९ ऑक्टो, २०१५

खरे पुरोगामित्व : आमचे आकलन

खरे पुरोगामित्व : आमचे आकलन

आजच मित्रांशी झालेल्या चर्चेत हा विषय निघाला . खोट्या पुरोगाम्यांची आम्ही नेहमीच फुरोगामी म्हणून चेष्टा करतो. पण पुरोगामी या संकल्पने विषयि आम्हास अतिशय प्रेम आणि आदर आहे . आमचे पुरोगामी या संकल्पने बद्दलचे आकलन १) स्वातंत्र्य , २) समता ३) बंधुता असे आहे . पहिल्यातून दुसरे आणि दुसर्यातून तिसरे निर्माण होते .

स्वातंत्र्य सगळ्याना मिळावे म्हणजे समता आणि या सार्वत्रिकरणाच्या आग्रहाचा परिणाम म्हणजे बंधुता होय !

व्यक्तीला पुर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे , हे "स्वातंत्र्य" स्वत:चा विकास करून घेण्याचे आहे , विकासाच्या संधि प्रत्येक व्यक्तीला मिळाल्या पाहिजेत . याला "संधीची समता " असे म्हणतात. आणि प्रत्येकाला अशी संधीची समता मिळाली पाहिजे हि मागणी "मानव बंधुता " तयार करते.

जरा अधिक खोलात जाऊ -

माणुसकि हे मुल्य आणि व्यक्ती हे एकक पुरोगामित्वाच्या केंद्रस्थानि असले पाहिजे .  १) व्यक्ती स्वातंत्र्य - व्यक्तीचे स्वातंत्र्य हा पुरोगामित्वाचा पाया आहे. हे सर्वोच्च मुल्य आहे . हे स्वतंत्र्य अनिर्बंध असले पाहिजे. मानवी मेंदूची विचार करण्याची क्षमता अफ़ाट आहे. मानवी कर्तुत्व सीमित करणारी सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय बंधने भस्म केली पाहिजेत. हे स्वातंत्र्य स्वैराचाराचे सुद्धा आहे . कारण दुसर्याचा आचार स्वैर ठरवून बंद करण्याची दादागिरी चूक आहे . एखादी व्यक्ती जोपर्यंत स्वत:ला किंवा दुसर्याला शारीरिक दुखापत करत नाही - इतकी एकमात्र अट असली पाहिजे . बाकी विचार , लेखन , चित्र , शिल्प, कला , विज्ञान, तंत्र , शोध ,या सर्वाच्या वर आणि मानवी अभिव्यक्तीवर एकही बंधन असता कामा नये . एकही नाही . 

महापुरुष , देव , इतिहास , धर्म , संस्कृती , अस्मिता आणि राजकारण हे सारे व्यक्तिस्वातंत्र्या पुढे तुच्छ आहे .

माणसाला हवा तसा स्वत:चा विकास , अभिव्यक्ती आणि आनंद मिळवण्याचा हक्क म्हणजे " व्यक्ती स्वातंत्र्य " , हे स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला मिळाले पाहिजे हि मागणी म्हणजे "समता" आणि या भावाकीतून मानवी बंधुता तयार होते ….

२) समता : सर्व माणसे समान नसतात . प्रत्येक जण वेगळा आहे . प्रत्येकाचे काही गुण आणि दोष आहेत. पण प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे . स्वत:चा बौद्धिक , मानसिक विकास आणि नवनिर्मितीची प्रत्येक व्यक्तीला पुर्ण संधि दिली पाहिजे . हे "संधिचे स्वातंत्र्य" म्हणजे समता होय .

सामाजिक न्याय हे समतेचे साधन आहे . याच कारणाने भारतासारख्या मागास समाजरचनेच्या देशात---- मागास समाज गटाना अधिक सोई सवलती द्याव्या लागतात . असे पोझीटिव्ह डिस्क्रिमिनेशन करणे हे समतेचे एक साधन आहे . साध्य नाही . प्रत्येक व्यक्तीला भेदभाव विरहित वातावरणात स्वत:च्या विकासाची पुर्ण संधि मिळायला हवी . हे उद्दिष्ट अवघड असले तरी अशक्य नाही . त्यासाठी मानवी बंधुत्वाचा एल्गार हवा .

३) बंधुत्व : स्वातंत्र्य टिकवण्यासाठी समता आणि समता टिकवण्यासाठी बंधुत्व आहे. समतेची मागणी आपण करतो तेंव्हा त्यावरचा इतरांचा हक्क मान्य करावा लागत असतो.त्याला बंधुता म्हणतात . बंधुत्व नैसर्गिक नाही . गटबाजी आणि टोळियुद्धे हा जनावर माकड माणुस या सार्याचा उपजत नैसर्गिक स्वभाव आहे. या नैसर्गिक जाणिवेवर मानवी मेंदुला मात करायला शिकवायचे आहे . बंधुता हे उपयुक्त आणि आवश्यक मुल्य आहे. त्याशिवाय समता आणि स्वातंत्र्य शक्य नाही . आता प्रश्न असा कि हे - बंधुत्व मेंदुला शिकवायचे कसे ?
==========================
बंधुत्व मेंदुला शिकवायचे कसे ? 
==========================
उत्तर आहे : प्रबोधन - 
==========================

प्रबोधन -

लोकशाहीचा पप्पा आणी पुरोगामिपणाचा फादर म्हणजे व्हॉल्टेर हा फ्रेंच विचारवंत. तो म्हणाला होता. "I do not agree with what you have to say, but I'll defend to the death your right to say it" . तुझे विचार मला अजिबात मान्य नाहित. पण वेगळे विचार बाळगण्याच्या - तुझ्या हक्काच्या - रक्षणासाठी - मी मरण पत्करायला तयार आहे. याला म्हणतात पुरोगामीपणा ! माणूस विचार करणारा प्राणी आहे यावर श्रद्धा बाळगणार्‍याला मी पुरोगामी म्हणेन. चर्चा करून समोरच्याचे विचार बदलता येतात हा पुरोगामीपणाचा कणा आहे .जर आपण चर्चेने दुसर्याचे विचार बदलू पाहत असू - तर स्वत:चे विचार नवे ज्ञान मिळाल्यास बदलले पाहिजेत . तशी तयारी पाहिजे - 

स्वत:चे विचार बदलण्याची  नवे शिकण्याची  उत्सुकता पाहिजे (हि प्रबोधनाची पूर्वअट आहे )

अशा प्रकारे ज्ञानाचे आदान प्रदान करत समाज प्रगतीच्या दिशेने पुढे न्यायचा. गामी म्हणजे जाणारा पण जायच कुठे ? पुरो - प्रगतीच्या दिशेला. पुरो - गामी. पुढे जाण्याचा एकाच नियम आहे ….

==========================
एकच नियम बदल हाच नियम 
==========================

मानवी विकास हा कलेक्टिव्ह इंटेलिजन्स आहे . पिढ्यान पिढ्या आपण ज्ञान एकत्र करत आलो - आणि पुढच्या पिढ्यांना देत आलो …

गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर मनुष्याची झालेली प्रगतीच दिसून येते. हाच नियम गेल्या दहा शंभर आणी हजार वर्षालाही लागू पडतो. मनुष्य आपल्या ज्ञानाचा संग्रह करतो आणि तो पुढच्या पिढीला देतो. हे ज्ञान पाठांतरित, मुद्रित किंवा किंवा कशाही स्वरूपात पुढच्या पिढीला देता येते. त्यामुळे आज्यापेक्षा नातवाकडे जास्त ज्ञान असते. नातू जेंव्हा आजा होतो तेंव्हा त्यालाही हा नियम लागू होतो.
आकलन , समज , धर्म आणी संस्क्रुती काळा बरोबर बदलत जातात. बदलले पाहिजे…==========================

खर्या पुरोगामित्वाची सूत्रे : (लेखाचा सारांश )

१) ( व्यक्तीचे अनिर्बंध आणि स्वैर) : स्वातंत्र्य 
२) (विकासाच्या संधिची मानवी) : समता 
३) ( समतेवर सर्व मानवांचा हक्क ) : बंधुता
४) (बंधुता हे मुल्य शिकवण्यासाठी अहींसक ) : प्रबोधन 
५) (प्रबोधनाचा नियम ) : बदल

हि यादी पुरोगामित्वाच्या खर्या धारणेवर अधिक वाढवता येईल ….
==========================

उजव्यांना यातले काहीही मान्य नाही , कम्युनिस्ट डावे आजचे समाजवादी यांनाही मान्य नाही . इतिहासप्रेम व्यक्तिपूजा दैववाद सूड व्यक्तिस्वातंत्र्याचे दमन , मानवी बंधुतेचि हाक न देणे , प्रबोधन आणि बदल हे सूत्र समजून न घेता वैचारिक अस्पृश्यता पाळणे, द्वेष करणे , संशयि राहणे इत्यादी गुण डाव्या उजव्यात समान आहेत . अपवाद फक्त नियम सिद्ध करत असतात . त्यामुळे आजच्या भारतात कोणतिहि विचारधारा पुरोगामी नाही . सनातनी आणि फुरोगामी असे दोनच गट इथे आहेत .

लेखक : डॉ अभिराम दीक्षित

(आजच्या चर्चा सुनील आणि वैभव सोबत )

४ टिप्पण्या:

 1. ऊत्तम लेख आहे संकल्पना आणखी स्पष्ट करता येतील

  उत्तर द्याहटवा
 2. (विकासाच्या संधिची मानवी) : समता .......Do you really think we have this? or at least we are heading in that direction? I doubt it.

  उत्तर द्याहटवा
 3. अनिर्बन्ध आणि स्वैर स्वातंत्र्य ही दुधारी तलवार आहे. सगळेच जर स्वतःला पटेल असं वागू लागले तर खरचअवघड होवून जाईल. केवळ संकल्पना म्हणून विचार ठीक आहेत.

  उत्तर द्याहटवा
 4. संधीची समानता आणि समतेची संधी यातील फरक हा अधिक महत्वाचा

  उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *