कि राणा प्रताप ?



अकबर कि राणा प्रताप ? हा प्रश्न इथे अप्रस्तुत आहे . ज्या काळात अकबराने राणा प्रतापाविरुद्ध जिहाद 

करून त्याला संपवले त्या काळात प्रतापच आपल्याला आप्त वाटणार आहे . अकबराने हिंदु राजपूत स्त्रियांशी 

लग्न करताना आधी त्याना मुस्लिम बनवले होते त्यातही काही कौतुकास्पद नाही . 


इथे मुद्दा अकबराकडे नवा विचार करायची विलक्षण शक्ती होती असा आहे. उत्तर आयुष्यात अकबराचा 

बुद्धिवादाकडे झुकणारा नास्तिक कारभार पाहिला कि मते बदलावी लागतात . जाबाल - चार्वाक अशा भारतिय 

दार्शनिकांच्या परंपरेत अकबर जाउन बसतो . तो आंधळेपणे धर्म पाळत नाही . त्याला सुधारतो - वाकवतो 

आणि मोडतोसुद्धा . या काळात मात्र अकबर आगदी आपला होऊन जातो. मध्ययुगिन भारतातला बुद्धिवादी 

वारसा शोधायचा तर उत्तरकालीन (बदलेल्या) अकबरास मुळपुरुष मानणे भाग आहे .

त्याने जनतेचे भले करणारे कायदे ----- धर्मात हस्तक्षेप करून लादले.

 अकबराच्या दिने इलाही या नव्या धर्माला पंचवीस हून कमी अनुयायी मिळाले. पण त्याने त्याचा नवा धर्म कोणावरही लादला नाही. मुल्ला मौलवींना कंदाहरच्या बाजारात विकणार्‍या अकबराला ते अवघड न्हवते. . हा  बुद्धिवाद - हि सहिष्णुता - एकप्रकारचा चमत्कार होता. सेक्युलर हा शब्द जन्मण्या आधी हे घडत होते. फ्रेंच राज्यक्रांती घडायला अजून २०० वर्षांचा अवकाश होता.


 - डॉ. अभिराम दीक्षित, पुणे 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *