२ एप्रि, २०१३

बडवा ( कडव्या हिंदूची बखर ) - भाग 3


बडवाबडवा भाग १ साठि लिंक : -  http://drabhiram.blogspot.in/2013/03/1.html
बडवा भाग 2 साठि लिंक : -  http://drabhiram.blogspot.in/2013/03/2.html

पेग पहिला


शिंदे सरांनी स्कॉचचे दोन लार्ज पेग बनवले. विनोद च्या ग्लासात थंड सोडा भरला. स्वतःच्या ग्लासात बर्फाचे तीन खडे टाकले फक्त.... बर्फ ग्लासात घोळवत घोळवत ग्लास आदळला आणी म्हणाले " चिअर्स... विनोद तुला माहितिय ? ही चीअर्स ची प्रथा कशी सुरू झाली ते ? तसा तू ....या विषयात नवाच ! मी बर्‍याच गोष्टी ऐकल्यात चीअर्स बद्दल. युरोपातली प्रथा आहे म्हणतात. .....युद्धानंतर शत्रूपक्षातले जनरल लोक वाटाघाटी करायला बसायचे.... त्यावेळी बिअर ढोसायचे. कधी कधी बिअर मधूनच एकमेकाना विषप्रयोग करायचे. त्यावर उपाय म्हणून चिअर्स आलं. चिअर्स च्या वेळी ग्लास आदळायचे.... मग दोन्ही ग्लासातली बिअर इकडे तिकडे मिसळते.... बियर मधला अर्क मिसळला कि   विषप्रयोगाचा धोका टळतो. म्हणून ! चिअर्स ! "

विनोदनं पहिल्यांदा एक खणखणीत घोट ओढला. शर्टाच्या बाहीन ओठ पुसले. स्कॉच प्यायची ही पद्धत नव्हे खर तर. पण शेवटी दारू ती दारूच. अर्धा झालेला ग्लास टेबलावर ठेवत विनोद बोलला '' आपण जनरल तर आहोत सर; पण शत्रूपक्षातले नाही. तेंव्हा विषप्रयोगाचा धोका नाहीच ! आणी खरं युद्धही अजून सुरू व्हायचय.. "

" आणी रणांगणावर माझा सेनापती विजयी होणारच. तेंव्हा थ्री चीअर्स फॉर यू विनोद. पहिल्यांदा पत्रकाची केस निल करून  देतो. केस निल झाली की, टार्गेट : उस्मान ची बहीण नाजरीन ... १८ वर्षाला सहा महीने कमी आहे वय तिच. उचलायची तिला. आणी मग हो गायब ६ महीन्यांसाठी. लग्नाच कायदेशीर वय झाल की सहा महीन्यानी बेळगावच्या नटेश्वर मंदिरातच धडाक्यात लग्न लावतो तुमचं. हिंदूची पोरगी पळवल्याचे परिणाम कळू दे साल्याना. त्यानंतर फक्त चार --- सहा महिन्यात लोकसभेची निवडणूक लागेल. चमत्काराला नमस्कार होतोच विनोद. आणी आपला हिंदू समाज मेल्या आईच दूध प्यालेला नाही. पराक्रमाला मतदान होतंच. हजारो भाषणांपेक्षा एक बाबरी काम करते आणी देशाचं सरकार बदलते... राजकारणात जनतेची नाडी कळली पाहीजे. मला बेळगावच्या मतदाराची नाडी माहितीय विनोद. शास्त्रीजींची सुनेत्रा उस्मान न पळवली आणी कट्यार खुपसली बेळगावच्या काळजात. ती जखम सांधणारा खासदार होणारच. आणी तुझी पक्षाकडून उमेदवारी फिक्स करायची जवाबदारी माझी ! निवडुन आणण्यासाठी जी काही ' गडबड '  करावी लागेल त्याचीही जवाबदारी माझी . तेंव्हा भावी खासदार श्री विनोदभाउ बडवे.. चीअर्स.. थ्री चीअर्स फॉर यू !" ग्लास उंचावत शिंदे म्हणाले; आणी मग त्यानी एक हलका सीप मारला.

गडबडलाच विनोद. खर तर त्याला त्याच्या आणी नियतीच्या प्रेम प्रकरणाविषयी सरांशी बोलायच होतं. पण सरांची गाडी वेगळ्याच रूळांवर धावू लागली होती. ही खासदारकीची गाडी विनोद सोडणार न्हवता. पण नियतीची मधुर साथसोबतही सोडू इच्छीत न्हवता. गोंधळलेल्या चेहर्यान सरांकडे बघत त्यानी ग्लास उचलला आणी एका दमात तो संपवत म्हणाला " जरा गोंधळलोय मी सर. आपल मागे बोलण झाल्यानुसार नाझरीनच्या मोठ्या बहिणीशी क्रीष्णान सूत जुळवलंवतं; तिला उचलायला आम्ही टीपू सुल्तान नगर पाशी गेलो आणी मग सगळा राडा झाला..."

ग्लास संपवत शिंदे म्हणाले " प्लॅन चेंज विनोद... क्रीष्णा आणी तू दोघानी सय्य्दांच्या पोरी उचलायच्या. क्रीष्णाच लग्न लगेच लावायच. तू नाबालिक नाझरीन ला घेउन ६ महीने गायब रहायच. म्हणजे सहा महिने विषय मिडियात तापत राहिल. तिच लग्नाच कायदेशीर वय झालं की प्रकटायचं. आणी निवडून यायचं". तू निवडुन येण्यासाठी जो दंगाधोपा आणि खूनखराबा करावा लागेल त्याची जवाबदारी माझी.....
गोंधळलेल्या चेहर्यान विनोदने दोघांचे पेग भरले आणी म्हणाला " धक्का बसला सर."

पेग दुसरा

पुढचे दोन तीन घुटके मारताना शिंदे शांतपणे विनोदकडे पहात होते. म्हणाले " गडबडून जाउ नको विनोद.. मी अतीशय विचारपूर्वक योजना बनवलीय. तू नाझरीनला घेउन गायब व्हायच. पहिल्यांदा पोलीस तुला कुठे शोधतील ? बेळगावात. पण तू त्याना सापडणार नाहीस. कारण तू तेंव्हा पंढरपुरात असशील. तिथल्या गर्दीत मिसळलेला. तुझं वडीलोपार्जीत घर आहे तिथं. त्याबद्द्ल कोणालाही माहीत नाही. त्या घरी रहायचं मागच्या दारानं एन्ट्री घ्यायची आणी सुमडीत रहायचं वरच्या सोप्यावर. कार्यकर्ते शिधा पोचवतील तुला. बाकी पोलीस तुला शोधतील मुंबई पुण्यात पण त्याना काय मिळणार ? केळं.... ! बाकी पोरगी एकदा अठरा वर्षाची झाली की लावू वाजत गाजत लग्न. तेव्हा पहिल मिशन म्हणजे नाझरीनला फूस लावून पटवणे. बाकी ते जमेलच तुला. तुझ्यासारख्या देखण्या राजकुमाराची वाटच पहात असतात पोरी."

" सर तुमच्याशी नियतीबद्दल बोलायचं होतं थोडसं " विनोद चाचरत म्हणाला.

दोन पेग होत आले. शिंदे भावूक झाले. ग्लास संपवत शिंदे म्हणाले मला पण बोलायचय तिच्याविषयी. " बाकी तू आणी नियती मला मुलं दोन. दोघही दिसायला सुंदर सर्वगुणसंपन्न की काय ते ! पण मुकं लेकरू नियती. पोरीच्या बापाच्या चिंता कळायच्या नाहीत तुला विनोद. "

विनोदचं डोकं भणाणलं होतं. आपण कोण कुठले पोरके भटके. आपल्यासारख्या अनाथाला शिंदे सरानी मायेने जवळ घेतलं , नेता बनवल ....  मुलगा मानलं, राजकीय वारसदार मानलं, त्यांच्या मुलीबद्दलच्या भावना कशा सांगाव्या त्याना ? त्यांच्या आपल्याबद्दलच्या योजनांवर पाणी कसं फिरवायच ? कस खेळायचं त्यांच्या आणी  खर तर आपल्याही राजकीय स्वप्नांशी ?  भानावर येत विनोद म्हणाला " नियतीबद्दल बोलत होता सर ... "

ग्लासातले बर्फखडे खुळखुळवत शिंदे म्हणाले. '' हो तिच्यासाठी स्थळ बघितल आज. स्थळ ऐकून धक्का बसेल तुला.. इंन्पेक्टर राजवीर पाटील ! मुलगा मोठा उमदा वाटला मला. पण पक्का .. हिंदुत्वाचा विरोधक. आधी मानवता - माणुसकी  वगैरे बडबडला. कशाला पायजे धर्मावरून भांडणं वगैरे वगैरे... त्यानंतर तेच तेच बामन बामन बामन बामन करत बसला, वेदोक्त प्रकरण बामनी कावा वगैरे.. मी विचारलं त्याला - हिंदुत्व  ? काय आहे हिंदुत्व ? बामणाला आंदण कुणी दिल ? कुणि दिली मक्तेदारी हिंदुत्वाची भटाला  . काय आहे हिंदुत्व ??

ग्लास टेबलावर ठेवला. दोन्ही हात मानेमागे ठेवत ते म्हणाले " मग मी राजवीरला त्याच्याच आजोबांची गोष्ट सांगीतली. त्याचे आजोबा ...माझ्या चुलत्यांचे मामेभाउच ते ..... पाहुण्यापैकि आमच्या ...नाना पाटलांबरोबरचे  स्वातंत्र्यवीर होते. ते कम्यूनिस्ट. पण निजामी राज्यातल्या रझाकरांची मस्ती उतरवायला. नानांची तूफान सेना धावली होती....तेव्हा राजविरचा आजा हातात ठासणीची बंदुक घेऊन धावला होता ....... ते हिंदुत्व "

"माझा देश... देशावरच प्रेम... देशद्रोह्यांची चीड म्हणजे हिंदुत्व... माणुसकी हाच खरा धर्म बरोबराय.. घराला कुलुप घालू नये ही पण एक आदर्श गोष्ट आहे... पण जोपर्यंत या जगात खुनी आहेत बलात्कारी आहेत; तोपर्यंत घराला कुलुपांची आवश्यकता आहे... माणुसकी हाच खरा धर्म असला तरीही जोपर्यंत इस्लामी जिहादची दारू पिउन या लांड्या  डुकरांचा दहशतवादी नंगानाच या देशात सुरू आहे तोपर्यंत आम्ही हिंदुत्वाचे रणशिंग फुंकतच राहणार. ....शेंडीच्या गाठीत, जानव्याच्या दोरीत, गायीच्या मुतीत हिंदुत्व नाही...... पुराणातल्या वांग्यात, तीर्थाच्या भांड्यात, उपासाच्या सांडग्यात हिंदुत्व नाही..... वेदांच्या उक्तीत ..., यज्ञाच्या आगीत , ब्राह्मणांच्या पंगतीत हिंदुत्व नाही... देशद्रोह्यांची दाढी उपटायला मर्द हिंदूंची मूठ वळते -  त्यात -आणि त्यातच हिंदुत्व आहे..त्या वळत्या मुठीत ... पेटत्या डोळ्यात ...... सीमेवरच्या जवानांत , जवानांच्या हौतात्म्यात , त्यांच्या चीतेतल्या निखार्‍यात हिंदुत्व आहे. कारसेवकांच्या अंगारात हिंदुत्व आहे. वीरपत्नींच्या त्यागात - अश्रूत हिंदुत्व आहे..... त्यांच्या डोळ्यातले एक थेंब पाणी लाख  लाख तरुणांचे रक्त उकळवते त्यात हिंदुत्व आहे. त्या उकळत्या रक्तात, रक्ताच्या नात्यात हिंदुत्व आहे. हिंदुचे बंधुत्व म्हणजे हिंदुत्व ! "
"मग काय म्हणाला राजवीर ?" पेग भरत विनोद ने विचारले.

पेग तिसरा 

 राजवीर फार नेमकं बोलतो. हिंदूनी एक व्हायला कुणाचीच अडकाठी नाही, पण हिंदुत्वाचा वटवृक्ष जर वाढायचा असेल तर त्यावरची सनातनी बांडगुळं भवानी तलवारीनी छाटावी लागतील म्हणाला तो. ठीकय. पण त्यावर जास्तीची मल्लीनाथी करत म्हणाला, पण त्यासाठी हिंदू आणी मुस्लीमात अविश्वास तयार करायची काहीच गरज नाही. तसं करू नका तुम्ही लोक". शिंदेनी राजवीरची भाषा ऐकवली.

ग्लास टेबलावर आदळत विनोद म्हणाला "आईच्या गावात गेला विश्वास."

शिंदेनी खांद्यावरची शाल काढून सोफ्याच्या पाठीवर टाकली. स्कॉचचा एक हलका सिप मारला आणी डोळे बारीक करत विनोद कडे पहात, स्मितहास्य करत ते म्हणाले " कसा जाईल आइच्या गावात ? पानिपतात पूर्वीच मेला नाही का तो ? मग मी राजवीरला ९२ च्या दंगलीवेळची एक गोष्ट सांगीतली.

 बेळगावाचा आमदार होतो मी तेंव्हा. भल्या पहाटे एक कार्यकर्ता माझ्याकडे आला म्हणाला बडी मशीदीत मुस्लीमांनी शस्त्र लपवलियात..... मग पहाटेच्या नमाजाच्या वेळेलाच -- दोनशे कार्यकर्ते घेउन धडकलो मशीदीत. सरळ आत घुसलो. मला पाहून सारी मुसलमानं भीतीने चळाचळा कापत उभी होती. ....सगळी मशीद शोधली. तपासली.... एकही शस्त्र न्हवतं... मग दुसरा कार्यकर्ता बोलला इथे नाही सर ...अल निर्मा मशीदीत पेट्रोल बाँम्ब आहेत... मग आम्ही तीही मशीद तपासली. तिथंही काही मिळालं नाही. त्यादिवशी बेळगावातल्या तब्बल पंधरा मशीदी तपासल्या आम्ही.... एकाही मशीदीत काडी सुद्धा   मिळाली नाही . तलवारी आणी पेट्रोल बाँम्ब सोडाच. शाट्ट मिळाल नाही .. पोपट झाला माझा तेंव्हा. पण आजही कुणी मला मशीदीत शस्त्र लपवल्याची टीप दिली तर मी तपासायला जाईनच तिथं. कारण काय ? अविश्वास ! अविश्वास आहे आपल्या देशात मुसलमानांबद्द्ल...... मशीदीत शस्त्र लपवल्याची बातमी कोणालाही खरीच वाटेल. पण प्रश्न असा आहे की का नाही बसत विश्वास अल्पसंख्यांवर? पाकिस्तानातल्या हिंदूनी मंदिरात शस्त्र लपवल्याची टीप तिथल्या मुसलमानाना कुणी दिली तर ? काय प्रतिक्रीया असेल त्यांची ? दाताड विचकटून हसतील ते पाकडे ! आता कळलं का नाही बसत विश्वास .....

त्यांची वागणूक, आचार आणी अनुभवच असे आहेत की विश्वास ठेवूच शकत नाही मी."

" मग मी राजवीरला म्हणालो तुला पोपटाची गोष्ट महितीय का ? एक सुंदर राजकन्या असते. एका राजकुमाराचं तिच्यावर फारफार प्रेम असतं. एकदा एक दुष्ट राक्षस त्या राजकन्येला पळवून नेतो. मग राजकुमार काय करणार ? झक्कत जातो लढायला राक्षसाशी. पहिल्यांदा राक्षसाचा हात छाटतो. लगेच दुसरा हात उगवतो. पाय उडवल्यावर नवीन पाय उगवतो. मुंडकं कापल्यावर नवं मुंडकं उगवतं. आता राजकुमाराला प्रश्न पडतो की याला मारायचा कसा? मग त्याला तिथं एक पोपट दिसतो. पोपट. हिरवागार. लाल चुटुक चोचीचा. राजकुमार त्या पोपटाची मान पिरगाळतो. राक्षस आचके विचके देत जमनीवर धाडकन पडतो. जीभ बाहेर लटकते त्याची. कारण राक्षसाचे प्राण त्या पोपटात असतात........ महाराजांनी त्यांच्या वाघनखानी अफझलखान उभा फाडला. पण संसदेवर हल्ला करणारा भडवा..... अफझलगुरू जन्माला येतोच आहे.  . एक अफझल फाडला तरी दुसरा तयार होतोच.... ह्या अफझुल्ल्यांचे प्राण कशात आहेत ? त्यांच्या पोपटाची मान पिरगाळल्याशिवाय हे अफझल सत्र थांबणार नाही. तो ईस्लामी धार्मीक शिकवणुकीचा पोपट आहे. जिहादचा पोपट छाटला पाहिजे. हिंदू म्हणून ताठ मानेन या देशात जगणे. हा माझा हक्क आहे. और मै कीसी आने वाली पीढीओंके लिये नही लढ रहा. मुझे मेरा हक चाहिये. और वो भी अभी. इसी वक्त. "

विनोदनी एका दमात ग्लास संपवला. त्याच्या आशा पल्लवित, चित्तवृत्ती उल्हासित झाल्या होत्या. अधिरपणे त्याने विचारल. "मग काय ठरलं नियतीच्या लग्नाचं ?"

" काय होणार ? लटकतोय अजून प्रश्न. पण राजकारण वेगळं आणी रक्तसंबंध वेगळे. हे त्यालाही कळतं. आणी मलाही.......पुढच्या बैठकीत गाडी सरकेल पुढे... ठरवून टाकू लग्न. "

विनोदच डोक गरगरू लागलं होतं. डोळे मिटले की की समोर वर्तूळं दिसायची. त्यात नाचती नियती तरळायची. तीन पेगनंतर भीडही थोडी चेपली त्याची. ग्लासच्या तळात बघत तो म्हणाला " .....सर नाझरीनशी लग्न नाय करायच मला. लग्न म्हणजे काय खेळय ? माझा खेळ नका मांडू.... माझ्या पुर्‍या आयुश्याचा प्रश्न आहे हा."

शिंदेनी ग्लास संपवला. नशा चढू लागली होती. नशा दारूची. ..नशा राजकारणाची... नशा सत्ताकारणाची... नशा इतिहासाची...नशा भूतकाळाची... नशा स्वतःचीच. छातीवर हात आपटत ते म्हणाले " हा मी. मी मल्हारराव केशवराव शिंदे. कोण आहे माहित आहे ? गरीब शेतकर्‍याचा पोरगा. आजचा आमदार. ४० कोटींचा मालक. बेळगावातल्या हिंदूंचा त्राता. आणी तुझा भाग्यविधाता. का आहे? कारण स्वतःच्या खाजगी जीवनाच तेरावं घालूनच राजकारणात उतरलो मी. तुझ्या आयुश्याचा प्रश्न नाही हा...... हा हिंदूच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. हा देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. तान्हाजी, बाजी, मुरारबाजीने स्वतः खाजागी आयुश्य फाट्यावर मारल म्हणून तू बडवा राहिलास. नाहीतर सय्यदांचा भडवा बनून नमाज पढतास."

डाव्या हाताने सोफ्याचा आधार घेत शिंदे पुढे कलले. ग्लास टेबलावर आदळत म्हणाले " भर पेग"

पेग चौथा

शिंदेनी पुन्हा ग्लास उचलला त्यातले बर्फाचे खडे स्कॉच मधे गोल - गोल फिरवले. " हे चक्र तोडलं पाहीजे. आता बस्स झालं. अब हिंदू मार नही खायेगा. तुम्ही पन्नास माराल तर आम्ही पाच हजार मारू. तुम्ही एक पोरगी बाटवाल तर आम्ही शंभर पोरीना शुद्ध करू. दुसरी भाषा समजत नाय भाड्याना. हे युद्ध आहे. त्यासाठी रणचंडी बळी मागते आहे. तुझ्या वैयक्तीक खाजगी जीवनाचा बळी. कवीता आहे ना ती ... जिवा,तान्हाजी, बाजी, मुरारबाजीवरची.... सेतुनिर्माण.... देहाचा पूल


स्वर्णीम पृश्ठ गतकालके
पढतेही कंपित हृदय, प्रस्फूर्त बाहुद्वय |

जो नस नस मे थी दौडी
बि़जली हमारी रगोंमे
हतवीर्य आज वह विद्युत
जीवन हुवा श्वानवत, या फूटी अपनी किस्मत|
किस्मत पे न रोते थे
खुद भविष्य अपना लिखते थे,
हस्तरेखाओंकी दिशा, मुट्ठी से बदलते थे |

मुठीत दारुचा ग्लास उंचावत विनोद उभा राहिला. कविता म्हणू लागला

खान उठाये बिडा ,  बिजापुरी दरबार में 
इस सिवा चूहे को , मै पकडुगा शान से
कसम खाकर जिहाद की निकला जानोशान से 
मुर्तिया भंजने गोवध करने , मुजाहिद निकले शौक से 

जासूद मौजूद सिवा का , बिजापुरी दरबार में 
पहुचा राजगड  किला , करे शिवा को मुजरा 
वृत्त सुनकर सिवा , हो गया उठ खडा 
खडे हो गए भाले , शत्रु रक्त के प्यासे 

जय भवानी नि गर्जना आसमान में लहराई 
हर हर महादेव  कहते    फ़ौज अवनिपर दौड़ी 

देखा तो बड़ी खायी ; अंगारो से भरी हुइ 
अद्भुत संकट आसमानी ; कैसे कुचले सुल्तानी 

आता विनोदच्या उघड्या डोळ्याना वर्तुळं वर्तुळं दिसू लागली होती. तिरमिरत तो बोलू लागला " सर म्ह्टलं तर कविता काल्पनीक आहे. म्हटलं तर जिवा,तान्हाजी, बाजी, मुरारबाजीवरची... रूपक कविता..म्हटलं तर भूतकाळ... " भूतकाळ अनिश्चित असतो" ....... " इतिहास हा अंदाज असतो " ...... मी गडकरी शिवबाचा....खानाची ती हिरवी छावणी. त्या भोवती खणलेला खंदक. खंदकात निखारे. पेटते निखारे. पल्याड जावून माजलेले बोकड चिरायचेत. त्यांच्या रक्तासाठी भाले तहानलेत. पण पेटत्या निखार्‍यावरून आत कस जायच ? विझवायला जवळ ओढे न्हवते. स्वराज्या भोवती अशाच अडचणींचे निखारे होते. पण मावळे लेचेपेचे न्हवते. " एका हाताने सोफ्याचा आधार घेउन विनोद उभा होता. थोर विचारवंताचा - वक्त्याचा आव आणत त्याने उजवा हात उंचावला होता.

ग्लास खाली ठेवत शिंदे उठले. पुढची कविता म्हणू लागले

" कल्पना स्पर्शली चित्ता
जो तोच पटाइत चित्ता
ठाकूनी पुढे सगळ्यांच्या

जाहला शिवजी वदता -
जाणार काय माघारा ?
सरकार काय हे पुसता ?
ऐका तर माझे आता -

जी तयार हुकुमाकरता

खंदकावरी जरी कोण
आपुले देह टाकून
मज देइल पूल करून ? "

"अंगारो की शयन
बनेगी कुसुमसज्जा
वीरो अपने तन से
सेतुनिर्माण है करना"

विनोदनं आपला वर नेलेला हात झोकात खाली आणला. चुटकी वाजवून त्वेषानं तो म्हणाला -

" निघताच शब्द बाहेर
जन निजले त्यावर चार
त्यांचिया शरिरावरूनी
छावणीत सगळे घुसले

गळे शत्रूचे चिरले

रक्त ते भाले प्याले"

इतक्यात उगवला अरुण
तो गुलाल उधळी वरून

अरुणोदय बस तभी हुआ
केसरिया रंग छाया
स्वाधीनता का भगवा
आस्मान मे लहराया "

रणचंडी व्यक्तीस्वातंत्र्याचा बळी घेत होती....नशा चढत होती. दारूची.... युद्धाची. ....अनिश्चित भूतकाळाची. काल्पनीक इतिहासाची.... ताम्रसुरा प्यालेला नभातला दैत्य माजला... राजकारणाचा राक्षस जास्वंद चुरगाळत होता. सत्ताकारणाचा सैतान नसानसात भिनत होता. मोगरा पिचत होता.

धडपडत विनोद टेबलाजवळ आला शिंदेकडे पहात म्हणाला " माजी आमदारसाहेब .... भावी खासदाराचा पेग भरा "

पेग पाचवा"विनोदपंत जरा चढलिय तुम्हाला." शिंदेच्या या उद्गारांवर विनोद म्हणाला - " मी कुठला पंत ? मी तर जंत सर... भरा पेग. पण सर खासदार होणारच आपण. कितिपण पैसे खर्च करू. माझा एक काँटॅक्ट आहे मुंबईत. लय भारी टॉप सिक्रेट. तुम्हाला सांगेन नंतर त्याविषयी ... "

पाचव्या पेग ला दोघांनी पुन्हा चिअर्स केलं. थरथरत्या हातांनी ....विनोदने पुन्हा एका दमात ग्लास संपवला आणी तळहाताने ओठ पुसले. कडक स्कॉच जठर जाळत धमन्यांत शिरली...... मेंदूत पसरली. भास. शौर्याचे भ्रम. ....नियतीचे विभ्रम. वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं.

 शिंदे सर बर्फाचे खडे स्कॉच मधे गोल गोल घोळवत होते. विनोदच्या अर्धोन्मलित डोळ्या समोर दिसत होती - वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. स्कॉच चा महाप्रचंड ग्लास. कट्यावर बसावं तसं आपण ग्लासच्या कडेवर बसलोय. बर्फाचे मोठमोठे क्युब दोन्ही हातानी उचलून ग्लासात फेकतोय. त्यामुळे स्कॉच मधे ऊठतायत तरंग - तवंग - वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. विनोद नी बर्फाचे धोंडे जोरजोरात ग्लासात फेकायला आरंभ केला. आरंभ है प्रचंड, बोले मस्तकों के झुंड । आज जंग की घडी की तुम पुकार दो ॥ धाडड बर्फाचा मोठाला धोंडा नियतीच्या डोक्यात आदळला. आयला .....तिनं तर आधीच त्या वर्तुळात फेर धरला होता. बर्फाच्या खड्याबरोबर नियतीपण ग्लासात वितळून गेली. तिनं विनोदची साथ सोडली.... तशी नियतीन विनोदाची साथ कधीच सोडून दिली होती ....वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं.


विनोदला गरगरू लागलं. तो उभा राहिला. पाय लटपटत होते. म्हणाला - " मी निघतो सर "

विनोदची पाउलं जिन्याच्या दिशेने पडली. विनोदची धडपडती पावल जिन्यावर वाजत होती. डोक्यात घण वाजत होते. दारूच्या नशेत मुंबईच्या काँटॅक्ट बद्दल बोलण्याची घोडचूक घडली होती. त्याच्या पावलांचा आवाज बंद होइस्तवर शिंदे ग्लासातले खडे घोळवत होते. आवाज बंद झाला. विनोद घराबाहेर पडलाय याची खात्री झाली.

विनोद बाहेर पडत असताना .. नियतीचे मुके डोळे .. त्याकडे हताश विषण्ण पणे......  आणि  साहजिक त्वेषाने बघत होते .. पण त्या डोळ्यात द्वेशापेक्षा करुणाच जास्त दिसली मला ... 


शिंदेनी मोबाईल उचलला. एक नंबर डायल केला. पहिल्याच रिंग ला तिकडच्या व्यक्तीने तो उचलला. - " पोती पोचली ? .... अच्छा, अच्छा. जपून ठेव. फार तर १० दिवस माल पोलिसांपासून लपवून ..... अच्छा, अच्छा. त्यानंतर त्याचा वापर. ..." शिंदेनी प्रसन्न चित्ताने हसत मोबाइल बंद केला. "सोन्या जेवण लाव" शिंदेनी हुकूम सोडला.

*********************************************************************************

दिल्ली - सेंट्रल कमांड ऑफिस 

रामशरण पांड्या साहेबाचे बूट चकाचक पॉलिश करत होता. काटेकोर व्यवस्थितपणाच दुसरं नाव म्हणजे मेजर शीलवर्धन कांबळे . पस्तीस वर्षाचा हा तरणाबांड ऑफिसर. अविवाहित. कारण त्याच पहिलं लग्न झालं होतं घड्याळाशी. दुसरं हातातल्या टॅबलेट पीसी शी. आणी तिसरं लग्न सतत जवळ असणार्‍या एस एल आर कॅमेर्‍याशी. चौथ्या बायकोला द्यायला त्यापाशी वेळ शिल्लक न्हवता.

अव्यवस्थितपणा खपवून घेतला जात नाही हे रामशरणला पक्कं ठावूक होतं.
सकाळी बरोब्बर ६ वाजून तीस मिनिटानी मेजर शिलवर्धन च्या टॅबलेट पीसी चा मॉर्नींग अलार्म भूणभुणत असे. पण त्याआधी एक सेकंद शिलवर्धनचे डोळे उघडलेले असत. तंतोतंत ६:३५ ला रामशरण बेड टी आणून देई. सकाळच्या सहा वाजून पंच्चावन्न मिनिटांनी; मेजर साहेब ब्रेकफास्टच्या टेबलावर हजर असत. तीन उकडलेली अंडी, कडक भाजलेले चार ब्रेड टोस्ट आणी १ मोठा मग भरून स्ट्राँग काळी कॉफी. गेली ३ वर्षे न्याहारीत किंवा वेळेत फरक पडलेला रामशरणने पाहिला न्हवता.

पाच मिनिटाच्या आत ब्रेड आणी अंडी संपलेली असत. त्यापुढचा मोजून अर्धा तास शीलवर्धनची बोटे टॅबलेट पीसी वर फिरत. विविध देशांच्या अनेक वर्तमानपत्रांच्या ई - पेपरचे झपाट्याने वाचन चालू असताना मे़जर ब्लॅक कॉफीचे घुटके घेत राहतो. त्यावेळी आवाज झालेला त्याला खपत नाही हे माहिती असल्याने रामशरण तो अर्धा तास बागेतल्या झाडाना पाणी घाली. साडे सात वाजता टॅबलेट पीसी पुन्हा भुणभुणायचा - त्यावेळी चकाचक पॉलिश केलेले बूट तयार ठेवणे हे रामशरण पांड्याच्या अंगळवणी पडले होते.

मेजर शीलवर्धन बूट चढवून खाड खाड पावले टाकत ऑफिसकडे चालू लागला. चालताना पहिल्यांदा टाच मग चवडा. बरोबर २३५० पावले चालून ; नेहमीप्रमाणे १२ मिनिटात तो ऑफिसला पोचला आणी सकाळी आठ वा़जण्याआधी काही मिनिटे त्याने कामाला सुरुवात केली. बरोबर एक वाजता तो खुर्चीवरून उठला. लंच साठी घरी जायला निघाला. ह्या प्रवासाला मात्र त्याला कधी २० मिनिटे लागत तर कधी एक तास.

वाटेतल्या झाडांचे, फुलांचे, कीटकांचे, दगडधोंड्यांचे फोटो काढत - काढत शीलवर्धन घरी जाई. वर्षानुवर्षे तोच रस्ता, तीच झाडं, तसलेच पक्षी. पण प्रत्येक फोटो मात्र निराळा. कधी छायाप्रकाशाचा खेळ तर कधी ऑब्सर्व्हर्ची जागा बदलेली. कधी ऋतु बदलेला. एकाच दगडाचे किती वेगवेगळे फोटो निघू शकतात हे पहायच असेल तर मेजरसाहेबांच्या घरच्या भिंती पहा ! एकच वस्तू वेगवेगळ्या द्रुष्टीकोनातून पहाणे हा शीलवर्धन चा छंद होता; आणी एकच घटना वेगवेगळ्या अंगाने समजून घेणे हा व्यवसाय ! ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी. अ‍ॅनालिसिस डिपार्टमेंट. इंटलिजन्स ब्यूरो.इंडियन आर्मी . 

हे सगळे फ़ोटो त्याने घरातल्या भीतिंवर फ्रेम करून लावले होते. रामशरण पांड्या ला सक्त ओर्डर होत्या सगळ्या फ़ोटो फ्रेम चकचकीत कायम ठेवणाच्या . त्या सगळ्या फ़ोटो फ्रेम पांड्या रोज साफ ठेवतो .  त्यातल्या एका फोटोचा अर्थ मात्र त्या भय्याला कळत नाही. शिलवर्धन  च्या वडिलांनी दिलेला तो आंबेडकरांचा  फोटो असतो. 

अ‍ॅनालिटिक बुद्धीमत्ता आणी सम्यक निरिक्षणक्षमता या त्याच्या गुणांमुळेच डायरे़क्टर श्रीवास्तवांनी त्याला आय बी त डेप्यूट केला होता. त्याआधी इंडो तिबेटियन रायफल फोर्स मधील त्याच्या कामाबद्दल त्याला, अतिविशिष्ट सेवा पदकानेही गौरवण्यात आले होते.

तो दिसायला काळासावळा, अंग़काठीने किरकोळ तर होताच. पण सैनिकी पेशात आवश्यक अशी .दमबाजी  किंवा      नेमबाजीही त्याला फारशी येत नसे. इंडो तिबेटियन रायफल फोर्स मधे त्याचं काम होतं पकडलेल्या दहशतवाद्याकडून माहिती वदवून घेणे. पण त्यान कधी कुणाला साधी कानफडित सुद्धा मारली नव्हती. दहशतवाद्याच्या मनसिकतेचा व्यवस्थित अभ्यास करून तो त्याला असे काही प्रश्न विचारी, की खच्चीकरण झालेला कैदी धडा - धडा बोलू लागे. मेजर शिलावर्धन कांबळे हा मानसशास्त्राचा अभ्यासक होता .

आज वाटेत एकही फोटो न काढता तो घरी पोचला. डोक्यात विचारांची चक्र फिरत होती. कारण  आजच त्याच्या हातात ट्रान्सफर लेटर पडलं होतं

ड्यु टी पोस्ट : बेळगाव
मराठा लाइट इंन्फेंट्री.

श्रीवास्तव साहेबांनी आपली बदली का केली असावी ? तीही बेळगावला ?

शिलावर्धन च्या हातातला टेब्लेट पीसी खणाणला - श्रीवास्तव साहेबाचा प्रयवेट आयडीवर मेल होता -  

Dear Shilvardhan ,

No more Questions . Two extremist organisations growing in Behelgum.   Report @ Maratha Lite infantry HQ. As False ID .  High command  don't  want communal politics till next election.   Interference , Trojan anything. Stop the nonsense .  Turn around time - 60 days . PDN.

**********************************************************************************************************

त्याच वेळी बेळगावच्या अल निरमा मशिदीत चांद्या पासून बांद्या पर्यंत आणि भटकळ पासून आशमगडपर्यंतचे मौलवी दाखल झाले होते . अहले हदीस  आणि जमाते इस्लामी मधल्या कड्व्यांचि बैठक बसलि होती . आवाज घुमला - नारा ए तकदीर - आलाहु अकबर ...

(क्रमश : )

पुढचा भाग लवकरच येत आहे …. 

५ टिप्पण्या:

  1. डॉक्टर साहेब, बरेच दिवस झाले तुमच्या ब्लॉगच्या अपडेट येत होत्या पण तुम्ही कादंबरी लिहित आहात आणि ती देखील क्रमशः प्रसिद्ध करत आहात म्हणून वाचत नव्हतो. कारण एक भाग वाचला कि दुसरा भाग वाचायला मिळण्यात जो खंड पडतो त्यामुळे वाचनाची लिंक तर तुटतेच पण सोबत कथेतील प्रसंग, पात्रे अशा खंडित वाचनाने मनावर हवा तसा परिणाम करत नाहीत. आज सलग तिन्ही भाग वाचून काढले. कथानक उत्तम. प्रसंगांचे चित्रण देखील सरस आहे. त्याशिवाय घटना एका वेगाने घडत असून त्यांचा वेग कुठेही मंदावत नाही हे विशेष !

    प्रत्युत्तर द्याहटवा
  2. मस्त जातेय... पण कशाला क्रमशः प्रसिध्द करताय ब्लॉगवर?एकदमच करा- हार्ड कॉपी किंवा इबुक म्हणून... असं मला वाटतं अर्थात्.
    पण दौडत जातेय कथा.

    प्रत्युत्तर द्याहटवा

या गॅझेटमध्ये एक त्रुटी होती.

सर्व लेख विषयानुसार

या गॅझेटमध्ये एक त्रुटी होती.
या गॅझेटमध्ये एक त्रुटी होती.

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

संदेश *