१० मार्च, २०१४

कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख )


कारट्या ची शाळा एडमिशन .  (ललित लेख )


आमचे चिरंजीव श्री राजवीर दिक्षित नुकतेच तीन वर्षाचे होतील. तवा साहेबांच्या शाळा प्रवेशासाठी गेला आठवडाभर मिशन हाती घेतले होते.  आमचे शिक्षण सरकारी शाळेत झालेले - पाच रुपये फी वाल्या . पण पोराला इंटरनेशनल अभ्यासक्रमाच्या शाळेत टाकायचं असा निश्चय केला . बांद्रे सांताक्रूझ च्या शांळाची चौकशी सुरु  केली . फार माहिती नेट  वर नाही . मग सुजाण पालक या नात्याने मी , बायको आणि चिरंजीव असे तिघे शाळा शोधत फिरू लागलो .  शेवटी बर्याच चौकशी अंती सान्ताक्रुझ  पश्चिम येथील  एका प्रथित यश शाळेकडे काल  मोर्चा वळवला .




पूर्ण रस्ता भर आमची पत्नी पढवत होती . हो शाळेत प्रवेशासाठी इंटरव्हू असतो . त्याला तसे म्हणत नाहीत . पण एडमिशन साठी आई बाप पोर या तिघांनी येउन भेटायचे असते आणि शिक्षक मुलाला प्रश्न विचारतात आणि मुख्याध्यापक पालकाना विचारतात  . आमचा कार्टा तसा वाइच बडबड्या आणि चण्ट  आहे . गाणी , कविता सगळ्या तालात म्हणतो . ए टु झेड ,  एक ते दहा सगळे तोंडपाठ आहे . त्यामुळे आमची पत्नी पोराला पढवत नसून दस्तुरखुद्द आम्हालाच पढवत होती . निट  बोल उगीच वाद विवाद नकोत वगैरे . म्हणजे त्या पोराच्या शाळा एडमिशन वेळीही मी काही तात्विक खुसपट काढून शाळा मेनेजमेंट  शी वाद उकरून काढेन … इतका दुर्दम्य विश्वास आमच्याबद्दल तिकडून आहे . असो .


शेवटी एकदाचे त्या  शाळेत पोहोचलो .  तिथे एक रीसेप्शनिस्ट. बयेला विचारल शाळा आतून बघता येईल का ? अतिशय मंद असे प्रोफेशनल मंदस्मित करत तिने नकार दिला . मग विचारल बर फी किती ? (हा मुद्द्याचा प्रश्न ) . यु नीड टु गो थ्रू अवर एडमिशन फोर्म , फोर डीटेल्स . म्हटलं वोक्के . दे बाई तुझा फार्म . यु नीड तू पे एट द काउण्टर एण्ड कलेक्ट युर फोर्म फ्रोम देअर . बर बाई मग तू कशाला बसलीस इथे ? असो तर फोरम ची किंमत रुपये सहा हजार फक्त . च्यामारी आणि नाई पटली शाळा तर ? गेले का फुकट ? मग थोडा तात्विक वाद विवाद करून तिच्याकडून फी विषयी माहिती काढलीच . या विवाद्समयी आमचे कुटुंब आमच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत आहे असा भास झाला .  तर वर्षाची फी रुपये दोन लाख फक्त . हि मेडिकल वा इंजिनिअरइंग  ची फी नाही हो . बालवाडी शाळेची आहे . शेवटी आम्ही तिघेही विजयी मुद्रेने शाळेबाहेर पडलो तेंव्हा दोन लक्ष सहा सहस्त्र होन वाचवल्याचा आनंद आमच्या मुखमंडलांवर झळकत होता .





कालच्या अशा अनुभवांमुळे आज शाळा शोधताना फी हा मुद्दा प्रथम ठेवला आणि त्यातल्या त्यात स्वस्त अशी इण्टर्नेशनल शाळा हुडकून काढली. तरी फी साठ हजार वर्षाला . ठीक आहे म्हटलं होऊ दे खर्च . शिक्षणात तडजोड नको . मग  रविवारच्या भल्या पहाटे नौ वाजता उठून आमची तीक्कल नव्या शाळेचा इण्टरव्ह्यू देण्यासाठी निघाली . वाटेत अर्धांग यावेळी मात्र मुलाची उजळणी करून घेत  होते . ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार म्हणा पाहू असे उच्चारायचा अवकाश . आमचे पिल्लू स अभिनय गाणे सुरु करते आणि दहा पंधरा कविता नाचासकट म्हणून झाल्या कीच थांबते. एक ते दहा म्हण म्हटले कि एक ते वीस म्हणते . ए  2 झेड  तर ऐपाल , बोल , कॅट अशी उदाहरणे देत घडा घडा म्हणते . आमही दोन्हीही सुजाण पालकांनी अभिमानाने या आमच्या छोट्या बुद्धिमान सिंघम कडे प्रेमान पाहिलं .

आणि बाल सिंघम सकट नव्या शाळेत दाखल झालो . प्रशस्त शाळा . सर्व वर्ग एसी . रिसेप्शन सुद्धा एयर कंडीशन . आणि रखवालदार पण इंग्लिश बोलणारा . मग रिसेप्श्निस्ट ने हसून स्वागत केले . चार वर्षापूर्वीच उघडलेली नवी शाळा असल्याने--- गिर्हाइके हवी होती वाटत त्याना . चला कालच्या मानानं आज सुरवात बरी झाली होती . एकदम पॉश आणि भारी होती शाळा .  …. मग त्या सुंदर आणि हसतमुख रिसेप्शनिस्ट न सर्व माहिती सांगितली . प्लीज वेट फोर फ़ाइव्ह मिनिटस असे लाडीकपणे म्हटली  . चला म्हणजे पाच मिनिटातच इण्टर व्ह्यू सुरु होणार होता तर . एव्हढ्यातच-- आईच्या गावात-- आमच्या बाल  सिंगम ची सटकली. तो सोफ्यावर उभा राहिला आणि स्वत:ची चड्डी काढु लागला .


मी भर्रकन त्याची चड्डी पुन्हा वर केली आणि त्याला नजरेने दटावण्याचा व्यर्थ   प्रयत्न करू लागलो .  पण तो कसला ऐकतो ? मला हि चड्डी नको …. लाल वाली पायजेल … म्हणून त्यान भोकाड पसरला . रडण्याचे तार सप्तक सुरु जाहले . प्रत्येक आलाप पहिल्यापेक्षा चढ्या सुरात आणि मोठ्ठ्या आवाजात . परत प्रत्येक आलापाच्या वेळी तो दोन्ही हातांनी स्वत:ची चड्डी खाली ओढू पाहत होता . मी ती वर खेचत होतो . काही मिनिटे आमचे हे चड्डी युद्ध सुरु राहिले . मग त्यांच्या मातोश्रींनी एक धपाटा घातला . सिंघम ला हा अपमान फार जिव्हारी लागला असावा . त्याने रडे बंद केले . आणि स्वारी गाल फुगवून चिडून रुसून बसली .

मग मी बायको आणि रुसलेला बालक  असे तिघे . एका केबिनमध्ये दाखल झालो . स्वारी चिडक्या नजरेने मातोश्रींकडे पहात होती . शेट्टी पिता पुत्र हि शाळा चालवतात .  त्यापैकी हा पुत्र शेट्टी . तो शाळेचा एडमिन हेड म्हणे . त्याने सर्व कागदी सोपस्कार पार पाडले . पॉवर  पोइण्ट प्रेझेन्टेशन मध्ये शाळेची माहिती सांगितली . केंब्रीज युनिव्हर्सिटिचे प्रमाणपत्र दाखवले वगैरे . तर पुढचा मुद्दा असा होता कि मी फी भरणे  वगैरे सोपस्कार पार पाडायचे आणि आईने मुलाला घेऊन जायचे इंटरव्हू साठी . मी चेक बुक काढून सही करू लागलो . आणि सौ ने बाळाला उचलले . सिंघमाची पुन्हा सटकली … आई मारते मी नाई जाणार तिच्याबरोबर … बाबा तू घे … आणि त्याने बाबा बाबा बाबा बाबा चे तारसप्तक सुरु केले . तो बिचारा पुत्र शेट्टी पोराची समजूत काढायला त्याला पेन दाखवू लागला . कार्ट्याने पेन हिसकावले …. पुत्र शेट्टी च्या तोंडावर फेकून मारले …… आणि तार सप्तक खर्ज्यात नेत तो हट्टाने जमिनीवर झोपला . आता अजून तमाशा नको म्हणून मी त्याला उचलले …. आणि इंटरव्हू साठी नेले . कागदी सोपस्कार महिला दिनानिमित्त पत्नीला करावे लागले .


मी इंटरव्हू साठी सिंगम सकट एका सुस्वभावी शिक्षिकेसमोर उभा होतो . ती चाईल्ड साकोलोजी वगैरे शिकली होती म्हणे . अगदी गोड हसून ती सिंगम कडे पाहिले . त्याचा राग बराचसा निवळला असावा . रडला नाही अजिबात . मग तिने त्याला त्याच्या कलाने प्रश्न विचारायला सुरवात केली. व्होट इस युवर नेम ? स्वारी मक्ख ! आपण मुकबधीर असल्याप्रमाणे राजेंनी शून्यात नजर लावली . आणि ती बाई जणू पारदर्शक आहे असे समजून तिच्याकडे शून्यात पाहू लागला . मग तिने काय काय विचारले , प्राणि सांग , पक्षि सांग , बाबाच नाव सांग , इंग्लिश,  हिंदी,  मराठी अशा सर्व भाषेत विचारले . आमचे राजपुत्र ढिम्म बसलेले . चेहर्यावरची माशी हलत नव्हती . मग म्हणाली कविता म्हण , ट्विंकल ट्विंकल म्हण …. सिंघम ढिम्म ! एक शब्द बोलायला तय्यार नाही पट्ठ्या .


शेवटी कंटाळून ती निघून गेली . शाळा प्रवेश हुकलाच होता . पोराने साठ  हजारही वाचवले होते बहुतेक !. मी प्रेमाने आमच्या सुपुत्राकडे पाहिले . जशी ती बाहेर गेली तसा कार्टा बोलला मला गाणी म्हणायचीत . त्याला बकोट  धरून उचलला आणि टिचर्स रुम  मध्ये घेऊन गेलो . तिथे पट्ठ्या जो सुरु झाला ..... साग्रसंगीत गाणी आणि नाचासकट ! शेवटच्या नाच रे मोरा गाण्याला तर टिचर्स रूम चे टेबल खालून तबल्या सारखे वाजवून दाखवले .....  हुश्श ! शेवटी  या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अंत  झाला आणि मी विजयी मुद्रेने चिरंजीवांना कडेवर घेऊन बाहेर पडलो .

चला मुलाचे उज्ज्वल भविष्य आम्ही इंटरनेशनल शाळेत सुरक्षित केले होते. आता शेवटची भेट . ती म्हणजे शाळेचे ट्रस्टी पिता शेट्टी यांच्याशी . एकंदर माणूस सभ्य . आत जाण्याआधी पोराला लालूच दाखवली . गुड बोय सारखा वाग ह ! तुला चोकलेट देईन मी ! झाल … जसा पिता शेट्टिशि संवाद सुरु झाला तसा पोरान घोषा लावला । बाबा चोकलेट दे ना ! चोकेत दे !  शेट्टी अथवा मी एक जरी वाक्य बोललो -- कि हा चोकेतचा गजर !





शेट्टी ला सवय असावी तो दयार्द नजरेने पहात होता . मग शेट्टी शाळेत फकस्त इंटरनेशनल अभ्यासक्रम नाही आपली महान भारतीय संस्कृती वगैरे बोलू लागला . आमच्या पोराला संस्कृतीत फारसा इंटरेस्ट नसावा . त्याचे आपले चोकेत दे चे पालुपद सुरु होते. मग शेट्टी म्हणाला शाळेत नोंव्हेज चिकन मटन वगैरे आणायचे नाही . असा नियम आहे बरेच विद्यार्थी जैन आहेत वगैरे .  आमच्या पोराने चिकन हा शब्द जसा ऐकला तशी त्याची भुक जागृत झाली … त्याने चोकेत चा घोष बदलला . आई चिकन दे …चिकन दे….  चिकन दे …। नवा घोष सुरु केला .


इतका वेळ मोठ्या प्रयत्नाने दाबून ठेवलेले हसू भळ्ळ दिशि माझ्या थोबाडातुन बाहेर पडले . बायकोही फुटली - आम्ही दोघे खो खो हसू लागलो . आम्हाला हसताना पाहून सिंघम अजून जोराने खोटा नकली हसू लागला . शेट्टी पिता पुत्र आमच्या चक्रम तिक्कलिकडे आश्चर्याने पहात राहिले …।


८ टिप्पण्या:

  1. खूप मस्त लेख....चिरंजीव हुशार आहेत....

    उत्तर द्याहटवा
  2. अभिरामजी पोरग खूपच गुणी दिसतंय .....अनेक दिवसानंतर वाचतांना खूप हसलो....एकदम मस्तज

    उत्तर द्याहटवा
  3. अनुभव कथानाची मांडणी चांगली जमली आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. पोरगं शाळा गाजवणार बर का ......हा हा हा . एकदम मस्त आहे सिंघम जी !

    उत्तर द्याहटवा
  5. बापसे बेटा सवाई दिसतोय डॉक्टर ....
    शेवटी बालहट्ट अवघडच म्हणायचा......!

    उत्तर द्याहटवा
  6. I remember the days when I have to take my daughter for her admission

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *