१९ जुलै, २०१६

विज्ञान विरुद्ध छद्म विज्ञान : Causation Vs Correlation

विज्ञान विरुद्ध छद्म विज्ञान :
छद्म म्हणजे खोटारडे . विज्ञान आहे असे सोंग आणते पण खरे पाहता जी एक अंधश्रद्धा असते त्याला छद्म विज्ञान म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिकेतील बहुसंख्य लोकांचा एलियन वर विश्वास आहे . अनेकांची श्रद्धा देखील आहे . परग्रहावरील जीव उडत्या तबकड्यातुन पृथिवीवर येतात असे त्यांना मनापासून पटले आहे. ते सर्व खोटे बोलतात काय ?.... नाही .

ललित साहित्य सिनेमे याचा मानवी मनावर परिणाम होत असतोच. त्याला काही विचित्र अनुभवाची जोड देऊन आपण आपली मते बनवतो. विज्ञानात ज्याप्रमाणे तर्क असतात त्याप्रमाणे तर्क छद्म विज्ञानात असतात . श्रद्धेत असतात आणि अंध श्रद्धेत सुद्धा तर्क असतातच . तर्क करण्याची पद्धत मात्र चुकलेली असते.
अमेरिकेत उडत्या तबकड्या दिसण्याचा एक काळ होता. १९८० सालच्या दहशकात अमेरिकेत एलियन येण्याचे प्रमाण वाढले होते. अनेक वर्तमानपत्रातून त्यावर लेख येत . उडत्या तबकड्यांचे फोटोही छापून येत. एलियन पाहिल्याचे दावे करणारे महापुरुष भाषणे करत . पुस्तके लिहीत पैसेही कमावत . त्यातले काही लोक्स लबाड धरले तरी सगळेच खोटारडे होते असे म्हणता येणार नाही. एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घावी लागेल , ती म्हणजे १९८० च्या दशकात एलियन ने गर्दी केली पुढे गायब झाले ! हे एलियन मुख्यतः अमेरिकेत येत .. इतर देशाचा व्हिजा त्यांकडे नसावा अथवा एलियन लोकांना अमेरिकन बर्गर आवडत असावेत ! कारण इतर देशात उडत्या तबकड्या अभावानेच दिसल्या !

१९८० च्या दशकात अमेरिकन संरक्षण संस्था - पेन्टयागोंन - एका नवीन प्रकारच्या विमानावर गुप्तपणे काम करत होती - स्टेल्थ विमान . हे विमान लांबून उडत्या तबकडी सारखे दिसते . हा कार्यक्रम पूर्ण झाला . विमाने लष्करात दाखल झाली . आणि एलियन नि अमेरिकेतून गाशा गुंडाळला ! त्यानंतर एकही उडत्या तबकडीच्या नोंद नाही ! ( संबंधित बातमी Click Here )

इथे अमेरिकन लोकांनी केलेला तर्क बरोबर आहे . एखादी विचित्र उडती वस्तू आकाशात दिसली की तिचा संबंध परग्रहावरील प्राण्यांशी लावणे यात तर्क आहेच ! तर्क करण्याची पद्धत चुकलेली आहे .
----------------------------------
Causation Vs Correlation : 

कार्यकारण भाव विरुद्ध सहसंबंध
----------------------------------

इथे कार्य कारण भाव आणि सहसंबंध यातील फरक समजावून घ्यावा लागेल. दोन घटना एका मागोमाग एक घडल्या की मानवी मन त्यात संबंध जोडते. मांजर आडवी गेल्यावर अपशकुन होतो हा असाच जोडलेला संबंध आहे . दिवसभरात काही बर्या वाईट घटना घडतातच . त्यातील वाईट घटना सकाळच्या रस्ता क्रॉस करणाऱ्या मांजरावर टाकता येतातच ! यात तर्क आहेच पण अमेरिकन एलियन प्रमाणेच तर्क करण्याची पद्धत चुकली आहे . चांगली तारीख , मुहूर्त , लकी कलर , लकी डे या सर्वात सहसंबंध (correlation) असते पण त्यामागे (causation) कार्य कारण भाव नसतो.

कार्य कारण भाव म्हणजे काय ?

अपशकुन नेमका मांजरा मुळेच झाला हे सिद्ध करावे लागते. त्यासाठीचे एक साधन गणित आणि संख्याशास्त्र आहे . शंभर मांजरे शंभर माणसापुढून गेली , शंभर माणसापुढून डुकरे , शंभरा पुढून गायी गेल्या ... कोणाचा दिवस कसा गेला ? किती वाईट घटना घडल्या ? किती चांगल्या घटना घडल्या ?
त्या सर्वांची निरीक्षणे घेतली पाहिजेत .
त्यातून मग मांजराचे अपशकुनी असणे किंवा नसणे सिद्ध होते . व्यक्तिगत अनुभवा वरून तर्क करणे चूक आहे . त्यासाठी गणिती किंवा सांख्यिकी पाद्धत वापरली पाहिजे .
अजून एक पद्धत म्हणजे एखाद्या सिस्टीम मध्ये मुद्दाम मांजर सोडायची किंवा काढून घ्यायची ! म्हणजे रोज सकाळी उठल्यावर मांजर आडवी गेलीच पाहिजे याची व्यवस्था करायची - मग पाहायचे ! काय घडते दिवसभरात ? किंवा ज्या दिवशी काही वाईट घडणार आहे याची खात्री आहे - त्यादिवशी सोसायटीतल्या सर्व मांजरी जेल मध्ये टाकायच्या ! नेमके ठरवले पाहिजे अपशकुन नेमका मांजरा मुळे की अजून कशामुळे ?
अशाप्रकारे वेगवेगळ्या वैज्ञानिक पद्धती वापरून कार्य कारण भाव सिद्ध करावा लागतो .

--------------------------

श्रद्दा , अंधश्रद्धा , वेदातली विमाने आणि डाव्या लोकांच्या सोशल थेअर्या - या सार्या सहसंबंध - (correlation) वर आधारालेल्या आहेत . त्यामुळे ते छद्म विज्ञान आहे. विज्ञान नाही . कारण त्यात कार्य कारण भाव नाही .
विज्ञान ही विचार करायची पद्धती आहे . त्यातला प्रमुख भाग म्हणजे कार्य कारण भाव शोधणे आणि सतत तपासत राहणे.

२ टिप्पण्या:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *