७ डिसें, २०१२

बुद्ध सरणं गच्छामि । (भाग १)

माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही. पण देव आणि धर्म यावर विश्वास असणारे लाखो लोक माझ्या भोवती आहेत त्यांच्या पासून तुटून पडण्यावारही माझा विश्वास नाही. त्यांना माझ्या बरोबर खेचून नेण्यासाठी आवश्यक असणारी व्यवहारातील तडजोड करण्यास मी तयार आहे. विचारात मात्र करणार नाही. याच कारण अस आहे की विचार हे तुम्हाला कोणीकडे जायचं आहे याची दिशा दाखवणारे असतात आणि व्यवहार तिथपर्यंत तुम्हाला टप्या टप्याने खेचून नेण्यासाठी असतो. - नरहर कुरुंदकर.
या लेखमालेत विविध धर्मचिंतनांचा परिचय करून देणार आहे.
***********************************************************************************************
अथातो धर्मजिज्ञासा - बुद्ध सरणं गच्छामि । (भाग १)
***********************************************************************************************
ख्रिस्तपूर्व ५६३ सालच्या वैशाखी पूर्णिमेला क्षत्रीय शाक्य कुलात सिद्धार्थाचा जन्म झाला. त्याचा पिता राजा शुद्धोदन. आपल्या लाडक्या सुपुत्रावर दु:खाची सावलीसुद्धा नको असे त्याला वाटले. सिद्धार्थाच्या राजवाड्याभोवती त्याने सुखांची अशी कारंजी उडवून दिली की ; त्यांच्या तुषारपटलातून खर्‍या जगातील एकही भेसूर दृश्य सिद्धार्थाला दिसू नये. सुखाच्या कारंज्यांच्या थुयथुय आवाजात सत्य जीवनातील मानवी क्रंदन लुप्त व्हावे. पण वास्तव किती दिवस लपून रहाणार ? म्हातारपण, रोगराई आणी म्रुत्यू यांचे हिडीस व भयानक दर्शन राजपुत्राला झालेच ! सिद्धार्थ कळवळून गेला. करुणेचा महापूर त्याच्या अंतःकरणात दाटला. याचा अर्थ काय ? यातून मार्ग काय ? मानवी जीवनाची ही आर्तता कशी नाहीशी करायची? समस्त मानवजातीच्या दु:खाचे निराकरण करण्याचा मार्ग कोणता? तो कोठे सापडेल ? शोध घेतलाच पाहिजे.
सुत्तनिपातात (९३५-३६) तथागत म्हणतात - " थोड्याश्या पाण्यात राहिलेल्या माश्यांप्रमाणे तडफडून एकमेकांवर हल्ले करणारे लोक पाहून माझ्या मनात (मनुष्यजातीच्या भविष्याबद्दल) भीती उत्पन्न होउन मला उबग आली. "
बुद्धाच्या अस्सल सहित्यात हे वाक्य वारंवार आलेले आहे. लोकांचे दु:ख पाहून सिद्धार्थ कळवळून उठतो आणी त्याच्या मनात भीती किंवा उबग निर्माण होते. त्यातून चींतन घडते आणी धम्माचा जन्म होत जातो. ह्या सगळ्या मानसिक प्रक्रीयेचे आधुनिक मानशास्त्राच्या द्रुष्टीकोनातून केलेले विवेचन पुढे येणार आहे.
त्याच्या संस्कारक्षम मनात हा डोंब उसळला तो त्याला स्वस्थ बसू देईना. दु:खाच्या नाशाच्या मार्गाच्या शोधार्थ तो निघाला; एकटाच, एकाकी, अज्ञाताची वाट काढीत. जगाच्या एतिहासात इतका नाट्यपूर्ण प्रसंग दुसरा नसेल!
.
.
b
.
.
एकोणतीस वर्षांचा, देखणा, मनोहर देहाचा राजपुत्र, आप्तजनांचा लाडका सिद्धार्थ. त्याच्या मुखाने एखाद्या इच्छेचा उच्चार होण्याचा अवकाश की ... की कुठलाही भोग्य पदार्थ त्यापुढे सिद्धच आहे.... असा हा भाग्यवान सिद्धार्थ - मध्यरात्री - शयनगृहात उभा आहे. रूपतारुण्यवती, नवप्रसवा, मानिनी यशोधरा ही त्याची पत्नी शांत झोपली आहे. तिच्या कुशीत तान्हुला राहुल पहुडला आहे. गौतम भरल्या डोळ्यांनी राहुलकडे पहातो.. क्षणभर त्याला वाटले की आपल्या ह्या छोट्या गोंडस प्रतिमेचे- राहुलचे चुंबन घ्यावे. पण नकोच ! न जाणो ... तेवढ्याने यशोधरा जागी व्हायची व आपल्या महाभिनिष्क्रमणाच्या मार्गात अडथळा यायचा. हाही मोहच. शेवटचा का असेना? सोडला पाहिजे. मुलाच्या चुंबनासाठी प्रस्फुरित झालेले ओठ त्याने घट्ट मिटून घेतले. पाठ न वळवताच. दृढ निश्चयाने एक एक पाउल तो मागे हटला. राजवाडा सोडला. राज्य सोडले. प्रेमळ पिता, प्रिय पत्नी आणी एक अजाण तान्हुला मागे राहिला. स्वजनातून विजनात, भोगातून चिकित्सेत, राजमहालातून अरण्याकडे सिद्धार्थ शोधार्थ निघाला. मानवतेच्या चिरकल्याणाच्या शोधार्थ तो निघाला.
वाटेत पाच साधक मिळाले. हे पाच श्रमण शरिराला नाना प्रकारे कष्ट - क्लेश - पीडा देउन परमप्राप्तीसाठी प्रयत्न करत होते. सिद्धार्थ गौतम ही त्यात मिसळला. श्रमणांची परंपरा भारत देशात वेदकाळाच्या आधीपासून सुरू आहे. स्वतः च्या शरिराला श्रमण गौतमाने नाना प्रकारचे त्रास दिले. हाल करून घेतले. जे शोधत होता ते मिळाले नाही. त्याला वाटले - यातून काही मिळणार नाही. देहपीडे पासून त्याने अंशतः फारकत घेतली आणी स्वतःला मध्यम मार्गी म्हणू लागला. हा मध्यम मार्ग बुद्धाच्या वैचारिकतेचा रस्ता कसा झाला हेही आपण पहाणार आहोत.
आधुनिक भारतीय मनाला गौतम बुद्धाविषयी कायम आकर्षण वाटत आलेले आहे. कारण बुद्धाच्या जीवनात काव्य आहे. बुद्धाचा जन्म वैशाखी पौर्णीमेचा, महाभिनिष्क्रमण झाले वैशाखीला आणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली तो दिवसही वैशाखी पौर्णीमेचाच. बोधीवृक्षाखाली सिद्धार्थ दु:खा बद्दल चिंतन करत बसला आहे. त्याला तहान भुकेची पर्वा नाही. शाक्य कुलातले हे राजबिंडे पोर आता पार अस्थिपिंजर बनुन राहिले आहे. आणी वैशाखीच्या त्या पौर्णीमेला त्याला ज्ञानप्राप्ती झाली. ह्याचे बाह्य रूपक म्हणून की काय; पौर्णीमेच्या शीतल चंद्रप्रकाशात त्याचा देह उजळून निघाला.
.
.
a
.
.
त्याला समजलेले अंतिम सत्य माणुसकीच्या चिरकल्याणासाठी प्रसारित करायला तो निघाला. ह्यावेळी मात्र तो एकटा नव्हता , एकाकी नव्हता. त्याजवळ त्याला उमगलेले अंतिम सत्य होते. असा माणुस कधीही एकाकी असत नाही.
बुद्ध धम्माचे पारंपारिक पंथ. मिटल्या डोळ्यांनी स्वतःकडे पहाणारा गौतम आणी डॉ. आंबेडकरांनी रेखाटलेला उघड्या डोळ्यांचा बुद्धही आपण उलगडणार आहोत.
आधीचे पाच साधक पुन्हा भेटले. त्यांना बुद्धाने पहिले प्रवचन दिले. त्या प्रवचनाला म्हणतात धम्मचक्रप्रवर्तन. आपल्या झेंड्यावरचे अशोकचक्र त्याचेच प्रतीक आहे. बुद्ध म्हणाला -
(क्रमशः)

३ टिप्पण्या:

  1. sir , very gd article...pudhacha bhag kevha yenar aahe....? eagerly waiting..!

    उत्तर द्याहटवा
  2. कुबेरांचे बौद्धिक दारिद्र्य

    बुद्ध धर्मावर टीका करणार्या एका पुस्तकाचे परिक्षण गिरीश कुबेरांनि आजच्या लोकसत्तेत केलेलं आहे . बौद्ध विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष चित्रित करणारे हे पुस्तक आहे . कुबेर हे तसे भगव्या परिवाराशी संबधित आहेत. पण महाराष्ट्रात बौद्ध धर्मावर टिका करायची झाली तर पुरोगामित्वाची ढाल पुढे करणे आवश्यक आहे. अशा सुज्ञ विचाराने कुबेरांनि परिक्षणाच्या पहिल्या परिच्छेदात इस्लामची बाजू घेतली आहे. इस्लामची बाजू घेणे हे महाराष्ट्रात पुरोगामित्वाचे लक्षण मानले जाते हे कुबेरांना पक्के ठाउक आहे !

    इस्लाम धर्माच्या मुलभुत शिकवणुकीतच हिंसा आहे असे इस्लामच्या टिकाकारांचे म्हणणे आहे . त्याला विरोध दर्शवत कुबेरांनि परिक्षणाचि सुरवातच " एकच धर्म कधी हिंसेची शिकवण देतो का ? " असा खडा सवाल केला आहे . त्याला उत्तर हि स्वत:च दिलेले आहे . कोणताच धर्म हिंसेची शिकवण देत नाही… मग पुढे ते म्हणतात प्रत्येकच धर्म काही पूर्णपणे शांततावादी नसतो. बौद्ध धर्मीयही हिंसक आहेत . हायला ! नेमके काय म्हणायचे आहे ?

    आता गंमत अशी कि संपुर्ण लेखात कुबेरांनि कुठेही बौद्ध तत्वज्ञानाची चिकित्सा केलेली नाही . बुद्ध् विचार उद्धृत केलेला नाही . बौद्ध धर्मियांच्या हिंसक कृत्यांचे दाखले देत , बौद्ध धर्मही हिंसकच आहे असे कुबेरांना सिद्ध करायचे आहे . पण त्यांनी उपस्थित केलेला पहिला प्रश्न हा धर्माच्या शिकवणुकिबद्दल आहे … बौद्ध धर्माची शिकवण जर हिंसेची असेल तर कुबेरांनि एखाद दुसरे आक्रमक बुद्धावचन किंवा धम्मपद उधृत करायला हवे होते .

    पण बुद्धांचा हिंसक आचार चर्चेला आणताना आधी इतर धर्माना क्लीन चिट देणे हे कुबेर आपले कर्तव्य समाजात असावेत ! पुढे सर्व धर्म हे समान असतात असे चुकीचे गृहीतक त्यांनी धरलेले दिसते . त्यामुळे एकतर सर्वच धर्म हे हिंसेची शिकवण देत असतील किंवा अहिंसेची तरी असा चुकीचा निष्कर्ष त्यानी काढलेला आहे !

    सर्व धर्माची शिकवण पूर्णपणे वेगवेगळी असते . त्यातले काही धर्म हिंसक तर काही अहिंसक असतात . त्याचप्रमाणे काही धर्मात कालानुसार बदल होतात. काही धर्मात तसे बदल घडवून आणणार्याना गोळ्या घातल्या जातात . इत्यादी विषय कुबेरांनि चर्चेला घेतलेले नाहीत . त्याचप्रमाणे धर्माची मुलभुत शिकवण आणि अनुयायांचा आचार यात फरक असू शकतो हेही ध्यानात घेतलेले नाही . पौर्वात्य , पाश्चिमात्य , अब्राहामिक असे वेगेवेगळे धर्मगट असू शकतात हे हि कुबेरांच्या गावी नाही . काही धर्मात धर्म ग्रंथानुसार आचरण केले जाते , तर काही धर्मात तत्वज्ञान हा केवळ रंजनाचा विषय असतो हेही कुबेरांना समजलेले नाही . त्यामुळे त्यांनी धर्म , हिंसा आणि आचार यांची गल्लत , गफलत आणि गहजब उडवलेला आहे !

    कुबेर हे सावरकर समर्थक असावेत. जेव्हढे कव्हरेज लोकसत्ता सावरकरांना देतो त्यावरून मी हा अंदाज बांधला आहे .
    सावरकरांनी बुद्ध धर्मावर भरपूर टिका केलेली आहे . बुद्ध धर्मियांच्या अतिरेकी अहिंसेमुळे देश बुडाला असा सावरकरांचा निष्कर्ष आहे .

    बुद्द धर्म हिंसक असेल तर सावरकरांची इतिहास मिमांसा पूर्णपणे चुकलेली आहे असे कुबेरांनि मान्य करायला हवे ! कधी बुद्धा वर हिंसक म्हणून टीका करायची कधी अहिंसक म्हणून करायची ! नेमक काय ते ठरवा रे ! !

    बुद्धावर टिका केल्याने कोणाचे कोणते गंड सुखावतात हे सगळ्यांनाच माहित आहे …

    पण पुस्तकाचे परिक्षण वेगळ्या मार्गानेही करता आले असते . धर्मचर्चेचा घोळ न घालता … म्यानमार मधील बुद्धांना हिंसेवर का उतरावे लागले ? असाही प्रश्न उपस्थित करता आला असता ! विचार करता आला असता … शब्द्संपत्ति वापरता आली असती … पण ।….

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *