६ सप्टें, २०१२

अवलिया विचारवंत - नरहर कुरुंदकर.







तीस वर्षापूर्वी एक प्रभावी वक्ता स्टेजवरच मरण पावला. तो मॅट्रीक पास झाला तेंव्हा त्याची पुस्तके बीए च्या अभ्यासक्रमासाठी लावली होती आणि बीए 'ना'पास झाला तेंव्हा एम ए चे विद्यार्थी त्याची पुस्तके अभ्यासत होते. त्यांची भाषणं जेव्हढी लोकांना चक्रावून टाकणारी असत तेव्हढाच त्यांचा म्रुत्यू ही होता. औरंगाबादेत भाषणाची सुरवात करताच रणांगणावरील योध्याप्रमाणे १० फेब्रूवारी १९८२ ला कुरुंदकर गुरुजी व्यासपिठावरच कोसळले. त्यावेळी त्यांच वय होतं पन्नास वर्ष. या उण्यापुर्या पन्नास वर्षात त्यांनी मानसशास्त्रापासून इतिहासापर्यंत विषयांचा अभ्यास केला, कलामिमांसेपासून राजकारणापर्यंत लेख लिहिले, आणी मनुस्म्रुतीपासून कुराणापर्यंत विषयांवर व्याख्याने दिली.
आपल्याकडची विचारवंत मंडळी सहसा अमुक जातीची, तमुक राजकीय विचारसरणीची किंवा एखाद्या नेत्याचे अनुयायी म्हणून ओळखली जातात. राजकीय विचारसरणीच्या बेड्या पायात ठोकूनच वैचारिक झेपा घेतल्या जातात. महाराष्ट्राच्या या वैचारिक काळोखात कुरुंदकर झगमगुन उठतात.
मनुस्म्रुतीवरच्या पुस्तकात ते लिहितात, मध्ययुगीन जगात सर्वच देशात विषमता होती. अमेरिका, युरोप ते अरबस्तानापर्यंतचा इतिहास गुलामिच्या आणी स्त्री छळाच्या काळ्या शाइने लिहिला आहे. पण ह्या गुलामिचे आपल्या धर्माने ज्या प्रमाणात समर्थन केलेले आहे, तेव्हढे जगाच्या पाठीवर कोठेही आढळणार नाही. कर्म करत रहा, फळ अत्ता मागू नकोस, पुढल्या जन्मी तुला ते मिळेलच. त्यानुसार तुझी जात ठरेल अन त्यावरून लायकी; ही धार्मीक शिकवण हिंदूना घातक ठरली. देशाला दुर्बल करणार्या . ह्या धार्मीक व्यव्स्थेचे समर्थक आजाही अस्तित्वात आहेत. ही कुरुंदकरांची खरी खंत होती. मनुस्म्रुतीत शुद्राला कर नाही असे मनुसमर्थक म्हणतात. पण त्याचवेळी शुद्राला धनसंचयाचा अधिकारच मनू देत नाही. तर तो कर भरणार कोठून ? अशा बाबी डोळ्याआड करतात. केवळ ग्रंथप्रामाण्यातून हे घडत नाही पण जातीचा दंभ मनूच्या उच्चवर्णीय समर्थकाना बौद्धीक गुलामगिरीत ढकलतो हे कुरुंदकर दाखवून देतात. परंपरेची बौद्धीक गुलामी अमान्य करणार्या उच्चवर्णीयांनाही मनू शूद्राचीच वागणूक देतो असे प्रतिपादून मनूच्या उच्चवर्णीय समर्थकानाही ते चक्रावून टाकतात.



सुभाषबाबूंचे आकलन करताना कुरुंदकर लिहितात - जे सशस्त्र क्रांतीकारक आहेत, ते सगळे अहिंसाविरोधी . जे अहिंसाविरोधी ते सर्व गांधीविरोधी आणी जो गांधीविरोधी तो हींदुत्ववादी अशी सोयीची समजूत मध्यमवर्गीयांनी केलेली आहे. सुभाषबाबूंनी त्यांच्या आझाद हिंद रेडीओवरच्या भाषणातून गांधीचा उल्लेख राष्ट्रपिता असाच केला होता. बंगाल मधल्या दास पॅक्ट नुसार ५२ % मुसलमानाना ६०% जागा मिळणार होत्या आणी सुभाषबाबू ह्या करारात सामील होते हे पटवून देत कुरुंदकर सुभाषबाबूंचे मुस्लीम प्रेम दाखवून देतात. स्वतःला गांधीवादी म्हणवणारे कुरुंदकर महात्मा गांधीचे अमक्या विषयावरचे विचार साफ चूक आहेत असे म्हणायला कचरत नाहीत. फाळणीच्या वेळी गांधीजींनी मुस्लीमांचे लांगुलचालन केले होते असा आरोप हिंदुत्ववादी करतात. त्याला उत्तर देताना कुरुंदकर म्हणतात " एका मुसलमानाला तीन मतांचा अधिकार देउन; लखनौ कराराच्या वेळी कोंग्रेस मधील मुस्लीम लांगुलचालनाचा पाया; खुद्द लोकमान्य टिळकांनी घातलेला आहे. हे हिंदुत्ववादी का विसरतात ?"




वाचकांच्या, श्रोत्यांच्या प्रस्थापित कल्पनांना तडाखे हाणत त्यांना संपूर्णतः नव्याने विचार करायला शिकवणे हे कुरुंदकरांचे वैशिष्ट्य होतेच. पण असे करताना कुरुंदकर अंगावर येत नाहीत. क्लिष्ट विषयांवर धक्कादायक भाष्ये करताना कुरुंदकरांची भाषा मार्मिक, प्रवाही तरी विचारप्रवर्तक अशी असते.

जमाते इस्लामी च्या संमेल्लनासमोर त्यांनी केलेले भाषण विशेष विचारप्रर्तक होते. जमलेल्या तमाम मौलवी, उलेमा आणी मुस्लीम श्रोतुसमुदायाला कुरुंदकर म्हणाले होते ''मी नास्तिक आहे. धार्मिक अर्थाने मी हिंदू नाही. पण मी मुसलमानही नाही. हे तुम्हाला मान्य आहे काय? एक मिनिट ... जगात चोर असतात हे वास्तव मान्य करण वेगळं आणी चोरांचा चोरी करण्याचा अधिकार मान्य करण वेगळं. मी मुसलमान नाही. पण माझा मुसलमान नसण्याचा हक्क तुम्हाला मान्य आहे काय ? अल्लाहने एकमेव सत्यधर्म सांगितला तो म्हणजे इस्लाम. अशी तुमची धारणा आहे. इतर सर्व घर्म अशुद्ध आहेत असे तुमचे म्हणणे आहे. त्या इतर धर्मीयांनी अल्लाचा धर्म स्वीकारलाच पाहिजे असा तुमचा आग्रह आहे मग माझ्यासारख्या नास्तिकाविषयी तर बोलायलाच नको !" मुस्लीम प्रश्न हा अल्पसंख्यांक प्रश्न नाही तर इतर धर्म खोटे आहेत या भुमिकेतुन तो जन्मला आहे असे कुरुंदकर म्हणतात. जमाते इस्लामी समोरचे भाषण मान्यतेच्या शांततेत पार पडते. पण कुरुंदकरांचे पुरोगामी मित्र चक्रावून जातात.

 

विनोबांना न पटणारा संत म्हणणारा हा गांधीवादी, इस्लाम धर्माची कठोर चिकीत्सा करणारा हिंदुत्ववाद्यांचा शत्रू आणि धर्मशास्त्रांचा नास्तिक प्रकांडपंडीत महाराष्ट्राला पुनःपुन्हा आठवावा लागणार आहे. त्यांनी ज्या प्रश्नांवर चिंतन केलं ते प्रश्न आजही ज्वलंत आहेत. यापुढेही रहाणार आहेत. बाबा आमटेंच्या कुरुंदकरांवरच्या ओळी आहेत :
वास्तवाच्या जाणीवांना वाचा यावी; तस बोलायचास
प्रज्ञेच्या दाहक हुंकारासारखा.
काळोख उजळत येणाऱ्या किरणांसारखा यायचा तुझा शब्द;
नीतीच्या वाटा प्रकाशत,आयुष्याचे अर्थ दाखवत.
त्यातून दिसायचे नवे प्रश्न नव्या दिशा;
कुणाला गवसायचा प्रकाश कुणाला संधी,
तर कुणाला सापडायचे ते स्वत:च.


 - डॉ. अभिराम दीक्षित, पुणे 

१० टिप्पण्या:

  1. Daktar saheb khupach changalya shabdat Kurundkar mandale ani Kurundkar wachayala prerit kelet. Khup aaabhar.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अभिराम दिक्षित आपले सगळे लेख कॉपीड का असतात??? मुळ लेखकाच नाव का लिहत नाही आपण स्वतःच्या नावाने असे काहीही खपवणे चांगले नाही मुळ लेख

      http://www.misalpav.com/node/20659

      हटवा
    2. अरे अनमिक दादा मिसळपाव या संकेत स्थळावर सारेच टोपण नावने लिहित असतात . मी तेथे तो लेख टोपणनावाने लिहिला आहे … मिसळपाव वरील लेखाच्या कोमेंट पहा भले होईल तुझे डॉक्टर धन्यवाद अशी पहिली कोमेंट आहे. बाकी राजघराण हे माझे प्रोफ़ाइल आहे. माझे बाकी लेखही दिसतील तिथे . हा लेख मी सकाळ वर्तमान पत्रासाठी लिहिला होता. आणि नावासकट कोमेंट दे कि भावा

      हटवा
  2. Dear Dr. Abhiram - thank you very much for this note on Kurundkar!

    उत्तर द्याहटवा
  3. Please translate your all articles in english! Related to narharkurundkar.

    उत्तर द्याहटवा
  4. अभिराम दिक्षित आपले सगळे लेख कॉपीड का असतात??? मुळ लेखकाच नाव का लिहत नाही आपण स्वतःच्या नावाने असे काहीही खपवणे चांगले नाही मुळ लेख

    http://www.misalpav.com/node/20659

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अरे अनमिक दादा मिसळपाव या संकेत स्थळावर सारेच टोपण नावने लिहित असतात . मी तेथे तो लेख टोपणनावाने लिहिला आहे … मिसळपाव वरील लेखाच्या कोमेंट पहा भले होईल तुझे डॉक्टर धन्यवाद अशी पहिली कोमेंट आहे. बाकी राजघराण हे माझे प्रोफ़ाइल आहे. माझे बाकी लेखही दिसतील तिथे . हा लेख मी सकाळ वर्तमान पत्रासाठी लिहिला होता. आणि नावासकट कोमेंट दे कि भावा

      हटवा
  5. अरे अनमिक दादा मिसळपाव या संकेत स्थळावर सारेच टोपण नावने लिहित असतात . मी तेथे तो लेख टोपणनावाने लिहिला आहे … मिसळपाव वरील लेखाच्या कोमेंट पहा भले होईल तुझे डॉक्टर धन्यवाद अशी पहिली कोमेंट आहे. बाकी राजघराण हे माझे प्रोफ़ाइल आहे. माझे बाकी लेखही दिसतील तिथे . हा लेख मी सकाळ वर्तमान पत्रासाठी लिहिला होता. आणि नावासकट कोमेंट दे कि भावा

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *