२० जाने, २०१३

अमान मोमीन - यांचे मी कोल्हापुरी.

अमान मोमीन - यांचे मी कोल्हापुरी.

आमच्या लहानपणी सीडी मिळत नसत. केसेटि मिळायच्या. इतका मी प्राचीन आहे. बापाच्या केसेटि पळवून मी गच्चीवर घेऊन जायचा. केसेट दगडांनी तोडायची . त्यातली फिल्म काढायची. त्याच्या टोकाला दगड बांधायचा . मग तिसर्या मजल्यावरच्या गच्चीवरून त्या केसेट्च्या फिल्मची दोरी खालपर्यंत सोडायची असा तो उद्योगी खेळ चाले. त्या जमान्यात ऐकलेली ही केसेट. अमान मोमीन - यांचे मी कोल्हापुरी. आमचे मूळ गाव कोल्हापूर. त्या कोल्हापूराचे आणि विशेषत: त्यातल्या मुस्लिम समाजाचे त्यात वर्णन होते. भाष्य मात्र माणुसकीवर, आधुनिक युगात येऊ पहाणार्या टोकदार धार्मिक अस्मितांवर आहे. त्यावेळी भाष्य कळण्याएव्हढि अक्कल न्हवती. पण गणेशोत्सवात त्या केसेटवर आधारित एकपात्री प्रयोग मी करत असे . त्यातल्या "रांडिच्या" वगैरे शिव्या टाळाव्यात हा घरच्यांचा सल्ला साफ धुडकावत मी तो एकपात्री प्रयोग करत असे. पाच वर्षाच्या दिक्षित आडनावाच्या पोराने गणपतीच्या स्टेजवर अश्या शिव्या देत कार्यक्रम करावा हे लोकांना विशेष वाटले. पण प्रोग्राम सुपर हिट होत असे. 

पुढे ती केसेट ही आमच्या गच्ची खेळातून सुटली नाही. त्याचा दोरा जमिनिपर्यंत पोचला. आणि बापाचा हात आमच्या कान्फ़ाडापर्यंत. वय वाढले.. मार लक्षात राहिला पण केसेटचे पाठांतर विसरून गेलो. त्यात काहीतरी जबरदस्त होत. घेण्यासारख होत एव्हढ मात्र लक्षात राहील. ती केसेट पुढे कैक वर्ष शोधत होतो. मिळाली नाही. परवाच काही कामानिमित्त कोल्हापुरला जाण झालं . भवानी मंडपाच्या बाहेर फ़ुटपाथवर ती च केसेट सीडी स्वरूपात दिसली. उचलली. परवाच ऐकत होतो. अमान मोमीन नावाचा एक अवलिया कोल्हापुरी. राजर्षी शाहू महाराजांच्या कृपेने निघालेल्या होस्टेलात शिकतो काय. नशीब काढत अमेरिकेत पोचतो . पुढे आपल्या खुसखुशीत शैलीत जून कोल्हापूर आपल्या समोर उभा करतो काय ... सारच विलक्षण . अद्भुत आणि नोस्टाल्जिक .

आठवणींची केसेट पुन्हा गुंडाळत गेलो. माझ्या लहानपणी मी ९२ - ९३ ची दंगल मी अनुभवली आहे. भितीन स्वत: बाथरूम मध्ये कोंडून घेतलं आहे. दंगलितला हिंसाचार - खूनसत्र डोळ्यांनी पाहिला आहे. मुंबॆतले बॉम्बस्फोट - धार्मिक - कटुता -विद्वेषपूर्ण हिंदुत्व . इस्लामी जिहादचे नारे. या सार्यांचे चढते उतरते आलेख मी पाहिले आहेत. त्यातली भीती . टोकदार अस्मिता . पण माझ्यावर या सार्या गोष्टीचा मुंबईत रहात असूनही वेगळ्या प्रकारे फरक पडत होता. या सार्याच एक वेगळच एंटर्प्रिटेशन मी करत होतो. धर्म - जात पात - अभिमान. माणुसकी प्रांजळ पणा . अघळ पघळ पणा . माझ्या मित्रांना मी विचित्र वाटतो. (आणि बायकोला येडा).

त्या केसेट मधले शब्द मी विसरून गेलो होतो. पण त्यातली भावना म्हणा किंवा भाष्य म्हणा मनात कुठेतरी खोलवर जागृत होत. आपल्या आयुष्यावर आणि मतांवर अशा लहान लहान गोष्टी खुप प्रभाव टाकत असतात. आपली मने घडवत असतात. मानवी आयुष्यात कसदार साहित्याच मोल फार मोठ आहे. अमान मोमीन यांच्या या केसेट मध्ये थट्टा आहे मस्करी आहे. कामरे खालाचे विनोद आहेत. नक्कल आहे. कुस्ती आहे. मुस्लिम लीग आहे. कोल्हापुरी तांबडा तिखटजाळ रस्सा आहे. शाहू महाराज आहेत. हिंदु मुस्लिम प्रश्न आहेत . जात पातीवर मार्मिक टिप्पणी आहे. धर्म धर्मांधतेवर भाष्य आहे. खाशी कोल्हापुरी अवलीगिरी आहे. पुणेकरांना शालजोडीतले आहेत.

पण त्याहून महत्वाच या सगळ्या कडे खट्याळ पणे पहाणारा एक माणुसकीचा चष्मा आहे. 

तुम्हाला मिळतोय का तो? एकदा ऐकून पहाच . संपुर्ण कार्यक्रम दीड तासाचा आहे. चार भागात मी तो अपलोड केलेला आहे. ओनलाइन ऐकता येत नाही. आधी चारही भाग डाउन लोड करून घ्यावे लागतील . ऐकाच वेळ काढुन आणि प्रतिक्रिया अवश्य कळवा. 

mi kolhapuri aman momin

http://yourlisten.com/channel/content/16943912/Aman_Momin_Mi_Kolhapuri_1

http://yourlisten.com/channel/content/16943896/Aman_Momin_Mi_Kolhapuri_2_

http://yourlisten.com/channel/content/16943904/Aman_Momin_Mi_Kolhapuri_3

http://yourlisten.com/channel/content/16943905/Aman_Momin_Mi_Kolhapuri_4

Dr. ABHIRAM DIXIT

७ टिप्पण्या:

  1. I tried the link but they are not playing. Do you have other links to mi kolhapuri?

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *