१२ ऑग, २०१४

आव्हाडांचा सर्व धर्म समभाव - साहेबांचे नवे धोरण !

 .

पक्षाच्या नेत्यांच्या विविध कृत्यातून त्या पक्षाचे धोरण व्यक्त होत असते . साहेबांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाढ यांच्या दोन धर्म विषयक भूमिका इथे चर्चेला घ्यायच्या आहेत .  पहिली दही हंडी ची हिंदू भूमिका आणि दुसरी गाजा पट्टितले मुस्लिम बचाव हि भूमिका

१) दही हंडी 


 दही  हंडीत लहान मुलांचा मृत्यू झाल्याने कोर्टाने दही हंडीच्या थरावर आणि लहान मुलांच्या सहभागावर  निर्बंध आणले. त्यावर आव्हाढ चांगलेच संतापले      . संतापून त्यांनी फेसबुक पेजवर एक फोटो टाकला त्यावर लिहिले : - "आज माझ्याच नाहीत तर स्वर्गात हि अश्रुधारा वाहत असतील " . असे स्वत:चे कोटेशनहि आहे. (स्वर्गात !) राम , कृष्ण आणि शंकर घळा घळा रडताना दाखवले आहेत.  पुढे मुलाखतीत एक हिंदुत्व वादि  पुस्ती जोडत , .  " स्वत:ला हिंदुत्त्ववादी म्हणवणारे आता मात्र हिंदूंच्या सणाच्या बाजून उभे राहत नाहीत, हे दुर्दैवी असल्याचं "  बिनतोड सेक्युलर विधान आव्हाड साहेबान केलेलं आहे .

दही हंडी हा एक चांगला खेळ आहे आणि आधुनिक उपकरणांनी काळजी घेऊन तो खेळला गेल्यास कोणाचाच आक्षेप असणार नाही ।

लाखो रुपयांच्या हंड्या , मंडळांचे  धनाढ्य दादा, अनेक  बेरोजगार कार्यकर्ते  क्षणिक प्रसिद्धीसाठी लहान पोराला त्यात उतरवणारे आई बाप याला चाप कोणी लावायचा ?बरे ते सर्व सोडून दिले तरी (स्वर्गातले !) देव  रडतानाचे  फोटो बीटो  टाकून  आणि हिंदुंच्या धर्म भावनाना हात घालून राजकारण करणे चूक आहे . हि तर फुल टू  सनातन प्रभात स्टाइल झाली . श्रद्धाळू माणसाच्या भावना काशाने हि   भडकू शकतात . यात अव्हाडांचे  मोठे हिंदू धर्म प्रेम आहे असा आरोप तर त्यांचे विरोधकही करणार नाहीत …. शिवसेनेच्या आमदारांनी न्यायालयीन आदेश पाळतो म्हटल्यावर   त्यांवर राजकीय कडी करण्यासाठी आव्हाडांनी हि धार्मिक काडी टाकलेली आहे.

अशा धार्मिक काड्या उत्सवाच्या बेभान (स्पिरिटमय ) जोशात दंगलिच्या वणव्याना  निमंत्रण देऊ शकत नाहीत काय ? लाउडस्पिकर्च्या वेळेवरुन पुण्यात गणपतीत दंगल झालेली आहे .  सांगलीत  गणेशोत्सवात दंगल पेटवण्यात कोणते "सेक्युलर  हात" होते याची चविष्ट चर्चा  पुढारितुन आणि सकाळ मधून भरपूर घडली आहे  . अटक झालेला सूत्रधार साहेबांच्या पक्षाच्या  वरिष्ठ नेत्याचा उजवा हात होता . बर. असो .

निवडणुकीच्या तोंडावर केलेला  - - धार्मिक भावना दुखवण्याचा - -  हा झाला हिंदू कांगावा… पण गोष्ट इथे संपत नाही ….२)  गाजा पट्टीतली  माणुसकी 


येथे आव्हाड साहेबांचा गाजा वाचावा पेलेस्टिन वाचवा वगैरे लिहिलेला टी  शर्ट घालून काढलेला ऐटबाज कुर्रेबाज हसतमुख फ़ोटो वृत्तपत्रातून झळकला होता.  आव्हाड साहेब बाल पणापासूनच 'गोविंदा ' असल्याने त्यांचे दही हंडी बद्दलचे प्रेम समजू शकतो. गाजा पट्टीच्या य:कश्चित टी  शर्ट चा स्वाभिमान   साहेबांना का बरे वाटला असावा ? माझ्या माहितीनुसार गाजा पट्टी ठाण्यात येत नाही . आणि महाराष्ट्राच्या आमदाराचा भारताच्या परराष्ट्र धोरणाशी काहीसुद्धा संबध नाही . अरेरे हा मानवतेचा पुळका तर नव्हे ?

पृथ्वीवरील सर्व मानवावर प्रेम करणे हा तर  साक्षात मानवधर्म ! पण हाच पुळका काही अक्षाने  सरकला असता तर इसीस चे अत्याचारही दिसले असते . इसीस नावाची सुन्नी मुस्लिम संघटना इराक मध्ये सध्या  शिया मुस्लिमांचे हत्या कांड घडवत आहे . ज्यू लोकांनी घडवलेल्या पेलेस्टिनि हत्याकाण्डा एव्हढेच क्रूर हत्याकांड  ! पण आव्हाड  साहेब शिया मुस्लीमावर फारशी माणुसकी दाखवत नसावेत …।

इसीस हि संघटना इस्लाम धर्म वादि  असल्याने त्याचा निषेध केल्यास कदाचित स्वर्गातला अल्ला रडला असता . त्याचे रडके फ़ोटो टाकणे मौलविना मंजूर नसल्याने साहेबांनी सिलेक्टिव्ह माणुसकी दाखवत फकस्त ज्युनचा निषेध केला ! आव्हाढां च्या  मतदार संघात सुन्नी मुस्लिमच असून शिया  मुस्लिम फारच कमी संखेने आहेत …  हा केवळ योगायोग समजावा !
पण खरा मुद्दा याहून गंभीर आहे .  भारतातले मुस्लिम राजकारण स्थानिक मुस्लिमाना शून्य किंमत देत अंतर राष्ट्रीय प्रश्नात रस घेत बसते . याला पेन इस्लामचे राजकारण म्हणतात .   जमाते इस्लामी सारख्या संघटनांनी  ९ तारखेपासून भारतातून इस्त्राइल अमेरिका चाले जाव असे आंदोलन छेडले आहे . जमाते इस्लामीची ध्येये  त्यांनी उघडपणे अनेकवार मांडली  आहेत . त्याना भारातावर  शरिया कायद्याचे इस्लामी राज्य आणायचे आहे . त्यांच्या पेलेस्टाइन प्रेमात माणुसकीचा अंश नाही . ज्यू द्वेषाचा धार्मिक  दंश आहे .
नेमक्या त्याच मुहूर्तावर सेव्ह गांजाची माणुसकी उफाळून आली आहे . भारतीय मुस्लिम समाजाचे वास्तव भीषण आहे . गरिबी - सामजिक प्रश्न याकडे दुर्लक्ष करत आंतराष्ट्रीय प्रश्नावर धार्मिक आंदोलने करणारे या समाजाला कोठे घेऊन जाणार आहेत ? म्यानमारी बौद्धांच्या विरुद्धच्या आंदोलनात भारतात दंगली घडल्या होत्या .  आझाद मैदानात हैदोस झाला होता . त्याआधी महिनाभर इण्टनेट्वरुन विकृत चित्रे प्रसिद्ध करून भावना भडकावल्या जात होत्या . गाजाबाबत नेमक तसेच कार्य सध्या चालू आहे .

आधी आव्हाढ साहेबाची माणुसकी मुस्लीमाताल्या सुन्नी या एकाच जातीपुरती मर्यादित … त्यातही ती शर्ट्चा मुहूर्त पर्फ़ेक्ट साधलेला आहे . जमाते इस्लामीच्या आंदोलनाशी तारीख जुळून आलेली आहे हा हि निव्वळ योगायोगच आहे !


सर्व धर्मातला गाळीव मुर्खपणा एकत्र करून त्याला समर्थन देणे हेच साहेबांचे नवे धोरण असावे . पण अशा  धोरणामुळे भारत अराजकाच्या उंबरठया वर उभा आहे . 

                                                                                                                                                                                                                  


हिदुत्वाचे तर्कट आणि सेक्युलर मर्कट 


मुस्लिमाना लाउड्स्पिकर मग … आमची पण महा आरती अशा   विवादातून हिंदुत्व वादि  राजकारण फोफावले … ते जर चिखलात खेळतात तर  मग आम्ही काय पाप केलय ? आम्ही पण खेळणार !
त्याना चिखलात खेळल्याबद्दल मुका आणि आम्हाला मार काय म्हणुन ?
आम्हालाहि राजकीय मुका हवा !
अशी एकंदर पोप्युलर उजवी भूमिका आहे .  गटारात खेळल्याबद्दल मुके होऊन प्रगती होत नाही अधोगती होते . मुस्लिम बांधवाना पेन इस्लामच्या दरिद्री राजकारणातून बाहेर काढुया … त्यासाठी त्याना हात देऊया अशी भूमिका   लोकप्रिय नाही . जर त्यांच्या धर्माचे राजकारण होत असेल  तर मग आमच्या का नाही ? त्याना हज हाउस मग आम्हाला वारकरी भवन …

तर मग हिंदू बांधव हो चिखलात खेळणे हा आपला सनातन जन्मसिद्ध अधिकार आहे असे ते तर्कट आहे .

त्यावर उपाय म्हणुन सर्वच धर्माचे लांगुलचालन केले जाइल । कोणत्याच धर्मात सुधारणाना वाव देणार नाही । असे सेक्युलर मर्कट डोके वर काढु लागले आहे . आज देशाला धर्माचे मर्कट नको . खरे सेक्युलर तर्कट हवे आहे.

                                                                                                                                                                                                                       काय आहे सेक्युलारिजम ? त्याचा घटनेतला अर्थ काय ?  


सेक्युलारिजम आणी सर्वधर्म समभाव हा विषय प्रत्येकाने चघळला. आणी प्रचंड घोळ घातला. सभ्य स्त्री - पुरुष हो - आपल्या राज्यघटनेत सर्वधर्मसमभाव नाही. धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य ही घटनेत नाही.  घटनेत सेक्यूलारिझम आहे. सर्वधर्मसमभाव आणी सेक्युलारिझम या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत. सर्वधर्म समभाव. सर्व धर्म सारखेच आहेत. त्यांची शिकवण एकच आहे. सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छती -  ही हिंदुधर्माची शिकवण आहे. संविधानातला कायदा न्हवे ! उलट धर्मपालनाचे कोणतेच हक्क संविधान देत नाही. 

तुम्ही सगळे प्रेमात पडायच्या वयाचे आहात. कारण प्रेमात पडायचं वय कधीही संपत नाही   आणी कुणाच्यातरी प्रेमात पण असणार. जो - जी नसेल त्यान कार्यक्रम संपल्यावर मला येऊन भेटावं. शनिवारवाड्यावर जाहिर सत्कार करण्यात यील. असो ..समजा तुम्ही ट्रेन नी कुठेतरी प्रवास करत आहात. समोर एक अप्सरा बसली आहे. यौवन बिजली.. पाहून थिजली.. इंद्रसभा भवताली. अप्सरा दिसली. तुम्ही मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करत आहात. असे प्रेम करण्याचे स्वातंत्र्य ती अप्सरा तुम्हाला अवश्य दील. पणमनातल्या मनात. मांडे खा. पण मनातल्या मनात. तिला ट्रेनमधे डोळा मारला ; की काय खायच ? सँडल !

भारताच्या राज्यघतनेत सेक्युलारिझम आहे. म्हणजे इहवाद आहे. कुठल्याही धर्मावर तुम्ही श्रद्धा ठेवू शकता. प्रेम करू शकता पण कसं ? मनातल्या मनात ! तुम्ही म्हणाल आमच्या धर्मात अस्प्रुश्यता आहे. आम्ही ती पाळणार... मग काय खायचं ? सँडल. 

तुम्ही म्हणाल आमच्या कुराणात लिहिलिय . मूर्त्या फोडा. काफरांविरुद्ध जिहाद करा. म्हणा की. पण. मनातल्या मनात म्हणायच. खरोखर कुणी जिहाद करू लागला- तर काय खायच ? ....सँडल. 
धर्माच्या चिकित्सेत संविधान शिरत नाही. पण २५ व्या कलमात बजावून सांगतं - धर्म पाळायचा पण मनातल्या मनात. इहलोकात कसं जगायच ? ते कायदा ठरवेल. लग्नाच वय किती असावं ? कायदा ठरवेल धर्म नाही. 


सर्व धर्म चांगले आहेत ते जवळ घ्या म्हणजे सर्वधर्म समभाव. शासकीय निर्णयातून धर्म वगळा. धर्म दूर ठेवा म्हणजे सेक्यूलारिझम. म्हणजे च इहवाद. हा सेक्युलारिझम आपल्या संविधानाचा पाया आहे. 

                                                                                                                                                                                                                  


 या देशात जी धर्मनिरपेक्षता आहे ती  मुस्लिमाच्या फायद्यासाठी नाही   नाही . या देशात एकही मुस्लिम नसता तरी हा देश धर्म निरपेक्षच राहिला असता . सेक्युलरीझम म्हणजे शासन आधुनिक राहील . शासकीय निर्णय न्याय , नीती , आचरण इत्यादी आधुनीक  चष्म्यातून घेतले जातील .  दही हंडीचे किती थर रचावेत ? किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही . सर्व हक्क शासनाकडे आहेत . 


देशातला सेक्युलारीझम हा सर्व धर्माच्या सुधारणेसाठी आहे । आणि ज्या धर्माचा समाज या सुधारणेच्या सुवर्ण संधीचा फायदा घेणार नाही … तो चिखलातच  मागास आणि दरिद्री राहणार  आहे … पण हे कोणि बोलायचे  ?  


साहेबांचे नवे धोरण सर्व धर्म लांगुलचालानाचे असल्याने दाभोलकरांचे   मारेकरी सापडणार नाहीत आणि मुस्लिम स्त्रीयांना पोटगीचा न्यायही मिळणार नाही … बाकी सर्व धर्मातल्या गाळीव मुर्खपाणाचे कौतुक महाराष्ट्रात चालूच राहणार आहे . 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------४ टिप्पण्या:

  1. डॉ. अभिराम दिक्षित साहेब,
    परखड आणि अप्रतिम लेख !

    उत्तर द्याहटवा
  2. छान लेख, परखड लेख....... सणांची एक आधुनिक व्याख्या ----- दही हंडी म्हणजे वेड्यांचे इस्पितळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ठाण्यातील रस्त्यावरील " सांस्कृतिक संघर्ष" ......

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *