२० एप्रि, २०१५

आंबेडकर भक्त ओवेसिंना पाच प्रश्न


डॉ. आंबेडकर भक्त (म्हणवणार्या) ओवेसिंना पाच  प्रश्न 


महात्मा गांधिंपेक्षा मी  डॉ  आंबेडकरांना अधिक मानतो असे विधान   खासदार ओवेसिंनि एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नुकतेच केले आहे .  या बद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजेत . आजच्या आधुनिक काळात बाबासाहेबांच्या पुरोगामी विचारांची देशाला गरज आहे.  सामाजिक न्याय , धर्म निरपेक्षता आणि समाज सुधारणा याबाबतीतले बाबासाहेबांचे विचार सार्या देशानेच अंगिकारले पाहिजेत . ओवेसी सारख्या वेगाने लोकप्रिय होणार्या नेत्याने बाबासाहेबांच्या नावाची  कास धरावी हे एक चांगले लक्षण आहे. बाबासाहेबांचे नाव कोन्ग्रेस, भाजपा, कम्युनिस्ट इत्यादि सारेच घेत असतात . पण त्यांचे सगळे विचार  मात्र  मान्य करत नाहित. हिंदुत्व  परिवार एकिकडे बाबासाहेबांचे फ़ोटो लावतो दुसरीकडे त्यांनी त्यागलेल्या  सनातन हिंदु धर्माचे हि समर्थन करतो  . हा बाबासाहेबांच्या फ़ोटोचा दुटप्पी  उपयोग आहे. त्याच धर्तीवर ओवेसी साहेबांचे नवे आंबेडकर प्रेम विचारासाठी आहे कि मतासाठी ?  या संबंधाने काही प्रश्न उपस्थित होतात . स्वातंत्र्य ,समता , विज्ञान निष्ठा , धर्म चिकित्सा आणि सेक्युलारीझम यावरील बाबासाहेबांचे विचार ओवेसिंना मान्य आहेत का ? हा खरा प्रश्न आहे.   







१)  स्त्री स्वातंत्र्य : मुस्लिम समाजाचे भले व्हायचे असेल तर आधी मुस्लिम स्त्रियांचे हित पाहिले पाहिजे असे बाबासाहेबांना वाटत असे. शोषित मुस्लिम स्त्रियांचा विकास आणि  व्यक्ती स्वातंत्र्य  हा त्याना अतिशय महत्वाचा मुद्दा  वाटे .   बाबासाहेब लिहितात   " रस्त्या वर चालणार्या  बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे . (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात  . मुस्लिम स्त्रियात अनिमिया , टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची  शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत . पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा - मुस्लिम स्त्रीचे  शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही "  ( ८ - २३० , २३१)  बुरखा नावाची अमानुष अन्यायी आणी व्यक्तिस्वातंत्र्य दडपणारी धार्मिक रूढी मोडायला ओवेसी पुढाकार घेणार का ? बाबासाहेबांचे विचार मानणार का ?  स्त्री स्वातंत्र्या साठी धर्मसुधारणा करणार का ? 

२) सेक्युलारीझम:  भारतीय राज्यघट्नेवर बाबासाहेबांच्या विचारांची चिरंतन छाप आहे . या घटनेतली धर्म निरपेक्षता ओवेसिंना मान्य आहे का ? घटनेतले २५ वे कलम फक्त पारलौकिक बाबतीतल्या धार्मिक स्वातंत्र्याला मान्यता देते . इहलोकात धर्मात हस्तक्षेप  करण्याचे सर्व हक्क शासनाकडे संरक्षित राहतात . अस्पृश्यता , मंदिर प्रवेश आणि बुरखा , तालाख इत्यादी  सर्व धार्मिक बाबतीत कायदे करण्याचे  स्वातंत्र्य सरकारला आहे. ओवेसिंना सरकारचा धर्मात हस्तक्षेप करण्याचा-  हा सेक्युलर अधिकार मान्य आहे का ?  

३) बुद्धिवाद आणि विज्ञान निष्ठा : यावर बाबासाहेबांचा भर होता . हिंदु समाजात   आधुनिक विचार येउन त्यांची धार्मिक रुढितून सुटका व्हावी असे बाबासाहेबांना वाटत असे .  धर्म धिक्कार आणि हिंदु समाजाचे प्रबोधन यासाठी बाबासाहेबांनी नेटाने लेखणीचे शस्त्र चालवले आहे.   पण बाबासाहेब कधीही हिंदुंचे पक्षपाति नव्हते . हिंदुप्रमाणे मुस्लिमांचेहि प्रबोधन व्हावे - प्रगती व्हावी असे त्यांना वाटे. यासाठी मुस्लीमानीही आधुनिक व्हावे धर्म ग्रंथ  बाजूला ठेवून विज्ञान ग्रंथाचे  पान उलटावे असे बाबासाहेबांना वाटे . त्यासाठी त्यांनी रेनन ला उधृत केले आहे. बाबासाहेब उधृत लिहितात  : 
  • " इस्लाम विज्ञानाला सततच  शत्रू समजत आला आहे. हे त्या धर्माचे एकनिष्ठ एकमेव सातत्य आहे . पण हे सातत्य धोकादायक आहे. इस्लामच्या दुर्दैवाने इस्लामला यश मिळत आले. विज्ञानाचा  - बुद्धीवादाचा वध  करून खरे तर इस्लामने स्वत:चाच वध  केला आहे. जगाचे शाप घेतले आहेत आणि हीनत्व पत्करले आहे " ( ८ - २३५)      
मुस्लिमांनी विज्ञान निष्ठेचा, बुद्धिवादाचा , आणि धर्म चिकित्सेचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही इतरांचेही भले होणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे . डॉ. आंबेड्करांच्या विचारांचे पालन करून बुद्धिवादी आणि विज्ञान निष्ठ होण्याची ओवेसिंचि तयारी आहे का ? 


४) समता:  इस्लाम हा मुक्तिदाता , समतेचा , शांततेचा धर्म आहे या   अंधश्रद्धेतुन हि  मुक्त झाले पाहिजे. बाबासाहेब लिहितात " " इस्लाम बंधुत्वाचि भाषा करतो. सर्वाना वाटते कि जणु  इस्लाम  मध्ये गुलामी नाही …. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेंव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ   इस्लाम धर्म आणि इस्लामिक   देशातून झाला होता . " (  … support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८).  धर्मातली विषमता हि वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते -  इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या  रूपाने  टिकून राहिली आहे  , हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पाकिस्तान या पुस्तकात पानभर  दिले आहे . (८-२२९)
मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ , अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत . मुस्लीमातल्या  अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास - पददलित म्हणुन संबोधले आहे . सेन्सस सुप्रिटेंडंट चे दाखले देत बाबासाहेब म्हणतात " मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध  आहे  , व्यवसायावर  जाती निर्धारण  आहे.  "  (८-२२९,३०) 
बाबासाहेबांच्या विचारावर चालायचे असेल तर समाजसुधारणा आणि त्यासाठी धर्मसुधारणा करावी लागते . ओवेसी ना हि समता मान्य  आहे का ? 



५) धर्म चिकित्सा : हिंदुच्या अमानुष वर्ण व्यवस्थेचे निर्दालन करण्यासाठी बाबासाहेबांनी धर्माच्या चिकित्सेचे सुयोग्य शस्त्र आणि शास्त्र दिले आहे. बुद्ध धम्माचा स्वीकार हा त्यातला अंतिम टप्पा आहे . सारा भारत बुद्धमय करीन हि बाबासाहेबांची गर्जना आहे. ओवेसी आणि त्यांचा पक्ष हे शत प्रतिशत भारतीय आहेत . बाबासाहेबांच्या विचारातल्या अंतिम टप्प्याचा - धम्माचा स्वीकार करायला कदाचित काही वेळ द्यावा लागेल. पण तोवर धर्म चिकित्सेचा तरी अंगिकार केला पाहिजे . आणि बुद्ध धम्मातली  श्रेष्ठ तत्वे थोडी का होईना अंगिकारली पाहिजेत. तेही अवघड वाटत असेल तर निदान बुद्ध धम्माच्या विरोधी आचरण नको .  बाबासाहेबांनी भारतातील बुद्ध धम्माच्या ह्रासाची कारणे सांगणारे शेवटचे भाषण महानिर्वाणापुर्वि सहा महिने २३ जून १९५६ रोजी अखिल भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्लीतल्या सभेत दिले होते . बाबासाहेब म्हणाले होते : 
" मुसलमानांनि या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून , बौद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्याना बूत  शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे असे म्हटले जाते. बूत  हा मुर्तिसाठीचा शब्द म्हणजे बुद्ध या शब्दाचे (अपभ्रंश ) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे.….मुसलमानांनि बौद्ध व हिंदु धर्मावर आक्रमण केले होते . दोघांची मंदिरे उध्वस्त केली होती … .  बर्याच बौद्ध भिक्कुची कत्तल झाली आणि काहींनी देशाटन केले. त्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ? हेच कळेनासे झाले . बौद्ध अनुयायी अंध:कारात चाचपडत राहिले…   " ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ ) अगदी असेच मत १० जून १९५० च्या जनता पत्रातही त्यांनी व्यक्त केले आहे. 
  वैचारिक   नेतृत्व हरवलेला बौद्ध समाज पुढे ब्राम्हणी धर्माच्या तोंडप्रचारी तडाख्यात अडकला असा निष्कर्श   बाबासाहेबांनी काढला आहे.   इस्लामी बूत  शिकन वृत्ती   हे बुद्ध धर्माच्या नाशाच्या अनेक कारणापैकी  एक महत्व पुर्ण कारण मानले आहे. 

बुतशिकन वृत्तीचा प्रत्यय तालिबानने अफ़गाणिस्तानातील  बुद्ध मूर्ती फोडून नुकताच दिला आहे . हि  वृत्ती नष्ट करण्यासाठी आणि धर्मसुधारणा करण्यासाठी ओवेसी कटिबद्ध आहेत का ? निदान जमाते इस्लामी अथवा इतर   संस्थानि  त्यांच्या धार्मिक शिक्षणाच्या  कोर्सेस मध्ये बूत -शिकन या संकल्पनेचा  गौरवपूर्ण उल्लेख टाळावा - त्यास प्रोत्साहन देऊ नये  असे आवाहन तरी  ओवेसी करतील का ?  

केवळ हिंदूची समाजसुधारणा आणि धर्म चिकित्सा  करणे  हा पक्षपात ठरेल . त्यामुळे   हिंदुचे हित होईल आणि मुसलमान मागासच राहतील . असा पक्षपात करणे बाबासाहेबांना मंजुर नव्हते. ते लिहितात "केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे . असा कोणता सामजिक दुर्गुण आहे जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही ? " ( ८ -२२५)  



हिंदु मुस्लिम ऐक्य  

खरोखरचे ऐक्य घडवायचे असेल तर बाबासाहेबांच्या विचाराल पर्याय नाहि. बाबासाहेबांनी १९४०- ४५  दरम्यान  पाकिस्तान संदर्भात अनेक मते मांडली आहेत . पाकिस्तान का ? याची कारण मिमांसा करताना ते लिहितात "  ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदु मुस्लिम संबंध बिघडले हे खरे नाही . ब्रिटिशांच्या पूर्वीपासून  भांडणे होतीच.   हिंदु आणि मुस्लिमातील राजकीय भांडण हा ऐतिहासिक, धार्मिक , सांस्कृतिक आणि सामजिक घटक परस्पर विरोधी ( Antipathy) असल्याचा परिणाम आहे.  (८-३२८,३२९) . 

 अकबर आणि कबीर  या सुधारकांच्या कार्याचा इष्ट परिणाम झालेला नाही .  अधिक विश्लेषण करताना आंबेडकर लिहितात : - " इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी  नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही .....  भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म - सच्च्या मुस्लिमाला  देत नाही . "  (८- ३३०) "इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोन भागात केली आहे ….  दार उल हरब म्हणजे शत्रूभूमिचे रुपांतर  -   दार उल इस्लाम मध्ये करण्यासाठी … जिहाद करणे हे मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. "   (८-२९५, २९६) 

 धर्माच्या आधारावर एकदा फाळणी घडून गेलेली आहे . बाबासाहेबांनी चर्चा केलेला  हिंदु मुस्लिम लोक संख्येच्या  आद्लाबदलिचा (८-११७) मुद्दा आज चर्वित चर्वण करण्यात अर्थ नाही . आज भारतात हिंदु आणि  मुस्लिमाना सहजीवन अपरिहार्य आहे . पण ज्या कारणाने पूर्वी मने दुभंगलि ती कारणे पुन्हा घडता कामा नयेत . शांतते शिवाय विकास आणि सामजिक क्रांति अशक्य आहे. त्यासाठी हिंदुप्रमाणे मुस्लीमानही  प्रयत्न करावे लागणार  आहेत. धर्म सुधारणा कराव्या लागणार आहेत . राजकीय ढोंग करणे ओवेसिंच्या परंपरेत नसेल , तर बाबासाहेबांचे विचार स्वीकारले पाहिजेत.  

स्वातंत्र्य ,समता , विज्ञान निष्ठा , धर्म चिकित्सा आणि सेक्युलारीझम तथा हिदू मुस्लिम ऐक्य याची कारणे स्वरूप आणि उपाय बाबासाहेबांच्या विचारातून ओवेसी समजून  घेतील आणि त्यानुसार आचरण करतील अशी आशा बाळगुया.

बोलिवुड आणि पेज थ्री विचारवंतानि  हिंदु मुस्लिम प्रश्नाचे एक चित्र आणि चरित्र आपल्यासमोर उभे  केले आहे .  बाबासाहेबांचे विचार त्यापेक्षा अतिशय भिन्न आहेत , सखोल आहेत , अभ्यासपूर्ण आहेत . मुस्लिम समाजाचे ओवेसिंना हित करायचे असेल तर १०० कोटि हिंदुचे निर्दालन उपयुक्त नाही. आंबेडकरी विचाराचे पंचशिल आवश्यक आहेत . त्यासाठी  ओवेसी या पाच महत्वाच्या  विचारांचा  स्वीकार करतील तर  या देशाचेच  रुपांतर स्वर्गात (जन्नत) मध्ये होईल.  आणि जन्नत प्राप्ती साठी वेगळा जिहाद (पराकाष्ठा) करायची गरजच उरणार नाहि.


 संदर्भ : 

[(८ - ३२०)  हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र  शासनाने  प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत  रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे.  बरेचसे  मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English)  मध्ये कंसात दिले आहेत.  ]

४ टिप्पण्या:

  1. Parlik deshatun alele muslim bharat ani pakistanat je aahet te swatala itar indian sub continet madhil lonka peksha shresta samjtaat.
    Te ekach kutumbat lagna karatat. Pakistan madhe tar pastun,sindhi,punjabi,rajput,baluchi ashi kityek jati sangarsha nirman zala aahe ani to wadhatach chalala aahe.
    Bhartatil muslim je convert zalele aahe nahak bali padat aahe. tyancha fakt upyog kela jaat aahe...swatala arabi ani itar deshatun aaleli muslim sahaja sahaji yethil mul muslimanacha fakt upyog karun getil ya peksha jast apeksha naahi.

    Jari swatala patale tari muslim he shriyanna kadhi hi mukt wavar karu denar naahi. muslim kashala aajahi hindu madhe kuthe muli swatantra aahe..ghedopadi khap panchayati vegere aahech...shaharanchi tulana keli tar muslim shriyanahi kami pramanat swatnarya aahech..

    उत्तर द्याहटवा
  2. ओवेसी बाबासाहेबांना मानायला लागला याचा अर्थ फक्त आणि फक्त राजकिय लाभ उठवून दलितांची मते मिळवणे हाच आहे. आपण लिहलेल्या एकाही तत्वाचे पालन केले तर त्याची मुस्लिम मते गेलीच समजा. तो ही चूक करेल? आता दलितांच्या लक्षात ही गोष्ट ज्या दिवशी येईल तो सुदिन समजायचा.

    उत्तर द्याहटवा
  3. कुठल्याही महापुरुषाला पूर्णपणे स्वीकारणे हे अवघड काम आहे. तोकड्या मनोवृत्तीची माणसे काही ठराविक विधानांपुरते, सोयीपुरत स्वीकारतात. अशांना जास्त महत्व देण्याची गरज नाही.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *