२९ एप्रि, २०१३

महावीराची वर्धमान अहिंसा



************************************************************************************************************ 
  महावीराची वर्धमान अहिंसा 
************************************************************************************************************ 
 संदर्भ : १) आकलन (नरहर कुरुंदकर ). २)  भारतीय तत्वज्ञान (श्रीनिवास   दीक्षित )


जैन आणि बौद्ध हे   वैदिक   नसलेले   भारतीय धर्म आहेत . त्यांची परंपरा म्हणजे श्रमण परंपरा . या परंपरेत अहिंसेचे स्थान फार मोठे आहे.  हि अहिंसा पुढे सर्वच भारतीयांनी निदान  तत्व म्हणुन तरी मान्य केली आहे . भारताच्या नसानसात भिनलेला सर्वधर्म   समभाव हि सुद्धा याच परंपरेची देणगी आहे .ज्ञानेश्वरांनिहि  अहिंसेचे महत्व उत्साहाने सांगितले आहे.  अहिंसा आणि सर्वधर्म समभाव  यामुळे देशाचा बट्ट्याबोळ झाला आणि देश  गुलाम झाला असे बर्याच देशभक्तांना वाटते.  ते खरे नाही . बौद्ध धर्मीय चीन युद्धखोरीत  मागे नाही . . आणि जैन राजांनीही लढाया मारलेल्या आहेत. मुळात अहिंसा आणि सर्वधर्म समभाव हा षंढपणा  नाही . सध्या शहाण्यासारखे बोलणे म्हणजे षंढपणा  आणि मवालीगिरी म्हणजे मर्दपण असे काहीसे वातावरण महाराष्ट्रात तरी तयार होते आहे.  या वेळी श्रमण परंपरेतलि अहिंसा नेमकी काय आहे ? ते जाणुन घेणे आवश्यक वाटते. 

हि श्रमण परंपरा फार  प्राचीन आहे .जैन हाही एक प्राचीन धर्म आहे . वर्धमान  महावीर हे जैनांचे शेवटचे आणि चोविसावे तिर्थंकर आहेत . या शेवटच्या तिर्थंकराचा  जन्म  येशु ख्रिस्ताच्या जन्माहून  सहाशे वर्ष जुना आहे. इतकी हि परंपरा जुनी आहे .  जैनांची मुळ भूमिका अनेकांतवादाचि आहे .नावात वाद असले तरी  हा काही इझम नाही . जगाकडे पहाण्याचा तो एक प्राचीन भारतीय दृष्टीकोन आहे. 

अनेकांतवाद आणि अहिंसा हि जुळी भावंडे आहेत . अहिंसा म्हणजे केवळ दुसर्याला मारू नका एव्हढी शारीर नाही . अहिंसा पहिल्यांदा मनात जन्म घेते . दुसर्याच्या मताचा आदर करण्यापासून अहिंसा सुरु होते. परमत  सहिष्णुता , परधर्म सहिष्णुता , सर्वधर्म समभाव हि सारी या अहिंसेची पिल्ले आहेत . 


 अनेकांतवाद


आता अनेकांतवाद म्हणजे काय ते पाहू . अंत म्हणजे शेवट . एकान्त म्हणजे एकच शेवट . अनेकांतवाद म्हणजे अनेक शेवट . म्हणजेच कुठल्याही गोष्टीबाबत एकाच  बाजूचे मत न बनविणे .    यासाठी हत्ती आणि सात आंधळ्यांची कथा उधाहरण म्हणुन फिट्ट बसते. सात आंधळे हत्तीजवळ जातात. त्यांनी हत्ती आधी  कधीच पाहिलेला नाही .  हत्तीच्या  शेपटीला हात लावून एका आंधळा म्हणतो हत्ती दोरिसारखा आहे . हत्तीच्या  पायाला हात लावणारा ओरडतो - हत्ती झाडासारखा आहे . हस्तिदंताला स्पर्श करणारा आंधळा पुटपुटतो -  हत्ती भाल्यासारखा टोकदार आहे. सगळ्या आंधळ्यांचे मत वेगवेगळे बनते . 







प्रत्यक्षात हत्ती हा दोरी , खांब , भाला इत्यादी सर्वासारखा असतो आणि कुणासारखाच तंतोतंत नसतो . सत्याकडे पाहण्याचे अनेक मार्ग असतात. एकाचवेळी ते सर्व योग्य आणि अयोग्यही असतात . एकाचवेळी निश्चित आणि  अनिश्चितहि असतात.सत्याचे मानवी आकलन विभिन्न असते. सत्याचे मानवी आकलन अपुर्ण असते.   त्यामुळे स्वत:च्या मताबद्दल कट्टरता किंवा दुसर्याच्या मताचा द्वेष चुक  आहे.    अनेकांतवाद कट्टर पणाचा  मुडदा अहिंसक मार्गांनी  पाडतो !    अहिंसेचा जन्म असा मनात आहे .  प्रथम तो माझ्या मनात होणार आहे त्यानंतर तुझ्या मनात होणार आहे . तो ज्ञानातून होणार आहे.  हे स्पष्ट दिसणारे  वैद्न्यानिक सत्य स्वीकारायला पुरुषार्थ लागतो . शौर्य लागते . स्वत:च्या डोळ्यावरची झापडे काढणे हे येरागबाळ्याचे काम नाही . ते महाविराचे काम आहे. वर्धमान महावीर या शेवटच्या तिर्थंकराचे नाव त्याला अशाप्रकारे  शोभून दिसते. 

अनेकांतवाद हा एक  दृष्टिकोन  किंवा एटीट्युड आहे . नयवाद आणि स्याद वाद हि या एटीट्युड ची पिल्ले आहेत. ज्ञान , सत्य  , रिआलिटि ची व्याख्या नयवाद करतो . कोणत्याही गोष्टीला सुरवात आणि शेवट हा असतोच . जे उत्पत्ती , विनाश आणि नित्यत्व यांनी युक्त असते तेच सत्य . बौद्ध दर्शनाताला अनित्यावाद असाच आहे .  स्यादवाद मोठा रंजक आहे . स्यात म्हणजे कदाचित,   M a y   b e .प्राचीन  सापेक्षतावाद .      

"  देव आहे "      . हे विधान सप्तभंगिनय - सात आंधळ्यां प्रमाणे -सात प्रकारे सत्य असेल  : - 

 १) देव आहे .

 २)   देव नाही    . (आधीच्या नय  वादानुसार जे उत्पत्ती , विनाश किंवा नित्यत्व यांनी युक्त असते तेच सत्य. म्हणून प्रत्येक वाक्य   -विधान हे कधीतरी नष्ट होणार आहे. देव आहे हे विधान सुद्धा नष्ट होणारच बुवा  ! देव आहे हे विधान एकदा  नष्ट झाले कि  - देव नाही हे आपोआप सत्य ठरते !)

३) देव आहे हि  आणि देव नाही हि  . (पहिली दोन विधाने सत्य मानल्याने तिसरे १  + २  = ३  आपोआप सत्य ठरते ! ) . 

४) देव भाषेतून व्यक्त करता येणार नाही . (तिसर्या विधानात परस्पर विरोध आहे तरी ते सत्य आहे.  परस्परविरोध सत्य मानला तर आपोआप हे चौथे विधानही सत्य ठरते )

हि चार लोजिकल विधाने मान्य केली कि चौथ्या वाक्याला पहिली ३ जोडुन पुढची ३ विधाने मिळतात .

५) देव आहे पण तो भाषेतून व्यक्त करता येणार नाही .
६ ) देव नाही  पण हे भाषेतून व्यक्त करता येणार नाही .
७) देव आहे हि  आणि देव नाही हि . पण हे भाषेतून व्यक्त करता येणार नाही .

स्याद वाद मानवी भाषेच्या,  बुद्धीच्या आणि आकलनाच्या मर्यादा स्पष्ट करून टाकतो . पण हि केवळ शाब्दिक कसरत नाही . हे आधुनिक गणितातल्या प्रोबेबलिटि चा सिद्धांत वापरून हि पडताळता येते . मानवी बुद्धी भाषा आणि अभिव्यक्ती याना काही मर्यादा असू शकतात. सत्य अनेक चष्म्यातून पाहता येते .  त्यामुळे दुसर्याच्या मताचा आदर केला पाहिजे. यातूनच अहिंसा आणि परमत  सहिष्णुता , सर्व धर्म  समभाव वगैरे पिल्ले जन्माला येतात . 

 विरुद्ध बाजू तोडुन मोडुन झोडून  नष्ट करणे . प्रतिक्रिया म्हणुन हल्ला करणे . पुढे हल्ला होईल या भीतीने आधीच हल्ला करणे !   वगैरे आदिम रानटी पण मानवी प्रवृत्ती आहेत . अनेकांतवाद या रानटी वृत्तीचा खात्मा करतो . 

मणिभद्रासारखा जैन तत्वज्ञ म्हणतो कि शब्द तर्कशुद्ध आहेत कि नाही हे महत्वाचे . ते महाविराचे आहेत किंवा आणखी कोणाचे    - हे महत्वाचे नाही . जैनांची अहिंसा हि अशी मनात जन्मते . आणि ती दुसर्या आधी स्वत:ची चिकित्सा करते . 





मर्यादा 


जैन धर्माचे मोठेपण सांगत असतान त्याच्या मर्यादा नाकारायचे काहीच कारण नाही . बहुदा तोच खरा अनेकांतवाद ठरेल !  तोंडाला फडकी बांधुन रस्त्याच्या कडेने भीत भीत जाणारे मुनी हा जैन धर्माचा बाह्य आचार आहे . मुळचे तत्वज्ञान नाही . तोंडावरचे फडके हे पराकोटीच्या अहिंसेचे अपत्य आहे . तोंडावाटे सुक्ष्म जंतु आत जाउन मरू नयेत म्हणून हा प्रपंच ! पायाखाली सुक्ष्म किटक मरू नयेत म्हणून रस्त्याच्या कडेनेच जायचे . सकाळीच प्रवास करायचा . सुर्यास्तानंतर जेवायचे नाहि. कंदमुळे (कांदा , लसुण वगैरे ) जमिनीखालून उपटताना आळ्या मरतील म्हणुन झालेला …. लसुण विरहित जैन फ़ास्ट फ़ुडचा जन्म ……. किंवा मांसाहारि कुटुंबाला घर न विकणे … हे सारे स्वत:च्या  जैन पुर्वजांचे अनुकरण आहे. जैन तत्त्वज्ञानाचे आचरण नाही . 

खरे पाहता बांधलेल्या फ़डक्यातुनहि अनेक सुक्ष्म जंतु पोटात शिरतच  असतात.  मानवी त्वचेतून आत   येत   असतात..  अन्नातून  प्रवेशत असतात . मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती  - इम्युनिटि . हर एक मिनिटात हजारो जीवाणू आणि विषाणुंचा मुडदा पाडत असते ! 

आधुनिक काळ हा  विज्ञानाच्या प्रतिष्ठेचा काळ आहे. सर्व जग अणु रेणुंचे बनले आहे असे विज्ञानाने  म्हटले कि - कुणीतरी सोम्या गोम्या किंचाळतो  - आता कणाद ऋषी विज्ञानाला कळाले ! त्यावेळी कणाद कशाला अणु मानतो ? त्याची द्रव्याची व्याख्या काय आहे ? या चिंतेत कुणीही पडत नाही . मग काहिंना वेदात विमाने दिसतात. दशावतारात डार्विन दिसतो. त्यावेळी डार्विनच्या आधी हे का दिसले नाही असे कोणि विचारायचे नसते. डार्विनच्या थेअरितले सुक्ष्म प्रश्नही विचारायचे नसतात  . कुणाला कुराणात मेडिकल सायन्स दिसते. किंवा बायबलातले  इलेक्ट्रोनिक्स शोधले जाते. हि विज्ञान निष्ठा नाही . हा परंपरावाद आहे.  अंधभक्ति आहे.  सगळ्याच धर्माचे लोक अशा छद्म विज्ञान निष्ठेचे पाइक आहेत . जैन धर्म कसा अपवाद राहील ? 

अशी छद्म   विज्ञान निष्ठा जैन मंडळिहि दाखवतात . जैन धर्म समता मानतो. तो वर्णाश्रम विरोधी आहे वगैरे उच्च रवात सांगितले जाते. श्वेतांबर धर्म संप्रदायात वर्धमान महाविराचा जन्म संक्रमणातुन झालेला आहे असे मानले जाते . प्रथम देवानंदेच्या (ब्राह्मण स्त्री ) पोटात राहिलेला हा गर्भ त्रीशिला (क्षत्रिय स्त्री) च्या उदरात संक्रमित झालेला आहे . असे श्वेतांबर परंपरा मनते. महान धर्मपुरुषात ब्राह्मणाचा अंश असलाच पाहिजे अशी हि विचित्र श्रद्धा आहे. या श्रद्धेतून  संक्रमणाच्या चमत्काराचा जन्म झालेला आहे.  यात ब्राह्मण श्रेष्ठ्त्वाचा वास आहे. हल्लीच्या फ़ेशन नुसार हि भटांनी नंतर केलेलि घुसडंबाजि आहे असे म्हणता येईल . पण त्याने आख्खी श्वेतांबर परंपरा ब्राह्मणी ठरण्याचा धोका उत्पन्न होतो .  दिगंबर हि दुसरी परंपरा -  तिर्थंकर फक्त शुद्ध क्षत्रियच असतात असे मानते . इथेही वर्ण श्रेष्ठत्वाचा दर्प उरतोच .  वर्णव्यवस्था अभंगच राहते. 

जैन धर्मात सात तत्वे आणि नऊ  पादार्थ मानले आहेत. त्यातल्या द्र्व्यास्रवात वेदनीय , मोहनीय   अशी  आठ प्रकारची कर्मे येतात . त्यातले एक गोत्र कर्म आहे .गोत्र म्हण्जे आजच्या परिभाषेत पोटजात .  या गोत्र कर्माने सामाजिक दर्जा ठरतो याबद्दल पुरातन जैन साहित्यात कुठेही संदेह नाही . 

जैनांनी सजिवांचे वर्गीकरण केले आहे त्यात त्रस जीव म्हणुन एक भाग येतो . ज्ञानेंद्रियांच्या संख्येवरून सजीव सृष्टीचे केलेले वर्गीकरण यात येते . काळाच विचार करता ते महान आहे. पण आधुनिक विज्ञानाने कालबाह्य ठरवले आहे . जैनांची स्वत:ची पुराणे आहेत . त्यात पुरेशा भाकडकथा आहेत. जैन कुमारी साध्विंचा केस उपटायचा हिंसक विधीही आहे  .  वर्धमानाच्या चिंतनात जैन धर्म निरीश्वरवादी असला तरी पुढे तिर्थंकरांचि देवळे येतात. नवस हि बोलले जातात .  आणि आजच्या आचारधर्मात जैन हा हिंदुधर्मासारखाच एक रुढिवादि धर्म बनून उरतो . 



जैनांचे  तात्विक श्रेष्ठत्व आणि बौद्धिक झेप 


हे सामजिक सत्य स्वीकारूनही तत्वज्ञ म्हणुन जैन मुनींचे आणि  तिर्थंकराचे महान स्थान कुणीही नाकारू शकत नाही. स्याद वाद आणि त्यातून निर्माण होणारी बौद्धिक अहिंसा हि जैन धर्माची मानवतेला देणगी आहे . एकाच वस्तूकडे अनेक दृष्टीकोनातून पाहता येते . त्यामुळे कोणतेच विधान अंतिमत: सत्य नसते. सत्य  - -स्थळ,  काल आणि परिप्रेक्ष सापेक्ष असते (सापेक्षतावाद). अवकाश (अलोकाकाश ) हि संकल्पना  जैन  धर्मात आहे . जैनांनी काल द्रव्य अशी एक कल्पना केलेली आहे.  हे एकमितीय आहे . त्यामुळेच पदार्थात बदल अथवा विकार घडून येतात . त्यामुळेच पदार्थाला स्वत:ची ओळख मिळते.  इथे मात्र जैन धर्म आधुनिक विज्ञानाच्या, भौतिक शास्त्राच्या, सापेक्षतावाद  आणि गणिताच्या खूप जवळ जाउन बसतो. प्राचीन  भारतीय श्रमण परंपरेतल्या ह्या अलौकीक बौद्धिक  झेपेचा मला अभिमान वाटतो.

जैनांची ज्ञान मिमांसा अफलातून आहे. सर्वसाधारणपणे डोळे,  कान इत्यादी   ५ ज्ञान  इंद्रियांच्या सहाय्याने होणारे ते प्रत्यक्ष ज्ञान असे इतर भारतीय दर्शनात मानले जाते. जैन म्हणतात इंद्रियांचे सहाय्य लागत असेल तर इंद्रिये हि माध्यम ठरतात . ज्यास माध्यम लागते ते ज्ञान साक्षात कसे ? मानवी इंद्रियांना खिडक्यांची उपमा देता येईल . खिडकीतून बाहेरचे दिसते . त्याच प्रमाणे बाहेरच्या पदार्थांचे ज्ञान इंद्रिये आत्म्या  पर्यंत 
पोचवतात ! पण खिडकी म्हटली कि भिंती आल्याच . या भिंती पाडून टाकल्या कि खरे केवल ज्ञान प्राप्त होते.   अहिंसक आत्मा असा विश्वरूप होऊन जातो ! 

अनेकांतवाद मनापासून स्वीकारला कि इतरांचे तत्वज्ञान जसे मर्यादित अर्थाने सत्य होते त्याचप्रमाणे स्वत:च्या तत्वज्ञाना वरही मर्यादेची बंधने येतात . हि जगाची सत्यता मान्य करून , कोणताही ग्रंथ , शब्द अगर देव प्रमाण न मानता नैतिक जीवनाची उभारणी करता येते हा जैनांचा  आग्रह होता .  हा आग्रह हा मला जैन धर्माशी जोडणारा सांधा आहे . 






जैनांचा बुद्धिवादी निरीश्वर वाद :


विरोधी पक्षाला ठार मारणार्या हिंसक समाजाला वाद विवाद आणि चर्चेची गरज वाटत नाही . हिंसक माणसालाही बुद्धिवादाची गरज नसतेच . बुद्धिवाद खर्या अहिंसकाला प्रिय असतो . जैन धर्म ईश्वर मानत नाही . पराकोटीच्या बुद्धीवादातून हा निरीश्वरवाद जन्माला आलेला आहे . जैन साहित्य ईश्वराची चर्चा करताना म्हणते :-

१) जगात एकसारखे बदल घडून येतात यावरून तुम्ही यामागे काहीतरी हेतू असला पाहिजे असा अंदाज करता . मग हे हेतू ईश्वरी असले पाहिजेत असा सुपर अंदाज करता ! 

२ ) अंदाज आणि सुपर अंदाज दोन्ही चुकलेले आहे ! जगात बदल होतात . जग कार्य आहे एव्हढेच सत्य आहे. त्यावरून यामागे कोणीतरी - " तो " :- कर्ता - धरता आहे हे सिद्ध होत नाही . समजा क्षणभर "" तो ""  आहे असे वाद विवादासाठि मान्य केले तरीहि ; त्याने नुसते असून उपयोगी नाही . त्याने स्वत:ची इच्छाशक्ती वापरली पाहिजे. इच्छाशक्ती म्हटली तिच्यात चढाव उतार आले . निरनिराळ्या आकांक्षा आल्या . आकांक्षांचे निर्माण होणे आणि नष्ट होणे ओघानेच आले . म ईश्वर लहरी ठरतो . त्यात नित्यत्व कोठे आहे ?

३) बुद्धिमान ईश्वराने जग कशासाठी निर्माण केले हे तरी सांगाल का ? केवळ लहर म्हणुन ? तसे असेल तर विश्वात एव्हढी सुसंबद्धता कशी काय ? जर ईश्वर करुणेने प्रेरित झाला असेल तर जगात त्याने दु:ख का शिल्लक ठेवले ? जर मनुष्याच्या स्वत:च्या कर्माने (कर्मनियम ) दु:ख निर्माण होत असेल तर हे कर्मनियम इश्वरापेक्षा वरचढ ठरतात कि ! म्हणजे ईश्वराला हि हे नियम पाळावेच लागतात . मग तो सर्वशक्तिमान कसा ? स्वतंत्र कसा ? निर्माता कसा ? 

४) हे सारे सोडुन केवळ लीला (instinct / खेळ )  म्हणुन परमेश्वराने जग उत्पन्न केले असे मानले तर परमेश्वर पोरकट ठरतो !  असा पोरखेळ करणारा न मानालेलाच बरा !

५) सृष्टी उत्पन्न करणे हा ईश्वराचा स्वभाव आहे असे मानायचे काय ? मग ईश्वराची भर कशाला पाहिजे ? सर्जन (नव उत्पत्ती ) हा जगाचाच स्वभाव आहे एव्हढे मानले तरी पुरतेच कि !


जैन धर्माची हि निरीश्वरवादी भूमिका आधुनिक नास्तिकाच्या भूमिकेशी मिळती जुळती आहे यात शंका नाही

मानवी बुद्धीचे थिटेपण 

मानवी बुद्धी खुजी आहे हे सर्वच धर्म मानतात . मग जैनाचे काय विशेष ? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. .सत्य समजण्याच्या मानवी  बुद्धीच्या मार्यादेबद्दल कोणत्याही धार्मिक माणसाला शंका असत नाहि. स्वत:च्या शंकाचे निरसन करण्याची जवाबदारी त्याने  देवावर किंवा अल्लाह वर सोपवली असते. हे देव  लोक सहसा असे समाधान करत नाहीत !  त्यामुळे एखाद्या   धर्मगुरूच्या खांद्यावर हा भार आपसुक येउन पडलेला असतो . मुळात धर्माचा जन्मच अज्ञान आणि भीती मधून झालेला आहे.जन्माआधी मी कोण होतो ? म्रुत्युनंतर काय ? जगण्याचा हेतू काय ? को हं ? अशा प्रश्नातून किंवा भविष्याच्या चिंतेतुन -  भीतीतून धर्म नावाची पिल्ले जन्माला येतात. मानवी बुद्धीचे थिटेपण, खुजेपण , मर्यादा -  श्रद्धेला म्हणा किंवा अंधश्रद्धेला म्हणा -  जन्म देत असते.

 हे वैश्विक  बौद्धिक थिटेपण हाच धर्म मानणे -  हे  खरे जैन धर्माचे वेगळेपण आहे.

 सत्याचे मानवी आकलन अपुर्ण असते. इथपर्यंत सर्व धर्मांचे एकमत आहे 
 पण .
सत्याचे मानवी आकलन विभिन्न असते. आणि ती विभिन्नता हेच सत्य - हाच जैन धर्म !   
हा जैनांनी ठोकलेला उत्तुंग बौद्धिक  षटकार आहे .   त्या अंतिम वैश्विक   सत्याचा साक्षात्कार वर्धमान महावीराला झालेला आहे. 



वर्धमान महावीर 


सत्य अनेक चष्म्यातून पाहता येते .  त्यामुळे दुसर्याच्या मताचा आदर केला पाहिजे.  यातूनच अहिंसा आणि परमत  सहिष्णुता , सर्व धर्म  समभाव   जन्माला येतात .  अहिंसेचे वडिल म्हण्जे स्याद वाद आणि स्याद वादाचे पितामह म्हणजे अनेकांतवाद . अशी हि वैचारिक वंशावळ आहे.  . जैन तिर्थंकरांनि भारताला या महान सत्याचा वर दिलेला आहे . हे तत्व समजल्याशिवाय भारत समजणार नाही . गांधिजिंचे आकलन होणार नाही . गांधिंनि हिंदुच्या हृदयावर का राज्य केले ? हेही समजणार नाही .  संख्येने जैन अल्प  आहेत . पण अनेकांतवाद , अहिंसा ,परमत  सहिष्णुता , परधर्म सहिष्णुता , सर्वधर्म समभाव हि तत्वे भारतातिल बहुसंख्य जनतेच्या रक्तातच उतरली आहेत. सामाजिक समता आली नाही पण..... . सर्वच जाती जमाती आणि टोळ्यांच्या हजारो  देवतांना भारतात समान महत्व आले आहे . त्यातून आजचा अगडबंब पण विस्कळीत आणि विषम  असा हिंदु धर्म निर्माण झाला आहे. चार्वाक, सांख्य , जैन, बौद्ध , अद्वैतवादी, वैदिक , द्वैती  यांच्या बौद्धिक चर्चा आणि वाद विवाद आपल्याकडे भरपूर वर्षे चाललेले आहेत .पण  प्राचीन भारतात ; अपवाद वगळता ; धर्मावरून रक्तपात झालेले नाहीत . दुसर्या धर्माविरुद्ध क्रुसेड किंवा जिहाद भारतात नाही . अनेकांतवाद हे त्याचे कारण आहे.   .त्या अर्थाने महावीराने भारत पादाक्रांत केला आहे. वर्धमान चा  एक  अर्थ आहे वाढणारा.  .  शांततेने सहजीवन जगायचे असेल तर सार्या  जगाला या तत्त्वांचा स्वीकार करण्या वाचून पर्याय  नाही .महावीराची वर्धमान अहिंसा जगही पादाक्रांत करेल अशी आशा  बाळगु . अनेकांतवादानुसारच त्यासाठी जैन धर्माचा प्रत्यक्ष स्वीकार करण्याची गरज उरत नाही !    अनेकांतवादाचे वैद्न्यानिक सत्य स्विकारणे पुरेसे आहे.  भगवान महाविरांचे  अहिंसेचे चिंतन  वैश्विक  आणि   वर्धमान आहे.  जर तसे झाले नाही तर.....आपापसात धर्म आणि इझम वरून युद्ध करंणार्या ....  सार्या  जगाला .....कयामत किंवा सत्यानाश किंवा  सर्वनाश अटळ आहे.    


माणुस हा विचारी प्राणि आहे आणि त्यात टिकून राहण्याची क्षमता आहे , यावर विश्वास ठेवला तर कालौघात माणुस अनेकांतवादाचा स्वीकार करणारच !



 ह्या अर्थानेही वर्धमान महावीर हे नाव सार्थ आहे. 







१३ टिप्पण्या:

  1. अभिराम, तुमचा छान लेख, आणि ही टीका योग्यच आहे.

    आधुनिक काळ हा विज्ञानाच्या प्रतिष्ठेचा काळ आहे. सर्व जग अणु रेणुंचे बनले आहे असे विज्ञानाने म्हटले कि - कुणीतरी सोम्या गोम्या किंचाळतो - आता कणाद ऋषी विज्ञानाला कळाले ! त्यावेळी कणाद कशाला अणु मानतो ? त्याची द्रव्याची व्याख्या काय आहे ? या चिंतेत कुणीही पडत नाही . मग काहिंना वेदात विमाने दिसतात. दशावतारात डार्विन दिसतो. त्यावेळी डार्विनच्या आधी हे का दिसले नाही असे कोणि विचारायचे नसते. डार्विनच्या थेअरितले सुक्ष्म प्रश्नही विचारायचे नसतात . कुणाला कुराणात मेडिकल सायन्स दिसते. किंवा बायबलातले इलेक्ट्रोनिक्स शोधले जाते. हि विज्ञान निष्ठा नाही . हा परंपरावाद आहे. अंधभक्ति आहे. सगळ्याच धर्माचे लोक अशा छद्म विज्ञान निष्ठेचे पाइक आहेत . जैन धर्म कसा अपवाद राहील ?

    अशी छद्म विज्ञान निष्ठा जैन मंडळिहि दाखवतात . जैन धर्म समता मानतो. तो वर्णाश्रम विरोधी आहे वगैरे उच्च रवात सांगितले जाते. श्वेतांबर धर्म संप्रदायात वर्धमान महाविराचा जन्म संक्रमणातुन झालेला आहे असे मानले जाते . प्रथम देवानंदेच्या (ब्राह्मण स्त्री ) पोटात राहिलेला हा गर्भ त्रीशिला (क्षत्रिय स्त्री) च्या उदरात संक्रमित झालेला आहे . असे श्वेतांबर परंपरा मनते. महान धर्मपुरुषात ब्राह्मणाचा अंश असलाच पाहिजे अशी हि विचित्र श्रद्धा आहे. या श्रद्धेतून संक्रमणाच्या चमत्काराचा जन्म झालेला आहे. यात ब्राह्मण श्रेष्ठ्त्वाचा वास आहे. हल्लीच्या फ़ेशन नुसार हि भटांनी नंतर केलेलि घुसडंबाजि आहे असे म्हणता येईल . पण त्याने आख्खी श्वेतांबर परंपरा ब्राह्मणी ठरण्याचा धोका उत्पन्न होतो . दिगंबर हि दुसरी परंपरा - तिर्थंकर फक्त शुद्ध क्षत्रियच असतात असे मानते . इथेही वर्ण श्रेष्ठत्वाचा दर्प उरतोच . वर्णव्यवस्था अभंगच राहते.

    जैनांनी सजिवांचे वर्गीकरण केले आहे त्यात त्रस जीव म्हणुन एक भाग येतो . ज्ञानेंद्रियांच्या संख्येवरून सजीव सृष्टीचे केलेले वर्गीकरण यात येते . काळाच विचार करता ते महान आहे. पण आधुनिक विज्ञानाने कालबाह्य ठरवले आहे . जैनांची स्वत:ची पुराणे आहेत . त्यात पुरेशा भाकडकथा आहेत. जैन कुमारी साध्विंचा केस उपटायचा हिंसक विधीही आहे . वर्धमानाच्या चिंतनात जैन धर्म निरीश्वरवादी असला तरी पुढे तिर्थंकरांचि देवळे येतात. नवस हि बोलले जातात . आणि आजच्या आचारधर्मात जैन हा हिंदुधर्मासारखाच एक रुढिवादि धर्म बनून उरतो .

    उत्तर द्याहटवा
  2. नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख आहे. असेच लेखन नेटाने ( आणि नेमाने ) चालू द्या !

    उत्तर द्याहटवा
  3. Mahavir jain once ate died chicken which was killed by cat to gain energy which was necessary to gain energy to meditate. is it true?

    उत्तर द्याहटवा
  4. hello सर,
    तुमचा 'अथातो धर्मजिज्ञासा-महावीराची वर्धमान अहिँसा' हा लेख वाचण्यात आला. मी एक जैन आहे. आणि पहिल्यापासून जैन तत्त्वज्ञानावर मनापासून प्रेम करणारा आणि आमच्या समाजातल्या अनेक अंधश्रध्दा-अनिष्ट रूढीँना विरोध करणारा आहे. या दोन्ही दृष्टिकोनातून आपला लेख आवडला.
    लेख वाचायला सुरवात केली तेव्हा खूप छान वाटलं. एखादी गोष्ट जैन/श्रमण परंपरेची देणगी आहे म्हणून त्यातल्या भारतीयत्वाचा धागा पकडून तिच्याबद्दल अभिमान बाळगणारी तुमच्यातली अजैन व्यक्ति खूप भावली. जितक्या आग्रही आणि प्रभावी शब्दांत तुम्ही जैन तत्त्वज्ञानाचे वर्णन केले तितक्याच स्पष्ट शब्दांत आजच्या जैन समाजातल्या त्रुटीँवरही नेमकं बोट ठेवलं.
    खरं तर सुरवातीला वाचताना ते आक्षेप चांगलेच खुपले. ते सर्व खरे आहेत व मी स्वतः सुधारणावादी आहे तरी देखील खुपले. स्वतःच्या घरातला कचरा बाहेरच्याने येऊन दाखवला की कसं वाटेल, अगदी तसं वाटलं. पण लेख 2-3 वेळा वाचला. मग पटलं की तुम्ही बाहेरचे कसे..? महावीर तर सगळ्यांचे आहेत. मग पुन्हा स्वतःच्या संकुचितपणाची जाणीव झाली नि वाटलं खरा अनेकांत तर तुम्हालाच कळला... असो खूप प्रदीर्घ होतंय.
    पण लेख खरंच अप्रतिम आहे. तुमची परवानगी गृहीत धरून माझ्या वॉल वर शेयर करतोय...
    'जैनांची अहिँसा ही अशी मनात जन्मते. आणि ती दुसय्रा आधी स्वतःची चिकित्सा करते.' हे वाक्य खूप आवडले. अशी परखड चिकित्सा करण्याची सुबुध्दि आम्हां जैनांना मिळेल अशी अपेक्षा करतो. शेवटी वयाने आणि ज्ञानाने तुम्ही मोठे आहात सर, काही चूक झाली असेल तर क्षमा असावी.
    thanx sir..

    उत्तर द्याहटवा
  5. बौद्ध धर्मीय चीन युद्धखोरी दाखवितो कि कम्युनीझ्हम स्वीकारलेला चीन ??... बुद्ध धम्म चीन मध्ये जावून शेकडो वर्षे झ्हालीत ..किती बौद्ध राज्वातिनी भारतावर हल्ला केला ??

    उत्तर द्याहटवा
  6. उत्सुकतेपोटी लेख वाचला पण सामना किवा नवाकाळ मधील लेख वाटला ,जैन धर्माचा सविस्तर अभ्यासकरून लिहिले असते तर चिकित्सा वाटली असती किवा महावीरांचे भव्य दिव्य विचारांचा फैलाव /प्रचार /प्रसार का झाला नाही ?जैन धर्मियचं व्यापारात का पुढे आहेत याचेही अकलन झाले असते ..
    .

    उत्तर द्याहटवा
  7. अप्रतिम...!
    जैन तत्त्वज्ञान, समज-गैरसमज समजून घ्यायला ह्या सविस्तर लेखाचा खूप फायदा झाला...!
    धन्यवाद अभिराम...!!!

    उत्तर द्याहटवा
  8. खूपच छान , सविस्तर मांडणी केलीय अगदी.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *