२८ डिसें, २०१२

गुंठा मंत्र्यास पत्र लिहिणेस कारण की,




गुंठा मंत्र्यास पत्र लिहिणेस कारण की,






राजश्रिया विराजित, अखंडित लक्ष्मी अलंकृत, सकल राजकार्य धुरंधर, प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर, सकल गुणऐश्वर्यसंपन्न, मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ,सकल विद्यालंकृत, न्यायशास्त्रसंपन्न, राष्ट्रवादी विश्वासनिधि श्री श्री श्री भाउ यांस,

साष्टांग दंडवत,


पत्र लिहिणेस कारण की,

गेले काही दिवस आपली सुहास्य राष्ट्रवादी वदन भित्तिचित्रे पुण्यनगरीच्या कानाकोपर्‍यात झळकत आहेत. परंतु चित्रे पाहून आंम्हास भित्ती न वाटता अंमळ आनंद जाहला. पुण्यपत्तनास योग्य कारभारी मिळणार, मिळेल, मिळाला पाहिजे अशी चर्चा कैक दिवसांपासोन तारिके अहकामे सकाळगिरी मध्ये चालू होती. त्यामुळे पुण्यनगरीतील प्रत्येक चावडीवर आणी कित्येक ब्राह्मणभोजनातून कारभारी बदलाची गप्पाष्टके आणी खलबते चालू होती. आपल्या प्रकटनाने पुण्यनगरीची अवस्था अजि म्या ब्रह्म पाहिले ऐसी जाहली. पेशवाईचा सुवर्णकाळ पुन्हा येणार येणार ऐशी जोरदार चर्चा सुरू जाहली.


दुसर्‍या रावबाजीचा काळ ! काय तो वर्णावा ! मनगट बुडेल इतका भात पंगतीत वाढला जात असे. सकाळ सायंकाळ सोमरसाची आचमने चालत असत. नायकिणी, नाटकशाळा यांना उदार राजाश्रय असे. दक्षिणा गोळा करण्यासाठी दूर - दूर वरून ब्रह्मवृंद गोळा होत असे. टोपीकर आला आणी धर्म बुडाला. दक्षिणा मागावी तर लालतोंड्या टोपीकर म्हणतो कसा ? - फक्त विद्वान ब्रह्मणास दक्षिणा मिळेल. आता ब्राह्मण हा जन्मजात विद्वान अस्तोच ! हे त्या विलायती टोपीकरास कसे कळावे ? ब्राह्मणभोजने बंद झाली. पुण्यनगरीचा सत्यानाश झालान.





पुढे टोपीकर बुडाला. स्वकीयांचे राज्य आले. पुण्यपत्तन आनंदले. याव्वचंद्रदिवाकरौ नेहरूबाबाचे राज्य चालो ऐश्या गर्जना पेठा पेठातून घुमू लागल्या. पण चांडाळ नेहरू बिल्कूलच जातीला जागेना. स्वकीयांस ऐतखाउ म्हणू लागला. ब्राह्मणभोजनांस फुकट्चे देणार नाही म्हणून धिक्कारू लागला. त्यानंतर पुण्यनगरीची कळाच गेली. कोणी वाढपी झाला. कोणी कारकून झाला. कोणी दूरदेशी कळा बडवू लागला.

आज आपले ऐश्वर्य पाहिले; अन चौका चौकात उभे राहून ताम्बूलभक्षण करणारे पुण्यनगरीचे नवे राष्ट्रवादी कार्यकर्ते आनंदले. आपला राजबिंडा थाट आपल्या उमद्या स्वभावाची साक्ष देतो आहे. आपणास मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ऐसे म्हटले ते त्यामुळेच. पुण्यनगरीची सांस्क्रुतिक संम्मेलने काव्य - शास्त्र - विनोद, सध्या पान टपरी या राष्ट्रवादी संगमस्थानी भरतात. भाउ आज तेथे आपल्या उदार आश्रयाला जाण्याची भावना सध्या रंगते आहे. रिकामटेकड्या कार्यकर्त्यांस आपुल्याकडे सढळ हाताने राष्ट्रवादी दक्षिणा मिळते ऐसी वदंता आहे.






पुण्यपत्तनाच्या आसपास धाकले राजे दादा साहेब ( जे की मंत्री महाराष्टर राज्य); यांनी सोन्याचा नांगर फिरवला. जमिनीचे भाव वाढले. त्यास आज गुंठा मंत्री नामक गोमटी फळे आली आहेत. ह्या मंत्रीगणांनी सैन्य जमविण्यासाठी पुनश्च ढाबाभोजनांस सुरवात केली आहे. आता ऐतखाउंचे काही चालत नाही. चौका चौकात सांस्क्रुतिक संगमस्थानी जमून काव्य - शास्त्र - विनोद करणार्या सकल विद्यालंकृत कार्यकर्त्यांसाठी ढाबाभोजने राखिव आहेत. येथेच सकाळ सायंकाळ विलायती सोमरसाची आचमने चालतात. आणी जुन्या पेशवाईच्या आठवणींनी आमुचे डोळे पाणावतात.

सोमरसाच्या कैफात काही प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर कार्यकर्त्यांकडून तुरळक घटना घडतात, पण आपल्यासारख्यांचे न्यायशास्त्रसंपन्न आशिर्वाद असताना कुणाची भिती ?
आपणास पुण्यनगरीच्या नूतन जाणत्या राजाचे आशिर्वाद अवश्य मिळोत; दादामहाराजांची क्रुपा आपल्यावर अखंड राहो; पेशवाईचे दिवस पुन्हा येवोत ही विघ्नकर्त्या गणेशचरणी प्रार्थना.
आपला क्रुपाभिलाशी,


वैद्यबुवा

७ डिसें, २०१२

बुद्ध सरणं गच्छामि । (भाग १)

माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही. पण देव आणि धर्म यावर विश्वास असणारे लाखो लोक माझ्या भोवती आहेत त्यांच्या पासून तुटून पडण्यावारही माझा विश्वास नाही. त्यांना माझ्या बरोबर खेचून नेण्यासाठी आवश्यक असणारी व्यवहारातील तडजोड करण्यास मी तयार आहे. विचारात मात्र करणार नाही. याच कारण अस आहे की विचार हे तुम्हाला कोणीकडे जायचं आहे याची दिशा दाखवणारे असतात आणि व्यवहार तिथपर्यंत तुम्हाला टप्या टप्याने खेचून नेण्यासाठी असतो. - नरहर कुरुंदकर.
या लेखमालेत विविध धर्मचिंतनांचा परिचय करून देणार आहे.
***********************************************************************************************
अथातो धर्मजिज्ञासा - बुद्ध सरणं गच्छामि । (भाग १)
***********************************************************************************************
ख्रिस्तपूर्व ५६३ सालच्या वैशाखी पूर्णिमेला क्षत्रीय शाक्य कुलात सिद्धार्थाचा जन्म झाला. त्याचा पिता राजा शुद्धोदन. आपल्या लाडक्या सुपुत्रावर दु:खाची सावलीसुद्धा नको असे त्याला वाटले. सिद्धार्थाच्या राजवाड्याभोवती त्याने सुखांची अशी कारंजी उडवून दिली की ; त्यांच्या तुषारपटलातून खर्‍या जगातील एकही भेसूर दृश्य सिद्धार्थाला दिसू नये. सुखाच्या कारंज्यांच्या थुयथुय आवाजात सत्य जीवनातील मानवी क्रंदन लुप्त व्हावे. पण वास्तव किती दिवस लपून रहाणार ? म्हातारपण, रोगराई आणी म्रुत्यू यांचे हिडीस व भयानक दर्शन राजपुत्राला झालेच ! सिद्धार्थ कळवळून गेला. करुणेचा महापूर त्याच्या अंतःकरणात दाटला. याचा अर्थ काय ? यातून मार्ग काय ? मानवी जीवनाची ही आर्तता कशी नाहीशी करायची? समस्त मानवजातीच्या दु:खाचे निराकरण करण्याचा मार्ग कोणता? तो कोठे सापडेल ? शोध घेतलाच पाहिजे.
सुत्तनिपातात (९३५-३६) तथागत म्हणतात - " थोड्याश्या पाण्यात राहिलेल्या माश्यांप्रमाणे तडफडून एकमेकांवर हल्ले करणारे लोक पाहून माझ्या मनात (मनुष्यजातीच्या भविष्याबद्दल) भीती उत्पन्न होउन मला उबग आली. "
बुद्धाच्या अस्सल सहित्यात हे वाक्य वारंवार आलेले आहे. लोकांचे दु:ख पाहून सिद्धार्थ कळवळून उठतो आणी त्याच्या मनात भीती किंवा उबग निर्माण होते. त्यातून चींतन घडते आणी धम्माचा जन्म होत जातो. ह्या सगळ्या मानसिक प्रक्रीयेचे आधुनिक मानशास्त्राच्या द्रुष्टीकोनातून केलेले विवेचन पुढे येणार आहे.
त्याच्या संस्कारक्षम मनात हा डोंब उसळला तो त्याला स्वस्थ बसू देईना. दु:खाच्या नाशाच्या मार्गाच्या शोधार्थ तो निघाला; एकटाच, एकाकी, अज्ञाताची वाट काढीत. जगाच्या एतिहासात इतका नाट्यपूर्ण प्रसंग दुसरा नसेल!
.
.
b
.
.
एकोणतीस वर्षांचा, देखणा, मनोहर देहाचा राजपुत्र, आप्तजनांचा लाडका सिद्धार्थ. त्याच्या मुखाने एखाद्या इच्छेचा उच्चार होण्याचा अवकाश की ... की कुठलाही भोग्य पदार्थ त्यापुढे सिद्धच आहे.... असा हा भाग्यवान सिद्धार्थ - मध्यरात्री - शयनगृहात उभा आहे. रूपतारुण्यवती, नवप्रसवा, मानिनी यशोधरा ही त्याची पत्नी शांत झोपली आहे. तिच्या कुशीत तान्हुला राहुल पहुडला आहे. गौतम भरल्या डोळ्यांनी राहुलकडे पहातो.. क्षणभर त्याला वाटले की आपल्या ह्या छोट्या गोंडस प्रतिमेचे- राहुलचे चुंबन घ्यावे. पण नकोच ! न जाणो ... तेवढ्याने यशोधरा जागी व्हायची व आपल्या महाभिनिष्क्रमणाच्या मार्गात अडथळा यायचा. हाही मोहच. शेवटचा का असेना? सोडला पाहिजे. मुलाच्या चुंबनासाठी प्रस्फुरित झालेले ओठ त्याने घट्ट मिटून घेतले. पाठ न वळवताच. दृढ निश्चयाने एक एक पाउल तो मागे हटला. राजवाडा सोडला. राज्य सोडले. प्रेमळ पिता, प्रिय पत्नी आणी एक अजाण तान्हुला मागे राहिला. स्वजनातून विजनात, भोगातून चिकित्सेत, राजमहालातून अरण्याकडे सिद्धार्थ शोधार्थ निघाला. मानवतेच्या चिरकल्याणाच्या शोधार्थ तो निघाला.
वाटेत पाच साधक मिळाले. हे पाच श्रमण शरिराला नाना प्रकारे कष्ट - क्लेश - पीडा देउन परमप्राप्तीसाठी प्रयत्न करत होते. सिद्धार्थ गौतम ही त्यात मिसळला. श्रमणांची परंपरा भारत देशात वेदकाळाच्या आधीपासून सुरू आहे. स्वतः च्या शरिराला श्रमण गौतमाने नाना प्रकारचे त्रास दिले. हाल करून घेतले. जे शोधत होता ते मिळाले नाही. त्याला वाटले - यातून काही मिळणार नाही. देहपीडे पासून त्याने अंशतः फारकत घेतली आणी स्वतःला मध्यम मार्गी म्हणू लागला. हा मध्यम मार्ग बुद्धाच्या वैचारिकतेचा रस्ता कसा झाला हेही आपण पहाणार आहोत.
आधुनिक भारतीय मनाला गौतम बुद्धाविषयी कायम आकर्षण वाटत आलेले आहे. कारण बुद्धाच्या जीवनात काव्य आहे. बुद्धाचा जन्म वैशाखी पौर्णीमेचा, महाभिनिष्क्रमण झाले वैशाखीला आणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली तो दिवसही वैशाखी पौर्णीमेचाच. बोधीवृक्षाखाली सिद्धार्थ दु:खा बद्दल चिंतन करत बसला आहे. त्याला तहान भुकेची पर्वा नाही. शाक्य कुलातले हे राजबिंडे पोर आता पार अस्थिपिंजर बनुन राहिले आहे. आणी वैशाखीच्या त्या पौर्णीमेला त्याला ज्ञानप्राप्ती झाली. ह्याचे बाह्य रूपक म्हणून की काय; पौर्णीमेच्या शीतल चंद्रप्रकाशात त्याचा देह उजळून निघाला.
.
.
a
.
.
त्याला समजलेले अंतिम सत्य माणुसकीच्या चिरकल्याणासाठी प्रसारित करायला तो निघाला. ह्यावेळी मात्र तो एकटा नव्हता , एकाकी नव्हता. त्याजवळ त्याला उमगलेले अंतिम सत्य होते. असा माणुस कधीही एकाकी असत नाही.
बुद्ध धम्माचे पारंपारिक पंथ. मिटल्या डोळ्यांनी स्वतःकडे पहाणारा गौतम आणी डॉ. आंबेडकरांनी रेखाटलेला उघड्या डोळ्यांचा बुद्धही आपण उलगडणार आहोत.
आधीचे पाच साधक पुन्हा भेटले. त्यांना बुद्धाने पहिले प्रवचन दिले. त्या प्रवचनाला म्हणतात धम्मचक्रप्रवर्तन. आपल्या झेंड्यावरचे अशोकचक्र त्याचेच प्रतीक आहे. बुद्ध म्हणाला -
(क्रमशः)

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *