१६ एप्रि, २०१६

असत्य ? अज्ञान ? कि विद्वेष ?

परिवर्तनाचे आंबेडकरी पर्व: हिंदुत्व विचारधारेचे विधायक टीकाकार असा एक लेख श्री राज कुलकर्णी यांनी दहा एप्रिल च्या दिव्य मराठीत लिहिला आहे. विधायक टिका म्हणजे भले करण्यासाठी केलेली टिका. तशीच विधायक टिका राज यांच्या लेखनावर करण्यासाठी प्रस्तुत लेखन प्रपंच .

राज कुलकर्णी यांचा मुद्दा अंशत:मला मान्य आहे. डॉ आंबेडकर हे हिंदुत्व वादी नव्हते. त्यांना तसे प्रोजेक्ट केले जात आहे . सावरकरांनी बाबासाहेबांच्या धर्मांतरावर केलेली टिका अयोग्य , अस्थानी आणि अनावश्यक होती . राजचे हे दोन मुद्दे मान्य करून आपण पुढे जाऊ. 

लेखाच्या उर्वरित भागात असत्य प्रतिपादने , खोटे आरोप आणि गंभिर तार्किक चुका केल्या आहेत.
 राज यांनी सावरकर आंबेडकर यांचे संबंध सांगण्यासाठी चवदार तळे ते नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह हा काळ निवडला आहे . मुळ लेखात यावेळी सावरकर काय करत होते असा प्रश्न आहे . पुढिल चर्चेत सावरकरांनी फक्त लेखी पाठिंबा दिला प्रत्यक्षात काय केले ? असा रोकडा सवाल राज करतात.सावरकर बंधु : विनायकराव आणि डॉ  नारायण चवदार तळ्याची कोर्ट केस 

याबाबत खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्रात बरीच माहिती आहे . यातील तिसर्या खंडात पृष्ठ २५१ पासून महाडच्या चवदार तळ्याच्या केस मधील साक्षि आहेत . हा कोर्ट  केस चा भाग असल्याने . सरकारदरबारी अंकित झालेला महत्वाचा भाग आहे. हा खटला अनेक वर्षे चालला या केस मध्ये (पूर्व ) अस्पृश्यांच्या बाजूने साक्षि देणार्यांची नावे आहेत. त्यातले दुसरे नाव डॉ ना दा सावरकर असे आहे. सावरकरांचा लहान भाऊ नारायण (पूर्व ) अस्पृश्यांच्या बाजूने साक्षिदार होता असे खैरमोडे यांनी नमूद केले आहे. चांगदेव खैरमोडे हे बाबासाहेबांचे सहकारी आणि विश्वसनीय चरित्रलेखक  म्हणून मान्यता प्राप्त आहेत . (खैरमोडे खंड ३ पृष्ठ २५७).  सावरकर स्वत: ब्रिटिशांच्या स्थानबद्ध्तेत होते म्हणून स्वत:च्या लहान भावास या उलाढालीत  पाठवले होते. याच केस मध्ये डॉ आंबेडकर यांची साक्ष झालेली आहे .

कोर्टा पुढिल साक्षित बाबासाहेब म्हणतात
"आपल्यामध्ये हिंदु समाजाचे संघटन व ऐक्य व्हावे आणि परधर्मियांचे हल्ले हिंदु धर्मियांवर होऊ नयेत , ह्या बाबतीत डॉ सावरकर यांचे ह्यांचे जे प्रयत्न चालू आहेत. त्या बाबतीत डॉ सावरकर यांचे व माझे एकमत असून सहकार्य हि आहे. "   (खैरमोडे खंड ३ पृष्ठ २५५)   


हि डॉ आंबेड्करांनि कोर्टासमोर दिलेली साक्ष आहे. त्यात सावरकरांच्या भावाशी असलेल्या सहकार्याचा व कोणत्या मुद्द्यावर हे सहकार्य आहे त्याचा अतिशय  स्पष्ट उल्लेख येतो. हिंदुचे हित करण्यास जातिभेद मोडण्यासाठी सहकार्य आणि इतरत्र  नाही  (ब्रिटिश सरकारविरोधी क्रांतिकार्य -वगैरे गोष्टीत). अशी भूमिका बाबासाहेबांनी कोर्टात घेतली आहे. बाबासाहेब  निष्णात वकील होते . राजसाहेब सुद्धा शिक्षित वकील आहेत . कोर्टातली साक्ष हा किती महत्वाचा ऐतिहासिक पुरावा आहे याचे ज्ञान त्याना असणार आहे.

चवदार तळ्याप्रमाणेच नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहा वेळेला डॉ नारायणराव सावरकर यांना वि दा सावरकरांनी स्प्रुश्यांना  समज देण्यासाठी धाडले होते. एकटे नारायणच नव्हे तर रत्नागिरी हिंदु सभेचे अनेक कार्यकर्ते नाशिकात दाखल झाले होते. सावरकर , उदगावकर व धडफ़ळे    यांनी मंदिरात जिथपर्यंत स्प्रुश्यांना प्रवेश आहे तिथपर्यंत अस्प्रुश्यांनाहि प्रवेश दिला पाहिजे अशी भूमिका मांडली. सनातन्यांनि सावरकरांची मागणी धुडकावुन लावली. (पृष्ठ १३, आंबेडकरी चळवळ , य दि फडके)

नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाला पाठिंबा देणारे व नाशिककर हिंदुबंधूंना विनंती करणारे वि दा सावरकरांनी लिहिलेले पत्र बोलके आहे. सावरकरांनी सवर्णाना माफी मागायचा सल्ला दिला आहे . सावरकर लिहितात :
"यास्तव पूर्वास्पृश्य हिंदुबंधू मंदिरापाशी येताच तुम्ही त्यांचे उत्कट प्रेमाने स्वागत करा.आणि..दोन्ही कर जोडून झाल्या गेल्याची क्षमा याचना करा." - सावरकरांचे पत्र 
१९३१ला ’मुंबई इलाखा अस्पृश्यता परिषदे’च्या अध्यक्षपदावरून रत्नागिरी येथे भाषण करताना काळाराम मंदिर सत्याग्रहाचा उल्लेख करून सावरकर म्हणाले:
"मी मोकळा असतो तर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात स्वत: झुंजलो असतो."  
सावरकरांनी अजून काय करायला हवे होते ? सावरकरांनी काहीच केले नाही हे  राज कुलकर्णी कशाच्या आधारावर लिहितात हे कळायला मार्ग नाहि. हे जर अज्ञान म्हणून सोडुन दिले तरी विसंगति, तर्कदोष आणि शब्दच्छल याचे स्पष्टीकरण कसे देणार ?

कुलकर्णी जा काळाची चर्चा करत आहेत, त्या काळात सावरकर रत्नागिरीत स्थानबद्धतेत होते त्याना राजकारणात प्रवेश घ्यायला बंदि होती. त्यांनी हिंदुसभा नावाचे समाज सुधारणा मंडळ काढले होते. या रत्नागिरी हिंदुसभेचा आणि हिंदुमहासभा या राजकीय पक्षाचा काहीही संबंध नाही . हे नामसाधर्म्य अयोग्य रीतीने वापरत कुलकर्णी यांनी बाबासाहेबांनी तत्कालीन हिंदुमहासभा या राजकीय पक्षावर केलेली टिका सावरकरांशि  जोडलि  आहे. हा शब्द्च्छ्ल नावाचा तर्कदोष होय.

रत्नागिरीतून मुक्त झाल्यावर सावर स्वतंत्र भारत प्रजासमाजवादी नामक पक्षात गेले . पुढे फार नंतर हिंदुमहासभेत गेले. तो काळ फार पुढचा आहे - कुलकर्णी काळाची गल्लत आणि नावाची गफलत करतात.    


या सर्व घटना क्रमाबद्दल राज कुलकर्णी याना अज्ञान आहे कि ते दडपून खोटे लिहित आहेत हे कळावयास मार्ग नाही . चवदार तळ्याच्या शुद्धी चा  उलेख कुलकर्णी विचित्र पद्धतीने करतात आणि त्याचा संबंध सावरकरांशि जोडल्यासारखे सूचित होते .   बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या आंदोलना नंतर तळे बाटले असा ओरडा मूर्ख सनातन्यांनि सुरु केला - त्याला सावरकर पक्षाचे तरूण विरोध करू लागले - सनातन्यांचि टिंगल करू लागले हा इतिहास आहे.  
या संदर्भात बाबासाहेबांच्या जनता पत्रातील समकालीन लिखाण महत्वाचे आहे . सावरकर पक्षाचे तरुण हा उल्लेख बाबासाहेबांच्या जनता पत्रातील आहे. (जनता पत्र १ मार्च १९३१ )  त्यात  पुढे असेही लिहिलेले आहे कि , 

 " चवदार तळे बाटले म्हणुन काही सनातनी ते तळे शुद्ध करून घेत होते त्याला सावरकर पक्षाच्या तरुणांनी हरकत घेतली आणि शुद्ध कराल तर आमच्या घरातील अशुद्ध पाणि आणुन तळ्यात पुन्हा टाकू … पुन्हा शुद्धी केली तर पुन्हा टाकू - तुम्हाला सतावून सोडू  ! असे सनातन्यांना बजावले.  (डॉ  आंबेडकरां चे जनता पत्र १ मार्च १९३१ )

जनता पत्र पुढे म्हणते : -

 सावरकर पक्षाचा याहिपेक्षा मोठा विजय विश्वेश्वराच्या सार्वजनिक भोजनात झाला , (तेथे जातीनुसार वेगळ्या पंगती बसत असत. ) - सावरकर पक्षिय तरुणांना आमंत्रण नव्हते , तरी देवीच्या प्रसादासाठी त्या घरातील सावरकरपक्षिय तरुण तेथे उपस्थित होऊन प्रत्येक रांगेत एक एक घुसला ,  म्हातार्या कोतार्यांचि धांदल उडाली ! धर्म बुडाला ! देव भ्रष्ट झाला असा आक्रोश सुरु झाला . शेवटी एकच पंगत बसली " (डॉ  आंबेडकरां चे जनता पत्र १ मार्च १९३१ )

सावारकरांनी अनेक जुनी मंदिरे दलितांना उघडी करून दिली होती , काही आंतरजातीय विवाह लावून दिले होते हे पतित पावन मंदिरापेक्षा अधिक महत्वाचे आहे. डॉ आंबेडकरांच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला आणि चवदार तळे आंदोलनाला सावरकरांनि अतिशय सक्रिय  पाठिंबा दिला होता.

डॉ आंबेडकरांनी या कामाबद्दल सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते. आंबेडकर लिहितात -
" नुसति अस्प्रुश्यता जाउन भागणार नाही . चातुर्वण्याचे उच्चाटन झाले पाहिजे . ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटलि आहे , त्यापैकी आपण एक आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो " . डॉ आंबेडकर  (कीर लिखित आंबेडकर चरित्र पृष्ठ २३९, सहावी आवृत्ती ) 

बाबासाहेब केवळ एवढ्यावर थांबलेले नाहित. बाबासाहेब मुंबईच्या प्रांतिक विधिमंडळात नियुक्त आमदार होते . २७ सप्टेंबर १९२७ रोजी त्यांनी सभापतिंकडे ठराव पाठवला कि सावरकरांची रत्नागिरी स्थानबद्धतेतून मुक्तता करण्यात  यावी जेणेकरुन त्यांचे कार्य देशभर चालावे.   ( पृ. ७३ शोध सावरकरांचा- य दि )

सुधारक सावरकरांना बाबासाहेंबांचा पाठिंबा होता. त्यात काही कुरबुरी., नंतर स्पष्टीकरणे आहेत पण मुख्यत: या काळात त्यात  फारसा संघर्ष दिसत नाही . असेलच तर ऐक्य आणि मनोमिलन दिसते. मनुस्मृती जाळल्या नंतर सुद्धा हे सहकार्य टिकून आहे .   आता हिंदुत्वा बद्दल बोलू .


 हिंदुत्व म्हणजे काय ?


हिंदुत्व हा शब्द अनेक अर्थाने वापरला गेला आहे. बाबासाहेबांनी हिंदुधर्म सोडला बुद्ध स्वीकारला त्याअर्थी त्याना हा धर्म मान्य नव्हता हे उघड आहे. पण हिंदु समाजाचे हित त्याना मान्य होते . बाबा साहेबांच्या फ़ाळणिविशयक पुस्तकातला संदर्भहीन उतारा राज कुलकर्णी यांनी दिलेला आहे . बाबासाहेबांचे हे पुस्तक वकिली बाण्याने लिहिलेले आहे . त्यातील पूर्व पक्ष  हे लेखकाचे मत नसते. 
फाळणी मुळे हिंदुचा राजकीय विजय झाला आणि हजार वर्षाच्या धार्मिक भांडणातुन हिंदुंचि मुक्ता झाली . या विषयावर बाबासाहेब आंबेडकरांचि मते अतिशय अभ्यासपुर्ण आहेत. फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - 

" जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक ,  ,  परिणामशुन्य राज्य बनेल । जणु जिवंत प्रेत    , न पुरलेला मृतदेह " -  डॉ आंबेडकर 
(पाकिस्तान ३ ४ ०.  Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page ३ ४ ० ) 

फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५  साली   बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. --  

" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " -  डॉ आंबेडकर

(Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page 146 ) 

समता आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला होता . त्यांनी सनातनी वृत्तीचा आयुष्यभर धिक्कार केला . मनुस्मृतीला काडी  लावली . हिंदुच्या सनातन वैदिक धर्माचा त्याग केला . पण  राजकीय दृष्ट्या त्यांना देशहिताची आणि हिंदुच्या राजकीय सामाजिक प्रगतीची चाड होती . धम्म स्वीकारापुर्वी एक वर्ष - बाबासाहेबांनी फ़ाळणिबद्दल देवाचे आभार मानले आहेत. परमेश्वर न मानणार्या बाबासाहेबांनी हलक्याश्या विनोदात लिहिलेले वाक्य अतिशय बोलके आहे .  १९५५ सालीच  बाबासाहेब आंबेडकर लिहितात कि - 

" जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे "  -  डॉ आंबेडकर 

(Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page 146 ) 

इथे बाबासाहेब शाप कशाला म्हणत आहेत ? आणि देश व हिंदुबद्दल त्यांची मते १९५५ सालीही काय आहेत ? ते उघड आहे .असत्य ? अज्ञान ? कि विद्वेष ?  


श्री  राज कुलकर्णी हे माझे चांगले मित्र आहेत. पंडित नेहरुंचे उत्तम अभ्यासक आहेत. हे सारे तथ्य त्याना माहित नसेल तर नव्या माहितीचा स्वीकार करावा आणि आपली जुनी मते बदलावि. तसे करायचे नसल्यास अज्ञान पांघरुन असत्य बोलत रहावे . जर काही विशिष्ट द्वेषामुळे ते असे करत असतील तर ---
द्वेष पेरला तर द्वेषच उगवतो -  इतके नम्रपणे सुचवू इच्छितो . 

डॉ  अभिराम दिक्षित 

१० टिप्पण्या:

 1. सत्य सांगणे म्हणजे मोठे करण्याचा प्रयत्न नव्हे

  उत्तर द्याहटवा
 2. लेख साधार व स्पष्ट,अभिराम यांना दिलखुलास दाद देतो!

  उत्तर द्याहटवा
 3. खोटारड्या हलकट आणि निच जातिवादी फुर्रोगाम्यांना सडेतोड उत्तर !!!!

  उत्तर द्याहटवा
 4. राज कुलकर्णी यांना अभ्यासक म्हणणे हे अभ्यासक या शब्दाची कुचेष्टा करण्यासारखे आहे.
  मध्यंतरी नेहरूंनी ब्रिटनचे पंतप्रधान अॅटली यांना नेताजींचा ठावठिकाणा सांगणारे पत्र पाठवताना त्यात नेतांजींचा 'Your war criminal' असा उल्लेख केल्याचे प्रसिद्ध झाले होते. नेहरूंच्या स्टेनोने त्या पत्राच्या सत्यतेची साक्ष नेताजींच्या विमानअपघाताची चौकशी करणार्‍या समितीसमोर दिलेली आहे. या अपघाताची चौकशी करणार्‍या शाहनवाझ यांना नेहरूंनी अपघातस्थळीच जाऊ दिले नाही. नंतर इंदिरा गांधी यांनी नेमलेल्या समितीने तेथे जाऊ दिले मात्र तेथे जाऊनही बर्‍याच तपशिलांमध्ये जाण्यापासून समितीच्या इतर सदस्यांना रोखले. सत्य असे दडपण्याचे बक्षिस नंतर नेहरूंनी शाहनवाझ यांना मंत्री करून दिले. अपघाताबद्दलची इतकी उघडउघड झालेली बनवाबनवी स्पष्ट असूनही राज कुलकर्णी मात्र सगळी लाजलज्जा गुंडाळून नेताजी त्या अपघातात मरण पावले असा निष्कर्ष काढून मोकळे होतात. याचे कारण एकच की नेताजी तेव्हाच गेले म्हणजे त्य‍ांचा ठावठिकाणा कळवणारे पत्र पाठवण्याचे नेहरूंवरचे किटाळ आपोआपच दूर होईल. त्यामुळेच नेहरूंना नेताजींबद्दल किती आत्मियता होती हे दाखवण्यासाठी विमानअपघातानंतर किती तरी वर्षे नेहरू नेताजींच्या कुटुंबियांच्या घरी पैसे पाठवत असा उल्लेख कुलकर्णी करतात. मात्र हेच महाशय याच नेहरूंनी नेताजींच्या कुटुंबियांवर पहारा ठेवून होते हे दडपतात.
  अभ्यासकाला अशी दडपादडपी करून चालत नाही.
  पुढेमागे राजकारणात येण्याची त्यांची इच्छा आहे असे दिसते. त्याची पूर्वतयारी म्हणून हा 'अभ्यास' (खरे तर एकांगी व पूर्वग्रदूषित अभ्यास) दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.
  मागे शिवस्मारकाच्या उद्घाटनाला मोदी येणार होते तेव्हा तर या महाशयांनी आपल्या पूर्वग्रहदूषितपणाचीबहद्दच केली होती. सुरत स्वारीच्यावेळी काही गुजराती व्यापार्‍यांनी शिवाजीला विरोध केला होता. मोदी शिवस्मारकाच्या उद्घाटनासाठी येणार म्हटल्यावर या कुलकर्णीमहाशयांना शिवाजीचे स्वागत करणारी इतर गुजराती जनता आठवली नाही परंतु मोदींच्या स्वरूपात हे व्यापारी आठवले.
  अशा पूर्वग्रहदूषित व्यक्तीकडून तुम्ही आंबेडकर-सावरकर वादामध्ये समतोल भूमिका घेण्याची अपेक्षा ठेवणे हेच मुळात कितपत योग्य आहे हे लक्षात यावे.
  संशोधक किंवा अभ्यासक हे कुलकर्णी महाशय जे नाहीत ते शब्द आहेत. ते निव्वळ एक काँग्रेसी आहेत व त्यासाठी सोयीस्कर अशी भूमिका ते घेत असतात.

  - राजेश कुलकर्णी

  उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *