२ नोव्हें, २०१४

मोदि विरुद्ध सावरकर

मोदि विरुद्ध सावरकर

भारताचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री नरेंद्र मोदि हे अनेक  अर्थाने आदरास पात्र आहेत. ते उत्तम वक्ते,  श्रेष्ठ जननायक आणि तळमळीचे कार्यकर्ते आहेत . त्यांची देशभक्ती वादातीत आहे. आणि सध्याच्या राजकीय नेत्यांशी तुलना केली तर ते सर्वात  स्वच्छ प्रतिमेचे आणि  सर्वाधिक कार्यक्षम आहेत. कोन्ग्रेस नावाची कुरूप जीर्ण जर्जर  म्हातारी त्यांच्या हस्ते इहलोकातून परलोकात गेली हेही अतिशय वाखाणण्या जोगे आहे .   एक सामान्य माणुस --परिस्थितीशी लढा देत  -- चहावाला ते भारताचा सर्वात लाडका नेता इथपर्यंतचा प्रवास ४० - ५० वर्षात करतो आणि भाजपाला देशाचे सत्ताकेंद्र बनवतो हेही जबरदस्त आहे . प्राप्त राजकीय परिस्थितीचा विचार करता   नरेद्र मोदि आणि  नवे उमदे नेतृत्व तयार करणारी  भाजपा याना पुढची किमान १० - १५ वर्षे तरी  सत्तेचा निरंकुश योग संभवतो आहे . फेमिली बिजनेस सारखे चालणारे इतर राजकीय सरंजामी पक्ष भाजपाच्या वार्यालाही उभे राहू शकत नाहीत हि सत्य परिस्थिती आहे . नरेंद्र मोदींचे सावरकर प्रेमही सर्वश्रुत आहे . त्यांनी सावरकराना अनेकवार  दिलेली मानवंदना सर्वज्ञात आहे .  भारताचे प्रधानमंत्री होण्यास ते प्राप्त परिस्थितीत सर्वाधिक पात्र होते हे सत्य मतदार राजाने अधोरेखित केले आहे . मी स्वत:हि त्याच मताचा आहे . पण सावरकरांच्या फोटोची पूजा केली म्हणजे  त्यांचे विचार मोदिना  मान्य आहेत असा अर्थ निघत नाही . .  आजची  चर्चा नरेंद मोदिना सावरकरांचे हिंदू धर्म विषयक विचार मान्य आहेत का ? मोदींचे धर्मविषयक विचार आहेत तरी काय ? यावर करायची आहे. हि चर्चा अतिशय महत्वाची आहे . कारण मोदींचे हिंदुत्व देशाच्या संरक्षण , परराष्ट्र , शिक्षण आदी महत्व पुर्ण धोरणावर प्रभाव टाकणार आहे .


 अंबानी सायबाच्या पंचतारांकित अत्याधुनिक अलोपाथी  रुग्णालयाच्या उद्घाटनात मोदि  उपस्थित होते . तिथे  प्रधान मंत्र्यांनी स्वत:चे विज्ञान , वैद्यक आणि धर्म विषयक विचार मांडले . असेच विचार त्यांनी निवडणुकीपूर्वी लतादिदींच्या हॉस्पिटलात हि मांडले होते .  गुजरात चे मुख्यमंत्री असताना मांडले होते . अनेकदा  तेच बोलल्यामुळे त्याचे हे मत ठाम आहे हे निश्चित . डोक्टर लोकांसमोर महोदय बोलत होते .  तर मोदींचे म्हणणे आहे कि - (शब्दश: भाषांतर )

१) भारतात पूर्वी वैद्यक शास्त्राची  प्रचंड प्रगती झाली होती .
२) आपण सर्वांनी महाभारतातल्या कर्णा  विषयी वाचले आहे. आपण जर  अजून थोडासा विचार केला तर आपणास उमजून येईल कि - कर्णाचा जन्म मातेच्या उदरात नाही . कर्ण  अयोनिज आहे. याचा खरा अर्थ  असा कि , भारतात त्या काळी जेनेटिक सायन्स अस्तित्वात होते.
३) आपण गणपतीची पूजा करतो . त्याकाळी नक्कीच कोण्यातरी प्लास्टिक सर्जन ने हत्तीचे मुंडके मानवी धडाला जोडले असणार .आणि  त्यावेळीच प्लेस्टिक सर्जरीची सुरवात झाली  .

http://www.theguardian.com/world/2014/oct/28/indian-prime-minister-genetic-science-existed-ancient-times


या सर्व छद्म विज्ञानाचे खंडन आठवीतला विद्यार्थी हि करेल . मातेच्या उदाराबाहेर जन्म घेण्यासाठी जेनेटिक सायन्स लागत नाही . सेरोगासी पुरते . बर कर्ण  हा अयोनिज होता ह्याला महाभारतात पक्का आधार आहे का ? हे असे जिवंत गणपति बनवायची प्लास्टिक सर्जरी अंबानी   रुग्णालयात नव्याने सुरु होणार का ? मग शेकड्यांनी गणपति बनवणार का ? असे अनेक मजेदार प्रश्न विचारता येतील .

मुद्दा वेगळा आहे . आमच्या पुराणात , वेदात आणि श्रुती स्मृतीत अत्याधुनिक सर्व ज्ञान सामावले आहे . धर्मशास्त्रे आणि भारताची पुरातन संस्कृती ह्यातच ज्ञानाचे मर्म आहे असे जर प्रधान मंत्र्यांचे मत असेल तर … भारताची प्रगतीविषयक धोरणे श्रुती स्मृती पुराणाना अनुसरून बनवली जाणार का ? त्यांची च्छाप भारताच्या संरक्षण , परराष्ट्र , शिक्षण आदी महत्व पुर्ण धोरणावर प्रभाव टाकणार का ? खरा मुद्दा हा आहे . प्रधान मंत्री मोदी  सावरकराना वारंवार मानवंदना देत असल्याने सावरकरांचे धर्मविषयक विचार काय होते ? हे जाणुन घेणे उचित ठरेल .सावरकरांचे दोन लेख 

अधिक खोलात न जाता सावरकरांच्या दोनच लेखांचा थोडक्यात सारंश आपण पाहू . २००१ साली प्रकाशित झालेल्या समग्र सावरकर वाड्:मयाच्या पाचव्या खंडातल्या १९८ व्या पानावर  सावरकरांचा एक विनोदी  लेख आहे . त्याचे नाव काशितली दोन सम्मेलने : माकड महासंमेलन आणि भाकड महासंमेलन .  काशी नगरीस ज्ञानवापी असेही म्हणण्याचा प्रघात आहे . तर काशीला ब्राह्मणांचे एक संम्मेलन   भरले होते . श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म आज लागू आहे काय ? या विषयाचा निवाडा लावण्यासाठी हे आयोजन होते .  त्याचवेळी सावरकरांनी हा लेख लिहिला आहे .  तात्याराव सावरकरांनी आपले एक "" मनकवडे ""  नावाचे काल्पनिक वार्ताहार काशीच्या ज्ञानवापिस पाठवले.……  तर श्री मनकवडेना दोन संमेलने दिसली --- पहिले संमेलन माकडांचे होते . काशीस पूर्वी माकडे मुक्त संचार करत . अद्वातद्वा उड्या  मारीत शेपटीने झाडास लोंबकाळित --  भू:भु:क्कार करीत माकडांचे दिवस सुखात चालले होते . मग एके दिवशी काशीच्या ज्ञानवापीत वीज आली. विजेच्या ताराही आल्या . विजेच्या ताराना  शेपटी लागल्यावर विजेचे झटके  आणि चटके बसू लागले. मग माकड महासंमेलनात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला . कि विजेच्या ताराना शेपटीने लटकावे का ? काही माकडे म्हणाली " छट्ट  हा प्रश्नच गैरलागू आहे . विजेच्या तारा नावाचा काही पदार्थ असता तर आपल्या त्रिकालदर्शी पूर्वजांनी माकड-स्मृतीत तसे लिहिले नसते काय ? ज्या अर्थी माकडस्मृतीत वीज नाही तर ती आताही अस्तित्वात असू शकत नाही.  शेवटी बराच गिचगीचाट झाला. माकडी भाषेतल्या दुरगम्य चर्चेतून असे निष्पन्न झाले कि - परिस्थिती बदलली आहे तेव्हा माकड स्मृतीत बदल केला पाहिजे……………………… त्याच वेळी अज्ञान वापिस ब्राह्मणाचे दुसरे संमेलन भरले होते त्याचा निष्कर्ष आला कि परिस्थिती हा शब्दच धर्म बाह्य आहे . अधम धर्म विरोधी आहे . शुद्ध संस्कृत भाषेत ओरडत… गिल्ला करत …  असा ठराव पास झाला कि परिस्थितीचा पालट विचारात घेणे हा धर्मद्रोह आहे . पाखंड आहे …………… लेखाचा समारोप करताना सावरकर लिहितात " या ब्राह्मण संमेलनातील ठरावामुळे डार्विनच्या उत्क्रांतीवादास मोठाच धक्का बसला . प्राप्त परिस्थितीत माकडाचा विकास होऊन माणुस झाला…. यापेक्षा माणसाचा विकास होऊन माकडे निर्माण झाली हेच मान्य करणे क्रमप्राप्त आहे. अज्ञान वापितले पंडित धर्म संमेलन हेच दर्शवते !"  यावार अधिक भाष्य न करता आपण सावरकरांचे त्यांच्या दुसर्या लेखातले शब्द जसेच्या तसे पाहू . लेखाचे नाव आहे : दोन शब्दात दोन संस्कृती .


दोन शब्दात दोन संस्कृती . - 

तो युरोप प्रत्यही अधिक काही शिकून अधिक शहाणा होत आहे . बापाहून शहाणा निघालोच कि नाही ? म्हणुन हुन्कारात आहे . बापाला जे कळत नव्हते ते शिकलो । तर बापाचे बापपण काय उरले? ... हि आमची भीती !
हिंदूसंस्कृतीचे महासूत्र म्हणजे स्मृतीश्रुती पुराणोक्त हेच होय ! आजच्या युरोपियन संस्कृतीचे ' अद्यायावत '.... त्याच्या अगदी उलट ! ते पूजक " आज" चे  आम्ही "काल" चे । ते "ताज्या" चे भोक्ते आम्ही "शिळ्या" चे ! एकुण पाहता युरोपियन संस्कृती "अद्यतन"  आमची "पुरातन"  !
तो धर्मग्रंथ पाच हजार वर्षापूर्वीचा धरला तरीही पाच हजार वर्ष मागासलेला ! जग पाच हजार वर्ष पुढे गेलेले .....परतू अजूनही आजचे विज्ञान न शिकता .....पाच हजार वर्षापुर्वीच्या शहाण्पणाहुन - अधिक शहाणे व्हायचेच नाही असे आम्ही ठरवून बसलो आहोत .
प्रकृती आणि काळ हि असा.... त्या स्वत:स अपरिवर्तनीय आणि त्रिकाल बाधित समजणार्या धर्मग्रंथांच्या ताडपत्रांचा चुराडा उडवीत …सारखा स्वच्छंद धिंगाणा घालीत असता .......त्या ग्रंथांच्या शेवटच्या अक्षरापलिकडे पाउल टाकायचेच नाही …. असा मूर्ख हट्ट धरणार्या लोकांची संस्कृती त्या त्या धर्म ग्रंथाच्या..... प्राचीन मागास संस्कृतीपेक्षा कधीही अधिक विकासु शकणार नाही ..... हे वेगळे सांगायला नको !
- विनायक दामोदर सावरकर (दोन शब्दात दोन संस्कृती ) समग्र सावरकर वाड्:मय 2001 (6:65)सावरकर विरुद्ध मोदि 

भारताचे प्रधानमंत्री मा नरेंद्र मोदि यांनी कर्णाचा जन्म हे प्राचीन भारतातले जेनेटिक सायन्स आहे आणि गणपतीची कथा हे प्लास्टिक सर्जरीचे उदाहरण आहे असा शोध लावलेला आहे .वेदात आगगाड्या महाभारतात अणुबोम्ब आणि रामायणात पुष्पक विमान शोधणार्याचि काहीही कमी या देशात नाही. आपल्याकडे धर्मग्रंथ, शास्त्रे, पुराणे इतकी मुबलक आहेत, शिवाय अतिशय मोघम मसुद्याची आहेत. त्यामुळे रूपक, दृष्टांत, प्रतिमा असल्या भाषिक संकल्पना ताणून, तुम्ही त्यात शोधायचे म्हटले तर काहीही शोधू शकता !हे पहा विमाने आभाळातुन पडत नाहीत … स्क्रू बनवायच्या टेक्नोलोंजि पासून मेटालर्जि पर्यंत आणि एरोडायनामिक्स च्या किचकट गणितापासून ते इंधनाच्या शोधापार्यंत बहुशाखीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती व्हावी लागते । आता हि सारी प्रगती रामायण काळी होती आणि वल्कले आणि धनुष्य बाण हि फक्त फेशन होती असे कोणाला  वाटत असेल तर ठीकच ! मुद्दा असा कि सर्व शाखीय विज्ञानाची प्रगती हातात हात घालून आणि " कालानुरूप " होत असते. 


कालानुरूप प्रगती 

 गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर मनुष्याची झालेली प्रगतीच दिसून येते. हाच नियम गेल्या दहा शंभर आणी हजार वर्षालाही लागू पडतो. मनुष्य आपल्या ज्ञानाचा संग्रह करतो आणि तो पुढच्या पिढीला देतो. हे ज्ञान पाठांतरित, मुद्रित किंवा किंवा कशाही स्वरूपात पुढच्या पिढीला देता येते. त्यामुळे आज्यापेक्षा नातवाकडे जास्त ज्ञान असते. नातू जेंव्हा आजा होतो तेंव्हा त्यालाही हा नियम लागू होतो. हल्लीची पिढी एकदम चुकार म्हणत बोटे मोडणे सोपे आहे - पण पूर्वीच्या पिढीतहि असेच म्ह्टले जायचे हे एकदम सत्य आहे . खरी गोष्ट अशी आहे की - बापाचे ऐकायचे असे आपण ठरवले असते तर आपण आजही गुहेत राहत असतो.. लहान मुल जन्मते, रांगते, उभे राहते, चालते, धावते त्याची प्रगती होते हा निसर्गनीयम आहे. त्याचप्रमाणे पुढच्या पिढीकडे आपण ज्ञान संक्रमित करत जातो आणी पुढ्च्या पिढ्यांची प्रगती होते हाही निसर्गनियम आहे. वेदात आगगाड्या शोधणे किंवा गणपतीच्या पुराण कथेत प्लास्टिक सर्जरी शोधणे । हे चातुर्य आहे पण विज्ञान निष्ठ दृष्टीकोन नव्हे … अशा छद्म विद्न्यानामुळे प्रगतीला कोणताही हातभार लागत नाही पण एक अत्यंत चुकीचा प्रतिगामी संदेश समाजात जातो ।


खरी चिंता हिंदुंच्या  भविष्याची 

रिलिजन पासून रिसन पर्यंत आपण जाणार आहोत काय ? जय विज्ञान नाही….  तर जय  विज्ञाननिष्ठा म्हणणार आहोत काय ?  विज्ञाननिष्ठा हि आर्टस ची संकल्पना आहे . विज्ञान शाखेतली प्रगती म्हणजे विज्ञान निष्ठा नाही . मंगळावर रोकेट  सोडणे आपल्या देशासाठी  निश्चित अभिमानास्पद आहे . हि झाली विज्ञान क्षेत्रातलि प्रगती . विज्ञाननिष्ठा हे वेगळे प्रकरण आहे . इस्रो च्या शास्त्रज्ञांनी रोकेट  सोडण्या आधी बालाजीला केलेल्या नवसाची चिकित्सा विज्ञाननिष्ठा करेल. विज्ञाननिष्ठा कार्यकारण भाव समजून घेण्याचे तंत्र आहे. मागे अमेरिकेतल्या एका पेपरात भारताच्या मंगळ  मोहिमेचा अपमान करणारे एक कार्टुन प्रसिद्ध झाले होते . न्यू योर्क टाइम्स ने छापलेले हे चित्र अपमानास्पद होते भारत नावाचा शेतकरी देश इलिट उच्चभ्रू च्या दारात गाय घेऊन उभा आहे त्या गावनढळाला  विज्ञान प्रवणतेत इलिट व्हायचे आहे म्हणुन आपली खिल्ली अमेरिकन वृत्तपत्राने उडवली होती .  
हि खिल्ली खोटी होती . आपण वैद्न्यानिक प्रगतीत पाश्च्यात्यांच्या तोडीस तोड आहोत . पुढे अमेरिकन नासाचे एक यान हवेतच फुटले आणि "द हिंदू " नावाच्या वृत्तपत्राने नवे कार्टुन प्रकाशित करून अमेरिकेचा सूड घेतला . विज्ञान तंत्रज्ञानात  प्रगती करणे आवश्यक आहे . आणि असा विकास मोदींच्या नेतृत्वातला भारत करेल यावर माझा प्रगाढ विश्वास आहे. माझा मुद्दा विज्ञान निष्ठेचा आहे.


विज्ञाननिष्ठा हा तर्काचा प्रांत आहे . बुद्धिवाद हे विचारसरणीचे नाव आहे . पाकिस्तानी हुकुमशहांकडे अण्वस्त्रे आहेत. विज्ञान तंत्रज्ञान आहे पण विज्ञान निष्ठा नाही . पाकिस्तानातले  कायदे अजूनही शरियत नावाच्या विकृत आणि पुरातन इस्लामी धार्मिक  विचारावर आधारित  आहेत . आपल्याला काय हवे आहे ? पाकिस्तान ?? विज्ञान कि विज्ञान निष्ठा ? हे आपणच ठरवायचे आहे . पुराणातली प्लास्टिक सर्जरी , कर्णाचे जेनेटिक सायन्स आणि वेदातल्या आगगाड्या - विमाने वगैरे धार्मिक मुलतत्व-वादाची पहिली चाहूल आहे. वेद हे पाच हजार वर्ष जुने ग्रंथ असतील तर ते पाच हजार वर्षे मागासलेले ग्रंथ आहेत असे सावरकरांचे स्पष्ट मत होते.  याबाबतीत तरी मोदींचे विचार सावरकरांशी जुळत नाहीत . या हिंदुच्या  धार्मिक अन्वयार्थ बाबतीत   " मोदि  विरुद्ध सावरकर "  असाच सामना आहे.  पण अजूनही आशेला वाव आहे. 

विज्ञान निष्ठा या बाबतीत इल्ला असला तरी संविधान आणि सेक्युलारीझम चा अर्थ मोदि उत्तम पणे जाणतात . भारताचे संविधान न्यायी असल्यानेच एक चहावाला प्रधान मंत्री होऊ शकतो असे वक्तव्य मोदिनी केले होते . आणि शपथे समयीच संविधानाचे गुणगान केले होते . "देवालय से पहले शौचालय" हि त्यांची वास्तव वादि आणि  आवश्यक भूमिकाही गाजली होती . निदान सामजिक न्याय हा  धर्मशास्त्रात नाही --  तो संविधानात आहे याचे भान मोदिना आहे. संविधानाचा उच्चरवाने गौरव करणारे ते पहिले स्वयंसेवक आहेत . धर्माच्या चिखलात न पडता ते  " विज्ञान निष्ठा" स्वीकारतील अशी अशा करुया . पुढची १५ वर्षे एखादा बुद्धिमान बुद्धिवादी एव्हढेच करू शकतो !


२ टिप्पण्या:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *