५ डिसें, २०१३

आम्ही माडिया : अद्भुत , थरारक तरी वास्तव

    पुस्तक परिक्षण : आम्ही माडिया : अद्भुत , थरारक तरी वास्तव .


लेखक : एम डी रामटेके

या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशनाच्या जागेवर हातोहात खपली होती. सध्याचा नक्षल ग्रस्त जिल्हा गडचिरोली , तालुका भामरागड ; गाव कुडकेल्लि - डुकराच्या आणि रानटी अस्वलांच्या शिकारी करत, मोहाची दारू गाळत आणि आदिवासी नाच करत   एक मुलगा शिकत जातो…  पुढे पदवीधर होऊन पुण्याच्या कार्प्रेट जगतात नोकरीला लागतो . तो मधुकर रामटेके हा या पुस्तकाचा तरुण लेखक. ब्लोगलेखक म्हणुन नेटकरांना ते परिचित आहेत . पण त्यांच्या ब्लोग वर सहसा न आढळणार्या मिस्किल , वर्णनात्मक , खुसखुशीत तरी संवेदनशील अशा शैलीने हे पुस्तक वाचनीय बनले आहे.

पुस्तकाची सुरवातच शिकारीच्या प्रसंगाने होते .  दुष्काळ पडला आहे . पोटासाठी हाल सुरु . आदिवासींच्या देवीने पाउस पाडावा म्हणुन तिला नैवेद्य दाखवायचा आहे . शिकारीचा . तिला एकट्या दुकट्याने केलेली शिकार अजाबात चालत नाही . अक्खा गाव जमतो . तीर कामठे , भाले , कुर्हाडी , दोर्या, जाळी । बायकापोरे , अबालवृद्ध सारे सज्ज … शिकारीचा प्लान बनतोय . जाळी  कुठं लावायची , हाकारे देत प्राणि हाकलत आवाज करत गर्दी पुढे सरकतीय. भाल्याच्या टप्प्यात सावज घ्यायला जाळिजवळ  दबा धरला गेला आहे … देवीला नैवेद्य मिळणार का ? कि बिनधार्मिक उपासाचा भोग तसाच चालू रहाणार ?
पुस्तकात जागोजाग शिकारीच्या प्रसंगांची रेलचेल आहे .

 अस्वल हा प्राणि सायकिक आणि चक्रम असतो .  केवळ मजेखातर तो माणसाला  हाल हाल करून मारू शकतो .   एका मुक्या नावाड्याला रानटी अस्वल अस्वल भिडते . त्याला पळुन जाता येत नाही , लपण्यासाठी झाडावर चढायला वेळ नाही . मुका नावाडी ओरडून हाळी देऊन कोणाला मदतीलाहि बोलावू शकत नाही . मुका पटकन एका झाडामागे लपतो. चक्रम अस्वल दुसर्या बाजूने झाडाला मिठी मारतो….  मुका नावाडी  झटकन रानटी अस्वलाची दोन्ही मनगटे पकडतो. आणि विरुद्ध बाजूने दणक्यात जोर लावून अस्वलाचे थोबाड झाडाच्या बुंध्यावर आदळतो. पुन : पुन्हा .  अनेकदा . अस्वलाच्या  एका शिकारीची हि एक गोष्ट . अशा अनेक शिकारकथा ह्या पुस्तकात आहेत . स्वत: लेखकाच्या  जिवावर बेतलेल्या हि अनेक शिकारी आहेत .
पण केवळ चक्रमपणा म्हणुन हत्या करणारे अस्वल आणि पोटासाठी शिकार करणारे आदिवासी ह्यात फरक आहे .   पोटासाठी        वणवण अशा नावाचे दुसरे प्रकरण पुस्तकात आहे. भात , कोवळा  बांबू, लाल मुंग्याची चटणी आणि मिळाले तर मासे हा रोजचा आहार . पावसाळ्यात पुर आणि दर दोन वर्षाआड कोरडा दुष्काळ . अस्वलाचे थोबाड  फोडण्याचा जीगरा आणि ताकद आपोआप येत नाही … अन्नासाठीचे कष्ट हातभार लावतातच पण दुबळ्यांना निसर्ग लहानपणीच मारून टाकतो . उरतात ती चिवट माणस …  बालमृत्यू . लेखकाच्या अप्तजनांचे मृत्यू घडतात त्याचेही वर्णन किंचित तटस्थपणे येते .

पण लेखकाची माणुसकी आणि संवेदनशीलाता पुन: पुन्हा प्रत्ययाला येत राहते. आदिवासी कुटुंबांचे चाली रीतिंचे ओघवते वर्णन पुस्तकात येत राहते.  तिथे लग्ना आधी शरीर संबंध ठेवणे शिष्ट संमत  आहे.  तरुण मुला मुलिंना समूहनृत्याची जरा मोकळिक मिळावी आणि नंतर " रानात"  जाता यावे . म्हणुन लवकर निघून जाणारे ( अमेरिकन प्रागतिक ! ) आई बाप आहेत. घरी आलेल्या पाहुण्याला आदराने मोहाची दारू ऑफर करणारे यजमान आहेत .  तशा आदिवासींच्या श्रद्धा अंधश्रद्धा देखील आहेत .  हे पुस्तक वाचकाला आदिवासी सण वार उत्सव , त्यांच्या दंतकथा , जलपर्या , मत्स्य कन्या , सर्प कन्या , ड्रेकुला - व्हेंपायर प्रमाणे वाघाची मुंडकी (मधून - मधून ) धारण करणारे रक्तपिपासू मानव … वगैरेच्या जादुई हरी पाटिल दुनियेत घेऊन जाते …. पण वास्तवात  कोणालातरी असा ड्रेक्युला ठरवून गावाकडून त्याची होणारी त्याची हत्या हि या पुस्तकात येते .


पुस्तकात मामाच्या घरी केलेली लग्नाची जबरदस्ती आहे … ती सामाजिक प्रथा म्हणुन आदिवासिंनि स्वीकारली आहे .  लग्न झालेल्या स्त्रीने पोलका घालायचा नाही . उघडेच फिरायचे आणि त्यासाठीचा पोलका उतरवणे- हा आदिवासी  धार्मिक  विधीही आहे .  पण त्याविरुद्ध आवाज उठवून लग्ना  नंतर पोलके घालणारी लेखकाची बालमैत्रीण हि आहे . आणि तिच्या फ़ोलोवर बनणार्या समस्त गावकरी स्त्रियाही आहेत . १ ९ ८ ०  च्या दशकापासून त्या आदिवासी जगतात झालेले बदल लेखकाने टिपले आहेत .

सगळ्या पुस्तकात कोठेही अतिरंजित शैली नाही. शहरी वाचकाला अद्भुत वाटणार्या गोष्टी वास्तवातच घडत आहेत . शिकारीचा थरार तुम्हा आम्हाला तर … कोणासाठी…  ते अन्नार्जन आहे . दिखाऊ योनिशुचिता आणि व्यसनमुक्तीच्या शहरी नैतिकतेपेक्षा वेगळी संस्कृती पहायची असेल तर पुस्तक वाचायला हवे .   सुसंस्क्रुत पणाचे मापदंड ढवळून टाकणे वगैरे राणा भीमदेवी भाषा पुस्तकात नाही पुस्तकात फक्त वर्णन आहे . नक्षल वाद्यांचे , पोलिसांचे , माणसाला ओढुन नेणार्या सर्प कन्यांचे  , लाल मुंगीच्या चटकदार चटणीचे, रानात रस्ता चुकून चकवा लावणार्या विशिष्ट वनस्पतींचे , तेंदुच्या पानांचे आणि व्यावसायिक कंत्राटदारांचे फक्त वर्णन … रसरशीत वर्णन …   पुस्तकात धडपडून आणि दारू विकून शिक्षणासाठि पैसे जोडणारी तरुण आदिवासी मुले - मुली दिसतात  आणि शहरातला पैसा सोडुन आदिवासिंसाठि दवाखाना चालवणार्या प्रकाश  आमटे या डागदारीचेही उल्लेख येतात .


डागदारी म्हणजे आदिवासी भाषेत डोक्टर .  कुणि दारू पिउन मस्त गाणी गातो म्हणुन त्याचे नाव  रेडिओ - हा रेडिओ वस्तीचा मुखिया आहे . आणि रेडी याच नावाने ओळखला जातो . कोणि लहानपणी हरवलेला माणुस आदिवासी भाषेत " बेपत्ता " म्हणुन ओळखला जातो . आणि थापाड्या आणि भूयारासारख्या पोकळ बाता मारणार्याचे   नाव " भूयाराम " म्हणुन रुढ होते . तिथे सणाला पुजारी बैल कापायला सांगतो आणि देवीला दारू हि मस्ट लागतेच .

अशी मस्त दुनिया कलंदर लेखक मिस्किल भाषेत वर्णन करत राहतो . त्यावर फारशी मते मांडत नाही.  पण गाणार्याला रेडिओ नाव पडल होत तस लेखकाच्या डेंबिस आणि बदमाश (पान क्र १ १ ) मिश्कीलीवर त्याला लहानपणी कोणते नाव पडले होते ते मात्र शेवट्पर्यंत गुलदस्त्यात राहते .

खालील धाग्यावर आम्ही माडिया  हे पुस्तक ओं लाइन उपलब्ध आहे .

http://www.pustakjatra.com/default/aamhi-madiya-m-d-ramteke/p-2502150-81109195717-cat.html1 टिप्पणी:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *