२९ जुलै, २०१३

सावरकर समजून घेताना





 सावरकर समजून घेताना ……. 


 सावरकर : स्वातंत्र्यवीर आणि सामजिक सुधारणा : महत्वाचे काय ? 



(तीन लेख)


प्रस्तुत भागात तीन लेखात विषयाची मांडणी केली आहे 

पहिला लेख सावरकरांच्या बोटीतील उडीला १०० वर्षे झाल्याबद्दल 

'सकाळ'  वृत्तपत्रासाठी लिहिलेला आहे .

दुसरा लेख प्रतिगामी सावरकर भक्तांची झडाझडती घेण्यासाठी लिहिला आहे . 

तिसरा लेख सर्वात महत्वाचा आणि  शेवटचा निष्कर्ष काढण्यासाठी आहे . 






लेख पहिला 


'उडी विसरलात तरी चालेल...'
सकाळ वृत्तसेवा
Thursday, July 08, 2010 AT 12:00 AM (IST)

(डॉ. अभिराम दीक्षित)

स्वा. सावरकरांच्या समुद्रातील उडीला १०० वर्षे पूर्ण होत आहे. उडीचे स्मरण तर करायचेच आहे, त्याचबरोबर त्यांच्या "इच्छे'चेही!

स्वा. विनायक दामोदर सावरकरांना १९१० सालच्या मार्च महिन्यात इंग्लंडमधील व्हिक्‍टोरिया स्थानकावर अटक करण्यात आली. फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स ऍक्‍ट या कायद्याखाली ब्रिटिश सरकारने सावरकरांना पकडले आणि त्यांच्यावर पुढील चार आरोप ठेवले. १) ब्रिटिश सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे आणि तशा युद्धाला साह्य करणे. २) ब्रिटिश साम्राज्याचे भारतावरील सार्वभौमत्व नष्ट करण्याचा कट करणे. ३) शस्त्रास्त्रे मिळवणे; ती ठिकठिकाणी वाटणे. कलेक्‍टर जॅक्‍सनच्या खुनाला प्रोत्साहन देणे. ४) हिंदुस्थानात आणि लंडनमध्ये ब्रिटिशांविरोधी भाषणे देणे.

अटक झाल्यावर पुढे काय होणार? याचे चित्र सावरकरांच्या डोळ्यासमोर स्पष्ट होते. त्यांनी आपल्या क्रांतिकारी मित्रांना लिहिले, ""नेमून दिलेली भूमिका पार पाडत असताना प्रसंगी कीर्तीच्या लाटांवर स्वार होता येईल, तर प्रसंगी अंधारकोठडीतल्या जळत्या खडकांना बांधून कोंडले जाऊ... माझ्या अस्थी आणि रक्षा कोठे पडतील याचा नेम नाही. त्या कोठेही पडलेल्या असोत. हौतात्म्य गाजवणाऱ्या विचारवंतांनो! आणि कृतिविरांनो!! तुम्ही ज्या संग्रामात लढलात आणि पडलात तो संग्राम यशस्वी झाला. उठा! अशी घोषणा झाली की माझ्या कोठेतरी पडून राहिलेल्या अस्थी आणि राखेतून पुन्हा तेज आणि चैतन्य सळसळू लागेल! ...तोपर्यंत मित्रांनो राम राम!!''


खटला चालवण्यासाठी सावरकरांना भारतात पाठवायचे ब्रिटिशांनी ठरवले. १ जुलै १९१० रोजी अतिशय गुप्तपणे या राजबंद्याला "मोरिया' बोटीवर चढवण्यात आले. त्या आधीच सावकरांनी पॅरिसमधील आपल्या क्रांतिकारक मित्रांना एक गुप्त पत्र  पाठवले होते आणि फ्रान्सच्या किनाऱ्यावर सज्ज राहण्यास सांगितले होते, असे शि. ल. करंदीकरांनी चरित्रात लिहिले आहे.





""साप विषारी देशभूमीचा येई घ्याया चावा... अवचित गाठुनि, ठकवुनि, भुलवुनी कसाही ठेचावा!'' अशी सावरकरांची विचारसरणी होती.


 ब्रिटिशांना ठकवून, भुलवून, फसवून कसेही करून पळून जायचे असा त्यांचा निश्‍चय होता. बोट फ्रान्सच्या मोर्सेलिस बंदराजवळ आली तेव्हा त्यांनी आपला निर्णय अमलात आणण्यास सुरवात केली. शौचाच्या बहाण्याने ते संडासात गेले. तेथील काचेवर आपल्या अंगातील गाऊन टाकला. आता विचाराला वेळ नव्हता. वेळ कृतीची होती, कृती विचारापुढे धावत होती. अंगावरील बहुतेक कपडे झटक्‍याने काढून टाकून त्यांनी पोटहोलच्या दिशेने उडी टाकली. पहिल्या उडीत पोटहोल हाती आले नाही. दुसऱ्या उडीत त्यांनी पोटहोल गाठले. आपल्या  बाहूंनी उघडले. शरीर आक्रसून बाहेर काढताना रक्तबंबाळ झाले. "स्वातंत्र्यलक्ष्मी की जय' अशी गर्जना केली आणि खवळत्या सागरात उडी ठोकून दिली.  

तात्याराव सावरकरांनी पोहत मार्सेलिस बंदर गाठले आणि वाट फुटेल तेथे पळायला सुरवात केली. ते आपल्या सहकाऱ्यांना शोधत होते, पण दुर्दैवाने ते दिसले नाहीत. सहकारी योग्य वेळी पोचले असते, तर कदाचित  इतिहास बदलला असता. सावरकरांची ऐन तारुण्याची पंचवीसेक वर्षे अंदमानच्या काळकोठडीत आणि स्थानबद्धतेत फुकट गेली नसती.

सावरकरांना ब्रिटिशांनी पुन्हा अटक केली, पण मॅडम भिकाजी रुस्तुम कामा आणि व्ही.व्ही.एस.अय्यर या दोन सहकाऱ्यांनी हे प्रकरण लावून धरले. हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यास भाग पाडले. या उडीचा जगभर गाजावाजा झाला. 

बॅ. निर्मलचंद्र चटर्जींनी लिहिले आहे, (मार्क्सवादी नेते सोमनाथ चटर्जिचे बंधु )
 "८ जुलै १९१०च्या या घटनेची बातमी जगभर पसरली. भारताच्या स्वातंत्र्याचे निनाद आकाश कोंदटून टाकू लागले. भारतमातेच्या किंकाळ्या साऱ्या मानवजातीच्या कर्णपथावर आदळू लागल्या. हिंदी माणसाचा पराक्रम आणि व्यक्तित्व याबद्दल नेहमीच हिनगंडाची भावना बाळगणाऱ्या परकीयांचे डोळे दिपले."

आज या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. लौकिकार्थाने सावरकरांचे हे साहस फसले, पण त्यावेळी जे पलायन जमले नाही ते पुढे सावरकरांनी लेखणीच्या एका फटकाऱ्याने करून दाखवले. या लेखणीच्या फटकाऱ्यालाच काही लोक "माफीनामा - माफीनामा' असे म्हणत असतात. शत्रूला भुलवून, ठकवून, फसवून कसेही सुटायचेच, अशी सावरकरांची विचारसरणी होते. कधी शस्त्राने तर कधी लेखणीने! हा माफीचा तपशील कोणी विशेष संशोधन करून पुढे आणलेला नाही . त्याची गरजही नाही . सावरकरांनी  त्यांच्या माझी जन्मठेप या आत्मचरित्रात माफी पत्राचे  वर्णन अतिशय उघडपणे केले आहे. तुरुंगात सडून मरणे हि त्यांच्या देशभक्तीची व्याख्या कधीच नव्हती.  त्याकाळी हि सावरकरांवर  माफी मागितल्याची टिका झाली होती . त्याला उत्तर द्यायला तेंव्हाच सावरकरांनि एक लेख लिहिला होता - 

 हुतात्मे अंदमानात मेले का नाहीत ? असे विचारणारा हा नर (सिंह) पुंगव आहे तरी कोण ? त्याने असे कोणते पराक्रम केले आहेत ? त्याच्या  शेपटीची (पृच्छाचि) लांबी तरी किती ? 






सावरकरांच्या या उडीबद्दल बरेच समज- अपसमज पसरले आहेत . ते तीन तास / तीन दिवस पोहत होते - ब्रिटिशांनि हजारो गोळ्या झाडल्या- त्या चुकवून सावरकर पोहत होते . वगैरे वर्णन त्यांच्या भक्तांनी केले आहे. (सिनेमातही आले आहे) ना सं बापटांच्या चरित्रात याचा विस्तृत तपशील येतो. उडी मारणारा वीर म्हणून अनेक लोक सावरकरांचे " दर्शन " घ्यायला रत्नागिरीत येत. सावरकर त्याना हसून सांगत " अरे दहा मिनिटे सुद्धा पोहलो नसेन मी ! मोरिया बोट आधीच मार्स्साय (मोर्सेलीस ) बंदराच्या धक्क्याला आधीच लागली होती. गोळ्या बिळ्या कोणि काही झाडल्या नाहीत .( इतक्या जवळचा कैदी पकडायला गोळ्यांची गरज पण नव्हती.) सावरकरांचे सत्यकथन ऐकून भक्त हिरमुसून परत जात !  
काळानुसार आपले विचार बदलण्याचे तारतम्यही तात्यारावांजवळ होते. "अभिनव भारत' या सावरकरांच्या क्रांतिकारी संघटनेने बॉंब आणि पिस्तुलांनी ब्रिटिशांचा विरोध केला. स्वातंत्र्यानंतर सावरकरांनी ही गुप्त संस्था जाहीरपणे विसर्जित केली व स्वतंत्र भारतात निर्बंधाचे (कायद्याचे) राज्य चालेल अशी घोषणा केली.


सावरकर कारागृहात असताना भारतातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत होती. गोलमेज परिषदा सुरू झाल्या होत्या. ब्रिटिश टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देऊन टाकतील, अशी आशा भारतातील सर्वच राजकीय पक्षातील धुरिणांना वाटत होती. 


या वेळी ब्रिटिश विरोधापेक्षा जन्माधिष्ठित जातिव्यवस्था, हिंदू समाजातील अंधश्रद्धा आणि मुस्लिम लीगचे धर्मांध राजकारण याच भारतापुढील खऱ्या समस्या आहेत असे सावरकरांना वाटले. तरुणांनी तळहातावरच्या रेषांपेक्षा मनगटावर अधिक विश्‍वास ठेवावा, जातिव्यवस्था नष्ट व्हावी, विज्ञान हाच राष्ट्राचा वेद व्हावा, असे सावरकरांना वाटले. त्यासाठी त्यांनी रत्नागिरीतील सुमारे साडेपाचशे मंदिरे पूर्वास्पृश्‍यांना उघडी करून देण्यासाठी यशस्वी आंदोलने केली. सुमारे १५ ते २० आंतरजातीय विवाह लावून दिले, असे ना. सं. बापटांनी त्यांच्या सावरकर चरित्रात लिहिले आहे.

या सामाजिक कामांना आणि जतिअंताच्या चळवळीला सावरकर हिंदू संघटन असे म्हणत असत.

समाजास विज्ञाननिष्ठ, पुरोगामी एकसंघ बनवले पाहिजे, असे सावरकरांना उत्तर आयुष्यात अधिकाधिक तळमळीने वाटू लागले.


"माझी समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल... पण माझे सामाजिक काम विसरू नका... ते अधिक महत्त्वाचे आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्‍यक आहे,'' अशी "इच्छा' सावरकरांनी व्यक्त केली होती.


(डॉ. अभिराम दीक्षित)


दैनिक सकाळ ची लिंक पहाण्यासाठी येथे क्लिक करा 

----------------------------------------------------------------------------------------------------------- 







लेख दुसरा 


(सावरकरांवर अतिशय हीन भाषेत आणि चुकीची टिका अनेकदा होते … पण त्यामुळे आत्म परिक्षण बंद करण्याचे प्रयोजन नाही . जर सावरकरांच्या बुद्धिवादाचा आणि राष्ट्रवादाचा वारसा सांगायचा असेल तर हृदयावर दगड ठेवा आणि मेंदूची दारे उघडा ) 



सावरकरांवर  पातळी सोडुन केली जाणारी टिका निश्चितच निषेधार्य आहे . पण सावरकर भक्तांचे काय ? देशप्रेमाने ओथंबलेल्या सावरकरांच्या कवितेवर ज्यांचे कविमन पोसले आहे त्यांना सावरकरांना वापरलेली शेलकी विशेषणे बेचैन करून जावीत यात आश्चर्य नाही . अंदमानच्या अंधेरीत दहा वर्षाहून अधिक काळ बंद रहात अनेक तरुणांच्या रक्ताला कढ आणणारी साहित्य रत्ने प्रसविणारा हा क्रांतिकारकांचा मुकुटमणि (सरोजनी नायडुंचे विशेषण ) कंठस्थ कराणारे सावरकरभक्त अजून काही नागड्या सत्यांचा विचार करतील काय ?







सावरकरांचे स्मरण रक्ताला कढ आणणारे आहे . पण भावनेच्या गहीवारात विचारांची समिक्षा हरवून चालणार नाही . राष्ट्रीय अस्मितेच्या विटंबनेतुन उठलेला संतापी हुंकार आणि चिपळुणकरि परंपरा गौरवाची हाक ह्या एवढाच सावरकरवाद्यांच्या हिंदुत्वाचा आवाका राहणार आहे काय ? रक्षणाचा विचार पोषणाच्या चिंतनातुन सकस बनत जातो . हिंदु परंपरेने दु:ख आणि दैन्य मिटवण्यासाठी सामाजिक परिवर्तनाचा विचार का केला नाही ? दारिद्र्य , विषमता , अज्ञान, शोषण आणि त्यामुळे कुजून करपून गेलेली कोत्यावधिंचि आयुष्ये मनाला पाझर फोडत नसतील तर … …. तर … राष्ट्र आणि संस्कृती हि कोणत्या डुकरिणिचि नावे ?? असा तळतळाटि सवाल गावकुसाबाहेर फेकलेली माणसे करणारच. केवळ दलित नव्हेत तर दारिद्र्य्पिडित कष्टकरी जगच हिंदु परंपरेविरुद्ध दात ओठ खात का उभे राहते ??

अयोध्येच्या राम मंदिरात दुधातुपाच्या आरामाची स्थापना होणार कि श्रम रामाची चिंताहि कोण्या देशभक्ताला पडली आहे । हनुमान मंदिराच्या दाराशी दलित लाथा बुक्क्यांनी चेचला जातो । पण बजरंग दलाचा प्रातापी बाहू उन्मत्त आक्रमकांवर तुटुन पडत नाही . मलबार मधील हिंदु स्त्रियांवर मुस्लिमांनी बलात्कार केले कि सावरकर कृत्येला मशाल आणायला पाठवतात . पण दलित स्त्री भर गावातून नागव्याने फिरवली जाते - ती हिंदु नसते का ? आता कोणि अग्नी आणायचा ? हुंड्यासाठी हिंदु राष्ट्रातील पुरुष हिंदु स्त्रियांना जाळतात . पण या दुर्गुण विकृती विरुद्ध एकही सावरकरवादी दंड थोपटून उभा राहत नाही .


सावरकरांनी दलितांना मोकळी केलेली पाच पन्नास मंदिरा वाद विवादात तोंडी लावायला घ्यायची . आणि सनातन प्रभात च्या जेवणावळीत लाडु हादडायचे हा दुटप्पिपणा किती वेळ चालणार ? जन्माधारित वर्ण व्यवस्था आणण्यासाठी शेंडीला गाठ मारणार्या सनातन प्रभात शी दोन हात करायला कोण सावरकरवादी तयार आहे ? मुस्लिमां समोरचे वाघाचे दात सनातन समोर कवळ्या होतात . आणि त्या म्हातार्यांच्या श्रीमुखातून आमचे सावरकर समानतावादी होते हो चे रडगाणे आळवले जाते.


हिंदुत्ववादि मंडळि केवळ मुद्दा सिद्ध करण्यासाठी सावरकरांचे उतारे दावणार कि जातीयतेची झोटिंगशाहि मोडुन काढायला मैदानात उतरणार ? हिंदुत्व मंडळ हिंदु समाजाचा विचारच का बरे करत नाही ? सगळे लक्ष मुस्लिमांवर खिळलेले । मुसलमान धर्म पिसाटांच्या कारवायांबद्दल न बोलता हिंदुत्वावर बोलता येईल का ? ते टाळून कोणि धर्म बोलू लागला त्याने हिंदू समाज फ़ुटण्याचाच धोका जास्त ! मनुची लक्तरे सोडवत नाहीत आणि वेदा पलिकडे संस्कृती माही नाही !


गेल्या पन्नास वर्षात जी दलित मुक्ती , स्त्री मुक्ती , शोषित मुक्ती ची आंदोलने झाली त्यात हिंदुत्व वादि सावरकर भक्त कोठे होते ? एक गाव म्हटले कि एक पाणवठा असावा. त्याने हिंदु समाज एकरस होईल . हा विचार बाबा आढावांना सुचला . भिडे गुरुजींना नाहि.


सावर्करांच्या विद्न्यानानिष्ठेचे पोवाडे त्यांचे अंधश्रद्धा निर्मुलाक निबंध वगैरे साहित्य शाम मानव वाचून दाखवतात . नरेंद्र दाभोळकर प्रकाशित करतात ,नरेंद्र महाराज नाही .


देवदासिचा आचार आणि पंढरपुरच्या बडव्याचा अनाचार बंद केला तर कोणाचे कल्याण होणार ? हिंदु समाजाचेच ना ? राष्ट्राभावानेने मने पेटवण्यापेक्षा मने जोडणे अधिक महत्वाचे आहे । हे कोणाला कळणार . हिंदु समाजाच्या एकतेसाठी मनुस्मृतीला काडी लावणारा शंकराचार्य आणि जमाते इस्लामिपेक्षा सनातन प्रभात वर तुटुन पडणारा हिंदु हृदय सम्राट ह्या हिंदू समाजाचे एक राष्ट्र बनवू शकतो  


(दुसरा लेख आधारित ) --------------------------------------------------------------------------------------------------------------------



सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *