नव राष्ट्राचे निर्माते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नव राष्ट्राचे निर्माते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१४ फेब्रु, २०१५

भगतसिंग आणि व्हेलेण्टाइन डे


सकाळपासून व्हेलन्ताइन विरोधासाठी भगतसिहाच्या फोटोचे पोस्टर फिरते आहे. भगतसिग आणि १४ फेब्रुवारी यांचा काहीही संबध नाही . भगतसींग आणि त्याच्या सहकारी क्रांतिकारकांना २३ मार्च १९३१ ला फाशी झाली. ७ ओक्टोबर १९३० ला हि फाशीची सजा सुनावली गेली होती . भगतसिग यांची दोनदा अटक ,सोंडर्स मर्डर केस , लाहोर खून खटला यातल्या एकाही महत्वपूर्ण घटनेशी १४ फेब्रुवारी या तारखेचा दुरान्वयेहि संबंध नाही . बरेच संशोधन केल्यावर असे आढळते . कि या केस मध्ये - फाशिविरुद्ध कोन्ग्रेस चे तत्कालीन अध्यक्ष पं मदन मोहन यांनी एक फाशी माफी अर्ज ब्रिटिश सरकारला पाठवला होता त्याची तारिख १४ फेब्रुवारी आहे . तो अर्ज पुढे बर्याच काळाने फ़ेटाळण्यात आला . त्यामुळे भगतसिंगांच्या चरित्रपटात १४ फेब्रुवारी हि तारीख अजिबात महत्वाची ठरत नाही . एका कोन्ग्रेस अध्यक्षाने भगतसिंगला पाठिबा देण्याचा तो स्मरणदिन आहे . प्रत्येकच तारखेला कोण्या न कोण्या हुतात्म्याचा मृत्यू / मृत्यू ची सरकारी ओर्डर निघालेली असते . ह्या न्यायाने मुलांचे वाढदिवस सुद्धा साजरे करणे अवघड होऊन बसेल …




व्हेलेण्टाइन डे विरोधकांनी चालवलेला हा खोटा प्रचार आहे. शर्ट पेंट फेसबुक कोम्प्युटर सगळे परदेशी चालते … पण प्रेम म्हटले कि कट्टर वाद्यांच्या पोटात पाश्चिमात्य गोळा उठतो !
भगतसिघांचे स्मरण धार्मिक आगंतुकांनि १४ फेब्रुवारीलाच काय ? तर रोजच केले पाहिजे . पण फुले उदबत्त्यांनि त्यांच्या फोटोची मूर्तीपूजा करून नव्हे । तर भगतसिंहाच्या क्रांतिकारी विचाराचे चिंतन करून ! धर्माला व्हेलनटैन पेक्षा अधिक धोका भगत सिहाच्या विचारांमुळे आहे हे संस्कृती रक्षकानि समजून घेतले पाहिजे. भगतसिंह लिहितात -
------------------------------------------------------------------------
( मी नास्तिक का झालो ? - सदार भगतसिंग )
" माझ्या लक्षात एक गोष्ट आली की सर्व शक्तीमान परमात्माची कहाणी, विश्वनिर्मिती आणि विश्वाचं संचालन देव करतो ही गोष्ट एकदम बकवास आहे. माझ्या या विचारांना मी मांडू लागलो. माझ्या मित्रांशी याबाबत मी विचार विनिमय, चर्चा करू लागलो. मी नास्तिक म्हणून जाहीर झालो होतो…
फाशी जाहीर झाली त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या काळातच नव्हे - तर कठीण प्रसंगीदेखील …. विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. फाशीच्या आदल्या दिवशीही नाही !
… ज्याक्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.
जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते."
--------------------------------------------------------------------------
समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. सदार भगतसिंग यांच्या नास्तिक विचाराचे स्मरण आपण करणार का ? कि इतरांच्या लैगिक - भावनिक आयुष्याचे हुकुमशाही नियंत्रण करण्यासाठी फक्त त्यांच्या फोटोची पूजा करणार ?


- डॉ . अभिराम दिक्षित .
.
.
लेखनसीमा

७ ऑक्टो, २०१३

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ?

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ?
 (मला समजलेले गांधीजी  भाग २ )

******************************************************************************************************************************************************************
संदर्भ स्पष्टीकरण : धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्राची  दहावी  आवृत्ती संदर्भ म्हणुन वापरली आहे . खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्रही संदर्भाला घेतले आहे - ( खैरमोडे ३-६७) हा संदर्भ खैरमोडे लिखित चरित्रातील तिसर्या खंडातील ६ ७ वे पान असा वाचावा . बहिष्कृत भारत  या पत्रातले बाबासाहेबांचे लेख उद्धृत केले आहेत त्यापुढे  वर्तमान पत्राचा दिनांक दिला आहे.  द न गोखले यांचे डॉ आंबेडकरांचे अंतरंग हे हि पुस्तक संदर्भ म्हणून वापरले आहे .
******************************************************************************************************************************************************************


गांधी विरुद्ध आंबेडकर हा संघर्ष अटळ होता . एक दलितांचा नेता आणि दुसरा सवर्ण हिंदुंचा पुढारी यात गुलुगुलु गुलाबी  ऐक्य शक्य नव्हते . त्याला सामाजिक कारणे जवाबदार होती .  हा संघर्ष कधी निर्माण झाला ? कसा निर्माण झाला ? कसा वाढत गेला ? आणि कधी संपला ? हे आपण प्रस्तुत लेखात पहायचे आहे .
 आजच्या दलितांनी गांधिंचा द्वेष करण्याचे कारण नाही आणि सवर्णांनी आंबेडकरांचा किंवा आजच्या दलितांचा राग धरू नये .म्हणुन हि धडपड.

  हिंदु महासभा हा हिंदुंचा पक्ष म्हणणे तत्व म्हणुन ठिक आहे . पण लोकशाहीच्या राजकारणात हा एक जोक ठरत असतो  . ज्याला लोक मते देतात तो पक्ष त्या समाजाचा असतो .   सवर्ण हिंदुंनि फ़ाळणिपुर्वि आणि फ़ाळणिनंतरहि गांधिबाबाच्या कोग्रेसला मते टाकलि होती. तत्कालीन सवर्ण हिंदुंचा पुढारी - लोकनियुक्त पुढारी गांधी होता .


आंबेडकर गांधिंकडे सवर्ण हिंदुंचा नेता म्हणुनच पहात होते . तत्कालीन हिंदुंच्या हृदयावर गांधीच राज्य करत होते.  हे सत्य एकदा मान्य केले कि पुढे जाता येईल . आंबेडकरांचा प्रश्न वेगळा होता. दलित समाजातल्या एका घटकाने त्याकाळी त्यांना पुढारी मानले होते    . त्या काळाचा विचार आंबेडकरांनि राजकारणात प्रवेश करण्या आधीपासून केला पाहिजे. आणि त्या आधी परिस्थिती,  अनुभव,  वाचन आणि  विचार करून माणुस सतत बदलत जात असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे .



महाडचा धर्म संगर : फक्त गांधिजिंचि तसबीर 

चवदार तळ्यासाठी केलेला सत्याग्रह हि बाबासाहेबांच्या संघर्षातलि पहिली मोठी लढाई . २५ डिसेंबर १९२७ रोजी ह्या लढ्याला आरंभ झाला. ७ - ८ हजार माणसे जमली होती . मंडपात येताना शिवाजी महाराज कि जय ! आणि गांधीजी कि जय ! अशा घोषणा देण्यात येत होत्या .  यावेळी मंडपात फक्त एकाच नेत्याची तसबीर विराजमान होती - गांधीजी ! (खैरमोडे ३ - १५९ )




आपल्या तडाखेबंद भाषणात बाबासाहेब म्हणतात -

 " चवदार तळ्याचे पाणि प्याल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही . आजपर्यंत ते प्यायलो नव्हतो तेंव्हा काही मेलो नव्हतो . इथे आम्ही पाणि पिण्यासाठी जमलेलो नाही . आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी जमलो आहोत. हि सभा समतेची आहे ...

हिदू समाज समर्थ करायचा असेल तर चातुर्वण्य व असमता यांचे उच्चाटन करून हिंदु समाजाची रचना एकवर्णत्व व समता या दोन पायावर केली पाहिजे. अस्पृश्यता निवारण्याचा मार्ग हा हिंदु समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही. म्हणुन मी म्हणतो - कि आपले कार्य जितके स्वहिताचे आहे , तितकेच राष्ट्र हिताचे   आहे . ….  हि सभा हिंदु समाजाचे संघटन करण्यासाठी बोलावली आहे. "  (बहिष्कृत भारत ३-२ - २ ७ )

या काळात बाबासाहेब गांधी आणि गांधिविचार दोन्हीही मानत असलेले दिसतात.  माहाडच्या धर्म संगराला बाबासाहेबांनी सत्याग्रह म्हटले होते . हे हि ध्यानात ठेवले पाहिजे . " सत्याग्रह हि विचारसरणी आम्ही गीतेतून घेतली असून . गीता हा धर्म ग्रंथ म्हणुन आम्हाला मान्य आहे " - बाबासाहेब (बहिष्कृत भारत - २५ - ११ - २ ७ ). याच परिषदेत बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली .

१९ २ ७  सालीच बाबासाहेबांनी दादरच्या गणेशोत्सवात भाषण केले होते . आणि विरोधकांच्या बंदोबस्तासाठि खिशात पिस्तुल बाळगले होते! (खैरमोडे २ - १ ४ ९ )

हिंदु राहून समता प्राप्त करणे आणि त्यासाठी लढा देणे हे आंबेडकरांचे धोरण १९ २ ७ साल पर्यंत स्पष्ट दिसते आणि हिंदु पुढारी - गांधी हे आपले विरोधक आहेत असे आंबेडकरांना त्याकाळी वाटत नव्हते हे हि स्पष्ट होते .

हिंदु समाज समर्थ आणि संघटित करण्याची मनीषा आंबेडकरांनि या काळात अनेकदा बोलून दाखवली आहे.


काळाराम ते सायमन : ठिणगी पेटली  

काळा राम मंदिर प्रवेशासाठी अस्प्रुश्यांचा संघर्ष चालू होता. त्यावेळी आंबेडकरांनि गांधिंना सवाल केला होता - " मंदिर प्रवेशाचा प्रश्न मिटल्या नंतर जेंव्हा अस्पृश्य लोक जातीच्या आणि चातुर्वणाच्या उच्चाटनाचा प्रश्न हाती घेतील . तेंव्हा महात्माजी कोणाच्या बाजूने उभे राहतील ? "

हा सवाल फक्त गांधीना नव्हता. पुर्या हिंदु समाजाला होता.

गांधीजी उत्तरले - " मी मानत असलेल्या हिंदु धर्मात उच्च नीचता नाही पण डॉ आंबेडकरांना वर्णाश्रमाशि झगडा करायचा असल्याने मी त्यांच्या पक्षाला राहू इच्छित नाही. कारण वर्णाश्रम हा हिंदु धर्माचा अभिन्न भाग आहे, अशी माझी श्रद्धा आहे . "  (कीर - २ ३ ९ )


गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष इथून सुरु होतो.





(सनातनी हिंदु धर्माला डांबर फासत आहेत . गांधीजी ते कष्टाने   पुसू पाहत आहेत आणि आंबेडकर त्याचा पाया असलेल्या वर्ण व्यवस्थेवर हातोड्याने घाव घालत आहेत.  ब्रिटीश लांबून मजा बघत आहेत- तत्कालीन व्यंगचित्र ) 



सायमन आयोग : 

 हा आयोग भारताला कोणत्या बाबतीत स्वायतत्ता द्यावी याचा विचार करण्यासाठी होता . बहुतेक सर्व राजकीय पक्षांनि त्याला अनेक मर्यादा आहेत म्हणुन विरोध केला . बहिष्कार घातला . आंबेडकरांनि मात्र सायमन आयोगाला सहकार्य केले आणि त्याला एक लांबलचक निवेदन नेउन  दिले . का ? हा आंबेडकरांचा स्वातंत्र्याच्या चळवळीशी द्रोह होता का ? काय होते त्या निवेदनात ?  या प्रश्नांचि  उत्तरे  पहाण्या आधी एका घटनेची नोंद केली पाहिजे .




सायमन गो ब्याक ! म्हणत आंदोलन करताना लाला लजपत राय यांच्या छातीवर ब्रिटिश पोलिसी दंडुके बसले. त्याबद्दल ७ डिसेंबर १ ९ २ ८  च्या बहिष्कृत भारत च्या अग्रलेखात श्रद्धांजली वाहताना बाबासाहेब म्हणतात - " लाला लजपत राय यांनी राजकारण आणि समाजकारण यात फारकत करून  आपल्या पंगुपणाचे प्रदर्शन कधीच केले नाही .त्याकाळी  लालाजिंचा आर्य समाज मुस्लिमांच्या आक्रमणापेक्षा जातीभेदादि हिंदु समाजाच्या अंतर्गत दोषांकडे अधिक लक्ष पुरवत असे . अस्पृश्यांच्या चळवळीबद्दल लालाजिंचि सहानुभूती कळकळीची होती  "

१ ९ २ ७  ते ३ ०  या काळात बाबासाहेबांच्या विचारात बदल घडू लागलेला दिसतो . त्यांना अजून हिदू समाजाकडून आशा आहे पण गांधिविरुद्ध मत बनू लागले आहे . ठिणगी पेटली आहे .



******************************************************************************************************************************************************************
विभक्त  मतदार संघ म्हणजे काय ?

भारातात सध्या जी लोकशाही आहे त्यात संयुक्त भौगोलिक मतदार संघ   आहेत . काही जागा मागास उमेदवारांना राखीव आहेत . पण प्रत्येक उमेदवारासाठी सर्व जाती धर्माचे लोक मत देतात . त्यामुळे निवडणुकीतल्या उमेदवाराला सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते. 

विभक्त  मतदार संघ म्हणजे काही जातीना वेगळे मतदार संघ . आजच्या पदवीधर  मतदार संघात  ज्याप्रमाणे पदवीधर उमेद्वरांसाठि  केवळ पदवीधर च  मतदान करतात त्याप्रमाणे - दलित उमेदवारासाठी केवळ दलितांनी मतदान करणे म्हणजे - विभक्त मतदार संघ. 
******************************************************************************************************************************************************************


ब्रिटिशांना दिलेल्या सायमन कमिशनच्या निवेदनात बाबासाहेब लिहितात  -

" १ ) आज अस्पृश्य समाजाच्या समस्या वेगळ्या असल्याने ते हिंदु समाजापासून वेगळे आहेत
२) मात्र अस्पृश्यांसाठी मागितलेल्या मागितलेल्या सवलती तात्पुरत्या आहेत . सर्व भारत शेवटी एका व्हावा . " (गोखले १ १ ८ )
या काळात आंबेडकरांनि विभक्त  मतदार संघाला कडाडून विरोध केलेला आहे. आणि राखीव जागा मागितलेल्या आहेत .   

निवेदनात बाबासाहेब म्हणतात - विभक्त मतदार संघ हे लोकशाहीच्या मुळावरच घाव घालतात. विभक्त मतदार संघात निवडुन गेलेले उमेदवार सभागृहात सर्वांसाठीच कायदे करतात . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांबद्दल कायदे करण्याचा हक्क विभक्त मतदार संघातल्या उमेदवारांना मिळतो . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांवर राज्य करणे हि कुठली लोकशाही ?  ( Dr Ambedkar Writings and Speeches. Vol 2 pg 344 - 366, 1982)


ह्या निवेदनात बाबासाहेबांचा लोकशाहीवाद आणि राष्ट्रवाद अनेकवार व्यक्त झाला आहे . पण सायमन शी सहकार्य केले म्हणुन त्याकाळी बाबासाहेब देशद्रोही असल्याची चुकीची   टिका कोंग्रेसि वर्तमान पत्रांनी केली होती .






गोलमेज परिषद : वणवा पेटला 


सायमन आयोगापुढे ३७ दलित संघटना गेल्या होत्या.  त्यापैकी ३५ संघटनांनि विभक्त मतदार संघांचि मागणी केली होती .  आंबेडकरांनि आपले वैयक्तिक मत बाजूला ठेवत पुढे लोकमताला मान दिला . (खैरमोडे ४ - १ ४ १ . १ ४ २ ) आणि गोलमेज परिषदेत  बाबासाहेबांनी दलितांना विभक्त मतदार संघ मागितले .  लोकमताच्या रेट्यात बाबासाहेबांनी बदललेला हा निर्णय आहे . 

इथे एक लक्षात ठेवले पाहिजे कि आंबेडकर हे केवळ विचारवंत नाहीत ते एक राजकारणीही आहेत . जे बाबासाहेबांबद्दल खरे आहे ते गांधीबाबा बद्दल हि खरे आहे.




******************************************************************************************************************************************************************

प्रौढ सार्वत्रिक मताधिकार म्हणजे काय ?

ब्रिटिश राजवटीत हि निवडणुका होतच होत्या पण मतदानाचा अधिकार सर्वांना नव्हता. ठराविक जमीन ठराविक शिक्षण असलेलेच लोक मतदान करू शकत .  या गाळण्यांमूळे बहुसंख्य दलितांना मतदानाचा हक्क मिळत नव्हता आणि त्यामुळे राखीव जागांवरुन निवडुन जाणारे दलित उमेदवारही सवर्णांचे  चमचे असत. 

प्रौढ मताधिकार म्हणजे १८ / २१  वर्षे वयाच्या सर्व भारतियांना मतदानाचा अधिकार असणे .  प्रौढ माताधीकारात सर्व दलितांनाहि  मतदानाचा हक्क मिळतो आणि अस्पृश्य  हिताबद्दल जागरूक असणारे उमेदवार निवडुन जाणे सोपे होते , असे आंबेडकरांचे मत होते .

******************************************************************************************************************************************************************


स्वत:चे विभक्त मतदार संघाबद्दलचे प्रतिकूल मत राजकारणी आंबेडकरांनि बदलले . गांधिंमधल्या अट्टल राजकारणी पुरुषा बद्दल तर कोणालाच शंका नाही !  राजकारणात स्वत:च्या लोकांचा अनुनय करावा लागतो . हा लोकशाहीचा साइड इफ़ेक्ट आहे !

गांधीनी सवर्णांच्या भावना बोलून दाखवत दलितांच्या विभक्त मतदार संघाला विरोध केला असे काहिंना वाटते.  प्रौढ मतदानाचे नाव सुद्धा नसताना केवळ उच्चशिक्षिताना मतदानाचा अधिकार असताना - आंबेडकरांची नवी  मागणी चुकीची  होती असे म्हणता येणार नाही. पण जर दलितांना विभक्त मतदार संघ दिले तर उद्या सर्वच जाती स्वत:चे वेगळे मतदार संघ मागतील -प्रत्येक जात स्वत:चे उमेदवार निवडुन देऊ लागली तर - उमेदवारांना सर्वसमावेशक भूमिका घेण्याची काहीच गरज उरत नाही  त्यामुळे जातीवादी  उमेदवारच निवडुन येतील आणि ते देशाचे तुकडे पाडतील हि गांधिजिंचि भीती हि अनाठाई  नव्हती.

गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष पेटु लागला आणि त्यातच उभयतांचि भेट ठरली.




वादळी भेट आणि जळते उद्गार  


इथे एका विनोदी गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे . हि भेट संपेस्तवर आंबेडकर हे अस्पृश्य समाजातले आहेत हेच गांधीना माहित नव्हते. (कीर १८०)  गांधीजी आंबेडकरांना पुण्याचे पुरोगामी ब्राह्मण समजत असत ! आंबेडकरांच्या शैक्षणिक डिग्र्यांकडे पाहून गांधिंनि हा ग्रह करून घेतला होता कि आंबेडकर या ब्राह्मण आडनावामुळे गांधिंचा तसा ग्रह झाला होता ते सांगता येत नाही . ( आं - बा -व -डे -क -  र हे मुळ नाव बदलून त्यांच्या एका प्रेमळ ब्राह्मण गुरुजीने आंबेडकर असे स्वत:चे नाव दफ्तरी लावले होते. आंबेडकरांनि तेच पुढे कायम ठेवले)

पण गांधिंचा समज आंबेडकर हे एक पुरोगामी ब्राह्मण गृहस्थ आहेत असा होता! आणि पुरोगामी ब्राह्मण हा प्राणि राजकारणात फारशी किंमत द्यायच्या लायकीचा नसतो ! कदाचित यामुळेच या भेटीत गांधिंच्या अजब पुर्वग्रहामुळे मोठे नुकसान झाले असे मानायला जागा आहे ! आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांनी गांधी भानावर आले आणि ते अस्पृश्य समाजातले आहेत काय ? अशी सहकार्यांकडे विचारणा केली .


कादाचित हा  -  पुरोगामी ब्राह्मण कशापाई नसती उठाठेव करतो आहे ? कशासाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या लष्कराच्या भाकरी भाजतो आहे ?    अशा भावनेतून गांधीनी भेटीची सुरवातच थोडी कडक केली. आंबेडकरांचि पार्श्वभूमी माहित नसल्याने  - कोणत्या परीस्थित आणि दबावात हा निर्णय घेतला हे गांधिंना कळलेले नसणार . सुरवातीला  त्यांनी आंबेडकरांकडे चक्क दुर्लक्ष केले आणि दुसर्याच कोणाशीतरी सुत कताइबद्दल बोलू लागले. थोड्या वेळाने गांधी  म्हणाले " आंबेडकर तुमचा जन्म व्हायच्या आधीपासून मी अस्पृश्यांसाठी काम करतो आहे . (तेंव्हा मला शहाणपणा शिकवू नये ! ) कोग्रेसने अस्पृश्यांसाठी विस लाख रुपये खर्च केलेले आहेत.

अशाप्रकारच्या बोलण्याने आंबेडकर चांगलेच व्यथित झाले असणार.  त्यांनी चिडून गांधिंना खडे बोल सुनावले शेवटी म्हणाले " ज्या देशात आमच्या समाजाला कुत्र्यापेक्षा वाइट वागणुक मिळते त्या देशाला मी मायभूमी म्हणु शकत नाही , गांधीजी मी पुन्हा सांगतो - मला मायभूमी नाही !"

या वादळी भेटीमुळे - गांधिंच्या दुर्लक्ष करण्यामुळे आणि आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांमुळे या दोनही महान नेत्यात तयार झालेला व्यक्तिगत दुरावा बराच काळ टिकला.





पुणे करार : कौन जिता … कौन हारा 


आंबेडकरांनि  विभक्त मतदार संघांचि मागणी सोडुन द्यावी म्हणुन गांधिजिंनि उपोषण सुरु केले. ज्याच्या मागे जवळजवळ सारा सवर्ण समाज आहे त्याचा मृत्यू झाला तर गावोगावच्या अस्पृश्यांना काय झेलावे लागले असते ? आंबेडकरांसमोर पुणे करारावर  सही करण्याशिवाय कोणता पर्याय होता ?

ताणलेले दोर 

पण त्या आधी एका भानगडिचा वेध घेणे आवश्यक आहे. ती भानगड म्हणजे राजा - मुंजे करार होय . एम सी राजा हे एक अस्पृश्य पुढारी होते . राजा आणि त्याच्या सारख्या इतर अस्पृश्य पुढार्यांच्या दबावामुळेच आंबेडकरांना आपली मुळातली सायमन कमिशन समोरची भूमिका बदलत विभक्त मतदार संघाना पाठिंबा द्यावा लागला होता . हेच राजा आता गटबाजीचे राजकारण खेळले . आणि स्वत:चे महत्व वाढवण्यासाठी त्यांनी डॉ मुंजे या हिंदु महासभेच्या पुढार्याबरोबर एक करार केला. या करानुसार अस्पृश्यांना विभक्त मतदार संघ नको . वाढीव राखीव जागा हव्या अशी मागणी केली !

आता आंबेडकरांसमोर मोठा पेचप्रसंग होता . महाराष्ट्रातल्या महार समाजाचा पुर्ण पाठिंबा आणि मराठि दलीतात बर्यापैकी वजन या  आंबेडकरांच्या जमेच्या बाजू असल्या तरी अखिल भारतीय पातळीवर त्या क्षणापर्यंत तरी  आबेडकर हे सर्व दलितांचे एकमुखी नेते नव्हते .  अखिल भारतीय पातळीवर दलितांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना राजा सारख्या अंतर्गत गटबाजांबरोबर हि राजकाराण भोगावे लागत होते . पंचाइत अशी कि राजा मुंजे करार मान्य केला तर आंबेडकरांनि राजाचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर मान्य केलेले आहे आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व अधिकार राजा कडे आहेत असा सरळ अर्थ निघत होता . राजा आणि मुंजेंचि तीच राजकीय चाल होती . आता आबेडकरांना चटकन विभक्त मतदार संघाची मागणी सोडणे अशक्य झाले . राजा सारख्या गटबाज व्यक्ती च्या हाती राष्ट्रीय दलित चळवळीची सूत्रे देण्याचा गलथान पणा आंबेडकर करणे शक्य नव्हते.

त्यामुळे आंबेडकरांनिहि विभक्त मतदार संघाचा मुद्दा ताणून धरला आणि गांधिंना प्राणांतिक उपोषण करण्या पर्यंत परिस्थिती ताणावी लागली.






 तुटलेले बंध 

परिस्थिती विकोपाला जाऊ लागली . गांधिजिंना कोणत्याहि परीस्थित जातीय तत्वावर विभक्त मतदार संघ नको होते . आणि आंबेडकर एका विचित्र राजकीय परिस्थितीमुळे झटकन निर्णय फिरवू शकत नव्हते. गांधिंचि तब्येत खालावू लागली . परिस्थिती स्फोटक बनू लागली. गांधिंचा मृत्यू ओढवला असता तर गावोगाव सवर्ण दलित दंगली पेटल्या असत्या . बाबासाहेबांसारख्या लोकशाहीवादी   नेत्याला  दंगली होणे कदापि मंजुर नव्हते त्यामुळे त्यांनी पुणे करारावर सही केली .

व्यथित होऊन आंबेडकर म्हणाले होते " हे कोंग्रेस वाले माझे राजकीय जीवन संपुष्टात आणतील आणि मग तेच दलितांचे पुढारी होतील " ( खैरमोडे ५ - ३१ )

  पुणे करारावर सही -  हा आंबेडकरांचा राजकीय पराभव होता काय ? त्यांच्या सहकार्यांना तेंव्हा तसेच वाटले आजही आंबेडकर वाद्यांच्या हृदयातली ती एक भळभळति जखम आहे . त्यामुळे मने तुटली आहेत . पण सत्य काय आहे ?


अंतिम विजय कोणाचा ? 

पुणे करारामुळे विभक्त मतदार संघ रद्द झाले आणि संयुक्त मतदार संघ आले असा बर्याच लोकांचा भ्रम असतो . ते खरे नाही . पुणे करारा मुळे संयुक्त आणि विभक्त मतदार संघाचे एक आगळेच फ्युजन जन्माला आले . त्यानुसार -

१) दोन स्तरीय निवडणुक पद्धती आली . अस्पृश्यांनी स्वत:चे चार उमेदवार निवडायचे (विभक्तपणे) आणि त्यानंतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी या चारपैकी एक उमेदवार (संयुक्तपणे ) निवडायचा. या कलमामुळे सवर्णांचे चमचे निवडुन जाण्याचा धोका आंबेडकरांनि टाळला. आणि खरे पाहता आंबेडकरांचा मुलभुत विचार गांधिंनि मान्य केला. 

२) या करानुसार अस्पृश्यांना १ ८ टक्के राखीव जागा मिळाल्या . (त्या पूर्वीच्या मेकडोनल्ड निवाड्यापेक्षा खूपच जास्त होत्या )

३) अस्पृश्यांच्या शिक्षणासाठि वेगळी काढुन ठेवायची रक्कम ठरली यातही आंबेडकरांनि ठरवलेला आकडा ग्राह्य धरण्यात आला .




डॉ  बाबासाहेब आंबेडकर हेच दलितांचे एकमेव राष्ट्रीय नेते आहेत आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व हक्क एकट्या आंबेडकरांना आहेत हि गोष्ट सिद्ध झाली . पुणे करारा नंतर आंबेडकर हे एकमेव  राष्ट्रीय दलित नेते असून एम सी राजा सारखे लोक  केवळ उपट्सुंभ आहेत हे सिद्ध झाले. 

पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा हक्क दलितांसकट सर्वांना मिळाला . शीक्षण , जमीन इत्यादी चाळण्या गेल्या .   त्यामुळे घटना परिषदेचे सदस्य  असलेल्या आंबेडकरांनि स्वतंत्र भारतात एकदाही विभक्त मतदार संघ मागितले नाही .  प्रौढ सार्वत्रिक मतदान आल्याने विभक्त कि संयुक्त हा मुद्दाच उरला नाही . 

गांधिंना जे साध्य करायचे होते ते हि घडलेच -  द्विस्तरीय गुंतागुंतीची निवडणुक प्रक्रिया झाल्याने इतर जाती विभक्त मतदार संघ मागाण्याचा धोका टळला . कारण इतकी गुंता गुंतिचि प्रक्रिया सर्व जातींसाठी लागू करणे अशक्यच होते . त्यातून जातीय फायद्याची गणिते बांधणेहि दुरापास्त होते .

थोडक्यात पुणे करार बरोबरीत सुटला किंवा थोड्या प्रमाणात आंबेडकरांच्याच बाजूला झुकला असे म्हणावे लागते.  स्वातंत्र्यानंतर तर तो प्रश्न पुर्णपणेच आउट डेट बनलेला आहे . कारण सार्वत्रिक प्रौढ मतदान !





 सम्यक पणे विचार बदलणारा - झपाटलेला अभ्यासक : डॉ  आंबेडकर 

बाबासाहेब आंबेडकर हे एक अभ्यासू आणि विद्वान गृहस्थ होते .  राजकारण - समाजकारण - धर्म कारण याबद्दल ते सतत अभ्यास करत आणि नव्या अभ्यासानुसार - मते बदलत असत  . उदाहरण घायचे झाले तर भगवत गीता या हिंदु धर्म ग्रंथाबद्दल लिहिता येईल .


१) १९ २ ७  सालच्या महाडच्या   संगरात   त्यांनी मनुस्मृती जाळली पण गीता हा धर्मग्रंथ स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन्ही लोकांना मान्य आहे असे ते त्याकाळी  म्हणत असत  .
२)  पुढे धर्मांतराच्या घोषणे नंतर गिता हा पुर्णपणे  मूर्खपणे आणि बाष्कळ पणे लिहिलेला ग्रंथ आहे असे ते म्हणत .
३) धर्मांतरानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बाबासाहेब म्हणाले - गीतेत ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बुद्ध धर्मातून उसन्या घेतल्या आहेत . (म्हणजे गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत !)


एकाच ग्रंथाबद्दल व्यक्त केलेली हि मते आहेत . प्रा शेषराव मोरे यांनी त्यांच्या आंबेडकरांवरिल ग्रंथात राजकारण , समाजकारण , इतिहास मिमांसा  या सर्वच बाबतीतल्या बदलत जाणार्या मतांचा आढावा घेतला आहे .






अभ्यासक नवीन माहितीनुसार मते बदलत जातोच . पण आंबेडकरांचे सामाजिक धोरणही त्यांची धर्म मिमांसा आणि इतिहास मिमांसा बदलते. जोपर्यंत हिंदु राहून समता आणता येईल असे त्यांना वाटत होते तोपर्यंत ते गीतेला पुज्य मानत होते. हा हिंदु समाजावरचा विश्वास उडाल्यावर ते गीतेला मुर्ख ग्रंथ म्हणु लागले . पुढे घटना   परिषदेत  दाखल   झाल्यावर ....जेंव्हा त्यांना हिंदु कोड  बिल  पास करून हिंदु स्त्रियांचे भले करायचे होते तेंव्हा........ ते बिल पास करायला त्यांना सवर्ण हिंदुंचा पाठिंबा हवा होता....... आणि त्यावेळी त्यांनी गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत पण ........त्या बुद्धाकडुन उधार घेतलेल्या आहेत असे मत व्यक्त केले .

समता आणणे आणि लोकशाही रुजवणे  हे बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते . त्यासाठी त्यांनी धर्म मिमांसा आणि इतिहास मीमांसा लिहिली , त्यात वेळोवेळी बदल केले , कारण त्यांना इतिहास केवळ लिहायचा नव्हता तर घडवायचाहि होता .


स्वत:ची मते बदलण्याचे स्वातंत्र्य जर आंबेडकरांना आहे तर गांधिंना का नाही ?



परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी 

परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी

गांधीजी हे आंबेडकरांप्रमाणे विद्वान , अभ्यासक किंवा संशोधक निश्चितच नव्हते . पण त्यांना उभ्या देशाबद्दल कळकळ प्रेम आणि जिव्हाळा होता . दलितांचे भले करणे हा गांधिंसमोरचा एकमेव कार्यक्रम कधीच नव्हता पण उच्च निचतेला आणि मुख्यत: अस्पृश्यतेला त्यांचा विरोध पहिल्या पासून होता . त्याला गांधिंनि कमी महत्व दिल-  हा आरोप खोटा म्हणता येणार नाही . पण गांधी म्हणजे अस्पृश्यांच्या जिवावर उठलेला सैतान निश्चितच नव्हे.

गांधीही स्वत:ची मते अगणित वेळा बदलत आलेले आहेत . मी हिमालया  एव्हढ्या चुका केल्या आहेत असे गांधिंनि अनेकदा म्हटले आहे .







कधीकाळचा चातुर्वणाचा समर्थक गांधी । यापुढे मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच हजार राहीन अशी अट ठेवतो .। आणि राउंड टेबलाची नीती पुढे घटनाकारांना सन्मान देण्यापर्यंतही बदलते । बाकी गांधिंचि मते बदलत गेली आणि बाबासाहेब कायदामंत्रि (पहिल्या) मंत्रिमंडळात होण्यामागे गांधी होते   ।  पहिल्या घटनेपरिषदेवर बाबासाहेब लीग च्या पाठिंब्यावर गेले होते । ती परिषद पुढे रद्द झाली आणि फ़ाळणिनंतर जी नवी घटनापरिषद आली त्यावर बाबासाहेब जाताना गांधिंनि पाठिंबाच दिला होता . कोग्रेसच्या पाठिंब्या  शिवाय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होणे शक्य नव्हते … आणि आंबेडकरांसरखा विद्वान कायदा पंडित हातचा घालवायला गांधिजिहि मूर्ख नव्हते .

सुरवातीला गांधी सनातनी आणि चातुर्वणाचे समर्थक आहेत असा अर्थ निघू शकेल अशी पुष्कळ वचने गांधिंच्याच साहित्यातून काढुन दाखवता येतील . पुढे मात्र . गांधिंनि त्यांचे विचार बदलले आणि हिंदु धर्माच्या सर्व स्मृतींचे आणि धर्म ग्रंथांचे पुनर्लेखन करावे आणि स्त्रिया आणि शुद्र यांवर अन्याय करणारा भाग त्यातून काढुन टाकावा असे स्पष्ट मत गांधिंनि व्यक्त केले . ( म. गांधी आणि समाजसुधारणा - आकलन . नरहर कुरुंदकर)

हिंदु राहून समता प्राप्त करण्याचा हा  गांधी विचार आहे . हा विचार १ ९ २ ७  सालच्या आंबेडकरांच्या विचारासारखाच आहे.







गांधीच्या अर्धनग्न धार्मिक फ़किरिपेक्षा आंबेडकरांचे सुटा बुटात राहणे आणि त्यांचा आधुनिक विचार मला अधिक भावतो पण ....

सुस्पष्ट , लोजिकल , तर्कशुद्ध विचार करणारा माणुस उभ्या भारताचा नेता बनणे अशक्यच होते. या देशाची विविधता समस्यांची गुंतागुंत व आकांक्षांचा अनेकपदरिपणा जितका संकिर्ण (Complex ) होता तितकेच गांधिंचे व्यक्तिमत्व हि संकिर्ण होते.

 भारतासारख्या अनेकपदरी देशात राजकारण करायचे झाले तर मायावतिलाहि शेवटी सर्वजन हिताय अशी घोषणा द्यावी लागते हे विसरून चालणार नाही . गांधीना सर्वोदय हवा होता . पण अंत्योदय हे त्याचे सूत्र होते . सर्वांच्याच डोळ्यातले अश्रू पुसण्याची गांधिंचि महत्वकांक्षा आहे . पण अंत्यजाच्या डोळ्यातले अश्रू पुसणे हि त्याची पहिली पायरी आहे .  गांधी हे मुख्यत: राजकीय नेते आहेत पण त्यांनी समाजकारण झटकून टाकलेले नाही . त्यांची धर्माची परिभाषा , हरिजन वगैरे संकल्पना माझ्यासारख्या नास्तिकाला पचणार्या नाहीत पण गांधिंचा उदारमत वाद भारताला थोड्या बहुत प्रमाणात का होईना जोडू शकला हे नाकारता येत नाही .




समारोप 

घटनेचा साचा बनवून बाबासाहेबांनी ह्या देशाचा मनु  पालटला . गांधिच्या पाठिंब्या शिवाय हे शक्य नव्हते . देशाचे भविष्य कसे चालावे याचा ढाचा आंबेडकर तयार करतात आणि त्यांच्या नियुक्तीला गांधिंचा पाठिंबा असतो . तेंव्हा मुख्य वाद मिटलेला असतो. हा देश सनातनी विचारांनी चालणार नाही … आधुनिक राज्यघटनेनुसार चालेल अशी ग्वाही मिळालेली असते .   . बाकी थोडेबहुत मतभेद सगळ्याच माणसात असणार आणि ते नैसर्गीकही आहे .

गांधी आंबेडकर मुख्य वाद आणि संघर्ष इथे संपतो .

तरीही या दोन महान भारतीय नेत्यांत कधीही मनोमिलन झाले नाही हि भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे .

गांधी सवर्ण हिंदुचे नेते होते पण अस्पृश्यांचे दुश्मन नाही . आंबेडकर दलित समाजाचे नेतृत्व करत असले तरी त्यांचे घटना परिषदेतील काम , हिंदु कोड बिल , कायदा मंत्रि म्हणुन केलेले काम हे सर्व देशासाठी होते . एक अर्थशास्त्री म्हणुन आंबेडकरांचा रिझर्व बेंक ऑफ इंडिया च्या पायाभरणीत मोठा वाटा आहे . हे काम सर्वच देशासाठी आहे . त्या अर्थाने आंबेडकर हे राष्ट्रीय नेते आहेत .

स्पृश्य - अस्प्रुश्यांचा संघर्ष जटिल होता . अस्पृश्यांची अस्मिता जागी करणे - अन्याया विरुद्ध लढणे - स्वत:चे न्याय्य हक्क मागणे आवश्यक होते. हे काम आंबेडकरांनी केले . त्याचवेळी अस्पृश्यांना त्यांचे हक्क देऊन टाकण्यासाठी सवर्णांचि मानसिकता तयार करणे आवश्यक होते . गांधिंनि तेच काम टप्प्या टप्प्याने केले . हे कामही अतिशय अवघड होते आणि आवश्यकही होते .

त्या दोघात एकमत दुर्दैवाने  झाले नाही म्हणुन आजही तो भांडण  वारसा चालू ठेवणे वेडेपणाचे आहे .

(क्रमश:)

-------------------------------------------------------------------------------------------------------------
मला समजलेले गांधिजी या मालिकेतील पुढील भाग : - 

भाग ३) पुस्तकांपलिकडचे गांधी : (आगामी )   



२९ जुलै, २०१३

सावरकर समजून घेताना





 सावरकर समजून घेताना ……. 


 सावरकर : स्वातंत्र्यवीर आणि सामजिक सुधारणा : महत्वाचे काय ? 



(तीन लेख)


प्रस्तुत भागात तीन लेखात विषयाची मांडणी केली आहे 

पहिला लेख सावरकरांच्या बोटीतील उडीला १०० वर्षे झाल्याबद्दल 

'सकाळ'  वृत्तपत्रासाठी लिहिलेला आहे .

दुसरा लेख प्रतिगामी सावरकर भक्तांची झडाझडती घेण्यासाठी लिहिला आहे . 

तिसरा लेख सर्वात महत्वाचा आणि  शेवटचा निष्कर्ष काढण्यासाठी आहे . 






लेख पहिला 


'उडी विसरलात तरी चालेल...'
सकाळ वृत्तसेवा
Thursday, July 08, 2010 AT 12:00 AM (IST)

(डॉ. अभिराम दीक्षित)

स्वा. सावरकरांच्या समुद्रातील उडीला १०० वर्षे पूर्ण होत आहे. उडीचे स्मरण तर करायचेच आहे, त्याचबरोबर त्यांच्या "इच्छे'चेही!

स्वा. विनायक दामोदर सावरकरांना १९१० सालच्या मार्च महिन्यात इंग्लंडमधील व्हिक्‍टोरिया स्थानकावर अटक करण्यात आली. फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स ऍक्‍ट या कायद्याखाली ब्रिटिश सरकारने सावरकरांना पकडले आणि त्यांच्यावर पुढील चार आरोप ठेवले. १) ब्रिटिश सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे आणि तशा युद्धाला साह्य करणे. २) ब्रिटिश साम्राज्याचे भारतावरील सार्वभौमत्व नष्ट करण्याचा कट करणे. ३) शस्त्रास्त्रे मिळवणे; ती ठिकठिकाणी वाटणे. कलेक्‍टर जॅक्‍सनच्या खुनाला प्रोत्साहन देणे. ४) हिंदुस्थानात आणि लंडनमध्ये ब्रिटिशांविरोधी भाषणे देणे.

अटक झाल्यावर पुढे काय होणार? याचे चित्र सावरकरांच्या डोळ्यासमोर स्पष्ट होते. त्यांनी आपल्या क्रांतिकारी मित्रांना लिहिले, ""नेमून दिलेली भूमिका पार पाडत असताना प्रसंगी कीर्तीच्या लाटांवर स्वार होता येईल, तर प्रसंगी अंधारकोठडीतल्या जळत्या खडकांना बांधून कोंडले जाऊ... माझ्या अस्थी आणि रक्षा कोठे पडतील याचा नेम नाही. त्या कोठेही पडलेल्या असोत. हौतात्म्य गाजवणाऱ्या विचारवंतांनो! आणि कृतिविरांनो!! तुम्ही ज्या संग्रामात लढलात आणि पडलात तो संग्राम यशस्वी झाला. उठा! अशी घोषणा झाली की माझ्या कोठेतरी पडून राहिलेल्या अस्थी आणि राखेतून पुन्हा तेज आणि चैतन्य सळसळू लागेल! ...तोपर्यंत मित्रांनो राम राम!!''


खटला चालवण्यासाठी सावरकरांना भारतात पाठवायचे ब्रिटिशांनी ठरवले. १ जुलै १९१० रोजी अतिशय गुप्तपणे या राजबंद्याला "मोरिया' बोटीवर चढवण्यात आले. त्या आधीच सावकरांनी पॅरिसमधील आपल्या क्रांतिकारक मित्रांना एक गुप्त पत्र  पाठवले होते आणि फ्रान्सच्या किनाऱ्यावर सज्ज राहण्यास सांगितले होते, असे शि. ल. करंदीकरांनी चरित्रात लिहिले आहे.





""साप विषारी देशभूमीचा येई घ्याया चावा... अवचित गाठुनि, ठकवुनि, भुलवुनी कसाही ठेचावा!'' अशी सावरकरांची विचारसरणी होती.


 ब्रिटिशांना ठकवून, भुलवून, फसवून कसेही करून पळून जायचे असा त्यांचा निश्‍चय होता. बोट फ्रान्सच्या मोर्सेलिस बंदराजवळ आली तेव्हा त्यांनी आपला निर्णय अमलात आणण्यास सुरवात केली. शौचाच्या बहाण्याने ते संडासात गेले. तेथील काचेवर आपल्या अंगातील गाऊन टाकला. आता विचाराला वेळ नव्हता. वेळ कृतीची होती, कृती विचारापुढे धावत होती. अंगावरील बहुतेक कपडे झटक्‍याने काढून टाकून त्यांनी पोटहोलच्या दिशेने उडी टाकली. पहिल्या उडीत पोटहोल हाती आले नाही. दुसऱ्या उडीत त्यांनी पोटहोल गाठले. आपल्या  बाहूंनी उघडले. शरीर आक्रसून बाहेर काढताना रक्तबंबाळ झाले. "स्वातंत्र्यलक्ष्मी की जय' अशी गर्जना केली आणि खवळत्या सागरात उडी ठोकून दिली.  

तात्याराव सावरकरांनी पोहत मार्सेलिस बंदर गाठले आणि वाट फुटेल तेथे पळायला सुरवात केली. ते आपल्या सहकाऱ्यांना शोधत होते, पण दुर्दैवाने ते दिसले नाहीत. सहकारी योग्य वेळी पोचले असते, तर कदाचित  इतिहास बदलला असता. सावरकरांची ऐन तारुण्याची पंचवीसेक वर्षे अंदमानच्या काळकोठडीत आणि स्थानबद्धतेत फुकट गेली नसती.

सावरकरांना ब्रिटिशांनी पुन्हा अटक केली, पण मॅडम भिकाजी रुस्तुम कामा आणि व्ही.व्ही.एस.अय्यर या दोन सहकाऱ्यांनी हे प्रकरण लावून धरले. हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यास भाग पाडले. या उडीचा जगभर गाजावाजा झाला. 

बॅ. निर्मलचंद्र चटर्जींनी लिहिले आहे, (मार्क्सवादी नेते सोमनाथ चटर्जिचे बंधु )
 "८ जुलै १९१०च्या या घटनेची बातमी जगभर पसरली. भारताच्या स्वातंत्र्याचे निनाद आकाश कोंदटून टाकू लागले. भारतमातेच्या किंकाळ्या साऱ्या मानवजातीच्या कर्णपथावर आदळू लागल्या. हिंदी माणसाचा पराक्रम आणि व्यक्तित्व याबद्दल नेहमीच हिनगंडाची भावना बाळगणाऱ्या परकीयांचे डोळे दिपले."

आज या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. लौकिकार्थाने सावरकरांचे हे साहस फसले, पण त्यावेळी जे पलायन जमले नाही ते पुढे सावरकरांनी लेखणीच्या एका फटकाऱ्याने करून दाखवले. या लेखणीच्या फटकाऱ्यालाच काही लोक "माफीनामा - माफीनामा' असे म्हणत असतात. शत्रूला भुलवून, ठकवून, फसवून कसेही सुटायचेच, अशी सावरकरांची विचारसरणी होते. कधी शस्त्राने तर कधी लेखणीने! हा माफीचा तपशील कोणी विशेष संशोधन करून पुढे आणलेला नाही . त्याची गरजही नाही . सावरकरांनी  त्यांच्या माझी जन्मठेप या आत्मचरित्रात माफी पत्राचे  वर्णन अतिशय उघडपणे केले आहे. तुरुंगात सडून मरणे हि त्यांच्या देशभक्तीची व्याख्या कधीच नव्हती.  त्याकाळी हि सावरकरांवर  माफी मागितल्याची टिका झाली होती . त्याला उत्तर द्यायला तेंव्हाच सावरकरांनि एक लेख लिहिला होता - 

 हुतात्मे अंदमानात मेले का नाहीत ? असे विचारणारा हा नर (सिंह) पुंगव आहे तरी कोण ? त्याने असे कोणते पराक्रम केले आहेत ? त्याच्या  शेपटीची (पृच्छाचि) लांबी तरी किती ? 






सावरकरांच्या या उडीबद्दल बरेच समज- अपसमज पसरले आहेत . ते तीन तास / तीन दिवस पोहत होते - ब्रिटिशांनि हजारो गोळ्या झाडल्या- त्या चुकवून सावरकर पोहत होते . वगैरे वर्णन त्यांच्या भक्तांनी केले आहे. (सिनेमातही आले आहे) ना सं बापटांच्या चरित्रात याचा विस्तृत तपशील येतो. उडी मारणारा वीर म्हणून अनेक लोक सावरकरांचे " दर्शन " घ्यायला रत्नागिरीत येत. सावरकर त्याना हसून सांगत " अरे दहा मिनिटे सुद्धा पोहलो नसेन मी ! मोरिया बोट आधीच मार्स्साय (मोर्सेलीस ) बंदराच्या धक्क्याला आधीच लागली होती. गोळ्या बिळ्या कोणि काही झाडल्या नाहीत .( इतक्या जवळचा कैदी पकडायला गोळ्यांची गरज पण नव्हती.) सावरकरांचे सत्यकथन ऐकून भक्त हिरमुसून परत जात !  
काळानुसार आपले विचार बदलण्याचे तारतम्यही तात्यारावांजवळ होते. "अभिनव भारत' या सावरकरांच्या क्रांतिकारी संघटनेने बॉंब आणि पिस्तुलांनी ब्रिटिशांचा विरोध केला. स्वातंत्र्यानंतर सावरकरांनी ही गुप्त संस्था जाहीरपणे विसर्जित केली व स्वतंत्र भारतात निर्बंधाचे (कायद्याचे) राज्य चालेल अशी घोषणा केली.


सावरकर कारागृहात असताना भारतातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत होती. गोलमेज परिषदा सुरू झाल्या होत्या. ब्रिटिश टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देऊन टाकतील, अशी आशा भारतातील सर्वच राजकीय पक्षातील धुरिणांना वाटत होती. 


या वेळी ब्रिटिश विरोधापेक्षा जन्माधिष्ठित जातिव्यवस्था, हिंदू समाजातील अंधश्रद्धा आणि मुस्लिम लीगचे धर्मांध राजकारण याच भारतापुढील खऱ्या समस्या आहेत असे सावरकरांना वाटले. तरुणांनी तळहातावरच्या रेषांपेक्षा मनगटावर अधिक विश्‍वास ठेवावा, जातिव्यवस्था नष्ट व्हावी, विज्ञान हाच राष्ट्राचा वेद व्हावा, असे सावरकरांना वाटले. त्यासाठी त्यांनी रत्नागिरीतील सुमारे साडेपाचशे मंदिरे पूर्वास्पृश्‍यांना उघडी करून देण्यासाठी यशस्वी आंदोलने केली. सुमारे १५ ते २० आंतरजातीय विवाह लावून दिले, असे ना. सं. बापटांनी त्यांच्या सावरकर चरित्रात लिहिले आहे.

या सामाजिक कामांना आणि जतिअंताच्या चळवळीला सावरकर हिंदू संघटन असे म्हणत असत.

समाजास विज्ञाननिष्ठ, पुरोगामी एकसंघ बनवले पाहिजे, असे सावरकरांना उत्तर आयुष्यात अधिकाधिक तळमळीने वाटू लागले.


"माझी समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल... पण माझे सामाजिक काम विसरू नका... ते अधिक महत्त्वाचे आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्‍यक आहे,'' अशी "इच्छा' सावरकरांनी व्यक्त केली होती.


(डॉ. अभिराम दीक्षित)


दैनिक सकाळ ची लिंक पहाण्यासाठी येथे क्लिक करा 

----------------------------------------------------------------------------------------------------------- 







लेख दुसरा 


(सावरकरांवर अतिशय हीन भाषेत आणि चुकीची टिका अनेकदा होते … पण त्यामुळे आत्म परिक्षण बंद करण्याचे प्रयोजन नाही . जर सावरकरांच्या बुद्धिवादाचा आणि राष्ट्रवादाचा वारसा सांगायचा असेल तर हृदयावर दगड ठेवा आणि मेंदूची दारे उघडा ) 



सावरकरांवर  पातळी सोडुन केली जाणारी टिका निश्चितच निषेधार्य आहे . पण सावरकर भक्तांचे काय ? देशप्रेमाने ओथंबलेल्या सावरकरांच्या कवितेवर ज्यांचे कविमन पोसले आहे त्यांना सावरकरांना वापरलेली शेलकी विशेषणे बेचैन करून जावीत यात आश्चर्य नाही . अंदमानच्या अंधेरीत दहा वर्षाहून अधिक काळ बंद रहात अनेक तरुणांच्या रक्ताला कढ आणणारी साहित्य रत्ने प्रसविणारा हा क्रांतिकारकांचा मुकुटमणि (सरोजनी नायडुंचे विशेषण ) कंठस्थ कराणारे सावरकरभक्त अजून काही नागड्या सत्यांचा विचार करतील काय ?







सावरकरांचे स्मरण रक्ताला कढ आणणारे आहे . पण भावनेच्या गहीवारात विचारांची समिक्षा हरवून चालणार नाही . राष्ट्रीय अस्मितेच्या विटंबनेतुन उठलेला संतापी हुंकार आणि चिपळुणकरि परंपरा गौरवाची हाक ह्या एवढाच सावरकरवाद्यांच्या हिंदुत्वाचा आवाका राहणार आहे काय ? रक्षणाचा विचार पोषणाच्या चिंतनातुन सकस बनत जातो . हिंदु परंपरेने दु:ख आणि दैन्य मिटवण्यासाठी सामाजिक परिवर्तनाचा विचार का केला नाही ? दारिद्र्य , विषमता , अज्ञान, शोषण आणि त्यामुळे कुजून करपून गेलेली कोत्यावधिंचि आयुष्ये मनाला पाझर फोडत नसतील तर … …. तर … राष्ट्र आणि संस्कृती हि कोणत्या डुकरिणिचि नावे ?? असा तळतळाटि सवाल गावकुसाबाहेर फेकलेली माणसे करणारच. केवळ दलित नव्हेत तर दारिद्र्य्पिडित कष्टकरी जगच हिंदु परंपरेविरुद्ध दात ओठ खात का उभे राहते ??

अयोध्येच्या राम मंदिरात दुधातुपाच्या आरामाची स्थापना होणार कि श्रम रामाची चिंताहि कोण्या देशभक्ताला पडली आहे । हनुमान मंदिराच्या दाराशी दलित लाथा बुक्क्यांनी चेचला जातो । पण बजरंग दलाचा प्रातापी बाहू उन्मत्त आक्रमकांवर तुटुन पडत नाही . मलबार मधील हिंदु स्त्रियांवर मुस्लिमांनी बलात्कार केले कि सावरकर कृत्येला मशाल आणायला पाठवतात . पण दलित स्त्री भर गावातून नागव्याने फिरवली जाते - ती हिंदु नसते का ? आता कोणि अग्नी आणायचा ? हुंड्यासाठी हिंदु राष्ट्रातील पुरुष हिंदु स्त्रियांना जाळतात . पण या दुर्गुण विकृती विरुद्ध एकही सावरकरवादी दंड थोपटून उभा राहत नाही .


सावरकरांनी दलितांना मोकळी केलेली पाच पन्नास मंदिरा वाद विवादात तोंडी लावायला घ्यायची . आणि सनातन प्रभात च्या जेवणावळीत लाडु हादडायचे हा दुटप्पिपणा किती वेळ चालणार ? जन्माधारित वर्ण व्यवस्था आणण्यासाठी शेंडीला गाठ मारणार्या सनातन प्रभात शी दोन हात करायला कोण सावरकरवादी तयार आहे ? मुस्लिमां समोरचे वाघाचे दात सनातन समोर कवळ्या होतात . आणि त्या म्हातार्यांच्या श्रीमुखातून आमचे सावरकर समानतावादी होते हो चे रडगाणे आळवले जाते.


हिंदुत्ववादि मंडळि केवळ मुद्दा सिद्ध करण्यासाठी सावरकरांचे उतारे दावणार कि जातीयतेची झोटिंगशाहि मोडुन काढायला मैदानात उतरणार ? हिंदुत्व मंडळ हिंदु समाजाचा विचारच का बरे करत नाही ? सगळे लक्ष मुस्लिमांवर खिळलेले । मुसलमान धर्म पिसाटांच्या कारवायांबद्दल न बोलता हिंदुत्वावर बोलता येईल का ? ते टाळून कोणि धर्म बोलू लागला त्याने हिंदू समाज फ़ुटण्याचाच धोका जास्त ! मनुची लक्तरे सोडवत नाहीत आणि वेदा पलिकडे संस्कृती माही नाही !


गेल्या पन्नास वर्षात जी दलित मुक्ती , स्त्री मुक्ती , शोषित मुक्ती ची आंदोलने झाली त्यात हिंदुत्व वादि सावरकर भक्त कोठे होते ? एक गाव म्हटले कि एक पाणवठा असावा. त्याने हिंदु समाज एकरस होईल . हा विचार बाबा आढावांना सुचला . भिडे गुरुजींना नाहि.


सावर्करांच्या विद्न्यानानिष्ठेचे पोवाडे त्यांचे अंधश्रद्धा निर्मुलाक निबंध वगैरे साहित्य शाम मानव वाचून दाखवतात . नरेंद्र दाभोळकर प्रकाशित करतात ,नरेंद्र महाराज नाही .


देवदासिचा आचार आणि पंढरपुरच्या बडव्याचा अनाचार बंद केला तर कोणाचे कल्याण होणार ? हिंदु समाजाचेच ना ? राष्ट्राभावानेने मने पेटवण्यापेक्षा मने जोडणे अधिक महत्वाचे आहे । हे कोणाला कळणार . हिंदु समाजाच्या एकतेसाठी मनुस्मृतीला काडी लावणारा शंकराचार्य आणि जमाते इस्लामिपेक्षा सनातन प्रभात वर तुटुन पडणारा हिंदु हृदय सम्राट ह्या हिंदू समाजाचे एक राष्ट्र बनवू शकतो  


(दुसरा लेख आधारित ) --------------------------------------------------------------------------------------------------------------------



३ मे, २०१३

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे मुस्लिम प्रेम .




 

******************************************************************************************************************************************************************

हा  लेख प्रस्थापित मतांना धक्का देणारा असल्याने . संदर्भासहित स्पष्टीकरण केलेले आहे . शेवटी संदर्भ ग्रंथांचि यादी दिलेली आहे (१-१० ६ ) हा संदर्भ -  यादीत दिलेल्या पहिल्या संदर्भग्रंथातिल १ ० ६ वे पान असा वाचावा . कुरुंदकर आणि शेषराव मोरे हे माझे गुरु तर आहेतच पण स्वत:चे पूर्वग्रह बाजूला ठेवून तटस्थ पणे इतिहासाची समिक्षा करणारे दुर्मिळ  इतिहासकारही आहे . या लेखाची प्रेरणा त्यांच्याच लेखनातून मिळाली आहे . नेताजिंचे विचार योग्य कि अयोग्य याची चर्चा न करता … त्यांचे मुस्लिम विषयक विचार काय होते ? ते आपण प्रस्तुत लेखात तटस्थ पणे जाणून घ्यायचे आहे .
******************************************************************************************************************************************************************

क्रांतिकारकांचे मुकुटमणि 




क्रांतिकारकांचे मुकुटमणि म्हणुन भारतीय जनता सुभाषबाबुंना मानते . आपल्या या प्रिय नेत्याच्या मृत्यूची खबर भारतीय पचवू शकलेले नाहीत . नेताजी भारताबाहेर जिवंत आहेत अशी श्रद्धा बाळगणारे कित्येक लोक होते. वास्तविक पाहता बोसांचे आपल्या मातृभूमीवर नितांत प्रेम होते. भारत सोडुन कोठेतरी परदेशात गुप्तपणे राहण्यापेक्षा त्यांनी मायभूमीत सामान्य  माणसाचे अतिसामान्य जीवन पत्करले असते . त्यांना भारतात प्रवेश नाकारणारे सरकार एक आठवडा हि टिकू शकले नसते. तरीही त्यांचा मृत्यू पचवणे कठिण जाते . ते जिवंत असावेत - असले पाहिजे असे भारतीय मनाला वाटत राहते आणि मग सुरस - चमत्कारिक कथांचा जन्म होत जातो . असे दंतकथांचे नायकत्व फार कमी नेत्यांच्या नशिबी येते कारण जनतेचे  इतके अपार प्रेमही फार कमी लोकांच्या नशिबी येते. 










महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे असेच झाले आहे . हिदुत्व वादि , कम्युनिस्ट , सेक्युलर , समाजवादी, कोंग्रेसि , ब्रिगेडी , बहुजन वादि फार काय कट्टर इस्लाम वादि  सुद्धा -  शिवराय आमचेच म्हणुन छाती ठोकून सांगतात. त्यामागे अनेक राजकीय कारणे आहेत पण सर्वात महत्वाचे कारण आहे कि - महाराष्ट्रातली तमाम मराठि जनता रयतेच्या या राजावर मनापासुन प्रेम करते . सुभाष बाबुंच्या वाट्याला हे भाग्य अखिल भारतीय स्तरावर आहे .  प्रस्तुत लेखात भावनेची झूल बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ अंगाने विचार करायचा आहे . 






 

 सुभाष बाबू आणि सावरकर यात भेट झाली होती हे खरे आहे . सावरकरांचे अभिनव भारत संघटनेतिल  सहकारी रासबिहारी बोस यांची सुभाशबाबुंना सेनेच्या स्थापनेत मदत झाली होती हे ऐतिहासिक सत्य आहे पण त्यावरून सुभाष बाबू हिंदुत्व वादि ठरत नाहित. त्यांनी सावरकरांची भेट घेतली होती यावरून ते सावरकर वादि  हि ठरत नाहीत !

विस्तार भयास्तव प्रस्तुत लेखात आपण सावरकर संदर्भात अधिक खोलात न शिरता -  नेताजिंचे मुस्लिम प्रेम पहायचे आहे . त्यानंतर सुभाष बाबुंचा सावरकरांसोबत फोटो लावायचा का ? याचा निर्णय सावरकर भक्तांवरच सोडायचा आहे .  फक्त जाता जाता एव्हढे नमूद केले पाहिजे कि ज्या नौदलातील बंडाला घाबरून ब्रिटिश भारतातून पळाले असे अनुमान काढले जाते त्या बंडखोरांच्या हातात बंडाच्या वेळी  भगवे झेंडे  न्हवते . त्यांच्या हातात कोग्रेसचे तिरंगे होते आणि मुखी - महात्मा गांधी कि जय होते ! 

सुभाषबाबूंचे आकलन करताना कुरुंदकर लिहितात -  जे सशस्त्र क्रांतीकारक आहेत, ते सगळे अहिंसाविरोधी . जे अहिंसाविरोधी ते सर्व गांधीविरोधी आणी जो गांधीविरोधी तो हींदुत्ववादी अशी सोयीची समजूत मध्यमवर्गीयांनी केलेली आहे."


जुलै ६१९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींनाजपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.






 सुभाषबाबूंनी त्यांच्या आझाद हिंद रेडीओवरच्या भाषणातून गांधीचा उल्लेख राष्ट्रपिता असाच केला होता. बंगाल मधल्या दास पॅक्ट नुसार ५२ % मुसलमानाना ६०% जागा मिळणार होत्या आणी सुभाषबाबू ह्या कराराचे पाठीराखे  होते हे पटवून देत कुरुंदकर सुभाषबाबूंचे मुस्लीम प्रेम दाखवून देतात. आकलन मधल्या याच लेखात कुरुंदकर लिहितात - गांधी,  नेहरू आदी ज्या नेत्यांना बहुसंख्य हिंदुंचा कौल मिळाला ते सर्व मुस्लिम धार्जिणे आणि ज्यांना बहुसंख्येने कधीच जवळ केले नाही ते हिंदुंचे एकमेव प्रतिनिधी असे गणिताचे विपरीत उत्तर हुडकण्यात वरिष्ठ वर्गीय हिंदुनि स्वत:च्या वांझोट्या बुद्धीचे कौतुक करून घेतले आहे . कुरुंदकरांचे वरील वाक्य कोणाला उद्देशून आहे ते उघड आहे. समजदार को इशारा काफी है ! 




मुस्लिमांना किती द्यायचे  ? 



बाबुंचे गांधिंशि वाद झाले होते हे इतिहास सिद्ध आहे.  हे वाद कोणत्या कारणावरुन झाले होते ?  या वादाला काही हिंदु मुस्लिम आयाम होता काय  ? 

हिंदु मुस्लिम भांडणाचा गैरफायदा इंग्रजांनि घेऊ नये म्हणुन सारेच कोंग्रेसि धडपडत होते. हिंदु - मुस्लिम प्रश्नाबाबत उदार भूमिका घेतली पाहिजे असे सर्व कोंग्रेस जंटल्मन्स चे म्हणणे होते. दोन मुस्लिमांना तीन मतांचा अधिकार देणारा कायदा लखनौ करारात लोकमान्य टिळकांनी उचलून धरला होता. टिळकांपासुन गांधिंपर्यंत आणि नेहरुंपासुन बोसांपर्यंत सारेच मुस्लिमांबाबत उदार मतवादी होते . 

मुस्लिमांना किती द्यायचे  ? यावरून गांधीजी आणि बाबूत वाद झालेले आहेत …. गांधी म्हणतात त्यापेक्षा अधिक दिले पाहिजे असे सुभाष बाबुंचे मत होते ! दास पेक्ट च्या वेळी याच कारणावरुन दोन्ही पक्षात वाजले हि होते. मुस्लिमांबाबत बोस हे गांधिंपेक्षा अधिक उदार आहेत हे ध्यानात ठेवले पाहिजे . देशबंधू चित्तरंजन दास यांच्या दास पेक्ट नुसार तत्कालीन  बंगाल मधील  ५ २ % मुस्लिमाना ६ ० % जागा विधिमंडळात राखीव मिळणार होत्या .  सुभाषबाबू हे देशबंधू चित्तरंजन दास यांचे पट्टशिष्य होते .  त्यांच्यावरील मृत्युलेखात  सुभाष बाबू म्हणतात . " हिदू नेत्याताला कोणीही दास यांच्याएव्हढा इस्लामचा मोठा मित्र नाही . ते इस्लाम वर निस्सीम प्रेम करणारे होते. " (२- ६ ८ ) 

१ ९ ३ ८ साली जिन्हा सुभाष बाबुंना म्हणाले होते "  मिस्टर  बोस तुम्ही चित्तरंजन दास यांचे शिष्य आहात . त्यामुळे तुमचे माझे जमेल . पण माझे आणि गांधिंचे कधीच जमणार नाही " (३-२४६ )

फ़ोरवर्ड ब्लोक हा बाबुंचा कोंग्रेस अंतर्गत पक्ष होता . हा डाव्या विचारांचा पक्ष होता . उजव्या   नाही ! हिंदु मुस्लिम प्रश्नाबाबत सुभाष बाबुंचि स्वत:ची ठाम मते होती .  ती मते पुढिलप्रमाणे - 

१)  (अपवाद वगळता ) भारतातली मुस्लिम राजवट हि मुख्यत: सहिष्णू होती . त्यात हिंदुना सांस्कृतिक , सामाजिक आणि धार्मिक स्वातंत्र्य मिळत होते. (१ -८ ) 

२) मुस्लिम राजवटीच्या काळात भारत हा प्रगतीच्या आणि वैभवाच्या शिखरावर पोहोचला होता . (१-७) 

३  )  मुस्लिम प्रश्न हा कधी अस्तित्वातच न्हवता … ब्रिटिशांनि फोडा आणि राज्य करा या नीतीने हा प्रश्न उभा केला . ब्रिटिश निघून जाताच हिंदु मुस्लिम प्रश्न चुटकीसरशी नष्ट होईल असे त्यांचे मत होते . (२-२ ९ १ ) 

४)  इतिहासात कोणतेच हिंदु मुस्लिम असे भांडण झालेले नाही .  भारतीय जनातेतले भेद ब्रिटिश शासानाने निर्माण केलेले आहेत . (२-३ २ १ ) .    १ ९ २ ३  साली झालेलि  मोपला दंगल हा ब्रिटिश राजवटीचा परिणाम आहे . (१ - ६ ९ ) 

५)मुस्लिम लीग , हिंदु महासभा या सारख्याच जातीय संघटना आहेत असे बाबुंचे मत होते. (१- १ ० १ ) 

६) भारताची फाळणी रोखावी म्हणुन   बाबुंनि मुस्लिम लीगच्या जिनासाहेबाकडे  एका प्रस्ताव ठेवला होता आणि जिनांना अखंड भारताचे पंतप्रधान बना अशी गळ घातली होती . (३-३ ० ७ ) . पण "सारख्याच जातीय"  हिंदु महासभेकडे त्यांनी असला कोणताही प्रस्ताव पाठवला नव्हता ! 

विस्तार भयास्तव हि मते योग्य कि अयोग्य याची चर्चा करत नाही . पण सुभाष चंद्र बोस यांची मते हि अशी होती . 


जिन्हा मुहम्मद या पाकिस्तानच्या राष्ट्रपित्याची  भेट  बोसबाबुनी सावरकर भेटीच्या दिवशीच घेतली होती 




 सुभाष बाबुंचे मुस्लिम सहकारी आणि हितचिंतक  : 


१)  अफ़गाणिस्तानचा अमीर अमानुल्ला याने भारतावर स्वारी करून हा देश इंग्रजांपासुन मुक्त करावा असे काही भारतीय मुस्लिम नेत्यांना वाटत होते. गांधिजिंचा याला पाठिंबा होता . या पदच्युत अमीर अमानुल्ला ची सुभाष बाबुंनि १ ९ ३ ४  साली रोम येथे भेट घेतली होती . सुभाष बाबुंच्या भावी योजना अमानुल्ला ला एव्हढ्या पसंद पडल्या कि त्याने सुभाष   बाबुंच्या दिमतीला आपली इसोटा फ्राशिनी हि (महागडी) मोटार भेट दिली होती . (३-२१५ ) 


२) फोरवर्ड   ब्लोक या नेताजिंच्या डाव्या पक्षात आणि आझाद हिंद सेनेत मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांचा  सहभाग होता . पेशावारचे कार्यकर्ते मिया अकबर्शहा , अबिद हसन , हबिबूर रहमान, शहनवाज , कियानी , गिलानी यांनी आपली निष्ठा नेताजिंच्या चरणी वाहिली होती. (३ - ४ ० ८ , १ १  ) 

३) हबिबखान नावाच्या एका धनाढ्य पंजाब्याने नेताजिंचे एक भाषण ऐकले . तो धावत व्यासपीठाकडे गेला आणि चित्कारला " नेताजी मी माझी सारी संपत्ति तुमच्या चरणांशी अर्पण करतो आहे . केवळ संपत्तीच नाही . माझे सारे जीवनही . "  (३- ४ ७ १ ). नेताजिंना असे अनेक हबिब्खान मिळाले होते. 

४ ) १ ९ ४ १  मध्ये गुप्तपणे देशत्याग करून जाताना सर्व जवाबदारी अकबर शहा वर होति. प्रवासातले नेताजिंचे टोपण नाव होते - महंमद झिया उद्दीन ( ३-३१८) 

५)बाबुंना या प्रवासात पेशावर ला उतरून घेण्यासाठी माजीदखान आले होते. माजिद खानाचा मोठा भाऊ म्हणजे अब्दुल काय्युमाखान . हे मुस्लिम लीगचे मोठे नेते होते.  (३ - ३ ३ ९ ) 

६) पुढच्या प्रवासात रशिया कडे जाण्यासाठी त्यांनी हाजी महंमद चे सहकार्य घेतले. (३-३ ५ १ ). १९ ४ ३  मध्ये जर्मनीहून जपान ला जाताना बरोबर फक्त अबिद हसन होता . (३-४ ३ ३ ) । नेताजी ज्या विमानात निधन पावले त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेला एकमेव विश्वासू सहकारी म्हणजे हबिबूर रहमान

नेताजिंना जेव्हढे मुस्लिम सहकारी आणि त्यांचे प्रेम मिळाले - तेव्हढे इतर कोणत्याहि तत्कालीन हिंदु नेत्याला मिळालेले दिसत नाही . नेताजिंच्या मुस्लिम प्रेमाची हि पावतीच आहे . 




आझाद हिंद सेना ते आझाद मुस्लिम सेना : 









१) आझाद हिंद फौजेत मुस्लिमांची संख्या लक्षणिय होती . मुळात ब्रिटिश सैन्यातच मुस्लिम बरेच होते आणि आझाद हिंद फौज हि याच युद्धकैद्यांतुन तयार झाली होती . नेताजिंचि मुस्लिम जनमानसातली प्रतिमा त्यांना या सेनेचे नेतृत्व करण्यात उपयोगी पडली असावी . आझाद हिंद सेनेचे मुख्य  प्रतिनिधी मंडळ ७ लोकांचे होते . या ७  पैकी ४ मुस्लिम होते . (३-४ ५ ७ ) 

२)  लक्ष्मि सहगल आझाद हिंद सेनेत केप्टन होत्या त्यांचे इन्किलाब झिंदाबाद नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.  त्यात पान क्र    :   ४ ७ वर लक्ष्मि सहगल लिहितात " वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीत म्हणुन स्वीकारणे नेताजिंना पसंद न्हवते. त्यामुळे मुस्लिम जनतेच्या भावना दुखावतात असे त्यांना वाटे . त्यामुळे फौजेत 'वंदे मातरम'   ऐवजी  'जन गण मन' हे गीत म्हटले जाई . "  लक्ष्मि सहगल  यांचे चक्षुर्वै सत्य पुरेसे बोलके आहे. नेताजी मुस्लिमांच्या भावना जपण्यासाठी किती धडपडत असत हेच यावरून सिद्ध होते. 

३) आझाद हिंद फौजेत फक्त आझाद हिंद रेडिओ नव्हता । त्या जोडीने आझाद मुस्लिम रेडिओ देखील होता . (३- ४  १ ४ ). मुस्लिमांची मने राखण्यासाठीच नेताजींनी हा निर्णय घेतला होता . 

४ ) इक्बाल शेदाई हे सुभाष बाबुंचे खास मित्र होते त्यांना आझाद हिंद फौजेत नेताजिंनंतर क्र २ चे स्थान हवे होते . पण पुढे ते पालटले .   शेदाइंनि आझाद मुस्लिम फौज उभारली . पुढे ते पाकिस्तानात स्थाईक झाले . (३ - ४ १ ५ ). नेताजिंच्या राष्ट्रीय आत्म्यास किती वेदना झाल्या असतील ! पण सुभाष बाबू आपल्या सिद्धांतावरुन हटले नाहीत . त्यांच्या फौजेत मुस्लिमांचे स्थान तसेच राहिले. 

५  ) केप्टन मुहम्मद दुराणी हा नेताजिंचा फार लाडका होता . सिद्धहस्त लेखक विश्वास पाटिल यांच्या महानायक कादंबरित पान  क्र  ८३९  वर फार रोमहर्षक वर्णन आलेले आहे .राष्ट्रीय अशा  अझाद  हिंद फौजेत सुद्धा काही लोक धर्मांध  प्रचार करत होते. पत्रके वाटली जात होती  "गांधी आणि सुभाष हे हिंदुंचे नेते आहेत . यांना हिंदुराज्य हवे आहे . हिंदुंचे दास बनू नका . पाकिस्तानचा ध्यास घ्या . जिना साहेबासाठी आपले सर्वस्व अर्पण करा ".  नेताजी हे पत्रक मोठ्याने वाचत असताना मुहम्मद दुराणी ताडकन उभे राहिले. आणि म्हणाले " पाकिस्तान हा शब्दोच्चार सहन करण्याऐवजी मरण पत्करलेले चांगले . खुद्द आझाद हिंद फौजेत असा बुद्धिभेद करणारा पशु कोण आहे त्याला आपल्यासमोर फ़रफ़टत आणतो . "

६) हाच तडाखेबंद भाषण देणारा महम्मद दुराणी च तो पत्रक वाटणारा गद्दार होता हे समजल्यावर नेताजिंना किती यातना झाल्या असतील . नेताजींनी आदेश दिला" पकडा त्या गद्दार दुराणिला !" (उक्त ९ २ ० ). शेदाइंप्रमाणेच दुराणिहि गद्दार निघाला हे ऐतिहासिक सत्य आहे. पण तरीही नेताजींनी  आपले हिंदु मुस्लिम ऐक्याचे धोरण सोडले नाही हाही इतिहासच आहे . 

७) नेताजिंच्या मृत्युसमयी त्यांच्या बरोबर एकमेव विश्वासू सहकारी होता -  हबिबूर रहमान . तोच त्यांच्या हौतात्म्याचा साक्षिदार होता . 

हिंदु मुस्लिम ऐक्यावर प्रगाढ श्रद्धा असणार्या सुभाष बाबुंना हिंदुत्वाच्या रांगेत बसवता येईल का ? 

************************************************************************************************************************************************************************************************************************

संदर्भ ग्रंथ :

1) The Indian struggle (1920 - 1942) - Subhash Chandra Bose, OUP (1977)

2) The Essential writings of Netaji Subhash Chandra Bose, OUP (1998)

3)  नेताजी : वि. स. वाळिंबे , मेहता पब्लिशिंग हाउस पुणे (१९ ९ ४ ) 




सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *