१८ ऑक्टो, २०१५

माझ्या कार्ट्याचे देव


मी आंतर्बाह्य नास्तिक धर्मविरोधी आणि पाखंडी आहे . पण आमच्या घरात एक अति धार्मिक,  श्रद्धाळू   आणि कर्मकांडि गृहस्थ राहतात . त्या गृहस्थांचे नाव राजवीर दिक्षित असून … वय वर्षे चार त्यांनी नुकतीच पुर्ण केली . हे आस्तिक गृहस्थ आमचे सुपुत्र आहेत .  त्यांच्या धार्मिक भावना अतिशय टोकदार आहेत . आणि वृत्ती बजरंग दलापेक्षा अधिक आक्रमक आहेत .  त्यामुळे त्याना मी सहासा दुखावत नाही . या गृहस्था विषयी आणि त्यांच्या धार्मिक भावनां विषयी संपुर्ण आदर राखत - प्रस्तुत लेखात त्याच्या मनातल्या देवाचा आणि धर्माचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे .

सर्व प्रथम आस्तिक आणि नास्तिक हि भानगड समजावून घेवू . 

( न + आस्तिक ) नास्तिक हा शब्द संस्कृत आहे.  वेद कालापासून तो शब्द साहित्यात आहे. नास्तिक विचाराचे लोक त्या पूर्वी पासून आहेत . भारतासाठी हा विचार पाश्चात्य नाही , विदेशी नाही , नवा तर नाहीच नाही .

भारतीय धर्मविचार मुख्यत: दार्शनिक आहे . दार्शनिक म्हणजे चष्मा - कोणत्या चष्म्यातून जगाकडे पहावे ? मग आपल्याला सत्याचे आकलन होईल ? याचा विचार …. हे वेगवेगळे चष्मे म्हणजे - अद्वैत वेदांत , पूर्वमिमांसा , जैन , सांख्य , बौद्ध , चार्वाक इत्यादी दर्शने - हा भारतीय तत्वविचार / धर्मविचार म्हणून ओळखला जातो .  यातले जैन बौद्ध आणि चार्वाक ह लोक वेद प्रमाण मानत नाहीत म्हणून त्याना नास्तिक म्ह्टले जाते . वेद प्रमाण मानणारा सांख्य योग देव किंवा ईश्वर मानत नाही । तरीही तो सांख्य आस्तिकच म्हटला जातो . म्हणजे संस्कृतातला नास्तिक हा वेदाशी निगडित आहे . देवाशी नाही .आता जे विचार नास्तिक म्हणून ओळखले जातात ते म्हणजे - जैन बौद्ध आणि चार्वाक  ते सर्व एक नव्हेत . त्यात बरेच वाद विवाद आहेत … त्यांनी एकमेकावर भरपूर टिका केली आहे. (श्रमण)  जैन आणि बौद्ध विचार कोणत्या ना कोणत्या अर्थाने पुनर्जन्म मानतो.  इहलोकापेक्षा अधिक महत्व मानवी मन , अध्यात्म , समाधी / निब्बाण याना देतो . चार्वाक मात्र सगळ्याला कोलते . तो शुद्ध इहवादी आहे . चार्वाक ज्या अर्थाने नास्तिक होता . त्या अर्थाने मी नास्तिक आहे . वेदप्रामाण्य तर झुगारले पाहिजेच पण पुनर्जन्म , अध्यात्म निर्वाण वगैरे ला काही अर्थ नाही.  अध्यात्म   निव्वळ टाइम पास आहे … त्या सर्वाचा अभ्यास करून आणि प्रशिक्षण घेऊन मग मी माझे हे मत बनवले आहे .नास्तिकाचे प्रकार 


नास्तिकाचे अनेक उपप्रकार असतात . त्या बाबाबातीत आपली मायमराठी दरिद्री आहे । नास्तिकांच्या उप जातींची नावे फारशी रूढ नाहीत .

सायबाची इंग्रजी भाषा लई भारी आहे . त्यात तीन शब्द आहेत . तिन्ही शब्दांचे अर्थ चढत्या भाजणीने अधिकाधिक वर जातात ,, गुड , बेटर ,,बेस्ट सारखे ..... Agnosticism , Atheism , Anti - theism …… 


  1.  Agnosticism (अज्ञेयवादी ) म्हंजी माहित नाय बुवा देव हाय का नाही ? त्यावर चर्चा करण्यात वेळ फुकट घालवण्यापेक्षा बाकी रग्गड कामे पडली आहेत - ती करुया ! ह्यूम, कांत , रसेल, डार्विन  इत्यादी पाश्चात्य तत्व  विचार यात मोडतील.  पुरातन ग्रीक विचारात येणारा ( Skepticism) साशंकतावाद किंवा आपल्या देशी ऋग्वेदातल्या नासदीय सुक्तातला  प्रश्न वाद हि अज्ञेय वादाची चुलत भावंडे आहेत .  सावरकर स्वत:ला अज्ञेयवादि  म्हणवत असत . अज्ञेयाचे रुद्धद्वार नावाची त्यांची कविता मुळातून वाचण्यासारखी आहे . पंडित जवाहरलाल नेहरुंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तकात नासदीय सूक्त येते . त्याचवर जी गाजलेली सिरियल होती , त्याचे ते टायटल सॉंंग  सृष्टी से पहिले सत नाही था हे नासदीय सूक्ताचे हिंदि गाणे अगदी नोस्टाल्जिया म्हणूनही ऐकायला हरकत नाही . 
  2. Atheism ( नास्तिक ) देव अस्तित्वात नाही. मी त्याला मानणार नाही . पण इतरांनी देव धर्म मानावे किंवा नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे . हा शब्द बराच सैलपणे वापरला जातो . अज्ञेयवादी वा धर्मद्रोही या दोन्ही प्रकारांना हा शब्द वापरतात . हा शब्द बराच पोप्युलर आहे . 
  3. Anti - theism (धर्मद्रोही - देव विरोधी ) " कुस्तिक "  देव नाही आणि तो नाही हे मी लोकशाही मार्गाने  पटवून सांगणार …. देव धर्म हा मानवी मनाचा आजार आहे . मानवतेसाठी तो रोग नष्ट केला पाहिजे . माझ्या मते सर्वच्या सर्व धर्म आणि आय्डुयोलोजि मुळासकट नष्ट केल्याशिवाय आणि देव हि संकल्पना रद्द केल्याशिवाय मानवतेचे कल्याण शक्य नाही . आणि त्यासाठी मी कटिबद्ध आहे . 


नेहरू वा सावरकरांप्रमाणे मी अज्ञेयावादि  नाही . फक्त नास्तिक सुद्धा नाही . आपण मराठीत या तिन्ही प्रजातिंना नास्तिक म्हणतो . नास्तिक हा शब्द पुरेसा नाही … मी नवा शब्द सुचवतो " कुस्तिक " ( Anti-theist ) म्हणजे देवाचा - धर्माचा   विरोधक … मी धर्माशी कोल्हापुरी कुस्ती खेळणारा धर्मद्रोही विद्रोही आणि पाखंडी  ......... " कुस्तिक " ( Anti-theist ) आहे ! आमच्या या कुस्तीतून पुरोगामी / कम्युनिस्ट / नवबौद्ध  आदी नवधर्म सुद्धा सुटलेले नाहीत .


आता आमच्या कुस्तिकाच्या घरात हा तुकारामाचा अवतार जन्माला आहे .श्री राजवीर दिक्षित .  त्यावर मी कधीही धार्मिक संस्कार केले नाहीत. जर काही झाले असतील तर त्यास ख्रिस्मस ला सांताक्लोज वा …… जन्माष्टमीला कृष्ण बनवणे …. आणि सणासुदीला फोटू काढणे इतपत ते संस्कार मर्यादित आहेत. त्याला मज्जा म्हणुन घरात गणपति सुद्धा बसवू दिला आहे . देव धर्म किती नको म्ह्टले तरी सणासुदितुन ते डोकावत राहतात .  त्याला इलाज नाही . आणि निरस , रुक्ष  जगणे मला मान्य नाही . नास्तिकतेचा अर्थ निरसपणा वा रुक्षपणा निश्चित नाही . या सगळ्या आजूबाजूच्या  समाजात जे काही सण उत्सव चालू आहेत त्यापासून फटकून राहणे हि विकृती आहे - माज आहे असे मला वाटते .

त्यात जे पावित्र्य आहे त्याला माझा विरोध आहे . मौज मजेला विरोध करण्याचे काहीच कारण नाही . माणसाने पूर्णार्थाने आणि आनंद घेत जीवन जगावे . मजा करावी  . त्यात सणा  सुदीचा अपवाद करण्याचे काहीच कारण नाही . बुद्ध जयंतीला निळ्या जिलब्या मी हादडल्या आहेत . रमजान चा उपास संपायची  मी वाट पहात असतो रात्री अपरात्री - पुण्याच्या पश्चिम भागात जाउन खरपूस भाजलेला तित्तर पक्षि खाणे वा बड्याचा आस्वाद घेणे हि मला कधी धार्मिक कृत्ये वाटलि  नाहीत . अधार्मिकही वाटत नाहीत .


मुद्दा असा कि आमचा विरोध गायीला नाही . पवित्र गायीला आहे .गोहत्या हा मुद्दा समजून घ्या   . विरोध बुद्धीहत्येला आहे . हा वसा सावरकरांचा .  गायीचे पावित्र्य कत्तलखान्यात मारले पाहिजे . आमच्या येथे सर्व पवित्र होलि काऊ ची घाउक कत्तल करून मिळेल …. आणि त्यावेळी ती पवित्र गाय पुरोगाम्यांचि आहे काय ? कि प्रतिगामी आहे ? याचा विचार केला जाणार नाही ---गायीचा धर्म , गोमातेची जात , बैलोबाचा वंश इत्यादीचा विचार न करता - सर्व पवित्र गायीबद्दल - पवित्र गायीची थेट कत्तल - आमचे हेच तत्व आहे …मात्र सर्वसामान्य कचरा खाणाऱ्या गायीबद्दल गोब्राह्मण प्रतिपालनाचे प्रेमळ आणि वात्सल्यपूर्ण हिंदु (!)  धोरण अवलंबले जाइल ….मागे गोहत्येचा आणि त्यासंबंधि कायद्याचा मुद्दा बराच गाजला होता.

आमची स्पष्ट भूमिका अशी होती - कि सर्व माणसाकडे स्वातंत्र्याचे हक्क आहेत. पशु पेक्षा माणुस थोर आहे . काय पायजेल ते खायाचे हक्क माणसाकडे असले पाहिजेत … पशुकडे नव्हे .  आणि गायीचे थोतांड पुढे करत हिंदु मुस्लिम दंगली करणे हा मुर्खपणा आहे . आमचा नास्तिक खाटिक खाना पवित्र गायीसाठी राखीव असतो - अन्यथा आम्ही गांधी बुद्ध महाविराचे अहिंसक अनुयाई - आम्हास हिंसा नको ---पण विचाराचे पावित्र्य मात्र खाटिक खाण्यात मारले पाहिजे. पावित्र्य मेले आणि -- प्रश्न विचारायला सुरवात झाली कि मानवी बुद्धीची प्रगती  सुरु झालीच समजा …. 
तर आमचा आस्तिक आणि देवभोळा कार्टा …चीरंजिव  राजवीर दीक्षित …  माझी मनीषा अशी कि , शुक्रवार शनिवार च्या रात्री उशिरा संपाव्यात. काहीतरी कळा बडवत लेख लिहावेत । ब्लॉग लिहावेत … हा आमचा छंद … आणि मग रविवारची सकाळ उशिरा उगवावी …  सूर्यवंशि असल्याने । लोळत उशिरापर्यंत बेडवर पडावे . पण आमचे हे सुख आमच्या ह्या गोंडस तुकारामाला बघवत नसावे ! सकाळी सहा वाजता साहेब उठतात . उद्या शाळा आहे का नाही हे आधीच विचारून ठेवतो … मग शाळा असेल तर आठ वाजता रडत उठणारे हे बालक . शनिवारी रविवारी  मात्र सक्काळी सक्काळी सहा वाजता उठते आणि येउन माझ्या पोटावर उड्या मारू लागते .

 बाबा बाबा उठ … आयपेड दे… मग मी झोपेत त्याच्या आयला खुण करून आज्ञेचे पालन करायला सांगतो . शेवटी चिरंजिव  आयपेड  वा कोम्युटर वा काहीतरी सुरु करतात आणि ……त्यावर आयअप्पाची   गाणी  लावतात.   काळी लुंगी घातलेले अजस्त्र देह स्वामी शरणं आयअप्पा । स्वामी शरणं आयअप्पा । असे सुरेल गाणे गात उघडे बाघडे नाचू लागतात . ते काळी लुंगी घातलेले शेकडो अयप्पा भक्तस बघत आमचे कार्टे भक्तिभावाने हात जोडुन उभे राहत असते .

कार्टा दुपारी त्याच्या आजीकडे राहतो . आजीच्या घरासमोर अयप्पाचे मंदिर आहे , तिथे कार्ट्याचा बराच दबदबा असावा . या अयप्पा मंदिराचे ट्रस्टि अगदी गुंड आहेत … येता जाता कधी दिसले - तर ते गुंडा लोक्स मला नमस्कार करून राजवीर ची चौकशी करत असतात … मी आपला भिडेखातर हुं हुं अशी मोघम उत्तरे देतो !


शिवाय कार्ट्याने काही मूर्ती जमा केल्या आहेत . आमच्या एका मित्राने एक बुद्धाची मूर्ती भेट दिली होती. ती सोनेरी रंगाचि आहे . तो कार्ट्याचा मेन देव . कारण दिसतो फार छान - शिवाय सोनेरी रंगाचा !  . मग आवडीचा म्हणजे गणपति . सोंड असलेले हे दैवत प्राणि नसून देव आहे…  हेच कित्ती उत्साहवर्धक आहे . मग त्याला कुठेतरी नेपोलियन चा  लहान पुतळा मिळाला . मी युरोपात फिरायला गेलेलो तेव्हा तो विकत घेतलेला . घोडा आहे त्यात . प्राणिसंग्रहालय आमच्या   बाळास  लैच अट्राक्टिव्ह असावे . तो तिसरा देव म्हणाजे नेपोलियन !

 मग कार्टा पूजा सुरु करतो . मध्ये बुद्ध. एका बाजूला नेपोलियन. दुसर्या बाजूला गणपति . मागे सरस्वती - ती पणतीत आहे … मग उदबत्त्या सुवास … आणि मग मोठ्या मोठ्याने आरत्या … आरत्या मात्र गणपतीच्या ! कारण त्या ऐकून ऐकून पाठ आहेत !

बाळाला निट बोलताहि  येत नाही…  जेव्हढे जमेल तेव्हढे करतो ! बोबड्या आरत्या ऐकताना फार मजा येते ! 

मधेच विठ्ठलाचे नाव घेतो…  दोन्ही हात कंबरेवर ठेवून विठ्ठला प्रमाणे  उभा राहतो … तासान तास …. मागे माझा  पूर्व कम्युनिस्ट बाप घरी आला होता … माझ्याकडे पहात हसून म्हणाला - हा बाळ विठ्ठल नियतीने तुझ्या नास्तिक पणावर  उगवलेला सूड आहे !!

पण ते खरे नाही . कुस्तिक मी आणि माझे आस्तिक कार्टे आम्ही अतिशय प्रेमाने एकत्र राहतो . कोणताही वाद विवाद करता . राजवीर दीक्षित हा जगातला असा एकमेव प्राणि आहे कि … त्याचा आस्तिक पणा मी मान्य केला आहे ! पण त्याबरोबर हेही मान्य केले पाहिजे कि … त्यानेही माझा कुस्तिक पणा मान्य केला आहे . माझा कुस्तिक पणा एडल्ट  आस्तिक मान्य करतील काय ?

मी राजविरला कधीही आस्तिक असण्यापासून रोखत नाही , व्यक्तीचे स्वातंत्र्य हा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे .  आणि तो मुद्दा चार वर्षाच्या राजवीर नावाच्या  व्यक्तीला सुद्धा लागू आहे . 

पण त्या बाळाच्या बुद्धीनुसार त्याच्याही मी या विषयावर चर्चा करतो . 

त्याला मी एकदाच एकच प्रश्न विचारला ;

------------------------------------------------------------
बाबा : राजवीर देव  खरा असतो काय ?
बालक : खरा म्हणजे काय बाबा ?
बाबा :  म्हणजे सुपरम्यान  ब्याट्म्यान स्पायडरम्यान हे काय आहेत ?
बालक : ते खरे नसतात ना ? मोन्स्टर पण खरा नसतो ना ? आई घाबरवायला बोलते ना ?
बाबा : तू निट जेवण केला नाहीस तर मोन्स्टर खरा असतो ! ( हे साहेबास जेवू घालायचे एकमेव टुल आहेय )
बालक : ममाला माहित नाही . कोकोनट मोन्स्टर नसतो … ती सांगते ।   पण खोट बोलते
बाबा : कशावरून ?
बालक : तो मोन्स्टर दिसत नाय ना
बाबा : मग देव कुठे दिसतो
बालक : देव असतो पण आणि नसतो पण।     
बालक : (पुन्हा पॉज  घेऊन) … मला दिसतो …
--------------------------------------------------

आता मात्र हात टेकले . देव असतो पण आणि नसतो पण। राजवीर उवाच हे प्रकरण बराच गूढ होत चालल  होत  …. मग मी विचारले  - देव कुठे दिसतो ? मग बालकाने एका हातात बुद्ध , दुसर्या हातात गणपति आणि बगलेत नेपोलियन मारून आणला ! त्या मुर्त्या कडे पहात मी मग म्ह्टले - हे देव काय कामाचे - बालक म्ह्टले मजा !! मजा असते बाबा !

आता त्याला नमस्कार केला आणि   उचलून पापी घेतली ! त्याने त्या गोंडस तुकारामाने क्षणापुरता तरी एका कुस्तिकाचा पराभव केला होता !

देव भक्त खरेच बोलतात !
 मानवी विकासाच्या पहिल्या टप्प्यात … साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसत … पाउस का पडतो ? वारे का वाहतात ? रात्र का होते ? जे कळत नाही त्यास देवाचे आहे असे म्ह्टले जाते … उनाड वांडा ना वध्णिवर आणायला कदाचित राक्षस आणि सैतानाच्या परिकल्पना आल्या असाव्यात …. धार्मिक लोक आजू विकासाच्या बाल्बुद्धीवर आहेत … त्यांचा द्वेष करू नये .

धर्म - आय्डियोलोजि - विचारधारा त्याबद्दल द्वेष बाळगु नये - पण टिका सडकून करावी . धर्म आणि विचारधाराना कचाट्यात पकडायचे असेल तर बुद्धिवाद हा एकाच मार्ग आपल्यापाशी आहे -  यानंतर आणखी एक मुद्दा चर्चेला घ्यायचा  आहे .

मुद्दा असा कि - जगात ज्या क्या काही वाईट घटना घडतात - दुष्काळ , पूर , प्लेग , जरा , जर्जरा , आणि मानवी हींसेचे कारण काय ?ज्वालामुखी का उपटतात ? माणसे का मरतात ? भुकंप का होतात ?या सगळ्या वाइट घटना घडतात अणि देव बावळटा सारखे बघत बसतात ! देव जर सर्व शक्तिमान असेल तर त्याने असे भवितव्य कसे घडवले ??? देवाने क्वार्टर का बनवली ?

लवकरच येत आहे - देवाने    क्वार्टर का बनवली ? ( नास्तिक पुराण भाग -२ ) 

४ टिप्पण्या:

  1. डॉक्टर, तुम्ही प्रतितयश डॉक्टर आहात मानव किंवा कोणत्याही प्राण्याच शरीर हे केवढ complecated gadget आहे हे मान्य कराल. एवढा perfect job कसा तयार झाला असेल ?, रोज सुर्य उगवतोच आणि एक सेकंद आधी नाही का उशिरा नाही पूर्ण ब्रम्हांड एका लयि मध्ये असते थोडेही इकडे तिकडे होत नाही हि एक बाजू .दुसरी कडे लोक आपत्ती मध्ये मारतात दुखः दारिद्र्य आहे .इसीस मधली किवा आपल्याकडली पण काही 'माणसे ' माणसा सारख वागत नाहीत .देव असेल तर त्याने हे लगेच थांबवले असते हि दुसरी बाजू . तिसरी बाजूही intresting आहे कि देव सर्व धर्म म्हणतात त्या प्रमाणे (जगाचा निर्माता/पालनकर्ता)आहे कि नाही आम्हाला माहित नाही.हा खरच वैज्ञानिक दृष्टीकोन आहे ,कारण खरच कोणाला सत्य माहित नाही .काही योगिक सम्रादायात देव physical entity नसून निर्गुण निराकार म्हणजे पृथ्वी ,अग्नी ,जल ,वायू ,आकाश यांच्या सारख सेकुलर आहे .पाण्यात पोहता येत पाण्यात पडलात मजा घेतली, येत नाही तर बुडणार कारण पाण्याला प्रेम,दया,माया,खुन्नस अशी मानवी मुल्य नाहीत .देव त्यांच्या मते तसाच आहे त्याला मानवी मुल्य नाहीत.विचार करा

    उत्तर द्याहटवा
  2. रोज सुर्य एक सेकंद आधी नाही की ऊशीरा नाही आणि पूर्ण ब्रह्मांड एका लयिमध्ये असते ही वस्तुस्थिती नाही. पंच महाभूतांना गुण आणि आकार दोन्ही आहेत. Perfect job is still in process of evolution. How to prove that god had made it?

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *